शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 28

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

रायगड(जिमाका)दि.1:- राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील, अतिरिक्त शल्य चिकित्सक शीतल जोशी, उपजिल्हा धिकारी डॉ.रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यान्वयित करणेबाबत निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यलयात हा कक्ष सुरु करण्यात आला आहॆ.

वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून सदरचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

काय असणार कक्षाची जबाबदारी

अर्ज करण्यासाठी रूग्ण व नातेवाईकांना मदत करणे. प्राप्त अर्जांची सद्यस्थिती उपलब्ध करुन देणे. रूग्ण व नातेवाईकांच्या समस्यांचे निराकरण करणे. आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे. नागरिकांमध्ये कक्षा बाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करणे.कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे. जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अधिकाधिक देणग्यांचा ओघ येण्याकरिता प्रयत्न करणे. अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे. रूग्ण व नातेवाईकांना होणार कक्षाचे फायदे. रूग्ण व नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला अर्ज करण्याकरिता मदत मिळणार. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, माहिती सहज उपलब्ध होणार. संलग्न रूग्णालयांची यादी मिळणार. अर्ज किंवा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही. अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजणार

००००

 

महाराष्ट्र दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

रायगड (जिमाका) दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन  करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व यांनी केले. पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल,  गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- 112 पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक,  अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल 108 सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला.

जिल्हा व राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे- महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवित राज्याला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाचा असून जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमीत्त तसेच कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मंत्री कु. तटकरे म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याच्या विकासाचा अध्याय नव्याने सुरू झाला आहे.  आज महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.  राज्य शासन गतिमान व सुशासनाचे ध्येय साध्य करण्यासाठी “त्रिसूत्री कार्यक्रम” राबवित आहे. राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांत लोककल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व विभागांच्या कामांना गती दिली आहे. मागील 100 दिवसांत जिल्ह्यात विविध विभागानी उत्कृष्ट कामगिरी बजावून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महामुंबईचा विस्तार रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नवे जाळे या परिसरात विणले जात आहे.

नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र सागरी विकास धोरण-2023”मध्ये बंदर विकासाकरीता स्वामित्वधन, अकृषिक कर, वीज शुल्क, मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे. वीजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे.  प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे.  बंदरांच्या करारांचा कमाल कालावधीही 90 वर्षे करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या अर्थसंकल्पात गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे.  दिघी येथील  जेट्टींची कामे प्रगतीपथावर आहेत. काशिद येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी 200 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय मंजुर करण्यात आले आहॆ.  नवी मुंबईत उलवेमध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किंमतीच्या “युनिटी मॉल”चे काम प्रगतीपथावर आहे.

किमान 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन मालवाहू क्षमता असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वात मोठे ‘ग्रीनफिल्ड विमानतळ’ म्हणून पुढे येत आहे. जून 2025 पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा कार्यान्वयीत करण्याची योजना आहे.

राज्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारके यांच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  शासनाने, राज्यभरात रक्तदान मोहीम, अवयव दान, कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जागरुकता आणि उपचार, थायरॉईड अभियान, मोतीबिंदू- अंधत्व प्रतिबंध अभियान आणि स्वच्छ मौखिक आरोग्य अभियान अशी 7 आरोग्य अभियाने सुरू केली आहेत. या अभियानाची जिल्ह्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. तसेच क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, अन्नासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय घेण्याची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे.    महिलांकरिता रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची सुमारे 18 हजार रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.  राज्यात माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. हे चित्र आशादायी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे जलद व प्रभावी वितरण सुलभ होण्यासाठी “अॅग्रीस्टॅक” कृषी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. सरकारने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीप्रमाणे विमा व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे .कोकण किनारपट्टीतील असंख्य मत्स्य व्यावसायिकांना थेट लाभ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सर्व एकत्रित काम करू या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विविध पुरस्कारांचे वितरण

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे  यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. पुरस्कारार्थीची नावे पुढीलप्रमाणे- पोनि /संदिप अभिमन्यू बागुल,  रापोउनि/संजय दिनकर साबळे, पोउनि/तानाजी रामचंद्र वाघमोडे, श्रेणी पोउनि / मोहन दत्ताराम बहाडकर, श्रेणी पोउनि/गजानन पांडुरंग म्हात्रे, श्रेणी पोउनि/गणेश अंकुश भिलारे, सफो / नितीनकुमार धोंडू समजिसकर, सफौ / राजेश दत्तात्रेय मारकंडे, सफौ / जितेंद्र विठ्ठल म्हात्रे,) सफो / सुखदेव यशवंत सुर्यवंशी, सफौ / जितेंद्र दामोदर साटोटे, सफो / नरेंद हासू म्हात्रे, सफौ / किशोर गजानन गुरव, सफो / सुभाष पोसुराम म्हात्रे, सफो / ललीतकुमार वसंत कडू, पोह / 1284 अतुल रामचंद्र वडकर, पोह / 847 संतोष नामदेव चव्हाण, पोना / 328 प्रकाश रामा हालेखाना, पोशि / 805 रितेश बाळकृष्ण यादव, पोशि / 557 संकेत सुधीर पाटील (खेळाडू), पोशि / 1573 शनिराज हणमंत हारगे (खेळाडू)

यावेळी अवयवदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.  यामध्ये प्रितेश राजाराम पाटील,बस्वाराज म.बिडवे यांचा सन्मान केला. महाराष्ट्र राज्aत राबविण्यात येणाऱ्या स्टुडंट पोलीम कॅन कॅडेट (SPC) या कार्यक्रमात भाग घेवून कोंकण परिक्षेत्र स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालय, रोहा चा सन्मान करण्यात आला

0000000

 

 

भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा  निर्धार आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, असा  निर्धार आणि निश्चय  महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करत असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी कार्यरत अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी, जवान उपस्थित होते.

०००

 

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Oplus_131072

मुंबई, दि. ३० : – महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यानिमित्ताने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आदी सर्व महान समाजसुधारकांना विनम्र अभिवादन केले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “महाराष्ट्राची स्थापना ज्यांच्या बलिदानातून सत्यात आली त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. महाराष्ट्राने आपले थोरपण देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान देत सिद्ध केले आहे. महाराष्ट्राने गेल्या ६५ वर्षात उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा ,साहित्य ,सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य हा आपल्या अस्मितेचा आत्मा आहे. ही ओळख जपणे आणि पुढच्या पिढीकडे पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र शुरवीर नरोत्तमांची पावनभूमी आहे. तशीच ती समाजसुधारकांची आणि स्वातंत्र्ययोद्ध्यांची आहे. या राज्याला ज्ञान ,वैराग्य, सामर्थ्य, त्याग, प्रतिभा आणि कला या सद्गुणांचे अलौकिक कोंदण लाभले आहे. सामाजिक प्रबोधनाचा लाभलेला वारसा, राज्यात नांदणारी शांतता, कायदा सुव्यवस्था , नैसर्गिक साधनांचा सदुपयोग करण्याचे नियोजन, प्रतिभावंत नागरिक आणि कष्ट करण्याची तयारी असणारी युवा पिढी यामुळे जागतिक पातळीवर महाराष्ट्राने आपली ओळख निर्माण केली आहे. या सगळ्याच्या पाठबळावर आणि सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित, सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल हा आपला संकल्प आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

कामगार दिनाच्या निमित्तानेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान असल्याचे अधोरेखित करून, महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात कामगार वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कल्याणासाठी आणि अधिकार संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही म्हटले आहे.
000

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

त्यामुळे या सत्रातील सर्व उमेदवारांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेर परीक्षा दि. ५ मे २०२५ रोजी होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

यावर्षी एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान १५ सत्रांमध्ये १९७ परीक्षा केंद्रांवर पार पडली. एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४,२५,५४८ उमेदवारांनी परीक्षा दिली. २७ एप्रिलच्या सकाळी घेतलेल्या सत्रात इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांतून एकूण 27837 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर काही उमेदवार आणि पालकांनी इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी असल्याबाबत तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने राज्य सीईटी कक्षाने  तज्ञांमार्फत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता, २१ प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळले. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून 27837 उमेदवारांची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी अधिकृत www.mahacet.org या वेबसाइटवर भेट देऊन अद्ययावत माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

मुंबई, ‍‍दि. ३० : केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार मानले आहे.

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यासाठी धोरण व योजना आखण्यात मदत होणार असून, स्वतंत्र निधी नियोजन करण्यासही आधार मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे आता इतर मागास प्रवर्गालाही शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा अशा मूलभूत सुविधांचा लाभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री सावे म्हणाले की, या घटकांना खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात सामील होता येणार आहे.  या निर्णयाबद्दल मंत्री सावे यांनी केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा. जैन आर्थिक विकास महामंडळासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. या महामंडळाअंतर्गत कर्जासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सोय करून देण्यात यावी.  कर्ज वाटपाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात यावे. कर्ज वसुली संदर्भात धोरण आखण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

जास्तीत जास्त अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तक्रारींसाठी १८२२५७८६ हा टोल फ्री क्रमांक जास्तीत जास्त लोकांपर्यत पाहोचवावा. पंजाबी साहित्य अकादमी आणि उर्दु साहित्य अकादमीसाठी मिळणाऱ्या निधीचा योजनेअंतर्गत असलेल्या कार्यक्रमासाठी वापर करून जास्तीत जास्त साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिली.

हज यात्रेसाठी १८ हजार ९४९ हाजी जात असून त्यांच्या प्रवासाचे नियोजन, सोयी सुविधा आणि सुरक्षिततेची सोय करावी अशा सूचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी केल्या.

०००

भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक ‘वेव्हज्-२०२५’ महोत्सव

  • भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावर
  • WAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

१९ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रेरणादायी स्वप्न मांडले ते म्हणजे “आपण एका परिषदेपासून सुरुवात करू आणि तिला दावोसच्या धर्तीवर जागतिक परिषद बनवू.” या दृष्टिकोनाला साकार करणारा एक भव्य उपक्रम म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025.

भारताची आर्थिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाची राजधानी, मुंबई 1 ते 4 मे 2025 दरम्यान या अभूतपूर्व जागतिक सोहळ्याचे यजमानपद भूषवणार आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या सहकार्याने हा सोहळा  मुंबईत आयोजित केला आहे. WAVES 2025 हे भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून स्थापित करण्याचे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जिथे सर्जनशीलता, नवप्रवर्तन आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा एकत्र येणार आहे.  जगात प्रथमच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.”

“कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज” या ब्रीदवाक्यासह, WAVES 2025 ही भारतातील पहिली जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषद आहे, जी मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजनासाठी  सज्ज  झाले आहे. हा चार दिवसांचा महोत्सव भारताच्या 54 अब्ज अमेरिकी डॉलरच्या (2026 पर्यंत) मीडिया आणि मनोरंजन बाजारपेठेला नव्या उंचीवर नेण्यासाठी आकारला गेला आहे. या परिषदेत भारताच्या कथाकथन परंपरेला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अॅनिमेशन, VFX, गेमिंग, AR/VR/XR, कॉमिक्स, चित्रपट, माहितीपट, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म आणि प्रसारण यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांशी जोडले जातील. ही परिषद केवळ एक इव्हेंट नाही, तर सर्जनशीलतेचा महासागर आणि नवप्रवर्तनाची लाट आहे, जी भारताला जागतिक सर्जनशील केंद्र बनवण्यासाठी सज्ज झाले आहे.

WAVES 2025 मध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 40 जागतिक मंत्री आणि नेटफ्लिक्स, गुगल, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, सोनी पिक्चर्स, अॅडोब, एपिक गेम्स यासारख्या दिग्गज कंपन्या सहभागी होतील. जागतिक बॉलिवूडचे वरिष्ठ  कलाकार शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, चिरंजीवी, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि दिलजीत दोसांज यांच्या सल्लागार मंडळाने या परिषदेला पाठिंबा दिला आहे. नेटफ्लिक्सचे टेड सरांडोस, अॅमेझॉनचे माईक हॉपकिन्स आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती WAVES परिषदेला जागतिक स्तरावर ओळख देईल. या परिषदेचा मुख्य उद्देश भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे आणि नवप्रवर्तनाला गती देणे आहे. भारत आणि इतर देशांमधील सर्जनशील उद्योगांमधील भागीदारी वाढवणे, AI आणि गेमिंगसारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून उद्योगाला नवे आयाम देणे आणि 2027 पर्यंत 36.1 अब्ज डॉलरची सर्जनशील अर्थव्यवस्था उभारणे हा या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. यामुळे 2–3 लाख रोजगार निर्माणही होतील, सोबतच महिला-नेतृत्वातील स्टार्टअप्स आणि 12–19 वयोगटातील क्रिएटर्सना प्राधान्य देऊन त्यांचा  समावेशकता वाढेल.

WAVES 2025 परिषदेला 1 मे रोजी भव्य सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन…

चार दिवस AI, मीडिया आणि संस्कृतीच्या महोत्सवाने सजणार

WAVES 2025 या बहुप्रतीक्षित महोत्सवाचा प्रारंभ परिषदेच्या पहिल्या दिवशी 1 मे 2025 रोजी भव्य उद्घाटन समारंभाने होणार असून, या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. या वेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. ग्लोबल मीडिया डायलॉग्समध्ये मंत्र्यांसह धोरणे, गुंतवणूक आणि सहकार्यासाठी चर्चा होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत PM-CEO राउंडटेबल आयोजित  होतील, ज्यामध्ये उद्योगांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण संवाद होतील. भारत पॅव्हिलियनच्या लाँचद्वारे नाट्यशास्त्रापासून AI-चालित कथांपर्यंतचा भारताचा कथाकथन वारसा प्रदर्शित होईल. एक्झिबिशन आणि गेमिंग अरेनामध्ये AI, AR/VR/XR, VFX मधील नवकल्पना दिसतील. WAVES बाजार क्रिएटर्स, स्टुडिओ आणि खरेदीदारांसाठी नेटवर्किंगची संधी या आतंरराष्ट्रीय व्यासपीठावर  एक छताखाली उपलब्ध होतील, तर शास्त्रीय आणि फ्यूजन कॉन्सर्ट्ससह सांस्कृतिक कार्यक्रम या दिवसाला अविस्मरणीय बनवतील.

दुसऱ्या दिवशी, 2 मे 2025 रोजी, क्रिएटोस्फीअरमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा थेट अंतिम सोहळा होईल, ज्यामध्ये 32 स्पर्धांमधील 750 फायनलिस्ट सहभागी होतील. यामध्ये फिल्म पोस्टर मेकिंग, यंग फिल्ममेकर्स, बॅटल ऑफ द बँड्स यासारख्या स्पर्धांचा समावेश असेल. नेटफ्लिक्स आणि सोनी पिक्चर्स यांचे मास्टरक्लासेस सर्जनशीलतेला प्रेरणा देतील. WAVES क्रिएटर अवॉर्ड्समध्ये अॅनिमेशन, गेमिंग आणि AI मधील विजेत्यांचा गौरव करण्यात येईल. वेव्हएक्सलरेटर स्टार्टअप्ससाठी पिचिंग आणि मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होईल, तर थॉट लीडर्स ट्रॅकमध्ये जेनरेटिव्ह AI आणि इमर्सिव्ह स्टोरीटेलिंगवर चर्चा होईल. WAVES बाजारात सह-निर्मिती आणि कंटेंट खरेदीसाठी B2B बैठका होतील, ज्या क्रिएटर्स आणि उद्योग दिग्गजांना एकत्र आणतील.

तिसऱ्या दिवशी, 3 मे 2025 रोजी, ग्लोबल मीडिया डायलॉग्स WAVES डिक्लरेशन 2025 च्या समारोपासह चर्चा करतील. वेव्हएक्सलरेटर गेमिंग, AI आणि मेटाव्हर्स स्टार्टअप्ससाठी पिचिंग आणि गुंतवणूक आणेल. क्रिएटोस्फीअरमध्ये XR हॅकाथॉन, AI अवतार चॅलेंज आणि अॅनिमेशन स्पर्धा झोन उपलब्ध असेल. प्रदर्शनात  भारतीय IPs आणि AR/VR/XR तंत्रज्ञान प्रदर्शित होतील. WAVES बाजार जागतिक निर्माते आणि प्रसारकांमधील जुळवणी सुलभ करेल, ज्यामुळे सह-निर्मिती आणि IP खरेदीला चालना मिळेल.

चौथ्या आणि अंतिम दिवशी, 4 मे 2025 रोजी, समारोप समारंभात WAVES च्या प्रभावाचा आढावा घेतला जाईल आणि भविष्य आवृत्त्यांची घोषणा होईल. क्रिएटोस्फीअरमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज विजेत्यांचे प्रदर्शन आणि WAVES अवॉर्ड्स आयोजित केले गेले आहे. वेव्हएक्सलरेटर स्टार्टअप इंडिया अंतर्गत अनुदानाच्या घोषणा होतील, तर भारत पॅव्हिलियन भारताच्या 50 अब्ज+ अमेरिकी डॉलर M&E क्षमतेचा उत्सव साजरा करेल. हा दिवस WAVES च्या यशाचा  मैलाचा दगड ठरेल आणि भारताच्या सर्जनशील भविष्याची दिशा ठरवेल.

WAVES 2025 परिषदेची ची विशेष वैशिष्ट्ये भारत पॅव्हिलियनपासून सुरू झाली, जे बॉलीवूड, प्रादेशिक सिनेमा, OTT आणि गेमिंगमधील नवकल्पना दाखवेल. WAVES बाजार हे कंटेंट क्रिएटर्स, खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी जागतिक ई-मार्केटप्लेस असेल, जिथे सह-निर्मिती आणि IP खरेदी सुलभ होईल. वेव्हएक्सलरेटर गेम स्टुडिओ आणि लॅपविंग स्टुडिओ यासारख्या स्टार्टअप्सना पिचिंग, इनक्यूबेशन आणि अनुदानाद्वारे सक्षम करेल. क्रिएटोस्फीअर 100+ देशांमधील 750 फायनलिस्टसह क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा अंतिम सोहळा साजरा करेल, तर ग्लोबल मीडिय डायलॉग्स आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी व्यासपीठ  प्रदान करेल.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज (CIC) सिझन 1 ही WAVES ची आत्मा आहे. 32 स्पर्धांमधील प्रतिभांना प्रोत्साहन देणारी ही चळवळ 1 लाख नोंदणी आणि 100+ देशांमधील 1,100 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह जागतिक स्तरावर गाजत आहे. फिल्म पोस्टर मेकिंग, यंग फिल्ममेकर्स, WAVES VFX, गेम जेम्स, XR हॅकाथॉन, बॅटल ऑफ द बँड्स आणि मंगा कॉन्टेस्ट यासारख्या स्पर्धांमधून सर्जनशीलतेला  जागतिक ओळख, पुरस्कार आणि नेटवर्किंगच्या  सुवर्ण संधी उपलब्ध होतील.

WAVES 2025 ही केवळ एक परिषद नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि तांत्रिक क्षमतेचा जागतिक महोत्सव आहे. डाव्होस आणि कान्स यांसारख्या परिषदांप्रमाणे, WAVES जागतिक सर्जनशील उद्योगासाठी एक सर्वोत्तम व्यासपीठ बनेल. यामुळे भारताला सर्जनशील उद्योगाचे जागतिक केंद्र बनवताना IP संरक्षण, 2–3 लाख रोजगार आणि जागतिक व्यापार सुनिश्चित  होऊ शकेल. या ऐतिहासिक WAVES 2025 च्या जागतिक परिषदेत  सामील व्हा आणि जागतिक सर्जनशीलतेच्या क्रांतीचे साक्षीदार व्हा!

०००

  • अमरज्योत काैर अरोरा, उपसंचालक  

गो उत्पादन वस्तूंच्या मंत्रालय येथील दोन दिवसीय प्रदर्शनाला उर्त्स्फूत प्रतिसाद

मुंबई, दि. ३०: पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गो उत्पादन दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दोन दिवसीय गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात पंचगव्यांपासून बनवलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या. या प्रदर्शनास मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यांगतांनी भरघोस प्रतिसाद दिला.

३० एप्रिल हा दिवस यावर्षीपासून गो उत्पादन दिन म्हणून साजर करण्यात येत आहे. त्यानिमित्त  मंत्रालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात राज्यातील विविध जिल्ह्यातील गो शाळांच्या प्रतिनिधींनी सुबक आणि उत्कृष्ट वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यामध्ये पंचगव्यांपासून बनवण्यात आलेल्या वस्तू भीमसेन कापूर, बिना बांबू अगरबत्ती, धूप, सांबरणी धूप आदी पुजेच्या साहित्यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त लक्ष्मीची पाऊले, श्रीयंत्र, गणेश मूर्ती, कृष्ण मूर्ती, तोरण, की चैन, लटकन, दिवे, राखी यासारख्या शोभेच्या वस्तू प्रदर्शनाचे आकर्षण होत्या. याबरोबर या प्रदर्शनात उत्तम शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक पंच्यगव्यापासून तयार केलेले तेल, फंगल इन्फेक्शन स्प्रे, पचनशक्ती / रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्क, जखमेसाठी मलम, डोळे आणि कानात टाकण्यासाठी श्रवण थेंब या वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

याशिवाय सौंदर्यवर्धनासाठी सुगंधी उटणे, गोरस सोप, उटणे, दंतमंजन या वस्तू खरेदी करण्याकडे कल दिसून येत होता. याशिवाय गोवऱ्या, गांडूळ खत, शुद्ध तूप या वस्तू देखील होत्या. पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या औषधांचे फायदे यासंदर्भात पुस्तकांचे दालन देखील प्रदर्शनात होते.

या प्रदर्शनात धुळे जिल्ह्यातून श्रीकृष्ण गोशाळा, वाशिमची छत्रपती गोशाळा, नागपूरची गो विज्ञान अनुसंधान केंद्र, अहिल्यानगरची यशोदानंद गोशाळा, सोलापूरच्या पंढरपूर येथील गोपाळनाथ गो शाळा आणि राधेकृष्ण गोशाळा, भिवंडीतील ग्रामीण प्रगती फाउंडेशन गोशाळा, कोल्हापूर शिरोळ येथून वेद खिल्लार गोशाळा, अहिल्यानगरची गो धाम गोशाळा, मुंबईची देवता कला केंद्र, जळगावची सातपुडा परिसर आदिवासी विकास संघ आणि नाशिक येथून गोकुळधाम गो सेवा प्रतिष्ठान या गोशाळांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

०००

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘ढोल गर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई दि. ३०: महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ढोल ताशा पथकांच्या सादरीकरणाचा ढोलगर्जना हा सांस्कृतिक कार्यक्रम दि. १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात राज्यभरातून दहा विविध ढोल ताशांचे पथक आपली कला सादरीकरण करतील. महिला पथकांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे.

ढोल गर्जना या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...