बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 340

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’

नवी दिल्ली दि. १०:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली.

11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल. ५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

कार्यक्रमाच्या पूर्वी शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

०००

हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत, दर्जेदार करा – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १० : राज्य शासनाच्या पुनर्विकसित करण्यात येत असलेल्या हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावे, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

देशातील विविध महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती यांच्या बैठक आणि निवासस्थानाच्या व्यवस्थेसाठी मुंबईमध्ये असलेल्या अतिथीगृहांपैकी एक असलेल्या हायमाउंट अतिथीगृहाच्या पुनर्विकासाचे काम पूर्णत्वास आले असून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्याची पाहणी केली. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हायमाऊंट येथे महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असणार असल्याने या इमारतीचे सुरू असलेले काम मुंबई आणि महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसे असे व दर्जेदाररित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपसचिव हेमंत डांगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, मुख्य वास्तूशास्त्रज्ञ चेतन आके, वरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ मि.दी.जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील तावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वि.अ. पाटसकर, डॉ. प्रसन्ना कुलकर्णी उपस्थित होते.

मुंबईत येणाऱ्या महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी असलेले अतिथीगृह हे सर्व सुविधांनी युक्त असावे. त्यादृष्टीने हाय माउंट अतिथीगृहात एक्झिक्यूटिव्ह कक्षांसोबतच महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी आवश्यक सर्व सुविधा असणारे कक्ष असावेत, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

हाय माउंट अतिथीगृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेल्या सह्याद्री अतिथीगृहाची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, असे निर्देशही मंत्री रावल त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे मुंबई विमानतळानजिकच्या नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

लोकनाट्य कला केंद्रांसाठी नवी नियमावली करणार – मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. १० : महाराष्ट्रातील लोककला जगली पाहिजे, लोकनाट्य कला केंद्रांवरील सादरीकरणातील पारंपरिक बाज जपला पाहिजे. तसेच सादरीकरणात पारंपरिक वाद्यांचा वापर झाला पाहिजे. या तसेच अनुषंगिक बाबींसाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून लवकरच नियमावली तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. लोककलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, लोकनाट्य केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. लोकनाट्य व पारंपरिक लावणी कला जपणे गरजेचे असून ही कला व हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्व.पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.

लोकनाट्य कला केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. यासंदर्भात नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

हिंदी भाषा व साहित्य अकादमीच्या शिष्टमंडळाकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट

मुंबई, दि. १० : साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना सन्मानित करण्यासाठी ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाषा शिखर सम्मान’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार असून याबाबतची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. हिंदी भाषा व साहित्य अकादमीच्या शिष्टमंडळानी मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली त्यावेळी ते बाेलत हाेते.

यानुसार दरवर्षी एका साहित्यिकाची निवड करून त्यास या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी आवश्यक नियमावली तयार करण्यात येणार असून लवकर याबाबतची घोषणा करण्यात येत असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना – मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. १०:  कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत  लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स अशा विविध स्मृतींचे जतन करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

कोल्हापूर चित्रनगरी येथे नवीन वस्तुसंग्रहालयात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचा ठेवा जपला जाणार असून, जुन्या तसेच नव्या पिढीला चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली परंपरेची माहिती मिळेल असे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, सांस्कृतिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने चित्रफिती तयार करून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित कराव्या.

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे काम सुरळीत चालविले जावे, यासाठी यंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामे सुरू असल्याने या विकासकामांकरिता चित्रपट क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या वास्तुविशारद यांची बाह्य स्रोतांद्वारे नियुक्ती करावी. ही पदे भरताना ‘एम एस आय डी सी’ ची मदत घेण्याची सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी केली.

०००

संजय ओरके/विसंअ/

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नांदेड, दि. १० : दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा अभियान’ राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत यानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री.सावे म्हणाले, “शिक्षण हे केवळ गुणांसाठी नाही, तर ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून, प्रामाणिक प्रयत्नांद्वारे यश संपादन करावे. आगामी परीक्षा काळात जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि सर्व परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त आणि भयमुक्त राहतील यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापनांनाही अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

0000

‘दिलखुलास’ मध्ये परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुलाखत

मुंबई दि. १०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व विविध उपक्रम’ याविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 12, गुरुवार दि. 13, शुक्रवार दि.14 आणि शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रितली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व रस्ते अपघातांचे टाळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता परिवहन विभागामार्फत दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून स्पीड गन, हेल्मेटचा वापर करणे, विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच नुकताच सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे, जुन्या गाड्या वापराबाबत करावयाच्या नियमांचे पालन आदी निर्णय आणि शंभर दिवसाच्या कामकाजात प्रामुख्याने करावयाच्या बाबी, याविषयी परिवहन आयुक्त भीमनवार यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

 

राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांना सर्वोत्तम सेवा देणे हेच ब्रीद – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्यासह रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा, सुविधा देणे हेच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ब्रीद आहे. तसेच सध्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून हे रोखण्यासाठी जिल्ह्यातील 9 ते 26 वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक  (एचपीव्ही) लस देण्यासाठीचा संकल्प केला असून सीएसआर निधी व लोकसहभागातून ही लस उपलब्ध करुन दिली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परीसरात 88 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी ही विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांचा सन्मान करण्यात आला.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सीपीआर परिसरातील नूतनीकरणाची सर्व कामे या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होतील. तसेच शेंडा पार्क परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या 1100 बेडेड रुग्णालयाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. तर आयुर्वेदिक, होमिओपॅथी व निसर्गोपचार शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांची कामेही गतीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यात आणखी 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली असून यामुळे एमबीबीएस ची विद्यार्थी क्षमता वाढली असल्याचे सांगून मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सीपीआर रुग्णालयात दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ न देता या रुग्णालयाचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. त्यानुसार ही कामे हाती घेण्यात आली. येथील उर्वरित सर्व कामे ही डिसेंबर अखेर पूर्ण होतील.

गोर गरीबांचा दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयातील सर्व इमारतींच्या नूतनीकरणाची कामे या वर्ष अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी यावेळी दिली.

वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी प्रास्ताविकातून सीपीआर रुग्णालयात आजवर करण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. मानसोपचार विभाग, स्त्री रोग विभागातील शस्त्रक्रियागार, अतिदक्षता विभाग, नर्सिंग मुलींचे हॉस्टेल व ईएनटी विभाग, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वॉर्डचे नुतनीकरण, प्रत्येक वॉर्डमध्ये अत्याधुनिक बेड आदी विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली.

आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी मानले.

0000

ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. १०: मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या उत्पादीत ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटरची विक्री व वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पुण्याच्या या कंपनीद्वारे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फेरबदल करण्यात आल्यासंदर्भातील याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी त्यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ अन्वये उत्पादित केलेल्या मीटरची खरेदी करु नये, तसेच वाहनावर हे मीटर न बसविण्याचे आवाहन नियंत्रण, वैद्यमापनशास्त्र यांनी केले आहे.

०००

‘फेस डिटेक्शन’ न झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची फेरनोंदणी

मुंबई, दि. १०: मंत्रालय प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या ‘फेस डिटेक्शन’वर आधारित ‘एफआरएस’ तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फेस डिटेक्शन न झाल्यामुळे मंत्रालय प्रवेशास विलंब किंवा अडथळा होत असल्यास अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अद्ययावत छायाचित्रासह फेर नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मंत्रालयात कामानिमीत्त येणाऱ्या  अभ्यांगताना व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी  यांना ‘डिजी प्रवेश’ या अॅप आधारीत ऑनलाईन प्रणालीमार्फत मंत्रालय प्रवेश सुनिश्चीत करण्यात येणार असून त्याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. तसेच अनधिकृत प्रवेश व अनधिकृत प्रवृत्तींना चाप बसणार आहे. या प्रणालीमुळे अनुचित प्रवेश रोखले जाणार असून मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता येईल. तसेच लोकांची कामे जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे.

मंत्रालय ही अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची आस्थापना असल्याने या आस्थापनेची सुरक्षा महत्त्वाची बाब आहे. त्याअनुषंगाने मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला आहे. मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.  मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा आणि देखरेख अंतर्गत टप्पा 2 प्रकल्प हा टप्पा 1 प्रकल्पाचा नैसर्गिक विस्तार म्हणून राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना ‘फेसीअल रिकॉग्नीशन’ व ‘आरएफआयडी’ कार्ड आधारित प्रवेश देण्याबाबत तरतूद आहे. याकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील 10 हजार 500 अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांचा तपशिल या प्रणालीमध्ये भरण्यात आलेला आहे. तसेच सर्व मंत्री कार्यालये, संसदेचे व विधानमंडळाचे सर्व विद्यमान व माजी सदस्य यांचा तपशिल मागविण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे ‘फेसीअल रिकॉग्नीशन’ यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे.   जानेवारी 2025 पासुन मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना ‘फेसीअल रिकॉग्नीशन’ व ‘आरएफआयडी’ कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे.

मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना दि.26 सप्टेंबर 2023 रोजीच्या  शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. त्यामधील सुचनेनुसार बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात आणण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा भाग म्हणून अभ्यागतांजवळील पाण्याच्या बॉटल्स, औषधे व इतर पदार्थ प्रवेशद्वार येथेच काढून ठेवण्यात येत आहेत, असे गृह विभागाचे कक्ष अधिकारी प्रविण ढिकले यांनी कळविले आहे.

०००

 

नीलेश तायडे/विसंअ/

ताज्या बातम्या

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य...

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...