शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 36

जेएनपीए येथे योग दिनानिमित्त ‘योग संगम’ कार्यक्रम

मुंबई, दि. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रासाठी नोडल समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरआरएपी – केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, वरळी, मुंबई यांच्या तर्फे ‘योग संगम’ या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन २१ जून २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता, जेएनपीए टाऊनशिप, सीआयएसएफ कॅम्पस, उरण, नवी मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर .गोविंद रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) तसेच भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमात सुमारे दहा हजार योगप्रेमी सहभागी होण्याची शक्यता असून, आयुष मंत्रालयाचे महासंचालक प्रो. रवीनारायण आचार्य यांची उपस्थिती राहणार आहेत.

योग दिनानिमित्त आयोजित होणारा हा उपक्रम आरोग्यप्रद जीवनशैलीचा संदेश देणारा ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना टी-शर्ट, रेनकोट, योगा मॅट मोफत वितरित करण्यात येणार आहे. असून अल्पपोहाराची ही सोय केली आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

योग संगम कार्यक्रमातून महाराष्ट्रात योग आणि हरित उपक्रमांना चालना

यावर्षी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने १० प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यात ‘योग संगम’ हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

या कार्यक्रमाअंतर्गत ‘हरित योग’ आणि ‘योगा पार्क’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वृक्षारोपणालाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून, केवळ जे.एन.पी.ए.मध्ये १ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. राज्यभरात योगप्रसारासाठी व्याख्याने, शिबिरे आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

आर.आर.ए.पी. संस्थेने या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन करत योगाची व्यापक घडी घातली असून, ‘योग संगम’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, निरोगी भारताच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असे मत संस्थेचे सहायक संचालक डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केले.

०००

मोहिनी राणे/ससं/

अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचा अंक प्रकाशित

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे २०२५ या अंकाचे प्रकाशन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव सुचिता महाडिक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकर, अवर सचिव (मावज) अजय भोसले, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लिहिलेल्या कथा, कविता, ललित लेख, सुलेखन मालिका, स्वानुभव, पाककला, भ्रमंती, तंत्रज्ञानाची टेकवारी, मिशन आयगॉट कर्मयोगी, वेव्हज, या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.

०००

अश्विनी पुजारी/ससं/

भुसावळ येथे महावितरण मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक

Milind Kadam M4B

मुंबई, दि. १९ : भुसावळ (जि. जळगाव) येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत फोर्ट येथील उर्जा विभागाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी महावितरण कंपनीचे संचालक प्रदीप भागवत उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, महावितरण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडेही लक्ष देण्यात यावे तसेच कार्यालयीन कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी व स्थानिक पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी यावेळी  सांगितले.

या बैठकीत भुसावळ आणि परिसरातील वीज समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी स्थानिक वीज पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करून, समस्या क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पाहाव्यात, लोकांच्या अडचणी समजून घेत ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, भुसावळ शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज पुरवठा योग्य प्रकारे आणि वेळेवर होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि क्षेत्राच्या गरजेनुसार वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा. महावितरणच्या नवीन मंडळ कार्यालयामुळे भुसावळसह परिसरातील वीज सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख होईल, असा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीस महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, भुसावळ विभागातील  स्थानिक उर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

‘लाईन स्टाफ’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Milind Kadam M4B

मुंबई, दि. १९ : महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी हे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे घटक असून, त्यांच्याशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

फोर्ट येथील ऊर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. या बैठकीस महावितरणचे संचालक प्रदीप भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी,  संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, सुरक्षा साधने व अपघात प्रतिबंधक उपाययोजना कामाच्या स्वरूपामुळे लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने, सेफ्टी शूज, रेनकोट आदी साधने व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक सुरक्षित साधने उपलब्ध करून देण्यात येतील. तांत्रिक पदांचा स्वतंत्र दर्जा व वर्ग वेतनश्रेणीत व वेतन वाढ यासह विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व चॅमरिया यांनी मंत्री लोढा यांची मंत्रालयातील दालनात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी मंत्री लोढा प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने माहिती क्षेत्रातील अग्रगण्य जागतिक कंपनी गुगलच्या सहकार्याने महाराष्ट्रात उद्योगाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावेळी कौशल्य विभागाचे आयुक्त लहुराज माळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे बैठकीला उपस्थित होते.

जगातल्या नऊ देशात गुगलद्वारे एआय प्रशिक्षण सेंटर्स कार्यरत आहेत. स्टार्टअप्स करिता भारतातही अशाप्रकारचे सेंटर स्थापन करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती यावेळी गुगलचे अधिकारी चॅमरिया यांनी दिली.

निवड प्रक्रियेद्वारे उत्कृष्ट ठरणाऱ्या स्टार्टअप्सना यात संधी मिळणार आहे. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र ठरणार असून महाराष्ट्रातील नव्या उमेदीने उद्योग करू पाहणाऱ्या युवकांना या निमित्ताने जागतिक कवाडे उघडणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. सध्या यासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरु असून लवकरच सामंजस्य करार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान एकीकडे स्टार्टअप्ससाठी सेंटर तर आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम ही महाराष्ट्रात सुरु करण्याची तयारी गुगलने दाखवली आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तसेच विविध महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांमार्फत शासन महिलांचे आर्थिक सबलीकरण करीत आहे. या लाभार्थी महिलांना आता आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शासनामार्फत सुरू असलेल्या महिलांसाठीच्या व्याज परतावा योजनेची मुंबई बँकेच्या कर्ज योजनेसह सांगड घालून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासंदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार तथा मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महामंडळाचे प्रतिनिधी, सहसचिव वि. रा.ठाकूर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनविण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी महामंडळ आणि ‘मुंबै बँक संयुक्तपणे हा उपक्रम राबविणार आहे. मुंबईतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आर्थिक साक्षर करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक व  सामुहिक कर्ज देऊन त्यांना उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी मदत केली जाईल. तसेच पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत विविध वैयक्तिक व गट कर्ज योजना राबविण्यात येतात. यामुळे महिलांना स्वत:चा व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी नऊ टक्के इतक्या अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आमदार दरेकर यांनी मुंख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुक्ष्म, लघू उद्योजक बनवून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद केले. मुंबै बँकेच्या विशेष कर्ज धोरण अंतर्गत वैयक्तिक व गटाला एक लाख व त्यापेक्षा जास्त कर्ज नऊ टक्के दराने अदा करण्यात येईल. मुंबई शहर आणि उपनगर येथे 16 लाख इतके लाभार्थी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंभमेळ्यातील कामांचा आढावा

नाशिक, दि. १९ : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभेमळ्यानिमित्त होणाऱ्या विविध कामांचा आढावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला. दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणाऱ्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी कुंभमेळा आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रिया देवचक्के यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, कुंभमेळ्यानिमित्त प्रस्तावित विकास कामे तातडीने सुरू करावीत. दीर्घ कालावधी लागणारी कामे वेळेत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. या कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. आगामी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नव्याने बांधण्यात येणाऱ्या घाटांचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करावे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

यावेळी मंत्री महाजन यांनी साधुग्राम करिता आवश्यक भूसंपादन, रस्ते, पूल, जलशुद्धीकरण प्रकल्प आदींचा सविस्तर आढावा घेतला. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष श्रीमती नायर यांनी विविध कामांची माहिती दिली.

०००

अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर, दि. १९ (जिमाका) : पद्मश्री अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून चित्तमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार व उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले व दर्शन घेतले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सामाजिक वनीकरणचे अजित शिंदे, मनीषा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, साहित्यिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

  • ️देवेंद्र फडणवीस यांनी गरिबांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी तेंव्हा काढला होता एनआयटीवर मोर्चा
  • ️प्रत्येकाला घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध

नागपूर,दि. १९: अनेक वर्षांपासून नागपूर महानगरात वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी धारकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, स्वत:च्या मालकी हक्काचा पट्टा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला भाडे पट्टा देण्याच्या लोककल्याणकारी निर्णय आता एक आदर्श मापदंड म्हणून नावारुपास आला आहे. नागपूर येथील तब्बल 426 झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर प्रत्यक्ष साकारले गेले आहे. या 426 झोपडपट्टीमधील एक असलेल्या लक्ष्मीनगर येथील झोपडपट्टीने आता जुन्या पाऊलखुणा पुसत श्रमीकनगर म्हणून आपल्या झोपडपट्टीचे नामकरण केले आहे.

या निर्णयाच्या माध्यमातून झोपडपट्टीमधील जे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गात असणाऱ्यांना रमाई आवास योजनेत, तर आदिवासी प्रवर्गातील व्यक्तींना शबरी आवास योजनेत व इतर प्रवर्गातील व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळाली आहेत. एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन कटिबद्ध आहे.

दहा रुपये रोजीने होतो तेव्हा घेतले होते झोपडे  –  रामदास वुईके

“१९८९ मध्ये मी शिवाजी कॉलेज येथे दहा रुपये रोजंदारीवर कामाला होतो. स्वत:च्या पक्क्या घराचे स्वप्न अशक्य होते. पैशाची जुळवाजुळव करत 150 रुपयात मी लक्ष्मीनगर झोपडपट्टीत एक झोपडी घेतली. हक्काचा निवारा झाला पण यात कायदेशीर मालकी नव्हती. एका बाजूला जगण्याचा संघर्ष दुसऱ्या बाजूला हक्काच्या कायदेशीर निवाऱ्याचा संघर्ष आमचा सुरु झाला. माझ्यासारखे या झोपडपट्टीत एकूण 110 झोपडपट्टीधारक होते. या संघर्षाला भक्कम साथ दिली ती तेव्हाचे आमचे नगरसेवक देवेंद्र फडणवीस यांनी. आम्हालाही तेवढेच सन्मानाने जगता यावे ही त्यांची भूमिका परिपक्व राजकीय कृतिशीलतेची होती. मनपाचे नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी आमचे सारे प्रश्न मार्गी लावले असे लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील रामदास वुईके यांनी या परिवर्तनाची माहिती देताना सांगितले.

आता आमची दुसरी पिढी ही पूर्णत: पदवीधर व चांगल्या मार्गाने जगणारी झाली

लक्ष्मीनगर येथील एनआयटीच्या जागेवर असलेल्या या 110 घराच्या वस्तीला 1990 मध्ये झोपडपट्टी म्हणून मान्यता जाहीर झाली. शहर विकास मंच यांच्या लढ्यामुळे एनआयटी व मनपाने येथील नागरी सुविधेला आकार दिला. येथे राहणारे नागरिक हे बांधकाम व्यवसायात काम करणारे मजूर तर आजुबाजुला घरची कामे करणाऱ्या महिला, काही नोकरदार आहेत. 1990 ते 2000 पर्यंत ही वस्ती येथील गुंडगिरीमुळे बदनाम होती. हे बदनामीचे पदर नागरी सुविधेतून बाजुला होत गेले. “आता आमची दुसरी पिढी ही पूर्णत: पदवीधर व चांगल्या मार्गाने जगणारी झाली” असे वुईके यांनी सांगितले.

आमच्या मालकी हक्काच्या पट्ट्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा एनआयटीवर काढला होता मोर्चा

लक्ष्मीनगरचे वार्डाचे नगरसेवक या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीतील प्रश्नांबाबत वारंवार आवाज उठविला. पुढे महापौर झाल्यानंतर या झोपडपट्टीसाठी सुविधेला त्यांनी प्राधान्य दिले. या झोपडपट्टीवर शाळेसाठी आरक्षण होते. ते उठविण्यासाठी 1999 नंतर या भागाचे आमदार या नात्याने एनआयटीकडे पाठपुरावा केला. प्रश्न मार्गी लागत नसल्याने त्यांनी एनआयटीवर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले अशी आठवण शहर विकास आघाडीचे वासनिक यांनी करुन दिली.

पट्टेवाटप व झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम दिशादर्शक –  अनिल वासनिक

“या झोपडपट्टीच्या क्षेत्रावर एनआयटीचे शाळेसाठी आरक्षण होते. आम्ही जिथे राहत होतो त्या जागेची मालकी इतरांच्या नावावर होती. आखीव पत्रिका आमच्या नावावर घेणे शक्य नव्हते. “मुख्यमंत्री पदावर फडणवीस विराजमान झाल्यानंतर 2017-18 च्या कालावधीत त्यांनी येथील आरक्षण हटवून झोपडपट्टी वासियांना हक्काचा आसरा दिला, असे ज्येष्ठ पत्रकार तथा शहर विकास मंचचे मुख्य संयोजक अनिल वासनिक यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे पट्टे वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनांच्या माध्यमातून निराधारांना जी घरे दिली त्याला तोड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसहभागातून उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर महानगर व ग्रामीण भागातील गरीब लोकांना पट्टे वाटपासह इतर दिलेल्या योजना लाखमोलाच्या ठरल्या. अनेक भागात नागरी सुविधा पोहचल्या. लक्ष्मीनगर येथे नवबौद्ध व इतर समाजाची संख्या अधिक आहे. सर्वांच्या मताचा आदर करुन या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आम्ही लोकवर्गणीतून उभा केला. लोकवर्गणीतून या पुतळ्यावर छोट्या छत्रीचे कामही झाले. त्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते करण्याचा आग्रह तेव्हा लोकांनी धरला. याचे लाकार्पण करण्याअगोदर त्यांनी या परिसरात असलेल्या अडसरांना दूर केले.

०००

मंत्री जयकुमार गोरे यांची ‘जय महाराष्ट्र’ मध्ये २४ जूनला मुलाखत

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘आषाढी वारी निमित्त राज्य शासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधा’ या विषयासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

पंढरपूरची आषाढी वारी ही वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. या वारीतील प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सुसज्ज व्हावा यासाठी राज्य शासनाने यंदा अधिक व्यापक नियोजन केले आहे. वारीमध्ये यंदा शासनाने आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, वाहतूक नियोजन, आपत्कालीन व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला आहे. तसेच ‘मुख्यमंत्री निवारा सुविधा’ ही यंदाच्या वारीतील नवी भर असून, यामार्फत हजारो वारकऱ्यांना विश्रांतीसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही वारी अधिक सुसंगठित आणि सुरक्षित करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. वारकरी परंपरेतील या महत्त्वाच्या सोहळ्यात शासनाची भूमिका आणि जनहितकारी उपाययोजनांची माहिती याविषयावर मंत्री श्री. गोरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 24 जून 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच  महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/ससं/

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...