गुरूवार, मे 8, 2025
Home Blog Page 362

मतदारजागृतीसाठी लातूर जिल्ह्यात ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम

  • दयानंद विज्ञान महाविद्यालय येथील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • कुटुंब, मित्र परिवारातील व्यक्तींमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचा संकल्प

लातूर, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम आयोजित करण्यात होता. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवा मतदारांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी नागेश मापारी, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिध्देश्वर बल्लाळे, डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. संध्या वाडीकर, प्रा. विलास कोमटवाड, डॉ. संदीपान जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.

निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मत हा लोकशाहीसर्वात सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक युवा मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजवावा. यासोबतच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. प्रत्येक मत हे मौल्यवान असून आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचे मोल लक्षात घेवून नवमतदार, वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी मतदान करावे, असे त्या यावेळी म्हणाल्या.

युवकांशी मनमोकळा संवाद आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत प्रश्नोत्तरे

‘कॉफी विथ कलेक्टर’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवक-युवतींशी मनमोकळा संवाद साधत त्यांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक मतदाराचे महत्व याबाबत माहिती दिली. तसेच निवडणूक प्रक्रिया, लोकशाही व्यवस्था याबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध बाबींवर प्रकाश टाकला. यामध्ये युवक-युवतींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच लोकशाही आणि निवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले.

प्रारंभी उपस्थित सर्वांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. तसेच डॉ. संदीपान जगदाळे यांनी मतदानाचे महत्त्व सांगणारा पोवाडा सादर केला.

०००

 

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा

नांदेड, दि. २५: विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी व्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. सी व्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. वैशिष्ट्ये सी व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सी व्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा. अचूक कृती व देखरेख या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सी व्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते. लाईव्ह फोटो, व्हिडिओ या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हीडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच निवडणूक यंत्रणा तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. डाटा सुरक्षा या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

नांदेड विधानसभा मतदार संघात आतापर्यत सी-व्हीजील ॲपवर एकूण 32 तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी 11 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत, तर 21 तक्रार बेदखल होत्या. तरी नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हीजील ॲपवर नोंदवाव्यात तसेच 1950 टोल फ्री क्रमांकावर ही तक्रार नोंदविता येईल.

०००

नांदेडमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपमार्फत जनजागृती 

नांदेड, दि. २५:  आगामी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 86- नांदेड उत्तर आणि 87- नांदेड दक्षिण मतदारसंघांमध्ये व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. यानिमित्त आज नांदेड वाघाळा महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कार्यक्रमाची चर्चा करण्यात आली. मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर्स) च्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन मतदारांपर्यंत पोहोचणे, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, मतदान शपथ, महिला बचत गटांचे मेळावे, विविध व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करणे, तसेच ऑटोरिक्षातून जागृती संदेश प्रसारित करणे या उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी सांगितले.

महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट आणि ध्वनीक्षेपक रिक्षांचे उद्घाटन डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मी मतदान करणार या स्वाक्षरी मोहिम फलकाचे अनावरण करण्यात आले. यात अनेकांनी सहभाग घेतला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सहमती दर्शवली. तसेच येत्या दिवाळीमध्येही स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आडे, प्रा. डॉ. घनश्याम येळणे, अधीक्षक एस.आर. पोकळे, बालासाहेब कच्छवे, हनुमंत राठोड, सारिका आचमे, कविता जोशी, संजय भालके, सुनील मुत्तेपवार, साईराज  मदिराज, आशा घुले, माणिक भोसले, शिवराज पवार, मुकुंद अनासपुरे, गणेश कस्तुरे, अनिल कांबळे यांच्यासह 86- नांदेड उत्तर मतदार संघ व 87- नांदेड दक्षिण मतदार संघाचे स्वीप कक्षाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

०००

 

 

आर्थिक बाबी, खर्चावर असणार करडी नजर

मुंबई, दि. २५: विधानसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षामार्फत करडी नजर ठेवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी सौरभकुमार शर्मा, नागेंद्र यादव, मीतू अग्रवाल, विनोद कुमार, राजेशकुमार मीना व चंचल मीना हे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक दाखल झाले असून ते मतदारसंघनिहाय आर्थिक बाबी आणि खर्चविषयक कामकाजाचा आढावा घेत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिका-यांची खर्च संनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक

जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रत्येक खर्चावर करडी नजर असणार आहे. प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहित नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक राहणार असल्याचेही श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

विविध यंत्रणांकडून तपासणी

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेटवस्तूंचे वाटप, किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर, अमली पदार्थ नियंत्रण दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, पोलीस दल केंद्रीय, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय किनारा दल, रेल्वे संरक्षण दल, पोस्ट विभाग, वन विभाग, नागरी उडुयन विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, यांच्यासह  फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत निवडणूक खर्चासंदर्भात घ्यावयाची खबरदारी याबद्दलची माहिती देण्यात आली.

०००

 

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबई, दि. २५: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर

०००

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

मुंबई, दि. २५ : भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.

त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

आयर्लंड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद

मुंबई, दि. २५ : आयर्लंड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली.  यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया काटेकोरपणे, नियोजनबद्धरित्या पार पाडत आहे. राज्यातील एकूण मतदार, मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती आदींची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भेटी दरम्यान शिष्टमंडळाला दिली.

यावेळी आयर्लंड निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीमती मॅरी बेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ऑर्ट ओ’लॅरी, महावाणिज्यदूत श्रीमती अनिता केली, आयरलँड दूतावासाचे अरमान श्रीवास्तव, राज्याच्या निवडणूक विभागाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप, सहमुख्य निवडणूक अधिकारी डॉ.विजय राठोड तसेच उपसचिव के.सूर्यकृष्णमूर्ती उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भारत निवडणूक आणि राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांचे अधिकार व चालणारे कामकाज याविषयी माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येतात. राज्याची लोकसंख्या, विधानसभा मतदार संघ, एकूण मतदान केंद्र,  निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र, बॅलेट युनिट ,कायदा व सुव्यवस्था, राजकीय पक्ष आणि आचारसंहिता, मतदान वाढवण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा निवडणूक प्रक्रियेत उपयोग  करून विविध ॲप आणि पोर्टल आयोगाने विकसित केलेले आहेत, याबाबत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी आयरलँडच्या शिष्टमंडळांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.

०००

मतदान यंत्राची (ईव्हीएम) कार्यप्रणाली आणि सुरक्षा व्यवस्था

विशेष लेख – विधानसभा निवडणूक – २०२४

मतदान प्रक्रिया पारदर्शकतेने, नियमानुसार  पार पाडण्यासाठी  निवडणूक आयोगामार्फत सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येते. यामध्ये  मतदानाची नोंद करणारे मतदान यंत्र, त्याची निगराणी आणि सुव्यवस्थितपणा  या बाबी विशेषत्वाने महत्वाच्या ठरतात. यादृष्टीने  ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने आवश्यक ती  विशेष काळजी  निवडणूक यंत्रणेकडून घेतली जाते.  विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार एकूण 1,37,118 व्हीव्हीपॅट

महाराष्ट्र  विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅट EVM-VVPAT चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 2,26,624 बॅलेट युनिट (Bus), 1,26,911 सीयु (CUs) आणि 1,37,118 व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी  (First Level Checking) पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना त्याबाबत अवगत करुन तपासणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात कळवण्यात आले. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी, या हेतूने मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगामार्फत जनजागृती कार्यक्रम दि. 10 सप्टेंबर 2024 ते दि.9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. यामध्ये  सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे, याची जनतेला माहिती देण्यात आली. या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी ठरला असून जनतेने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला.

ईव्हीएमची निर्मिती आणि रचना

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (संरक्षण मंत्रालयातंर्गत सार्वजनिक उपक्रम) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( संरक्षण विभागांतर्गत सार्वजनिक उपक्रम ) यांनी  इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटची निर्मिती केली आहे.

इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) मध्ये दोन युनिट्स असतात. एक कंट्रोल युनिट (सीयु)आणि दुसरे बॅलेट युनिट(बीयु). एक बॅलेट युनिट सोळा उमेदवारांसाठी वापरता येते. दृष्टीहीन मतदारांसाठी बॅलेट युनिट्सच्या उजव्या बाजूला मतदाराचे मत या बटणाशेजारी 1 ते 16 अंक ब्रेललिपीत कोरलेले असतात.

व्होटर व्हेरिफायबेल पेपर ऑडिट ट्रेल(व्हीव्हीपॅट) व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल ही इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनला संलग्न पण स्वतंत्र अशी प्रणाली आहे. यामुळे मतदारांना त्यांचे मत त्यांनी दिले त्यानुसारच नोंदले गेले आहे हे पडताळता येते.

ईव्हीएमची सरमिसळ ( Randomization ) प्रक्रिया

निवडणुकीत वापरल्या जाणा-या सर्व मतदान यंत्रांची म्हणजे ईव्हीएम यंत्राची सरमिसळ प्रक्रिया दोन वेळा करण्यात येते. भारत निवडणूक आयोगाद्वारे विकसित केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यस्थापन प्रणालीचा (ईएमएस) वापर करुन, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपीएटी यांचे सरमिसळ (यादृच्छिकीकरण) करण्यात येते. याची पहिली फेरी राष्ट्रीय व राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उपस्थितीत करण्यात येते. विधानसभा मतदारसंघनिहाय/ प्रभाग  क्षेत्र निहाय इेल्क्ट्रॉनिक  मतदान यंत्र व व्हीव्हीपीएटीचे वाटप करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. विधानसभेच्या निवडणूकीसाठी या  सरमिसळ  प्रक्रियेची  पहिली फेरी राज्यातील सर्व जिल्ह्यात पूर्ण करण्यात आली आहे.

प्रथम यादृच्छिकीकरण झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांची यादी (विधानसभा मतदारसंघनिहाय/  विधानसभा प्रभाग क्षेत्रनिहाय) राष्ट्रीय व राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात येते.  निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर, यादृच्छिकीकरण झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांची यादी (विधानसभा मतदारसंघनिहाय/ विधानसभा प्रभागक्षेत्रनिहाय) निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना  देखील देण्यात येते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांचे दुसरे यादृच्छिकीकरण, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी सुरू करण्यापूर्वी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत, मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यासाठी आणि यंत्रे राखीव ठेवण्यासाठी करण्यात येते. दुसरे यादृच्छिकीकरण झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांची यादी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना देण्यात येते.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी कार्यान्वित करणे (commissioning)

मतदानात वापरण्यासाठीची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत जिल्हा कर्मचाऱ्यांद्वारे कार्यान्वित करण्यात येतात. कार्यान्वित करण्याच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटीचा सुरक्षित कक्ष, ध्वनिचित्रमुद्रणाखाली (व्हिडिओग्राफी) उमेदवारांच्या/त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येतो. प्रत्येक व्हीव्हीपीए मध्ये चिन्हांकन भरण युनिटद्वारे (सिम्बॉल लोडींग युनिटद्वारे) (एसएलयु) चिन्हांचा अंतर्भाव करण्यात येईल. व्हीव्हीपीएटीमध्ये अंतर्भूत केलेली चिन्हे, उमेदवारांना/त्यांच्या प्रतिनिधींना मॉनिटर/टी. व्ही. पडद्यावर पहाता यावीत, यासाठी एकाचवेळी प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपीएटी मतदानासाठी वापरताना त्यांची, नोटासह सर्व उमेदवारांना एकेक मत देऊन तपासणी केल्या जाते.  त्याबरोबरच, यादृच्छिकपणे निवडलेल्या पाच टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीचे एक हजार मतांचे उच्चस्तरीय अभिरुप मतदान केले जाते ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा इलेक्ट्रॉनिक निकाल व्हीव्हीपीएटीच्या चिठ्ठ्यांच्या संख्येशी  मिळता जुळता आहे ना हे पाहिले जाते.  उमेदवारांना त्यांच्या प्रतिनीधींनाही, पाच टक्के ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी यंत्रे यादृच्छिकपणे निवडण्यास आणि अभिरूप मतदानात मतदान करण्यास परवानी देण्यात येते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मोहोरबंद करण्यासाठी वापरावयाच्या मोहोरांवर स्वाक्षरी करण्यास उमेदवार/त्यांच्या प्रतिनिधींना परवानगी देण्यात येते. ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी कार्यान्वित केल्यानंतर, उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुहेरी कुलुप वापरून ईव्हीएम- व्हीव्हीपीएटी सुरक्षित कक्षात ठेवण्यात येते.

मतदान संचलन पथकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यंत्रांचे वाटपाच्या दिवशी  सुरक्षित कक्ष उमेदवारांच्या/ त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हीडीओ चित्रणांतर्गत उघडण्यात येतो. त्यांच्या उपस्थितीत यंत्र वितरीत करण्यात येतात.

मतदानाच्या  दिवशी ईव्हीएम कार्यान्वितता 

मतदानाच्या दिवशी, प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या वेळेपासून ९० मिनिटे अगोदर, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी  नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रत्येक मतदान केंद्रात किमान ५० मतांचे अभिरूप मतदान (नोटासह, प्रत्येक उमेदवाराला किमान एक मत देऊन) घेण्यात येईल. अभिरूप मतदानाचा इलेक्ट्रिॉनिक निकाल  व्हीव्हीपीएटी  चिठ्यांच्या  संख्येशी  मिळता-जुळता आहे  हे पडताळून  बघण्यात  येईल.

नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाच्या सर्व माहितीसाठा नष्ट करण्यात येईल आणि अभिरूप मतदानातील व्हीव्हीपीएटी  चिठ्ठ्या काळ्या लिफाफ्यामध्ये ठेवण्यात येईल आणि तो गुलाबी कागदी मोहरेने मोहोरबंद करण्यात  येईल. मतदान केंद्राध्यक्ष तशा आशयाचे अभिरुप मतदान  प्रमाणपत्र  तयार करील.  प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी, नियंत्रण युनिट हे हिरवी कागदी मोहोर, विशेष खूणचिठ्ठी आणि निर्देश खूणचिठ्ठी यांच्याद्वारे मोहोरबंद करण्यात येईल. व्हीव्हीपीएटी ड्रॉप बॉक्ससुद्धा (मतदान कक्ष) पत्ता खुणचिठ्ठीने  मोहोरबंद करण्यात येईल.  मतदान समाप्त झाल्यावर, मतदान केंद्राध्यक्ष मतदान समाप्त करण्यासाठी नियंत्रण युनिटचे” CLOSE ” बटन दाबेल. ईव्हीएम / व्हीव्हीपीएटी त्या त्या वहन पेट्यांमध्ये ठेवण्यात येतील, आणि ते निर्देश खूणचिठ्ठीने मोहोरबंद करण्यात येतील. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीए‌टी मोहोरबंद करण्यासाठी वापरलेल्या मोहोरांवर (मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी आणि मतदान समाप्तीच्या वेळी) स्वाक्षरी करण्याची मतदान प्रतिनिधींना परवानगी देण्यात येईल.

निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींना, मतदान प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी मतदान केंद्रामध्येच उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. मतदारांचा तपशील, ईव्हीएम व्हीव्हीपीएटी आणि वापरलेल्या मोहोरा, ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांसह, इत्यादींचा तपशील असणाऱ्या नमुना ‘१७  सी’ ची प्रत मतदान प्रतिनिधींना दिल्या जाईल.

मतदान नोंदवलेली ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची मतदान केंद्रापासून ते संकलन केंद्रापर्यंतची वाहतूक

मतदान संपल्यानंतर, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी, सुरक्षा व्यवस्थेत मतदान केंद्रावरून संकलन केंद्रापर्यंत नेले जाते. हे घेऊन जाणाऱ्या वाहनांमागे उमेदवार/मतदान प्रतिनिधींना येण्याची परवानगी देण्यात येते.

मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची साठवणूक

मतदान केलेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी उमेदवार/त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरक्षा कक्षामध्ये ठेवले जाते. सुरक्षा कक्षाच्या कुलुपांवर उमेदवार/त्यांच्या प्रतिनिधींना देखील त्यांची मोहोर लावण्याची परवानगी दिली आहे. या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. मतदान नोंदवलेली ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षाकक्षाच्या ठिकाणी  किमान एक सशस्त्र सुरक्षा तुकडी (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात केलेला असतो. तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही चित्रणाची तरतूद केलेली असते. मतदान केलेले ईव्हीएम साठविलेल्या सुरक्षाकक्षाच्या ठिकाणी  द्विस्तरीय सुरक्षाकडे उभारलेले असते. पहिल्या कड्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात असतो आणि बाहेरच्या कड्यात राज्य सशस्त्र पोलीस तैनात असतात.  आतील कड्यात कोणालाही प्रवेश दिले जात नाही.  सुरक्षा कक्षात पहारा  करण्यासाठी  तेथे उमेदवारांचा/त्यांच्या प्रतिनिधींना राहण्याची परवानगी दिली आहे. सुरक्षा कक्षाचे  प्रवेशद्वार दिसत  नसल्यास, सीसीटीव्ही दर्शक पटल सुविधेची तरतूद केली आहे. मतदान न नोंदवलेली कार्यान्वित  केलेली आणि न वापरलेली  राखीव  ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी, स्वतंत्रपणे सुरक्षेत ठेवली जातात.

मतमोजणीचा दिवस

मतदाराने नोंदविलेली यंत्रे ठेवलेले सुरक्षित कक्ष हे मतमोजणीच्या दिवशी उमेदवार/त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक   अधिकारी, निवडणूक आयोग निरीक्षक यांच्या उपस्थितीत, व्हिडीओ चित्रणाखाली उघडले जाते. उमेदवार आणि त्यांनी नेमलेले मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतमोजणी केली जाते. अशा पद्धतीने मतदान यंत्रांची सुरक्षितता आणि कार्यप्रणाली यंत्रणेमार्फत कटाक्षाने पाळण्यात येते.

०००

  • वंदना थोरात, विभागीय संपर्क अधिकारी

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची २८, २९, ३०, ३१ ऑक्टोबरला मुलाखत

  • विधानसभा निवडणूक – २०२४

मुंबई, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आणि समाजमाध्यमांची भूमिका’ या विषयावर सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ही निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी काटेकोरपणे नियोजन देखील करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत ‘सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि ही सर्व ‘माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात समाजमाध्यमांवरून कुठेही नियमांचे उल्लघंन होणार नाही तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स इत्यादी समाजमाध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट, तथ्यहीन माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत कोणती नियमावली जाहिर करण्यात आली आहे, याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शिंत्रे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. शिंत्रे यांची मुलाखत सोमवार दि. 28, मंगळवार दि. 29, बुधवार दि. 30 आणि गुरूवार दि. 31 ऑक्टोबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

२०२४ च्या ८.४४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची परतफेड

मुबंई, दि. २५: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.44 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि.26 नोव्हेंबर, 2024 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, 1881” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 26 नोव्हेंबर,  2024पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.44 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस “प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत.  लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत थेट संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.७, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य...

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी साधला जीवन विकास प्रतिष्ठानमधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.7, (विमाका) :- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज येथील जीवन विकास प्रतिष्ठानला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी...

१६ वा वित्त आयोग ८ ते ९ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

0
मुंबई,दि.७ : सोळाव्या वित्त आयोगाचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा   ८ व ९ मे , २०२५ रोजी  नियोजित आहे. आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या सह...

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

0
मुंबई, दि. 7: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध...

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे  – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. ७ : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत....