बुधवार, जुलै 2, 2025
Home Blog Page 27

नवी मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी तातडीने मार्ग काढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : नवी मुंबईतील नागरिकांच्या विविध सुविधांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबईतील विकास आराखड्यास मंजुरी, करारपद्धतीने कार्यरत प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेणे, गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करणे, नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा मंजूर करणे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विकास शुल्काच्या रक्कमेबाबत तसेच खारघर ते नेरूळ धक्का सागरी मार्ग बेलापूरमधून न घेता सेक्टर ११ बेलापूर मधून विमानतळाला जोडणे आदी मागण्यांबाबत तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महापालिका आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत आढावा बैठक वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार कपिल पाटील आदी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा महासभेच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी. महापालिकेने होर्डिंग व फेरीवाला धोरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी. तसेच अशा प्रकारचे धोरण महापालिकास्तरावर मंजूर करण्याबाबत विचार करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

बारवी धरणग्रस्तांना ज्या प्रमाणे विविध महापालिकांमध्ये कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे, त्या प्रमाणेच मोरबे धरण व सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेण्यासंदर्भात कालबद्ध आराखडा तयार करावा. ऐरोली जेट्टी चोवीस तास सुरू ठेवणे, शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प बाधित मच्छिमारांना भरपाई देणे, नवी मुंबईतील गावठाण विस्तारामध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांना अधिकृत करणे, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती कमी करणे, नवी मुंबई विमानतळामध्ये स्थानिकांना नोकरी देणे, दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांना पुनर्वसन म्हणून भूखंड देणे आदी विषयांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

खारघर सेक्टर १६ ते नेरूळ जेट्टी या प्रस्तावित सागरी किनारा मार्गातील बेलापूर सेक्टर १५ येथे डबल डेकर रस्ता तयार करता येईल का याचा विचार करावा. तसेच तुर्भे व कोपरखैरणे यांच्यामधील खैरणे गावाजवळ आणखी एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा लवकर मंजूर करावा – वन मंत्री गणेश नाईक

नवी मुंबईतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत. घणसोली येथे खुला रंगमंच कला अकादमी मिनी थिएटर बांधणे, मराठी भाषा भवन उभारणीला गती देणे, घणसोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणे, तसेच विकास शुल्कामध्ये महानगरापालिकेलाही हिस्सा मिळावा. परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाचे नाव बदलून श्री शिव गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ करणे, नागरी सुविधांसाठी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करावेत, आदी विविध मागण्या वन मंत्री नाईक यांनी यावेळी केल्या.

खारघर ते नेरूळ जेट्टी सागरी मार्ग बेलापूरमध्ये न आणता तो सेक्टर ११ मधून विमानतळाच्या दिशेला न्यावा, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेला विकास आराखडा लवकर मजूर करावा, अशी मागणी मंत्री नाईक यांनी यावेळी केली.

बैठकीस नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, यांच्यासह नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग, उद्योग विभाग, एमआयडीसी, मेरी टाईम बोर्ड आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

केमसेफ केमिकल कंपनीतील कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात

मुंबई, दि. १९: केमसेफ केमिकल कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घ्यावे, कंपनीच्या नियोजनानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कक्षात बैठक झाली. यावेळी कामगार उपआयुक्त अभय कुमार गीते, कामगार विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय जनरल कामगार उत्कर्ष संघटनेचे इंदर शेंडगे, गजानन गिरी, कंपनीचे संचालक आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

तळोजा एमआयडीसी मधील केमसेफ कंपनीचे कामावरून काढून टाकलेले अनेक कामगार २० वर्ष अथवा दीर्घ काळापासून कंत्राटी स्वरूपात काम करीत होते. यांना काम न देता नवीन कामगार कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत. यापूर्वी काम करणाऱ्या ६५ कामगारांना कंत्राटी पद्धतीने टप्प्याटप्प्याने कामावर नेमावे, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी दिले.

०००

किरण वाघ/विसंअ/

जेएनपीए येथे योग दिनानिमित्त ‘योग संगम’ कार्यक्रम

मुंबई, दि. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रासाठी नोडल समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरआरएपी – केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, वरळी, मुंबई यांच्या तर्फे ‘योग संगम’ या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन २१ जून २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता, जेएनपीए टाऊनशिप, सीआयएसएफ कॅम्पस, उरण, नवी मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर .गोविंद रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) तसेच भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमात सुमारे दहा हजार योगप्रेमी सहभागी होण्याची शक्यता असून, आयुष मंत्रालयाचे महासंचालक प्रो. रवीनारायण आचार्य यांची उपस्थिती राहणार आहेत.

योग दिनानिमित्त आयोजित होणारा हा उपक्रम आरोग्यप्रद जीवनशैलीचा संदेश देणारा ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना टी-शर्ट, रेनकोट, योगा मॅट मोफत वितरित करण्यात येणार आहे. असून अल्पपोहाराची ही सोय केली आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

योग संगम कार्यक्रमातून महाराष्ट्रात योग आणि हरित उपक्रमांना चालना

यावर्षी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने १० प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यात ‘योग संगम’ हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

या कार्यक्रमाअंतर्गत ‘हरित योग’ आणि ‘योगा पार्क’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वृक्षारोपणालाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून, केवळ जे.एन.पी.ए.मध्ये १ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. राज्यभरात योगप्रसारासाठी व्याख्याने, शिबिरे आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

आर.आर.ए.पी. संस्थेने या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन करत योगाची व्यापक घडी घातली असून, ‘योग संगम’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, निरोगी भारताच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असे मत संस्थेचे सहायक संचालक डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केले.

०००

मोहिनी राणे/ससं/

अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचा अंक प्रकाशित

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे २०२५ या अंकाचे प्रकाशन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव सुचिता महाडिक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकर, अवर सचिव (मावज) अजय भोसले, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लिहिलेल्या कथा, कविता, ललित लेख, सुलेखन मालिका, स्वानुभव, पाककला, भ्रमंती, तंत्रज्ञानाची टेकवारी, मिशन आयगॉट कर्मयोगी, वेव्हज, या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.

०००

अश्विनी पुजारी/ससं/

भुसावळ येथे महावितरण मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक

Milind Kadam M4B

मुंबई, दि. १९ : भुसावळ (जि. जळगाव) येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत फोर्ट येथील उर्जा विभागाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी महावितरण कंपनीचे संचालक प्रदीप भागवत उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, महावितरण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडेही लक्ष देण्यात यावे तसेच कार्यालयीन कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी व स्थानिक पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी यावेळी  सांगितले.

या बैठकीत भुसावळ आणि परिसरातील वीज समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी स्थानिक वीज पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करून, समस्या क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पाहाव्यात, लोकांच्या अडचणी समजून घेत ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, भुसावळ शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज पुरवठा योग्य प्रकारे आणि वेळेवर होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि क्षेत्राच्या गरजेनुसार वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा. महावितरणच्या नवीन मंडळ कार्यालयामुळे भुसावळसह परिसरातील वीज सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख होईल, असा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीस महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, भुसावळ विभागातील  स्थानिक उर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

‘लाईन स्टाफ’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Milind Kadam M4B

मुंबई, दि. १९ : महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी हे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे घटक असून, त्यांच्याशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

फोर्ट येथील ऊर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. या बैठकीस महावितरणचे संचालक प्रदीप भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी,  संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, सुरक्षा साधने व अपघात प्रतिबंधक उपाययोजना कामाच्या स्वरूपामुळे लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने, सेफ्टी शूज, रेनकोट आदी साधने व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक सुरक्षित साधने उपलब्ध करून देण्यात येतील. तांत्रिक पदांचा स्वतंत्र दर्जा व वर्ग वेतनश्रेणीत व वेतन वाढ यासह विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व चॅमरिया यांनी मंत्री लोढा यांची मंत्रालयातील दालनात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी मंत्री लोढा प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने माहिती क्षेत्रातील अग्रगण्य जागतिक कंपनी गुगलच्या सहकार्याने महाराष्ट्रात उद्योगाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावेळी कौशल्य विभागाचे आयुक्त लहुराज माळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे बैठकीला उपस्थित होते.

जगातल्या नऊ देशात गुगलद्वारे एआय प्रशिक्षण सेंटर्स कार्यरत आहेत. स्टार्टअप्स करिता भारतातही अशाप्रकारचे सेंटर स्थापन करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती यावेळी गुगलचे अधिकारी चॅमरिया यांनी दिली.

निवड प्रक्रियेद्वारे उत्कृष्ट ठरणाऱ्या स्टार्टअप्सना यात संधी मिळणार आहे. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र ठरणार असून महाराष्ट्रातील नव्या उमेदीने उद्योग करू पाहणाऱ्या युवकांना या निमित्ताने जागतिक कवाडे उघडणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. सध्या यासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरु असून लवकरच सामंजस्य करार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान एकीकडे स्टार्टअप्ससाठी सेंटर तर आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम ही महाराष्ट्रात सुरु करण्याची तयारी गुगलने दाखवली आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तसेच विविध महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांमार्फत शासन महिलांचे आर्थिक सबलीकरण करीत आहे. या लाभार्थी महिलांना आता आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शासनामार्फत सुरू असलेल्या महिलांसाठीच्या व्याज परतावा योजनेची मुंबई बँकेच्या कर्ज योजनेसह सांगड घालून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासंदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार तथा मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महामंडळाचे प्रतिनिधी, सहसचिव वि. रा.ठाकूर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनविण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी महामंडळ आणि ‘मुंबै बँक संयुक्तपणे हा उपक्रम राबविणार आहे. मुंबईतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आर्थिक साक्षर करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक व  सामुहिक कर्ज देऊन त्यांना उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी मदत केली जाईल. तसेच पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत विविध वैयक्तिक व गट कर्ज योजना राबविण्यात येतात. यामुळे महिलांना स्वत:चा व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी नऊ टक्के इतक्या अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आमदार दरेकर यांनी मुंख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुक्ष्म, लघू उद्योजक बनवून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद केले. मुंबै बँकेच्या विशेष कर्ज धोरण अंतर्गत वैयक्तिक व गटाला एक लाख व त्यापेक्षा जास्त कर्ज नऊ टक्के दराने अदा करण्यात येईल. मुंबई शहर आणि उपनगर येथे 16 लाख इतके लाभार्थी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंभमेळ्यातील कामांचा आढावा

नाशिक, दि. १९ : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभेमळ्यानिमित्त होणाऱ्या विविध कामांचा आढावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला. दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणाऱ्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी कुंभमेळा आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रिया देवचक्के यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, कुंभमेळ्यानिमित्त प्रस्तावित विकास कामे तातडीने सुरू करावीत. दीर्घ कालावधी लागणारी कामे वेळेत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. या कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. आगामी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नव्याने बांधण्यात येणाऱ्या घाटांचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करावे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

यावेळी मंत्री महाजन यांनी साधुग्राम करिता आवश्यक भूसंपादन, रस्ते, पूल, जलशुद्धीकरण प्रकल्प आदींचा सविस्तर आढावा घेतला. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष श्रीमती नायर यांनी विविध कामांची माहिती दिली.

०००

अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर, दि. १९ (जिमाका) : पद्मश्री अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून चित्तमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार व उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले व दर्शन घेतले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सामाजिक वनीकरणचे अजित शिंदे, मनीषा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, साहित्यिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

विधानपरिषद इतर कामकाज

0
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक - मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा...

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....