बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 342

सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त सायबर सुरक्षेचा जागर!

सुरक्षित इंटरनेट दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. यंदा हा दिवस उद्या, मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी ‘Together for a Better Internet’ या थीमखाली साजरा होत आहे. लहान मुले आणि तरुणांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित व जबाबदार वापराविषयी जागरूकता वाढवणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

आजच्या काळात शासकीय कामात सायबर सुरक्षेचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) आणि जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांनी ‘Secure Your Accounts’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सरकारी कार्यालय, बँक, खाजगी संस्था आणि नागरिक यांना त्यांच्या ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षेबद्दल माहिती दिली जाईल.

सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या बाबी:

  • इंटरनेट सुरक्षा: फक्त विश्वसनीय वेबसाईट वापरा. HTTPS असलेली वेबसाइट वापरा. सार्वजनिक वाय-फाय वापरताना VPN चा वापर करा आणि तुमचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा.
  • पासवर्ड सुरक्षा: मजबूत पासवर्ड ठेवा. प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड वापरा. नियमितपणे पासवर्ड बदला आणि Two-Factor Authentication (2FA) चा वापर करा.
  • बँक खात्यांची सुरक्षा: OTP, PIN, CVV कोणालाही देऊ नका. फिशिंग ई-मेल आणि बनावट कॉल्सपासून सावध राहा. बँकेच्या ऑफिशियल ॲपमधूनच व्यवहार करा आणि मोबाईल वॉलेट व नेट बँकिंगसाठी मजबूत पासवर्ड ठेवा.
  • UPI पेमेंट सुरक्षा: अनोळखी व्यक्तीकडून आलेली UPI पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका. UPI PIN फक्त पैसे पाठवण्यासाठी असतो, घेण्यासाठी नाही, फसव्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नका आणि Google Pay, PhonePe, Paytm इत्यादी ॲप्सवर सुरक्षा सेटिंग चालू ठेवा.
  • सोशल मीडिया सुरक्षा: तुमची खासगी माहिती सार्वजनिक करू नका. मजबूत पासवर्ड ठेवा आणि 2FA सुरू करा. खोट्या ऑफर्स आणि लिंक्स टाळा आणि Facebook, Instagram, X (Twitter) वर लॉगिन अलर्ट सुरू ठेवा.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ‘माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता’ (Information Security Education and Awareness – ISEA) प्रकल्पाच्या माध्यमातून सायबर सुरक्षा आणि सायबर स्वच्छता (Cyber Aware Digital Citizens) याबद्दल जनजागृती करीत आहे.

ISEA प्रकल्पाच्या अंतर्गत, यावर्षीच्या ‘सुरक्षित इंटरनेट दिना’निमित्त, म्हणजेच दि.11 फेब्रुवारी  रोजी देशभरात जनजागृती मोहीम चालविली जाईल. जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य https://staysafeonline.in/safer-internet-day येथे उपलब्ध आहे. जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांनी सर्व नागरिकांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपली ऑनलाईन सुरक्षा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

००००

-अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी, अमरावती

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पीडितेच्या कुटुंबाचे केले सांत्वन; ⁠मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत देण्याची ग्वाही

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : जत तालुक्यातील करजगी येथे बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याचा निकाल लवकरात लवकर होवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

जत तालुक्यातील करजगी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, करजगी येथील बालिका अत्याचार व हत्येची घटना अत्यंत दुर्देवी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. यामध्ये पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, मनोधैर्य योजनेतून पीडितेच्या कुटुंबियांना सत्वर आर्थिक मदत देण्यात येईल. याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

प्रारंभी या घटनेची सविस्तर माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून व कुटुंबियांकडून जाणून घेतली.

00000

 

 

मधू पर्यटन हा प्रकल्प राबविण्यात येणार – खादी व ग्रामोद्योगचे सभापती रवींद्र साठे

सोलापूर दि.10 (जिमाका) महाबळेश्वर येथे मधु पर्यटनासारखा (हनी टुरिझम) प्रकल्प राबवून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच  मधमाशांच्या संवर्धनासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, असे प्रतिपादन  खादी व ग्रामोद्योगचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

एव्हरेस्ट उद्योग समूहाच्या सहकार्याने व राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकाराने महाबळेश्वर येथे मधुबन हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन  राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी मधपाळांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना श्री.साठे बोलत होते. यावेळी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, रामबंधू मसालेचे हेमंत राठी व एव्हरेस्टच्या वतीने रवींद्र गांधी उपस्थित होते.

राज्याच्या एकूण क्षमतेच्या केवळ 7 ते 8 टक्के आज महाराष्ट्रात मध उत्पादन होते. हे मध उत्पादन वाढण्यासाठी खादी मंडळ प्रयत्नशील आहे. मध गोळा करण्यासाठी व मधपाळ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रोत्क प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. मधकेंद्र योजनेाच्या माध्यमातून मंडळ हे काम करत आहे. आपल्याकडे मध हे सोनं आहे; परंतु त्याचा आपण हवा तेवढा प्रचार व प्रसार करीत नाही. भविष्यकाळात मधमाश्यांच्या संवर्धनाची लोकचळवळ उभी राहिली तर महाराष्ट्रात मधक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. इस्त्रायलप्रमाणे आपल्याकडे मधमाळांचा डेटा उपलब्ध नाही. राज्यातील प्रत्येक मधपाळांची नोंद करून राज्यात किती मधपाळ आहेत याची माहिती वेबसाईटवर दिली पाहिजे. देशात कोठेच मधसंचालनालय नाही ते केवळ महाराष्ट्रात आहे. महाबळेश्वर येथील मधसंचालनालयाचा वर्धापनदिन साजरा झाला पाहिजे. 20 मे हा जागतिक मधपाळदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिवशी राज्यातील सर्व मधपाळांना एकत्रित करून मधपाळांचे महाअधिवेशन भरविण्याची सूचना रवींद्र साठे यांनी केली.

महाबळेश्वर येथील मध संचालनालय पुढील काळात “ सेंटर ऑफ एक्सलंस ” करण्याची  मंडळाची कल्पना आहे. त्यादृष्टीने इथे झालेले मधुबन ही एक छोटी सुरूवात आहे. मधमाशी व मधमाशीपालन या विषयी अधिकाधिक प्रबोधन होण्याची आवश्यकता साठे यांनी प्रतिपादित केली. अशाच प्रकारचे दुसरे मधुबन येत्या काळात बोरिवली, मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार असल्याची माहिती साठे यांनी दिली.

अमेरिका आणि चीनमध्ये मधमाश्यांचे विष गोळा केले जाते. हे विष एक कोटी रुपये किलो या भावाने विकले जाते. दुर्धर आजारावर हे विष गुणकारी आहे. भविष्यात खादी व ग्रामोद्योगमंडळाच्या वतीने अशाप्रकारे विष गोळा करता येते का, याचा राज्यशासन गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती साठे यांनी यावेळी दिली.

००००

अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक हवा – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर,दि.१०(जिमाका)- जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येत आहे. जिल्ह्यात विविध सुविधांचा विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला दिले.

येथील स्मार्ट सिटी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांचा सर्वसाधारण आढावा पालकमंत्री शिरसाट यांनी घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणीयार, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट यांनी गौण खनिज, मातोश्री पाणंद रस्ते योजना, मनपा हद्दीतील जमिन मोजणी प्रकरणे, जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम, जिल्हा परिषद इमारत बांधकाम, महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, आरोग्य योजना, पोलीस दल अशा विविध विभागांचा आढावा घेतला.

शहरातील एका अपहरण प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास काम पूर्ण करुन अपहृत बालकाची सुखरुप सुटका केली त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी पोलीसांचे अभिनंदन केले. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, गौण खनिज प्रकरणी कारवाई करतांना पोलीस दल सोबत असावे याची खात्री महसूल विभागाने बाळगावी. तहसिलदार, मंडळ अधिकारी यांचा आढावा घ्यावा. लवकरच तालुकानिहाय जनसंवाद यात्रा सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कामकाज करतांना येणाऱ्या अडचणींबाबतही सांगावे. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करु. अधिकाऱ्यांनी कामे करुन जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. त्यास आपले प्राधान्य आहे. जनहिताची कामे वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अधिक चांगली करावी. गुन्हेगारीची केंद्रे ओळखून त्यावर कारवाई करावी. कुणालाही पाठीशी घालू नका. ग्रामिण भागात शेतरस्ते मोकळे करण्यासाठी मातोश्री पाणंद रस्ते योजना राबवा, असे निर्देश त्यांनी दिले.

०००००

अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेतकऱ्यांचे योगदान : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक, दि. 10 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
आज यूथ फेस्टिवल मैदान येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2025 समारोप कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते. यावेळी आमदार छगन भुजबळ, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर अध्यक्ष अण्णासाहेब मोरे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

                                                                                                                                    जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त गुंतवणूक या क्षेत्रात केली जाणार आहे.  नवनवीन योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी व समृद्ध शेतीसाठी अविरतपणे सेवा सुरू आहे. नव्या पिढीला रचनात्मक कामांमधून नवी दिशा देण्याचे काम स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतीची नवीन औजारे, पीकपद्धती,  फळे व पीकांचे नवीन वाण यामुळे शेती उत्पादनात वाढ होतांना दिसत आहे. पश्चिम खोऱ्यातील वाहून जाणारे 65 टीएमसी पाणी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचे महत्वाचे नियोजित असून यासाठी 50 ते 60 हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षात हे काम पूर्ण  करुन गोदावरी खारे दुष्काळमुक्त करण्याची शासनाचे प्रयत्न आहेत. जिल्ह्यातील धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी पाण्याचे नियोजन करतांना बिगर सिंचन क्षेत्रासाठी असेलेले पाण्याचे काटकोर नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभाग व नाशिक महानगरपालिका यांना दिल्या असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.


शेतीक्षेत्रात होणारे क्रांतिकारी बदल स्वीकारतांना येणाऱ्या काळात निर्यातक्षम शेतीसाठी अधिक संधी कशा उपलब्ध होतील यासाठी अधिक प्रयत्नांवर भर देण्यात येणार आहे. यासाठी जैविक शेती व सेंद्रीय खतांचा वापर करून कमी खर्चात शेतीची उत्पादकता अधिक वाढण्याच्या कृषी  विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतीपूरक दुग्ध व्यवसायास अधिक चालना देण्यासह शेती उत्पादनांची  विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार श्री. भुजबळ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कृषी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.


000000

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार – कृषिमंत्री कोकाटे

रायगड (जिमाका) दि.10 : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

कृषिमंत्री श्री.कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आले. या अंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवडी, कृषी सह संचालक अंकुश माने, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावळे, अनिल पाटील, आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड.कोकाटे म्हणाले, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कामकाज होण्यासाठी समस्या,अभिप्राय तसेच सूचना विचारात घेऊन कृषी विभागात शेतकरीभिमुख कामकाजासाठी बदल करण्यात येत आहेत. शेतकरी व कृषी विभागाची सांगड घालून भविष्यात शेतीक्षेत्रात मोठया प्रमाणावर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. कृषी विद्यापीठ यांनी केलेले प्रयोग, विकसित केलेले तंत्रज्ञान, हवामान बदल, पीक पद्धती याची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती वापरावी. समाज माध्यमे, विविध संदेश वहनाची साधने वापरावी. तसेच शेतकऱ्याशी सातत्याने संवाद ठेवावा. कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनविताना शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या तसेच सूचना व प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या संवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन करून राष्ट्रीय सेंद्रिय सह.संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

या परीसंवादात कोकण विभागातील आंबा, काजू, नारळ, चिकू, फणस, सुपारी,  भात उत्पादक शेतकरी, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती, भाजीपाला व फूलशेती अशा विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी राज्याला दिशा देणाऱ्या सूचना आणि अपेक्षा व्यक्त करताना, विविध योजनांचे थकित अनुदाने, खतांचे लिंकिंग, पीकविमा, पायाभूत आणि काढणीपश्‍चात सुविधांचा अभाव, पीकनिहाय अडी-अडचणी, पीक क्लस्टर आदीं महत्त्वपूर्ण विषयांसह शेतीतील आव्हाने, समस्या मांडल्या.  कृषिमंत्री कोकाटे यांनी 4 तास चाललेल्या या बैठकीत शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले.ज्या ठिकाणी बदल शक्य आहेत, त्या विभागाशी चर्चा करून सुधारणा करण्यात येईल. तसेच ज्या योजना किंवा धोरणे केंद्र सरकारशी संबंधित आहे, त्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस व पाठपुरावा करण्यात येईल. ज्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय, निधीची आवश्यकता आहे त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेण्यात येतील असे  आश्‍वासित केले.

कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून शेतकरी केंद्रबिंदू मानून प्रभावी निर्णय, योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकरी, विविध प्रयोगशील व्यक्ती, कृषी विद्यापीठ आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती मध्ये बदल घडवू शकतो. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांकडून कृषी योजना,कृषी निविष्ठा,नैसर्गिक आपत्ती,कृषी बाजार व्यवस्थापन याबाबत परिसंवाद प्रश्नावली भरून घेण्यात आली.

आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांनी आभार मानले.

००००००

नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा ‘चॅम्पियन’

चंद्रपूर, दि 10 : चंद्रपूर येथे पार पडलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत 356 गुणांसह ‘जनरल चॅम्पियनशीप’ चा किताब पटकाविला. तर उपविजेता गडचिरोली जिल्ह्याला 305 गुण मिळाले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हा विजयी चमुसह ‘जनरल चॅम्पियनशीप’’ चषक स्वीकारला.

दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विसापूर येथील सैनिक शाळेत नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि नागपूर येथील आयुक्त कार्यालयातील चमूने सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा समारोप सैनिक स्कूल येथे 9 फेब्रुवारी 2025 रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, नागपूरच्या विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, नागपूर येथील उपायुक्त दिपाली मोतिहाळे, सहायक जिल्हाधिकारी अपुर्वा बासुर, कश्मिरा संख्ये, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करा  पालकमंत्री डॉ. अशोक उईके

यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, महसूल विभाग प्रशासनाची मुख्य रक्तवाहिनी आहे. दैनंदिन काम करीत असतांनाच अशा प्रकारच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून अधिकारी – कर्मचा-यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. जिल्हास्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर खेळण्याची चांगली संधी त्यांना मिळते. खेळामध्ये यश प्राप्त करणे हे ध्येय ठेवायलाच पाहिजे. प्रशासनामध्ये काम करीत असतांना आपण आपली ओळख निर्माण करतो, तशीच ओळख खेळाच्या माध्यमातूनही निर्माण झाली पाहिजे. राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेत आता नागपूर विभाग आणि चंद्रपूर जिल्ह्यानेसुध्दा उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन : आमदार किशोर जोरगेवार

राज्य शासनाच्या 590 कोटीतून ही सैनिक स्कूल उभी राहिली आहे. खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा येथे आहेत. शासनाला महसूल प्रशासनाकडून जास्त अपेक्षा असतात. महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धांप्रमाणेच नागपूर विभागाने इतरही शासकीय  विभागांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयेाजित कराव्यात. जेणेकरून इतर विभागातील अधिकारी कर्मचा-यांनासुध्दा स्वत:तील कलागुण विकसीत करता येईल. या क्रीडा स्पर्धांचे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट आयोजन केले, असे त्यांनी सांगितले.

राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर राहावा : विभागीय आयुक्त माधवी खोडे

महसूल विभागावर प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि आयुक्त कार्यालयाच्या टीम येथे आल्या. सर्वांनी चांगली कामगिरी केली असून खेळभावना केवळ खेळातच नव्हे तर कामातूनही दिसू द्यावी. तसेच संपूर्ण राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर असावा, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, तीन दिवस या स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातून एकूण 1080 अधिकारी आणि कर्मचा-यांनी यात सहभाग नोंदविला. 22 क्रीडा प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. अशा स्पर्धांमधून व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते.

कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार, तहसीलदार विजय पवार, श्रीधर राजमाने यांच्यासह इतर खेळाडू अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे संघ ठरले विजेता आणि उपविजेता : कबड्डी – विजेता गडचिरोली जिल्हा, उपविजेता चंद्रपूर जिल्हा. व्हॉलीबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली.  थ्रो बॉल – विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो  महिला : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो पुरुष : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. क्रिकेट – विजेता चंद्रपूर, उपविजेता नागपूर. फुटबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली. याशिवाय उत्कृष्ट गायन सोलो, उत्कृष्ट अभिनय सोलो, वैयक्तिक नृत्य, उत्कृष्ट वेशभुषा, नक्कल, युगल गीत, दिग्दर्शन, कलाप्रकार मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली.

००००

 ‘जल जीवन मिशन’ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १०: ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण ११६४ योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला. नळ पाणी पुरवठा अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी पूर्ण झालेल्या ७१७  योजना असून, उर्वरित ४४० कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’अंतर्गत योजनांची आर्थिक आणि भौतिक प्रगती, सिल्लोड, गंगापूर-वैजापूर ग्रीड, देवगाव, पिशोर, लाडसावंगी, केळगाव, चारनेर, शिरसाळा, ३५ गावे औरंगाबाद, रेल कनकावतीनगर पाणी पुरवठा योजनांची सद्य:स्थिती, कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या समस्या, १०० दिवस कार्यक्रम अंतर्गत पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांचा मंत्री श्री. पाटील यांनी आज मंत्रालयातील दालनात आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नळ जोडणी अंतर्गत ७१८ गावांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नळ जोडणीच्या १४ च्या राबविण्यात येत आहे. यामध्ये १४ लाख २२ हजार ६५१ लोकसंख्येत २ लाख ८५ हजार ९८ घरे आहेत. २ लाख २६ हजार ६५४ नळ जोडणी पूर्ण केली असून, दोन लाख ३७ हजार ११५ नळ जोडणी १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत साध्य करण्यात येणार आहे.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (ई- उपस्थित होते.) जल जिवन मिशनचे अभियान संचालक ई. रविंद्रन, मुख्य अभियंता मनिषा पलांडे, कार्यकारी अभियंता दी. ह. कोळी, अजित वाघमारे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने परीक्षा द्या – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १०: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. यानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मंत्री श्री. भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. ११ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील १५,०५,०३७ विद्यार्थी ३,३७३ केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

आपले कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्या. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नाही, तर आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी आहे.

शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

समाजात प्रेम, शांतता, सद्भावना निर्माणाचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १०: एकीकडे मनुष्य विज्ञान – तंत्रज्ञान, उद्योग व व्यवसायात प्रगती करीत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक व भावनिक स्तरावर अशांत होत आहे. अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचे समाजात प्रेमभावना, शांतता व सद्भावना निर्माणाचे कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

‘वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता व सद्भावना’ या ब्रह्मकुमारी संस्थेच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या जागतिक अभियानाचे राज्यातील उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे पार पडले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कला आणि कलाकारांच्या माध्यमातून तरुण पिढीला भारताच्या संस्कृती आणि सनातन मूल्यांशी जोडणे हा या अभियानाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही. परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे असल्याचे सांगताना ब्रह्मकुमारी संस्था ध्यान व राजयोग यांच्या माध्यमातून प्रेम व शांतता या प्राचीन मूल्यांना नव्या पिढीपुढे आणण्याचे कार्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

आज मुक्त व्यापारामुळे जग लहान गाव झाले आहे. व्यापार वाढला आहे, त्यातून ग्राहकाचा फायदा होत आहे. परंतु अनेक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. स्वतःला ओळखून इतरांसाठी कार्य करीत नाही तोवर मनुष्य जीवन अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

आज जीवन खूप गतिमान झाले आहे. अशावेळी ध्यानाच्या माध्यमातून चित्त स्थिर करता येते व सकारात्मक विचार अंगीकारता येतात, असे त्यांनी सांगितले.

जीवनात सत्ता आणि पैसा या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी झाला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित काम करून देशाला बलशाली केले पाहिजे. देश बलशाली झाल्यानंतर प्रेम व सद्भावनेचा विचार जगाला दिल्यास त्याला लोक महत्त्व देतील, असे राज्यपालांनी सांगितले.

कलाकारांच्या जीवनात प्रेम, शांती व सद्भावना महत्त्वाची: पूनम ढिल्लन

चित्रपटसृष्टी ही इतरांना आनंद देणे व मनोरंजन करण्यासाठी निर्माण झाली असली तरी देखील प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या समस्या असतात. त्यामुळे कलाकारांना आत्मिक शांतीसाठी प्रेम, शांतता व सद्भावनेची विशेष गरज असल्याचे अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनी यावेळी सांगितले. जीवनात इतरांशी तुलना नको कारण प्रत्येक जण अद्वितीय असतो, असे त्यांनी सांगितले.

०००

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...