बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 380

मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात ‘संविधान मंदिरा’चे उद्घाटन

मुंबई, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर हा उपक्रम कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मंत्रालयातील स्वच्छता कर्मचारी जया दीपक चव्हाण, केशव  परमार, प्रतिमा विलास मांगळे यांच्या हस्ते ‘संविधान मंदिरा’चे उद्घाटन करण्यात आले.

कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिरांची स्थापना  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून  करण्यात आली आहे.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आपले  संविधान आणि त्याचे महत्व, ‘संविधान मंदिरांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम नक्कीच महत्वपूर्ण ठरेल.

00000

संध्या  गरवारे /वि.सं.अ.

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान

मुंबई,दि. १४ : पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.

पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील ५० मीटर रायफल ३ पोझीशन या उपप्रकारामध्ये कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंचा व श्री.कुसळे यांच्या प्रशिक्षक  दिपाली देशपांडे व श्री. खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

राज्य शासनाने नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेमध्ये केलेल्या भरघोस वाढीच्या पार्श्वभूमीवर पॅरिस, ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे यास दोन कोटी रुपये तसेच त्यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना २० लाख रुपये व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी यास तीन कोटी रुपये तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बुडापेस्ट, हंगेरी येथे दि. १० ते २३ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत झालेल्या ४५ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे १९३ व १८१ देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारताच्या संघाने सुवर्णपदक संपादन करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संघात राज्याचे बुद्धीबळपटू विदीत गुजराथी व दिव्या देशमुख यांचा समावेश होता, या दोन्ही खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी रोख एक कोटी रुपये व त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता व अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी १० लाख रुपये इतकी रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

विदीत गुजराथी स्पर्धेकरिता विदेशात असल्यामुळे त्यांच्यावतीने त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी तर अभिजीत कुंटे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेघना कुंटे आणि संकल्प गुप्ता यांच्यावतीने त्यांचे वडील  संदीप गुप्ता यांनी सन्मान स्वीकारला.

०००००

राजू धोत्रे/विसंअ

०००००

 

 

लोककल्याणासाठी असलेला निधी लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर,दि. 13: लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. याची सुरुवात आम्ही अन्नदात्या शेतकऱ्यांपासून केली. केंद्रसारकारचे सहा हजार व महाराष्ट्र शासनाचे सहा हजार असे आपण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सावरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील वृद्ध व्यक्तींना आधार देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना आपण साकारली. लाडक्या बहिणींची योजना आणली. आपल्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. बांधकाम कामगारांसाठी आधार देणारी खास कल्याणकारी योजना आपण सुरू केली. या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा आपण निर्णय घेतला. लोकांच्या कल्याणाचा निधी त्यांच्या हक्काचा आहे. लोक कल्याणाच्या भावनेतून हा निधी त्यांच्या पर्यंत पोहचविणे व वंचितांना न्यायाच्या कक्षेत आणणे याला आम्ही प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पारशिवणी येथे सुमारे २ हजार कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारशिवणी मैदान येथे आयोजित समारंभात ते बोलत होते. आमदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल व मान्यवर उपस्थित होते. या विकासकामात सत्रापूर उपसा सिंचन योजना, रस्ते, बंधारे, खिंडसी पुरक कालवा, सालई – माहुली पूल, नेऊरवाडा- पाली, घाटरोहणा – वाघोडा पुल, मनसर माहुली रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंटीकरण, रामटेक बसस्थानक नूतनीकरण, रामटेक पंचायत समिती प्रशासकीय इमारत, देवलापार अपर तहसील कार्यालय नवीन इमारत आदि कामांचा समावेश आहे.

गेल्या अडीच वर्षात कधी नव्हे ते शासनाने सर्वसामान्यांच्या व्यथा समजून घेतल्या. गोरगरिबांचे दु:ख ओळखले. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यातून सावरण्यासाठी आपण त्यांच्या बांधावर जाऊन एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदत पोहचविली. त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिलो. कोणत्याही शासकीय योजनांसाठी दलालाची साखळी आपण ठेवली नाही. केंद्राचा, राज्य शासनाचा जो निधी आहे तो थेट लाभधारकांच्या खात्यात जमा होत आहे. या माध्यमातून राज्यातील जनतेने एक स्वच्छ पारदर्शी सरकारची प्रचिती घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे अतिशय कल्पकतेने आमच्या काही बहीणी वापरत आहेत. यातून त्यांनी आपल्या छोट्या व्यवसायाला आकार दिला आहे. हा पैसा बाजारात खेळते भांडवल म्हणून वापरला जाऊ लागला आहे. या योजनेसमवेत लखपती दिदी योजनेसाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. उमेद अंतर्गत महिला बचत गटांची संख्या आम्ही 60 लाखांवरुन 1 कोटीपर्यंत लवकरच घेऊन जात आहोत. उमेदच्या अंतर्गत असलेल्या महिलांनाही अधिक भक्कम करु, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आमदार आशिष जयस्वाल यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संवाद साधला. विदर्भातील विविध विकास कामांसह सिंचनाच्या दृष्टीनेही आपण मैलाचा टपा गाठल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नागपूर वैनगंगा विकास खोऱ्यांतील सत्रापूर विकास योजनेच्या माध्यमातून सुमारे 10 हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. यासाठी 123 कोटी रुपये राज्यशासनाने दिले आहेत. या योजनेतून जे पंपगृह आहेत त्याद्वारे रामटेक तालुक्यातील 24 गावांतील 6 हजार एकर क्षेत्राला सिंचन उपलब्ध होत आहे.

विदर्भातील सिंचन क्षेत्राला न्याय देण्याकरीता आपण सातत्याने प्रयत्न केले. हा प्रकल्प अनुशेष निर्मुलनाचा एक भाग असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्प विदर्भातील सिंचनाचे चित्र बदलविणारा प्रकल्प आहे. सुमारे 87 हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहेत. यातून 10 लाख एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. आमदार आशिष जयस्वाल यांनी अत्यंत कल्पकतेने आपल्या मतदार संघात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली या शब्दात त्यांनी गौरव केला.

यावेळी आमदार आशिष जयस्वाल यांनी आपल्या मनोगतात मतदार संघातील विकास कामांविषयी कटिबध्दता व्यक्त करुन शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
00000

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय; आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना 

नांदेड दि. १३ ऑक्टोंबर : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
आज नांदेड येथील नवा मोंढा, कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानातील नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या निवडक सन्मानार्थी लाभार्थ्यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया…
“मुलींना मोफत उच्च शिक्षण योजने”मुळे;
मुलीच्या पंखांना बळ…….
नांदेड जिल्ह्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालय, ग्रामीण येथे बीएडच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली कविता मोकळे विद्यार्थिनी सांगते की, पूर्वी मुलींना उच्च शिक्षणात 50 टक्के  फी माफ होती. असे असूनही राहिलेली 50 टक्के फी भरणेही माझ्या शेतकरी आई वडिलांसाठी मोठे अडचणीचे होते. परंतू  आत्ता शासनाने मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी माफ करून  मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना सुरू केली. त्यामुळे  मला आत्ता  माझे शिक्षण पूर्ण करता येणार असून शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
या योजनेची लाभार्थी म्हणून माझा व माझ्या सहकारी विद्यार्थिनींचा मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सन्मानही झाला, हा सन्मान माझ्यासाठी खूप अविश्वसनीय आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण फी माफ केल्याने कुटुंबातही मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शासनाने  मुलींना उच्च शिक्षण घेऊन आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण केल्याची भावना ही कविताने बोलून दाखविली.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून
दिव्यांगही स्वतः च्या पायावर उभे
          राज्यात मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेतून उच्च शिक्षित तरुणांना रोजगार मिळत आहे. त्यातही नांदेड येथील आर.आर. मालपाणी  मतिमंद आणि मूकबधीर विद्यालय व किनवट सारख्या आदिवासी भागातील  निवासी मूकबधीर विद्यालयातील  संगणक तज्ञ, आयटीआय, डीएड  विद्यार्थ्यांना मिळालेला रोजगार विशेष आहे.
    कारण मालपाणी विद्यालयातील अभिषेक शेळके, समिउल्ला खान आसर पठाण, प्रदीप लोंढे तर निवासी मूकबधीर विद्यालयातील अक्षय तकलवार हे  विद्यार्थी कर्णबधीर, मूकबधीर असले तरी त्यांना आपल्या ज्ञानाच्या जोरावर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगाराची संधी मिळाली आहे. याआधी त्यांना कुठलाच रोजगार नव्हता, त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयाचे प्राचार्य नितीन निर्मल यांनी शासनाचे आभार मानले आहे.
श्री.निर्मल यांच्या प्रतिक्रियेचे द्विभाषिक शिक्षक साईनाथ इप्तेकर यांनी मुलांच्या भाषेत भाषांतरित करूनही सांगितले. रोजगार मिळाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर  झळकत होता.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 
आदिवासी पाड्यावरील महिला झाल्या आर्थिक सक्षम
      किनवट तालुक्यातील घोगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत शिवशक्तिनगर येथील पाड्यावर राहणाऱ्या जिजाबाई धुरवे व शशिकला आत्राम या 50 वर्षावरील वयाच्या आदिवासी  महिलांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. शेती आणि पशूपालन करणाऱ्या, स्वतःचे अर्जही भरता न येणाऱ्या या महिलांचे अंगणवाडी पर्यवेक्षिका चंद्रकला पोले यांनी परिपूर्ण अर्ज सादर केल्याने आजपर्यत 7 हजार 500 रू. चा लाभ त्यांना मिळाला आणि इतर महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाल्याने गावातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्तेही सन्मान होत असल्याने आनंद होत असल्याचे सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले.
बचत गटातील महिला आर्थिक मदतीतून स्वयंपूर्ण
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बँकेमार्फत 10 महिला असलेल्या आम्रपाली बचत गटास सात लाखांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून आम्ही बांधकाम साहित्य विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून आम्हाला चांगले उत्पन्नही मिळत आहे. आज मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते आमचा सन्मानही  झाला असून आम्हाला खूप आनंद होत असल्याच्या भावना आम्रपाली बचत गटातील लक्ष्मी धडेकर, चंद्रकला धडेकर यांनी व्यक्त केल्या.
लाडाची योजना लेक लाडकी
महिलांचे सक्षमीकरण करण्याचा मुख्य पाया म्हणजे मुलींच्या जन्मापासून त्यांचे आरोग्य, पोषण यांची काळजी घेणे. यासाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना गरीब कुटुंबासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. नांदेड येथील पौर्णिमा दापशेंडे यांना 10 महिन्यापूर्वी मुलीच्या जन्मावेळी पाच हजार रूपयांचे अनुदान व बेबी किट चा लाभ देण्यात आला. तसेच संघमित्रा कांबळे यांनाही एक वर्षापूर्वी मुलीच्या जन्मावेळी  पाच हजार रूपये व बेबी किट चा लाभ देण्यात आला.  मुलींच्या जन्मावेळी लेक लाडकी योजनेचा लाभ मिळाल्याने मुलींची चांगल्या पध्दतीने काळजी घेता आली, असे त्यांनी यावेळी सांगत शासनाचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांचाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्या सर्वांनी शासनाचे आभार मानले.
00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन

नांदेड, दि. १३ ऑक्टोबर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रकल्पांचे आज भूमिपूजन केले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुख्य कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष विकासकामांच्या ठिकाणी उपस्थित राहून भूमिपूजन केले.

 याप्रसंगी कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.

यामध्ये हनुमान गड परिसरातील राजमाता जिजाऊ सृष्टीचे लोकार्पण. कुसुम सभागृहासमोर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमीपूजन. पावडे वाडी नाका परिसरातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन.

नांदेड येथील वाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे तसेच परिचारिका वसतिगृहाचे भूमीपूजन. पिपल्स व सायन्स कॉलेज परिसरातील कै. नरहर कुरूंदकर यांचे नांदेड येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामाचे भूमीपूजन. यासह लेबर कॉलनीतील पाणी पुरवठा सक्षमीकरण व बळकटीकरणाचे भूमीपूजन यासह शहरातील शेतकरी चौक, तरोडा नाका येथे विविध रस्त्यांसाठी भूसंपादनासह सुधारणा आदी कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले.

00000

 

मुख्यमंत्र्यांनी केले गोमातेचे पूजन

नांदेड,दि. 13 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच गोमातेला पुष्पहार घालून पूजन केले. महाराष्ट्र शासनाने गोमातेला ‘राज्यमाता-गोमाता’ नुकतीच म्हणून मान्यता दिली आहे.

या पूजन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी गाय या गोमातेचे पूजन केले. लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील परसराम सापनर यांची लाल कंधारी, किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील संतोष पेळे यांची मथुरा लभाण व नांदेड येथील श्रीरंग डोईफोडे यांच्या देवणी गायीचा समावेश आहे.

यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आदी उपस्थित होते.

0000

महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’सह सर्व योजना सुरूच राहणार; महिलांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध

 नांदेड, दि १३ :- राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना देशभरात सुपरहिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा, हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेसह शासनाच्या सर्व योजना ‘पर्मनंट’ सुरू राहतील, असा विश्वासही  त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केला.

नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, श्यामसुंदर शिंदे, राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,  नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाच्यवतीने मुख्यमंत्री शिंदे यांचे स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील दहा लाख भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ मिळतो आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन सुरु केलेली ही योजना आहे. आता महिनाभरात भाऊबीज पण येईल. आमची भगिनींसाठी ही ओवाळणी थांबणार नाही. ती सतत सुरूच राहीन. योजना सुरु होऊन तीन महिने झालेत, जवळपास २ कोटी ३० लाख भगिनींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेसाठी शासनाने ३३ हजार कोटींची तरतूद केली आहे. तर १७ हजार कोटी रूपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२४ या दोन महिन्यांचे आगाऊ हप्तेही खात्यात जमा केले आहेत. सध्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रूपये जमा होताहेत. तर यापुढे यामध्ये योजनेच्या रक्कमेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे प्रत्येक महिलेला अधिक आर्थिक सक्षम बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. छोटा, मोठा व्यवसाय उभारणीसाठी या रकमेचा पाठिंबा महिलांना मिळणार आहे. काही महिला या दिशेने पुढेही जात आहेत, त्याचे समाधान आहे. या महिला लखपती दिदी झाल्याचे पाहायचे आहे, असा आशावादही  मुख्यमंत्री यांनी व्यक्त करत महिलांना प्रेरित केले. आर्थिक सक्षम महिला या ध्येयाबरोबरच सुरक्षित महिला यालाही शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटात ५० टक्के सवलतीचा लाभही देण्यात येत आहे. या योजनांबरोबरच सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी योजनाही सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गान सम्राज्ञी आशाताई भोसले यांनीही या योजनेचे कौतुक करत सरकारचे अभिनंदन केले आहे, हे विशेष. सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत ‘शासन आपल्या दारी’ सारखा स्तुत्य उपक्रम राबवून पाच कोटी जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून अतिशय समाधान होत आहे. बहिणींच्या डोळ्यातील आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर अखेरपर्यंत रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळते.

तत्पूर्वी आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळातवेळ काढून दोनवेळा पुढे ढकलेल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली याबद्दल आभार व्यक्त केले. त्यासोबतच मोठ्याप्रमाणात विकासासाठी निधी दिल्याबद्दलही आभार व्यक्त केले. राजर्षी पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. महिलांच्या आयुष्यात या नव्या आर्थिक क्रांतीने भर घातल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालय येथे २०० हून ५०० खाटांची संख्या वाढवून श्रेणी वाढ केल्याबद्दल तसेच नरहर कुरूंदकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्र अव्वल

लाडक्या बहिणीला रक्कम दिली, मग लाडक्या भावांचे काय ? असा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता.  तर भावांसाठीही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दरमहा ६ हजार, ८ हजार आणि १० हजार प्रशिक्षण भत्ता देऊन प्रशिक्षण योजना आपण राबवली, अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही गौरवोद्गार मुख्यमंत्री यांनी काढले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, लेक लाडकी योजना, महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियानासह इतर योजनांच्या महिला, युवा, ज्येष्ठ लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत  यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

प्रारंभी लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  सूत्रसंचालन स्म‍िता मोहरीर यांनी केले. आभार शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

गोमातांचे पूजन, ‘खेळ पैठणीची रंगत

राज्यमाता म्हणून नुकताच गायीला सन्मान राज्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी या प्रजातीच्या गोमातांचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील कला, गितांनी कार्यक्रमाने रंगत आणली. तसेच उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर ‘खेळ पैठणीचा’ हा प्रश्न मंजुषा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विचारलेल्या प्रश्नाला बरोबर उत्तर देणाऱ्या प्रत्येक विजेत्या महिलेस मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.

00000

 

 

लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहिण करण्याचे  काम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक 13 – बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत,  या बहिणींना लखपती बहिणी करण्याचे  काम शासन करणार आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कांजूरमार्ग येथे १२८ कोटी रुपये खर्चातून मुंबई महानगपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नेहरूनगर कांजूरमार्ग येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार नरेश म्हस्के, नगरसेविका सुवर्णा करंजे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महानगपालिकेच्या या रुग्णालयासाठी १२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शासनाने विविध रुग्णालयामध्ये कॅशलेस सुविधा देखील सुरू केली आहे. यासह महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. लेक लाडकी योजना, मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजनांमुळे महिलांना सक्षम होण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाही,  असे त्यांनी यावेळी सांगितले.

दोन वर्षांत मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त करणार

मुंबई शहरातील रस्त्यांच्या कामाना प्राधान्य देण्यात येत आहे दोन वर्षांत मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त करणार आहे, असा  मुख्यमंत्री शिंदे ग्वाही दिली.

भूमिपूजनासह विविध प्रकारच्या कामांना प्राधान्य

नेहरूनगर वसाहती मधील माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे लोकार्पण यापूर्वी आपण केले आहे, नेहरूनगर येथील बुध्द विहार,   नागरिकांसाठी सिमेट्री, मुस्लिम नागरिकांच्या मागणीस देखील तात्काळ प्रतिसाद दिला आहे. मुस्लिम, बुध्द, ख्रिश्चन, पारसी असे सर्व समाजातील नागरिकांच्यासाठी राज्य सरकार काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

00000

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.13(जिमाका): राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले.

सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.श्री. दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर-पाटणकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड , सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राजेश पाटील, मुख्य अभियंता श्री.राजेश निघोट , मुख्य अभियंता श्री.एस.के. सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते .

ठाणे खाडी पूल क्र.3 च्या उत्तर वाहिनीच्या लोकार्पणाबरोबर रेवस – रेडी सागरी महामार्गावरील धरमतर , कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पूलांचे भूमिपूजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडले.

स्थानिक स्तरावर प्रत्येक खाडी पूलाच्या कामाचे प्रत्यक्ष भूमिपूजन स्थानिक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

या सात खाडी पूलांची एकूण लांबी 26.70 किलोमीटर असून त्यासाठी 7 हजार 851 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे .

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती.ती मागणी आज पूर्ण होतेय. हा योगायोग आहे . या खाडी पूलांमुळे कोकणाचा विकास होईलच, तसेच पर्यटनाला चालना मिळेल. कोकणवासियांसाठी ही दिवाळीची भेटच आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या माध्यमातून  राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात पोहोचता येईल. पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येईल .

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री.दादाजी भुसे ठाणे खाडी पूल क्र.3 ची उत्तर वाहिनी या तीन पदरी पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच यश येईल, असा विश्वास व्यक्त करून म्हणाले की, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीच्या पूलाचे कामही अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. आज दुग्धशर्करा योग म्हणजे रेवस-रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांचे भूमीपूजन एकाच वेळी होत आहे. या परिसरातील  निसर्गाला अनुरूप असे केबल स्टे व इतर प्रकारांच्या पूलांची निर्मिती रस्ते विकास महामंडळ अत्यंत कल्पकतेने करणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे खाडी पूलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवार, दि.14 ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

प्रकल्पांची माहिती :

  1. सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र.३ प्रकल्पामधील कामाचा वाव :

प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पूल बांधणे (मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर)

  • प्रकल्पाची एकूण किंमत : रु. 559 कोटी.
  • पूलाची लांबी : 3180 मी. ( पोहोच रस्त्यासह )
  • सद्य:स्थितीत उत्तर वाहिनी पूलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी सोमवार, दि.14 ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम 80 % पूर्ण झाले आहे.
  • रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची एकूण लांबी : 498 किमी.
  • पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प.

सागरी महामार्गावरील सात पूलांची माहिती-

  • सर्व 7 पूलांची एकूण लांबी 26.70 किमी आणि एकूण प्रशासकीय मान्यता रु. 7 हजार 851 कोटी इतकी आहे.

प्रत्येक पूलाच्या कामाची मुदत तीन वर्ष आहे .

1)  रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडीवरील पूल

  • एकूण लांबी : 10.20 किमी.
  • प्रशासकीय मान्यता : रु. 3 हजार 57 कोटी
  • पूलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पूल)

2) रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडीवरील पूल:

  • एकूण लांबी : 3.82 कि मी
  • प्रशासकीय मान्यता रक्कम : 1 हजार 736 कोटी
  • पूलाचा प्रकार : केबल स्टे

3) दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडी वरील पूल:

  • एकूण लांबी : 4.31 किमी.
  • प्रशासकीय मान्यता रक्कम : 1 हजार 315 कोटी.
  • पूलाचा प्रकार : केबल स्टे

4) बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पूल :

एकूण लांबी : 1.711 किमी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 408 कोटी

पूलाचा प्रकार : केबल स्टे

5) केळशी भागातील केळशी खाडीवरील पूल :

  • एकूण लांबी : 670 मी.
  • प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 148 कोटी
  • पूलाचा प्रकार: बॉक्स गर्डर

6) जयगड खाडीवरील पूल:

एकूण लांबी : 4.40 किमी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 930 कोटी

पूलाचा प्रकार : केबल स्टे

7) कुणकेश्वर येथील पूलाचे बांधकाम

  • एकूण लांबी : 1580 मी.
  • प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 257 कोटी
  • पूलाचा प्रकार :  केबल स्टे

००००

मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 13 :- माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, असे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जवाहर बाल भवन परिसर, चर्नी रोड (प.) येथे उभारण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना यातून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन / लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार तथा सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठी भाषा भवनासाठी चांगली जागा उपलब्ध झाली असून भवनाचे भूमिपूजन आज सागराच्या साक्षीने होत आहे याचा आपणास आनंद होत आहे. भाषा भवनाचे काम अतिशय दर्जेदार व्हावे असे सांगून या भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धन, संशोधन आणि प्रसारासाठी अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाषा भवनसाठी साहित्यिक व अन्य क्षेत्रातून आलेल्या सूचनांचा आदर केला जाईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दोन हजार वर्षांपेक्षा अधिक जुनी माझी माय मराठी भाषा असल्याचे सिद्ध झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेकांचे योगदान मिळाले आहे. सर्वांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

संतांनी अभंग, गवळण, भारुड यातून मराठी भाषेचे सौंदर्य समोर आणले. मराठी भाषेच्या वैभवात भर घातली. ज्ञानपीठकारांनी आणि सर्व साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे असे सांगून मराठी भाषेच्या विकासासाठी जे-जे करता येईल ते केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करत असताना जनकल्याणाच्या योजनेतून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, वयोश्री अशा योजनांच्या माध्यमातून सामान्यांना आधार मिळत आहे. जनकल्याणाच्या योजना राबवताना राज्याचा विकासही तितक्याच गतीने केला जात आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, समृद्धी महामार्ग असे विकासाचे मोठे प्रकल्प राबवून राज्य विकासात अग्रेसर ठेवले आहे.

मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी बोलताना मराठी भाषकांना आणि साहित्यिकांना अभिमानास्पद वाटेल असे भाषा भवन उभारले जाईल, अशी ग्वाही दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या वैभवात आणखी भर पडली आहे. मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांसाठी व राहण्याची सोय व्हावी यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साहित्य भवन बांधणार असल्याचे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारत, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

नवी मुंबईच्या ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या मराठी साहित्य भवन इमारत बांधकामाच्या भूमिपूजनासह बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (2024-25) यातून  भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलेले विकास प्रकल्प –

  • सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन
  • जवाहर बालभवन, मुंबई या इमारतीमध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रेक्षागृह, संगीत कक्ष, ग्रंथालय व इतर अनुषंगिक कामांचा शुभारंभ
  • सर ज.जी. कला संस्था वसतिगृह व सर ज.जी. वास्तुशास्त्र वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन
  • शासकीय तंत्रविज्ञान महाविद्यालये मुले व मुलींचे वसतिगृह, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  • महाराष्ट्र राज्य तंत्र निकेतन मंडळ, प्रशासकीय इमारत, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  • वरळी, मुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  • नायगाव, दादर, भायखळा, शिवडी, शीव (सायन), वरळी पोलीस वसाहत लोकार्पण/भूमिपूजन
  • उमरखाडी, डोंगरी, डेव्हिड ससून येथील बालसुधारगृह बांधकामांचे लोकार्पण
  • नागरिक, देशी व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी भारतीय औषधी पद्धतीच्या प्रचार व प्रसारासाठी पोद्दार रुग्णालय, वरळी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पंचकर्म सुविधांचा शुभारंभ.
  • सेंट्रल बस स्टॅण्ड व मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहक/ चालक यांच्याकरिता वातानुकूलित विश्रामगृहाचे लोकार्पण
  • नूतनीकरण केलेल्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार भवन व विविध क्रीडा सुविधा संकुलाचे लोकार्पण
  • मत्स्य व्यवसाय विकास कार्यक्रम भूमिपूजन
  • मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर परिसर विकास कामाचे भूमिपूजन
  • बाबुलनाथ मंदिर परिसर विकास कामाचा शुभारंभ
  • कै. श्री. जगन्नाथ शंकरशेट यांचे स्मारक व कै. श्री. भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
  • जे. जे. उडाणपुलाखालील हो- हो बेस्ट बसेसमध्ये तयार करण्यात आलेले कलादालन व वाचनालय लोकार्पण
  • ए विभाग, मुंबई येथील बधवार पार्क येथे फूड प्लाझाचा शुभारंभ
  • ए ते डी वॉर्ड येथे पिंक टॉयलेटचे लोकार्पण
  • मुंबई शहरामध्ये 14 ठिकाणी कॉफी शॉपसह आकांक्षी स्वच्छतागृहांचा शुभारंभ व ७ ठिकाणी भूमिपूजन
  • फॅशन स्ट्रीटच्या कायापालटाचा शुभारंभ व भूमिपूजन
  • मुंबई शहरातील दलित वस्तीमध्ये दहा ठिकाणी वाचनालय व अभ्यासिका उपक्रमाचा शुभारंभ
  • ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सोयी सुविधा उपक्रमाचा शुभारंभ
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 103 शाळांमधील टेरेसवरील किचन गार्डनचे लोकार्पण
  • मुंबई शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण
  • श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या मंजूर प्रकल्पाचे सादरीकरण
  • दादर चौपाटी किनारा पुनर्भरणी
  • मुंबई शहरातील जुन्या म्हाडा इमारतींमध्ये उद्वाहन (लिफ्ट) सुविधा निर्माण करणे
  • सर ज. जी. रुग्णालयातील वॉर्ड नूतनीकरण व यंत्र सामग्री लोकार्पण
  • वरळी दुग्धशाळा येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती व नूतनीकरण अशा बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या विविध विकास प्रकल्पांचा यात समावेश आहे.

00000

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...