मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 374

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी प्राप्त, यापैकी ६६० निकाली; २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध राजकीय पक्षांच्या १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण

मुंबई, दि. २० : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध राजकीय पक्षांच्या एकूण १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात आले असून यामध्ये व्हिडिओ, क्रिएटिव्ह व ऑडिओ जाहिरातींचा समावेश आहे.

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

  • किमान मूलभूत सुविधाबाबत खात्री करा
  • जेष्ठ, दिव्यांगांचे गृह मतदान शंभर टक्के यशस्वी करा
  • 274, 275 व 276 विधानसभा मतदारसंघामधील क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्या बैठकीत सूचना

कोल्हापूर दि. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा वाढेल, यासाठी स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृतीचे कामकाज करावे. यासाठी आवश्यक नियोजन करून स्वीप मोहीम गतीने राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात 274 कोल्हापूर दक्षिण, 275 करवीर व 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधील सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण करवीर हरिष धार्मिक, 275 करवीर च्या वर्षा शिंगण, 276 कोल्हापूर उत्तर चे डॉ. संपत खिलारी, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार स्वप्नील रावडे, करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांच्यासह तीनही मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी, व निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त केले नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले की, सर्वांनी निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, आपणांस नेमून दिलेल्या भागामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून 85 वर्षावरील मतदारांना व दिव्यांग मतदारांना 12 डी चे अर्ज वाटप करणेचे कामकाज सुरू आहे. ते अर्ज भरून घेऊन त्यांचे गृह मतदान करावयाचे आहे. याकामाचा आढावा घेणेत यावा. तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेसाठी येणारे पथक यांचेशी समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, याची दक्षता घ्यावी. नेमून दिलेल्या भागामधील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथे सर्व किमान मुलभूत सुविधा आहेत किंवा कसे याबाबत खात्री करून संबधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर करावा. नेमून दिलेल्या झोनमध्ये असुरक्षीत मतदान केंद्र असतील तर त्याबाबत माहिती संबधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणेत यावी. नेमून दिलेल्या भागाच्या कार्यक्षेत्रापूरते विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तीबाबत आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ते निर्गमित करणेत येतील असे ते यावेळी म्हणाले. नोडल अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेले कामकाज त्यांचे अधिनस्त असलेले अधिकारी/ कर्मचारी यांचेशी योग्य तो समन्वय साधून पुर्ण करा.

बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले दिनांक 15 ऑक्टोबर पासून सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 जाहिर झाली असून त्याच दिनांकापासून आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. दिनांक 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र जमा करण्याची मुदत आहे. त्यानंतर दिनांक 30 ऑक्टोबर रोजी छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी जाहिर केली जाईल. दिनांक 04 ऑक्टोबर रोजी पर्यंत माघारीची मुदत असलेने त्या दिवशी सायंकाळी निवडणूक लढविणारे अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल

०००

 

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली – डॉ. किरण कुलकर्णी

मुंबई, दि. १९ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 576 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 563 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकुण 98 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आले असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी माहिती दिली.

सी-व्हिजिल (C-Vigil app) कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यानुसार राज्यातील शासकीय जागेतील 2 लाख 42 हजार 634, सार्वजनिक जागेतील 2 लाख 79 हजार तर खाजगी जागेतील विनापरवाना 1 लाख 83 हजार जाहिराती काढून टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये भिंतीवरील पेंटींग, पोस्टर, बॅनर, कटआऊट, फ्लेक्स इत्यादींचा समावेश आहे तसेच विनापरवाना जाहिरातींवर कारवाई करणे सुरु असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 14 कोटी 90 लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विविध विभागांना सुचित करण्यात आले आहे की,  कोणत्याही कल्याणकारी योजनांचे नवे लाभार्थी निवडता येणार नाहीत, नवी योजना जाहिर करता येणार नाही तसेच कल्याणकारी योजनांकरिता निधी वाटपाबाबत निवडणूक आयोगाची परवानगी बंधनकारक आहे. आचारसंहितेच्या तरतुदींची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले मार्गदर्शन

  • मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम
  • गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास तात्काळ हजर व्हा – जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. १९:  मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत सर्वच 26 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात सुरु आहेत. 158-जोगेश्वरी, 167- विलेपार्ले व 168 चांदिवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अंतर्गत विभागीय अधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासाठी निवडणूक कामकाज विषयक व ‘ईव्हीएम’ संदर्भातील प्रथम प्रशिक्षण मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे झाले.

173- चेंबूर आणि 167- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोज गोहाड हे उपस्थित होते.

167- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अंतर्गत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास 672 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर 206 जण गैरहजर होते अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

मतदान केंद्र अध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, व इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण यावेळी झाले. यावेळी हॅण्डस ऑन ट्रेनिंगची देखील व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

प्रशिक्षणास तात्काळ हजर रहावे

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास तात्काळ हजर राहण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले आहेत.

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले त्यांची माहिती संकलित करण्यात येत असून गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही श्री क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

०००

 

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. १९ : राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत.

विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे.  या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे निदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.  जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

०००

मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करा – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि.१९ : मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची मा.भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला.निवडणूक संबंधितसर्व अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मा. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी,पंखे आदी निश्चित किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व देखभाल दुरुस्त्या करुन घ्याव्यात. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक लावावेत. मा. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जेष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपद्धती विहित करुन दिली आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये, यादृष्टीने ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग मतदारांना गृह मतदान करता येणार आहे. गृह मतदानासाठी नमुना 12-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मतदार नोंदणी झालेल्या प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण  करावे व नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी,एसएमएस,व्हाट्सअप  अशा माध्यमातून संपर्क करावा आणि मतदार केंद्राची माहिती दयावी. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. असे आदेशही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना मतदान स्लीप मिळाली का? मतदान केंद्र कुठे आहे? याबाबत विचारणा केली. अनेक मतदारांनी जिल्हाधिकारी श्री.यादव यांच्याशी संवाद साधला मतदानदिवशीचा अनुभव सांगितला त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी  तिथेच आवश्यक सूचना दिल्या. सर्व मतदान केंद्रांवरील संबंधित नोडल अधिकारी यांनामतदान जनजागृती उपक्रम विविध माध्यमातून राबवून मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा,  असेही यावेळी सांगितले

आज दिवसभरात कुलाबा, मलबारहील, मुबांदेवी, वरळी, शिवडी आणि भायखळा या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी भेट दिली.

विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र स्वीप अंतर्गत उपक्रम राबवा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांद्वारे संकल्पपत्र भरून द्यावे, यातील संदेशामध्ये त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती द्यावी. लोकशाहीच्या मजबूतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात यावा आणि शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेऊन  त्यांच्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करावा असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

०००

निवडणूक जबाबदारी आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर, दि. १९ : विधानसभा निवडणुकीच्या कामांना गती देण्यात आली असून यात प्राथमिक टप्प्यात वय वर्षे ८५ पेक्षा अधिक ज्यांचे वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग मतदार असलेल्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ही जबाबदारी सोपविण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा सहाय्यक शिक्षक जयप्रकाश हेडाऊ यांनी अधिकृत कर्तव्याचे पालन न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल झाली. या तक्रारीअन्वये सावनेर येथील पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रविंद्र होळी यांनी पो. स्टे. सावनेर येथे सदर तक्रार दाखल केली. नगरपरिषदेची सुभाष प्राथमिक शाळा, सावनेर येथील सहाय्यक शिक्षक जयप्रकाश जगरामजी हेडाऊ यांची यादी भाग क्रमांक १३५ करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणुन नेमणुक करण्यात आली होती. या क्षेत्राचे तलाठी तथा पर्यवेक्षक यांनी १२ ड फॉर्म भरून घेण्यास सांगितले असता हेडाऊ यांनी सदर काम करण्यास स्पष्ट नकार दिला. आदेश घेण्यास त्यांनी नकार दिला. अरेरावीचे असभ्य वर्तणूक केली. यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

निवडणूक कामाच्या आदेशाचे पालन करण्याच्या त्यांना वारंवार सूचना देवून त्यांनी आपल्या कर्तव्यात टाळाटाळ केली.  याबाबत उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी समज देवून पाहिली. त्यांना वाजवी संधी देवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे खलाटे यांनी सांगितले.

निवडणूक जबाबदारी आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई निवडणूक विभागातर्फे सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी ही राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. याच बरोबर कोणताही शासकीय कर्मचारी हा राजकीय प्रचारात सहभागी होता कामा नये. याबाबत निवडणूक विभागामार्फत स्वयंस्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत. आपली जबाबदारी टाळण्यासाठी कोणीही आदेश रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिला.

०००

कायद्याची दिशाभूल व चुकीची माहिती  शेअर केल्यास तात्काळ गुन्हे दाखल -पोलिस उपायुक्त लोहित मतानी    

नागपूर,दि.१९:  विधानसभा मतदानाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी यादृष्टीने आता पोलीस विभागाचा सायबर सेल हा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन अथवा इतर माध्यमातून कोणी चुकीचा संदेश फॉरवरर्ड केला अथवा दुसऱ्या सोशल माध्यमांवर शेअर केला तर संबंधित व्यक्ती विरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले. ग्रामीणभागातील प्रत्येक पोलीस ठाण्यापासून शहरातील पोलीस ठाण्यापर्यंत यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा एक कृतीगट ही कारवाई करेल, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील पोलीस विभागांतर्गत असलेल्या सायबर सेल व गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण सत्रातते बोलत होते. पोलीस आयुक्त कार्यालय येथील सभागृहात आयोजित या सत्रास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अमोल देशमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र जरी दिले असले तरी कायद्याचा कोणताही भंग होणार नाही याची जबाबदारी राज्यघटनेने प्रत्येकावर टाकलेली आहे. खोट्या पोस्ट तयार करणे, समाजाची दिशाभूल करणे, मजकुरात खाडाखोड करुन समाजात तेढ निर्माण होईल अथवा सामाजिक शांततेला बाधा पोहोचेल अशा प्रकारची कोणतीही कृती पोस्ट / मजकूर / चित्र आदी शेअर जरी केले तरी तो कायद्यानुसार गुन्हा आहे. चुकीची पोस्ट जरी तयार केली नसली आणि फक्त शेअर केली हा सुद्धा गुन्हा आहे. अशा प्रकारचा गुन्हा सोशल माध्यमांवर अथवा इतर माध्यमातून निर्देशनास आला तर कोणताही वेळ न दडवता तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त मतानी यांनी दिले. विविक्षित प्रसंगी जर वेळ आलीच तर कोणी तक्रार करेलयाची वाट न पाहता सुमुटो स्वत:हून कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 हा आदर्श आचारसंहितेचा मुख्य गाभा आहे. निवडणूक आचार संहितेच्या अनुषंगाने अनेक बाबी या अधिनियमात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्हापातळीवर माध्यमांच्या अनुषंगाने माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समिती तयार करण्यात आलेली आहे. विधानसभेच्या कोणत्याही उमेदवाराला आपल्या प्रचारासाठी जे साहित्य वापरावयाचे आहे त्याचे प्रमाणिकरण या समितीमार्फत केले जाते. कोणतेही साहित्य हे प्रचारासाठी वापरावयाचे असेल तर त्याची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. पोलीस विभागांतर्गतअसलेली सायबर शाखा, जिल्हा माहिती कार्यालय, सर्व पोलीस स्थानक प्रमुखयांच्यावतीने मुख्यालयस्थळी सायबर विभागातील कर्मचाऱ्यांची टीम यात मिळून जबाबदारी पार पाडतील असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला.

यावेळी पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

०००

 

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई,दि.१८ : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करून  मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात यावा. निवडणूक हा भारतीय लोकशाहीचा  सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात मतदारांनी सहभागी होण्यासाठी मतदारांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने मतदान केंद्रनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे निर्देश मुंबई शहर जिल्हा जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व विभागाचे समन्वय अधिकारी, सहायक समन्वय अधिकारी उपस्थित होते.

श्री. यादव म्हणाले, मे महिन्यात तापमान अधिक असल्याने  निवडणुकीत राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष देऊन कमी मतदान का झाले याचा अभ्यास करून निरंतरपणे मतदार जागृतीसाठी स्वीप (SVEEP) (सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती करावी, यामध्ये शाळा, महाविद्यालय यांच्यासह सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा अशा सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्यात याव्यात,  मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी वेटिंग व्यवस्था, खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी, पंखे या सुविधा उपलब्ध करून मतदारांना फार काळ रांगांमध्ये उभे राहावे लागणार नाही, आणि गर्दी होणार नाही यासाठी टोकन सिस्टीम, कलर कोड अशी व्यवस्था करण्यात यावी. आरोग्य सुविधा सुद्धा पुरविण्यात याव्यात असेही श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

मतदानाच्या दिवशी कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक आहे. याबाबत खासगी संस्था,औद्योगिक संस्था, हॉटेल असोसिएशन यांच्या सोबत चर्चा करावी. तसेच जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे तसेच उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र आणि सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील मतदान केंद्रावरील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे करावी असेही बैठकीत सांगितले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. दिव्यांग आणि ८५ वर्षे वयाच्या नागरिकांना घरून मतदानाचा पर्याय दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना टपाली मतपत्रिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

नागरिकांकडून मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे सद्यस्थितीत नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात यावी तसेच नाव नोंदणीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे. अर्जाबाबत शंका असल्यास बीएलओमार्फत स्थळ पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती याबाबत सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आदेश, सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले.

भायखळा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात क्षेत्रिय अधिकारी (झोनल ऑफिसर) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी श्री. यादव यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

श्री.यादव म्हणाले, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच सर्व क्षेत्रिय अधिकारी यांच्या कामात एकसूत्रीपणा राहावा यासाठी प्रशिक्षण आवश्यक असून सर्व अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण लक्षपूर्वक घ्यावे. तसेच या प्रशिक्षणातून मतदान केंद्रावरील सर्व निवडणूक प्रक्रियेची माहिती समजून घेऊन त्याचा सूक्ष्मपणे अभ्यास करावा, अशा सूचना श्री.यादव यांनी यावेळी दिल्या.

ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणाबाबत सविस्तर माहिती घेऊन  निवडणुकीचे महत्व समजून  प्रत्येकाने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षणात महत्त्वपूर्ण सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले साहित्याचे वाचन करून प्रत्येक बाबीची सूक्ष्म माहिती घ्यावी, अशा सूचना श्री.यादव  यांनी यावेळी दिल्या.

लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक आणि मतदान प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेमध्ये थेटपणे सहभागी होऊन आपली कर्तव्यभावना व लोकशाहीप्रती असणारी निष्ठा अधोरेखित करत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, असे गौरवोद्गार श्री. यादव यांनी यावेळी काढले.

 त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारा आणि त्यांचे निराकरण करून घ्यावे. जेणेकरून आपले मतदानाविषयी कर्तव्य अधिकाधिक योग्य प्रकारे पार पाडता येईल,असेही श्री. यादव यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना आवर्जून नमूद केले.

या संवादादरम्यान, जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी प्रशिक्षणार्थींना सांगितले की, आपल्यापैकी काही कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही निवडणूक कार्यात सहभाग नोंदविला असेल, तर काही कर्मचाऱ्यांची ही पहिलीच वेळ असेल. मात्र, सर्वांनीच ही त्यांची पहिलीच निवडणूक ड्युटी’ आहे, असे समजून प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात येणाऱ्या सर्व बाबी व सूचना अत्यंत लक्षपूर्वक समजावून घ्याव्यात व त्याबाबी काम करताना काटेकोरपणे अंमलात आणाव्यात.

यावेळी नोडल ऑफिसर (प्रशिक्षण) अजित देशमुख यांनी उपस्थित सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व बाबींची अत्यंत सविस्तर व प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण दिले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

ताज्या बातम्या

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
वर्धा, दि.12 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा दि. 12 (जिमाका) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार...

‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा, दि.१२ (जिमाका)  : ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई,...

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. १२ मे : ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट...

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते...

0
धुळे, दिनांक 12 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :  मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे...