शनिवार, ऑगस्ट 23, 2025
Home Blog Page 429

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट

पुणे, दि. 15 : पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे, आमदार विजय शिवतारे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध मान्यवर तसेच महानगरपालिकेतील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 15 : राज्य सरकारच्यावतीने पोलीस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही,अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-2025’ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनेत्रा पवार, सुनील तटकरे,  आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील शेळके, हेमंत रासने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुनीत बालन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

    

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर असून ते राज्याचे उत्पादन व तंत्रज्ञानाचे हब आहे; शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नागरिक याठिकाणी येत असतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासोबत वाहतूकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. नागरिकांना उत्तमप्रकारच्या सेवा देवून त्यांना न्याय दिला पाहिजे, अपराध घडल्यानंतर अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे या गोष्टीवर प्रचंड भर पुणे पोलिसांच्या माध्यमातून देण्यात येत असतो. पुणे पोलीसांनी गंभीर घटनेच्यावेळी चांगल्या प्रकारे जलद प्रतिसाद देत त्या घटनांचा उलगडा केलेला आहे. त्यामधील आरोपींना जेरबंद करुन शिक्षा मिळत आहे, हे आपल्याकरीता अधिक महत्त्वाचे आहे. यापुढेही पुण्यासारख्या शहरांमध्ये अधिकाधिक घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमीत कमी असला पाहिजे. पोलिसांचा वावर नागरिकांना जाणवला पाहिजे.

पोलीसांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्यादृष्टीने देशातील सगळयात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म राज्याने निर्माण केला आहे. केंद्र शासनाने 1945 हा क्रमांक राज्याकरीता दिला असून तक्रारदाराला 24 तासाच्या आत कारवाई करुन अहवाल देण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्यदायी वातावरणात जगता यावे, याकरीता पोलीस कल्याणाच्यामाध्यमातून आरोग्य, निवासस्थाने अशा अनेक गोष्टी राज्यशासनाने अजेंडावर घेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

नागरिकांना उत्सव चांगल्याप्रकारे साजरा करता यावा, याकरीता राज्यातील पोलीस दल 24 तास बंदोबस्त करीत असतात, उत्सवाच्या काळात कुटुंबापासून दूर राहावे लागते, म्हणून अशा पोलिसांना आपल्या परिवारासोबत एखादा उत्सव साजरा करता यावा, याकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने  पोलिसांचा उत्सव म्हणून ‘तरंग’ एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये हास्य असले पाहिजे, त्यांना सुखशांती मिळाली पाहिजे, अपराधापासून मुक्ती मिळाली पाहिजे याकरीता पोलीस काम करीत असतात, अशा उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करुन यापुढेही अशाच प्रकारचे चांगले काम करतील, अशी अपेक्षा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

श्री. पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहिले पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे, शहरातील वाहतूक कोंडी सुटली पाहिजे, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ‘कॉप-24’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्याकरीता पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही राज्य सरकार कमी पडणार नाही. नागरिकांनीही आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

श्री. कुमार म्हणाले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मागील एक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासोबत गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या. यापुढे अधिक जोमाने करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे श्री. कुमार म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कॉप-24 उपक्रमाअंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे पाल्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली.

00000

शासकीय योजना गुणवत्तापूर्ण राबवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर, दि. १५ – केंद्र शासनाच्या सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेत. या योजना प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण राबवण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील संबंधित कार्यान्वयन यंत्रणेला आज दिले.

जिल्हा विकास समन्वय तथा संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर येथील नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर,  मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा मंत्री श्री. गडकरी यांनी घेतला.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी स्वच्छ भारत अभियान, सक्षम अंगणवाडी व पोषण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अमृत 1 व 2, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी व कचरा व्यवस्थापन योजना, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, प्रधानमंत्री आदिवासी ग्राम विकास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत आदी योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, रस्ते विकास योजना, अमृत योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यासाठी आहेत. सरकारी योजना राबविण्यात हयगय करणारे अधिकारी अथवा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी दिले

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबांना घरे द्या, पण त्याचवेळी अवैधरित्या घरांचा ताबा घेणाऱ्या लोकांवर पोलिसांच्या सुरक्षेत कारवाई करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचाही चुकीचे लोक लाभ घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही श्री. गडकरी म्हणाले.

ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन योजनेचा आढावा देखील त्यांनी घेतला. गावातून गोळा होणारा कचरा रस्त्याच्या कामात वापरता येईल का किंवा त्यातून कंपोस्ट खत तयार करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेची 137 कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर योजनेची अंमलबजावणी करताना पाइपलाइन टाकण्यापूर्वी पाण्याचा स्रोत निश्चित करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात सिकलसेल, थॅलेसिमियाची मोठी समस्या आहे.  लोक सिकलसेल, थॅलेसिमियाने ग्रस्त आहेत. या आजारांवर नागपुरात उपचार व्हावा यासाठी आपण एम्समध्ये यंत्रणा तयार करीत आहोत. याच्या  अंमलबजावणीवर लक्ष द्यावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला कुठल्याही रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सरकार मदत करेल. ही योजना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे लागू करण्यात आली आहे. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी दिले.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 15: ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी  रस्ते, पाणी, लाईट, शाळा, आरोग्य सेवा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर शासन प्राधान्याने भर देत आहे. या सुविधा पूर्णत्वास नेणे ही लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
अडुळपेठ येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन मधून अडुळ ते डिगेवाडी रस्ता सुधारणा करणे, अडुळ साळुंखेवस्ती रस्त्यावरील ओढ्यावर  साकव  बांधणे या कामांचे संयुक्त भूमीपूजन तसेच मल्हारपेठ येथे मल्हार पेठ, मंद्रूळहवेली, पानसकरवाडी, जमदाडवाडी, नवसारवाडी यांना जोडणाऱ्या मल्हार पेठ ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाटणचे उपअभियंता एस. वाय. शिंदे, डीगेवाडीचे सरपंच अर्चना नलवडे, उपसरपंच राजेश शिर्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील, मल्हारपेठचे सरपंच आर.बी. पवार, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण यांचेसह सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, गाव, वाड्या-वस्त्यांवर वॉर्ड निहाय पायाभूत सुविधांवर शासन भर देत असले तरी या सुविधांची अखंडपणे निगा राखण्यासाठी खर्च येतो.  यासाठी ग्रामपंचायतींनीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी ग्रामपंचायती स्वतःचे उत्पन्न वाढवून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. गाव स्वच्छ राहिले पाहिजे, गावातील नाले, गटारीची स्वच्छता राखली पाहिजे. बाजारपेठांमध्ये स्वच्छता असली पाहिजे. गावे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत यासाठी शासन त्यांना मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.

पेठसह परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

नाशिक, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : पेठसह परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. त्याबरोबरच सर्व विभाग प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
मंत्री श्री. झिरवाळ यांच्या विशेष प्रयत्नातून उंबरपाडा (माळेगाव) आदिवासी हुतात्मा स्मारक विकास कामे करण्याचे भूमिपूजन आज करण्यात आले. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत (ता. पेठ) यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी खासदार भास्करराव भगरे, माळेगावचे सरपंच दिलीप राऊत, माजी आमदार धनराज महाले, भास्कर गावित, भिकाजी चौधरी, दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, पेठच्या तहसीलदार आशा गांगुर्डे, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, पेठ परिसर औद्योगिक विकासाला पूरक आहे. या भागात औद्योगिक विकासाला चालना देण्यात येईल. या भागात पर्यटन विकासाची संधी आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जोगमोडी परिसरात शैक्षणिक संकुल निर्मितीला प्राधान्य देण्यात येईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अभियान राबविण्याच्या सूचना मंत्री श्री. झिरवाळ यांनी केली.
माजी आमदार श्री. महाले, श्री. गावित, श्री. चौधरी, गोपाळ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
हरिश्चंद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले. देवदत्त चौधरी यांनी परिचय करून दिला. तुषार भदाणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती भिवाजी महाले, सामाजिक कार्यकर्ते विठोबा भोये, रामभाऊ पगारे, यशवंत जाधव, गणपत पवार, मुजफ्फर खान, एकनाथ पाटील आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
०००००

सारस्वती जन्मभू : इंद्रपुरी – अमरावती

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व उत्सव अभिजात मराठीच्या निमित्ताने

दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन देश म्हणून विदर्भाचे नाव घेण्यात येते. रामायण, महाभारत, रघुवंश आदी प्राचीन ग्रंथांमधून विदर्भाचे संदर्भ येतात. कवी राजशेखरने ‘सारस्वती जन्मभूमी’ म्हणून या भूमीचा उल्लेख केलेला आहे. याच विदर्भाच्या सुवर्णाक्षरांतले एक पान इंद्रपुरीचे आहे. तीच आजची अमरावती!

येथले रिद्धपूर म्हणजे महानुभाव पंथीयांची काशी. या पंथांचे चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू यांचे वास्तव्य रिद्धपूरला होते. (१३ वे शतक ) चक्रधर स्वामींची शिष्या महदंबा महानुभाव वाङ्मयात आद्य कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिने लिहिलेले धवळे हे एक सुंदर कथागीत महानुभावांच्या मठातून सामुहिकरित्या म्हटले जाते. सुमारे 17 व्या शतकात येथे एक विद्वान ज्योतिषी आणि ग्रंथकार कृष्ण होऊन गेले. त्यांनी काही ग्रंथांची निर्मिती केली बीजगणितावर टीकाग्रंथ लिहून स्वतःचे काही नवे सिद्धांत मांडले.

संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले विदर्भ कवी म्हणजे देवनाथ महाराज (१७५४ – १८३१). त्यांनी स्थापन केलेला मुख्य मठ अंजनगाव सुर्जी येथे आहे. या मठाचे पीठाधीश देवनाथ महाराज आणि त्यानंतरचे दयाळनाथ महाराज हे आख्यानक कवी होते त्यांनी अनेक प्रसादिक कवितेची निर्मिती केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात अमरावतीतल्या अनेक लेखकांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. अमरावतीला डेप्युटी कमिशनर या पदावर कार्यरत असलेला (१८५७ – ५८) कर्नल फिलिप मेडोज टेलर या इंग्रज अधिकाऱ्याने ‘ कन्फेशन ऑफ ए ठग ‘ हा ठगांच्या जीवनमानावर खळबळ जनक ग्रंथ लिहिला होता.

पंडित विष्णुपंत पाळेकर यांनी अप्रबुद्ध या टोपण नावाने ‘ब्रम्हर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र’ हा ग्रंथही अमरावतीला वास्तव्याला असतानाच लिहिला होता. (१९२६) मृगेंद्र शंकर स्वामी हे लिंगायत पंथाचे गुरु. कन्नड व मराठी या दोन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी मराठीतून अभंग व पद रचना केली आहे. विविध ज्ञान विस्तार हे महाराष्ट्रातले एके काळचे खूप प्रसिद्ध मासिक होते (१८६७ – १९३७).  फार महत्त्वाचे लेखन म्हणून या मासिकाने अमरावतीच्या बजाबा रामचंद्र प्रधान या लेखकाची नोंद घेतली आहे. रामकृष्ण जठार हे त्यांचे समकालीन लेखक होते. कविता, नाटक आणि भाषांतरे ही मोलाची कामगिरी या दोघांनी करून ठेवली आहे.

अमरावतीच्या सरकारी हायस्कूलमध्ये शिकवून अथवा शिकून पुढे लेखक म्हणून नावारूपास आलेल्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. प्रसिद्ध नाटककार विष्णू मोरेश्वर महाजनी, रघुनाथ तळवलकर, श्रीराम जठार, गणेश गोरे, गंगाधरपंत सबनीस हे येथील मुख्याध्यापक/शिक्षक होते. मोरोपंत जोशी, इतिहास संशोधक या. मा. काळे आणि य. खु. देशपांडे,  ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर, कादंबरीकार बा. सं. गडकरी, आ. रा. देशपांडे उर्फ कवी अनिल, बा.ग. खापर्डे हे या शाळेचे विद्यार्थी होते. अनिलांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यासुद्धा अमरावतीच्याच.

वरुड येथील वखरे घराण्याने इसवी सन १६३४ पासून पुढे २५० वर्षे हस्तलिखित स्वरूपात सातत्याने लेखन केले आहे. ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ या नावाचा खळबळजनक ग्रंथ लिहिणारे स्वामी शिवानंद वरुड तालुक्यात राहायचे. या ग्रंथावरूनच आचार्य अत्रे यांना ‘ब्रह्मचारी’ हे नाटक लिहिण्याचे प्रेरणा झाली असे म्हणतात. येथलेच गणपत देशमुख या कवीला इंग्रज शासनाच्या विरोधात कविता लिहितो म्हणून अटक झाली होती.

 अमरावतीला नाटककार यांचे गाव म्हणतात ते खोटे नाही. महाराष्ट्रातील नामवंत नाट्यसंस्थांचा येथे महिना महिना मुक्काम असायचा. संपूर्ण जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने नाट्यरसिक नाटके बघायला यायची.  वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, विद्याधर गोखले, बाळकृष्ण मोहरील, नानासाहेब दिघेकर असे अनेक विख्यात नाटककार या भूमीने जन्माला घातले आहेत.

या नाटककारांवर आणि महाराष्ट्रातल्या नाट्यसंस्थांवर दादासाहेब खापर्डे (१८५४ – १९३८) यांचा वरदहस्त होता. लोकमान्य टिळकांचे ते सहकारी होते. त्यांनी पुस्तके लिहिली नसूनही त्यांचा नाट्यक्षेत्रात इतका दबदबा होता की पहिल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत (नाशिक, २८ ऑगस्ट १९०५). बालगंधर्वांचे बालपण येथल्या खापर्डे वाड्यात गेले आहे. वीर वामनराव जोशींनी इंग्रज सरकार विरोधात लिहिलेल्या नाटकावर बंदी आली होती. दीनानाथ मंगेशकर यांनी महाराष्ट्रभर त्यांची नाटके गाजवली. विद्याधर गोखले यांनी संगीत नाटकांना जी अवकळा आली होती, त्यांना पुनर्जीवित केले. सुप्रसिद्ध साहित्यिक विश्राम बेडेकर जन्माने अमरावतीचेच. चित्रपट, नाटक आणि साहित्यलेखनातली त्यांची कारकीर्द बहुतेकांना ज्ञात आहे.

अमरावती जिल्हा हा साहित्य आणि संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कवी कृष्णमूर्ती, गोपाळराव बेडेकर, ना. कृ. दिवाणजी, काकासाहेब सहस्त्रबुद्धे, वि. रा.हंबर्डे, राज सरंजामे, डॉ भगवानराव म्हैसाळकर, मा. ल.  व्यवहारे, पु. य. देशपांडे, कृष्णाबाई खरे.अ. तु. वाळके, जा.दा. राऊळकर, वासुदेवशास्त्री खरे, भाऊसाहेब असनारे, संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, गीता साने, सुदामजी सावरकर,  विमलाबाई देशपांडे आदींनी आपल्या लेखनकर्तुत्वाने एक काळ गाजवला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांच्या लेखनाची जनमानसावरील पकड आजही कायम आहे. संत गाडगेबाबा यांचे शिक्षण झाले नसले तरीही त्यांच्या नावे आज अमरावती विद्यापीठ स्थापन झाले आहे.  दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही गुलाबराव महाराजांनी प्रचंड साहित्य संपदा कशी निर्माण करून ठेवली असेल याचा अचंबा वाटतो.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक फार मोठी साहित्यिकांची पिढी अमरावती जिल्ह्यात निर्माण झाली. लेखकांचे प्रेरणास्थान डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी संस्थेमुळे अनेकांना शिक्षण घेता आले. इथल्या सरकारी विदर्भ महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक कार्यरत होते. वि भि कोलते, नातू बाई, शंकर वैद्य, कथाकार शांताराम, रा.ग. जाधव आदी लेखक कवी येथे प्राध्यापक होते. नंतरच्या पिढीतले आपल्या आगळ्यावेगळ्या कवितांनी आणि गद्य लेखनाने एकूण मराठी साहित्यावर आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे वसंत आबाजी डहाके आणि कवयित्री प्रभा गणोरकर,  लेखिका सुशीला पाटील, समीक्षक विवेक गोखले आणि प्राचार्य विजया डबीर, डॉ मधुकर आष्टीकर यांनीसुद्धा येथे प्राध्यापकी केली आहे. वसंत आबाजी डहाके यांनी नाट्यधर्मी नावाची नाट्यसंस्था स्थापन करून अनेक नाटकांचे प्रयोग केले होते.

सुप्रसिद्ध साहित्यिक ‘धग’ कार उद्धव शेळके, ‘माणूस’ कार मनोहर तल्हार, अभंगकार आणि ललित लेखक मधुकर केचे, कथाकार दे गो उदापुरे, कवी तुळशीराम काजे, प्राचार्य राम शेवाळकर, वऱ्हाडीतून अभंग लिहिणारे शरदचंद्र सिन्हा, कथाकार वामन प्रभू,आणि विख्यात कवी गझलकार सुरेश भट इ. साहित्यिकांचे लेखन चिरंजीवी ठरले आहे.

अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, वनिता समाज, नगर वाचनालय आणि तपोवन या दोन संस्था आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये अनेक साहित्य विशेष कार्यक्रम राबवले गेले आहेत. येथून एके काळी रंग आणि धारा नावाचे दर्जेदार मासिके प्रकाशित होत असत. महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक त्यांत लेखन करीत असत. इथल्या महाराष्ट्र प्रकाशन संस्थेने अनेक थोरामोठ्या साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. अमरावतीत आजही अनेक प्रकाशन संस्था कार्यरत आहेत. येथल्या पॉप्युलर बुक डेपोमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व नामवंत प्रकाशनाची पुस्तके उपलब्ध असतात.

१९७० च्या दशकात अमरावती आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक साहित्यिकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. मधुकर वाकोडे, जनसाहित्य ही संकल्पना राबवून अनेकांना आपल्या अक्षर वैदर्भी या मासिकातून लिहिते करणारे डॉ सुभाष सावरकर, अगदी वेगळ्या धाटणीची कविता लिहिणारे देवानंद गोरडे, राजकीय व्यक्ती असल्या तरीही कविता लेखन करणाऱ्या उषाताई चौधरी आणि प्रकाशदादा चौधरी, निसर्गलेखक श्याम देशपांडे, कादंबरीकार डॉ रमेश अंधारे, प्रा. श्याम सोनारे, प्रा. कृष्णा चौधरी, प्रा.माणिक कानेड, केशव बोबडे,  पद्माकर निमदेव, गो ल रडके, गीत गोविंदकार मनोहर कवीश्वर, कवयित्री कविता डवरे इ. साहित्यिकांच्या या पीढीने भरभरून लिहिलेले आहे.  तदनंतरच्या पिढीत इतके साहित्यिक निर्माण झाले आहे की साऱ्यांची नोंद घेणे शक्य नाही.

लेखनाचे सर्व प्रकार हाताळून शंभरावर पुस्तके लिहिणाऱ्या आणि तितकेच पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले, अनेक संस्थांचे पदाधिकारी असलेले ग्रामीण कथाकार डॉ. सतीश तराळ, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.अक्षयकुमार काळे, भावगर्भ कविता लिहून जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारे बबन सराडकर, मराठी साहित्याला अभंगांची अप्रतिम देण देणारे डॉ. सुखदेव ढाणके, कथा आणि ललित लेखिका मुक्ता केचे, विशेष शैलीकार कवी रमेश मगरे, कथा, कादंबरी आणि कविताकार राम देशमुख, तीव्र सामाजिक जाणीवेच्या कविता लिहिणारे प्रा. अशोक थोरात, कथाकार सुरेश आकोटकर आणि कवयित्री डॉ. रेषा, डॉ. कुमार आणि विद्या बोबडे, बहुआयामी लेखन करणारे खडू शिल्पकार डॉ राज यावलीकर, सुप्रसिद्ध कवयित्री डॉ शोभा रोकडे, कवयित्री रजनी राठी, कवी आणि गझलकार विष्णू सोळंके, कवी आणि कथाकार निळकंठ गोपाळ मेंढे, कवी आणि नाट्य अभिनेते तात्या संगेकर आणि अनुराधा संगेकर, नाटककार डॉ. सतीश पावडे, कवी कादंबरीकार मनोहर परिमल, डॉ. नरेश काठोळे, डॉ. मोना चिमोटे, भालचंद्र रेवणे, मयुरा देशमुख, सुरेश शुक्ल, विनोदी लेखक जनार्दन दातार, डॉ. गोविंद कासट, डॉ. सुभाष गवई, डॉ. शोभा गायकवाड, गजानन देशमुख, डॉ. अजय खडसे, अनिल जावळे, पक्षीमित्र आणि निसर्गमित्र प्र सु हिरूरकर इ.

 आज एक तरुण पिढी आपापल्या साहित्यविशेष क्षेत्रात दमदारपणे वाटचाल करीत आहे. डॉ. अशोक पळवेकर, सुनील यावलीकर, गझलकार नितीन भट, गझलकार अनिल जाधव, सौ. सुलभा गोगरकर, प्रीती बनारसे, प्रमोद चोबितकर, अनिल जवंजाळ, संजय खडसे, प्रा. अनिल प्रांजळे, दिगंबर झाडे, विशाल मोहोड, संदीप गावंडे, नितीन देशमुख, पवन नालट, राजेश महल्ले इ.

 येथल्या हिंदुस्थान, जनमाध्यम, मातृभूमी आणि नागपूरहून निघणाऱ्या तमाम मराठी दैनिकांनी लेखकांच्या लेखनाला प्रसिद्धी देऊन साहित्यसेवेचे मोलाचे कार्य केले आहे. काही संस्थामार्फत पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात आणि साहित्य संमेलने भरवली जातात. मराठी प्रमाणेच हिंदी आणि उर्दूमध्ये लेखन करणारे बरेच साहित्यिक या मातीत जन्मले, रुजले आणि त्यांनी भरभरून साहित्यसेवा केली आहे. हिंदीमधून आपल्या ग्रंथसंपदाची निर्मिती करणारे भगवान वैद्य ‘प्रखर’ यांनी अनेक मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे हिंदी भाषेतून अनुवाद प्रकाशित केले आहेत. तेलगू लेखिका सुजनादेवी आचार्य यांनी सुप्रसिद्ध लेखक जयंत नारळीकर यांच्या एका कादंबरीचा तेलगू भाषेत अनुवाद केला आहे. कविवर्य सुरेश भट यांना उर्दूचे धडे देणारे वली सिद्दीकी हे अमरावतीचेच. साहित्य, संगीत, नाटक अशा विविध सांस्कृतिक क्षेत्रात अमरावती जिल्ह्याने दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्याचाच हा धावता आढावा!

 

सुरेश आकोटकर,

अमरावती

मो.नं – 9967897975

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 15 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्त) : सध्याच्या डिजिटील युगामध्ये नागरीकांचा वाचण्याकडे कल कमी होत चाललेला आहे. वाचनाने माणूस समृध्द होत असल्याने ही वाचन संस्कृती वाढविण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे, ज्येष्ठांचे टोणगांवकर ग्रंथालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन दादासाहेब रावल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, दोंडाईचा येथे आज मान्यवरांच्या उपास्थितीत संपन्न झाले, यावेळी ते दूरदुष्यप्रणालीद्वारे देण्यात आलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशात बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, 5 वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य समेलनाचे अध्यक्ष सुभाष भामरे, उद्योगपती सरकारसाहेब रावल, माजी नगराध्यक्षा नयनकुंवरजी रावल, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अपर तहसिलदार संभाजी पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजीव गिरासे, ज्येष्ठ शाहीर लोककलावंत श्रावण वाणी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, धुळे ग्रंथोत्सव 2024 या कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या सगळ्यांचा साक्षीने पहिल्यांदा दोंडाईचा इथे होत आहे. वाचन संस्कृती ही पूर्वीपासून आपल्या देशामध्ये आहे. पूर्वीपासून वाचन, ज्ञान प्राप्त करणं आणि त्याच्या माध्यमातून जीवन जगणं ही भारतामध्ये हजारो वर्षांपासूनची परंपरा राहिलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आणि विशेषतः आता या मोबाईलच्या युगामध्ये वाचन संस्कृतीकडे लोकांचा कल कमी होत चाललेला आहे. परंतु जो वाचेल, तोच वाचेल या उक्तीप्रमाणे सर्वांनी वाचण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, लोकांना प्रोत्साहित करणं, लोकांची व्यवस्था करून देणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लहानपणापासूनच लक्ष दिले पाहिजे. त्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, येत्या काळात दोंडाईचा येथे एक मोठं वाचनालय उघडण्याचा प्रयत्न राहील.

खासदार डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या की, ग्रंथोत्सव म्हटलं म्हणजे सर्व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणी असते. या दोन दिवसात याठिकाणी सर्वांना ज्ञानाचं भांडार उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निश्चितपणे पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून निश्चितपणे स्फूर्ती निर्माण होते. त्यामुळे सर्वांनी ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या, तसेच  विविध साहित्य नियमित वाचले पाहिजे. वाचनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मार्गदर्शन होत असतं त्याचा देखील लाभ आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. आपल्या ज्ञानातून प्रगल्भता आपल्याला जर वाढवायची असेल तर पुस्तक वाचले पाहिजे.  आज युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असतांना त्याला आळा घालायचा असेल तर तो पुस्तकांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातूनच घालता येईल. ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्तीमत्त्व विकास होतो, आपल्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपलं जे काही ध्येय आहे ते निश्चित करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, समाजातील प्रश्न जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करणे आवश्यक आहे. पुढील काळ अतिशय कठीण आहेत या पुढच्या कठीण दिवसांचा जर सामना करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी  नियमित वाचन करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यामधील उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात पुढे जाणे आवश्यक आहे. याकरीता नियमित वाचनाची सवय लावावी. या ठिकाणी अनेक पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. येथून प्रत्येकाने किमान एक तरी  पुस्तक खरेदी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सरकारसाहेब रावल म्हणाले की, ग्रंथामध्ये खुप ताकद असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित कथा, कांदबरीचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यांनी यावेळी रामायण, महाभारतासह विविध ग्रंथाचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना ग्रंथाचे महत्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष अहिरे म्हणाले की, धार्मिक कुंभमेळा प्रयागराज होत असतांना दोंडाईच्या नगरीत ग्रंथाचा उत्सव होत आहेत. याचे श्रेय पालकमंत्री श्री. रावल यांना जाते. जयकुमार रावल अहिराणी बोलतात, अहिराणी सांगतात आणि अहिराणी जपतात आणि गावाच्या मातीवर काळजापासून प्रेम करतात. म्हणून महाराष्ट्र शासनाचा ग्रंथोत्सव दोंडाईचा येथे घेऊन दोंडाईचा वासीयांसाठी ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथाशी मैत्री केली ते घटनाकार झाले, अबु्दल कलाम यांनी ग्रंथाशी मैत्री केली ते देशाचे देशाचे राष्ट्रपती झाले. जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनीही ग्रंथाशी मैत्री केली म्हणून ते जिल्हाधिकारी झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  ग्रंथाची मैत्री सोडू नका, ग्रंथांसोबत आपले असलेल नाते तोडू नका. ग्रंथ हे माणसाला जगायला, वागायला शिकवतात असेही त्यांनी सांगितले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांच्या स्टॉलचे उद्धटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा गुजराती तर अविनाश भदाणे यांनी आभार मानले. यावेळी स्वो.नि.संस्था सेक्रेटरी सी.एन.गिरासे, सचिव ललितसिह गिरासे, दादासाहेब रावल नॉलेज सिटीचे प्राचार्य के.डी.गिरासे. डी.आर.बी.ओ.डी.हायस्कुल चे प्राचार्य व्ही.बी. चौधरी, टोणगांवकर ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ.श्रीराम महाजन, गर्ल्स हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यायलयाच्या प्राचार्या एन.डी. गिरासे, यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी, कवि, कथाकथनकार, नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथोत्सवाचा शुभारंभ ग्रथदिंडीने राणीमॉसाहेब मनुपादेवी राऊळ, गर्ल्स हास्कुल व ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा येथुन माजी नगराध्यक्षा ताईसो नयनकुंवरजी रावल यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथपुजनाने झाला. या ग्रंथदिंडीत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदृगांसह, लेझिम नृत्य सादर केले. ही ग्रंथदिंडी राणीमॉसाहेब मनुपादेवी राऊळ, गर्ल्स हास्कुल व ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा येथून शहिद अब्दुल हमीद चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-नगरपालिका मार्गे, दादासाहेब रावल हायस्कुल, दोंडाईचा येथे पोहचली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांसह संयोजन समितीचे सदस्य व विविध शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, नागरीक, साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी सहभागी झाले होते.

याठिकाणी वाचनप्रेमींसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ, साहित्य व वाड्.मय विषयक पुस्तके विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सवात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश राहणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले येत आहे.

ग्रंथोत्सवात आज होणारे कार्यक्रम

रविवार, 16 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 ते 12 वाजे दरम्यान ‘खान्देशातील अहिराणी साहित्याची वाटचाल’या विषयावर परिसंवाद कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ. फुला बागुल, प्राध्यापक डॉ. रमेश माने यांचा सहभाग असणार आहे.

दुपारी 1 ते 2 वाजे दरम्यान ‘कथाकथन’चा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिराणी कथाकार प्रविण माळी, साहित्यिक सुरेश मोरे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 2 ते 4 वाजे दरम्यान क-कवितेचा हा बहुभाषिक कवी संमेलनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभाकर शेळके असतील. ग्रंथोत्सव समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजता उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

उत्सव अभिजात मराठीचा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे  २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. हे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे  हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक हात मदत करत आहे. शासनही याला पाठबळ देत आहे.  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.                                                                                        

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: काय बदल होणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारताची समृद्ध भाषिक परंपरा लक्षात घेता, विविध भाषांना त्यांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या दृष्टीने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी मोठी चालना मिळेल. या दर्जामुळे मराठी भाषेच्या अभ्यासकांना, संशोधकांना आणि साहित्यप्रेमींना अनेक संधी मिळतील.

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय?

भारत सरकारने काही विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यामध्ये खालील प्रमुख अटी पूर्ण करणाऱ्या भाषांचा समावेश होतो.

प्राचीन वारसा: संबंधित भाषेचा उगम आणि तिचा लिखित इतिहास किमान १५०० वर्षे जुना असावा. समृद्ध साहित्य परंपरा: भाषा केवळ बोलीभाषा नसून तिच्या साहित्य वारशाचा स्वतंत्र ठेवा असावा. मूळ लिपी आणि व्याकरण: भाषेची स्वतःची व्याकरणशास्त्र आणि लिपी असावी. संस्कृती आणि परंपरेशी नातं: भाषेचे साहित्य आणि परंपरा आधुनिक भारतीय भाषांवर मोठा प्रभाव टाकत असाव्यात. संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, मलयाळम आणि ओडिया या भाषांना आधीच हा दर्जा प्राप्त झाला आहे. आता मराठीलाही हा बहुमान मिळाल्याने मोठे बदल घडणार आहेत.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने होणारे फायदे

1) मराठीच्या बोलीभाषांचा आणि व्याकरणाचा सखोल अभ्यास

मराठीत अनेक बोलीभाषा आहेत, जसे की कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी, मालवणी इत्यादी. या बोलींचा अभ्यास, संशोधन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रोत्साहन मिळेल.

2) संशोधन आणि साहित्यवाढीला चालना

अभिजात भाषेसाठी केंद्र सरकार संशोधन कार्यक्रमांना अधिक आर्थिक मदत देते. मराठी भाषेतील साहित्य, लेखन आणि ऐतिहासिक ग्रंथांचे संरक्षण करण्यासाठी विशेष योजना आखल्या जातील.

मराठीत प्राचीन हस्तलिखित ग्रंथांचे संकलन, संगणकीकरण आणि भाषांतर करण्यासाठी निधी दिला जाईल.

3) शैक्षणिक संधी आणि विद्यापीठांमध्ये अधिक महत्त्व

भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा निर्माण केली जाऊ शकते. मराठीतील संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व मिळेल. मराठी अभ्यासक्रमांना नवीन संधी उपलब्ध होतील आणि विद्यापीठांना यासाठी विशेष अनुदान मिळेल.

4) सरकारी अनुदान आणि मदत

अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी देते. मराठी भाषेच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी काम करणाऱ्या संस्था, संशोधक आणि साहित्यिकांना आर्थिक मदत मिळेल.  मराठी संस्कृतीशी निगडित विविध उपक्रमांना अधिक प्रोत्साहन दिले जाईल.

5) राष्ट्रीय पुरस्कार आणि गौरव

अभिजात भाषेतील उत्कृष्ट संशोधनासाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे मराठीतील भाषातज्ज्ञ, साहित्यिक आणि संशोधक यांना हे पुरस्कार मिळू शकतील. मराठी भाषेच्या वृद्धीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना केंद्र सरकारकडून गौरव मिळेल.

6) आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आणि महत्त्व

अभिजात भाषांचा दर्जा मिळालेल्या भाषा अधिक सन्माननीय मानल्या जातात. यामुळे जागतिक स्तरावर मराठी भाषा आणि तिच्या समृद्ध साहित्याला अधिक मान्यता मिळेल. मराठी भाषा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता वाढेल.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही मराठी भाषिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. यामुळे भाषा टिकवण्यासाठी, तिच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करता येतील. संशोधन, शैक्षणिक संधी, साहित्यवाढ आणि सरकारी मदतीमुळे मराठीचा विकास वेगाने होईल.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रायगड – अलिबाग

अभिजात मराठी : नव्या ध्येयाकडे वाटचाल…

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हे वृत्त वाचल्यावर अमराठी  कुटुंबातला असूनही मला अतिशय आनंद झाला. कारण अमराठी असूनही माझी वाणी आणि लेखणी या दोघोवर माय मराठी प्रसन्न आहे. ती कशी काय?  याच्या तपशीलात जाणार नाही पण आनंदाची अनुभुती मन प्रफुल्लीत करणारी आहे. मात्र सोबतच मराठीला खूप उशिरा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणुन खूप थोडे वाईटही वाटले. कारण हजारो वर्षापासूनचा इतिहास संभाळणारी जगात 10 व्या आणि भारतात 3 –या क्रमांकावर असणारी आणि मानवी जीवनाच्या विविध क्षेत्राशी सबंधीत मौलिक साहित्य पसरवणारी मराठी भाषा अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा मिळविण्यापासून अनेक वर्ष वंचित राहिली. तामिळ भाषेला इ.स.2000 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठीला सर्व निकष पूर्ण करण्याची क्षमता असूनही हा दर्जा मिळविण्यासाठी इ.स.2024 पर्यंत म्हणजे तब्बल 20 वर्षे वाट पहावी लागली हे दुदैवच म्हणावे लागेल. ‘देर आए दुरुस्त आए’ या हिंदी म्हणीप्रमाणे समाधान मानण्यास हरकत नाही.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे सिद्ध झाले की, ही प्राचीन भाषा आहे. या भाषेत अभिजात व दर्जेदार साहित्याची निर्मिती झाली आहे. लिळाचरित्र, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी, गाथा सप्तशती, तुकारामाची गाथा आणि इतर संत वाङमयाने समृद्ध असे साहित्य मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचा वेध घेणारे आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व वैज्ञानिक क्षेत्रातही मौलिक साहित्याची निर्मिती मराठीतून झालेली आहे. मराठी भाषेला स्वतंत्र अस्तित्व असून तिचे स्वत:चे व्याकरण आहे. साहित्यिक मुल्ये  व परंपरेचा मोठा वारसा  या भाषेला लाभला आहे. या सर्व बाबी आज अधिकृतरित्या मान्य झालेल्या आहेत. म्हणून मराठी भाषेच्या इतिहासात सुवर्णांक्षराने नोंद करणारा हा क्षण आहे. समस्त मराठी बांधव यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. कारण आपल्यापैकी अनेकांनी या क्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष केला आहे.

भाषा ही पिढ्या न पिढ्या लोकजीवनाचा, सामाजिक मुल्ये व विचारांचा आणि संस्कृतीचा भाग असते. सांस्कृतिक जीवनाची अभिव्यक्ती भाषेच्या माध्यमातून होत असते. ज्यामुळे एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो तेव्हा तिच्या साहित्यिक परंपरेचा गौरव असतो. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्या भाषेला शासकीय पाठबळ प्राप्त होते. त्यामुळे संशोधन आणि अध्ययनाला अधिक वाव मिळतो. भाषेचे संवर्धन व तिच्या प्रचार – प्रसाराला नवे आयाम प्राप्त होतात. भाषेच्या विकासाला एक गती प्राप्त होऊन त्या भाषेला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होते.

अभिजात हा शब्दच मुळात श्रेष्ठत्व दर्शविणारा आणि वर्चस्व वृत्तीचा सूचक मानला जातो. म्हणून मराठी भाषेचा फार मोठा विजय आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्याची क्षमता व्दिगुणित होणार आणि मराठीची विजयी पताका आता देशभर मिरविणार यात शंका नाही.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार आणि नवी ध्येये गाठण्याकरीता त्याचा कसा उपयोग होणार हे खालील मुद्यांच्या आधारे स्पष्ट  करता येईल.

मराठी भाषा आणि बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल. परिणामी नवीन संशोधन आणि साहित्यसंग्रह यांना चालना मिळेल.

भारतातील 450 विद्यापीठातून मराठी भाषेचे अध्यापन स्थापन करता येईल व त्यातून मराठी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध केली जाऊ शकेल.

मराठीतील प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करण्यास सुरुवात होईल. राज्यातील 12 हजार ग्रंथालये सशक्त होतील. त्यांची दुरवस्था संपेल.

मराठी भाषा जपण्यासाठी, तिच्या उत्कर्षासाठी आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती व विद्यार्थी यांना मोठी मदत मिळू शकेल.

अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल.

अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषांना दिला जातो. त्या भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान दिले जाते.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर इतके सगळे फायदे आता मराठी भाषा व मराठी  माणसाला मिळणार आहेत. पण ही तर सुरवात आहे. आपल्याला नवी ध्येये गाठण्याची आणि नवी नवी क्षितीजे पादाक्रांत करण्याची दिशा मिळाली आहे. संधीही उपलब्ध झाली आहे, पण या संधीच सोनं करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. आता गरज आहे. मराठी भाषेला तिच्या पर्वाचा उत्सव साजरा करण्याची आणि तिच्या उज्वल भविष्यासाठी कसोशीने उभे राहण्याची.

आज मराठी भाषेची काय स्थिती आहे ते लपून राहिलेले नाही. त्याची चर्चा करणार नाही पण एक इशारा द्यावासा वाटतो की हीच स्थिती जर कायम राहिली तर अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही काहीच उपयोग होणार नाही.

मराठीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी मराठी माध्यमांच्या शाळा जगणे अत्यंत आवश्यक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यासाठी शासन, समाज, संस्थाचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांना जबाबदारीच्या भावनेने प्रामाणिक प्रयत्न करावे, लागतील याबाबत दुमत असू शकत नाही.

०००

  • प्रा. शेख हाशम, 9372028943

वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पूरक : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

नवी दिल्ली, दि. 15 : वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचाच परिणाम म्हणून या सुरू असलेल्या भारत टेक्स एक्सपो मध्ये महाराष्ट्रासोबत 380 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत, या करारामधून राज्यात दोन हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे दिली.

प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे 14 ते 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान ‘भारत टेक्स एक्सपो 2025’ आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याने नॉलेज पार्टनर राज्य म्हणून सहभाग घेतला आहे. आज विविध सामंजस्य करार वस्त्रोद्योग मंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आज महाराष्ट्र राज्याच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले त्यावेळी श्री.सावकारे बोलत होते. 

यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव नीलम शमीरा, राज्यातील वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, रेशीम संचालनालयाचे संचालक डॉ.विनय मून मंचावर उपस्थित होते.

श्री.सावकारे म्हणाले, वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. महाराष्ट्रात या संदर्भात चांगले काम होत आहे. महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी नवनवीन योजना तयार करून अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी महाराष्ट्र शासन वीज पुरवठा, जमीन उपलब्ध करून देणे आणि निगडित असणाऱ्या बाबींवर अनुदान देत आहे. याचा परिणाम वस्त्रोद्योग चांगली भरारी घेत आहे. केंद्र सरकारचा महाराष्ट्र शासनाला पूर्ण पाठिंबा असल्याचेही श्री सावकारे यांनी यावेळी सांगितले.

वस्त्रोद्योग क्षेत्रात सादरीकरणालाही फार महत्त्व असून या उद्योगात असणारे पारंपरिक व्यावसायिकांनी सादरीकरणावर आणि जाहिरातीवरही भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग धोरण आणून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी नवीन उमेद निर्माण केली आहे.

राज्य शासनाने 100 दिवसात करावयाच्या कामांतर्गत नागपूर येथे अर्बन हार्ट सुरू करण्यात येईल. याअंतर्गत या ठिकाणी वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकर, कलाकुसर करणारे कलाकार स्वतःच्या सामानांची विक्री एकाच ठिकाणी वर्षभर करू शकतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यासह अमरावती येथे पीएम मित्र पार्क वस्त्रोद्योगासाठी तयार केलेले आहे, असेही सावकारे यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव नीलम शमीरा यांनी महाराष्ट्रात पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडित चांगले काम सुरू आहे. इचलकरंजी सारख्या छोट्या शहरात एक लाखापेक्षा अधिक यंत्रमाग आहेत, अशीच इचलकरंजी सारखी गावे भारतात इतरत्र सुरू करण्याचा केंद्र शासनाचा मानस असल्याचे सांगितले. केंद्र शासन वस्त्रोद्योग वाढीसाठी सर्वतोपरीने महाराष्ट्र राज्याला मदत करत आलेला आहे यापुढेही करत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सचिव विरेंद्र सिंह यांनी आपल्या मनोगतात म्हणाले,  वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणारे लोक हे उत्कटतेने काम करतात, त्यांना शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील आणि तोच प्रयत्न महाराष्ट्र शासन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आज झालेल्या सत्रामध्ये महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन’ चे लॉन्चिंग करण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील हातमाग विणकारांवर आधारित ‘करघा’ या वेब सिरीजचे तसेच Anthem चे लॉन्चिंग करण्यात आले. करघा या वेब सिरीज चा पहिला भाग हिमरू पारंपरिक या प्रकारावर असून तो दाखविण्यात आला. सर्वांसाठी ही वेब सिरीज 28 तारखेपासून प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

या कार्यक्रमामध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, रेशीम संचालनालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ असे एकूण ५ स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्र अधिक ठळक दिसेल यासाठी उपसचिव श्रीकृष्ण पवार, कक्ष अधिकारी प्रमोद पवार, अंजुम पठाण यांनी विशेष प्रयत्न केला.

000000

ताज्या बातम्या

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू...

0
पुणे, दि. २२ : शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या ‘मी विकासयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. २२: ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. लोकांच्या सहभागातून शासनाच्या योजना कशा यशस्वी होऊ शकतात हे...

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत – वनमंत्री गणेश नाईक 

0
ठाणे,दि. २२ (जिमाका):- गणेशोत्सवामध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, असे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश...

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (जिमाका)- आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा, त्यासाठी रुग्णालयांनी तत्पर...

करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

0
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख...