शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 37

मंत्री जयकुमार गोरे यांची ‘जय महाराष्ट्र’ मध्ये २४ जूनला मुलाखत

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘आषाढी वारी निमित्त राज्य शासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधा’ या विषयासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

पंढरपूरची आषाढी वारी ही वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. या वारीतील प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सुसज्ज व्हावा यासाठी राज्य शासनाने यंदा अधिक व्यापक नियोजन केले आहे. वारीमध्ये यंदा शासनाने आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, वाहतूक नियोजन, आपत्कालीन व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला आहे. तसेच ‘मुख्यमंत्री निवारा सुविधा’ ही यंदाच्या वारीतील नवी भर असून, यामार्फत हजारो वारकऱ्यांना विश्रांतीसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही वारी अधिक सुसंगठित आणि सुरक्षित करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. वारकरी परंपरेतील या महत्त्वाच्या सोहळ्यात शासनाची भूमिका आणि जनहितकारी उपाययोजनांची माहिती याविषयावर मंत्री श्री. गोरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 24 जून 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच  महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/ससं/

डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल – उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

नवी दिल्ली दि. १९: मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होत असून या ठिकाणी ३५० फूट उंच तयार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा हा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया पुतळ्याचे सुरू असलेले काम पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली.

सुप्रसद्धि मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गाझियाबाद येथे त्यांच्या वर्कशॉपमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे काम जलदगतीने सुरू आहे. उपाध्यक्ष बनसोडे यांनी पुतळ्याच्या कामाची पाहणी केली, तसेच या प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. हा पुतळा तयार झाल्यावर जागतिक किर्तीमान तर ठरेलच, सोबतच देशासाठी प्रेरणादायीही ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राम सुतार यांचे चिंरजीव अनिल सुतार प्रत्यक्ष काम पाहत असून त्यांना येणाऱ्या अडचणी उपाध्यक्ष बनसोडे यांनी समजून घेतल्या तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासनही दिले. पुढील आठवड्यात यासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित करून या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही उपाध्यक्ष बनसोडे यांनी योवळी  दिली.

उपाध्यक्ष बनसोडे यांनी पुतळ्याच्या निर्मिती प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. १०० फुट उंच पादपीठासह ३५० फूट उंचीच्या या पुतळ्याचे काम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुतळ्याचा पायाचा भाग (बूट) ६५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद असून, त्यासाठी सुमारे २० टन धातूचा वापर होणार आहे. या पुतळ्याचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. उपाध्यक्ष बनसोडे यांनी पुतळ्याच्या गुणवत्तेची आणि तांत्रिक बाबींची तपासणी करून राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आज पार पडलेल्या बैठकीत राम सुतार, त्यांचे चिंरजीव अनिल सुतार, महाराष्ट्र विधानसभेचे सचिव डॉ. विलास आठवले, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, उमेश साळवी, शापुरजी पालंजीचे उमेश साळुंखे, शशी प्रभू अँड असोसिएट्सचे अतुल कैटीकवार, भदंत राहूल बोधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, सुबोध भारत हे यावेळी उपस्थित होते.

तत्पूर्वी  विधानसभा उपाध्यक्ष यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र सदनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर त्यांनी अलीपूर रोडवरील डॉ.आंबेडकर नॅशनल मेमोरियलला भेट दिली. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित तसेच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती या संग्रहालयाच्या माध्यमातून सामान्य माणसांही कळेल, असे सुरेख संग्रहालय शासनाने बनविले असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरचे संचालक आकाश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनपथ येथे असलेले डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरलाही त्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत तयार करण्यात आलेली खासदार परिचय पुस्तिका उपाध्यक्ष बनसोडे यांना यावेळी  देण्यात आली.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

सोलापूर महानगरपालिकेतील कामगारांना नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठवा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. १९ :सोलापूर महानगरपालिकेतील विविध खात्यांमध्ये १९९५ नंतर रुजू झालेल्या पण नियमित न झालेल्या कामगारांच्या सेवा नियमित करण्यासाठी महानगरपालिकेने ठरावासह परिपूर्ण प्रस्ताव शासनास पाठवावा, अशा सूचना विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या.

विधिमंडळात उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी बैठकीस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच अतिरिक्त आयुक्त रवी पवार, नगरविकास विभागाचे अवर सचिव श्री. वाणी, कामगारांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत सुमारे २४९ कामगार नियमित करण्यात आलेले नाहीत. महानगरपालिकेचा आस्थापना खर्च विहित मर्यादेच्या पुढे गेला असल्याने अहवाल पाठविण्यात आला होता. परंतु, या कामगारांना नियमित करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव ठरावासह शासनास पाठवण्यात यावा, असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

०००

किरण वाघ/विसंअ/

आपलं मंत्रालय – मे, २०२५

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग, विरार – अलिबाग कॉरिडोर, जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड पूर्व, पश्चिम व विस्तारीकरण, भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग, नवेगाव (मोर) – सुरजागड मिनरल कॅरिडोर, वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्ग या राज्यातील रस्ते प्रकल्पांच्या भूसंपादनाचा तसेच वर्धा –  नांदेड, वडसा – गडचिरोली रेल्वे प्रकल्प आणि कोल्हापूर, कराड, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे. भूसंपादनाची कामे गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लावावीत. याबाबत सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग आराखडा गतीशक्तीवर रन करून त्याचा आराखडा तयार करून घ्यावा. जेणेकरून कमीत कमी वन जमीन बाधित होईल. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या १२ हजार कोटींच्या निधीची वित्त विभागाने तरतूद करावी. विरार – अलिबाग कॅरिडोरच्या मोरबे ते कारंजा टप्प्यामध्ये वन जमीन व कांदळवन असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. तसेच या प्रकल्पाच्या परवानग्या घेत असतानाच प्रशासकीय प्रक्रिया समांतर सुरू ठेवावी. त्यामुळे कामास गती देता येईल. वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्गाचा समावेश सागरमाला योजनेत करण्याविषयीचा प्रस्ताव सादर करावा. जालना – नांदेड द्रुतगती महामार्गाचे परभणी जिल्ह्यातील सेलू येथील भूसंपादनाची प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करावी. विदर्भातील भंडारा – गडचिरोली, नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदिया या सर्व द्रुतगती मार्गांचा आराखडा गतीशक्तीवर रन करून अंतिम करुन घ्यावा. वडसा – गडचिरोली व वर्धा – नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करून काम मार्गी लावण्यात यावे,  अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

गडचिरोली विमानतळाचा ओएलएस करून घ्यावा आणि त्याचा प्रस्ताव गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी पाठवावा. तर अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २४०० मीटर पर्यंत वाढवावी. अकोला येथे सुंदर आणि अत्याधुनिक तसेच मोठे विमानतळ उभारण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विमानतळ प्रकल्पांचा आढावा घेताना दिल्या. राज्यातील महत्त्वाकांक्षी ११ प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या ५३ हजार ३५४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग

मुंबई, दि. १९ :- खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या  विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

०००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा

मुंबई, दि 19: ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा  देण्यात आला आहे.

हा इशारा 18-06-2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते 19-06-2025 रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंत देण्यात आला असून या कालावधीत समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे.

या दरम्यान समुद्रामध्ये लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.   किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः  थांबवण्याचाही इशारा  देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

०००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. १९ : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता  मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह  पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी  आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १९ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ९०.३, रायगड १३४.१, रत्नागिरी ६०.९,  सिंधुदुर्ग ९.४,  पालघर १२०.९, नाशिक ४०.३, धुळे २५.५, नंदुरबार ३३.४, जळगाव ४.७
अहिल्यानगर ८.७, पुणे २९.३, सोलापूर ०.३,  सातारा १७.७,  सांगली ५.९,  कोल्हापूर १२.१, छत्रपती संभाजीनगर ४.५, जालना २.१, बीड ०.२,  धाराशिव ०.२, नांदेड ०.६,  परभणी ०.५, हिंगोली ०.८, बुलढाणा ३.१, अकोला ८.६, वाशिम १.७ अमरावती ५.९, यवतमाळ १.२, वर्धा ३.२, नागपूर ०.७, भंडारा ०.३,चंद्रपूर ४.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक पाळणा तुटून एक व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी व पाताळगंगा नदीने इशारा पातळी पार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी पार केली असून. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील नारुर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला आहे. जवळील लोखंडी पूलावरून नागरिकांचे दळणवळण चालू आहे. मौजे कुचंबे ता.संगमेश्वर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने तहसीलदार संगमेश्वर यांच्यामार्फत योग्य कार्यवाही करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

०००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

विचारधीन बंद्यांना न्यायाचा मार्ग दाखवणारा मुख्यमंत्र्यांचा अभिनव उपक्रम; २० हजार बंद्यांना मिळाली न्यायाची संधी

मुंबई, दि. १९ : कारागृहांमधील विचाराधीन बंद्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून २०१८ मध्ये सुरू केलेल्या देशातील पहिल्या विधि सहाय्य उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे जवळपास २० हजार विचाराधीन बंद्यांना लाभ झाला आहे. त्यापैकी ९ हजार म्हणजेच  ४५ टक्के बंदी विविध कायदेशीर प्रक्रियांद्वारे मुक्त करण्यात आले आहेत.  या उपक्रमाचे महत्व म्हणजे, केंद्र शासनाने देश पातळीवर हा उपक्रम स्वीकारला असून अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूदही केली आहे.

‘प्रिझन स्टॅटिस्टिक्स इंडिया रिपोर्ट २०२१’नुसार भारतातील कारागृहांमधील बंद्यांचा सरासरी दर १३० असून त्यामध्ये सुमारे ७७ टक्के बंदी हे विचाराधीन (अंडर ट्रायल) आहेत. या बंद्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत उद्योगपती अज़ीम प्रेमजी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करीत देशातील पहिला विधि सहाय्य उपक्रम सुरू केला.

कायदेशीर प्रतिनिधीत्वाच्या अभावामुळे किंवा जामीन घेण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे अजूनही शिक्षा न ठरलेले बंदीजन आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विचाराधीन बंदी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करीत आहे.

विचाराधीन बंदीगृहातील  बंद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने अज़ीम प्रेमजी फाउंडेशन आणि अंमलबजावणी भागीदार टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टी आय एस एस ) आणि राष्ट्रीय विधि विद्यापीठ, दिल्ली यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या विधि सहाय्य उपक्रमाने राज्यभरात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील आर्थर रोड, भायखळा, कल्याण, तलोजा, लातूर, ठाणे, पुणे आणि नागपूर या आठ प्रमुख कारागृहात  प्रभावीपणे राबविला जात आहे. या ठिकाणी सामाजिक कार्य व कायदा फेलोज यांची नेमणूक कारागृहांमध्ये तसेच जिल्हा विधि सेवा प्राधिकरणांमध्ये करण्यात आली आहे. हे तज्ज्ञ बंद्यांना प्रकरणाच्या तयारीसाठी, न्यायालयीन प्रक्रियेत मार्गदर्शन करतात आणि प्रभावी विधि प्रतिनिधित्व मिळवून देतात.

या उपक्रमामुळे विधि सहाय्य व्यवस्थेत मूलभूत सुधारणा झाल्या असून सेवांमध्ये समन्वय वाढला आहे. दुर्बल व संवेदनशील बंद्यांसाठी न्यायाची उपलब्धता सुधारली आहे आणि धोरणात्मक स्तरावरही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. या यशस्वी उपक्रमामुळे राज्य शासनाने अज़ीम प्रेमजी फाउंडेशनसोबतच्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले आहे.  या उपक्रमाचा दीर्घकालीन पद्धतीने राबवीत विस्तार करण्यात येत आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

माहिती व्यवस्थापन बळकट करणे, कारागृह विधि ‘क्लिनिक’ ची कार्यक्षमता वाढवणे आणि संस्थात्मक क्षमता वृद्धिंगत करणे यावर पुढील टप्प्यात भर दिला जाणार आहे. या पुढाकारामुळे गृह विभागाच्या महाराष्ट्र राज्य कारागृह सुधारणा शाखेने विधि सहाय्य व सुलभता या क्षेत्रात देशासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

 

00000

 

निलेश तायडे/वि.सं.अ/

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रदीप कोकरे, डॉ. सुरेश सावंत यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. १८: साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’  मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी मराठी साहित्याकडे आकर्षित होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

साहित्य अकादमीच्या वतीने वर्ष 2025 साठीचे 24 भाषांसाठीचे ‘बाल साहित्य पुरस्कार’ आणि 23 भाषांसाठीचे ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ आज जाहीर करण्यात आले. पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य भाषेतील साहित्यिकांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. मुलांसाठी लिहितांना बालसाहित्यिकांना स्वत: मूल होऊन जगावं लागतं. मुलांचं मनोरंजन करतांना त्यांचं ज्ञानार्जनही होईल याकडे लक्ष द्यावं लागतं. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयोगशील शिक्षणतज्ञ असल्याने डॉ. सुधीर सावंत यांनी ही किमया लीलया साधली आहे. त्यामुळेच त्यांचं लेखन प्रभावी ठरत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला.

कादंबरीकार प्रदीप कोकरे हे वास्तवदर्शी लेखक असून समाजातील गरीबी, बेरोजगारी, दुर्बल, उपेक्षित घटकांचं जीवनदर्शन त्यांच्या साहित्यात घडतं. त्यांचं लेखन हे सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारं, त्यावर परखड भाष्य करणारं असतं. त्यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’  कादंबरीस जाहीर झालेला ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ हा मराठी साहित्य क्षेत्राचाही गौरव असून तो आपल्या सर्वांना समाजाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कादंबरीकार प्रदीप कोकरे यांचं अभिनंदन केले आहे.

०००

ताज्या बातम्या

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...