शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 30

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘ढोल गर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई दि. ३०: महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ढोल ताशा पथकांच्या सादरीकरणाचा ढोलगर्जना हा सांस्कृतिक कार्यक्रम दि. १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात राज्यभरातून दहा विविध ढोल ताशांचे पथक आपली कला सादरीकरण करतील. महिला पथकांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे.

ढोल गर्जना या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/

मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींसोबत महाराष्ट्र शासन काम करणार

मुंबई, दि. ३०: मानसिक आरोग्य क्षेत्रात मूलभूत सुधारणांची गरज लक्षात घेता शासन आता या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्ती यांच्यासोबत काम करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक आणि सचिव विरेंद्र सिंह यांनी सांगितले. मानसिक आरोग्य यासंदर्भात जी. टी. रुग्णालय येथे बैठक झाली.

यावेळी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, मानसोपचारतज्ज्ञ, अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विविध विभागातील या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

प्राथमिक आणि सामुदायिक स्तरावर मानसिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज व्यक्त करून सचिव निपुण विनायक म्हणाले की, राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणाशी जोडून राज्य शासन मूल्यमापन करण्याचे काम करणार आहे. तसेच या क्षेत्रात क्षमता बांधणी महत्त्वाची असून त्यामध्ये शिक्षक, पोलीस यांच्यासह शासकीय मानसोपचार तज्ज्ञ यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुले, परीक्षार्थी विद्यार्थी, युवक यांच्यासह समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांसाठी मानसिक आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सचिव विनायक यांनी सांगितले.

बैठकीमध्ये शासकीय रुग्णालय, मानसोपचार केंद्र, पुनर्वसन केंद्र, संस्थाना येणाऱ्या विविध अडचणी शासकीय पुनर्वसन केंद्र उभारणे, मनोरुग्णालयांचा दर्जा सुधारणे यासह शासकीय संस्थांमधील कर्मचारी, नर्सेस व इतर स्टाफ यांच्या प्रशिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या प्राथमिक स्तरावर सोडवण्याविषयीही चर्चा करण्यात आली.

०००

राज्यघटनेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.३० (जिमाका)-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून आपल्या सगळ्यांना समता, न्याय आणि अधिकार दिला आहे.  या राज्यघटनेबद्दल विदेशात कमालीचा आदर आहे. आपण प्रत्येकाने  या राज्यघटनेचा अभिमान बाळगायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात घर घर संविधान अभियानांतर्गत देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजीत या कार्यक्रमास विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उप जिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, नीलम बाफना, संगिता राठोड, एकनाथ बंगाळे, रामदास दौड तसेच सर्व विभाग प्रमुख व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, घर घर संविधान या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संविधानाविषयी जागरुकता निर्माण करुन संविधानात सामान्यांच्या अधिकार कर्तव्याबाबत जाणीव जागृती करावी. जाणकारांनी संविधानाचा बारकाईने अभ्यास करावा. ही सर्वसमावेशक घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला देण आहे. या घटनेमुळेच मी ही आज तुमच्या समोर उभा आहे.

दीप प्रज्वलनने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले तसेच विभागीय आयुक्त गावडे यांनीही आपल्या मनोगतातून संविधानाची महती सांगितली. त्यानंतरजिल्हाधिकारीकार्यालयातीलअधिकारीकर्मचाऱ्यांनीदेशभक्तीपरगीतेसादरकेली.

०००००

 

शिक्षकांची राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

छत्रपती संभाजीनगर दि.30 (विमाका) : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर शासनाचा भर आहे. देशाचा उद्याचा नागरिक घडविण्यात आई-वडीलानंतर शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षण आनंददायी, शिक्षण गुणवत्तापूर्ण यासोबतच शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे हे ब्रिद घेऊन शिक्षण विभाग काम करत आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रात सक्षमपणे उभा रहावा, यासाठी शिक्षकांनी झोकून देत काम करावे, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शिक्षकांची राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. आयडॉल शिक्षकाने आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला आपल्या शाळेपुरते मर्यादित न ठेवता राज्यभर हा उपक्रम कसा पोहचेल यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर विभागातील आयडॉल शिक्षकांशी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रदिप जैस्वाल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, सहायक संचालक रविंद्र वाणी, शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतिष सातव उपस्थित होते.

शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, आयडॉल शिक्षकांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची शासनाकडून दखल घेण्यात येईल. आपल्यासमोर असलेल्या अडचणीतून मार्ग काढून या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या शाळेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक जिल्हयाच्या शैक्षणिक विकासासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. येणाऱ्या कालावधीत शाळांना भौतिक सुविधेसह डिजीटल सुविधा देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शिक्षकांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे श्री भुसे यांनी सांगितले.

राज्य शासन येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आठवीच्या पुढील विद्यार्थीनींना सायकलसाठी अर्थसहाय्य तसेच शालेय विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करणार आहे. हेल्थ कार्ड उपक्रमाच्या माध्यमातून तपासणीत गंभीर आजार आढळला तर त्या विद्यार्थ्याला शासकीय योजनेतून सर्व उपचार शासन करेल. शालेय पातळीवर पुर्वी विविध 15 समित्या कार्यरत होत्या. या समित्यांची संख्या 15 वरुन 4 समित्यांवर आणली आहे. शिक्षकावरील अशैक्षणिक कामाचा भार कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल, असे श्री. भुसे म्हणाले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सहली शेती, कारखाना, किराणा दुकान, बँक, दवाखाना याठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात येईल. बालवयात मुलांना याबाबी जाणून घेण्याची उत्कंठा असते त्यासाठी अशा सहली निश्चितपणे विद्यार्थ्यांना आनंद देतील. स्पर्धा परीक्षेच्या निकालात 50 टक्के विद्यार्थी हे जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेत शिक्षण घेतलेले आहेत. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश श्री. भुसे यांनी दिले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमासोबतच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरु केलेला शिक्षणाचा दशसुत्री उपक्रम राबविण्यात येईल. शिक्षक, पालक संवाद उपक्रम प्रभावीपणे राबवावा लागेल. शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांशी देखील संवाद साधावा लागेल. यातून अनेक अडचणी सुटतील तसेच आई वडीलांनी देखली आपल्या मुलांबरोबर संवाद वाढवावा त्यातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर येथे कार्यरत असतांना आपण लोकवर्गणीतून 2670 शाळा सुंदर केल्या आहेत. तसेच सोलापूर येथे विद्यार्थ्यांच्या ‘आरोग्याचा सातबारा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविला. ‘शिक्षणाचा दशसुत्री उपक्रम’ यशस्वीपणे राबविला. छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दशसुत्री उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक व पालकांचे सहकार्य महत्वाीतचे आहे. गीत गुंजण हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला असून शिक्षकांसाठी पुस्तक  प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांची कार्यशाळा यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक गुणवतेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हयात कार्यरत असतांना शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित  यांनी आजच्या या कार्यक्रमातून निश्चितपणे शिक्षकांना प्रोत्साहन तसेच ऊर्जा मिळेल. आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात पुढे जावेत. विद्यार्थ्यांमध्ये नाविण्यता यावी यासाठी अनेक शिक्षक चांगले काम करतात. शिक्षकांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला सर्वातोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती

जालना जिल्हयातील देवीपिंपळगाव (बदनापूर) येथील कृष्णा निहाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरवंटी तांडा ता. पैठण येथील भरत काळे, जरेवाडी ता. पाटोदा जि. बीड येथील राहुल डोंगर, सिरसम ता.गंगाखेड जि. परभणी येथील दशरथ मुंडे, सांडस ता. कळमनुरी जि.हिंगोली येथील शंकर लेकुळे तसेच परभणीचे शिक्षणाधिकारी  संजय ससाणे यांनी राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान पुरस्काराने शाळांचा गौरव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगांव मेटे जि. छत्रपती संभाजीनगर, बोरगव्हान जि. परभणी, देवीपिंपळगाव जि. जालना या शासकीय तर बहीरजी नाईक स्मारक विद्यालय, वसमत जि. हिंगोली, सरस्वती साधना विद्यालय आर्वी जि. बीड, संत ज्ञानेश्वर विद्यालय केरेवाडी जि. परभणी या खाजगी शाळांचा शालेय मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विभागातील सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, वेतन अधिक्षक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

०००

पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर, दि. ३० : सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याच्या वापराबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. पाण्याची बचत आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे केले. जलसंपदा विभागाच्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तसेच प्रशासक रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, महेंद्र काळे, रोहित जगताप यांच्यासह लातूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पाण्याचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र, पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, यासाठी जलव्यवस्थापन महत्त्वाचे आहे. जलसंपदा विभागाने या पंधरवड्यात राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.

काही जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी पाण्याचा अतिवापर झाल्याने जमीन क्षारपड होत आहे. त्यामुळे शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. भोसले यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलपूजनाने झाली. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थितांना जल संवर्धन व बचतीची शपथ देण्यात आली.

कार्यकारी अभियंता महेंद्र काळे यांनी प्रास्ताविकात पंधरवड्यात जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली. यासंबंधीची चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

००००००

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यात २६ बालविवाह रोखण्यात यश

मुंबई, दि.३०: अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. परंतु, याच मुहूर्तावर अनेक ठिकाणी बालविवाह होण्याचे प्रकारही समोर येतात. या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे राज्यात एकूण २६ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

महिला बाल विकास विभागाची बैठक; दूरदृश्य प्रणालीद्वारे अधिकारी सहभागी

बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि समन्वयाबाबत “निर्मल भवन” येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध जिल्ह्यांतील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले. बैठकीत बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला.

बालविवाह रोखण्यासाठी ठोस कार्यवाही

अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील भोकर शहर आणि मुखेड तालुक्यातील मंगनाळी या गावात होणारे दोन बालविवाह वेळेत हस्तक्षेप करून रोखण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक पातळीवर जनजागृती झाली असून, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश गेला आहे.

बालविवाहमुक्त महाराष्ट्राची संकल्प

राज्यातील विविध भागांतून आलेल्या अहवालांनुसार, फक्त एका दिवसात २६ बालविवाह रोखण्यात आले. यामुळे महिला व बाल विकास विभागाच्या प्रयत्नांचे फलित स्पष्ट झाले आहे. याबाबत बोलताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, “बालविवाहमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहेत.”

सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्नांची गरज

बालविवाह ही सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर समस्या असून, तिचे निर्मूलन करण्यासाठी सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने घेतलेली ही ठोस पावले बालकांच्या सुरक्षित भविष्याकडे उचललेले सकारात्मक पाऊल ठरू शकतात, असे यावेळी राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या.

०००

महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चे उद्घाटन

मुंबई, दि. ३०: राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, त्यानुसार या कक्षाचे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री / मंत्री/ राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यान्वयित करणेबाबत निर्देश दिले होते.

वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून सदरचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

काय असणार कक्षाची जबाबदारी

⏩ अर्ज करण्यासाठी रूग्ण व नातेवाईकांना मदत करणे.

⏩ प्राप्त अर्जांची सद्यस्थिती उपलब्ध करुन देणे.

⏩ रूग्ण व नातेवाईकांच्या समस्यांचे निराकरण करणे.

⏩ आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे.

⏩ नागरिकांमध्ये कक्षा बाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करणे.

⏩ कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे.

⏩जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे.

⏩ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अधिकाधिक देणग्यांचा ओघ येण्याकरिता प्रयत्न करणे.

⏩ अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे.

रूग्ण व नातेवाईकांना होणार कक्षाचे फायदे

▶️ रूग्ण व नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला अर्ज करण्याकरिता मदत मिळणार.

▶️ अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, माहिती सहज उपलब्ध होणार.

▶️ संलग्न रूग्णालयांची यादी मिळणार.

▶️ अर्ज किंवा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही.

▶️ अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजणार

०००

 

 

जातनिहाय जनगणनेचा केंद्राचा निर्णय स्वागतार्ह – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ३०: “जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामूळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी देता येईल. मागास समाजघटकांचा शैक्षणिक, आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय वेगाने साध्य करता येईल. जातनिहाय जनगणनेचा निर्णय म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने टाकलेले महत्वपूर्ण, क्रांतिकारी पाऊल आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून हा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

जातनिहाय जनगणनेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना गेल्या अनेक दशकांपासून करत आहेत. ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या, संवेदनशील नेतृत्वामुळेच पूर्ण होऊ शकली. जातनिहाय जनगणना होत नसल्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य जातींच्या लोकसंख्येच्या आर्थिक, सामाजिक स्थितीची माहिती उपलब्ध होत नव्हती. याचा फटका ओबीसी समाजबांधवांसह इतरही समाजघटकांना फटका बसत होता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना योग्य समाजघटकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.  यातून सर्व समाजांना विकासाची समान संधी उपलब्ध होईल हा निर्णय येणाऱ्या भविष्यकाळात जातव्यवस्था संपूष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे.

०००

वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत

मुंबई, दि. ३० : भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या १ मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल.

पंतप्रधान मोदी यांच्या सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या वेव्हज् 2025 मध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, एव्हीजीसी- एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सामर्थ्याचे हे सर्वांगीण प्रदर्शन असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.

या शिखर परिषदेत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग (GMD) चे आयोजन मुंबईत होणार आहे. यामध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होणार असून, भारताच्या जागतिक मीडिया क्षेत्रातील सहभागात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. वेव्हज् बजार या जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये 6,100 पेक्षा अधिक खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्प सहभागी होणार आहेत, ज्यातून स्थानिक व जागतिक स्तरावर व्यवसाय आणि नेटवर्किंगच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या परिषदेत प्रधानमंत्री क्रिप्टोस्पियरला भेट देऊन “क्रिएट इन इंडिया” उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियनला देखील भेट देतील. या स्पर्धेसाठी एक लाखांहून अधिक नोंदणी झाली.

वेव्हज् 2025 परिषदेमध्ये 90 हून अधिक देश, 10,000 प्रतिनिधी, 1,000 कलाकार, 300 हून अधिक कंपन्या आणि 350 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. शिखर संमेलनात 42 मुख्य सत्रे, 39 विशेष सत्रे आणि 32 मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी- एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असेल.

०००

राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज, संत महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. ३०: राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज  व संत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे या महान प्रभृतींच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती,  तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
भोपाळ, दि. 10 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या...

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि.10  : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज...

खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री...

0
खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न सातारा दि.10  : भारतीय हवामान विभागाने 103 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे...

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री नितेश राणे

0
महाराष्ट्र सागरी मंडळाची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि.१० (जि.मा.का.) :  आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असून मालवण हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मालवण बंदरामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने वाहनतळ...

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

0
खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक चंद्रपूर, दि. 10 मे : खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या हंगामावरच शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह होतो. त्यामुळे जिल्ह्यात...