शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 336

मुंबईत येणाऱ्या ९८ दुधाच्या वाहनांतील १ लाख ८३ हजार लिटर दूध साठ्याची तपासणी- मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. १३ : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण ९८ वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण ९६ लाख ०६ हजार ८३२ किंमतीच्या १ लाख ८३ हजार ३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत मध्यरात्री प्रवेश करणाऱ्या दूध वाहनांच्या तपासणीत मुलुंड चेक नाका (पूर्व), हायवे, आनंदनगर येथे १३ वाहने एक लाख ४१ हजार ६० किंमतीचा २ हजार ८३३ लिटर दुधाचा साठा, मानखुर्द (वाशी) चेक नाका येथे ४१ वाहने ३१ हजार २०० किंमतीचा ९८ हजार २१५ लिटर दुधाचा साठा, दहिसर चेक नाका येथे १९ वाहने ५३ लाख ८६ हजार ३८० किंमतीचा ८ हजार ९७७ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोळी चेक नाका येथे २५ वाहने ४० लाख ४८ हजार १९२ किंमतीचा ७३ हजार ३७२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला. यामध्ये गाईचे दूध, पॉश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड दूध, डबल टोन्ड दूध यांचा समावेश होता. मानखुर्द येथे तपासणी दरम्यान कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक वाहन परत पाठविण्यात आल्याचे ही मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

००००

 

अर्चना देशमुख/विसंअ/

डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा

मुंबई, दि. १३ : राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि. १३) डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरु प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी राज्यपालांपुढे विद्यापीठ कामकाजासंदर्भात सादरीकरण केले.

बैठकीत विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस संकल्पना, सेंटर ऑफ हॅपिनेस, भावी योजना, शैक्षणिक वेळापत्रक, शाळांशी संवाद, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, स्वच्छ भारत अभियान, ‘विकसित भारत’ उपक्रम, आदिवासी विद्यार्थी उत्थान योजना, क्रीडा संस्कृतीला चालना आदी विषयांवर चर्चा झाली.

डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था यांसह ६ संस्थांचा समावेश आहे.

बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास पाध्ये हे देखील उपस्थित होते.

0000

Maha Governor reviews functioning of Homi Bhabha University

Maharashtra Governor and Chancellor of Universities C P Radhakrishnan reviewed the progress of implementation of various programmes and policies by the Dr Homi Bhabha State University at Raj Bhavan, Mumbai on Thursday (13th Feb).

Vice-Chancellor of HBSU Prof. Rajanish Kamat made an elaborate presentation before the Governor on the occasion.

Issues such as the implementation of NEP 2020, Innovative programmes, the concept of Professor of Practice, Center of Happiness, Future Plans of the University, Academic Calendar, School Connect programme, Hostel facilities for students, ‘Viksit Bharat’ initiative, Tribal Student Upliftment Scheme etc were discussed at the meeting.

The Homi Bhabha State University has under its aegis six Colleges including the Elphinstone College, Sydenham College, Secondary Training College and The Institute of Science.

Registrar of the University Prof Vilas Padhye was also present.

 

000

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ आदर्श निर्माण करेल- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १३: महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे, या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे मंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कल्याणकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीत श्री. सरनाईक  बोलत होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, २७ जानेवारी २०२५ रोजी आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिवशी या मंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविण्यात येतील.

राज्यभरातील सर्व रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना ५०० रुपये नोंदणी शुल्क व ३०० रुपये  वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेतस्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने  चालकांना सभासद नोंदणी करता येईल. स्वतः च्या मोबाईल वरून देखील त्यांना ते सहज शक्य होणार आहे.

तसेच ६५ वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत १० हजार रुपये  सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे. या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.

कर्तव्यवर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे.

उत्कृष्ट रिक्षा, टॅक्सी चालक, उत्कृष्ट रिक्षा, टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असेही श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले. बैठकीला परिवहन आयुक्त  विवेक भीमनवार यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

000

नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.१३ : पार्टीकल ॲक्सीलरेटर (कण त्वरक) तंत्रज्ञान पूर्वी संशोधनापुरतेच मर्यादित होते. आता ते कॅन्सर सारख्या आजारावर उपचार तसेच शिक्षणाच्या नव्या ज्ञानशाखासह एक सामाजिक गरज झाली आहे. भारतात सद्यस्थितीत अवघी २४ सायक्लोट्रॉन केंद्र कार्यान्वित असून पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेत विचार करता आणखी एक हजार केंद्राची आवश्यकता आहे. नागपूर येथे विविध वैद्यकीय व अभियांत्रिकी पायाभूत संस्था असून सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृतीगट स्थापण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याचबरोबर या प्रकल्पासाठी जागेच्या उपलब्धतेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपूर येथे सायक्लोट्रॉन केंद्राच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, व्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल, प्रो.किशोर भूरचंडी, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, आयजीएमसीचे अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाण, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे संचालक वैद्यकीय संचालक डॉ.आनंद पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर उपस्थित होते.

नागपूरमध्ये व्हीएनआयटी, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या  आरोग्य क्षेत्रातील नावाजलेल्या पायाभूत संस्था आहेत. यादृष्टीने विचार करता हे केंद्र नागपूरसह मध्यभारतासाठी महत्वाचे ठरेल. या केंद्राद्वारे क्लीन एनर्जी, जलशुद्धीकरण, आरोग्य, ऊर्जा अन्य प्रक्रिया सारख्या औद्योगिक क्षेत्राची नवी दालने सक्षम होण्यास मदत होईल, असे एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सादरीकरणात सांगितले.

संशोधन, वैद्यकीय क्षेत्रासह कॅन्सरवरील उपचार, भौतिक विज्ञान व अभियांत्रिकी शिक्षण व औद्योगिक क्षेत्रासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरेल, असे व्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल यांनी सांगितले. मध्य भारतातील आवश्यक अशा या केंद्राच्या उभारणीसाठी व्हीएनआयटी सर्वतोपरी योगदान देईल. व्हीएनआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या क्षेत्रात रस घेणारे संशोधक पुढे आले आहेत. असे श्री. पटेल यांनी सांगितले.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आनंद पाठक यांनी मध्य भारतासह विदर्भ-मराठवाड्यातील कॅन्सर रुग्णांना याद्वारे होणाऱ्या लाभासंदर्भात सादरीकरण केले.

0000

रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे करून ‘जत’चा विकास साधावा – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक प्रकल्प राबवू. जतला सुजलाम‌् सुफलाम् करण्यासाठी व जतवासियांना लखपती करण्यासाठी अधिकारी व नागरिकांनी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे राबवावीत. त्यासाठी वेगवेगळ्या खात्याअंतर्गत अधिकाधिक आवश्यक निधी देण्याची ग्वाही रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज दिली.

जत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या सहाय्याने हरित महाराष्ट्र व सुविधा संपन्न कुटुंब कार्यक्रमाची अंमलबजावणी व याकरिता करावयाच्या उपाययोजना याबाबत आयोजित सरपंच मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तहसील कार्यालय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, मिशन मनरेगाचे महासंचालक श्री. नंदकुमार, जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, मनरेगाचे राज्य गुण नियंत्रक राजेंद्र शहाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे आदि उपस्थित होते.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जतच्या विकासासाठी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगून रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले, या माध्यमातून शक्य तितक्या अटी शर्ती शिथिल करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त प्रोत्साहनपर कामे करण्यासाठी तसेच बांबू लागवडीसाठी आवश्यक सर्व सहकार्य करू. रोजगार हमी योजनेतून अनेक योजना आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जतच्या विकासासाठी या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. त्यासाठी लागणारे सहकार्य शासनाच्या माध्यमातून करू. संघटितपणे सर्वांसाठी विकासकामांची आखणी करा व यशस्वी करा. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. तसेच, गावातील, शेतजमिनीचे रस्ते विविध लेखाशीर्षांमधून पूर्ण करण्यात येतील. रोजगार हमी योजनेची स्थगित कामे पुन्हा सुरू करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.

पर्जन्यमान, जलसंधारणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तुंची माहिती दिली. ते म्हणाले, देशात फक्त महाराष्ट्रात बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जाते. तसेच, 100 दिवसांची मजुरीही दिली जाईल. कमी पाणी व कष्टात बांबू लागवड करता येते. एक एकर बांबू लागवडीतून वर्षाला एक लाख रूपये मिळू शकतात. जागतिक बँकेकडून भविष्यात मित्रा संस्थेला मिळणाऱ्या निधीतील अधिकाधिक निधी जतच्या विकासासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, बंगळुरू विमानतळावर बांबूचा वापर केला आहे. लोकसभेत 5.5 लाख चौरस फूट फरशी बांबूची आहे, असे दाखले देऊन श्री. पटेल यांनी हरित महाराष्ट्र संकल्पना जत तालुक्यात यशस्वी करा. पर्यावरण बदलाची चाहूल ओळखून भावी वाटचाल करावी, असे आवाहन केले.

मिशन मनरेगाचे महासंचालक श्री. नंदकुमार म्हणाले, रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवल्यास ऊसतोड कामगारांसह सर्वांचे जीवन बदलेल. नागरिकांनी मनरेगाकडे लखपती व्हायचा मार्ग म्हणून पाहावे. रोजगार हमी योजनेतून 266 प्रकारची कामे आहेत. ती निकषांनुसार पूर्ण करा. विकासाची दृष्टी ठेवून, अभ्यास करून कामांचे नियोजन करावे. तुती लागवड, फळबाग लागवड अशा विविध मार्गांनी कामे करण्याचा विचार करा. यामध्ये युवकांचा सहभाग वाढवावा, असे ते म्हणाले.

माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, जत सांगली जिल्ह्याचा शेवटचे टोक असून, जत तालुक्यातील जनता कष्टाळू आहे. जतच्या विकासासाठी संघटितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दुष्काळी जिल्ह्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने जलसंधारण कामांसाठी भरीव निधी दिला आहे, असे सांगून आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जत तालुक्यात गट तट बाजूला ठेवून रोजगार हमी योजनेची कामे यशस्वी करा. तालुक्यातील प्रत्येक माणूस रोजगार हमी योजनेतून लखपती व्हावा. अधिकाऱ्यांनीही त्यासाठी सहकार्य करून  योजना यशस्वी करावी, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात गट विकास अधिकारी आनंदा लोकरे यांनी मनरेगाअंतर्गत जत तालुक्यात करण्यात येणाऱ्या विविध कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राणवायू रथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बसमध्ये बांबू लागवड वस्तू व स्क्रीन आहे. त्यातून बांबू लागवडीची माहिती दिली जाणार आहे. यावेळी जतच्या विकासात्मक कामाबाबत लघुचित्रफीत दाखवण्यात आली. सरपंच संघटना व रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून मंत्री भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला. अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.

00000

‘विधवा’ नव्हे ‘पुर्णांगिनी’ म्हणा – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर

छत्रपती संभाजीनगर,दि.१३(जिमाका)- पती सोबत संसार करतांना ती ‘अर्धांगिनी’ असते मात्र पतीच्या निधनानंतर ती एकटीच दोघांचीही जबाबदारी सांभाळते. त्यामुळे तिला ‘विधवा’ न म्हणता ‘पुर्णांगिनी’ म्हणा आणि तिचा सन्मान करावा, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर ह्यांनी आज येथे केले. संबोधनातील हा बदल करण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाने शासनाला शिफारसही केली आहे,असेही यावेळी श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने जिल्ह्यात ‘महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा’ आयोजीत करण्यात आली.

या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड, नीलम बाफना, महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव तसेच सर्व शासकीय विभागातील महिला अधिकारी उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात झाली.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, महिलांनी स्वतःला आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. उगाचच उपवास करु नका. आपण प्रशासकीय यंत्रणेतील घटक म्हणून समाजाला बांधील आहोत. आपण आपल्या पदावर काम करतांना सोबतच्या महिलांना जागरुक करु शकतो. असे करत असतांना समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

श्रीमती चाकणकर पुढे म्हणाल्या की, समाजात आजही विधवा महिलांना अवहेलना सहन करावी लागते. वास्तविक विधवा महिला ह्या आपल्या कुटुंबात आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यामुळे त्यांना अधिक सन्मान दिला पाहिजे. राज्य महिला आयोगाने विधवा हा शब्द हटवून त्या ऐवजी ‘पुर्णांगिनी’ हा शब्द वापरावा अशी शिफारस शासनाला केली आहे. समाजाचा हा दृष्टीकोन बदलविण्याचा सावित्रीमाईंनी सुरु केलेला हा लढा अजूनही अपूर्ण आहे, तो आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. समाज बदलासाठी महिला अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महिलांनी आपले आयुष्य सकारात्मकतेने जगा,असे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.

 त्यांनी महिला अधिकाऱ्यांना सांगितले की, बालविवाह, गर्भलिंगनिदान चाचण्या, विधवाप्रथा विरोधात लढा द्या.आपल्या कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती तयार करण्याबाबत आग्रही रहा. भारतीय न्याय संहिता या १ जून २०२४ पासून अंमलात आलेल्या कायद्यांसंदर्भात  माहिती जाणून घ्या. ही माहिती शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवा.विविध शासकीय योजना, टोल फ्री क्रमांक याबाबत जनजागृती करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार त्यांनी आपल्याला दिलेला आत्मसन्मान, कायदा, हक्क, अधिकार समजून घेऊन सक्षम व्हा. आयुष्यातील संकटांच्या लढाईला सामोरे जा. स्वतःच्या आरोग्य्याची काळजी घ्या, असा हितोपदेशही श्रीमती चाकणकर यांनी उपस्थित महिला अधिकाऱ्यांना केला.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ह्यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध महिला सक्षमीकरण उपाययोजनांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात महिला सुरक्षिततेसाठी ५०० हून अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला बचत गटांमार्फत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात ६५ हजार महिला ह्या लखपती दिली झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, महिलांनी अपप्रवृत्तीच्या विरोधात उभे रहायला शिकावे व प्रवृत्त व्हावे, यासाठी महिला सक्षमीकरण अभियान आहे. त्याची सुरुवात शासकीय महिला अधिकाऱ्यांपासून व्हावी यासाठी ही कार्यशाळा आहे. महिलांची सुरक्षितता, त्यांचे सक्षमीकरण याबाबतच्या उपाययोजनांची माहिती सर्व महिला अधिकाऱ्यांना हवी. त्यांची स्वतःची नोकरी व कुटुंब सांभाळतांना आपल्या पदाच्या माध्यमातून संपर्कात येणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा.

प्रास्ताविक श्रीमती रेश्मा चिमंद्रे यांनी केले. सुत्रसंचालन श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी केले. दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेत डॉ. समिना पठाण यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी, ॲड. शुभांगी वक्ते यांचे महिलांविषयक कायद्यांची अंमलबजावणी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य व ताणतणाव व्यवस्थापन, श्रीमती गीता बागवडे यांचे महिला सुरक्षितता- समस्या व उपाययोजना , श्रीमती रेश्मा चिमंद्रे यांचे महिलांसाठीच्या विविध योजना व अंमलबजावणी याविषयावर विविध सत्रात मार्गदर्शन होणार आहे.

०००००

मराठी भाषा : अभिजाततेचा सन्मान, जागतिक विस्तार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली पासून गल्लीपर्यंत एक मंतरलेले वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. मराठी भाषा तिचा विस्तार घराघरातील मराठी मराठीच्या अन्य भाषिक भगिनी मराठीचा विस्तार सात समुद्रापलिकडे गेलेली मराठी अशा अनेक विषयांवर चर्चा रंगत आहे ऊर भरून यावा असे वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा ऐतिहासिक वारसा, तिची प्राचीनता, शासनाच्या योजना आणि जागतिकस्तरावरील आपल्या माय मराठीची नोंद या सर्व घटनाक्रमाचा उहापोह करणे औचित्यपूर्ण आहे.

मराठी भाषेचे प्राचीन संदर्भ

मराठी ही इंडो-आर्यन भाषाकुटुंबातील महत्त्वाची भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषेतून झाल्याचे भाषाशास्त्रज्ञ मानतात. मराठीत प्राचीनतम लिखित संदर्भ १०-११ व्या शतकातील ‘शिलाहार ताम्रपटां’मध्ये आढळतात. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लिहिलेले लीळाचरित्र हे मराठीत उपलब्ध असलेले सर्वात प्राचीन गद्य स्वरूपातील साहित्य आहे. मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. तसेच ज्ञानेश्वरांनी रचलेली भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) ही मराठीत लिहिलेली पहिली मोठी साहित्यकृती मानली जाते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सापडलेल्या जुन्या पांडू लिपी, शिलालेख, यामध्ये देखील मराठी भाषेची नोंद सापडते.

मराठी भाषेचा अभिजात दर्जा

भारत सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष ठरवलेले होते. यामध्ये

  1. भाषेला १५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन लिखित साहित्य परंपरा असावी.
  2. स्वतंत्र व्याकरण आणि समृद्ध साहित्य असावे.
  3. संस्कृतीवर महत्त्वपूर्ण प्रभाव असावा.

लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकयांचे अभंग, दासबोध, पंडितराज जगन्नाथांची संस्कृत-मराठी लेखन परंपरा आणि पुढे येणाऱ्या संत साहित्यामुळे मराठी भाषा या निकषांमध्ये बसते. या संदर्भात पुरावा देण्यासाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न केले होते. विविध स्तरावरून यासाठी पाठपुरावा केला जात होता. 3 ऑक्टोबर 2024 ला  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असल्यामुळे सध्या तमाम मराठी मुलुखामध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. मंतरलेल्या आणि भारावलेल्या वातावरणातच दिल्लीत होणाऱ्या सारस्वतांच्या मेळामध्ये अनेकांनी कुच करायचे ठरविले आहे.

शासनाचे भाषा संवर्धनाचे उपाय

मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मराठी भाषा विभागाची स्थापना राज्य शासनाने 2011 मध्ये केली. शासनाने स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केला असून, तो जतन आणि संवर्धनाचे विविध धोरण आखतो.

मराठी भाषा धोरण : २०१३ मध्ये राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धन आणि प्रसारासाठी धोरण आखले.

मराठी भाषेच्या संरक्षणासाठी कायदा: २०२२ मध्ये ‘महाराष्ट्र मराठी भाषा अधिनियम’ संमत करण्यात आला, ज्यामुळे शासकीय कामकाजात मराठी अनिवार्य करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.

माय मराठीच्या संवर्धनाचा विचार व्हावा यासाठी मराठी भाषा भवन मुंबई येथे होणार आहे.

शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषेमध्ये कामकाज करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

मराठी भाषा दिवस (२७ फेब्रुवारी): कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जातो.

मराठी शाळांसाठी अनुदाने: इंग्रजी माध्यमाकडे झुकणाऱ्या प्रवृत्तीला आवर घालण्यासाठी मराठी शाळांना अनुदाने दिली जातात.

४) बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि जागतिक पातळीवरील मराठी भाषा

महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचा प्रचार आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बृहन्महाराष्ट्र मंडळ करते. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे. या ठिकाणी मराठी सण उत्सव व भाषा संदर्भातील कार्यक्रम नियमितपणे घेतली जातात. महाराष्ट्रात केवळ चांदा ते बांदा मराठी आहेत अशी धारणात चुकीची ठरते मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात एवढेच नव्हे तर सीमा लगत नसतानाही दिल्लीमध्ये जवळपास पाच लाख मराठी नागरिक रहिवासी आहेत. एकट्या दिल्लीमध्ये शेकडो मराठी मंडळे कार्यरत असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी आपले मराठी सण उत्सव परंपरा राजधानी दिल्लीमध्ये सुरू ठेवली आहे. नवी दिल्लीमध्ये दोन मराठी शाळा व अनेक मराठी मंडळे मराठी भाषेची सेवा कसोशीने करत आहे.

भारताबाहेर मराठी भाषा :

कविवर्य डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी आपल्या कवितेमध्ये ….

भाषेचे आणि जातीचे काय असते नाते

भाषा म्हणजे धान्य धर्म म्हणजे जाते

जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा

पऱ्हाटी कडून बोंडाचीच कराल ना आशा

असे भाषा आणि धर्माचे वर्णन करतात. त्यामुळे महाराष्ट्रात राहणारे हिंदू, मुस्लिम, शीख, जैन सर्व जाती धर्माची मंडळी मराठीमध्ये बोलतात. देवनागरी लिपी आणि अनेक भाषांमधले शब्द स्वतःमध्ये सामावून घेण्याची वृत्ती यामुळे ही भाषा लोकप्रिय आणि अधिक बोलल्या जाते जगामध्ये दहाव्या क्रमांकावर मराठी भाषा बोलली जाते जवळपास दहा कोटी जनता ही भाषा बोलते. काही ठिकाणचे मराठी मंडळ तर भारतातील भाषिक उपक्रमांना लाजवेल अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करते. यामध्ये उल्लेखनीय नोंदी म्हणजे लंडनमध्ये मराठी भाषेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अमेरिकेच्या अनेक विद्यापीठांत मराठी भाषा शिकवली जाते.ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात मराठी सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. कराचीतील मराठी मंडळी अजूनही गणेशोत्सवाला विसरली नाही.

दुबई आणि सिंगापूरमध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. जगाच्या पाठीवर जाई ठिकाणी मराठी माणूस गेला त्या ठिकाणी तो तीन गोष्टी करतो एक म्हणजे मराठी मंडळ स्थापन करतो, दुसरा म्हणजे गणेशोत्सवात गणपतीला विसरत नाही आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिलेल्या आदर्शांना त्याला विसरणे शक्य नसते. त्यामुळे शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिन, दिवाळी,दसरा, रक्षाबंधन अशा अनेक सणांना मराठी भाषा मराठी उत्सव आणि मराठी अस्मितेचा मुलामा चढलेला असतो त्यामुळे भाषेसोबत संस्कृती हे देखील मराठी भाषा संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

जागतिक स्तरावर मराठी भाषेचे स्थान

मराठी ही जगभरातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. काही महत्त्वाचे आकडेवारी दाखले –

जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 10 व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे. भारतात हिंदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची मातृभाषा असलेली भाषा. 9 ते 10 कोटीहून अधिक लोकांची मातृभाषा मराठी आहे.

दिल्लीतील महोत्सव

दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होणे, ही एक ऐतिहासिक बाब आहे. महाराष्ट्राबाहेर हे संमेलन होत असून, ते मराठी भाषेच्या जागतिक पातळीवरील महत्त्वाचे स्थान दर्शवते. यावेळी साहित्य, भाषा आणि संस्कृती यांचे चिंतन होणार असून, विविध चर्चासत्रे, परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित केले जात आहेत. दिल्लीच्या विज्ञान भवनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संमेलनाचे उद्घाटन करणार आहे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर भूषवित आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील शेकडो प्रकाशक आपल्या प्रकाशनासह दिल्लीत डेरे दाखल होत आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जिल्ह्यात घट्ट पाळीमुळे असणाऱ्या ग्रंथ चळवळीतील अनेक मान्यवर प्रकाशक साहित्यिक कवी लेखक समीक्षक दिल्लीकडे कूच करणार आहेत त्यानिमित्ताने संपूर्ण देशात भारावलेले वातावरण निर्माण होत आहे. मराठी सारस्वतांमध्ये तर या संमेलनाचे प्रचंड आकर्षण असून विविध उपक्रम संमेलनाची पूर्वतयारी म्हणून गावागावात सुरू झाले आहे.

खरे म्हणजे आमची माय मराठी कधीच लोकल नव्हती ती कायम अटकेपार ग्लोबलच होती. मराठी ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, तिच्या संवर्धनासाठी शासन आणि बृहन्महाराष्ट्र मंडळे योगदान देत आहेत. अशा साहित्य संमेलनांच्या माध्यमातून मराठीचा जागतिक प्रसार अधिक व्यापक होईल, यात शंका नाही. त्यामुळेच 21, 22, 23 फेब्रुवारी मराठी भाषकांच्या कॅलेंडरवर राखीव तारीख ठरली आहे… तेव्हा चलो दिल्ली !

प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

9702858777

साहित्य आणि कोकण यांच अतूट नातं!

कवी माधव हे एक निसर्गकवी होते. ते मूळचे कोकणातील असले, तरी त्यांचे बरेचसे आयुष्य आबकारी खात्यातील नोकरीमुळे मुंबईत गेले. असं असलं तरीही कोकणशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती. यातूनच त्यांची हिरवे तळकोकण ही कविता त्यांना खरी ओळख करून देण्यास कारणीभूत ठरली. निसर्गाचे अप्रतिम वर्णन त्यांनी या कवितेत केले आहे. कवी माधव केशव काटदरे यांना जशी कोकणच्या निसर्गाची भुरळ पडली तद्वत कोकणातील अनेक लेखकांना आणि कवींना कोकणने लिहितं केलं. याचं श्रेय जसं लेखक आणि कवी यांच्या प्रतिभेला आहे तसं ते कोकणच्या सौंदर्याला देखील द्यावं लागेल. मुळात कोकणच्या ग्रामीण भागाला संगीत नाटकांचे भलतंच वेड होतं आणि ही परंपरा आजही जपली जातेय. या वेडापायी संगीत नाटकं लिहिणारे कलाकार देखील कोकणच्या या लाल मातीत जन्माला आले. एकापेक्षा एक उत्तम अशी संगीत नाटकं लिहून त्यांनी कोकणचं नाव अक्षरशः साता समुद्रापार पोहोचवलं. याबरोबरंच कोकणच्या व्यक्तिमत्वावर, गावांवर, चालिरितीवर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. कोकणची खोडसाळ आणि ईरसाल स्वभावाची व्यक्तिमत्व केवळ कोकणातीलच नव्हे, तर ज्यांचे कोकण जवळच्या नात्या प्रकारे ऋणानुबंध जुळले त्यांनी आपल्या लेखणीतूनही व्यक्तीमत्वे अजरामर केली. पु. ल . देशपांडे हे अशाच विनोदी लेखनशैलीतील एक अजरामर नांव. त्यांनी साकारलेला अंतूबर्वा पुढे रंगभूमीवर देखील आला. या व्यक्तिमत्वानी वाचकांच्या मनावर जसं अधिराज्य गाजवलं, तसंच ते प्रेक्षकांच्या मन:पटलावरही कायम राहिलं.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते वि. स. खांडेकर  यांनी त्यांच्या साहित्यात आर्थिक विषमता, ध्येयवादी व्यक्तिंचे वैफल्य,दलितांवर होणारा अन्याय, दांभिकता दाखवून सामाजिक आशय आणला. ‘श्यामची आई’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांनी बालकुमारांसाठी कथा, कादंबरी, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र, अनुवाद असे भरपूर लेखन केले. श्यामची आई या पुस्तकाच्या असंख्य आवृत्ती काढल्या गेल्या. आजही हे पुस्तक वाचणाऱ्याच्या नेत्रात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. मातृहृदयीमनाच्या साने गुरुजी यांचे लेखन हृदयस्पर्शी असल्याने वाचकांच्या मनावर ते आजही अधिराज्य गाजवत आहे. इतर लेखकांपैकी ‘बालसन्मित्र’ पाक्षिकाचे संपादक पा. ना. मिसाळ आणि गणेश बाळकृष्ण ताम्हाणे यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. पुढील काळात ग. त्र्यं.माडखोलकरांनी कादंबऱ्या, एकांकिका, समीक्षा, आणि लघुकथा लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्यातून सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा पुरस्कारआढळतो. जवळपास १२०० कथा आणि ५० कादंबऱ्या लिहिणारे शब्दप्रभू श्रीपाद काळे यांनी त्यांच्या साहित्यातून कोकणच्या निसर्गाचे आणि लोकजीवनाचे मार्मिक वर्णन केले. काळे यांच्या लेखणीतून कोकणचा निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो. १९५८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोकणी गं वस्ती’ या पहिल्या कथा संग्रहापासून आजवर सातत्याने लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी ‘माहिमची खाडी’ या कादंबरीद्वारे मुंबईतल्या झोपडपट्टीतील माणसांचे जीवन रेखाटले. त्यांच्या साहित्यात मानवी स्वभाव, मानवी जीवन आणि कोकणातील निसर्गाचे कुतूहल व्यक्त झाले. जैतापूर येथील अणुभट्टीवर त्यांनी लिहिलेले लाल बत्ती हे पुस्तक चांगलेच गाजले. कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून कर्णिक यांनी कोकणात लेखन आणि वाचन चळवळीला चांगलीच दिशा दिली. आज वयाची नव्वद वर्षे पार केल्यानंतरही मधु मंगेश कर्णिक यांची साहित्याविषयी असणारी ओढ आणि तळमळ नक्कीच अभिमानास्पद अशी आहे. दिल्ली येथील साहित्य संमेलनात प्रकाशित होणाऱ्या माझ्या “मंतरलेले दिवस” या पुस्तकाला भाईंनी स्वतःच्या हस्ताक्षरात प्रस्तावना लिहून दिली, ही बाब माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. करूळ या त्यांच्या गावात भाईंच्या पुढाकाराने सुरू झालेले मधु मंगेश कर्णिक ग्रंथालय आज कोकणची वाचन चळवळ पुढे नेण्यास हाभार लावतआहे.

साठोत्तरी काळातील साहित्यिक चि. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांनी नाटक, कादंबरी व कथेच्या क्षेत्रातकोकणातील दंतकथा व गूढता यांचा प्रभावी उपयोगकेला. कोकणात आजही अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याबरोबरच अनेक गुढगोष्टी मोठ्या खुमासदारपणे आणि रंगवून सांगितल्या जातात. खानोलकर यांनी आपल्या लेखनात कोकणच्या या बारकाव्यांचा उत्तम आढावा घेतला. त्यांच्या साहित्यातून मानवी जीवनातील अतर्क्य आणि अद्भूत यांचा शोध घेण्यामुळे त्यांचे वेगळेपण जाणवते. मं. वि. कोल्हटकर, वि. कृ. नेरूरकर यांच्या साहित्यात कोकणातील अज्ञाताच्या भीतीचे चित्रण आहे. प्र. श्री. नेरूरकर यांनी कादंबरी, नाटक, बाल साहित्य, प्रवासवर्णन आणि चरित्रे साकारली आणि मालवणी बोलीतील साहित्यावर संशोधन केले. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले संसदपटू बॅ. नाथ पैं यांना मराठी कवीच्या काव्यपंक्ती मुखोद्गत असत. गं. बा. सरदार यांनी आपल्या ग्रंथांतून सामाजिक प्रबोधनाचे विचार मांडले. चंद्रकांत खोत यांचे कविता संग्रह, कादंबऱ्या ‘उभयान्वयी अव्यय’ आणि’बिंब-प्रतिबिंब’ प्रसिद्ध आहेत.  त्यांचे बालसाहित्य मात्र काही कारणामुळे दुर्लक्षित राहिले. सतीश काळसेकर यांचा ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हा लेखसंग्रह आणि ‘इंद्रियोपनिषद’ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लोकप्रिय लेखक रत्नाकर मतकरी यांनी भयकथा, नाटकं, आणि बालनाट्ये अशी शेकडो पुस्तकं लिहिली आहेत.

जयवंत दळवी यांनी देखील कथा, कादंबऱ्या, नाटके या साहित्यप्रकारात ‘चक्र’, ‘महानंदा’, ‘संध्याछाया’, ‘बॅरिस्टर’, ‘सूर्यास्त’ ‘पुरुष’, ‘सारे प्रवासी घडीचे’ अशी लोकप्रिय पुस्तके लिहिली.जयवंत दळवी हे दादरला भवानी शंकर रोडला विकास सोसायटीमध्ये राहत असत. याच ठिकाणी आमचे काका देखील राहत असल्याने बालपणी अनेकदा आमचे दादर येथे जाणे व्हायचे. दररोज सायंकाळी जयवंत दळवी एक फेरफटका मारण्यासाठी दादरच्या परिसरात फिरत असत. जाता येता आम्हाला त्यांचे दर्शन व्हायचे, मात्र ते त्यांच्याच विचारात मग्न असल्याचे दिसून येई.  साहित्यातून महानगरीय माणसाचे दुःख मांडणाऱ्या ह. मो. मराठे यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ आणि ‘काळेशार पाणी’ या कादंबऱ्या गाजल्या. माधव कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या पुस्तकातून वाचकांना उपेक्षित जीवनविश्वाचा परिचय झाला.कोंडविलकर यांनी अखेरचाकाही काळ देवरुख येथे वास्तव्य केले होते.

आ. ना. पेडणेकर यांच्या लेखनात कोकणातील लोकजीवन आणि निसर्ग यांचे चित्रण आढळते. ‘शैलुक’, ‘मैत्र’, ‘वेडा’, इत्यादी कथासंग्रहातून सामाजिक आ. ना. पेडणेकर यांच्या लेखनात कोकणातील लोकजीवन आणि निसर्ग यांचे चित्रण आढळते. त्यांनी ‘शैलुक’, ‘मैत्र’, ‘वेडा’, इत्यादी कथासंग्रहातून सामाजिक विकृतींचा निषेध केला. श्री. ना. पेंडसे यांच्या लेखनातून प्रादेशिक जीवनासह मानवी जीवनाचे मर्म दिसते. त्यांच्या ‘एल्गार’, ‘हद्दपार’, ‘गारंबीचा बापू’ आणि ‘तुंबाडचे खोत’ या कादंबऱ्या आणि नाटके प्रसिद्ध आहेत. विद्याधर भागवत हे ‘आरती’ मासिकाच्या संपादनाबरोबरच कविता, कथा, कादंबरी, नभोनाट्य, बालसाहित्य, साहित्य समीक्षा आणि चरित्रलेखन करीत असत. त्यांना बालकवी ठोंबरे यांच्यावरील ‘ऐलतटावर -पैलतटावर’ कादंबरीसाठी पुरस्कार मिळाले. कोकणातील प्रख्यात लेखकांनी लिहिलेली नाटकं ज्यावेळी मुंबईतील नाटक कंपनीमार्फत कोकणच्या रंगमंचावर येत त्यावेळीही नाटकं पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग मोठी गर्दी करत असे.

डॉ. विद्याधर करंदीकर यांनी कवितासंग्रह, मालवणी एकांकिका तसेच केशवसुत आणि वीर सावरकर यांची चरित्रे लिहिली. करंदीकर पीएचडी करत असताना त्यांचे मार्गदर्शक असणाऱ्या, देवरुख येथील लेखक डॉ. सुरेश जोशी यांच्याकडे त्यांचे येणे व्हायचे. अनेकदा डॉक्टर करंदीकर यांची जोशी सरांच्या घरी भेट झाली. अत्यंत साधे असणारे हे व्यक्तिमत्व एका वेगळ्याच रसायनाने बनलेले असल्याची प्रत्येक भेटीत जाणीव व्हायची. मूळ बेळगावचे असणारे मात्र नोकरीनिमित्त देवरुख महाविद्यालयात प्राचार्य पदी विराजमान झालेले डॉ. सुरेश जोशी यांनी मधुभाई यांच्या खांद्याला खांदा लावून कोकण मराठी साहित्य परिषदेसाठी काम केले. जोशी यांची आजवर दहा पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे.प्रसिद्धीपासून दूर असणारे लुई फर्नांडिस यांच्या साध्या, सरळ शैलीतील कथांतून राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य, ध्येयनिष्ठ आणि धर्मनिरपेक्षता व्यक्त झालेली आहे. अनंत वासुदेव मराठे हे व्यासंगी लेखक आणि ‘किरात’ साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथाचे संपादन केले होते. प्रख्यात ललित लेखक रविंद्र पिंगे यांक २०० ललित लेख, ३०० व्यक्तिचित्रे आणि कथाकादंबऱ्या लिहिल्या वि.स.सुखटणकर यांच्या साहित्याची प्रेरणा मानवी स्वभाव आणि जीवनातील नाट्य ही होती. सिंधुदुर्ग साहित्य संघाचे सक्रिय कार्यकर्ते हरिहर आठलेकर हे वाड्‍मयीन कार्यकर्ता, आणि ललित लेखक म्हणून परिचित होते. शरद काळे यांचे ललित लेख, कथा व कविता सत्यकथा ‘आरती’ मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या. या काळात ज्या स्त्री लेखिका पुरुषांच्या बरोबरीने साहित्याच्या क्षेत्रांत सक्रिय होत्या, त्यातील ‘विभावरी शिरुरकर’ या टोपण नावाने लिहिणाऱ्या मालतीबाई बेडेकर पूर्वाश्रमीच्या कोकणातील होत्या. त्यांच्या ‘कळ्यांचे निःश्वास’ कथासंग्रहात स्त्रियांचा भावनिक व्यथांचे दर्शन घडते.

कोकणात अनेक नाटककार झाले. गडकऱ्यांच्या प्रभावाने ल. मो. बांदेकर यांनी ‘आर्य चाणक्य’, ‘सेकंड लिअर’ अशी नाटके लिहिली. मामा वरेरकर यांनी ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘करीन ती पूर्व’ इत्यादी ३७ नाटके लिहिली आणि त्यातून सामान्यांचे प्रश्न मांडले. मो. ग. रांगणेकर यांच्या ‘कुलवधु’ नाटकाला फार लोकप्रियता मिळाली. त्ति त्र्यं. खानोलकर यांच्या ‘एक शून्य बाजीराव, ‘अजब वर्तुळाचा’ या दर्जेदार नाटकांनी रंगभूमी गाजविली. कोकणच्या ग्रामीण भागात आजही संगीत नाटकांची परंपरा कायम आहे. विशेष म्हणजे कोकणातल्या  लेखकांनी जी संगीत नाटके लिहिली आहेत, तीच नाटके, ग्रामीण रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्न हे कलाकार करत असतात. श्याम फडके यांनी एकांकिका, मुलांसाठी विनोदी नाटके आणि रसिकांसाठी नाट्यलेखन केले. श्री. ना. पेंडसे यांची महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’, ‘चक्रव्यूह’ ही नाटके लोकप्रिय झाली. ऐंशीच्या दशकात हौशी आणि व्यावसायिक नाटककार प्र. ल. मयेकर यांची रूपकात्मक नाटके नाट्यस्पर्धांमध्ये गाजली. लोकप्रिय नाटककार ला. कृ. आयरे यांनी आपली नाटके कामगार रंगभूमीवर सादर केली. आत्माराम सावंत यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी लेखन केले. याच काळात रमेश पवार, वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, तुलसी बेहरे, गंगाराम गवाणकर, मधुसूदन कालेलकर इत्यादींची नाटके प्रसिद्ध होती. प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या ‘लोककथा ७८’ आणि ‘आरण्यक’ या समांतर नाटकांना मानाचे स्थान मिळाले.मराठी नाटकाच्या इतिहासात कोकणातील हिराबाई पेडणेकर या पहिल्या मराठी स्त्री नाटककार होत्या. आत्माराम सावंत यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी लेखन केले. याच काळात रमेश पवार, वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, तुलसी बेहरे, गंगाराम गवाणकर, मधुसूदन कालेलकर इत्यादींची नाटके प्रसिद्ध होती.

 जे. डी. पराडकर 

(jdparadkar@gmail.com)

मराठी भाषेच्या समृद्धी आणि वृद्धित वर्धा जिल्ह्याचे योगदान

देशाच्या राजधानीत दिल्ली येथे २१ ते फेब्रुवारी दरम्यान ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचवेळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या राजधानीत वर्ध्यात दोन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. येवढ्यावरच हा प्रवास थांबला नाही तर मराठीची समृद्धी करण्यास वर्ध्याने मोठे योगदान दिले आहे. पुस्तकी साहित्य आणि जीवनाच्या यशस्वी समृद्ध वाटचालीचे मराठीतील साहित्य जिल्ह्यातील साहित्यिकांनी दिले आहे. यात योगदान देणाऱ्यांची श्रेय नामावली मोठी आहे. पण मराठी भाषेचा विविधांगी अभ्यास करणारे ध्यासवंत जिल्ह्यात होऊन गेले.

मराठी भाषेला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला, हा उपचार झाला पण जिल्ह्यातील साहित्यिकांनी मराठी भाषेतील साहित्य लिहून जनजीवनावर उपकार केले आहे. गांधीजींनी याच भूमीत मराठीत साहित्य लिहिले. काही हिंदी भजनाचे मराठी भाषेत भाषांतर केले. आचार्य  विनोबा भावे यांनी गिताई लिहिली. देविदास सोटे यांनी याच भूमीत मराठीतल्या वऱ्हाडी साहित्याला वेगळे अंग दिले. प्रा.डॉ.सानप यांनी याच भूमीत समग्र तुकाराम लिहून संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या विविध सामाजिक योगदानासह जीवनातील समाजहितैशी पैलूंचा परिचय करून दिला. देविदास सोटे यांनी पहिला वऱ्हाडी भाषेचा शब्दकोष वर्ध्यातच लिहिला आणि मराठी साहित्याच्या वर्धिष्णू वाटचालीत योगदान दिले. सेलू तालुक्यातील महाबळा गावचे वसंतराव वऱ्हाडपांडे नागपुरीबोलीचा पहिला शब्दकोष याच भूमित लिहिला. सरोज देशमुख लिहिते व्हा, म्हणतच स्वत: मराठीत लिहितच असतात. मराठी कवी संजय इंगळे तिगावकर यांचेही मराठीच्या विविध पदरांना सोनेरी काठ लावायला हात मागे नाहित. हिंगणघाटचे कवी बुरबुरे, सुनिता कावळे, यांचा मराठीच्या विकास योगदानातला वाटा विसरता येणारच नाही. त्यांच्या वतीने भाषेच्या समृद्धी आणि वृद्धीला योगदान मिळतच असते.

१९६९ आणि २०२३ मध्ये अखिल भारतीय महाठी साहित्य संमेलने याच गांधीभूमीत झाली. वर्धेकरांचे त्यांनी दिलेल्या मराठी भाषेच्या विकासाकरीता  योगदानाबद्दल नि:शब्द असणे आणि व्यक्त होणे आगळेच. भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी म्हणतात, येत्या ३० वर्षात देशातील सुमारे ४०० भाषा नामशेष होतील. पण अमृताते पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे अमरत्त्व कायमच राहणार.

 

प्रकाश कथले

पत्रकार, वर्धा

मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए या संस्था मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनमध्ये शासनाला सर्वोतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. दरवर्षी साधारण एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या संस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थाच्या माध्यमातून राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी नक्कीच मोलाचे सहकार्य होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून २०१७ पासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन शासनाने हाती घेतलेल्या या मिशनला २०१८ मध्ये नव्याने सुरवात करण्यात आली आहे. येत्या २०२७ पर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टिने सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, शालेय शिक्षण या विविध विभागांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या मिशनची राज्यातील यशस्विता पाहून राष्ट्रीय अंध निवारण कार्यक्रम व धर्मादाय रूग्णालयांचे सहकार्य लाभत आहे. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येत आहेत. हे मिशन यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालये मिळून साधारण ३५० ऑपरेशन थिएटर येथे दररोज किमान दहा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. या उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगाने हे मिशन सुरू झाल्यापासून २०१७ ते २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत साधारण साडेसतरा लाख व २०२२-२३ यावर्षात साधारण नऊ लाख मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे मार्च, २०२४ अखेर पर्यंत नऊ लाख ४५ हजार ७३३ मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून संबंधित रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर मोफत चष्मे देखील देण्यात आले आहेत. या मिशनमुळे राज्यातील मोतीबिंदू रूग्णांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होत असल्याचे समाधान ही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

शासनाचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन हे ध्येय २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी विदर्भातील मास्टेक आणि शंकरा फाऊंडेशन यांनी दरवर्षाला महाराष्ट्रामध्ये मोफत एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि त्यासोबतच इतर आर्थिक मदत ही देण्याचे मान्य केले आहे. यांच्यासोबत दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा, लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. महात्मे आय हॉस्पीटल, नागपूर, एआयआयएमएस, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, आयजीएमसी, नागपूर, सुरज आय इन्सस्टीट्युट आणि डॉ. नानगिया आय हॉस्पीटल, नागपूर यासारख्या इतरही वैद्यकीय क्षेत्रातील संस्था मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रदान करण्यासाठी सहभागी असतील. या संस्था ग्रामीण भागामध्ये शिबीर घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णाचं निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवणे आणि त्यांच्यावर मोफत उपचार करतील. तसेच या मार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील, या विश्वासाने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन म्हणून कायम या संस्थांना सहकार्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

अर्चनादेशमुख/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...