मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 395

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. २३ :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या आमदार मनीषा कायंदे तसेच विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार व विशेष कार्य अधिकारी सोमनाथ सानप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

अन्न व पोषण सुरक्षा व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत २८ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. २३ : अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. तरी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर २८ जानेवारी, २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच कडधान्यामध्ये  बीज प्रक्रिया ड्रम (seed treatment drum), पौष्टिक तृणधान्य अंतर्गत (pulveriser) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र (Dibbler), मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील (Seed drill), छोटे तेल घाणा सयंत्र (oil extraction unit ) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यांत्रिकीकरण व सिंचन (Mechanization and Irrigation) या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक जागतिक दर्जाचे करावे – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 23 : संपूर्ण जगासाठी आकर्षण आणि प्रेरणादायी ठरणारे, दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करावे. एप्रिल 2026 पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्याचा मानस असून स्मारकाचे काम दर्जेदार करावे, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या. तसेच स्मारकासाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले. दादर इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाची आज मंत्री श्री. शिरसाट यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, सहायक आयुक्त प्रसाद खैरनार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा, स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

सध्या येथील इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. या स्मारकामध्ये शंभर फूट उंच पीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूने आच्छादित ३५० फुट उंचीचा पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. या स्मारकाचा संपूर्ण परिसर हरित असेल, या ठिकाणी एक हजार आसन क्षमता असलेले सभागृह, संशोधन केंद्र, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

दरडप्रवण गावांचे पुनर्वसन धोरणात सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मागवावेत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

मुंबई, दि. २३ :  दरडप्रवण गावांच्या पूनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिल्या. याबाबत शासनाचे ऑक्टोबर २०२२ मध्ये धोरण ठरवण्यात आले आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या उपस्थितीत दरडप्रवण गावांचे पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस आपत्ती व्यवस्थापनचे संचालक सतीशकुमार खडके, सह सचिव संजय इंगळे, अवर सचिव प्रितमकुमार जावळे यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टी, पूर, भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविणे, पुनर्वसनासाठी पात्र लाभार्थ्यांचे निकष या धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच पुनर्वसित ठिकाणी १२ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात तरतूद करण्यात आली आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले की, या धोरणाची अंमलबजावणी करताना क्षेत्रीय स्तरावर काही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी तज्ज्ञ आणि संबंधित विभागांच्या सल्ल्यानुसार, या धोरणात आणखी काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे या धोरणात सुधारणा करणे व आणखी काही बाबींचा समावेश करणेबाबत क्षेत्रीय स्तरावरून सूचना घेणे आवश्यक आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान लोकचळवळ व्हावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 23 : राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावे आणि ती एक लोकचळवळ व्हावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. कुर्ला बसस्थानक येथे या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, आपण आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणेच आपण जिथे काम करतो, तेथे देखील आपले घर समजून त्या कार्यालयाची, त्या बसस्थानकाची स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यात स्वच्छ, सुंदर, सुशोभित बसस्थानके नक्कीच प्रवाशांना आकर्षित करतील.  अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये बस प्रवास करण्याचा आनंद त्यांना घेता येईल. अर्थात स्वच्छता हा एक “संस्कार” आहे, तो जसा एसटी कर्मचाऱ्यांनी अंगिकारणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रवाशांनीही तो आपल्या आचरणात आणला पाहिजे. बसस्थानक ही सार्वजनिक जागा आहे. तिथे स्वच्छता ठेवणे ही एसटी कर्मचारी आणि प्रवासी या दोघांची संयुक्त जबाबदारी आहे.

स्वच्छतेबाबत परदेशात जेवढी सजगता आणि जागरूकता आहे, तेवढी आपल्या देशात नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करून आपली बस स्थानके स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. या स्पर्धात्मक अभियानातून एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आपले बसस्थानक स्वच्छ, सुंदर व टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या माध्यमातून भविष्यात चांगली सुंदर बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील, अशी  आशाही मंत्री श्री. सरनाईक यांनी व्यक्त केली.

एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख यांनी प्रास्ताविक केले, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभियानाची रुपरेषा मांडली, तर उपमहाव्यवस्थापक जयेश बामणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला एसटीचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका ४.४ अ, १० व ११ संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

ठाणे,दि.22(जिमाका):- जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकऱ्यांसोबत चर्चा संपन्न झाली.

या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, नायब तहसिलदार श्री.पैठणकर, एमएमआरडीए, भूमी अभिलेख, तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी तसेच प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी/ कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होता कामा नये. मेट्रो कारशेड संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही परंतू कब्जा आहे. ही जमीन शासनाची असेल तर नवी मुंबई क्षेत्रात देणात येणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क संदर्भात राज्यात जो मोबदला धोरण राबविले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 आहे, त्यांना 22.5 टक्के मोबदला शासनाच्या नियमानुसार देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही परंतू अतिक्रमण कब्जा आहे व ती जमीन शासनाची आहे, त्या ठिकाणी 12.5 टक्के शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात येईल.  मी याच मतदानसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. या शेतकऱ्यांनी मला निवडून दिले आहे. मी त्यांची काळजी निश्चित घेईन. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना मोबदला देण्यात येणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण आहे. त्यासंदर्भात त्यांना कशा प्रकारचा मोबदला म्हणजे वस्तूनिहाय प्लॉट, तेथील रस्ते, गटारे, भूखंड, इलेक्ट्रॉनिक पोल, शेतकऱ्यांस कसा फायदा होईल व पुनर्वसन कसे होईल, याविषयी त्यांनी सांगितले.

मात्र या बैठकीत सर्व 198 शेतकरी उपस्थित न राहिल्याने मंत्री महोदयांनी पुढील 7 फेबुवारी रोजी बैठक घेवून पुढील निर्णयाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बाधित शेतकऱ्यांना आपले मत विचारात घेवून हा प्रश्न सोडविला जाईल याची ग्वाही दिली. एफएसआय, बफर झोन, प्लॉट या सर्व मुद्यांबाबत आपण सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करुनच निर्णय घेवू.

याप्रसंगी बाधित शेतकरी बबन दामोदर भोईर आपली कैफियत मांडताना म्हणाले की, कांदळवन जमीन व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना सरसकट मोबदला मिळाला पाहिजे. शासनाने जीआर मध्ये 22.5 टक्के व 12 .5 टक्के बाबत केलेला उल्लेख नाही. तसेच मालकीच्या 7/12 हद्दीबाहेर बाबत योग्य निर्णय व्हावा.

विनित ठाकूर यांनी खारभूमी शेतकरी समिती संस्थेस तसेच शेतकऱ्यांना 15 दिवसांची मुदत देऊन शासन व प्रशासनाचे धोरण कळविल्यास आम्ही गावकरी चर्चा करुन निर्णय घेवू. या प्रकल्पास आमचा विरोध नाही परंतू मोबदला कशा प्रकारचा देणार, याचा लेखी उल्लेख असावा, असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अटी व शर्तींसह खेळाचे मैदान, हॉस्पिटल, शाळा, कौशल्य शिक्षण, नजराना माफ, मेट्रो कारशेडला श्री कापरा देवाचे नाव देणे आदी विषयांबाबत लेखी निवेदन दिले.

याप्रसंगी परिवहन मंत्री यांनी 198 बाधित सर्व शेतकऱ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना देवून दि.07 फेब्रुवारी 2025 रोजी पुढील बैठक होईल, असे शेवटी सांगितले.

00000

राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई, दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघलराज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारीकर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

Governor offers tribute to Netaji Subhas Chandra Bose, Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray 

Maharashtra Governor  C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portraits of  Netaji Subhas Chandra Bose  and Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray on the occasion of their birth anniversary at Raj Bhavan, Mumbai.

Secretary to the Governor Shweta Singhal, Comptroller of the Governor’s Households Jitendra Wagh, staff and officers of Raj Bhavan and State police were present on this occasion.

0000

आदिवासींच्या प्रश्नांवर राजकारणापलीकडे विचार व्हावा – राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन

मुंबई, दि. 23 : आदिवासींच्या प्रश्नांवर राजकारणापलीकडे विचार झाला पाहिजे. विकसित भारत म्हणजे सर्वसमावेशक विकास. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे. यासाठी सर्व लोकनियुक्त प्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यातील नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांचा सत्कार राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी (दि. २२) सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.  वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रांतांतर्फे नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रपती भवन येथे झालेल्या राज्यपालांच्या परिषदेत आपण आदिवासी विकासविषयक उपसमितीचे अध्यक्ष होतो असे सांगून आदिवासी विकासाकडे विशेष लक्ष्य देण्यासाठी राजभवन येथील आदिवासी कक्ष पुनरुज्जीवित करण्यात आला असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यात आदर्श आदिवासी गाव विकसित केले जात असून त्याठिकाणी निवासी संकुल, शाळा, आरोग्यकेंद्र, समाजमंदिर, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी सुविधा असतील. याशिवाय नाशिक येथे स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ निर्माण केले जाणार असून तेथे आयआयटी दर्जाचे अभियांत्रिकी महाविद्यालय व एम्सच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल. या विद्यापीठातील ८० टक्के जागा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव राहतील. आपण लवकरच राज्यातील आदिवासी गावांना भेट देणार असून अति आदिम समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरु करण्यासाठी जागा देण्यात यावी, अशी मागणी केली. वनहक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच कातकरी समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जावे, अशी अपेक्षा डॉ. उईके यांनी व्यक्त केली.

यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी लोकशाही, पंचायत, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण रक्षण याबाबतीत आदिवासी जीवनशैली समाजाला मार्गदर्शक असल्याचे सांगितले. आदिवासी आमदारांनी आपल्या समाजाच्या समस्या पक्षाच्या व्यासपीठावर तसेच विधानमंडळात जोरकसपणे मांडाव्या, असे त्यांनी सांगितले. आमदारांनी निवडून आलेल्या आपल्या भागात पाच वर्षे विकास पुरुष होऊन कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आश्रमाच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष विष्णू सुरूम, ऑलिम्पिक स्पर्धेतील धावपटू कविता राऊत तुंगार तसेच नवनियुक्त आदिवासी आमदार उपस्थित होते. यावेळी राज्यातील १७ आदिवासी आमदारांचा सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते सर्व आमदार राजेश पाडवी, काशीराम पावरा, केवलराम काळे, राजू तोडसाम, दिलीप बोरसे, हरिश्चंद्र भोये, आमश्या पाडवी, मंजुळाताई गावित, चंद्रकांत सोनावणे, राजेंद्र गावित, नितीन पवार, दौलत दरोडा, डॉ किरण लहामटे, शांताराम मोरे, भीमराव केराम, नरहरी झिरवाळ व डॉ अशोक उईके यांचा सत्कार करण्यात आला.

0000

Maha Governor felicitates newly elected Tribal MLAs from State

Mumbai, 23 : Maharashtra Governor C P Radhakrishnan today felicitated the newly elected tribal MPs and MLAs at a felicitation function at Sahyadri State Guest House in Mumbai. The felicitation was organised by the Vanavasi Kalyan Ashram on Wed (22 Jan).

Minister of Tribal Development Dr Ashok Uike, Minister of Food and Drug Administration Narhari Zirwal, All India President of Vanavasi Kalyan Ashram Satyendra Singh, President of Maharashtra Prant of Vanavasi Kalyan Ashram Vishnu Surum, Olympian Kavita Raut Tungar and newly appointed people’s representatives were present. The Governor felicitated tribal 17 MLAs on the occasion.

Tribal MLAs Rajesh Padvi, Kashiram Pawara, Kewalram Kale, Raju Todsam, Dilip Borse, Harishchandra Bhoye, Amshya Padvi, Manjulatai Gavit, Chandrakant Sonawane, Rajendra Gavit, Nitin Pawar, Daulat Daroda, Dr Kiran Lahamte, Shantaram More, Bhimrao Keram, Narahari Jirwal and Dr. Ashok Uike were felicitated at the hands of the Governor.

0000

 

 

आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी  कटिबद्ध – मंत्री अशोक उईके

मुंबई, दि. 23 : आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरा जपणे आवश्यक आहे. यामुळे विविधता आणि सामाजिक समृद्धी टिकून राहते. आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि उत्कर्षासाठी  शासन कटिबद्ध असल्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी विधानभवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. उईके म्हणाले, वनहक्क जमीन पट्ट्याचे कायदे वेळोवेळी बदलत गेले. वन हक्क दावे हा विषय महसूल, वन विभाग आणि ग्रामविकास विभागाशी संबंधित आहे. या तिन्ही विभागासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या शंभर दिवस उपक्रम बैठकीमध्ये आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये वन हक्क जमीन हा मुद्दा तात्काळ सोडविण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्न करेल. राज्य जनजाती सल्लागार परिषदेची बैठक लवकरच घेण्यात येईल. आदिवासी समाजातील प्रमुख मुद्दे, जसे की शिक्षण, आरोग्य, जमीन हक्क, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक संवर्धन यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे मंत्री श्री.उईके यांनी यावेळी सांगितले.

वन विभागातील प्रलंबित दावे,वन धन योजना, कातकरी समाजासाठी घरकुल, जाती प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि अन्य महत्वाची कागदपत्रे, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत तयार करण्यात आलेल्या शबरी नॅचरल ब्रँड याबाबत चर्चा करण्यात आली .

या बैठकीस आमदार सर्वश्री राजेश पाडवी, काशिराम पावरा, केवलराम काळे, राजू तोडसाम, दिलीप बोरसे, हरिश्चंद्र भोये, भीमराव केराम, मंजुळाताई गावित यांच्यासह वनवासी कल्याण आश्रमचे सदस्य उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं/

ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे

0
विधानसभा/विधानपरिषद निवेदन मुंबई दि. ८ : राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५०...

विधानसभा लक्षवेधी

0
खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. ८ :  खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार...

 ‘दिलखुलास’ मध्ये मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांची १०, ११, १२ व १४...

0
मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात, 'हवामान अंदाज तंत्रज्ञान आणि प्रादेशिक हवामान केंद्राची कार्यपद्धती' या विषयावर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या...

संसदीय राजभाषा समिती सदस्यांकडून राज्यपालांची भेट

0
मुंबई, दि. ८: संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई...

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...