बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 379

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी  साधला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद

मुंबई दि. १४ :- राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे व प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विकास कामांतून नागरिकांचे  जीवनमान उंचावणार असल्याने या विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना केले.

राज भवन येथे झालेल्या या बैठकीस माजी राज्यपाल राम नाईक, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार पराग शहा, सुभाष देसाई,  विद्या चव्हाण, माजी खासदार गोपाळ शेट्टी, प्रकाश रेड्डी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन अनेक विकास कामे, योजना राबवित आहे. या योजनांमधून नागरिकांचे जीवनमान नक्कीच उंचावेल. या योजनांच्या, प्रकल्पांच्या पूर्तीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. विकास कामांबाबत ज्यांना काही सुचवायचे असल्यास त्यांनी त्यांचे म्हणणे लेखी घ्यावे,असे  ते म्हणाले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी राज्यपालांनी साधला संवाद

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज भवन येथे उद्योग, आदिवासी, अल्पसंख्यांक डीआयसीसीआय, तृतीयपंथी, दिव्यांग, खेळाडू आणि मागासवर्गीय यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल. या मान्यवरांनी उपस्थित केलेल्या सूचना, मांडलेले प्रश्न सोडवण्यास  संबधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे,अशा  सूचना त्यांनी  दिल्या. तृतीयपंथी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबत निर्देश दिले जातील, असे राज्यपाल महोदयांनी सांगितले. जे प्रश्न स्थानिक पातळीवरचे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवावेत, असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील विकास कामांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतला आढावा

नागरिकांना सर्व प्रकारच्या आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पाची कामे संबधित यंत्रणांनी निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात, अशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना दिल्या.

बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरसीएएल च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार,

कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मेरी टाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत. ही कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त  वापर करावा. प्रकल्प मुदतीत पूर्ण व्हावेत. विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. मुंबई उपनगर जिल्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुयोग्य नियोजन व्हावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत राज्यपाल महोदयांनी मेट्रो, रेल्वे, रस्ते, म्हाडा, वन, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था या विषयीचा आढावा घेतला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सादरीकरणातून मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे व उपक्रमांची माहिती दिली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष शासनाकडून भव्य स्वरूपात साजरा

मुंबई, दि. १४ : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्रावर आधारित एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे केले आहे. तसेच जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्ररथाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विद्वत्त परिषदेचे आयोजन कोल्हापूर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागात भव्य सांस्कृतिक होणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून राज्यातील विविध ठिकाणी उपक्रम होतील.

सहा महसुली विभागापैकी मुंबई विभागातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा या ठिकाणी आज सायंकाळी आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, सहाय्यक संचालक संदिप बलखंडे तसेच ज्येष्ठ अभिनेते सुशांत शेलार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास भरभरून उपस्थिती लावली.

000

संजय ओरके/विसंअ/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १४:- हरहुन्नरी, अभिनय संपन्न अभिनेते अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनामुळे एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बालरंगभूमी पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या सहज, टवटवीत अभिनयाने छाप उमटवली. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीतील नाटक, मालिका चित्रपट आणि जाहिरात या क्षेत्रांत त्यांनी ओळख निर्माण केली. शाब्दिक, वाचिक विनोद यांमध्ये त्यांनी अंगभूत गुणांनी रंग भरले. त्यांच्या निधनामुळे एक गुणी, अभिनय संपन्न कलाकाराला आपण मुकलो आहोत. ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे. परचुरे यांच्या असंख्य चाहत्यांपैकी एक म्हणून मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वराने त्यांना हे दु:ख सहन करण्याचं बळ द्यावी, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

000

मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आपट्याच्या पानांद्वारे मतदार जागृती संदेश

मुंबई दि. १४ :- ‘केंद्रस्तरिय अधिकारी आपल्या दारी’ हा उपक्रम १७१- मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. यामध्ये नुकतेच झालेल्या कार्यक्रमात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ‘स्वीप’ अंतर्गत या संकल्पनेतून दसऱ्याचे औचित्य साधून शिवाजीनगर येथील स्थानिक नागरिक व मतदारांना आपट्याच्या पानांवर नैतिक मतदानाचा संदेश देण्यात आला.

आपले मत अमूल्य आहे….

दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा आहे.. त्या निमित्ताने आपट्याच्या पानांवर ‘आपले मत सोन्यासारखे अमूल्य आहे, त्याचे मोल करू नका.. मतदान नक्की करा’, ‘आपण खास आहात आणि आपले मतही’ असे संदेश असणारे सोनं म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यात आली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राजेंद्र क्षीरसागर यांच्या व १७१- मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री सुदाम परदेशी यांच्या  मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाच्या समन्वय अधिकारी मनिषा पंडित व अन्य सहकारी यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविला व उपस्थित नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

—–000—–

केशव करंदीकर/विसंअ/

गिरणी कामगारांसाठी ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबईदि. १४ : गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहेत. गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबई महानगर क्षेत्रात ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार करण्यात येत आहे. गिरणी कामगारांचे १ लाख ७४ हजार अर्ज अर्ज प्राप्त झाले असून कामगार विभागाने १ लाख ८ हजार अर्ज वैध ठरविले आहेत. गिरणी कामगारांसाठी यापुढेही जास्तीत जास्त घरे बांधण्यात येतीलअसे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज केले.

प्रकल्प प्रवर्तकांच्या निवडीसाठी स्वारस्थ अभिव्यक्ती प्रक्रीयेत पात्र ठरलेल्या (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) कर्मयोगी एव्हीपी रिॲलिटी आणि चढ्ढा डेव्हलपर्स ॲण्ड प्रोमोटर्स या पात्र प्रवर्तकांना मंत्री श्री.सावे यांच्या हस्ते हेतू पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आलेयावेळी ते बोलत होते. गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री श्री.सावे म्हणाले कीसन १९८२ च्या संपानंतर बृहन्मुंबईतील ५८ बंद झालेल्या आणि आजारी कापड गिरण्यांतील गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत एकूण १५ हजार ८७० सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. म्हाडामार्फत आणखी  २८७४ सदनिकांचे गिरणी कामगारांना वाटप करण्यात येणार आहेत. उर्वरीत गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यात आली असून अजून साधारणत: १ लक्ष घरांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.सावे म्हणाले कीदेशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली आहे. ८१ हजार घरे बांधण्याचा आम्ही करार केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिले असून त्यांच्या माध्यमांतून गिरणी कामगारांकरिता घरे बांधून दिली जाणार आहेत. ५ लाख ५० हजार रूपये शासन देणार तर उर्वरित ९ लाख ५० हजार रूपये पात्र लाभार्थी गिरणी कामगार किंवा त्याच्या वारसदारांना द्यावी लागतील. हे घर १५ लाख रूपयांत मिळणार असून पुढील ३ वर्षामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यात ३०० चौ.फूटाचे राहण्यायोग्य घरकूलकम्युनिटी हॉलबागलहान मुलांसाठी खेळण्याची जागाज्येष्ठ नागरिकांसाठी छोटे उद्यान असेलअशीही माहिती मंत्री श्री.सावे यांनी यावेळी दिली.

000

संजय ओरके/विसंअ/                         

शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १४ : शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जातोय. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेत, असे सांगून शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

व्यक्तिमत्व विकासास चालना देणारे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ येथील एनसीपीएच्या भाभा सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांचे अभिनंदन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आय.ए.कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शाळा हा आपल्या आयुष्यातील हळुवार कोपरा असतो. शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. शाळा ही आयुष्यातील ज्ञान मंदिर असते. शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि देश घडवते. आईवडील जन्म देतात तर शिक्षक हे आयुष्य घडवतात. विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडवण्यासाठी मोठे योगदान देतात. त्यामुळे गुरूजनांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा समाजातील सर्व घटकांसाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. शिक्षक आणि शासकीय कर्मचारी हा देखील महत्त्वाचा घटक असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. राज्य उद्योग, जीडीपी, विदेशी गुंतवणूक अशा विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असून हे स्थान कायम राखण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या उन्नतीसाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. 30 हजार शिक्षक भरती, केंद्र प्रमुखांच्या जागा भरणे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरघोस वाढ, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील बोजा कमी करण्यात यश, टप्पा अनुदान लागू असे विविध निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्काराचे स्वरूप –

राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 51 लाख रुपये, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 31 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख रुपये. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 15 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 11 लाख रुपये. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला 11 लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपये. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह दिले गेले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांची यादी –

राज्यस्तरीय पुरस्कार – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गट – प्रथम- जिल्हा परिषद आदर्श पाथमिक शाळा धानोरे, जिल्हा, पुणे; द्वितीय – नवी मुंबई महानगरपालिका राजश्री शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 55; तृतीय – जवाहरलाल नेहरू नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा रामनगर, जिल्हा- गडचिरोली.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – प्रथम – प्रभात किड्स स्कूल अकोला जिल्हा अकोला, द्वितीय -कर्मवीर आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर, जिल्हा धुळे; तृतीय – कै. दशरथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा खुर्द, जिल्हा जालना.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र गट- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम- कलेक्टर कॉलनी मनपा उ.प्रा. हिंदी शाळा शिवशक्ती नगर, चेंबूर, मुंबई; द्वितीय- मुंबई पब्लिक स्कूल वरळी सीफेस मनपा उ.प्रा. इंग्रजी शाळा, वरळी, मुंबई; तृतीय- महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा रामकृष्ण परमहंस मार्ग, वांद्रे पूर्व, मुंबई.

उर्वरित इत्तर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – श्रीराम वेल्फेअर सोसायटीज हायस्कूल, मुंबई; सीईएम मायकल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुर्ला; द बयरामजी जीजीभॉय पारसी चॅरिटेबल इंस्टिट्युशन, चर्नी रोड पूर्व, मुंबई.

वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र गट – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम – पुणे मनपा भारतरत्न पंतप्रधान स्व.अटलविहारी वाजपेयी विद्यानिकेतन क्र.16, वडगाव बुद्रुक, पुणे; द्वितीय – महानगरपालिका शाळा क्रमांक 86 (मुली) पाथर्डीगाव, नाशिक; तृतीय- श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेशन क्र.1, शुक्रवार पेठ, पुणे.

उर्वरित इत्तर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड सदाशिव पेठ, पुणे; सरस्वती विद्यालय माध्यमिक शाळा, नागपूर; श्री शिवाजी मराठा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शुक्रवार पेठ, पुणे.

मुंबई विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद शाळा, कोटबी बुजडपाडा, जिल्हा पालघर; द्वितीय – रायगड जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वडगाव, जिल्हा रायगड; तृतीय – जिल्हा परिषद शाळा कालवार, जिल्हा ठाणे.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – प्रथम -जिंदाल विद्यामंदिर वाशिंद, जिल्हा ठाणे; द्वितीय – श्री स.तु. कदम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पालघर, जिल्हा पालघर; तृतीय – जनता शिक्षण संस्थेचे श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, जिल्हा रायगड.

पुणे विभाग – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संवत्सर, जिल्हा अहिल्यानगर; द्वितीय – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी (शिवणे), जिल्हा – सोलापूर; तृतीय – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर, जिल्हा पुणे.

उर्वरित इतर व्यवस्थापनाच्या शाळा- प्रथम- गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव, जिल्हा पुणे; द्वितीय- सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ, जिल्हा अहिल्यानगर; तृतीय – महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी, जिल्हा सोलापूर.

नाशिक विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम – शासकीय विद्यानिकेतन धुळे, जिल्हा धुळे; द्वितीय – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा, जिल्हा नाशिक; तृतीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलखेडे, जिल्हा जळगाव.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार, जिल्हा नंदुरबार; द्वितीय – माध्यमिक विद्यालय करंज, जिल्हा जळगाव; तृतीय- अनु.कै.डी.एन.देशमुख आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा आठंबे, जिल्हा नाशिक.

कोल्हापूर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद शाळा सिद्धेवाडी, जिल्हा सांगली; द्वितीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे (मिलिटरी), जिल्हा सातारा; तृतीय- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर 5, जिल्हा रत्नागिरी.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – प्रथम- अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी, जिल्हा सांगली; द्वितीय- न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाट, जिल्हा कोल्हापूर; तृतीय- ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय शिरवळ, जिल्हा सातारा.

छत्रपती संभाजी नगर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम – जिल्हा परिषद आदर्श उच्च माध्यमिक शाळा जळगाव मेटे, जिल्हा छत्रपती संभाजी नगर; द्वितीय – जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय प्राथमिक शाळा बोरगव्हाण, जिल्हा परभणी; तृतीय -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवपिंपळगाव, जिल्हा जालना.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- हु. बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली; द्वितीय – सरस्वती साधना विद्यामंदिर शांतीवन आर्वी, जिल्हा बीड; तृतीय- श्री  संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी, जिल्हा परभणी.

अमरावती विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद (मा.शा) माध्यमिक (मराठी) कन्या शाळा, कॅम्प अमरावती, जिल्हा अमरावती; द्वितीय- आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी, जिल्हा बुलढाणा; तृतीय- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा तिवसा, जिल्हा यवतमाळ.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- जे.सी. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज कारंजा लाड, जिल्हा वाशिम; द्वितीय-  सीताबाई संगई कन्या शाळा सुरजी, जिल्हा अमरावती; तृतीय- डी.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दाताळा, जिल्हा बुलढाणा.

नागपूर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम- पी एम श्री जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामाली, जिल्हा गोंदिया; द्वितीय- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर, जिल्हा नागपूर; तृतीय – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा, जिल्हा चंद्रपूर.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम – नवजाबाई हितकारिणी हायस्कूल ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर; द्वितीय – नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर साकोली, जिल्हा भंडारा; तृतीय- सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी/ मोर, जिल्हा गोंदिया.

लातूर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी, जिल्हा नांदेड; द्वितीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सताळा (बु.), जिल्हा लातूर; तृतीय- पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला ईट, जिल्हा धाराशिव.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव, जिल्हा धाराशिव; द्वितीय- कै. जनार्दनराव राजेमाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला व विज्ञान) आश्रम शाळा, जानवळ, जिल्हा लातूर. तृतीय- श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर, जिल्हा नांदेड.

00000

राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्व समाजघटकांच्या विकासासाठी कार्यरत  – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १४: महाराष्ट्र आणि देशाला सामाजिक न्यायाचा कृतिशील विचार देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श आणि विचार समोर ठेऊन राज्यातील सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी या संस्थेच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास दूरदृष्य प्रणालीद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, संचालक नवनाथ पासलकर आदी उपस्थित होते. पुणे येथे संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपव्यवस्थापक अनिल पवार आदी उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांना शिक्षणासाठी दारे खुली करणारे, जातीभेद निर्मूलनासाठी कृतिशील पाऊल उचलणारे लोककल्याणकारी राजे होते, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, करवीर संस्थानात मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवणारे शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने आरक्षणाचे जनक होते. त्यांनी स्त्रीयांच्या कल्याणासाठी कायदे केले. शिक्षणातील एका ठराविक वर्गाची मक्तेदारी मोडीत काढून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षण संस्थांची स्थापना केली, त्यांना आर्थिक मदत केली. जाती निर्मूलनाचे प्रयत्न केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराच्या पायावर देशाची लोकशाही भक्कमपणे उभी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा देशाच्या राज्यघटनेत समावेश केला असून राज्यघटनेवर शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणाचे प्रतिबिंब दिसून येते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेशी ही संस्थेची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे उद्घाटन करून आपण राजर्षी शाहू महाराज यांना कृतिशील वंदन करत आहोत. या संस्थेच्या इमारतीला साजेसे काम संस्थेकडून व्हावे. मुलांची निवड गुणवत्तेनुसार व्हावी, कोणताही पक्षपात होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती शाहू महाराजांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या समाज बांधवांच्या उन्नतीसाठी सारथीची निर्मिती केली. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे, कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाला अधिक गती देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सारथीच्या विभागीय कार्यालयांसाठी सर्वांच्या प्रयत्नातून चांगल्या ठिकाणी जमीनी उपलब्ध करुन देऊन इमारतींचे काम सुरू झाले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

या संस्थेप्रमाणेच विविध समाजघटकांच्या प्रगतीसाठी बार्टी, महाज्योती, अमृत, मार्टी, आर्टी, टीआरटीआय, वनार्टी अशा वेगवेगळ्या संस्थांसोबतच अनेक समाजांच्या विकासासाठी महामंडळे सुरू केली आहेत. या संस्था आणि महामंडळांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. छत्रपती शाहू महाराज यांचे विचार स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून पोहोचवायचे आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

सारथीचे अध्यक्ष श्री. निंबाळकर म्हणाले, प्रारंभी मराठा, कुणबी समाजातील अधिकाधिक विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षातून निवड  व्हावी, पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना मदत करणे हा उद्देश होता. त्यापुढील काळात अन्य केंद्रीय व राज्य शासनातील सेवा, आयबीपीएस, निमलष्करी दले यातील नियुक्त्यांसह कृषी, सेवा क्षेत्र, सनदी लेखापाल आदी वर भर दिला.

संस्थेने कौशल्य विकास प्रशिक्षण वर भर दिला. एमकेसीएल, केंद्र शासनाची औरंगाबाद येथील संस्था येथून कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याशिवाय ९, वी १२ वी मध्ये मेरिट कम मीन्स शिष्यवृत्तीतील कोटा पद्धतीमुळे पात्र असूनही वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. याचा लाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. सारथीच्या आठ सारथी विभागीय मुख्यालयातील वसतिगृहांचा लाभ मराठा व लक्ष्यित घटकासह अन्य समाजातील मुलांनाही प्रवेश मिळणार आहे. फक्त नोकरीकडे लक्ष न देता भविष्यात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार  सुरू करता यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी अशोक काकडे यांनी सारथीच्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेच्या कामकाजाची चित्रफीत, इमारतीची वैशिष्ट्ये दर्शविणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

००००

जिल्ह्यातील सर्व बसस्थानके आदर्श करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर, दि. 14 : ‘चांदा ते बांदा’ असे वर्णन असलेल्या महाराष्ट्रात चांदा कायम प्रथम क्रमांकावर असायला पाहिजे, असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. राज्याचा अर्थमंत्री असताना अनेक ठिकाणी बस स्थानकांसाठी निधी दिला. त्यावेळी 500 बस महाराष्ट्रासाठी मंजूर केल्या. त्यापैकी 200 बसेस फक्त चंद्रपूरसाठी देण्यात आल्या. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यासाठी या बसेस येत आहेत. मुल आगाराची मान्यता आली आहे. चंद्रपूर, मुल बल्लारशाह, पोंभुर्णा येथे आनंददायी बस स्थानके उभारण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व बसस्थानके आता आदर्श करणार आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपूर बसस्थानक, ऑटो-रिक्षा स्टँड तसेच पर्यावरण पूरक ई-बस सेवेचे लोकार्पण करताना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महापालिका आयुक्त विपीन पालिवाल,  राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गबने, चंद्रपूरच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे, विभाग अभियंता ऋषिकेश होले, कार्यकारी अभियंता शितल गोंड, डॉ. मंगेश गुलवाडे, रमेश राजुरकर, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, सुभाष कोसनगोट्टूवार, नामदेव डाहुले आदी उपस्थित होते.

‘बाहेरचा पाहुणा चंद्रपुरात येतो आणि जिल्ह्याचे कौतुक करतो. तेव्हा अतिशय आनंद होतो. पण त्यामुळे सेवा अद्ययावत करण्याची आपली जबाबदारी देखील  वाढते. त्यामुळे बस स्थानकांवर पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही लावा. हे सीसीटीव्ही अतिशय उत्तम दर्जाचे असायला हवेत. तसेच येथे प्रवासी समिती तयार करावी. बसस्थानकामध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. ‘लाडकी बहीण सुरक्षित बहीण’ अशी योजना आपण सुरू केली असून एक पोलीस किंवा होमगार्डला एक शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

ऑटोरिक्षा चालकांसाठी स्वस्त दरात घर : राज्यात सर्वात प्रथम ऑटो-रिक्षा चालकांवरील प्रोफेशनल टॅक्स आणि वाहन कर आपण रद्द केल्याचा उल्लेख पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते म्हणाले, ऑटोरिक्षा चालकांना अतिशय स्वस्त दरात घर देण्याचा निर्णय घेतला आहे. आज बसस्थानक येथे ऑटो-रिक्षा चालकांसाठी स्डँडचे लोकार्पण झाले आहे. खाजगी व छोट्या गाड्यांच्या स्थानकांसाठी सुद्धा शहरात मनपाने जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांना निधी देण्यात येईल.

जिल्ह्यात विविध वास्तुंची उभारणी : चंद्रपूरचा गौरव वाढविणाऱ्या बस स्थानकाचे तसेच ई-बसचे लोकार्पण झाले. जनतेच्या आशीर्वाद्याची शक्ती फार मोठी असते. यासाठीच आपण जिल्ह्यात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात नियोजन भवन, कोषागार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रस्तावित इमारत, न्यायमंदिर, जिल्हा परिषद इमारत, बचत गटांसाठी बाजारहाट, आदी वास्तू चंद्रपूर जिल्ह्यात दिमाखाने उभ्या झाल्या आहेत आणि काही निर्माणाधीन आहेत, असेही श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार : एस.टी. कर्मचारी, चालक-वाहक यांच्यापण अडचणी असतात. चालक-वाहकांसाठी येथील बसस्थानकात सूचना पेटी लावण्यात येईल. त्यात त्यांनी आपल्या सूचना टाकाव्यात. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या अडचणी नक्कीच दूर केल्या जातील. लालपरी ही गरिबांची जीवनवाहिनी आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी एस.टी. बसने प्रवास करतात. त्यामुळे चालक-वाहकांवर मोठी जबाबदारी असते. त्यांनी निर्व्यसनी राहून आपली सेवा द्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांची संकल्पना ; बस स्थानकाची आकर्षक वास्तू : विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे म्हणाल्या, 1 जून 1948 मध्ये पहिली बस सुरू झाली. त्यावेळी राज्य परिवहन मंडळाकडे केवळ 36 बसेस होत्या, तर आज 36 हजारापेक्षा जास्त बसेस आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहरात बस स्थानकाची आकर्षक वास्तू उभी राहत आहे. यासाठी 16 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली असूनबस स्थानकाच्या कामाचे भूमिपूजन 26 जानेवारी 2018 रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते. कोरानामुळे काही काळ या बस स्थानकाचे काम प्रलंबित होते, मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कामाला गती दिली. 22 फलाटांचे हे बसस्थानक अतिशय सुसज्ज करण्यात आले आहे. यात प्रतीक्षालय, तिकीट आरक्षण कक्ष, उपहार कक्ष, वाणिज्य आस्थापना, चालक -वाहक कक्ष, विश्रांतीगृह, महिला विश्रांती गृह, अधिकारी कक्ष, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदींचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच वन्यजीव संकल्पनेवर आधारित रंगरंगोटी सुद्धा करण्यात आल्याचे स्मिता सुतावणे यांनी सांगितले.

तत्पूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून बसस्थानकाचे लोकार्पण केले. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पर्यावरणपूरक ई-बस सेवा दळणवळणाचे उत्तम साधन बनेल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 14 :  जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायी इंधनांवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. त्यासाठीच चंद्रपूर शहर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. शासनाने चंद्रपूरला 50 ई-बस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पर्यावरणपूरक ई-बस दळणवळणासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी उत्तम साधन बनेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र पुरस्कृत पी.एम. ई -बस सेवा योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बस डेपोचे भुमिपूजन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपयुक्त मंगेश खवले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, सुभाष कोसनगोट्टूवार, रामपाल सिंग, नामदेव डाहुले, रवींद्र बेलावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रपूरमध्ये एखाद्या प्रकल्पाचे भुमिपूजन किंवा उद्घाटन होते, तेव्हा मनस्वी आनंद होतो. चंद्रपूरचे नाव देशात अग्रेसर असले पाहिजे, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. या गावात एखादी योजना मंजूर झाली की, त्याचा लाभ या गावातील, शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना होतो, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा उल्लेखही केला. ‘चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन अकादमीला थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. सोबतच बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था, कॅन्सर केअर हॉस्पिटल, सैनिक स्कूल, एसएनडीटी विद्यापीठ आदी बाबी येथे उत्तमरित्या साकारण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प आपल्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची आपली जबाबदारी वाढली आहे.

केंद्र सरकारने चंद्रपूर शहरात शहरात 50 ई-बसला परवानगी दिली आहे. बस डेपो, ई- चार्जिंग व्यवस्था येथे निर्माण करण्यात येत आहे. बस डेपोच्या परिसरात बचत गट आणि शेतक-यांच्या उत्पादीत मालासाठी सुसज्ज बाजारहाट, प्रशिक्षण व्यवस्था, संकुल व्यवस्था, फूड कोर्ट आदी बांधण्यात येणार आहे. भविष्यात हा परिसर शहराचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार असून बसस्टेशन आणि बाजार यादरम्यान रस्ता करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून बचत गट आणि शेतकऱ्यांनी आणलेला माल बस स्थानकातून बाजारातमध्ये येईल व पुढे ग्राहकसुद्धा येथून माल खरेदी करून शहरबस सेवेचा वापर करून आपापल्या गावी जातील, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, ई -बस सेवा हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. शाळा, दवाखाना व इतर ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना याची सुविधा होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम असून पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे.

प्रास्ताविकात महापालिका आयुक्त विपिन पालीवाल, म्हणाले इलेक्ट्रिक बस सेवा ही शहरासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सदर बस सेवा सुरू करण्याची नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांची ही अडचण दूर झाली आहे. 10 कोटींच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात येणार असून ई -बस सेवेसाठी चंद्रपूरच्या 25 किलोमीटर परिसराचा विचार या करण्यात आला आहे. सदर इलेक्ट्रिक बस 18 मार्गावर चालणार आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले तर आभार महानगरपालिका उपायुक्त मंगेश खवले यांनी मानले.

मंत्रिमंडळ निर्णय 

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आज १४ ऑक्टोबर मध्यरात्री बारा वाजेपासून याची अंमलबजावणी होईल.

हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना ही पथकरातून सूट राहील. सायन पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल.  पथकरातून सूट दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळास द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

—–०—–

सामाजिक न्याय विभाग

आगरी समाजासाठी महामंडळ

आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या महामंडळाच्या माध्यमातून आगरी समाजातील विविध घटकांसाठी विशेषत: युवकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतील.

—–०—–

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

१ जानेवारी २०१६ पासून या योजनेचा लाभ देण्याचे ठरले.  यासाठी येणाऱ्या ४५ कोटी ९८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेचा एक भाग म्हणून ही योजना इतर महाविद्यालयांना लागू आहे.  त्यामुळे तिचा लाभ समाजकार्य महाविद्यालयातील अध्यापकांना लागू करण्याची मागणी होती.

—–०—–

जलसंपदा विभाग

दमणगंगा एकदरे, दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस तसेच दमणगंगा वैतरणा गोदावदी नदी जोड योजनेस मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

दमणगंगा-एकदरे-गोदावरी या योजनेतून मराठवाड्यातील १० हजार ११ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल.  तसेच ६८.७८६ दलघमी पाणी सिंचनासाठी, १३.७६ दलघमी पाणी पिण्यासाठी आणि ९.१७ दलघमी पाणी उद्योगासाठी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविण्याच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. आंतरराज्यीय  दमणगंगा-पिंजाळ, नदीजोड प्रकल्प व नारपार गिरणा नदी योजना, पार – गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांना राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्याचे ठरले आहे.  या प्रकल्पाची किंमत २ हजार २१३ कोटी रुपये आहे.

दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेच्या १३ हजार ४९७ कोटी २४ लाख किंमतीच्या प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली.  हा प्रकल्प दमणगंगा आणि वैतरणा उपखोऱ्यातील ५.६८ टीएमसी अतिरिक्त पाणी स्थानिक वापरासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील अवर्षणप्रवण सिन्नर तालुका आणि मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला याचा लाभ होईल.

—–०—–

जलसंपदा विभाग

वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

वैजापूर तालुक्यातील शनीदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

हा बंधारा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत गोदावरी खोऱ्यात असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील या प्रकल्पामुळे ८.८४ दलघमी पाणी साठा निर्माण होणार आहे.  त्यामुळे १९७८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल.  या बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील नादुरुस्त अवस्थेतील कमालपूर व खानापूर या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा पाणी वापर शनीदेवगाव बंधाऱ्यातून करण्यात येईल.

—–०—–

महसूल विभाग

राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

पुणे जिल्ह्यातील मौ.जंक्शन, मौ.भरणेवाडी, मौ.अंथुर्णे, मौ.लासुर्णे येथील १३१ हेक्टर ५० आर. अशी राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मौ.जंक्शन येथील २० हेक्टर ३८ आर, मौ.भरणेवाडी येथील २४ हेक्टर २४ आर., मौ.अंथुर्णे येथील २१ हेक्टर १८ आर. आणि मौ.लासुर्णे येथील ६५ हेक्टी ७० आर. अशी ही जमीन चालू बाजारमुल्यानुसार देण्यात येईल.

—–०—–

महसूल विभाग

पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

ठाणे तालुक्यातील मौ.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे महानगरपालिकेस प्रशासकीय भवनासाठी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पाचपाखाडी येथील ५३४ सर्वे नंबर मधील ३६ गुंठे ९२ आर शासकीय जमीन ठाणे महापालिकेस प्रशासकीय भवनासाठी देण्यात येईल.

—–०—–

महसूल विभाग

खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

ठाणे तालुक्यातील खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

खिडकाळी येथील ७ हेक्टर ६९ गुंठे ३४ आर ही शासकीय जमीन सामाजिक न्याय विभागास हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी एक विशेष बाब म्हणून देण्याचा निर्णय झाला.

—–०—–

नगर विकास विभाग

पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या टप्प्यातील खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन या मेट्रो मार्गांना मान्यता देण्यात आली.  या मार्गिंकांची एकूण लांबी ३१.६३ कि.मी. असून २८ उन्नत स्थानके आहेत.  यासाठी ९ हजार ८१७ कोटी १९लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पास महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

—–०—–

सहकार विभाग

किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज

समान हप्त्यात परतफेडीस मान्यता

किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह समान हप्त्यात परतफेड करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

१९८१-८२ चे केन पेमेंट देण्यासाठी शासन हमी वरील ३ कोटी ४२ लाख ७० हजार तसेच २००२-०३ मधील एसएमपी प्रमाणे शासन हमी वर कर्जाचे २ कोटी ८५ लाख ५३ हजार आणि कर्जावरील हमी शुल्कावरील ६१ लाख २५ हजार अशा ६ कोटी ८९ लाख ४८ हजार रकमेस कर्ज परतफेडीच्या धोरणानुसार ८ वर्षात समान हप्त्याने परतफेडीस मान्यता देण्यात आली.

—–०—–

सहकार विभाग

अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ ४२ हजार ८४२ शेतकऱ्यांना होईल.

सध्या राज्यात २ हजार ६५९ उपसा सिंचन सहकारी संस्था असून २६१ संस्थांकडे बँकांची थकबाकी आहे. या संस्थांपैकी १४४ संस्था सध्या सुरु असून ४७ संस्था अवसायनात व ७० संस्थांची नोंदणी रद्द झाली आहे.  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अवसायानातील व नोंदणी रद्द झालेल्या ११७ संस्थांचे मुद्दल कर्ज ८३ कोटी ९ लाख माफ करण्यास मान्यता देण्यात आली.  त्याच प्रमाणे सध्याच्या कार्यरत १४४ संस्थांचे ५० टक्के मुद्दल कर्ज अशी ४९ कोटी ४५ लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली.  अशा प्रकारे एकूण १३२ कोटी ५४ लाख मुद्दल कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली.

—–०—–

वैद्यकीय शिक्षण विभाग

मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सहयोगी प्राध्यापक, फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन, साथरोग तज्ज्ञ, अभिरक्षक, रसायन शास्त्रज्ञ, सुरक्षा निरिक्षक, आवासी आणि निवासी भिषक अशी ६ पदे समर्पित करून इमर्जन्सी मेडिसिन या विषयात  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक अशी ३ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील.

—–०—–

सार्वजनिक आरोग्य विभाग

खंड क्षमापीत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

खंड क्षमापन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

खंड क्षमापन झालेल्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा “गट-अ” संवर्गातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अस्थायी सेवेत रुजू झालेले तसेच २ फेब्रुवारी २००९ रोजीच्या अधिसूचनेव्दारे समावेशन झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या निवड मंडळामार्फत नियुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अधिकाऱ्यांना विधि व न्याय विभागाच्या दि.२८.०२.२०१७ च्या शासन परिपत्रकातील समान प्रकरणी समान न्याय या तत्वास अनुसरुन शासन निर्णय, दि.०८.११.२०२३ नुसार खंड क्षमापन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना  दि.०१ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल.

—–०—–

अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास महामंडळासाठी अभ्यासगट

अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास महामंडळासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना उद्योग आणि स्वयंरोजगारासाठी विविध योजना राबविण्यात येतील.

—–०—–

कौशल्य विकास विभाग

कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नामकरण असेल. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

 

 

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...