सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 389

सहकाराच्या माध्यमातूनच होईल शेतकरी आत्मनिर्भर : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

मालेगाव, दि. 24 (उमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. सहकारातूनच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग समृद्ध होऊन देशातील शेतकरी आत्मनिर्भर होईल. त्यासाठी शेतीला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

अजंग, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे व्यंकटेश्वरा को. ऑप. पॉवर ॲण्ड ॲग्रो प्रोसिसिंगच्या माध्यमातून आयोजित सहकार परिषदेत केंद्रीय मंत्री श्री. शहा बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (विदर्भ, तापी खोरे व कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार छगन भुजबळ, आमदार दिलीप बोरसे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. भारती पवार, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. शहा यांच्या हस्ते माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बेळगाव येथील काजू उद्योगाचे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उदघाटन करण्यात आले.

केंद्रीय मंत्री श्री. शहा म्हणाले की, दिवंगत प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान- जय किसानची घोषणा दिली. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घोषणेला जय विज्ञानची जोड दिली. सुरुवातीच्या वर्षातच त्यांनी माती परीक्षणावर भर दिला. त्यामुळे शेतीला कोणते घटक आवश्यक आहेत याची माहिती मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली. आगामी काळात मृदा परीक्षण करणाऱ्या संस्थांना मदत केली जाईल.

तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सहकार विभागाची स्थापना केली. आगामी काळात सेंद्रीय शेती ही शाश्वत ठरणार आहे. या शेतीमुळे शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेता येईल. त्याबरोबरच पर्यावरण रक्षणास मदत होईल. सेंद्रीय शेती आणि या शेतीतून मिळालेल्या उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी केंद्रीय सहकार विभागाच्या माध्यमातून संस्थांची निर्मिती करण्यात येईल. जेणेकरून जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू शकेल. तसेच व्यंकटेश्वरा संस्थेने सुरू केलेले कार्य अनुकरणीय आहे. या संस्थेने उत्पादक ते निर्यातदार अशी मूल्य साखळी उभी केली. यामुळे सहकार क्रांतीला अधिकचे बळ मिळणार आहे. सहकाराचा पाया विश्वास असल्यामुळे ही संस्था या विश्वासास पात्र ठरणार आहे. याबरोबरच या संस्थेने जवान आणि किसान यांना जोडण्याचे काम केले. या संस्थेच्या माध्यमातून विविध फळ पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. या फळ पिकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगसाठी पुरेपूर सहकार्य केले जाईल.

या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी व्यक्त करीत साखर कारखाना उद्योगाच्या सबलीकरणासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. त्यात मागील काळात राज्यातील साखर कारखान्यांना 10 हजार कोटी रुपयांचा आयकर माफ केला. तसेच सहकार विभागाच्या माध्यमातून देशपातळीवर गोदाम उभारण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, रासायनिक खतांचा वाढता वापर पाहता प्रयोगशाळांची आवश्यकता आहे. या प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सहकार से समृद्धी ही घोषणा देशासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच पूरक उद्योगांवर भर दिला पाहिजे. व्यंकटेश्वरा संस्थेमुळे सेंद्रीय शेतीला पाठबळ मिळेल. या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार श्री. भुजबळ, माजी मंत्री डॉ. भामरे, डॉ. पवार, डॉ. महात्मे, डॉ. डोळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. डोळे यांनी संस्थेच्या विस्ताराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, व्यंकटेश्वरा संस्थेतर्फे बेळगाव येथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. तेथे रोज 24 टन काजू बियांवर प्रक्रिया करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी राज्यासह कर्नाटकमधील आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. २४ : धडाडीचा पत्रकार या व्याख्येत बसणारा, पत्रकारांच्या तीन पिढ्यांचा कृतीशील मार्गदर्शक हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

‘ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून दीर्घकाळ अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत राहीले. साहित्य, राजकारण, संगीत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा धडाडीचा सहभाग राहीला. प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून वृत्तांकन करण्याची त्यांची धडाडी होती. पुण्यातील पत्रकारिता, संघटन तसेच राष्ट्रीयस्तरावरील नेतृत्व यांसह सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी पत्रकारिता केली. समाजातील वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी लेखणी चालविली. पत्रकारांच्या तीन पिढ्या घडवितांना तरूणाईत विचारांचे बीजारोपण महत्त्वाचे हे सातत्याने सांगितले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक, दि.24 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांनी आज श्री त्र्यंबकेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मंदिर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी  श्री. शाह यांनी दर्शन घेऊन पूजा केली. पौरोहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे आणि मनोज थेटे यांनी केले. मंदिर देवस्थानच्या वतीने देवस्थानचे  अध्यक्ष तथा निवृत्त न्यायाधीश नितीन जीवने, मुख्याधिकारी श्रीमती देवचक्के, कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, रूपाली भुतडा यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांचा सत्कार केला.
000000

मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपन्न

मुंबई, दि. २४ :  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा व्यक्त करण्यासाठी मंत्रालयातील उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना अपर मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार यांनी शपथ दिली.

शनिवार दि.२५ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने दि.२४ जानेवारी रोजी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्रालयात या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित  कार्यक्रमास सचिव तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, मुख्य सचिव कार्यालयाच्या सह सचिव स्मिता निवतकर यांच्यासह सामान्य प्रशासन विभाग व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक तथा सूत्र संचालन, सहायक मुख्य निवडणूक अधिकारी किरण शार्दूल यांनी केले.

सन २०११ पासून, राष्ट्रीय मतदार दिवस हा २५ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे, जो भारतीय निवडणूक आयोगाच्या (२५ जानेवारी, १९५०) स्थापना दिनासोबत आहे. या महोत्सवाचा दुहेरी उद्देश नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि नवीन, पात्र तरुणांना मतदार म्हणून नावनोंदणी करण्यात मदत करणे असा आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

000

कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी दक्ष प्रकल्प – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा 

मुंबई, दि. २४ : कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा ‘दक्ष’ (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) या प्रकल्पासाठी  शासनाकडून गतीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना दिली.

मंत्रालयात  ‘दक्ष’ या प्रकल्पाबाबत जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा,मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, जागतिक बँकेचे  भारताचे  पथक प्रमुख प्रद्युम्न भट्टाचार्य, वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ डेनिस निकोलेव्ह यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागातील महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, राज्य कौशल्य विकास सोसायटी, राज्य कौशल्य आयुक्तालय, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ या सर्वांच्या कौशल्य विकासाच्या कामामध्ये एकसुत्रता येईल व काळानुरूप आवश्यक असलेले कौशल्य अभ्यासक्रम विकसीत करून जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ करण्याचा मानस ‘दक्ष’ या प्रकल्पातून घडेल, महिला व समाजातील प्रत्येक व्यक्तीला काळानुरूप कौशल्य विकसित करण्यावर या प्रकल्पातून भर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नाविन्यता व कौशल्य विकास या संकल्पनावर भर देण्यासाठी सूचना केले आहे त्या अनुषंगाने जागतिक कौशल्य केंद्र विकसित करणे आणि नाविन्यता नगर वसविणे याबद्दल देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.या प्रकल्पासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींसाठी कौशल्य विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत  करण्यासाठी उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत याबाबतीत निर्णय घेणे, ‘दक्ष’प्रकल्प अंमलबजावणी कक्षासाठी तात्काळ ४५ मनुष्यबळाला मंजुरी देणे व या प्रकल्पासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे, अशी चर्चा  मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी केली.

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, कौशल्य विकास विभागाला गती देणाऱ्या ‘दक्ष’प्रकल्पासाठी सर्व विभागामध्ये समन्वय साधून उद्योगांच्या मागणीप्रमाणे काळानुरूप कौशल्य विकास करण्यासाठी शासन आग्रही आहे.या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व निर्णयांना गती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

जागतिक बँकेचे  भारताचे  पथक प्रमुख प्रद्युम्न भट्टाचार्य म्हणाले की, कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा ‘दक्ष’ प्रकल्प हा देशातील सर्वात उत्कृष्ट प्रकल्प ठरेल.काळानुरूप समाजातील शेवटच्या घटकाला उद्योगांच्या मागणीप्रमाणे शिक्षण देवून कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. कौशल्य विकास विभाग व यामध्ये सहभागी सर्वांचा सक्रीय सहभाग आवश्यक असेल असेही त्यांनी सांगितले.

०००

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, दि. २४ : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनिल सोनार यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता उपस्थित होते. शासनाच्या राजशिष्टाचार विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृह रक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल,  बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल,  सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला), राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) एम.सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, सी. कॅडेट कोअर (मुली), सी. कॅडेट कोअर (मुले), रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डिसिल्वा हायस्कूल दादर, मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) अंजुमान ए इस्माईल हायस्कूल, बांद्रा मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) मनपा शाळा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल मनपा माणिकलाल एम. पी. एस इंग्लिश हायस्कूल, घाटकोपर मुंबई. स्टुडन्ट पोलीस कॅडेट (मुल-मुली) बृहन्मुंबई महानगरपालिका, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक आदी पथकांनी सलामी दिली. कमांडर सुमितसिंग चौहान हे संचलन प्रमुख होते.

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिन संचलनातील सर्वोत्कृष्ट संचलन पथकांना अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक राज्य राखीव दल, द्वितीय क्रमांक बृहन्मुंबई सशस्त्र दल (पुरुष) तर तृतीय क्रमांक बृहन्मुंबई नियंत्रण पथकास देण्यात आला. यावेळी विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी आणि नरेंद्र बेडेकर यांनी केले.

0000

गजानन पाटील/ससं/

 

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि.24 :- ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीने मांडले.  पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी समरस झालेला, लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. रामभाऊ जोशी यांनी सात शतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत त्यांचा विशेष स्नेह होता. रामभाऊ जोशी यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

—-*—

महिला बचत गट चळवळ आता मोठी; जळगाव जिल्ह्यात एक लाख लखपती दीदी करण्याचा मनोदय – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

▪️उमेद आयोजित सरस -2025 चे उद‌्घाटन

▪️ 23 ते 27 जानेवारी पर्यंत असणार सुरु

जळगाव दि. 23 (जिमाका): महिला बचत गट चळवळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना येण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून राज्यात विविध विभागांत ‘मिनी सरस प्रदर्शन’ सुरू करण्यात आले. यामुळे बचत गटाच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत होत असलेल्या प्रदर्शनात 10 कोटींची उलाढाल होत असे, परंतु विभागीय प्रदर्शनांमुळे ही उलाढाल 22 कोटींपर्यंत पोहोचली आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील उमेदच्या वतीने आयोजित मिनी सरस प्रदर्शन-2025 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते जि. एस. ग्राऊंडवर झाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बचत गट चळवळीला अधिक व्यापक करून 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

महिला बचत गट सशक्त होण्यासाठी मोठे पाऊल

राज्यात सुमारे 65 लाख महिला बचत गट कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या माध्यमातून राज्यातील महिला केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातही आपल्या वस्तू निर्यात करत आहेत. राष्ट्रीयकृत बँकाही बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवत असून, त्याचे नियमित पुनर्भरण होत असल्याने बँकांचे एनपीए टाळले जात आहे. राज्यातील बँकांनी आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटांना वितरित केल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

मुक्ताई सरस प्रदर्शनाची यशस्वी परंपरा

महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वस्तूंचे आकर्षक पॅकिंग व विपणन गरजेचे आहे. याची जाणीव ठेवून 2010 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मुक्ताई सरस प्रदर्शनाची सुरुवात केल्याचा आनंद खा. स्मिता वाघ यांनी व्यक्त केला. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून माऊथ पब्लिसिटी महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

जळगावकरांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन

प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी 23 ते 27 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाला जळगावकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन केले.

खाद्य पदार्थांचा आस्वाद व महिलांच्या आनंददायक प्रतिक्रिया

प्रदर्शनामध्ये मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन खरेदी केली व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनाही आग्रहाने सहभागी करून घेतल्याने स्टॉल धारक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

प्रशासनाने सर्वसामान्यांची कामे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्वरित मार्गी लावावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून शासकीय विभागांचा आढावा

सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- शासनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केलेल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे या प्रशासकीय यंत्रणेने सर्वसामान्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच यंत्रणेकडे येणारी कामे त्वरित मार्गी लावावीत, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार सर्वश्री राम सातपुते, रवींद्र राऊत, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसात सात सुत्री कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्तता करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व सर्व प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी ओळखून कामे पूर्ण करावीत. या अंतर्गत सर्वसामान्यांना विविध सोयी सुविधा देण्याबरोबरच कार्यालयाची स्वच्छता करावी. तसेच ही स्वच्छता मोहीम राबवत असताना सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देऊन त्यांची कामे त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मनाची स्वच्छता ही केली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्या त्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीची वागणूक देतात याची माहिती मिळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात व्हाईस सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसवावी, त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल. तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कशा पद्धतीने वागावे याबाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावे. प्रत्येक कार्यालयात स्वच्छता कशा पद्धतीने ठेवली जात आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांची त्या कार्यालयांचा व्यवहार कशा पद्धतीचा आहे याची माहिती आपण त्या त्या शासकीय कार्यालयात पुढील काळात अचानक भेट देऊन माहिती घेणार असल्याचे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासन हे दूरदृष्टी असलेले शासन असून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य मिळणार आहे. पुढील काळात सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय वाढतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसेच येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी प्रशासनाने ही योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच प्रशासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत. तसेच लोकप्रतिनिधी घेऊन आलेले प्रश्न, कामे विहित पद्धतीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधी यांना सन्मान द्यावा असेही पालकमंत्री गोरे यांनी सुचित केले.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना ही खूप मोठी योजना असून या योजनेचे 90% पेक्षा अधिक काम झालेले दिसून येत आहे. तरी पाणी पंपिंग करण्यासाठी लागणारी वीज ही सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. हा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास महापालिकेचे दरमहा लाखो रुपयांची वीज बचत होऊन हा निधी विकास कामांना वापरणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका व अन्य संबंधित विभागाचे विकास कामासाठी शासन स्तरावर प्रलंबित असलेले सर्व प्रश्नांची सोडवणूक सर्वांच्या सहकार्यातून लवकरात लवकर करण्यास आपले प्राधान्य राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरीकरणाद्वारे सोलापूर जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती सांगितली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले विविध योजना प्रकल्प याची माहिती दिली. त्याप्रमाणेच मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसात उद्दिष्ट पूर्तता कार्यक्रम याची सविस्तर माहिती दिली. सोलापूर विमानतळ विषय सविस्तर माहिती देऊन माहे मार्च 2025 मध्ये येथून प्रवासी विमान वाहतूक सुरू होऊ शकते असे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त श्रीमती तेली यांनी सोलापूर महापालिकेची सविस्तर माहिती दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती बैठकीत दिली.

शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पालकमंत्री यांनी केले वंदन

राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, धर्मवीर संभाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा, चार हुतात्मा पुतळा येथे जाऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते खापरी रेल्वे कलकूही येथील शाळा इमारतीचे उद्घाटन

नागपूर, दि. 23 :  मिहान पुनर्वसन क्षेत्रामधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरी रेल्वे कलकूही येथील शाळा इमारतीचे आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, खापरी रेल्वे कलकुही येथील सरपंच रेखा सोनटक्के, उपसरपंच प्रमोद डेहनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक रहिवासी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त एका रुग्णवाहिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पारदर्शी आणि गतिमान कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्ट शाळा बांधकाम करून देण्यात आली आहे. या शाळेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता तो आता निकाली निघाला.  अजून 55 लक्ष रुपये या शाळेवर खर्च करायचे आहेत. एक चांगली कॉम्प्युटर लॅब, सोलर टॉप अशा सर्व आवश्यक सुविधा या ठिकाणी निर्माण करून डिजिटल शाळा करण्याचा प्रयत्न आहे. 3 फेब्रुवारीला मिहानमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...