शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 337

ग्रंथोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना– सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली, (जिमाका),दि.13: “आजच्या मोबाईल युगात नवीन पिढी वाचनसंस्कृतीपासून दूर जात आहे. मात्र, वाचनामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते आणि देशाच्या प्रगतीतही हातभार लागतो. ग्रंथोत्सव उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला नव्याने चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल,” असे मत सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद हायस्कूल सभागृह, चामोर्शी रोड येथे आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे होते, तर आमदार रामदास मसराम व आमदार डॉ. मिलींद नरोटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री जयस्वाल म्हणाले, “वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात सर्व सुविधायुक्त अभ्यासिका स्थापन केल्या जातील. सुरुवातीला गडचिरोलीसह इतर तीन तालुक्यांमध्ये मिळून एकूण चार ठिकाणी या अभ्यासिका सुरू करण्यात येतील. या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील, जेणेकरून ते अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतील.”

ते पुढे म्हणाले, “ग्रंथोत्सव हा केवळ पुस्तकांच्या विक्री आणि प्रदर्शनापुरता मर्यादित नाही, तर हा एक वैचारिक चळवळ आहे. वाचनामुळे समाजात नवीन विचार रुजतात आणि त्यातून नवी दिशा मिळते. म्हणूनच, अशा उपक्रमांना पाठिंबा देणे गरजेचे आहे.”

यावेळी आमदार रामदास मसराम यांनी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून घ्यावी, कारण वाचनामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, असे सांगितले. तर आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी नवीन विचार रुजवण्यासाठी पुस्तक वाचन आवश्यक असल्याचे मत मांडले.

ग्रंथालय अधिकारी सु.श्री. गजभारे यांनी प्रास्ताविक करताना गडचिरोली ग्रंथोत्सवाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी ‘आजचा वाचक आणि ग्रंथालये’ तसेच ‘मराठी भाषा – अभिजात भाषा : उगम आणि उत्कर्ष’ या विषयांवर परिसंवाद व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी इंदिरा गांधी चौकातून ग्रंथ दिंडीही काढण्यात आली.

ग्रंथोत्सव उद्घाटन कार्यक्रमाला ग्रंथालय संघाचे भाऊराव पत्रे व जगदिश मस्के, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने आठ हजार बोअरवेल पूर्ण करण्याचे नियोजन – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल

गडचिरोली,(जिमाका),दि.13: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीतून सुजलाम‌् सुफलाम् करण्याच्या दृष्टीने सिंचन सुविधेची आवश्यकता नमूद करत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आठ हजार बोअरवेल टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. जिल्हा नियोजन निधीचा आढावा घेताना त्यांनी सिंचन सुविधांच्या विकासावर विशेष भर देत, बिरसा मुंडा सिंचन योजनेअंतर्गत बोअरवेल आणि सोलर पंप प्रकल्प प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना केल्या.

जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचा आढावा आशिष जयस्वाल यांनी काल नियोजन भवन येथे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यात पंडा, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार रामदास मेश्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आदी मान्यवर प्रत्यक्ष तथा दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते

गडचिरोली जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर 604 कोटी रुपयांचा निधी कोणतेही कात्री न लावता पूर्णपणे उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले. प्राप्त निधी यंत्रणांनी तातडीने खर्च करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ॲड. जयस्वाल यांनी जिल्ह्याची आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी उत्पादकता वाढवणाऱ्या योजनांना गती देण्याचे सांगतांना कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय यांना प्रोत्साहन देण्याचे व पाणीस्रोतांचा प्रभावी उपयोग करून पूर्ण क्षमतेने मत्स्य उत्पादन वाढवण्यास प्राधान्य देण्याचे सांगितले. पशुधन वितरणासाठी लॉटरी प्रणालीऐवजी मागेल त्याला लाभ देण्याचे व यासाठी ‘प्रथम मागणी, प्रथम लाभ’ या तत्त्वावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी मंत्रालयीन सचिवांना तात्काळ दूरध्वनीवर संपर्क करून शासनाच्या निकषात बदल करण्याच्या सूचनाही दिल्या.

सार्वजनिक सुविधा आणि नागरी विकासाची कामे प्रलंबित न ठेवता ती वेगाने पूर्ण करण्याचे तसेच जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.

महिला व बालकल्याण विभागाद्वारे माविमच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी 150 महिलांना प्रत्येकी 1 लाख रुपये अर्थसहाय्य फिरत्या निधीतून करण्यात आले होते. या योजनेचा चांगला परिणाम दिसून आल्याने आता हे लाभार्थी 200 महिलांपर्यंत वाढले आहेत. या उपक्रमाचे कौतुक करून ही योजना जिल्ह्यासाठी एक आदर्श म्हणून पुढे नेण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या खर्चाचा आढावा घेवून प्राप्त निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी व खर्चाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला सर्व यंत्रणाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

00000

तळमळीने काम करणारा सच्चा सहकारी गमावला -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १३ :- विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र, चळवळीत काम करणारा सच्चा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, माजी आमदार तुकाराम बिडकर हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेले, विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेले नेतृत्वं होते. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुध्दा ते उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा अपघातानेच त्यांचा बळी घेतला, ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांचं अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का आहे,  अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

0000

डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक -पणन मंत्री जयकुमार रावल

नवी दिल्ली, दि.१३ : डाळी क्षेत्रातील संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात खाजगी क्षेत्राच्या सहभागाचे आवाहन करत सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास उत्पादन क्षमतेत अधिक वाढ होऊन डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल, असे प्रतिपादन राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी भारत मंडपम येथे आयोजित भारतीय डाळी परिषदेत (IPGA-India Pulses Conclave)  केले.

भारतीय डाळी परिषदेच्या निमित्ताने, महाराष्ट्र सरकारने डाळींच्या उत्पादनात आपल्या पुढाकारावर प्रकाश टाकत  शाश्वत शेती, संशोधन, सरकारी योजना आणि उद्योग सहभागाद्वारे महाराष्ट्रसह भारत डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे श्री रावल यांनी नमुद केले.

भारत मंडपम येथे भारतीय डाळी आणि धान्य संघटना (आयपीजीए) च्यावतीने आयोजित भारतीय डाळी परिषदतर्फे ‘समृद्धीसाठी डाळी – शाश्वततेसह पोषण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री रावल बोलत होते.

या वेळी  केंद्रीय  नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी,  कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदी, ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे, अन्न प्रक्रिया उद्योग सचिव सुब्रत गुप्ता, इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन (आयपीजीए) चे अध्यक्ष बिमल कोठारी, ग्लोबल पल्स कॉन्फेडरेशन चे अध्यक्ष विजय अय्यंगार, आपयपीजीए के उपाध्यक्ष मानेक गुप्ता यावेळी उपस्थित होते.

डाळींच्या शाश्वत उत्पादनाच्या महत्त्वावर जोर देत श्री रावल यांनी  सांगितले, महाराष्ट्र राज्य हे  तूर, हरभरा, मूग, उडीद आणि मसूर यासारख्या डाळींच्या उत्पादनात आघाडीवर आहे. डाळी केवळ पोषण सुरक्षा पुरवतात असे नाही, तर डाळी उत्पादनामुळे मातीचे पोषण सुधारते, पाण्याचा कमी वापर लागतो आणि यामुळे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासही मदत होत असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

श्री. रावल यांनी सांगितले की, महाराष्ट्राने शाश्वत आणि नाविन्यपूर्ण शेती तंत्रांच्या वापराद्वारे डाळींच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. राज्य सरकारने संशोधन संस्थांबरोबर समन्वय साधून नवीन डाळींच्या जाती विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी डाळींवर किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. ‘भारत डाळ’ योजनेतंर्गत सामान्य नागरिकांना प्रथिनयुक्त अन्न पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राज्यात सुरू केली आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा डाळी उत्पादक, ग्राहक आणि आयातदार आहे. तरीही, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला दरवर्षी २-४ दशलक्ष टन डाळ आयात करावी लागते.  श्री रावल यांनी सांगितले की,  प्रथिनांच्या वाढत्या जागतिक मागणी ही भारतासाठी मोठी संधी आहे त्यामुळे ती पुर्ण कशी करता येईल यावरही या परीषदेत चर्चा होऊन मार्ग काढणे महत्वपूर्ण असल्याचे आवाहन त्यांनी केले.

0000

अहिराणी भाषा साहित्याची चळवळ….

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक हात मदत करत आहे. शासनही याला पाठबळ देत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत हा भव्य सोहळा अनुभवणार आहेत. त्यानिमित्ताने आपल्या राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यांना उजाळा यानिमित्ताने देण्यात येणार आहे. खान्देशातील नावाजलेले साहित्यिक सुभाष आहिरे यांनी अहिराणी भाषा साहित्याची चळवळ यावर आपले व्यक्त केलेले मत….

एखाद्याच्या नेतृत्वाने सुरू झालेली चळवळ भविष्यात नामशेष होऊ शकते. परंतू समाज समुहाने मान्य केलेली चळवळ नामशेष होत नाही. कारण, अशा चळवळीत आपण समाजासाठी आहोत, ही समाज बांधिलकीची भावना रुजलेली असते. भाषा ही माध्यम असते, विचार हा स्वतंत्र असतो. जेव्हा एखादी विचारधारा समाजहिताची असते, तेव्हा ती विचारधारा समाज चळवळीचं रूप धारण करते. ह्याच सिद्धांतानुसार मी आणि माझा समाज, माझं गाव, माझी संस्कृती, माझी भाषा, माझं साहित्य या समाज बांधिलकीच्या विचारधारेतून खान्देशातील अहिराणी भाषा साहित्याची चळवळ गतिमान झाली आहे.

“भाषा साहित्याची चळवळ-अशी चळवळ असू शकते का? हो, शोधाचा भाग असू शकतो. परंतू काल परवा मान्य झालेला भाषा साहित्याचा जागर आज विकसित रूप धारण करुन यश संपादन करत आहे. म्हणजेच चळवळीत रुपांतर होत आहे. असं आमचं मत आहे कारण, काल अहिराणी भाषा ही निरक्षरांची भाषा आहे, म्हणून अहिराणी भाषेला आणि अहिराणी भाषा साहित्याला नाकारले जात होते. आज मात्र अहिराणी भाषा देखील साहित्याची भाषा आहे. अहिराणी भाषेच्या शब्दांनाही साहित्याचं सौदर्य आहे. ही बाब उमगल्यामुळे प्रसारमाध्यमांनी अहिराणी भाषा साहित्याला प्रसारणाच्या प्रवाहात आणलं आहे. वृत्तपत्रांच्या पुरवण्यांनी सुद्धा त्यांना स्थान दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने देखील माय भाषेची दखल घेऊन साहित्य संमेलने विकसित होणेकरीता मदतीचा हात पुढे केला आहे. खान्देशातील अनेक आमदारांनी आपला शपथविधी अहिराणी भाषेत केला आहे. शालेय पाठ्यपुस्तकांतही अहिराणी भाषा-साहित्याला प्रकाशित केले आहे. म्हणून भाषा साहित्यांची चळवळ गतिमान झाली आहे हे कबूल करणं भाग आहे.

भाषेची निर्मिती मानवाने केली आहे. ईश्वराने नाही, म्हणून भाषा हे मानवाचं आत्मनिवेदनाचं माध्यम आहे. ह्याच आत्मनिवेदनाचं कलात्मक रुप साहित्य आहे. आधीच्या आमच्या पित्यांनी गाव आणि गावची भाषा, गावची संस्कृती, रिती-भाती, गावचं साहित्य, पेहराव हे आज मौखिक साहित्याचं लिखित साहित्य करून ठेवले आहे. म्हणून आज वर्तमान काळातलं साहित्य आश्वासतांना भूतकाळातल्या मौखिक साहित्याचे बारकावे हाताळण्याविना अभ्यास पूर्ण होत नाही. म्हणून मौखिक आणि लिखित यांची नीटपणाने सांगड घातली की अहिराणी भाषा साहित्याचे पदर आपोआप उलगडतात. लोकांचे लोकभाषेचे लोकसाहित्य हे संवादाचे केंद्रस्थान आहे. ऐकणे, समजणे, लिहिणे, वाचणे, व्यक्त होणे ह्या क्रीयेतून अहिराणी भाषा साहित्य लोकांच्या काळजावर अधिराज्य गाजवते.

अहिराणी भाषा साहित्य हे लोकांच्या लोकप्रियतेने स्वीकारले असल्याकारणाने, ते आजही कालबाह्य झालं नाही. कारण अहिराणी भाषासाहित्यात लोकांच्या जगण्याचं जीवनमुल्य दडलेलं आहे. ह्या साहित्यात लोकांची लोकसंस्कृती अधोरेखित केलेली आहे. अहिराणी भाषा साहित्यात देखील नाविण्यता आहे. शब्दांचं सामर्थ्य आहे. शब्दांना ताल, सूर, लय आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे किंवा इंग्रजी भाषेच्या अतिरेकामुळे अहिराणी भाषासाहित्य नामशेष होईल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही, कारण की, ब्रिटीशांचा राज्य कारभार इंग्रजी भाषेत होता. तरी सुद्धा अहिराणी भाषा आणि भाषा साहित्य ते नष्ट करु शकले नाहीत. जोपर्यंत गाव, गावची भाषा, गावची कुटूंब व्यवस्था सुरक्षित आहे, तोपर्यंत अहिराणी भाषासाहित्य नष्ठ होणार नाही.  कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या मायभाषेचा स्वाभिमान असतो. जोपर्यंत माणसाचा स्वाभिमान जागृत आहे, तो पर्यंत भाषा आणि भाषेचं साहित्य सुरक्षित राहील. अहिराणी भाषासाहित्य हे अहिराणी आणि भाषिकांच्या भावनिक गरजेतून निर्माण झालेलं आहे, म्हणून ते सुरक्षित आहे.

अहिराणी भाषासाहित्य हे अहिराणी मौखिक परंपरेच सुधारित रूप आहे. अहिराणी भाषासाहित्य हे प्रयत्न करुन निर्माण झालेलं नाही. तर ते लोकांच्या लोकभावना एकजीव झाल्यावर निर्माण झाले आहे. म्हणून जसे लोकांचे लोकसाहित्य लोकभाषेचे नेतृत्व करते, तसे अहिराणी भाषिकांचे भाषासाहित्य हे अहिराणी भाषेचे नेतृत्व करते. अहिराणी भाषासाहित्याचा आत्मा खऱ्या अर्थाने अहिराणी लोकगीतात सापडतो. म्हणून अहिराणी भाषेच्या जात्यावरच्या ओव्या अहिराणी साहित्याचा गाभा कथन करतात. आज जात्यावरच्या ओवी गीतांची खोलवर समिक्षा झालेली नाही. ओवीचा मराठी भाषेत अर्थ सांगून उत्कृष्ट वाड्मयीन मुल्याच्या ओवींची बोळवण केलेली आहे. अहिराणी भाषेचे लोकगीत हे अहिराणी लोकभावनेचे संगीत आहे. नवरा मरुन गेल्यावर प्रेताजवळ रडणारी पत्नी आक्रोश कमी करते आणि काव्यगायन पद्धतीच्या सुरात जास्त रडते. आतून दाटून आलेला ऊमाळा जेव्हा अहिराणी भाषेच्या रचना गातो, तेव्हा पाषाण हृदयी माणूस देखील बर्फासारखा वितळू लागतो, हे अहिराणी रचनेचं खरं भाषासाहित्य आहे.

अहिराणी भाषेच्या लोकगीतांची तुलना वेद उच्चारणांशी करता येऊ शकते. कारण पाठांतर हे जसे वेदांच बळ आहे, तसं पाठांतर हे मौखिक अहिराणी रचनांचं बळ आहे. दोघांच्या गायनपद्धती समान आहेत. लोककल्याण हा दोघांचा हेतू समान आहे. परंपरेनुसार खान्देशात कोणतीही नवी वस्तू उपयोगात आणण्याच्या आधी त्या वस्तूवर अहिराणी भाषेच्या लोकगीताचा उच्चार करुन पुजा करून पवित्र केली जाते नंतर उपयोगात आणली जाते. ही खान्देशातील अहिराणी परंपरा आहे.

कोणतेही साहित्य लिखित होण्याआधी मौखिक असते. मौखिक साहित्याचे सुधारित रूप लिखित साहित्यात होते. कोणत्याही साहित्याला धर्मभेद, जातीभेद, भाषाभेद मान्य नसतो. अखंड मानव जातीचे कल्याण हा साहित्याचा हेतू असतो. ह्याच हेतूने बुद्ध, कबीर, संत तुकारामासह अनेक परिवर्तनवादी लेखकांनी साहित्य निर्माण केले आहे. वेदांची निर्मिती देखील अखंड मानवजातीच्या कल्याणाकरीता झालेली आहे. परंतू वेद रचनांना अध्यात्मिक दर्जा प्राप्त झालेला आहे. अहिराणी भाषासाहित्याच्या रचनांना अध्यात्मिक दर्जा प्राप्त झालेला नाही. तरी सुद्धा लोकांनी लोकश्रध्देच्या बळावर अहिराणी भाषेच्या रचनांना ‘लोकवेद’ असा दर्जा बहाल केलेला आहे.

अहिराणी भाषासाहित्याची चळवळ गतिमान होण्याचं मुख्य कारण असं आहे की, शालेय पाठ्यपुस्तकाच्या साहित्यात खान्देशाच्या मातीतला माणूस, खान्देशाच्या नाविन्यतेची संस्कृती, खान्देशाची अहिराणी भाषा छापलीच नाही. म्हणून खान्देशातील अहिराणी भाषिकांची भाषा विषयीची आत्मीयता जागृत झाली. म्हणून खान्देशातील साहित्यिकांनी आपल्या लेखनात गाव, गावची संस्कृती, गावच्या माणसांची व्यक्तीरेखा अधोरेखित केली. त्यामुळे अहिराणी साहित्याची मागणी वाढली. वाचकवर्गात वृद्धी झाली. अनेक काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक, समिक्षा, ग्रंथ प्रकाशित झाले. अनेक प्राध्यापकांनी जशी लोकभाषेत पीएचडी पदवी धारण केली आहे, तशी खान्देशातील दहा प्राध्यापकांनी आहीराणी भाषासाहित्याची पीएचडी पदवी धारण केली आहे. तसेच चार प्राध्यापकांनी अहिराणी भाषा साहित्याचे संशोधन प्रकल्प यु.जी.सी. पुर्ण केले आहे. “देवनी करा कोप आनि राजानी ऊडनी जप” हे दोन अंकी अहिराणी भाषेचं नाटक अखिल भारतीय नाट्य महोत्सवात कणकवली येथे सादर झालं आहे. तसेच “औ तुनी माय” हा दोन तासाचा अहिराणी भाषेचा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला आहे. अहिराणी चित्रपटाच्या सीडी महाराष्ट्रात गाजल्या आहेत. तसेच जानकीनं लगीन हा बालविवाह प्रतिबंध आशयाचा चित्रपट अहीराणी भाषेत सीडी रुपात प्रकाशित आहे. डॉ. संजीव गिरासे, सुभाष आहीरे, वाल्मीक आहीरे, प्रविण माळी आदि आहीराणी भाषेचे कथाकथनकार म्हणून लोकप्रिय आहेत.

अहिराणी भाषा कळत नाही यावर माझा विश्वास नाही. गरजेतून माणूस भाषा शिकतो. परक्या देशाची इंग्रजी भाषा कळते. अहिराणी भाषा तर आपल्या मातीची भाषा आहे, ती का कळू नये? एकीकडे भाषा कळत नाही असं म्हणतात, दुसरीकडे जेव्हा डीजे वर “माय तुन्हा डोंगर हिरवागार, ढवळा बैल मन्हा नंदी व राजा, चमकया लुगडा नेसनी व बाय अशी गाणी वाजतात तेव्हा कंबर हलवून शिक्षित माणसंही नाचतात ही खरी भाषेची लोकप्रियता असते.

अहिराणी भाषा साहित्याचं संवर्धन ही कोण्या एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर ती शासनासहीत आपणा सर्वाची जबाबदारी आहे. ह्याच हेतूने अहिराणी साहित्य अकादमी, कन्नड, अहिराणी साहित्य कला संस्था, धुळे, अहिराणी साहित्य कला अकादमी, नंदुरबार, अहिराणी साहित्य परिषद, धुळे, खान्देश अहिराणी कस्तुरी मंच, पुणे, खान्देश वैभव सांस्कृतिक संस्था, पुणे, खान्देशी विकास संस्था, पुणे  अशा अनेक संस्था कार्यरत आहेत. साप्ताहिक शब्दशक्ती वर्धापनाच्या निमित्ताने मांडळ येथे 12 फेब्रुवारी, 1998 ला पहिले अहिराणी साहित्य संमेलन झाले. अहिराणी साहित्य समितीच्यावतीने कासारे येथे 27 फेब्रुवारी, 1999 ला अखिल भारतीय दुसरे अहिराणी साहित्य संमेलन झाले. कला गुणदर्शन मंडळाच्यावतीने चाळीसगांव येथे 24 मार्च, 2000 ला अखिल भारतीय तिसरे अहिराणी साहित्य संमेलन झाले. मराठा मंडळाच्यावतीने नाशिक येथे 3 डिसेंबर, 2011 रोजी चौथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन झाले. खान्देश विकास प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने धुळे येथे पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन झाले. जिल्हास्तरावर अनेक अहिराणी साहित्य संमेलन झाली. खान्देश साहित्य संघ, धुळेच्या वतीने अहिराणी साहित्याची काव्य संमेलन गाजली. परकीय भाषा शिकून झाली. आता गावाची भाषा विकसित करायची आहे. ह्या भावनेने अहिराणी भाषासाहित्याची चळवळ वेगवान झाली आहे.

प्रत्येक अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी “लाकडाची गऊर” बीजदेवतेच्या रुपात पुजली जाते. आणि “दगडाचं जातं” ओव वाड्मय निर्मितींच साधन ह्या अर्थान पुजले जाते. अक्षय्यतृतीया ह्या सणाच्या दिवसाला लोक -वाङ्मय दिन” ह्या अर्थाने मानला जातो. अहिराणी भाषेला स्वतंत्र लिपी नाही. देवनागरी लिपीने लेखन होते. तसेच अहिराणी भाषेला त्या भाषेपुरतं व्याकरण आहे. अनुवाद विचारांना जोडण्याचं कार्य करतो. परंतू अहिराणी भाषा साहित्याचा अद्याप अनुवाद झालेला नाही. तरी अहिराणी भाषासाहित्याची निर्मिती थांबलेली नाही. अहिराणी भाषेच्या सांस्कृतिक कलेनं आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अशा अनेक कारणांनी अहिराणी भाषा साहित्याची चळवळ लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेली आहे.

अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी खान्देशातली गावं, शहरे आहिराणी लोकगीते समुहाने गातात. म्हणून अक्षय तृतीया हा सण अहिराणी भाषा दिन घोषित व्हावा आणि दगडाचं जातं हे पहिलं मानवकल्याण यंत्र आहे आणि अहिराणी ओवी गायनाचं साधन आहे.

सुभाष वामन अहीरे

सुप्रभात, 104, भगवत पार्क,

वरझडी रोड, शिरपुर, जि. धुळे

मो. 8806113713

नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १३ : नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलकडे अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र नसणे तसेच इमारत बांधकामामध्ये अनियमितता असूनही हॉस्पिटल सुरू ठेवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील संबंधित उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, नगररचनाकार यांची नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत १५ दिवसांत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मेडिट्राना हॉस्पिटलसंदर्भातील अनियमिततेबाबत आमदार विकास ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकी झाली. या बैठकीस नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी ‘मेडिट्राना’ बाबतच्या तक्रारीचा सविस्तर आढावा घेतला. श्री. बावनकुळे म्हणाले, हॉस्पिटल हे रुग्णांच्या सेवेसाठी असते. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. बांधकाम अनियमितता अथवा अग्निशमन ना हरकत नसणे ही गंभीर बाब आहे. हॉस्पिटल बंद करणे हा शासनाचा उद्देश नसून ते सुस्थितीत कार्यरत राहणे गरजेचे असल्याने त्यांना कायद्यानुसार नोटीस देऊन एका महिन्यात त्यातील त्रुटी पूर्ण करून घ्याव्यात. याचबरोबर या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

अनियमिततेसंदर्भात मेडिट्राना हॉस्पिटलबाबत तक्रार प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने बॉम्बे नर्सिंग ॲक्ट १९४९ नुसार हॉस्पिटलला नोटीस देऊन त्रुटींची पूर्तता करून घ्यावी, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीमध्ये आरोग्य विभागाचे सहसचिव तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी यांचा समावेश करावा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. १३ :- राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच पुण्यात ‘एम्स’च्या उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठक झाली. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, यांच्यासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीवर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्यासह पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. पुणे शहरात दर वर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करावी. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरुर’ रस्त्याच्या कामाची व्यवहार्यता तपासून पाहण्याच्या सूचनाही श्री. पवार यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कुल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

0000

राजवैभवी अभिजात मराठी!

मराठी भाषेच्या अभिजाततेला मिळालेला अधिकृत दर्जा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक समृद्धीचा सुवर्ण क्षण आहे. हा गौरव मराठी भाषा, साहित्य, संतपरंपरा आणि समाजजीवनाच्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवरील सन्मानपूर्वक मान्यता आहे. त्यानंतर, पहिल्यांदाच नवी दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक ऐतिहासिक पर्व ठरले आहे. दिल्लीच्या हृदयस्थानी मराठीच्या अस्मितेचा गजर घुमणार आहे.

मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, ती संस्कृतीचे दर्शन घडवणारी, विचारांचा वारसा सांगणारी, समाजमन घडवणारी आणि राज्यकारभाराची एक सक्षम भाषा आहे. राज्याच्या प्रशासकीय कार्यपद्धतीत मराठी अधिकाधिक प्रभावी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने गेल्या अनेक दशकांत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. आज, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या संवर्धनासाठी आणि शासन व्यवहारात तिच्या पूर्ण प्रतिष्ठेसाठी शासनाचा दृढ संकल्प आणखी बळकट होत आहे.

अभिमानास्पद राजकीय व प्रशासकीय वारसा

मराठीच्या राजकीय व प्रशासकीय प्रवासाचा मागोवा घेतल्यास, आपल्याला समजते की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मराठीला राज्यव्यवहाराची भाषा म्हणून पुनर्स्थापित केले. त्यांनी फारसी संज्ञांना मराठी व संस्कृत पर्याय निर्माण करून “राज्यव्यवहार कोश” तयार केला. पुढे पेशव्यांनीही मराठीच्या शासकीय वापराला चालना दिली. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मराठीला शासन कारभाराची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. त्यानंतर 1965 साली महाराष्ट्र राजभाषा अधिनियम संमत करून मराठीला अधिकृत राजभाषेचा दर्जा बहाल करण्यात आला. शासनाने ‘भाषा संचालनालय’ स्थापन करून मराठीच्या प्रशासकीय विकासासाठी धोरणे आखली आणि कार्यवाही सुरू केली.

शासनाचे धोरण

मराठीला प्रशासन, न्यायव्यवस्था, अर्थसंकल्प, तंत्रज्ञान आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांत प्राधान्य मिळावे यासाठी शासनाने पुढील प्रमुख निर्णय घेतले:

प्रशासनिक परिभाषा कोश आणि मार्गदर्शक पुस्तके तयार करणे

  • शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेल्या संज्ञा आणि वाक्प्रयोगांचे एकसंध मराठीकरण.
  • ‘शासन व्यवहार कोश’,‘प्रशासनिक लेखन’, ‘वित्तीय शब्दावली’ यांसारखी महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित.

विधिविषयक अनुवाद आणि न्यायव्यवस्थेत मराठीचा वापर

  • राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिनियमांचा अधिकृत मराठीत अनुवाद.
  • ‘न्याय व्यवहार कोश’विकसित करून कायद्याच्या लेखनशैलीसाठी मराठीचे योगदान.
  • भारतीय संविधान,भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, पुरावा अधिनियम यांसारख्या केंद्रिय कायद्यांचे अधिकृत मराठीकरण.

अर्थसंकल्पीय दस्तऐवज आणि प्रशासकीय नियम पुस्तिकांचे मराठीकरण

  • शासनाच्या वित्तीय आणि प्रशासकीय प्रकाशनांचे मराठी भाषांतर करण्याची परंपरा.
  • अर्थसंकल्पीय नियम पुस्तिकांचा अनुवाद करून सर्व शासकीय कामकाज मराठीतून होण्यासाठी प्रोत्साहन.

अमराठी अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण आणि परीक्षा

  • राज्यातील शासकीय सेवकांसाठी मराठी भाषा परीक्षा अनिवार्य.
  • मराठी टंकलेखन आणि लघुलेखन प्रशिक्षणास प्रोत्साहन.

त्रिभाषा सूत्रानुसार केंद्र सरकारच्या कार्यालयांत मराठीचा समावेश

  • महाराष्ट्रातील केंद्रशासकीय कार्यालयांत हिंदी-इंग्रजीबरोबरच मराठीला स्थान मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न.

संगणकीकरण आणि डिजिटल मराठीकरण

  • शासकीय संकेतस्थळे,ऑनलाइन सेवा, डिजिटलीकरण आणि पेपरलेस प्रशासनासाठी मराठीचा अधिकाधिक वापर.
  • संगणक-आधारित मराठी टंकलेखन परीक्षा आणि मराठी ई-गव्हर्नन्स प्रणालीचे बळकटीकरण.

भविष्यातील दिशा आणि संधी

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिच्या विकासासाठी पुढील काही महत्त्वपूर्ण धोरणे राबविण्याचा निर्धार शासनाने केला आहे:

  • न्यायसंस्थेतील सर्व कामकाज मराठीतून करण्यासाठी आवश्यक सुधारणा आणि कायदेशीर व्यवस्था निर्माण करणे.
  • विविध विज्ञान व तंत्रज्ञान विषयांतील संशोधन व शिक्षणासाठी मराठीतील परिभाषा विकसित करणे.
  • शासकीय संकेतस्थळे आणि ई-गव्हर्नन्स प्रणालीत मराठी भाषा सुलभ करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरणे.
  • राज्यभरातील सर्व प्रशासकीय आणि शासकीय कार्यालयांत मराठीचा100 टक्के वापर सुनिश्चित करणे.

मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक वारशाचा प्रतीक आहे. तिची संतपरंपरा, साहित्यिक परंपरा आणि समाजजीवनातील भूमिका अढळ आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणे ही केवळ एक घटना नसून, मराठीच्या अभिजाततेचा राष्ट्रव्यापी उत्सव आहे. शासनाने मराठीला अधिकाधिक सक्षम आणि प्रशासकीय व्यवहारात प्रभावी बनवण्याचा निर्धार केला आहे. आज आपली भाषा केवळ स्वसंवादाची भाषा न राहता शास्त्रीय, तांत्रिक, न्यायसंस्था, अर्थकारण आणि प्रशासनाच्या भाषेत रूपांतरित होत आहे. मराठीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, कारण तो केवळ भाषेचा नाही, तर आपल्या संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल वाटचालीचा आहे. महाराष्ट्र शासन आपल्या मराठी भाषेच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे आणि या गौरवशाली परंपरेला पुढील पिढ्यांसाठी अधिक समृद्ध करण्याचा निर्धार घेत आहे.

मराठीसाठी एक नवा संकल्प!

दिल्लीच्या भूमीत मराठी साहित्य संमेलन घडत आहे, तो केवळ साहित्याचा सोहळा नाही, तर मराठी अस्मितेच्या राष्ट्रव्यापी स्वीकाराचा क्षण आहे. मराठी ही राज्यकारभारात आणि प्रशासनात सर्वव्यापी व्हावी, हीच मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक आणि महाराष्ट्र शासनाची सामूहिक इच्छा आहे “मराठी भाषेचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान!”

मराठीच्या या नव्या पर्वात शासन आणि मराठीप्रेमी एकत्र येऊन मराठीच्या अभिवृद्धीसाठी नवा संकल्प करू या!

रणजितसिंह राजपूत

जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावण

मुंबई, दि. १३ :  शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभागस्तरीय,शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक तथा राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनी केले.

बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० संदर्भात कोकण विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, म्हाडाचे मुख्य अभियंता आडे, म्हाडाचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतले, वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट, विभाग स्तरीय तसेच शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.कवडे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा १ करिता मासिकप्रगतीअहवालभरून लवकरात लवकर जियो टॅगिंग करावे.  तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा २ करिता तत्काळ लाभार्थी नोंदणी सुरू करण्याच्या सूचना केल्या. यासाठी आवश्यकतेनुसार प्रचार अभियान राबविण्याचीही सूचना त्यांनी केली

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०

सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्र शासनाने या नव्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सह्याद्री येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

गृहस्वप्न साकार होणार!

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २०१५ पासून राज्यात राबविली जात आहे. राज्यातील ३९९ शहरांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत १४.७० लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ३.७९ लाख घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ही योजना वरदान ठरली असून, आता २.० टप्प्यात आणखी सुधारित स्वरूपात घरे बांधण्यात येणार आहेत.

नव्या टप्प्यातील वैशिष्ट्ये

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३० ते ४५ चौ. मी. पर्यंतची घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) बांधली जाणार आहेत. या घरांमध्ये शौचालय व इतर नागरी सुविधांचा समावेश असणार आहे.

योजनेची अंमलबजावणी ही (१) वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (BLC), (२) भागीदारी तत्वावर परवडणारी घरे (AHP), (३) भाडे तत्वावर परवडणारी घरे (ARH) आणि (४) व्याज अनुदान योजना (ISS) या चार प्रमुख घटकांद्वारे केली जाणार आहे.

सर्वसमावेशक नागरी सुविधा

घरकुलांसोबत पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, वीजपुरवठा अशा मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. तसेच, दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक रॅम्प आणि सुविधा, अंगणवाड्या, पावसाचे पाणी साठवण्यासाठी यंत्रणा, सौर ऊर्जा प्रणाली आणि हरित क्षेत्रासाठी स्थानिक वृक्षांची लागवड या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) व नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA) यांच्या समन्वयाने ही योजना राबवली जात असून आतापर्यंत राज्यात ४३९८९ कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे.

राज्यातील हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

हिंदुस्थानी संगीताचा स्वर प्रभाकर दिगंतात विसावला

मुंबई, दि. १३ : – हिंदुस्थानी संगीतातील स्वर भास्कर दिगंतात विसावला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

धारदारआवाज आणि पल्लेदार तानांनी भारती संगीत क्षेत्राचे स्वर नभांगण उजळून टाकणारा किमयागार म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर अजरामर राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, पंडित कारेकर यांचा स्वर म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील अपूर्व ठेवा आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेतील शिष्योत्तम म्हणता येईल, अशा पंडित कारेकर यांची सांगितीक कारकिर्द देदिप्यमान राहीली. त्यांनी आपल्या गुरूजनांचा नाव लौकिक जपला आणि सातासमुद्रापार नेला. पंडितजींच्या खास शैलीतील स्वरांनीच कित्येकांच्या दैनंदिनीची सुरवात होत असे. त्यांच्या स्वरांनी अभंग, भजन, नाट्यगीत ऐकणाऱ्यांची पिढी तयार केली. दर्दी रसिकांची दाद मिळविण्याबरोबरच, श्रोतृ वर्ग निर्माण करण्याचे कार्य पंडितजीच्या स्वरांनी केले. पंडितजींच्या निधनाने संगीत क्षेत्रातील तीन पिढ्यांना जोडणारा मार्गदर्शक दिगंतात विसावला. ते स्वरांनी अनंतकाळ आपल्या सोबतच राहतील. त्यांचे निधन ही भारतीय संगीत क्षेत्राची भरून निघणार नाही अशी हानी आहे. पंडितजीच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही कारेकर कुटुंबिय आणि पंडितजीच्या रसिक चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...