बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 363

खर्च निरीक्षकांकडून नांदेड जिल्ह्यातील आढावा

नांदेड दि. २३ : नांदेड जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे मंगळवार 22 ऑक्टोबरला दाखल झाले आहेत. त्यांनी 23 रोजी जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांच्या बैठकी घेतल्या तसेच सी-व्हिजील कक्ष, निवडणूक खर्च कक्ष, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती कक्ष (एमसीएमसी) कक्षाला त्यांनी भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्यालेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

आज सर्वप्रथम खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची त्यांच्या कक्षामध्ये भेट घेतली.त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी कक्षामध्ये जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत स्थिरनिगरानी पथक तसेच भरारी पथकाच्या गेल्या काही दिवसातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ 40 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचे स्पष्ट केले. जाहीर कार्यक्रम, सभा, याबाबत रॅलीचे संपूर्ण रेकॉड्रींग झाले पाहिजे. व्हिडिओग्राफरने अतिशय व्यावसायिकपणे चित्रीकरण केले पाहिजे. तपासणी दरम्यान सगळ्या गाड्यांचे नंबर, साहित्याचा तपशील कॅमेऱ्यात कसा येईल याबाबत त्यांनी सूचना केल्या.

सिव्हिल कक्षाला त्यांनी भेट दिली कक्षाचे नोडल अधिकारी गंगाधर इरलोड यांनी त्यांचे स्वागत केले. आचारसंहितेपासून झालेल्या कामकाजाचा आढावा दिला.

त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या खर्च समितीच्या कार्यालयाला भेट दिली. निवडणूक खर्चा संदर्भात नोडल अधिकारी असणारे डॉ जनार्दन पक्वाने यांनी यावेळी कक्षाच्या संदर्भात माहिती दिली. एमसीएमसी समितीच्या कक्षाला यावेळी त्यांनी भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी त्यांचे स्वागत केले.

जाहिरातीवरील खर्च उमेदवाराचा मुख्य खर्च असून सर्व वर्तमानपत्रे, समाज माध्यम, बल्क एसएमएस संदेश तसेच सोशल माध्यमावरील पोस्ट या सर्व बाबींची माहिती खर्च निरीक्षकांना नियमितपणे कळली पाहिजे. यासाठी एमसीएमसी समितीने तत्पर रहावे. तसेच पेडन्यूजचा प्रकार होत तर नाही ना याकडे लक्ष वेधावे, असे यावेळी सांगितले.

०००

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा  

ठाणे,दि. २३ (जिमाका): निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, हे टीम वर्क असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपासून ते मतदान केंद्रावरील प्रत्येक कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ही सर्वांनी गांभिर्याने व जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. राजेश  देशमुख यांनी आज झालेल्या बैठकीत सर्वांना दिले.

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‍जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने तसेच सर्व जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते. तर  ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांपर्यत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी स्वीपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान जनजागृती कार्यक्रम राबवावेत. मतदानादिवशी मतदारांना मतदान केंद्रावर जास्त वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करावे. ज्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागतील तेथे मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था करावी, यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर स्वत: भेटी देवून त्याचा आढावा घ्यावा. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर मॉक पोल घेताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या सर्व सूचना मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. तसेच मतदान केंद्रावर तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्याचे निवारण तातडीने करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. कोणत्याही परिस्थितीत कुठेही मतदान प्रक्रिया थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या बैठकीत दिले.

मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती मिळण्यासाठी क्यू आर कोडचा अवलंब करावा, जेणेकरुन मतदारांना मतदान केंद्रावर पोहचणे सोईचे होईल. तसेच मतदान केंद्रावर पाणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर, दिशादर्शक फलक, रॅम्प आदी सर्व सुविधा असणे आवश्यक असून त्याची पूर्तता करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. तसेच मतदान केंद्रावर तसेच स्ट्राँग रुमच्या सुरक्षिततेबाबतचे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात  आल्या.

मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी जे प्रशिक्षणाला उपस्थित नव्हते त्यांना नोटीस पाठवून त्यांचे पुन्हा प्रशिक्षण घेण्यात यावे. मतदान केंद्रावर कर्मचारी अपुरे पडणार नाहीत याबाबतही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे, मुंबई, पुणे या जिल्हयातील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पडतील, या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.

बैठकीच्या सुरूवातीला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी 18 विधानसभा मतदारसंघाची माहिती, ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या, मतदानासाठी तयार करण्यात आलेली मतदान केंद्रे,‍ मतदान प्रक्रियेसाठी लागणारी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची संख्या, मतदान प्रक्रियेसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आदींची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.

०००

नाशिक जिल्ह्यात यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे- खर्च निरीक्षक डॉ. पोरियासामी एम.

नाशिक, दि. २३ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर नियुक्त भरारी पथकांसह सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना 123-नाशिक पूर्व, 124-नाशिक मध्य,  125- नाशिक पश्चिम, 126- देवळाली (अ.जा.), 127-इगतपुरी (अ.ज) विधानसभा मतदारसंघांसाठी नियुक्त खर्च निरीक्षक डॉ. पोरियासामी एम. यांनी दिल्या.

खर्च निरीक्षक तथा भारतीय राजस्व  सेवेतील वरीष्ठ अधिकारी असलेले डॉ. सामी यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे  त्यांच्या पथकातीलस सदस्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मीरखेलकर यांच्यासह संबंधित विभागाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

श्री. सामी यांनी यावेळी सर्व नोडल अधिकारी यांचा परिचय करून घेत त्यांच्याकडून  करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. मा. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वाहनांची तपासणी अधिक दक्षपणे करण्याच्या सूचना दिल्या. सर्व पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक  गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा. कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

०००

 

सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा

सांगली, दि. २३ (माध्यम कक्ष) : मा. भारत निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. कवठेमहांकाळ – तासगाव, विटा, जत आणि पलूस – कडेगाव मतदारसंघांसाठी खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप (आय. आर. एस.) सी व सीई व सांगली, मिरज, वाळवा, शिराळा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी खर्च निरीक्षक म्हणून करणी दान  (आय.आर.एस.) यांची नियुक्ती मा. भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिरीष धनवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हास्तरीय समित्यांचे नोडल अधिकारी प्रत्यक्षात आणि सर्व विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

निवडणुकीसाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काटेकोरपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यास व आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा. सर्व पथकांनी सतर्क राहावे, असे खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आठही मतदारसंघात मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हीडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडिओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपापल्या मतदारसंघात कामे करीत आहेत. या आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. राजा दयानिधी यांनी सूचित केले.

यावेळी शिरीष धनवे यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघांतील कार्यवाहीचा आढावा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केला.

०००

 

अमरावती जिल्हा परिषदेतील स्वीप कक्षाचे उद्घाटन

अमरावती, दि. २३ (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्वीप कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या सभागृहात वॉल ऑफ प्राऊड वोटरची संकल्पना साकारण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी वॉल ऑफ प्राऊड वोटर ही संकल्पना अभिनव आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असल्याने सर्व विभागांचा यात सहभाग महत्वाचा आहे. मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शी पद्धतीने आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय राबविल्या जाते. त्यामुळे या प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदानासाठी यावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात पिंक आर्मी, वीज देयकावरील मतदानाची आवाहन, विविध सामाजिक संघटनांना मतदार जागृती अभियानात सामावून घेण्यात आले. यामुळे जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली आहे. यावेळीही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यासाठी सर्व विभागांनी पुढे यावे. सहयोगासाठी नागरीक चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे यात त्यांचा सहभाग घ्यावा. नागरिकांपर्यंत वोटर स्लीप पोहोचविल्यास त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

मनपा आयुक्त श्री. कलंत्रे यांनी, शहरी भागात मतदानाबाबत जागृती करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. कर्मचारी आणि नागरिकांचे मतदान होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेत विशेष सुविधा केली जाईल. यावर्षी नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्यांचे मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन केले.

पोलिस आयुक्त श्री. रेड्डी यांनी मतदान जागृतीसाठी पोलिस विभागातर्फे संपूर्ण सहकार्य केल्या जाईल. तसेच सर्व पोलिसांचे मतदान होण्यासाठी यंत्रणा तयार केली जाईल. पोलिसांचा सक्रिय सहभागामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढण्यास मदत होईल, असे सांगितले.

जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. आनंद यांनी लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन मतदान करावे. मतदानासाठी पोलिस विभागातर्फे सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

श्रीमती मोहपात्रा यांनी प्रास्ताविकातून स्वीप उपक्रमात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी 80 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे सांगितले. मतदारांना समर्पित असे वॉल ऑफ प्राऊउ वोटर तयार करण्यात आले आहे. यामुळे जनजागृती होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. सुरवातीला जनजागृती कक्षाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानेश्वर घाटे यांनी सूत्रसंचालन केले. संजय राठी यांनी आभार मानले.

०००

 

मलबार हिल निवडणूक कार्यालयाला केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांची भेट

मुंबई, दि. २३: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाला केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मलबार हिल मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी कामकाजाविषयी माहिती दिली.

केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांनी कंट्रोल रूमची पाहणी करून आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमशी लवकरच त्या भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनकुमार पोतदार,सहायक खर्च निरीक्षक संजय गोरे, केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत  यांचे संपर्क अधिकारी श्याम दडस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

मतदार जागरूकतेसाठी लाला लजपतराय महाविद्यालयात ‘टाऊनहॉल’ कार्यक्रम

मुंबई, दि. २३ : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लाला लजपतराय महाविद्यालयात ‘टाऊनहॉल’ हे मतदार जागरूकता अभियान राबविण्यात आले. मुंबई शहराचे जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीप सेल, लाला लजपतराय महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना दल तसेच एनजीओ मार्क युवर प्रेझेन्स (MYP) यांनी संयुक्तपणे हे अभियान राबविले.

नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरचे ‘स्वीप’विभागाचे समन्वय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवणे, मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढवणे, आणि प्रत्येक मतदारापर्यंत त्या प्रक्रियेची माहिती पोहचवणे आहे. या माध्यमातून लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक बनविणे हे अभियानाचे मुख्य लक्ष्य आहे.

मुंबई शहरातील सुमारे १५ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) ७०० स्वयंसेवक आजच्या या अभियानात सहभागी झाले. लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट करत डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, मतदारांच्या मतदानाला चालना देण्याची गरज आहे आणि ह्यामध्ये देशातील युवकांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्यांनी युवकांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ‘लोकशाही दूत’ होऊन आपला हातभार लावण्याचे आवाहन केले. यावेळी सभागृहातील उपस्थितांना मताधिकार बजावण्याची शपथही देण्यात आली.

मुंबई शहर स्वीप प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, लाला लजपतराय महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. हरमीत कौर भसीन, मुंबई शहर स्वीप समिती सदस्य आणि एनएसएस जिल्हा समन्वयक  क्रांती उके इंदूरकर, मुंबई विद्यापीठाचे एनएसएस सेलचे ओसडी सुशील शिंदे, चैतन्य प्रभू  ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज….

विधानसभा निवडणूक २०२४: विशेष लेख 

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे.

राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी, दिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक  यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सैन्य दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय देण्यात येते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २ लाख ६७ हजार २५० टपाली मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना टपाली मतदान करता यावे यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे.

निवडणूक  कामासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेव्दारे (postal ballot Paper) मतदान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२’ किंवा ‘१२ अ’ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.तर  संबधित निवडणूक अधिकारी यांच्याकडून पडताळणी करून मतदाराला टपाली मतपत्रिका देण्यात येते. प्रपत्र १२ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्याने मतदानाकरिता उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रामध्ये मतदान करणे आवश्यक आहे.तर १२ ‘ड’ हा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी उपलब्ध करून  दिला जातो.

निवडणूक कामासाठी नेमलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची व सुरक्षेसाठी तैनात अधिकारी यांची संपूर्ण माहिती  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून तयार  करण्यात येते. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशासोबत संबंधित कर्मचाऱ्यांची आगाऊरित्या माहिती भरलेले (pre- filled) प्रपत्र -१२ व १२-‘अ’ संबंधित  निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात.

पोस्टाद्वारे मतदानाचा हक्क बजाऊ इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांनी प्रपत्र-१२ मध्ये आपला मतदान करण्यासाठी असलेला अर्ज संबंधित समन्वय अधिकाऱ्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे, मतदानाच्या तारखेच्या आधी किमान ०७ दिवसांपर्यंत सादर करावा असा नियम आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण माहिती भरुन सही केलेले प्रपत्र-१२  जमा करुन घेण्यात येते. कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रपत्र-१२ तसेच १२ ‘अ’ चे वितरण व संबंधित कर्मचाऱ्यांकडून भरण्यात आलेल्या प्रपत्रांची माहिती संकलित करण्यात येत असते.

कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रपत्र-१२ विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळे करणे व स्वतंत्र पाकिटांमध्ये त्या त्या मतदारसंघाचे नाव व जिल्ह्याचे नाव लिहून त्यामध्ये ठेवणे, प्राप्त झालेले ‘प्रपत्र-१२’ स्कॅन करुन त्या सोबतच्या प्रपत्र-४ मधील यादीसह त्या – त्या मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेल्या समन्वय अधिकारी यांच्याकडे पाठविले जातात.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पुढील ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत  विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी पडताळणी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका, निवडणूक कर्तव्यार्थ प्रमाणपत्र व त्या सोबतचे आवश्यक प्रपत्र व लिफाफे तयार करणे व संबंधित कर्मचाऱ्यांबाबत मतदार यादीमध्ये (Marked copy) आवश्यक नोंद घेणे आवश्यक असेल.

जिल्हा समन्वय केंद्रास दिलेल्या पहिल्या भेटी वेळी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर चौथ्या दिवशी दि.८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा समन्वय केंद्रात (District Clearing Centre) अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरिताच्या टपाली मतपत्रिका जिल्हा समन्वय अधिकाऱ्याकडे देण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.९ नोव्हेंबर २०२४ सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा समन्वय अधिकारी यांनी राज्य स्तरावरील समन्वयन केंद्रामधील (State Clearing Centre) एकत्र येऊन त्यांच्या जिल्ह्यातील विधानसभानिहाय टपाली मतपत्रिका तसेच त्या सोबतच्या आवश्यक प्रपत्र व लिफाफ्यांची देवाणघेवाण अन्य जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांबरोबर केली जाते. पुन्हा त्यांच्या जिल्ह्याकडे पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह रवाना केली जाईल.

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी (दि. १० नोव्हेंबर २०२४ ते १४ नोव्हेंबर २०२४या कालावधीत) सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी हे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्रावरील मतदान सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) संबंधित कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन घेण्यात येते. मतदान संपल्यानंतर सुविधा केंद्रामध्ये सर्व मतदारांनी (निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचारी) मतदान केल्यानंतर सुविधा केंद्राच्या प्रमुखाने राजकीय पक्ष अथवा उमेदवार यांच्या उपस्थितीत मतपेट्यांमधील टपाली मतपत्रिका असलेले लिफाफे बाहेर काढून संबंधित विधानसभानिहाय त्याची विभागणी करून ते स्ट्रॉगरुमध्ये ठेवतील.

त्यानंतर मतदानाच्या पाच दिवस आधी  म्हणजे दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा समन्वय केंद्रात (District Clearing Centre) संबंधित जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टपाली मतपत्रिका व उशीरा प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ असलेले स्वतंत्र लिफाफे/बॅग हे त्या त्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय किंवा अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान करण्यात आलेल्या मतपत्रिकांचे लिफाफे संबंधित जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडे सुर्पूद करतील. त्यानंतर मतदानाच्या चार दिवस आधी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्य समन्वय केंद्रात सर्व जिल्ह्यांचे जिल्हा समन्वय अधिकारी टपाली मतदान पत्रिका व उशीरा प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ यांचे आदानप्रदान करून व पुन्हा त्यांच्या जिल्ह्याकडे रवाना होतील.

मतदानाच्या तीन दिवस ते एक दिवस आधीपर्यंतचा कालावधी ( १७ नोव्हेंबर २०२४ते १९ नोव्हेंबर २०२४) सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी यांच्या मार्फत मतदान कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या प्रशिक्षणानंतर राज्य समन्वय केंद्राला दिलेल्या दुस-या भेटी वेळी त्या त्या दिवशी प्रशिक्षण केंद्रावरील मतदान सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) संबंधित कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन घेतली जाते व दुसऱ्या प्रशिक्षणानंतर मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकांच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही पूर्ण होईल.

राज्य समन्वय केंद्राला दिलेल्या तिसऱ्या भेटीत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी व जिल्हा समन्वय अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील विधानसभा समन्वय अधिकाऱ्यांकडून टपाली मतपत्रिका जमा करुन घेतील व त्या राज्य समन्वय केंद्रामध्ये घेऊन जाणे व तेथे अन्य जिल्ह्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांशी टपाली मतपत्रिकांचे लिफाफे व बॅग यांचे आदानप्रदान करण्याची कार्यवाही होते.

प्रत्येकाचे मत मोलाचे आहे राज्याची निवडणूक यंत्रणा हे जाणून कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही कार्यवाही करत आहे. तरी लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी जरूर मतदान करावे.

०००

  • संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी

 

 

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची नियुक्ती

मुंबई, दि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १७८ – धारावी, १७९- सायन कोळीवाडा, १८० – वडाळा, १८१- माहीम, १८२ – वरळी या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, १८३ – शिवडी, १८४- भायखळा, १८५ – मलबार हिल, १८६- मुंबादेवी, १८७ – कुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रीत यांची भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत  यांनी जिल्हा माध्यम संनियंत्रणासाठी माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी माध्यम कक्ष व सी-व्हिजील कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली. माध्यम कक्षाद्वारे इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत व समाजमाध्यमांवर  बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

२८८ विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती

  • विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

मुंबई, दि. २३ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून केंद्र निरीक्षक (Central Observer) यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी १३९ सामान्य निरीक्षक (General Observer), ४१ पोलीस निरीक्षक (Police Observer) व ७१ खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९८ टक्के तक्रारी निकाली

१५ ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल ॲप’(C-Vigil app)वर एकूण १०११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ९९५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९८ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे ‘सी-व्हिजिल ॲप’ (C-Vigil app) हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

४४ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ४४ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचे मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा जिल्हानिहाय तपशील :

अ.क्र. जिल्हा एकूण दाखल तक्रारी निवडणूक अधिकारी यांनी निकाली काढलेल्या तक्रारी
1. अहमदनगर ३९ ३९
2. अकोला
3. अमरावती ३२ ३१
4. औरंगाबाद २१ १९
5. बीड
6. भंडारा ११ ११
7. बुलडाणा
8. चंद्रपूर २६ २६
9. धुळे १८ १२
10. गडचिरोली ०० ००
11. गोंदिया
12. हिंगोली १४ १३
13. जळगाव १३ १३
14. जालना १२ १२
15. कोल्हापूर
16. लातूर
17. मुंबई शहर १९ १८
18. मुंबई उपनगर १२७ १२६
19. नागपूर २९ २९
20. नांदेड २८ २८
21. नंदुरबार
22. नाशिक
23. उस्मानाबाद
24. पालघर
25. परभणी
26. पुणे २१४ २११
27. रायगड १० १०
28. रत्नागिरी
29. सांगली ०० ००
30. सातारा २५ २५
31. सिंधुदुर्ग ०० ००
32. सोलापूर ३९ ३९
33. ठाणे २१८ २१७
34. वर्धा
35. वाशिम
36. यवतमाळ ५१ ५१
  एकूण १०११ ९९५

 

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एकूण ३६६ दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे. सदर दखलपात्र गुन्ह्यांमध्ये मतदान कर्मचारी, निवडणूक साहित्य (EVM/VVPAT), आचारसंहिता, सोशल मीडिया/फेक न्यूज व इतर बाबींशी संबंधित आहे. या ३६६ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे अंतिम झाले असून ३०६ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत, तसेच १६ गुन्हे तपासाधीन असल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

०००

 

ताज्या बातम्या

‘दिलखुलास’ कार्यक्रमात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

0
मुंबई, दि. ७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ५५१ वी रँक पटकावत उत्तीर्ण झालेले बिरदेव डोणे...

सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली संतुलित आहार – आहारतज्ञ ऋजुता दिवेकर

0
मुंबई, दि. ७ : आपण रोज जेवतो तोच खरा आहार (डाएट) असतो. त्यामुळे त्यात पोषणमूल्यांची योग्य सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे. घरच्या घरी बनवलेले...

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग राहावे – प्रसाद देवरे

0
मुंबई, दि. ७ : डिजिटल युग अधिक प्रगत होत आहे, तसतसे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सजग राहावे,...

राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे लॉईड्स मेटल्स व ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य...

0
मुंबई, दि. ७ :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे लॉइड्स मेटल्स व एनर्जी तसेच पश्चिम...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

0
सोलापूर, दि. ०७: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कांदलगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी 14 कोटी 68...