सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 304

लातूर जिल्ह्यातील साहित्य : भाषाशैली आणि बोलीभाषा

दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. अशा या विशेष संमेलनानिमित्त लातूर जिल्ह्यातील बोलीभाषेचे वेगळेपण मांडणारा हा लेख…_
भाषा ही एक सामाजिक संस्था असून तो मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भाषेच्या अस्तित्वाशिवाय दैनंदिन, भावनिक, वैचारिक आणि व्यावहारिक देवाण घेवाण अशक्य आहे. म्हणूनच लेखक ज्या परिसरात जन्मतो, तेथील भाषा शिकतो, त्या परिसरातील बोलीभाषेमधील शब्दांचा, भाषेचा उपयोग करून आपल्या सुख-दुःखात्मक अनुभवांची मांडणी आपल्या साहित्यातून करत असतो. मराठवाड्यातील लातूरच्या परिसरातील, मराठी ग्रामीण साहित्यातून अभिव्यक्त झालेल्या भाषाशैली मधून हे दिसून येते. ग्रामीण साहित्याशी नाळ बांधून लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी ग्रामीण परिसर जिवंत करण्यासाठी तेथील वास्तवाबरोबरच ग्रामीण बोलीभाषेचा वापर केला आहे. ग्रामीण कथा, कादंबरी, कविता आदि साहित्यप्रकारातून लातूरच्या बोलीभाषेचा पदोपदी प्रत्यय येतो, हे लातूरच्या मराठी ग्रामीण साहित्यातील भाषाशैलीचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
लातूरची भूमी कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नेत्रदीपक अशी आहे. या मातीचा सुंगध घेऊन आलेली शब्दकळा ग्रामीण साहित्यातून बोलीरूपाने आजही दरवळत आहे. रा.रं. बोराडे, शेषराव मोहिते, जनार्दन वाघमारे, योगीराज माने, भास्कर बडे, फ. म. शहाजिंदे, सुरेंद्र पाटील, बी. एम. देशमुख, श्रीराम गुंदेकर, प्र.ई. सोनकांबळे, ललिता गादगे, विलास सिंदगीकर, अंबादास केदार आदी लातूरच्या ग्रामीण दलित साहित्यिकांच्या साहित्यातून ग्रामीण भाषेतील शब्दकळा, म्हणी, वाकप्रचार, प्रतिमा, प्रतीके, उपमा, अलंकार, आदिंचा वापर केलेला असल्यामुळे भाषेला एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यात बोलीभाषेचा जिवंतपणा आला आहे. म्हणूनच लातूरच्या अस्सल ग्रामीण बोलीभाषेतील मराठी ग्रामीण साहित्य हे लातूरचे खरे भूषण आहे.
मराठवाडी बोली वेगळी आहे असे म्हणण्या इतपत या बोलीत वेगळेपणा आहे. निजामी सत्तेतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक दृष्टीने संपन्न आहे. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र्य जाणिवेची भाषा बोलली जाते. लातूर जिल्ह्यातील भाषेवर उर्दू, कन्नड, तेलगू, इंग्रजी व शेजारच्या जिल्ह्यातील भाषांचा प्रभाव दिसतो. लातूरच्या बोलीभाषेचा विचार लातूर जिल्ह्यातील ग्रामीण-दलित लेखकांच्या साहित्याधारे अभ्यास करावा लागतो. आधुनिक युगातही हा वेगळा प्रभाव या भाषेवर दिसतो.
लातूर कर्नाटकी सीमेवर असल्यामुळे कर्नाटकी ‘हेल’ काढून ही बोली बोलली जाते. शब्द, वाक्यरचना, म्हणी, वाक्यप्रचार या सगळ्यावरच कन्नड प्रभाव आहे. लातूर जिल्ह्यातील माणूस बोलताना उंच पट्टीत ‘का करुलालाव की आन् का नाय की’ असे भेटल्याभेटल्या बोलायला सुरुवात करतो. याशिवाय ‘गिरा लावणे’ म्हणजे ‘ग्रहण लावणे’ एखाद्याचे कुणामुळे तरी नुकसान झाले असेल किंवा काही संकटे येत असतील तर ‘गिरा लावला’ असा शब्दप्रयोग आजही केला जातो. ‘नकर’ म्हणजे ‘थोडसे’, ‘उगं नकर लागल्यालं हाय’ तसेच ‘कुठे आहेत’ असे म्हणायचे असेल तर ‘कुठ हाव’ असा शब्दप्रयोग केला जातो. तसेच मटमन (मटकन), आपरुग (आपरुक), मुरगाळून (पाय दुमडून), दलिद्री (दरिद्री), टुचभर (थोडसं), जवारी (ज्वारी), आगरी (शेकोटी) असे वेगवेगळे शब्दप्रयोग ग्रामीण भागात बोलले जातात.
लातूर जिल्ह्यातील स्त्रियांच्या तोंडी माय, कडू, हाट्या असे अनेक शब्द वापरले जातात. निजामी राजवटीचा प्रभाव मराठवाडा-लातूरवर असल्यामुळे निजामी राजवटीतील वक्त, कैफियत, जुमला, हमिशा, इमाम, मोगलाई, फितवून, फारारे, मुनिम, दम, कोशिश असे कितीतरी शब्द लातूरच्या मराठी बोलीभाषेत वापरले जात आहेत. थोडक्यात, लातूरच्या भाषेवर निजामी राजवटीचा प्रभाव असल्यामुळे ती वेगवेगळ्या ढंगाने बोलली जाते हे लातूरच्या मराठी भाषाशैलीचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच अशा भाषाशैलीचा प्रभाव लातूरच्या मराठी ग्रामीण साहित्यातून आजही ठळकपणे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील साहित्यिकांनी लातूरच्या अस्सल मराठमोळी मराठवाडी भाषाशैलीमधून ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन आपापल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक आदि साहित्यप्रकारातून घडविले आहे. आजही ग्रामीण जीवनातील रुढी, प्रथा, परंपरा, कृषिसंस्कृती, निसर्ग, नातेसंबंध, शेतकरी, शेतमजूरांच्या जीवनाचा दस्ताऐवज ग्रामीण भाषाशैलीमधून मांडला जात आहे.
मराठी ग्रामीण साहित्यातील आघाडीचे कथा कादंबरीकार प्राचार्य रा.रं. बोराडे लातूर जवळील काटगावचे होते. त्यांनी लातूरची पहिल्यांदा अस्सल ग्रामीण शब्दकळा आपल्या साहित्यातून मांडून या बोलीचा परिचय मराठी साहित्याला करून दिला. ‘पेरणी’, ‘ताळमेळ’, ‘वरात’, ‘नातीगोती’, ‘बोळवण’, ‘वाळवण’, ‘फजितवाडा’, ‘माळरान’, ‘राखण’, ‘गोंधळ’, ‘खोळंबा’ आदी कथासंग्रह तर ‘पाचोळा’, ‘सावट’, ‘चारापाणी’, ‘आमदार सौभाग्यवती’, ‘इथं होत एक गावं’, ‘रहाटपाळणा’, ‘राजसा’ कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्यातून लातूर, धाराशिव (तत्कालीन उस्मानाबाद) परिसरातील ग्रामीण बोलीभाषेचा सुयोग्य वापर केलेला आहे. रा.रं. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीतील बोलीभाषेसंदर्भात डॉ. विठ्ठल जंबाले असे म्हणतात की, ” ‘पाचोळा’ ही बोराडे यांची बहुचर्चित कादंबरी. निवेदन आणि संभाषणाकरिता बोलीभाषेचा वापर असल्यामुळे ही कृतीचे वेगळेपण दर्शविते. पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत या कादंबरीत बोलीभाषेचा (ग्रामीण भाषेचा) सर्जनशील वापर केल्यामुळे ही कादंबरी नजरेत भरते. कादंबरी कथनाचे सामर्थ्य बोलीभाषेत आहे. विशेषतः मराठवाड्यातील लातूर परिसरातील बोली या कादंबरीत योजिली आहे.” म्हणजे, ‘पाचोळा’ या कादंबरीतून लातूर परिसरातील बोलीभाषेचा यथोचित वापर केला आहे.
शेषराव मोहिते यांनी ‘असं जगणं तोलाचं’ व ‘धूळपेरणी’ या कादंबऱ्यामधून ग्रामीण भाषा शैलीतून शेतकरी जीवनाचे चित्रण केले आहे. शेषराव मोहिते यांच्या कांदबऱ्या संदर्भात डॉ. गणेश देशमुख असे म्हणतात की, “लग्न, त्यासाठी कर्ज, शेतीवर ते फेडण्याची इच्छा व उत्पन्न येऊनही ‘भाव’ न मिळाल्याने शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करणारा या कादंबरीतील ‘हाणमू’ आजच्या शेतकऱ्याचे प्रतिनिधिक रूप आहे. केवळ समस्या मांडून चालणार नाही तर त्यावर प्रभावी उपाययोजना सूचविण्याची चिंतनशील वृत्ती जोपासणारे मोहिते शेतकरी जीवनाशी कमालीची निष्ठा बाळगून आहेत. तर ‘धूळपेरणी’ शेती व गावापासून तुटू पाहणाऱ्या ‘श्रीराम’ ची शेतकऱ्यांच्या नव्या पिढीची कहाणी येते.” अर्थात् शेषराव मोहिते यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शोकात्म जीवन, त्यांच्या समस्या याचे वास्तव चित्रण लातूर परिसरातील ग्रामीण बोलीभाषेतील शब्द, म्हणी, वाक्यप्रचार आणि ग्रामीण जीवनातील निसर्गविषयक प्रतिमा, प्रतीके यांचा वापर करून केला आहे. त्यामुळे त्यांच्या कादंबरीलेखनात जिवंतपणा आलेला आहे.
जनार्दन वाघमारे यांनी ‘बखर एका खेड्याची’ या कादंबरीतून १९९३ साली झालेल्या भूकपामुळे किल्लारी परिसरातील विशेषतः ‘कौठा’ गावात झालेल्या जिवित व वित्तहानीचे चित्रण ग्रामीण भाषाशैलीत केले आहे. याशिवाय ‘मूठभर माती’ या आत्मकथनातून या परिसरातील त्यांचे अनुभव सांगितले आहेत.भास्कर बडे यांनी ‘चिकाळा’ या कथासंग्रहातून ग्रामीण समाजजीवनाचे दर्शन ग्रामीण भाषाशैलीतून घडविले आहे. ग्रामीण व प्रमाण भाषेतून स्वतःचा जीवनपट उलगडला आहे. त्यांच्या भाषेवर लातूर व बीड जिल्ह्यातील बोलीभाषेचा प्रभाव आहे. फ. म. शहाजिंदे यांनी ‘निधर्मी’, ‘शेतकरी’, ‘ग्वाही’ आदि काव्यसंग्रहातून ग्रामीण भाषाशैलीत सामाजिक व्यथा, वेदनांनी भरलेले समाजवास्तव चित्रित केले आहे. याशिवाय ‘मीतू’ ही प्रेमपत्रात्मक कादंबरीही लक्षणीय आहे. सुरेंद्र पाटील यांनी ‘चिखलवाटा’ आणि ‘झुलीच्या खाली’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. मधून ग्रामीण शेतकऱ्याच्या समस्या, कृषिसंस्कृती यांचे ग्रामीण भाषाशैलीतून दर्शन घडविले सुरेंद्र पाटील यांच्या साहित्य लेखनातून लातूर जि जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील कर्नाटकातील कानडी भाषेचा पडलेला प्रभाव याचे यथार्थ दर्शन घडविले आहे.
डॉ. श्रीराम गुंदेकर यांचे ‘उचल’ व ‘लगाम’ हे दोन कथासंग्रह प्रकाशित आहेत. सत्यशोधली संशोधन व म. फुले यांच्या विचाराला आयुष्यभर त्यांनी वाहुन घेतले आहे. त्यांनी कथावाङमयातून अत्यंत प्रभावीपणाने लातूरच्या बोली भाषेचा वापर केला. श्रीराम गुंदेकर यांच्या भाषाशैलो संदर्भात डॉ. वासुदेव मुलाटे असे म्हणतात की, “श्रीराम गुंदेकरांना प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाचा अनुभव आहे. किंबहुना त्या व्यथापूर्ण ग्रामीण वास्तवाशी त्यांची नाळ अजूनही तुटलेली नाही. याचा प्रत्यय देणारी अनेक स्थळे त्यांच्या कथांमधून सापडतात. बहुतेक कथा कधी संपूर्ण बोलीभाषेतून तर कधी बोलीशी जुळेल अशा प्रमाणात शेती शब्दांची, वाक्यांची सरमिसळ करून लिहिल्यामुळे प्रत्ययकारितेत भरच पडली आहे.” म्हणजेच श्रीराम गुंदेकर यांच्या कथालेखनात कधी ग्रामीण बोलीभाषा तर कधी बोलीशी जुळेल अशी प्रमाणभाषा त्यांनी वापरलेली आहे.
मराठवाड्यातील – लातूर परिसरातील साहित्यिकांच्या भाषेवर उर्दू, कानडी, इंग्रजी, हिंदी अशा देशी – विदेशी भाषेचा प्रभाव आहे. कारण या विविध भाषेतील शब्दांचा वापर कळत-नकळतपणे लेखक कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक आदि साहित्यप्रकारातून करत आहेत. म्हणूनच डॉ. प्रल्हाद लुलेकर असे म्हणतात की, “मराठवाड्यातील भाषेवर १९४८ पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या उर्दू भाषेचा, शेजारच्या कन्नड आणि तेलगू भाषेचा, खानदेशातील अहिराणीचा, काही प्रमाणात वऱ्हाडीचा परिणाम झाल्याने त्याचे परिणामही भाषेला लाभले आहे. सहचर्याचा हा परिणाम अपरिहार्य असतोच याचाच अर्थ असा की, लातूर परिसरातील साहित्य हे विविध भाषेतील शब्दांचा कमी अधिक प्रमाणात वापर करून निर्माण झालेले आहे, होत आहे. हे लातूरच्या भाषाशैलीचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
लातूर परिसरातील लोकांच्या आणि साहित्यिकांच्या भाषा शैलीवर सीमाभागातील कानडी, भाषेचा प्रभाव प्रभावीपणे आजही जानवतो आहे. लातूर जिल्ह्याची बोली कन्नड ढबीने बोलली जाते. यामध्ये कोणतेही वाक्य बोलताला उच्चार सुलभ करून बोलण्याची प्रवृती दिसते, तसेच कर्नाटकी शैलीपेमाणे हेल काढून बोलण्याची सवय दिसते. बोलत असताना बऱ्याच वेळा क्रियापद अगोदर बोलले जाते व नंतर बाकीचे वाक्य बोलले जाते. उदा जाताव का ये गावाला ? (गावाला जाता का?) तसेच बोलताना बऱ्याच वेळा वाक्याच्या मध्ये शेवटी हेल काढून ‘ये’ चा उच्चार केला जातो. लातूर जिल्ह्याच्या बोलीत बरेच नवीन शब्द दिसतात ते महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या इतर भागात हे शब्द वापरले जात नाहीत. उदा. ‘नकर’ हा शब्द ‘थोड’ साठी वापरला जातो. उदगीर परिसरात हा शब्द सर्रास वापरला जातो. औसा तालुक्यात ‘बोगाणं’ हा शब्द ‘भगुणं’, पातेलं यासाठी वापरला जातो. तसेच याच पारिसरात ‘आयनास’ हा शब्द ‘अनायसे’ साठी वापरला जातो. आणखी खूप वेगळे शब्द लातूर जिल्हा परिसरात बोलले जातात. स्त्रिया, पुरुष, लहान मुले यांच्या बोलीत फरक असलेला दिसतो.
 – प्राचार्य डॉ. आशा मुंडे
श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला महाविद्यालय, लातूर
(लातूर : वसा आणि वारसा ग्रंथातून साभार)

माय मराठीचा समृद्ध वारसा !

मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यासोबत सत्तर वर्षानंतर दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने आपल्या माय मराठीचा समृद्ध वारसा अधोरेखित करणारा हा विशेष लेख…

“मराठिया बोले अवघे संत।

येरि अवांतर भाष्य न लागे।”

– संत नामदेव

संत नामदेवांनी आपल्या लेखनातून मराठी भाषेची महत्ती सांगितली आहे. मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक असून तिचा इतिहास समृद्ध, साहित्यिक वारसा आणि तिला सांस्कृतिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी केली जात होती. अभिजात भाषेसाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये त्या भाषेचा प्राचीन इतिहास, स्वतंत्र परंपरा, समृद्ध साहित्य आणि समाजावर झालेला परिणाम हे महत्त्वाचे घटक असतात. संस्कृत, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना आधीच अभिजात दर्जा मिळाला होता. मराठी भाषाही सुमारे दोन हजारवर्षांहून जुनी असून संत साहित्य, लोककथा, काव्य, नाटक आणि आधुनिक साहित्य यामुळे तिचा वारसा अधिक उजळलेला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांसारख्या संतकवींनी मराठी भाषेत अमूल्य योगदान दिले आहे. मराठेशाहीच्या काळात ही भाषा प्रशासन आणि लष्करी व्यवहारात वापरण्यात आली. अशा या समृद्ध भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषा ही भारतातील एक समृद्ध आणि ऐतिहासिक भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असलेली मराठी कोट्यवधी लोकांची मातृभाषा असून ती आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे. ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. इ.स. ९ व्या शतकाच्या सुमारास अपभ्रंश रूपातून मराठीचा विकास झाला. मराठी भाषा संत साहित्यातून अधिक लोकप्रिय झाली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून, संत तुकारामांनी अभंगातून, तर संत रामदासांनी आपल्या काव्यरचनांमधून मराठी भाषेला एक वेगळी उंची दिली.

“मराठीचिया नगरी, ब्रम्ह वेचातो विकीरी।”

– संत ज्ञानेश्वर

छत्रपती शिवाजी महाराजांनीही मराठीचा गौरव वाढवला. त्यांनी राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा उपयोग केला आणि राजपत्रांसाठी मराठी भाषा प्रचलनात आणली. त्यामुळे मराठी ही केवळ बोलीभाषा न राहता राजभाषा बनली. मराठी भाषेत प्राचीन काळापासून अनेक थोर साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांसारख्या संतांनी भक्तिरसपूर्ण साहित्य निर्माण केले. नंतर कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर, पु.ल. देशपांडे, शिवाजी सावंत यांसारख्या साहित्यिकांनी आधुनिक मराठी साहित्य समृद्ध केले.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मराठीच्या वेगवेगळ्या बोली आढळतात. जसे- कोकणात मालवणी, विदर्भात वऱ्हाडी, उत्तर महाराष्ट्रात अहिराणी, पश्चिम महाराष्ट्रात देशस्थ मराठी, खानदेशात खंडेशी अशी काही प्रमुख उदाहरणे असली, तरी बारा मैलावर भाषा बदलते, असे म्हटले जाते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील बोलीमध्ये काही प्रमाणात वैविध्यता दिसून येते.  मराठी नाटक, चित्रपट, लोककला यांमध्ये भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. तमाशा, भारुड, गोंधळ, लावणी यांसारख्या लोककला मराठीतूनच विकसित झाल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात मराठीतून अनेक विज्ञानविषयक पुस्तके लिहिली जात आहेत. तसेच इंटरनेट, सोशल मीडिया, ब्लॉग्स यामुळे मराठीचा प्रसार वेगाने होत आहे.

अभिजात दर्जा

केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आता तिच्या संवर्धनासाठी विशेष निधी मिळेल, संशोधनाला चालना मिळेल आणि जागतिक स्तरावर तिची ओळख अधिक दृढ होईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करायला हवा. अभिजात दर्जा ही केवळ मान्यता नसून मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

आजच्या डिजिटल युगातही मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही भाषा सतत विकसित होत आहे. मोबाईल अॅप्स, वेबसाईट्स, शिक्षणपद्धतीत मराठीचा समावेश वाढला आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय स्तरावर मराठी भाषेला महत्त्व देणे आवश्यक आहे. मराठी माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करता येते. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने पुढाकार घ्यायला हवा. मराठी साहित्य वाचावे, मराठीतून लेखन करावे, मराठीत संवाद साधावा आणि मुलांना मराठी शिकवावी. आपण  मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. तिच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगून आपण मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

जय मराठी! जय महाराष्ट्र! जय भारत !

– संगीता पवार

महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका,

जि.प.प्रा.शा.साई, ता. जि. लातूर

लाभले  आम्हांस  भाग्य बोलतो मराठी. ….

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा वि. वा.शिरवाडकर यांनी मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीने  विशेष स्थान प्राप्त केले. त्यांचा जन्मदिन हा संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा दिन जवळ येऊ लागतातच महाराष्ट्रात मराठीचा गर्जा जयजयकार सुरू होतो. दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डॉ. संजयकुमार सरगडे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांनी
लेखन प्रपंच.
१९८७ साली मराठी भाषेतील दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन वि.वा. शिरवाडकर यांना गौरवण्यात आले. काव्य, नाटक, कादंबरी या साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांतात मुशाफिरी करणारे कवी कुसुमाग्रज यांनी वाड्मयीन क्षेत्रात मोलाची भर घातली. त्यांचे साहित्य चिरंतन, शाश्वत स्वरूपाचे असून ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणिवा जपणारे महत्त्वाचे साहित्यिक आहेत.
 जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांची संख्या प्रचंड आहे. भारत हा बहुभाषिक देश असून  भारतीय भाषांमध्ये लोकसंख्येच्या आधारावर बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून मराठी भाषा ओळखली जाते.
 भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेली मराठी ही भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा असून ती महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा या राज्याची सहअधिकृत भाषा आहे. भारतात नऊ कोटीपेक्षा जास्त लोक मराठी भाषा बोलतात. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असल्याने मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला वेगळे महत्त्व आहे.
 महाराष्ट्र, गोवा या राज्यामध्ये मराठी भाषेचा वापर प्रामुख्याने होतो. या दोन राज्याव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक पातळीवरील विचार करीत असताना भारताप्रमाणे इस्त्रालय, मॉरिशियस या देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. शिवाय जगातील अनेक देशात मराठी भाषिकांची वस्ती असलेली पहावयास मिळते. त्यातून मराठी भाषेचे आदान प्रदान होताना दिसते. मराठी भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी विविध देशातील संशोधक महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले पहावयास मिळतात. महाराष्ट्राचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने अनेक परदेशी नागरिक आषाढी वारीत सहभागी होऊन महाराष्ट्रीय संस्कृतीबरोबर मराठी भाषेचाही अभ्यास करतात. मराठी भाषेच्या जवळजवळ ५२ बोलीभाषा महाराष्ट्रातील विविध भागात बोलल्या जातात. बोलीभाषांमुळे मराठी भाषा ही अधिकाधिक परिपूर्ण झालेली असली तरी प्रशासन, शिक्षणाचे माध्यम, समाजातील लेखी व्यवहार यासाठी सहसा बोली भाषेचा वापर केला जात नाही. कोणतीही भाषा एकाएकी जन्मास येत नाही. तिच्या जन्माची प्रक्रिया प्रदीर्घकाळ सुरूच असते. आज असलेली आपली मराठी भाषाही  त्याला अपवाद नाही.
  जगातील कोणत्याही भाषेची सुरुवात नेमकी कधी, केव्हा, कुठे झाली हे सांगणे कठीण. मात्र मराठी भाषेला प्राचीन परंपरा असून ती आठव्या शतकापासून प्रचलित असल्याचे दिसते. राज्यकारभाराची भाषा म्हणून मराठीचा वापर यादव काळापासून होत होता. यादवकाळातील मराठीतील शिलालेख आणि ताम्रपट हे याची साक्ष देतात. दुर्मिळ स्वरूपात सापडलेले शिलालेख, ग्रंथ यावरील संशोधनावरून मराठी भाषा ही प्राचीन असल्याची साक्ष पटते.
 मराठी भाषा महाराष्ट्रातील विविध संतांच्या अभंग, कीर्तन, भारुड, भजनातून सहज सुलभपणे आविष्कृत होताना ती समृद्ध होत गेली. मराठी भाषेतील आद्य चरित्र ग्रंथ म्हणून   लीळाचरित्राचा उल्लेख केला जातो. संत ज्ञानदेवांनी मराठी भाषेची अस्मिता, तिची ध्वजा फडकवली. त्यांचा  साहित्याचा लेणे असणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ गेली अनेक शतके सर्वोच्च असून जागतिक दर्जाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
   परि अमृताचे पैजा जिंके !
   ऐसे अक्षरेचि रसिके   मेळविण !!
अशा  सार्थ शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले . नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी! असे म्हणणाऱ्या संत नामदेवांनी मराठी भाषेची पताका अभंगाच्या माध्यमातून उत्तर भारतापर्यंत पोहचवली. शीख धर्मीयांचा गुरू ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात त्यांच्या रचनांचा समावेश आढळतो. संत तुकाराम यांनी मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेहून ठेवले. त्यांचे अभंग सातासमुद्रापलीकडे गेले. संत तुकारामांचा अभंग माहित नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडत नाही. त्यांचे अभंग आजही लोकांच्या जिभेवर नाचताना दिसतात. गाडगेबाबांनी  संत तुकारामांच्या अभंगांचा आपल्या कीर्तनात यथोचित वापर करून समाजमन जागृत करून मानवता धर्माची शिकवण दिली. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक, दासबोध या ग्रंथातून मराठी भाषा भक्तीरसात रमली. संत एकनाथांनी भारुडाच्या माध्यमातून मराठी भाषेचे सौंदर्य रूप न्याहाळले. त्यांनी भागवत ग्रंथाची रचना करून मराठी भाषेत भर घातली. याशिवाय अनेक संतांच्या अभंग, रचनांनी मराठी भाषा समृद्ध झालेली दिसते.
संत, पंत, तंत मंडळींनी माय मराठी भाषेच्या समृद्धीचा आलेख व्यापक आणि विस्तृत स्वरूपात आकारास आणला. १९ व्या शतकात धर्म, राजकारण, समाजकारण, संस्कृती, साहित्य अशा क्षेत्रात समाजसुधारक तसेच साहित्यिक यांनी आपले योगदान दिले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, लोकहितवादी, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा अनेकांनी ग्रंथलेखन व त्यातून मराठीची सेवा केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर तर स्वतःला ‘ मराठी भाषेचा शिवाजी आहे’ असे अभिमानाने म्हणत.
      १९६० नंतर ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य अशा अनेक साहित्य प्रवाहांचा उदय झाला. या साहित्य प्रवाहांमुळे मराठी भाषा तळागाळातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली. मराठी साहित्याच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने दलित साहित्याचा सशक्त प्रवाह जन्माला आला. फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेशी एकरूप असणारे अनेक लोक लिहू लागले, वाचू लागले. कथा, काव्य ,कादंबरी, नाटक , चरित्र, आत्मचरित्र अशा विविध अंगी साहित्य प्रकाराने मराठी भाषा सर्वश्रेष्ठ ठरली आहे. समाजातील  दलित, उपेक्षित, शोषित , वंचित , कष्टकरी, मजूर, कामगार, सर्वसामान्यांचे जीवन लेखणीत शब्दबद्ध करून अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात क्रांती केली.
 ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झाला. भाषा प्राचीन असावी त्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे हे निकष पूर्ण करणारी मराठी भाषा अभिजात भाषा ठरली ही गोष्ट मराठी भाषिकांसाठी अभिमानाची आहे. यावरूनच मराठी भाषेची महती लक्षात येते.
 मराठी भाषेच्या उगमापासून ते आजच्या आणि सध्याच्या मराठी भाषेच्या स्वरूपात अनेक बदल हे कालपरत्वे झाले. कोणतीही भाषा एकजिनसी असत नाही. परकीय आक्रमणे, राज्यक्रांती, दुष्काळ, भूकंप, महापूर , युद्धे , रोगराई, वैचारिक व धर्मक्रांती अशा अनेक कारणांनी समाजमन ढवळून निघत असते. त्याचा परिणाम मराठी भाषेवर होताना मराठी भाषाही हळूहळू बदलत गेली. असे असले तरी विविध ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार, शासन स्तरावरील पुरस्कार, विविध संस्था यांचे पुरस्कार, भाषा संचालनालय,महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संमेलने अशा विविध  ज्ञात अज्ञात संस्था या मराठी भाषेचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावा तसेच मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी यासाठी  मराठी भाषा संवर्धनासाठी राबविलेले विविध उपक्रम मराठी भाषेच्या समृद्धीच्या दिशेने टाकलेली मोठी पाऊले आहेत.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि माध्यमांच्या जगात मराठी भाषा आपले अस्तित्व  राखून आहे. आज मराठी भाषेवर इतर भाषांची किती आक्रमणे झाली तरीही मराठी भाषेवर त्याचा फारसा परिणाम न होता उलट तिची वाटचाल समृद्ध दिशेने सुरू आहे….
  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
हा कविवर्य सुरेश भट यांनी मराठी मनात जागवलेला अभिमान चिरंतन राहील.
डॉ. संजयकुमार सरगडे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

समाजनिर्मितीची रूपरेषा…

आपल्या उक्ती आणि कृतीतून समाजाला प्रबोधनाच्या मार्गावर नेणाऱ्या संत गाडगेबाबा यांची २३ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. समाजाला दशसूत्री देऊन त्यातून एक सशक्त समाजनिर्मितसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. राज्‍य शासनाने गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा अंगीकार केला असून त्यामाध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत विकास नेला जात आहे.

विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत एक परिणामकारक कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे संत गाडगेबाबा होत. संत गाडगेबाबांची खरी ओळख ही चिंध्या पांघरणारा, हाती खराटा घेऊन स्वच्छतेचे व्रत सांभाळणारा नि आपल्या कीर्तनातून सर्वसामान्यांना अंधश्रध्दा, कर्मकांड यांपासून मुक्त करू पाहणारा एक लोकोत्तर पुरूष ! सामाजिक परिवर्तनासाठी ‘स्वच्छता’ आणि ‘कीर्तन’ या दोन प्रबोधन उपक्रमांचा उपयोग त्यांनी केला. गाडगेबाबांचे तसे औपचारीक शिक्षण झाले नव्हते. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यास कारणीभूत होती, असे असले तरी गाडगेबाबांनी विविध पध्दतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांसाठी आपल्या जीवनकार्यातून एक तत्वज्ञान देऊ केले.

युगनिर्माता संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. झिंगराजी जानोरकर हे त्यांच्या वडिलांचे नांव! तर सखुबाई ही त्यांची आई. गाडगेबाबांचे लहानपणचे नांव डेबू! त्यांच्या व्यसनाधीन-अंधश्रध्दाळू वडिलांचा १८८४ मध्ये मृत्यू झाला. त्यावेळी गाडगेबाबांचे वय अवघे सात वर्षांचे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर गाडगेबाबांचे मामा चंद्रभान यांचे घरी त्यांच्या पुढील जीवन प्रवास सुरू झाला. गाडगेबाबांचा कामसूपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या गुरे राखणीपासून तर शेती करण्यापर्यंत ठायी ठायी दिसून येई. १८९२ मध्ये त्यांचे कुंदाबाईसोबत लग्न  झाले. काही दिवसांनी मामाची शेती सावकाराने गिळंकृत करण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी व झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी डेबुजीने अपार कष्ट घेतले. बाबांना आलोका व कलावती या दोन मुली तर मुद्गल आणि गोविंद अशी दोन मुले होती. १९०५ मध्ये त्यांनी कोणत्याही पाशात न अडकता गृहत्याग केला. त्यानंतर आयुष्याची ५० वर्षे व्रतस्थपणे त्यांनी जनसेवेत घालवली.

बुडती हे जन न देखवे डोळा !

 म्हणोनी कळवला येत असे !

या भावनेतून त्यांनी समाजाला दिशा दिली. गाडगेबाबांची दशसूत्री प्रसिध्द आहे. त्यामध्ये समाजकल्याणाची एक रूपरेषा आपल्याला प्रतीत होते.

१) भूकेल्यांना : अन्न, २) तहानलेल्यांना : पाणी, ३) उघडयानागडयांना : वस्त्र, ४) गरीब मुलामुलींना: शिक्षण, ५) बेघरांना : आसरा, ६)अंध, पंगू रोग्यांना : औषधोपचार, ७) बेकारांना : रोजगार, ८) पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय, ९) गरीब तरूण-तरुणींचे : लग्न १०) दु:खी व निराश्यांना : हिंमत

अशी ही गाडगेबाबांची दशसुत्री म्हणजे कल्याणकारी राज्याच्या गुणवैशिष्ट्यांचाच भाग जाणवते.

समाजातील सुस्थितीत लोकांकडून इतर दुर्बल लोकांसाठी कार्य करण्याची ते जशी अपेक्षा व्यक्त करतात तशीच अपेक्षा ते शासनाकडूनही करतात. या दशसूत्रीतील गर्भित अर्थ खऱ्या अर्थाने मानवी विकासाचा निर्देशांक कसा वाढवता येईल याचे दिग्दर्शन करतो.

भुकेल्यांना : अन्न

या मूलभूत सुत्राकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. देशातील कुणीही माणूस हा भुकेने मरू नये, याकरिता बाबांनी मांडलेला विचार अनेकांनी स्वीकारला. शासनाने देखील ‘शिवभोजन योजना’च्या माध्यमातून हे सुत्र अंगिकारले आहे. आज राष्ट्रीय स्तरावरती सुमारे ८० कोटी नागरीक हे मोफत शिधा प्राप्त करत असून त्यातून त्यांना मोठा आधार मिळत आहे. सरकारने या कायद्याच्या माध्यमातून उचललेले पाऊल व केलेले प्रयत्न म्हणजे आज कोणीही गरीब उपाशी राहणार नाही, असेच म्हणावे लागेल.

तहानलेल्यांना : पाणी

गाडगेबाबा ज्यावेळी समाजप्रबोधनाचे काम करत होते. त्याकाळी पाण्याचे दुर्भिक्ष होते. विशेषत: स्त्रियांची होणारी भटकंती व गुंड-घागरी घेऊन त्यांची होणारी पायपीट, हे सार्वत्रिक चित्र होते. ‘जल हेच जीवन’ याचे महत्व सांगत असतांना प्रत्येक माणसाला पाणी मिळायला हवे व तेही शुध्द असावे. या गाडगेबाबांच्या संकल्पनेलाच केंद्र व राज्य शासनाने आपल्या धोरणांमध्ये अंगीकृत करून ‘गाव तेथे पाणी पुरवठा योजना’ राबविली जात आहे.

उघड्यानागड्यांना : वस्त्र

आज ‘माणुसकीची भिंत’ यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक उपयोगी कपड्यांचे दान दिले जाते आहे. गरजूंनी तेथून कपडे घेऊन आपली निकड भागवावी, अशी अपेक्षा त्यामागे आहे. शिवाय अनेक सेवाभावी संस्थामार्फत मोफत कपडे, ब्लॅंकेट्सचे वाटप केले जाते. यासारख्या उपक्रमांना बळ देण्यासाठी लोकमानसात सेवाभावी वृत्ती व दानत्व वाढवणे गरजेचे आहे. ज्यातून गरीब व उपेक्षित जनतेची वस्त्रांची गरज भागवली जाऊ शकते.

गरीब मुला-मुलींना : शिक्षण

गाडगेबाबा शिक्षणाचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी सतत कीर्तनातून संदेश देत.अज्ञानामुळे होणाऱ्या नुकसान व शोषणाचे अनेकअंगी पदर ते उलगडून दाखवीत.

आज शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणात राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमुळे व वसतिगृहाच्या प्रशस्त व्यवस्थांमुळे समाजातील तळागाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोईचे झाले आहे. तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी शासनाद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य व प्रोत्साहन दिले जाते आहे.

आजच्या संदर्भात बाबांनी अपेक्षिलेला शिक्षित समाज हा केवळ शालेय शिक्षणापुरता मर्यादित नसून, समाजातल्या उन्नत व विकसित घटकांच्या बरोबरीने उपेक्षित व मागास समाजाला शिक्षित करणे, असाच आपल्याला घ्यावा लागेल. त्यादृष्टीने शासनासोबतच समाजानेही कार्य करणे आज गरजेचे आहे.

बेघरांना : आसरा

बाबांना अभिप्रेत असलेली जी संकल्पना होती. त्यामध्ये कुडाच्या, तुटक्या-फुटक्या घरांमध्ये राहणारी श्रमिक माणसे, उघड्यावर संसार करणारी कुटुंबे यांना किमान हक्काचे छप्पर मिळावे ही होती.

रानावनात भटकंती करणारी स्थलांतरीत माणसे यांना स्थायित्व मिळावे आणि देशाचे नागरिक म्हणून किमान जगण्याची पूर्तता व्हावी, याकरीता गाडगेबाबा आपल्या किर्तनातून सातत्याने मांडणी करत.

देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर या उघड्या पडलेल्या माणसांना हक्काचे निवारे देण्यासाठी केंद्र शासनाने अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या. ज्यामध्ये ‘लोक आवास योजना’, ‘वाल्मिकी आंबेडकर आवास योजना’, ‘प्रधानमंत्री घरकुल योजना’, ‘महाराष्ट्र हाऊसिंग ॲण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरटी’ (म्हाडा) यांचा समावेश आहे. आजही केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये होणारी कोट्यवधी रूपयांची तरतूद ही बाबांच्या दूरदृष्टी व समाजभानाला अधोरेखित करणारी आहे.

गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व लहानपणीच हेरले होते नि अंगी बाणले होते. सार्वजनिक अस्वच्छतेतून साथीचे रोग, प्रदूषण आणि गलिच्छपणा या समस्यांना सामोरे जावे लागते, हे त्यांनी आपल्या भ्रमंतीतून टिपले होते. त्यामुळे स्वच्छतेचे महत्व लोकांच्या मनावर बाब बिंबवत असत. त्यासह लोकाच्या मनातील आरोग्यविषयक अंधश्रध्दाही बाबा निपटून काढत.

रोग्यांना : औषध

या सूत्राच्या परिपूर्तीसाठी बाबांनी मुंबई-पुण्यासारख्या शहरात दवाखान्याजवळ धर्मशाळा बांधल्या. गरीब स्त्रियांसाठी प्रसूतिगृहे, दवाखाने बांधले. ते आरोग्यविषयक जाणिवेतूनच !

कॉलरा कुणाच्या अवकृपेने होतो. यावर बाबांचा मुळीच विश्वास नव्हता. तो केवळ अस्वच्छतेने होतो. हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यामुळेच यात्रेच्या ठिकाणी ते सावध असत व लोकांनाही सावध करत.

बाबांच्या विचाराaचा मोठा प्रभाव हा धोरणकर्त्यावरही पडलेला आपल्याला आज दिसून येतो आहे. गाडगेबाबांच्या संवाभावीवृत्तीतून पेरलेल्या संस्कारामुळे व शासनाच्या प्रोत्साहानामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याला खेड्यातीलच नव्हे तर शहरी लोकांकडूनही उत्स्‍फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. ६०-७० वर्षापूर्वी पेरलेल्या या संस्कारांना आज अभियानाच्या रूपाने देखणेपण मिळाले आहे. ‘स्व्च्छता’ या शाश्वत संस्काराचा वसा जपणाऱ्या कर्मयोगी गाडगेबाबांचे नाव या अभियानास शासनाने देऊन एका परिने त्यांचा गौरवच केला आहे.

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तिंच्या अपंगत्वाकडे न बघता त्यांच्यातील सामर्थ्य ओळखून, त्यांचा सुप्त गुणांना विकसित करून, त्यांना जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी द्यावी व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. शिवाय सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती सूट व प्राधान्य देण्यात आले आहे. या सर्वांचा उद्देश अपंग व्यक्तिंना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हाच आहे. त्यापुढे जाऊन शासनाने तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पातील ५ टक्के रक्कम ही दिव्यांगांच्या साहाय्यसाठी राखीव ठेवण्याची सक्ती केली आहे. यातून फार मोठा आर्थिक आधार त्यांना मिळतो आहे. गाडगेबाबांच्या विचाराचे हे एक मोठे यश आहे, असे म्हणता येईल.

पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय

पशु-पक्षी, मुके प्राणी हे सुध्दा सृष्टीचे अविभाज्य घटक असून माणसांप्रमाणेच त्यांना सुध्दा जगण्याचा समान अधिकार आहे. ही गोष्ट ७०-७५ वर्षांपूर्वी बाबा मांडत होते. त्याकरीता अंधश्रध्देवर आधारलेल्या पशुबळी, नवस-सायास यांचा बाबांनी कडाडून विरोध केला. लक्षावधी लोकांना त्यापासून परावृत्त केले. आतातर केंद्र शासनाने व राज्य शासनाने पशुहत्या बंदीसारखे अनेक कायदे केले असून मुक्या जनावरांना वेदना देणाऱ्या कृती बंद केल्या आहेत.

अशिक्षित असणाऱ्या गाडगेबाबांना आज प्रगत राष्ट्र मांडत असलेल्या जैवविविधतेच्या साखळीची महती उपजतच ठाऊक होती. ही बाब त्यांच्या असामान्यत्वाची प्रचिती देणारी आहे.

गरीब तरूण-तरूणींचे : लग्न

समाजातील हजारो गरीब तरूण-तरूणींचे लग्न होऊन, त्यांनी सुखाचा संसार करावा असे गाडगेबाबांना वाटत असे. एकीकडे समाजात श्रीमंत व आर्थिकदृष्ट्या सबल लोकांच्या कुटुंबातील लग्ने उत्साहाने व थाटामाटात पार पडत. त्यांचे अनुकरणातून गरीब लोक अनेकदा कर्ज काढून लग्न-समारंभ साजरे करत. कित्येक गरीब तरूण-तरूणींच्या पाल्यांजवळ पैसाच नसे. त्यामुळे ते विवाहार्दीपासून वंचित राहत. कर्जबाजारी होऊन लग्न करू नका, ही बाब आपल्या कीर्तनातून बाबा सतत मांडत असत.

आज शासनाने गरीब व गरजू कुटुंबातील तरूण मुला-मुलींची लग्न करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. ज्यामधून लक्षावधी विवाहसोहळे सामूहिकपणे संपन्न होत आहेत. या कार्यक्रमांमधून संपन्न होणाऱ्या सोहळयांमध्ये जाति-पातीची कुठलीही बंधने नसून, एकाच मांडवाखाली विविध जातीच्या जोडप्यांचे विवाहसोहळे हे समाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘जाति-पाती विरहीत समाज’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप मिळाले असून, ते बाबांना अपेक्षित असलेल्या समाज निर्मीतीच्या दिशेने पुढे नेणारे आहे.

बेकारांना : रोजगार

प्रत्येकाने शिक्षण घ्यावे, शारीरिक श्रम करावे, रोजगार मिळवावा, असे बाबांना वाटे. कुठलेही श्रम कमी प्रतीचे नसतात, प्रामाणिकपणे शिस्तबध्द पध्दतीने नियोजित कामे करून त्या कामांना प्रतिष्ठा मिळवून देता येते, असे त्यांचे परखड मत होते. बाबांच्या विचारांना पुढे नेणारे आणखी एक महत्वाचे पाऊल शासनाने उचललेले आपल्याला दिसते.

गरीब व बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने शासनाने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू केल्या. १) ग्रामिण भागात अकुशल व्यक्तींकरीता रोजगार हमी योजना, २) वैयक्तिक लाभाच्या योजना.

शासनाच्या या योजनांमधून बेकारांना रोजगार मिळण्यासाठी प्रयास केले जात असतानाच, मानवी संसाधनाच्या निर्मीतीसाठी व आजच्या स्पर्धेमध्ये आवश्यक असणारे कौशल्य विकसित करणारे विविध अभ्यासक्रम राबविले जात आहेत.

रोजगार आणि स्वयंरोजगार यांच्या माध्यमातून श्रमाला प्रतिष्ठा देणारी व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर तरूणांची पिढी निर्माण व्हावी, हा यामागील उद्देश आहे. यातून बेरोजगारी व आर्थिक कुचंबना निश्चितपणे संपुष्टात येईल. गाडगेबाबांच्या ‘बेकारांना : रोजगार’ आणि ‘दु:खी व निराशांना : हिंमत’ या दोन्ही सुत्रांच्या पूर्ततेसाठी या योजना व धोरणे निश्चितच उपयुक्त ठरणारे असून मानसिक व शारीरिकदृष्ट्या अत्यंत सुदृढ असा समाज आपण याद्वारे निर्माण करू शकणार आहोत.

बाबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाच्या प्रत्येक समस्येवर विविध योजना शासनाकडून राबविल्या जात असल्या व समाज उन्न्तीची सर्व जबाबदारी शासनाची असली तरी, प्रत्येक नागरिकाने ती नैतिक कर्तव्य म्हणूनही निभावने जरूरी आहे. आपण या दृष्टीने येणाऱ्या काळात कार्य करत राहू हीच खऱ्या अर्थाने बाबांना आदरांजली ठरेल !

प्रा. डॉ. मोना चिमोटे

 विभागप्रमुख, पदव्युत्तर मराठी विभाग

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

 (संकलन-विभागीय माहिती कार्या. अमरावती)

सातारा जिल्हा वार्ता फोटो ओळ

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज किल्ले प्रतापगड येथे तुळजाभवानी मंदिरात आरती केली. यावेळी त्यांनी पालखीचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

शिवजयंतीदिनी राजधानीत दुमदुमला जयघोष !

नवी दिल्ली, दि. १९: ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष . . . शिवप्रेमींची मोठी आणि उत्साही उपस्थिती . . . ढोलताशांचा गगनभेदी गजर…  शाहिरी पोवाड्यांसह निनादणाऱ्या तुताऱ्या . . . मस्तकी विलसणारे भगवे फेटे . .. भारतीय सेनेची अनोखी मानवंदना . . .  अशा अत्यंत उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशाच्या राजधानीत मोठ्या उत्साहात साजरी झाली.

दिल्लीतील शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास संभाजीराजे छत्रपती आपल्या परिवारासह उपस्थित होते. खासदार राजाभाऊ वाजे, मेजर जनरल एस. एस. पाटील (विशिष्ट सेवाचक्र) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र सदनाच्या मुख्य  प्रवेश भागातील मध्यस्थानी  छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यात आली होती. येथे आयोजित विशेष कार्यक्रमात शिवजन्मोत्सवानिमित्त संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे  आणि परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत पाळणा पूजन करण्यात आले.  त्यानंतर पालखी पूजनही झाले.

सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार आदींसह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी तसेच  दिल्ली राजधानी क्षेत्र,  हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  या ठिकाणी भारतीय सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमच विशेष मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने महाराष्ट्र सदनाचा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

ढोल ताशांचे सादरीकरण

नाशिकच्या ढोल ताशांच्या पथकानेही या कार्यक्रमात  सादरीकरण केले. या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले.  ढोल पथकातील सहभागी तरुणाईचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मानवंदनाच्या कार्यक्रमानंतर .सदनाच्या सभागृहात ‘द फोक’ आख्यान खड्या आवाजात सादर करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित आख्यान  भिडणारे असे होते.

संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून अभिवादन  करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे व माजी खासदार हेमंत गोडसे आदींची यावेळी उपस्थिती होती. येथेही ढोलताशा पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.

०००

मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पाहणी

नवी दिल्ली, दि. १९:  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ज्येष्ठ मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेस भेट देऊन मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली.

यावेळी मूर्तिकार सुतार, त्यांचे पुत्र अनिल सुतार, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते. मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगतीचा आढावा घेऊन मूर्तिकार सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. आज राम सुतार यांचा १०० वा वाढदिवस असून मंत्री शिरसाट यांच्या उपस्थितीत तो साजरा झाल्याने आनंद द्विगुणीत झाल्याची भावना यावेळी सुतार कुटुंबियानी व्यक्त केल्या.

तत्पूर्वी महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही  पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख,  महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भावना मेश्राम उपस्थित होत्या.

०००

बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त

भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे.

भाषा कुठून येते ? आपण ‘मातृभाषा’ असा शब्दप्रयोग करतो तेव्हा आईची जी भाषा ती मुलाची भाषा असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो काय ? लहान मुल त्याच्या परिसरातील भाषा आत्मसात करते. ते वाढत जाते, तसा त्याच्या परिसराचा विस्तार होतो आणि त्याचा त्याच्या भाषेवर परिणाम होतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) राहणारे लोकं घराबाहेर पडले की अगदी सहज हिंदी बोलतात.आपण ज्या विक्रेत्याकडून भाजी घेत आहोत, तो ग्रामीण भागातून आलेला आपल्यासारखाच मराठी माणूस आहे, याचा जणू विसरच पडतो आणि ‘मेथी क्या भाव है ?’ असा प्रश्न हाती भाजीची जुडी घेत सहजपणे विचारतो !

प्रश्न भाषेचा असल्याने आणि भाषा ही मूलतः वैयक्तिक असल्याने काही व्यक्तिगत अनुभव नमूद करायला हवेत.साधारण पस्तीस  वर्षांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या मित्राने मला बजावले होते की, पुण्यात रिक्षावाल्याशी हिंदीत बोलायचे नाही ! हिंदीत बोलणारा माणूस पुण्यातील नाही म्हणजे नवखा आहे, असे रिक्षावाल्यांच्या लगेच लक्षात येते आणि मग त्यातील एखादा जवळच्या अंतरासाठी दूरचा रस्ता जवळ करू शकतो असे त्या मित्राचे सांगणे होते. दुसरा अनुभव दिल्लीतील. तेथे राहणारे माझे एक आप्त मला म्हणाले की त्यांच्या परिचयाच्या अन्य मराठी माणसांच्या तुलनेत माझी हिंदी चांगली आहे. या आप्तांना चांगल्या वाटलेल्या माझ्या हिंदीचे कारण माझे  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील वास्तव्य म्हणजे माझा परिसर हे आहे. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांसाठी मार्गदर्शन करणारे प्रा. वसंतराव कुंभोजकर विद्यार्थ्यांना सांगत की, मराठी शब्दोच्चारांवर लक्ष द्यायला हवे. हिंदीत ‘ण’ नाही पण मराठीत तो आहे आणि त्याचा उच्चार  ‘न’ पेक्षा वेगळा आहे ! ही सगळी उदाहरणे भाषेचे परिसराशी असलेले नाते सांगणारी आहेत. कोणतेही व्याकरण शिकण्यापूर्वी भाषा आत्मसात करण्याची मानवी क्षमता नैसर्गिक असल्याचे भाषाशास्त्रज्ञ सांगतात.

परिसरात माणसं असतात तशी माध्यमं असतात. आज तर माध्यमांचे प्रकार आणि त्यांची संख्या वाढती आहे. ही सारी माध्यमं आपल्या समोर आणून ठेवणारा मोबाईल आपल्या तर नेहमीच हाती असतो. त्याने आपला जणू सारा परिसरच व्यापला आहे. यातील बराच भाग आभासी असतो आणि तो खऱ्याखुऱ्या परिसरापासून आपल्याला नेहमी दूर नेतो, हेही लक्षात घ्यावे लागते. आपला परिसर माध्यमांनी व्यापलेला असल्याने माध्यमांच्या भाषेचा विचार करावा लागतो.

कोणे एकेकाळी (हा कोणे एकेकाळ फार लांबचा नाही !) माध्यमांचे विश्व म्हणजे दैनिके, नियतकालिके, आकाशवाणी आणि दूरदर्शन असे होते. ( आकाशवाणी आणि दूरदर्शन हे शब्द रेडिओ आणि टेलिव्हिजन या शब्दांचे मराठी प्रतिशब्द नव्हेत. पण माध्यमांनी त्या अर्थाने ते रूढ केले आहेत. ‘झेरॉक्स’ हा शब्दही असाच रूढ झाला आहे. मागच्या पिढीत वनस्पती तुपासाठी ‘डालडा’ हा शब्दही असाच रुढ झाला होता.) जेव्हा माध्यमाचे विश्व मर्यादित होते, तेव्हा त्यांच्यातील स्पर्धाही मर्यादित होती. ( माणसाची झोप ही आमची प्रतिस्पर्धी आहे, असे म्हणणाऱ्या ‘ नेटफ्लिक्स ‘ चा काळ तेव्हा कल्पनेतही नव्हता !) एकूण जीवनाला आजच्या सारखी गती नव्हती. ‘ सर्वात आधी आणि सर्वांच्या पुढे ‘ हा आजचा जीवनमंत्र तेव्हा माध्यमांनी स्वीकारलेला नव्हता. तेव्हा तंत्रज्ञान आजच्या इतके गतीमान नव्हते आणि त्याच्या गतीची मर्यादा स्वीकारली गेली होती. माध्यमे तंत्रज्ञानप्रधान नव्हती. तेथे काम करणारे आणि वाचक ( ग्राहक नव्हे !) महत्वाचे होते. वाचकांची जडणघडण आपण करू शकतो, ही भूमिका तेव्हा रूढ होती म्हणूनच काही दैनिके राशिभविष्य छापत नव्हती. काही दैनिके आसाम ऐवेजी असम, पंतप्रधान ऐवेजी प्रधानमंत्री, मध्यपूर्व ऐवेजी पश्चिम आशिया, उत्तरपूर्व ऐवेजी इशान्य असे शब्द जाणीवपूर्वक उपयोगात आणत.त्या काळातील भाषा ही बहुतेकवेळा प्रमाणभाषेशी नाते सांगणारी होती. मराठी शब्द कटाक्षाने वापरण्याकडे कल होता.आज एका बाजूला कम्प्युटर हा शब्द वापरला जातो आणि त्याच वेळी डेटा या शब्दासाठी विदा हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न सुरू असतो आणि यात विसंगती आहे, असे कोणालाही वाटत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांना अनुक्रमे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे रूढ झालेले शब्दही वापरले जात नाहीत. काही वेळा मुख्य न्यायाधीश आणि सरन्यायाधीश असा फरक केला जात नाही. दिनांक ऐवजी तारिख, सप्ताह ऐवेजी आठवडा असे सोपे शब्द रुजवण्यासाठी प्रयत्न झाले, याचा आता विसर पडला आहे. हे घडत आहे याची अनेक कारणे आहेत. वर्तमानपत्रांच्या जगात पूर्वी बातमी असो की लेख, ते संपादकीय संस्कार केल्यानंतरच पुढे पाठवले जात. वार्ताहर, मुख्य वार्ताहर, उपसंपादक, मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक… अशा पायऱ्या तेव्हा केवळ नामाभिधानासाठी अस्तित्वात नव्हत्या तर त्यांची स्वतंत्र कार्ये निर्धारित होती.आज ही पदं अस्तित्वात आहेत पण त्यांची दैनंदिन कार्ये बदलेली दिसतात. हा बदल तंत्रज्ञानातील बदलासोबत आला.तंत्रज्ञान गती आणि स्पर्धा घेऊन आले. त्याने माध्यमांचे स्वरूप बदलले. मुद्रितशोधक हद्दपार झाला.बातमीदार असो की लेखक , तोच त्याच्या मजकूराचा अनेकदा उपसंपादक ठरू लागला. जी दैनिके वेगळी जिल्हा पाने देतात , त्या पानांत या स्थितीचे प्रतिबिंब सहज दिसते.याचा परिणाम भाषेवर झाला. काहींनी नव्या पिढीशी नाते जोडायचे म्हणून त्या पिढीच्या भाषेशी नाते जोडण्याचा व्यावहारिक आग्रह धरला. त्याला कधी तात्विक रूप दिले. त्यातून भाषेचे रूप आणखी पालटले. महानगरातील भाषेत जशी इंग्रजी आणि हिंदीची सरमिसळ झालेली असते तशीच भाषा दैनिकातून डोकावू लागली. महानगरात राहणारी नवी पिढी इंग्रजी माध्यमातून शिकते. त्याच पिढीतील प्रतिनिधी आज वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात. मग वटहुकूम आणि शासन निर्णय, विधेयक आणि कायदा यात फरक केला जात नाही. मराठीत क्रियापदांचे अनेकवचनी रूप असते, आदरार्थी अनेकवचन उपयोगात आणण्याची पद्धत आहे अशा बाबींचा विसर पडतो.

कोणतीही भाषा स्थिर असू शकत नाही आणि भाषेने अन्य भाषांमधील शब्द स्वीकारण्यास काही प्रतिबंध असू शकत नाही. पण असे शब्द स्वीकारताना आपल्या मूळ भाषेला रजा देण्याची गरज नाही. आपल्या भाषेविषयी मराठी माणूस जागरूक नाही, ही विदारक वस्तुस्थिती आहे. मागे नगरला ( आजचे अहिल्यानगर ) साहित्य संमेलन झाले तेव्हा सुप्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टाचार्य म्हणाले होते की, कलकत्ता शहरात सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहायचे असेल तर बंगाली भाषा शिकावीच लागते.पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. येथे पिढ्यानपिढ्या राहणारी माणसं मराठी नव्हे तर त्यांची मातृभाषा आणि हिंदी / इंग्रजी बोलत राहू शकतात, राहतात. असे म्हणतात की ही विदारक वस्तुस्थिती ते सांगत होते तेव्हा सभामंडपातील प्रेक्षक टाळ्या वाजवत होते

आपल्याकडील माध्यमात याच अवस्थेचे प्रतिबिंब पडले आहे. त्यामुळे अनेकदा माध्यमातून कानी पडणारी किंवा वाचनात येणारी मराठी ही अनेकदा मराठी वळणाची राहिलेली दिसत नाही. त्यातून मग ‘ धन्यवाद ‘ मानतो ‘ / ‘ मानते ‘ यासारखे शब्दप्रयोग रूढ होतात. आभार मानले जातात आणि धन्यवाद दिले जातात हे लक्षात घेतले जात नाही.

आपल्याकडे दूरचित्रवाणीचा झपाट्याने विस्तार होत असताना एका मान्यवरांनी असे लिहिले होते की , पाश्चात्य देशात ‘ मुद्रण संस्कृती ‘ रुजल्यानंतर तेथे टेलिव्हिजन आला.आपल्याकडे मुद्रण संस्कृती रुजण्यापूर्वीच टेलिव्हिजन आला आणि विस्तारत असून त्याचे काही दुष्परिणाम संभवतात. भाषेच्या बाबतीत हे दुष्परिणाम आपण आता अनुभवत आहोत.

मुद्रीत माध्यम हे शब्दप्रधान आहे. नभोवाणीचे माध्यम शब्दच आहे. टेलिव्हिजनचे माध्यम कॅमेरा आहे. लिहिले जाणारे शब्द आणि टिपले जाणारे दृश्य यात अंतर असणार हे उघड असले तरी ते माध्यमांचा परस्परांवर परिणाम होऊ नये म्हणून आवर्जून लक्षात घेणे फार आवश्यक आहे. क्रिकेटच्या सामन्याचे दूरचित्रवाणीवरून होणारे थेट प्रक्षेपण, नभोवाणीवरून त्याच सामन्याचे प्रसारित होणारे धावते वर्णन आणि त्याच सामन्याचा दुसऱ्या दिवशी प्रसारित होणारा वृत्तांत यात फरक असणे स्वाभाविक आहे.असाच फरक या तीन माध्यमातून येणाऱ्या अन्य बाबींबद्दल असायला हवा. बोलण्याची भाषा आणि लिहिण्याची भाषा यात असणाऱ्या फरकाची जाणीव ठेवणे ही प्राथमिक गरज आहे.आपल्याकडे जेव्हा एखाद्या महत्वाच्या घडामोडीचे तपशील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवले जातात तेव्हा कॅमेरा त्याचे दृश्य टिपण्याचे काम त्याच्या यांत्रिक क्षमतेने आणि वेगाने करीत आहे  , मानवी तोंडातून निघणारे शब्द त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत याचा निवेदकांना / बातमीदारांना विसर पडलेला दिसतो.  वर्तमानपत्रातही हे घडत असल्याचे हल्ली अनुभवास येते.तपशिलाच्या पसाऱ्यात नेमकेपणा हरवून जातो. हा माध्यमांचा परस्परांवर होत असलेला परिणाम आहे.असाच परिणाम मांडणीतही होत असल्याचे अनुभवास येते. छोट्या पडद्यावर एकाच वेळी निवेदक / वार्ताहर दिसतो, त्यांचा ज्यांच्याशी संवाद सुरू असतो तेही दिसतात , जे काही दाखवले जात आहे , त्याच्याशी निगडीत शब्दांकन दिसत असते , ‘ स्क्रोल ‘ सुरू असतो , कोपऱ्यात तपमान वगैरे दिसत असते.हे सारे रंगीत असते. वर्तमानपत्रातही मांडणीत अनेकदा अशी गर्दी दिसते.तेथे पुरेसे अंतर राखणारी कोरी जागा अर्थपूर्ण ठरते याचा विसर पडत चाललेला आहे.

आपल्याकडे वाहिन्या बहुभाषक असणे अपरिहार्य आहे.त्याचेही भाषेवर दुष्परिणाम होत आहेत. हिंदीत ‘ खुलासा ‘ हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो , त्या अर्थाने तो मराठीत उपयोगात आणला जात नाही. पण हल्ली हा ‘ खुलासा ‘ मराठीत ऐकू येत असला तरी तो हिंदीतील आहे , हे लक्षात घ्यावे लागते ! अशी किती तरी उदाहरणे देता येतील. हल्ली लहान मुलं त्यांच्या संभाषणात खूप हिंदी शब्द वापरत असतात.त्याचा उगम ते पाहतात त्या ‘ कार्टुन शो ‘ मध्ये आहे. आपल्याकडील लग्नसमारंभातील मराठीपण जसे हळूहळू हरवत आहे , तसेच भाषेचेही होत आहे ! कौटुंबिक नात्यातील मराठी संबोधने बाजूला पडत असून भाऊजी या शब्दाची जागा जिजाजी , मेहुणा या शब्दाची जागा साला या शब्दांनी घेतली आहे.

एकेकाळी वर्तमानपत्रांनी परिभाषेत भर घातली.आता व्यवहारात रूढ झालेले मराठी शब्द बाजूला सारून तेथे इंग्रजी / हिंदी शब्दांचा उपयोग सुरू आहे , याचा पदोपदी अनुभव येतो.

एकीकडे माध्यमातील नवी पिढी कार्यक्षम आणि तंत्रस्नेही असल्याचा अनुभव येत असतानाच त्यांचा मराठी शब्दसंग्रह मर्यादित होत असल्याचे जाणवते.याचे कारण या पिढीत मराठी साहित्याचे वाचन कमी झाले आहे , हे असावे.

इंग्रजी माध्यमातून होणारे शिक्षण , बहुभाषक परिसरात संपर्कासाठी सहजपणे उपयोगात आणली जाणारी हिंदी , माध्यमांना आलेले तंत्रज्ञानप्रधान व्यवसायाचे रूप , उसंत न देणारी वाढती स्पर्धा या आणि अशा काही कारणांमुळे आजच्या माध्यमात दिसणारी भाषा विचित्र रूप धारण करीत आहे. माध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम लक्षात घेता माध्यमांकडून उपयोगात आणली जाणारी भाषा महत्वाची ठरते. ती निष्कारण कठीण , बोजड नको तशीच स्वतःचे अस्तित्व सहजपणे विसरणारीही नको.ती पुढे जाणारी , स्वागतशील हवी आणि तिचे नाते तिच्या मुळांशी हवे.

राधाकृष्ण मुळी 

निवृत्त संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी 

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे.तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे,बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला जाऊन मिळते, तशीच मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे.या बोली भाषेतील विविधतेमुळे मराठी भाषेची ताकद वाढली असून तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे.

 बोलीभाषांचे वैविध्य आणि त्यांचे योगदान 

महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, मराठवाडी, झाडीबोली, खानदेशी, नागपुरी याशिवाय गोंडी, बंजारा, कोलामी या बोलीभाषांनी मराठी भाषेला बळ दिले आहे. म्हणतात, “दर बारा कोसांवर भाषा बदलते,” हे महाराष्ट्राच्या भाषिक वैशिष्ट्यांवर अगदी तंतोतंत लागू होते. या बोलीभाषांमधील साहित्य, लोकसंस्कृती, गाणी, नाटकं, प्रवचनं यांनी मराठीला अधिक व्यापक आणि जिवंत बनवले आहे. या बोलीभाषा मधील काही शब्दांना अर्थ आहे. हजारो उखाणे या बोली भाषांमध्ये आहे. शेकडो वाक्प्रचार या भाषेत आढळतात, विविध शब्दांसाठी एक शब्द म्हणून आशयघनता असणारे अनेक शब्द बोली भाषेत आहे. प्रेम, राग, व्देष, आनंद व्यक्त करणारे वैशिष्ट्यपूर्ण शब्द या बोलीभाषांचे महत्व सांगते.

 वऱ्हाडी बोलीभाषेचे वैशिष्ट्य 

वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो.

 वऱ्हाडी भाषेचे महत्त्व

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना वऱ्हाडी भाषेतील लिखाण अलिकडच्या काळात विशेष अधोरेखित झाले आहे. लीळाचरित्र या महानुभव पंथाच्या ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभाव आढळतो. आद्य मराठी कवी मुकुंदराज यांच्या लेखनातही वऱ्हाडीचा वापर दिसतो. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभावी वापर केला आहे. कर्मयोगी गाडगेबाबांचे प्रवचनदेखील अस्सल वऱ्हाडी भाषेत असायचे. पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया, उद्धव शेळके यांची धग कादंबरी त्यातील वऱ्हाडी भाषा यांनी अनेक पिढ्यांना वेड लावले आहे. अनेक अशा अशा कादंबऱ्या, कथा मान्यवर लेखकांनी मराठी वाचकांना दिल्या आहेत.

वऱ्हाडीतील साहित्यिक योगदान 

वऱ्हाडी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, नाटके, सिनेमा अशा विविध माध्यमांद्वारे ही भाषा आपल्या भाषिक परंपरेत एक ठसा उमटवत आहे. अनेक लेखक आणि साहित्यिकांनी वऱ्हाडी भाषेत उत्कृष्ट लेखन केले आहे. वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल,कॉमेडी शो आणि चित्रपटात या बोली भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हिंदी भाषेनंतर हास्य कवी संमेलनाची संस्कृती वऱ्हाडी भाषेने सर्वाधिक जोपासली आहे. माध्यमांमुळे या बोलीभाषा आता आपल्या सीमा भेदून सार्वत्रिक होत आहे.

प्रा. देविदास सोटे, पुरुषोत्तम बोरकर, उद्धव शेळके, मनोहर तल्हार, बाजीराव पाटील, गो. नी. दांडेकर, महेश दारव्हेकर, पांडुरंग गोरे, विठ्ठल वाघ, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग,शंकर बडे, मधुकर केचे, ज्ञानेश वाकुडकर,शाम पेठकर, नाना ढाकूलकर, मनोहर कवीश्वर, मधुकर वाकोडे, गौतम गुडदे, डॉ. प्रतिमा इंगोले, शरदचंद्र सिन्हा, जगन वंजारी, राजा धर्माधिकारी, बापुराव झटाले, अॅड. अनंत खेळकर, किशोर बळी, रमेश ठाकरे, बापुराव मुसळे, रावसाहेब काळे,सदानंद देशमुख, नरेंद्र लाजेवार, नरेंद्र इंगळे,आदी मान्यवरांसह शेकडो लेखकांनी वऱ्हाडी भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे.

वऱ्हाडी भाषेतील नाटक आणि गझलसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. कविवर्य सुरेश भट यांनी मराठीत गझल लेखन केले, पण खासगी संभाषणात ते अस्सल वऱ्हाडीच वापरत. वऱ्हाडी भाषेतील सहज संवाद साधण्याची शैली, विनोदी प्रकृती, आणि लयदार उच्चार हा एक वेगळाच अनुभव देतात.

विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या सीमावरती भागात, तसेच मध्य प्रदेशातील तेलंगाना व आंध्र प्रदेशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वऱ्हाडी भाषा बोलली जाते. अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने तर अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये थोडा बदल होऊन भाषा बोलली जाते. नागपूर शहरातील बोलली जाणारी भाषा ही देखील एक वेगळी वऱ्हाडी शैली आहे. नागपूर मेट्रोने तर खास नागपुरी शब्दांच्या जाहिराती केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या त्या भागातील नागरिक एकमेकांना भेटल्यानंतर या शब्दांचा भरपूर वापर करतात. भाषिक जवळीकता साधण्यासाठी हे शब्द ओळखीचे काम करते. पुढे हीच भाषा भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये वेगळा हेल घेते. तिचे उच्चार वेगळ्या पद्धतीने केले जाते. मात्र हजारोंनी या भाषेचे संवर्धन केले आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा विचार करताना मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, त्यांचे संवर्धन आणि त्याचा अभ्यास करण्याचे व्यासपीठ अशी मोठी संमेलन असतात. दिल्लीच्या व्यासपीठावर अभिजात भाषेचा गुणगौरव होताना बोलीभाषेच्या सुप्त प्रवाहावरही चर्चा करावी लागणार आहे. बोलीचे वैभव,भाषेची संपन्नता वाढवणारे आहे.

 मराठीची अस्मिता आणि बोलीभाषांचे स्थान 

पु. ल. देशपांडे यांना वऱ्हाडी भाषेच्या विनोदी बाजाचे फार आकर्षण होते. सुरेश भट लतादीदी ,आशा भोसले आणि मंगेशकर घराण्यातील व्यक्तीशी वऱ्हाडी भाषेतून संवाद साधायचे. त्यांच्या वऱ्हाडी संवादाचे मैफिलीमध्ये खास आकर्षण असायचे. खरे तर भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती तिच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग असते. उर्दूची अदब, गुजरातीची गोडी, आणि वऱ्हाडीची मिश्किलता, विनोदी शैली हे वैशीष्टय आहे.

म्हणूनच बोलीभाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांना जपणे हे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात बोलीभाषांनी जो भाषिक गोतावळा तयार केला आहे, त्याने मराठीला अधिक समृद्ध केले आहे. मराठीने आपल्या अंगाखांद्यावर या उपभाषांना वाढवले, संगोपन केले आणि त्यांना भाषिक अस्मिता बहाल केली.

आजच्या काळातही बोलीभाषांचे संवर्धन हे मराठीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण मातृभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. आई जी भाषा बोलते तीच मुलाची भाषा होते आणि तीच त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.

मराठी भाषा ही केवळ एक संवादमाध्यम नसून एक संस्कृती आहे. बोलीभाषा ही तिच्या समृद्धीचा गाभा आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी यासारख्या अनेक उपभाषांनी मराठीच्या प्रवाहाला अधिक खोल आणि विस्तारलेले स्वरूप दिले आहे.

आजही मराठी भाषेच्या जडणघडणीत या बोलीभाषांचा मोलाचा वाटा आहे. बोलीभाषांचे संवर्धन आणि त्यांचे लेखन-साहित्यिक योगदान पुढे नेणे, हे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषा ही केवळ बोलीभाषांच्या आधाराने अधिकाधिक समृद्ध होत राहील. नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मायमराठीच्या या उपभाषांच्या संवर्धनासंदर्भातही वैचारिक मंथन अपेक्षित आहे.मराठी भाषा ही समुद्र आहेत तर तिच्यात मिसळणाऱ्या बोलीभाषा या विविध नदयांप्रमाणे आपले भाषिक सौंदर्य तिच्यामध्ये कायम मिसळत राहते. हा ओघ असाच कायम असणे खूप गरजेचे आहे. शब्दांचे वैशिष्ट्य, शब्दांचा गोडवा, शब्दांचे अर्थ, त्याची आशयघनता, काळाच्या गतीमध्ये लुप्त होऊ नये. थोडक्यात वऱ्हाडी शब्दांचा वापर करून सांगायचे झाल्यास असा ‘बैताडपणा, छपरीपणा, इचकपणा, नंबरीपणा, उपटपणा, घरावर गोटे आणण्याचे धंदे अन् ‘ जांगडबुत्ता ‘ मराठी भाषेवर चिंतन करताना होऊ नये ,एवढीच अपेक्षा आहे.

प्रवीण टाके, 

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

९७०२८५८७७७

00000

छत्रपती शिवरायांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे अभिवादन

सातारा दि.१९:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास शासनाने सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांचा आदर्श ठेवूनच शासन काम करीत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवराय हे नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्र राज्य अधिक प्रगतशील करण्याचे शासनाचे धोरण आहे.

०००

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...