सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 274

विधानसभा कामकाज

राज्यात नदीजोड प्रकल्पांद्वारे जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. २१: नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील पाणी टंचाईची समस्या सोडवून विदर्भ दुष्काळमुक्त होऊ शकेल. या प्रकल्पांमुळे पाण्याचे प्रादेशिक वाद टळतील आणि पाणीटंचाईच्या भागांना दिलासा मिळेल. हे प्रकल्प राज्याच्या जलसंपत्तीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मोठे पाऊल ठरणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत 293 अंतर्गत च्या चर्चेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड या प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्हयांना होणार आहे. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर आणि व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपलब्ध पाणी साठ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

***

शैलजा पाटील/विसंअ

०००

एआय’ तंत्रज्ञानामुळे शेतीत प्रगतीचा नवा मार्ग – कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे

मुंबईदि. 21 : राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास दर सन 2024-25 मध्ये 8.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. पीक नियोजनउत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन दिले जाणार आहे. मेहनती शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारच्या पाठिंब्यामुळे शाश्वत शेतीची दिशा मिळत असल्याचे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितले..

विधानसभेत 293 अंतर्गत च्या चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की, राज्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापनजमिनीच्या आरोग्याचे संवर्धनआधुनिक शेती पद्धतींचा अवलंब आणि कृषिपूरक उद्योगांना प्रोत्साहन यावर भर देण्यात येत आहे.

कोकण विभागात स्मार्ट प्रकल्पांतर्गत 63 प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहेतर 52 प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. याशिवायखतांवरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने विनंती केली आहे. कृषी व ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी 2,100 कोटी रुपयांचा बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात आहे. शेतमालाच्या मूल्यसाखळीच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून कृषी नवउद्योजकांसाठी नवे मार्ग खुले केले जात असल्याचेही कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

०००० 

शैलजा पाटील/विसंअ

धारावी पुनर्विकासात धारावीकरांना  मुंबईतच घरे मिळणार

माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही

मुंबई, दि. 21 : धारावी पुनर्विकास  प्रकल्प अंतर्गत पात्र झोपडपट्टी धारकांना धारावीत तर अपात्र झोपडपट्टी धारकांना मुंबईतच घरे मिळणार  आहेत. मुंबईतच घर देणारा धारावी पुनर्विकास हा एकमेव प्रकल्प असून धारावीची जागा कोणत्याही उद्योग समूहाला  देण्यात आलेली नाही, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत सांगितले..

विधानसभेत 293 च्या चर्चेला उत्तर देताना श्री शेलार बोलत होते.

माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार म्हणाले, धारावीतील एकुण 430 एकरमधील जागेंपैकी 37 टक्‍के जागेत खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान यारखी मोकळी जागा मुंबईकरांना मिळणार आहे. धारावीतल्या या सगळ्या जागेची मालकी धारावी पुर्नविकास  प्राधिकरण (डिआरपी) या राज्य सरकारने स्‍थापन केलेल्‍या कंपनीकडे असणार आहे. तर डि.आर.पी.पी.एल ही कंपनी पुनर्विकासाची कंत्राटदार म्हणून काम करणार आहे. त्‍यामुळे  कंत्राटदाराला निविदेनुसार जे  फायदे असणारच आहेत त्‍यातील 20 टक्‍के हिस्सा राज्य सरकारला मिळणार आहे.तसेच धारावीतील जवळजवळ 50टक्के जागा ही महापालिकेच्‍या मालकीची आहे तर काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची जागा आहे.  ज्या जागा मालकाची जागा  झोपडपट्टी पुनर्विकासाला घेतली जाते  त्याला त्या जागेच्या रेडीरेकनरच्या 25टक्के एवढी किंमत मिळते. याच नियमानुसार मुंबई महापालिकेसह संबंधित प्राधिकरणांना लाभ मिळणार आहेत

मुंबईतील रेल्वेच्या जमीनींवरील झोपडपट्टीच्या संदर्भात पुनर्वसन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून केंद्र सरकारकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे असेही श्री. शेलार यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

राज्यात पहिले महापुराभिलेख भवन उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. २१: पुराभिलेख संचालनालयाकडून दुर्मिळ व ऐतिहासिक कागदपत्रांच्या जतन व संवर्धनाचे महत्त्वाचे काम करण्यात येते. या कामासाठी पुराभिलेख संचालनालयाची एलफिस्टन महाविद्यालयातील जागा अपुरी पडत आहे. दुर्मिळ व ऐतिहासिक कागदपत्रांचा महत्त्वाचा ठेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील पुराभिलेख संचालनालयाच्या ६ हजार ६९१ चौरस मीटर जागेवर सुसज्ज असे महापुराभिलेख भवन उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले, या प्रस्तावित महापुराभिलेख भवनमध्ये तापमान व आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी कक्ष, प्रती चित्रण शाखा, देश-विदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी संशोधन कक्ष, प्रदर्शन दालन असणार आहे. पुराभिलेख संचालनालय १८२१ पासून कार्यरत असून त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

पुराभिलेख संचालनालयाकडे १७.५० कोटी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. त्यापैकी १० कोटी ५० हजार कागदपत्रे मुंबईत आहेत. सन १८८९ पासून एलफिस्टन महाविद्यालयाच्या इमारतीत या कागदपत्रांच्या जतन व संवर्धनाचे काम अव्याहतपणे सुरू आहे. मात्र जागेअभावी या कागदपत्रांचे जतन व संवर्धनावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे शासन महापुराभिलेख भवन उभारत आहे, असेही श्री शेलार यांनी सांगितले.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी विविध योजना-  ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. २१: राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकरी बांधवांना  दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत 293 अंतर्गत च्या प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सौर कृषी पंप योजनेंतर्गत आतापर्यंत 1 लाख 84 हजार सौर पंप बसविण्यात आले आहेत. येत्या काळात 2 लाख 75 हजार सौर कृषी पंप प्रस्थापित करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे 14 लाख एकर जमीन सिंचनाखाली आली आहे. विलंब करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई  करण्यात आली असल्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत राज्यात 700 दवाखाने स्थापन करण्यात आले असून, त्यापैकी 432 कार्यान्वित आहेत. या दवाखान्यांद्वारे 44 लाख 96 हजार 883 बाह्यरुग्णांना सेवा देण्यात आली आहे, तसेच 5 लाख 24 हजार 599 रुग्णांचे मोफत लॅब टेस्टिंग करण्यात आले आहे.

राज्यामध्ये 2 कोटी 52 लाख लाडक्या बहिणी पात्र झाल्या त्या लाडक्या बहिणींना  फेब्रुवारीमध्ये दोन कोटी 47 लाख 27,995 लाभार्थ्यांना लाभ दिला आहे.

महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली आहे. तसेच यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

***

काशीबाई थोरात/विसंअ

०००

विधानसभा प्रश्नोत्तरे

मोठ्या इमारतीमधील तात्पुरत्या बांधकामाबाबत दक्षता घेणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : मुंबईतील सिद्धार्थ नगर येथील घटनेनंतर अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या बांधकामांवर अधिक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात मोठ्या इमारतींशी संबंधित तात्पुरत्या व्यवस्थांमध्ये अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबतचा सदस्य डॉ. ज्योती गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला, तर सदस्य अमीन पटेल यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले, मुंबईतील सिद्धार्थ नगर येथे मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपातील पाण्याची टाकी फुटल्याची घटना घडली. पाणी भरत असताना पाण्याचा दाब वाढल्यामुळे टाकी फुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेत नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले.

संबंधित ठेकेदाराने मृत मुलीच्या कुटुंबाला अडीच लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे, तसेच जखमींवरील उपचाराचा खर्चही उचलला आहे.महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, ही टाकी तात्पुरत्या स्वरूपाची होती आणि कामगार कॅम्पसाठी तयार करण्यात आली होती. मृत मुलगी किंवा जखमींपैकी कोणीही महानगरपालिकेचे कर्मचारी नव्हते असेही त्यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

मुंबईतील रस्त्यांबाबत उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, अशी माहिती उद्येाग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर सदस्य अमित साटम, अमित देशमुख, आदित्य ठाकरे, योगेश सागर, मुरजी पटेल,अमीन पटेल, वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असून काही कामांमध्ये तडे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे. दोषयुक्त कामाचे प्रमाण एकूण कामाच्या ०.४ टक्के इतके असून, दोषयुक्त कामांसाठी कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर प्रत्येकी ३.३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोषयुक्त काम कंत्राटदाराकडून स्वखर्चाने नव्याने करून घेतले जात आहे. तसेच, पर्यवेक्षण करणाऱ्या ९१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवण्यात आला आहे.

या रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचेही उद्येाग मंत्री सामंत यांनी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ

मुंबईतील सर्व होर्डिंगचे तीन महिन्यात ऑडिट पूर्ण करणार – मंत्री उदय सामंत

 मुंबई, दि. २१ : मुलुंड टोल नाक्यावरील होर्डिंग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) असून, महानगरपालिकेची परवानगी घेण्याच्या अटीवर एमएसआरडीसीने एजन्सीला होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, संबंधित एजन्सीने महानगरपालिकेकडून परवानगी न घेताच होर्डिंग लावल्यामुळे महापालिकेने कारवाई केली आहे. मुंबईतील सर्व होर्डिंगचे समग्र लेखा परीक्षण तीन महिन्यांत पूर्ण केले जाणार असून, त्याबाबतचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले आहे.

याबाबतचा प्रश्न सदस्य अमित साटम यांनी उपस्थित केला तर सदस्य योगेश सागर, पराग अळवणी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री सामंत म्हणाले, मुलुंड टोलनाक्यावरील जाहिरात फलक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा प्रक्रियेद्वारे उभारले आहेत. मात्र या जाहिरात फलकांबाबत महानगरपालिकेने तपासणी केली असता, संबंधित फलकांसाठी मुंबई महानगरपालिकेची मान्यता घेण्यात आलेली नसल्याचे आढळून आले असल्याने जाहिरात फलकांवर प्रदर्शित जाहीरातींचे त्वरित काढून टाकण्यात आला आहे. मुलुंड टोल नाक्यावरील होर्डिंगवर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती प्रसारित होणार नाही. परवानगीशिवाय माहिती प्रसारित केल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : ठाणे जिल्ह्यातील मौजे मांडा येथील श्री. विनायक आशिष को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीवर इंडस कंपनीने मोबाइल टॉवरची उभारणी केली आहे. या टॉवरमुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार येथील नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार या इमारतीवरील टॉवर काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या मोबाईल टावर कारवाई बाबत सदस्य नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य भास्कर जाधव, कृष्णा खोपडे, वरुण सरदेसाई यांनीही सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री सामंत म्हणाले, मोबाईल टॉवर उभ्या करणाऱ्या इंडस कंपनीने रहिवाशांचा विरोध जुगारून महापालिकेद्वारा सील केलेल्या टॉवरचा सील तोडून विनापरवानगी प्रक्षेपण सुरू केले. ही बाब कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या निदर्शनास येताच पालिकेने सदर टॉवर अनधिकृत घोषित करून निष्कासित करण्याची कारवाई सुरू केली आहे. आता या टॉवरला काढून टाकण्याचीच कारवाई करण्यात येणार आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

 

 

 

 

विधानसभा लक्षवेधी

जुने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास नाबार्डच्या साह्याने कृती कार्यक्रम – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. २१ :- सिंचनासाठी शेतकऱ्यांना नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी नवीन योजन राबवित असताना जुने प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निरा देवधर प्रकल्प संदर्भात सदस्य उत्तमराव जानकर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती

जलसंपदा मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले की, सिंचन क्षेत्र वाढावे आणि शेतकऱ्याना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जलसिंचनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास प्राधान्य दिले आहे. निरा देवधर प्रकल्पाच्या कामाला गती दिली जाईल. या प्रकल्पावर जानेवारी २०२५ अखेर १२४३.०४ कोटी इतका खर्च झाला असून २७३३.८० एवढी तरतूद करण्यात आली आहे. नीरा देवधर प्रकल्पासाठी सन २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात २७४ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे.  त्यानुसार प्रकल्पाच्या उर्वरित कामांच्या  निविदा कार्यवाही हाती घेण्याचे घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

पाणथळ व क्षारयुक्त जमिनीच्या समस्या सोडविण्यासाठी बंदिस्त चर योजना राबविणार– जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

बई, दि. २१ :-   पाण्याचा  अतिवापर, पाणी निचरा न होणे यामुळे राज्यातील काही भागात पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी  जलसंपदा विभागामार्फत बंदिस्त चर योजना राबविण्यात येणार असल्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

सदस्य राहुल कुल यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, राज्याच्या ज्या जिल्ह्यात फार पूर्वीपासून सिंचन सुविधा निर्माण झाल्या. अशा ठिकाणी पाणथळ व जमीन क्षारपड प्रमाण वाढले आहे. अति पाणी वापरामुळे जमीन खालावलेल्या भागात बंदिस्त चर योजना  प्रभावी ठरणार असल्याने या योजनेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आता जुने झाले आहेत. या बंधाऱ्यांचे बॅरेजेस बंधाऱ्यांमध्ये रूपांतर केले जाईल. यामुळे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढेल. तसेच बुडीत बंधाऱ्यांचे ही बॅरेजेस बंधाऱ्यांमध्ये रूपांतर केल्यास या बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढेल.

पुणे महानगरपालिकेतील पाणी वापरासंदर्भातही महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात येईल. तसेच पुरंदर तालुक्यातील खोपटेवाडी योजना दुरुस्तीच्या कामाबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल असे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

वसई -विरार महापालिका क्षेत्रातील निष्कासित इमारतींच्या पुनर्वसनाबाबत धोरण ठरविणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 21 : वसई- विरार महानगरपालिकेतील नालासोपारा पूर्व भागातील मौजे आचोळे येथे मलजल प्रक्रिया केंद्र आणि डम्पिंग ग्राउंड करिता आरक्षित जागा होती. या जागेवरील ४१ इमारतींवर न्यायालयाच्या निर्देशानुसार निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली. इमारतींच्या निष्कासनामुळे जवळपास २५०० कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. या इमारतींमधील कुटुंबाच्या पुनर्वसनाची शक्यता पडताळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. त्यानुसार पुनर्वसनाबाबत धोरण ठरविण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले .

वसई – विरार शहरातील या निष्कासित इमारतींच्या पुनर्वसनाबाबत सदस्य राजन नाईक यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य पराग अळवणी यांनीही सहभाग घेतला.

सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उद्योग मंत्री सामंत म्हणाले, इमारतींच्या पुनर्वसनाबाबत भूखंड भूसंपादन आणि पुढील कार्यवाहीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. यासाठी म्हाडा, सिडको आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या यंत्रणांना सोबत घेण्यात येईल. धोरण ठरविण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही बैठकही घेण्यात येईल.

0000

निलेश तायडे/विसंअ

परभणी शहरातील नागरी सुविधांची कामे पूर्ण करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि. 21 : परभणी शहरामध्ये नगर विकास विभागाच्या अमृत २ अभियानांतर्गत समांतर पाणी पुरवठा योजना, भूमिगत मलनिःसारण योजना या नागरी सुविधांच्या प्रस्तावाला राज्यस्तरीय सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. शहरातील ही कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात घेण्यात येईल. या कामांना निधीची उपलब्धता करून कामे पूर्ण करण्यात येतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

परभणी शहरातील नागरी सुविधांच्या कामांबाबत सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या सूचनेच्या उत्तरात उद्योग मंत्री सामंत म्हणाले, पाणी पुरवठा योजनेला १५७.१५ कोटी खर्च आहे. योजनेसाठी ३० टक्के हिस्सा महापालिकेचा असणार आहे. महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत परभणी महापालिकेस १००० आसन क्षमतेचे नवीन नाट्यगृहाचे बांधकाम करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन १० कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे. नाट्यगृहाचे सद्यस्थितीत स्थापत्यशी निगडित ८० टक्के कामे पूर्ण झाले असून १० कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. नाट्यगृहाचा एकूण खर्च २३.७५ कोटी पर्यंत वाढला असल्याचेही त्यांनी सांबितले.

0000

निलेश तायडे/विसंअ

देवस्थान इनाम जमिनीबाबत कायदा करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २१ :  देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली  समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर यासंदर्भात कायदा करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. देवस्थान इनाम जमीन संदर्भात सदस्य गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

या लक्षवेधीच्या उत्तरात अधिक माहिती देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीत स्थानिक आणि देवस्थान व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींचा  समावेश केला जाईल. देवस्थानाच्या जमिनी शेतकऱ्यांना मिळाव्यात ही शासनाचीही  भूमिका आहे. जमिनी वर्ग १ करण्याबाबतही शासन सकारात्मक आहे. तसेच केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड कायद्याचा परिणाम देखील देवस्थानाच्या जमिनींवर होऊ शकतो, त्यामुळे त्या अनुषंगानेही विचार केला जात असल्याचेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

देवस्थान इनाम जमिनीचे दोन प्रकार असून ज्या जमिनी देवस्थानला थेट दान करण्यात आल्या आहेत अशा जमिनीला सॉइल ग्रँट म्हणतात तर ज्या जमिनीबाबत जमिनीचा शेतसारा वसुल करण्याचे अधिकार देवस्थानांना दिले आहेत त्या जमिनींना रेव्हेन्यू ग्रँट असे म्हणतात असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि २१ :  शासकीय जमिन व देवस्थान इनाम जमिनीवर झालेली अतिक्रमणे महसूल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने  हटवली जातील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले.

सदस्य मोनिका राजळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय जमीन व देवस्थान इनाम जमिनीवर अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसीलदार, पोलीस विभाग आणि स्थानिक प्राधिकरण यांची बैठक घेऊन यासंदर्भात कार्यवाही केली जाईल.

ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीत असलेल्या अतिक्रमणांसाठी स्थानिक प्रशासनाला जबाबदारी सोपवली जाईल. महसूल विभागाच्या अखत्यारितील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांवर असेल. तर गृह विभागाच्या निर्णयानुसार, अनधिकृत धार्मिक स्थळांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल  असेही त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.२१ :- जिवती (जि. चंद्रपूर) येथील शेतकऱ्यांच्या वनजमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात महसूल, वन, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सदस्य देवराव भोंगळे यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

यासंदर्भात अधिक माहिती देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल विभागामार्फत १९७३ ते १९९१ या कालावधीत  शेतकऱ्यांना जमिनींचे पट्टे  देण्यात आले. या प्रकरणी न्यायालयात दावा दाखला झाला. न्यायालयाने महसूल आणि वन विभागाने या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्वेक्षण केले असता ही जमीन वनविभागाची असल्याची नोंद आढळून आली.

येथील शेतकऱ्यांना न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. ही जमीन वन विभागाची असल्याने  वन विभागाला पर्यायी जमीन देता येईल का याबाबत  विचार केला जाईल. याबाबत केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

संजय गांधी उद्यानातील अनधिकृत बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयात वन विभागाकडून प्रतिज्ञापत्र – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. 21 : ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरातील मामा-भांजे दर्ग्याजवळील अनधिकृत बांधकामांविरोधात हजरत पीर मामा भांजे दर्गा ट्रस्टच्या सदस्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याने सध्या कारवाईला स्थगिती मिळाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वन विभागाकडून मा. उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

याबाबत सदस्य संजय केळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

वन मंत्री नाईक म्हणाले, दि. २० मार्च २०२३ रोजी भारतीय वायुदल तळ (कान्हेरी हिल) समन्वय समितीच्या बैठकीत मामा-भांजे दर्ग्याजवळील अनधिकृत बांधकाम निष्कासनावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर वन विभागाने दर्गा ट्रस्टविरोधात गुन्हा नोंदवून ५६१.६० चौ.मी. अतिक्रमण ८ दिवसांत काढण्याचे आदेश दिले.

मात्र, हजरत पीर मामा भांजे दर्गा ट्रस्टने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याने अतिक्रमण निष्कासनास २५ ऑगस्ट २०२३ रोजी अंतरिम स्थगिती मिळाली. ही स्थगिती ११ ऑक्टोबर २०२३ च्या सुनावणीतही कायम ठेवण्यात आली. वन विभागाने प्रतिज्ञापत्र दाखल केले असून प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असेही त्यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड प्रकरणी चौकशी करून कारवाई – वनमंत्री गणेश नाईक

 मुंबई, दि. २१: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला,पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचे काम झाले. या कामामध्ये अपहार झाल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीवर चौकशी करून वनक्षेत्रपाल यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात सहभाग असलेल्या सर्व घटकांची अधिक सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड अपहारबाबत सदस्य डॉ बाबासाहेब देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य समाधान अवताडे यांनी सहभाग घेतला.

उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री गणेश नाईक म्हणाले, याबाबत चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे. मात्र अजून एक चौकशी अहवाल प्राप्त होणार असून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर निश्चित कारवाई करण्यात येईल. पूर्ण तपासणी करून आणि लोकप्रतिनिधींकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

०००

निलेश तायडे/विसंअ

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग घटकावर कारवाई करणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. २१ : औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जे उद्योग घटक नियमांचे उल्लंघन करतील त्या उद्योग घटकांवर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सदस्य सना मलिक यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी सांगितले.

मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, आरएनसी प्लांटच्या संदर्भातही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमानुसार प्लांट बंदिस्त असावा जेणेकरून धूळ प्रदूषण टाळता येईल. पाच मीटर रुंदीच्या पट्ट्यात झाडांची लागवड करणे, धूळ उडू नये म्हणून रस्ते काँक्रिट किंवा डांबरयुक्त करणे आणि स्प्रिंकलर्स बसवण्यासह इतर उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे परवानगी देण्यात आलेल्या उद्योग घटकांची नियमित तपासणी केली जाते. या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते, असेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

मुंबईमधील देवनार, गोवंडी, वाशी नाका, तुर्भे आणि एम/पूर्व परिसरात सहा व्यवसायिक स्वरूपाचे व तीन स्वरूपाचे असे ९ आर.एम. सी. प्लांट अस्तित्वात आहेत. या आर एम सी प्लांटला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याबाबत अटी व शर्तीनुसार संमती प्रदान केली आहे.  या प्लांटबाबत आलेल्या  तक्रारीची दखल घेऊन या उद्योगाची पाहणी करण्यात आली. पाहणीप्रसंगी आढळलेल्या त्रुटी संदर्भात या उद्योग घटकावर कारवाई करण्यास येत आहे .

अणुशक्ती नगर मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या उद्योग घटकासंदर्भात सदस्य सना मलिक यांनी उपस्थित केलेले मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी व तपासणी केली जाईल. तसेच याबाबत योग्य ती आवश्यक कार्यवाही  केली जाईल, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले

००००

एकनाथ पोवार/विसंअ

चारकोप येथील म्हाडा निवासी वास्तूत खोल्यांच्या एकत्रीकरणावर कारवाई करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 21: चारकोप येथील सेक्टर एकमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था ही म्हाडाची निवासी वास्तू आहे. या निवासी वास्तूत स्थळ पाहणी केल्यानंतर काही मालकांनी खोली क्रमांक 14 ते 16 एकत्रित करून प्रार्थना स्थळ सुरू केल्याचे दिसून आले. या एकत्रिकरणविरुद्ध मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा (एमआरटीपी) नुसार कारवाई करण्याबाबत पडताळणी करुन कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

चारकोप येथील या प्रकरणी सदस्य योगेश सुतार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या सूचनेच्या उत्तरात मंत्री देसाई म्हणाले, चारकोप येथे नशेमन सहकारी गृहनिर्माण संस्था ही म्हाडाची निवासी वास्तू आहे. यामध्ये 135 खोल्या आहेत. यापैकी 14 ते 16 क्रमांकाच्या खोल्यांचे एकत्रीकरणबाबत 18 मार्च 2025 रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र सुनावणीला संबंधित कुणीही उपस्थित राहिले नाही किंवा लेखी सुद्धा कळविले नाही. त्यामुळे पुढील एक महिन्याच्या आत या एकत्रिकरणविरुद्ध कारवाई पूर्ण करण्यात येईल , असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

0000

निलेश तायडे/विसंअ

अंधेरी पूर्व भागातील डीपीरस्ते खुले करण्याची कार्यवाही करण्यात येईल – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : अंधेरी पूर्व भागामध्ये एकूण १३२ विकास नियोजन (डीपी) रस्ते आहेत. यापैकी १२ विकास नियोजन रस्त्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या संबंधित घरे आहेत. हे रस्ते खुले करण्याची कार्यवाही शासन करेल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

अंधेरी पूर्व भागातील १२ डीपी रस्त्यांबाबत सदस्य मुरजी पटेल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उद्योग मंत्री सामंत म्हणाले, अंधेरी पूर्व भागातील डीपी रस्त्यांवर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाशी संबंधित घरे आहे. हे रस्ते खुले करण्यासाठी ५५० घरांची आवश्यकता आहे. यासाठी पहिल्या १०० घरे देण्यात येतील. तसेच उर्वरित ३६० घरकुले देऊन वर्षभरात हे संपूर्ण रस्ते खुले करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रभागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून या पायाभूत सुविधांसाठी निष्कासित कराव्या लागणाऱ्या पात्र झोपडपट्टी धारकांना प्रकल्प बाधित सदनिका देण्यात येतात. अशाच पद्धतीने या डीपी रस्त्यावरील पात्र झोपडपट्टी धारकांनाही घरकुले देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.

0000

निलेश तायडे/विसंअ

वाडा-भिवंडी रस्त्याचे काम गतीने करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. २१ :  वाडा – भिवंडी रस्त्याचे काम गतीने करून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत सांगितले.

या संदर्भात सदस्य शांताराम मोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

या लक्षवेधीच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले, या रस्त्याच्या कामाकरता आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता आणि  रेडी मिक्स काँक्रिट प्लांट उभारण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. वाडा ते भिवंडी या रस्त्याच्या ५५.६१० कि.मी लांबी पैकी  डाव्या बाजूच्या मार्गिकेच्या सर्वसाधारणपणे ८ किमी  लांबीच काम प्रगतीत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. या रस्त्याचे प्रगतीत असलेले ८ किमी लांबीतील काम पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन  आहे. तर मनोर वाडा-भिवंडी या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदराला दिल्या असल्याचेही मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देताना दक्षता घेणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. २१: पनवेल महापालिका हद्दीतील सिडकोच्या कार्पोरेट पार्क येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाला सिडकोकडून देण्यात आलेली परवानगी तपासण्यात येईल. ही परवानगी किती कालावधीसाठी देण्यात आली, याची तपासणी करण्यात येईल. राज्यात यापुढे जास्त कालावधीसाठी सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याविषयी दक्षता घेण्यात येईल,असे गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

धार्मिक कार्यक्रमाच्या परवानगी बाबत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, पनवेल महापालिका हद्दीतील सिडको शेजारी असलेले मोकळ्या भूखंडावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आयोजकांच्या मागणीनुसार ६०० पोलीस बंदोबस्ताकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी परवानगी दिल्यापेक्षा जास्त लोक जमले होते. अशा धार्मिक कार्यक्रमांना यापुढे परवानगी देताना काळजी घेण्यात असेही त्यांनी सांगितले.

0000

निलेश तायडे/विसंअ

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई: २१ ऑक्टोबर २०२३ – चांदिवली विधानसभा क्षेत्रात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. या परिसरात मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या संदर्भात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य दिलीप लांडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले की, सन २०२३ आणि २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कारवाई केली आहे. पोलिस अहवालानुसार, २०२३ मध्ये २६ गुटखा प्रकरणे नोंदवली गेली, तर २०२४ मध्ये १४ प्रकरणांवर कारवाई झाली. मटका, जुगार आणि ऑनलाईन लॉटरीवर देखील एनडीपीएस अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांधी नगर, काजुपाडा आणि परिसरातील अवैध गुटखा विक्री संदर्भात कारवाई करण्यात आली आहे. यानंतर, राज्य सरकारने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात विशेष पोलीस पथक तैनात केले जाणार आहे.तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणि जवळ बाळगण्याविरुद्ध एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २०२४ मध्ये अमली पदार्थ कायद्याअंतर्गत १५,८७६ गुन्हे दाखल झाले असून १४,२३० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासोबतच, अमली पदार्थ ताब्यात बाळगणे आणि वाहतूक करण्याच्या कारणास्तव २,७३८ गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यात ३,६२७ आरोपींना अटक झाली आहे. एकूण ४,२४०.९० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

राज्यात शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी अंमली पदार्थविरोधी पोस्टर आणि जन जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामुळे समाजात अंमली पदार्थांच्या वापराविरुद्ध जनजागृती करण्यात येत आहे.

0000

 साखर गावातील घटनेत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही – गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

मुंबई, दि. २१ : पुणे जिल्ह्यात राजगड मधील साखर या गावी जमावाने केलेल्या दगडफेक घटनेबाबत भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियमनच्या विविध कलमांतर्गत ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नसल्याचा इशारा गृहे (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

साखर गावातील या प्रकाराबाबत सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या सूचनेच्या उत्तरात माहिती देताना राज्यमंत्री भोयर म्हणाले, किरकिटवाडी फाटा येथे राहणाऱ्या मुलाने औरंगजेबविषयी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामला ठेवलेल्या स्टेटसचे स्क्रीन शॉट राजगड तालुक्यातील व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले होते. याप्रकरणी काही संघटनांनी वेल्हे पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. त्यानुसार या मुलाच्या पालकाकडून पोस्ट चुकीची असल्याचे मुलास सांगून ही पोस्ट मुलाने डिलीट केली.

साखर गावात बलिदान मास कार्यक्रमादरम्यान जमावाने प्रक्षोभक भाषणे दिली. याप्रकरणी पोलिसांनी विरोध केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक करून शासकीय वाहनाचे नुकसान केले. यामध्ये दोन पोलीस अंमलदार जखमी झाले. पोलिसांनी वेळीच अटकाव करून परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित केली, असेही गृहराज्यमंत्री डॉ . पंकज भोयर यांनी सांगितले.

0000

निलेश तायडे/विसंअ

शिरसोनपाडा येथील दुर्घटनेसंदर्भात कंत्राटदारावर गुन्हा दाखल – पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे

मुंबई, दि. २१ :-  डहाणू (जि. पालघर) तालुक्यातील शिरसोन पाडा येथे पाण्याच्या टाकीवरून पडून जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलींचा मृत्यू व एक मुलगी जखमी झाली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन मुलींच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत देण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीचे काम केलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी दिली.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर साकोरे यांनी सांगितले की, या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली असता पाण्याचा टाकीचा प्लॅटफॉर्म कमकुवत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात

दोषी  असलेल्या एका कंत्राटी अभियंत्याची सेवा समाप्त तर  उप विभागीय अभियंता यांच्यावर प्रशासकीय कारवाई आणि कार्यकारी अभियंता यांची  चौकशी  करण्यात येत आल्याचेही त्यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा संदर्भात राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले, जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत असलेल्या ५६२ नळ पाणी पुरवठा योजनांपैकी १५२ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून उर्वरित ४१० नळ पाणी पुरवठा योजनांची कामे विविध टप्प्यावर प्रगतीपथावर आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या २६ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी एक योजनेचे काम पूर्ण झाले असून २५ नळ पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या २६ योजनांची कामे वेगवेगळ्या ६ कंत्राटदारांमार्फत  करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेली ५६२ योजनांची कामे वेगवेगळ्या ११० कंत्राटदारांमार्फत करण्यात येत आहेत.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील ५२ गावातील पाणी पुरवठाबाबत देखभाल  दुरुस्ती व्यवस्थापन महामालिकेमार्फत करण्यात येत आहे. तसेच उर्वरित ग्रामीण क्षेत्रातील १७ गावांसाठी जिल्हा परिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिकेचे प्रतिनिधी मिळून संयुक्त समिती स्थापन करावी व या योजना कार्यान्वित करून जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर साकोरे  यांनी सांगितले.

या संदर्भात सदस्य राजेंद्र गावित यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

 

 

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन देण्यात येणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि.२१ : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी यंदाचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याविषयी सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, काही शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी आवश्यक माहिती वेळेत दिली नव्हती. त्यामुळे शासनाने यासंदर्भात नोटीस काढून संबंधित महाविद्यालयांना सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी आवश्यक माहिती दिली असून, पुढील काळात विद्यावेतन वेळेवर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य शासन सातत्याने लक्ष देत आहे, असेही त्यांनी  सांगितले.

यावेळी सदस्य विक्रम काळे, राजेश राठोड यांनी याविषयीच्या चर्चेत सहभागी नोंदवला.

००००

राजू धोत्रे/विसंअ

छत्रपती संभाजीनगर येथील घाटीतील नवीन शस्त्रक्रिया इमारतीच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई,दि. २१ : छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारण्यासाठी ७६५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया राबवून इमारत उभारणी करण्याच्या बांधकामास सुरुवात केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील घाटीतील नवीन शस्त्रक्रिया इमारतीच्या उभारणीसंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, निविदा प्रक्रियेसाठी एका महिन्याचा कालावधी असेल, आणि त्यानंतर तातडीने काम सुरू करण्यात येईल. शासनाने प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल. घाटी रुग्णालयाच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

या वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग, रोबोटिक सर्जरी अशा अनेक उपचार केले जातात म्हणून दरवर्षी २५ हजारहून अधिक बाह्यरुग्ण उपचारासाठी येत असतात. विशेषतः खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह विविध भागांतील गरीब आणि गरजू रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयाचा विस्तार आणि आधुनिकीकरण होणे अत्यावश्यक असल्याने येत्या काळात नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांसह मराठवाड्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन सुपर स्पेशालिटी विभागामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, गरजू रुग्णांना चांगल्या उपचार आणि सुविधा मिळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य संजय केनेकर, प्रसाद लाड यांनी या चर्चेत सहभाग नोंदवला.

०००००००

राजू धोत्रे/विसंअ

शहरातील कुपोषीत माता बालकांनाही मिळणार पोषण आहार –  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 21 : ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन पोषण आहार योजना राबवते. त्याच प्रमाणे आता शहरी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शहरातील मुलांनाही पोषण आहार योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य चित्रा वाघ  यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तटकरे बोलत होत्या.

देशात कुपोषीत माता आणि कुपोषीत बालक यांना चौरस आहार मिळावा यासाठी केंद्र शासनातर्फे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवण्यात येत असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या की, अदिवासी भागातील कुपोषण यामुळे कमी झाले आहे. या चौरस आहाराच्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी अदिवासी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसेच राज्यातील प्रत्येक गरोदर माता, बालक, स्तनदा माता यांना चौरस आहार मिळावा ही शासनाची भूमिका आहे. चौरस आहारामध्ये पुरवण्यात येणाऱ्या आहाराची वेळोवेळी तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्या आहारात काही त्रृटी आढळल्यास तो परत पाठवला जातो. तसेच कुपोषीत बालक, माता यांना पुरक आहारही पुरवण्यात येतो अशी माहिती मंत्री तटकरे यांनी सभागृहात दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

गैरप्रकार रोखण्यासाठी डीबीटी व ऑनलाईन निवड प्रक्रिया – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई,  दि. 21 : कृषी औजारे खरेदी योजना तसेच कृषीच्या इतर योजनांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नयेत आणि गरजू लाभार्थ्यांनाच त्याचा लाभ व्हावा यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) तसेच लाभार्थींची संख्या जास्त असल्यामुळे लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जात असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य जयंत आसगावकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गोरे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये अमोल मिटकरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

कृषी औवजारांच्या खरेदी योजनांमध्ये आता आधी औवजारे खरेदी करून त्याची पावती द्यावी लागते असे सांगून मंत्री गोरे म्हणाले की, या औवजारांच्या खरेदीनंतर अनुज्ञेय असलेले अनुदान लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे दिले जाते. लाभार्थ्यांची निवड करताना कागदपत्रांची आवश्यकता असते. पण, आता कमीतकमी कागदपत्रे सादर करावी लागतात. जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था असल्यामुळे जिल्हा परिषदांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांवर किती निधी खर्च करावा हे ठरवण्याचे अधिकारी जिल्हा परिषदांना आहेत. याविषयी शासनाने कोणत्या घटकावर किती टक्के निधी खर्च करावा याविषयी काही नियम घालून दिले असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी सभागृहात दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

हिंगोली जिल्ह्यातील १८० पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. 21 : हिंगोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या 616 पाणी पुरवठा योजनांपैकी 180 योजनांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डिकर बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य एकनाथ खडसे, सदाशिव खोत, हेमंत पाटील यांनी सहभाग घेतला.

हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावातील पाणी पुरवठा योजना 1 कोटी 20 लाखाची होती असे सांगून राज्यमंत्री बोर्डिकर म्हणाल्या की, ही योजना 98 टक्के पुर्ण झाली असून यामध्ये काही त्रृटी आढळल्या आहेत. मुदतीमध्ये या त्रृटी दूर न केल्याने संबंधित ठेकेदारास 1 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील 190 योजनांची कामे 75 ते 99 टक्के झाली असून 131 योजनांची कामे 50 ते 75 टक्के झाली  असल्याची माहितीही राज्यमंत्री बोर्डिकर यांनी सभागृहात दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 हेमंतकुमार चव्हाण/विंसंअ

एमआयडीसीतील अविकसित रिक्त भूखंडांबाबत धोरण आणणार – राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई, दि. 21 : राज्यातल्या अनेक एमआयडीसीमध्ये अविकसित भूखंड आहेत. हे भूखंड परत घेण्याची तरतूद असली तरी त्यामध्ये काही अडचणी आहेत. या सर्व अडचणी दूर करून या भूखंडांबाबत धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री नाईक बोलत होते. यावेळी सदस्य एकनाथ खडसे, परिणय फुके, दादाराव केचे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीचा विकास करण्यात येत असल्याचे सांगून राज्यमंत्री नाईक म्हणाले की, ज्याठिकाणी भूखंडाचा विकास कालावधी संपलेला आहे. ते भूखंड परत घेण्याविषयी कारवाई करण्यात येत आहे. नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत कालबद्ध कारवाई करण्यात येईल. अमरावती जिल्ह्यातील एमआयडीसीविषयीही ठोस कार्यवाही करण्यात येईल. तसेच आर्वी येथील एमआयडीसीचे प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री नाईक यांनी सभागृहात दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

मुला – मुलींचे वसतिगृह उभारण्याला समाज कल्याण विभागाचे प्राधान्य -मंत्री संजय शिरसाट

कोल्हापूर, दि. २१ (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !! हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यरत राहणार असून भविष्यात शिक्षणासाठी मुला – मुलींचे वसतिगृह उभारण्याला हा विभाग प्राधान्य देईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.

माणगाव परिषदेच्या 105 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अशोक माने होते.

मंत्री शिरसाट म्हणाले की, माणगाव परिषदेपासून बाबासाहेबांच्या रुपाने संपूर्ण जगाला एका महान व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. तत्कालीन कालखंडात आपल्या कार्यरुपाने बाबासाहेबांनी क्रांती केली. माणगाव येथील लंडन हाऊसच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू करावे, त्यासाठी निधी दिला जाईल.

आमदार माने म्हणाले की, येथे चित्र व फिल्म रूपाने बाबासाहेबांचे चरित्र उभे करणारे दालन निर्माण करावे, तसेच सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या आराखड्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आपला शुभेच्छा संदेश पाठवला.

माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी प्रास्ताविक केले तर बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी आभार मानले. यावेळी मंत्री शिरसाट यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास सहकुटुंब भेट देवून अभिवादन केले तसेच हॉलोग्राफी शो व लंडन हाऊसच्या प्रतिकृतीची पाहणी केली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राजू आवळे माजी आमदार सुजित मिणचेकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, बार्टीच्या निबंधक इंदिरा असवार, रवींद्र माने, प्रकाश पाटील, अनिल कांबळे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले – बर्डे गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

 

०००

सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

  • मुख्यमंत्री यांचा १०० दिवसीय कृती आराखडा…
  • १०० दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमात प्रत्येक शासकीय कार्यालयाने सहभाग नोंदवणे बंधनकारक, या अंतर्गत सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम आला पाहिजे
  • जिल्हाधिकारी कार्यालयाचा सनद वाटप कार्यक्रम कौतुकास्पद
  • जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही त्वरित बसवून घ्यावेत
  • सोलापूर जिल्ह्यात गुंतवणूक व उद्योग वाढीसाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे

सोलापूर, दि.२१ (जिमाका):  मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे राज्यात सर्वत्र 100 दिवसीय कृती आराखड्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात या अंतर्गत काम सुरू आहे. या कार्यक्रमातून सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा पूर्वीचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टिकोन व्हावा तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत डॉ. पुलकुंडवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी महसूल तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, या शंभर दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमात जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयानी सक्रिय सहभाग घेणे बंधनकारक आहे जरी अद्याप यात सहभागी झालेले नाहीत अशा कार्यालयांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून आराखड्यातील सातसूत्री कार्यक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सोलापूर जिल्हा प्रशासन या अंतर्गत चांगले काम करत असून या अंतर्गत राज्यस्तरावर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले.

या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा पोट खराबा जमीन तसेच बिगर शेती असलेल्या जमिनीसाठी सनद वाटप कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा वेगळा व लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण कार्यक्रम असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगून अभिलेखासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून त्या अनुषंगाने अभिलेखाचे निंदनीकरण व सुसूत्रीकरण केले जात असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्हा परिषद तसेच महापालिकाअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून घेण्याची कार्यवाही त्वरित पार पाडावी. यासाठी आवश्यक निधी शासकीय तसेच सीएसआर फंडातून उपलब्ध करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तसेच कार्यालय परिसर स्वच्छता, घरे तसेच अभ्यागतासाठी असलेली स्वच्छतागृहे कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची असेल. जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी. आपण केलेल्या कामकाजाचे श्रेष्ठ संस्थेकडून तपासणीचे काम लवकरच सुरू होणार आहे तरी यात आपला जिल्हा चांगले कामकाज करेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

जिल्ह्यात गुंतवणूक झाल्यानंतर उद्योगवाढ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्या अनुषंगाने गुंतवणूक तसेच पायाभूत प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्याचे वातावरण उद्योगस्नेही असले पाहिजे. या अंतर्गत कोणीही अडचण करत असेल तर संबंधितावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून लक्ष ठेवले जात असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार सांगीतले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रशासन 100 दिवशी कृती आराखड्याअंतर्गत करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच नाविन्यपूर्ण कामकाजाची ही माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती सादर केली.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाचे सादरीकरण केले. यावेळी प्रांतस्तरावर प्रांताधिकारी व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी ई- उपस्थित होते.

०००

जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. २१ (जिमाका): २२ मार्च, जागतिक जल दिन! या निमित्ताने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते म्हणाले, “पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य वरदान आहे. मात्र, हे वरदान आपण जपले नाही तर भविष्यात भीषण संकट उभे राहू शकते. म्हणूनच जलसंधारण, पाणी पुर्नवापर, टाकाऊ जल व्यवस्थापन, जलसाक्षरता आणि जबाबदारीने पाण्याचा वापर या मुद्द्यांकडे सर्व नागरिकांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.”

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला आजही काही भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. जलजीवन मिशन, हर घर जल योजना, ग्रामीण भागातील शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांमधून नागरिकांना पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे.

“पाणी ही फक्त निसर्गाची देणगी नाही तर, ती आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक जबाबदारी आहे.” असे सांगत पालकमंत्री पाटील यांनी जनतेला जलसंधारणाचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या तत्त्वावर चालत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

०००

कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील ‘टीडीआर’ गैरव्यवहाराबाबत दंडात्मक कारवाई- मंत्री उदय सामंत

विधानसभा प्रश्नोत्तर

कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील टीडीआरगैरव्यवहाराबाबत दंडात्मक कारवाईमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील मौजे गावदेवी येथील जमिनीबाबत जमीन विकास हक्क हस्तांतरणात (टीडीआर) गैरव्यवहार झाल्याची चौकशी ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या जमिनीच्या ‘टीडीआर’ गैरव्यवहारप्रकरणी ७ कोटी वसुलीची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जमीन विकास हक्क हस्तांतरण बाबत सदस्य किसन कथोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री श्री.सामंत म्हणाले, या गैरव्यवहारप्रकरणी दोन तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हाही दाखल करण्यात आला असून विष्णू नगर पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

पुणे शहरात पालिकेच्या पथ विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : पुणे शहरात महानगर पालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. शहरातील प्रत्येक कामाचे ‘ थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात येणार असून त्यानंतरच देयकांची अदायगी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील कामाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य बापू पठारे यांनी सहभाग घेतला.

चर्चेच्या उत्तरात मंत्री सामंत म्हणाले, पुणे महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या कामांचे मेसर्स इआयएल कंपनी मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येत आहे. पथ विभागामार्फत पुणे शहरात पहिल्या टप्प्यात ८ कोटी ३० लाख रुपयांच्या कामामध्ये ४ कामे पूर्ण करण्यात आली असून तीन कामे प्रगतीपथावर आहे.  तसेच दुसऱ्या टप्प्यातील ३ कोटी ७० लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहे. यामधील काही कामांना कार्यादेश देण्यात आले असून काही निविदा स्तरावर आहे.

नियमानुसार डांबरीकरणाची कामे केलेल्या तीन वर्षे आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्याबाबत पाच वर्ष कंत्राटदारांना डागडुजीचे दायित्व असते. त्यानुसार पथ विभागामार्फत झालेल्या कामांमध्ये निकृष्टता असल्यास संबंधित कंत्राटदाराकडून त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा – मंत्री नितेश राणे

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार

स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार

मुंबई, दि. २१ : मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान केल्या.

मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांच्याशी महावाणिज्य दूत श्री. ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी श्री. ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे यांनी सांगितले की, मुंबई महानगरामध्ये वाहतूक यंत्रणेवर ताण येत असून ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. स्वीडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल.

श्री. ओस्टबर्ग यांनी महाराष्ट्रातील पोर्टच्या विकासात स्वारस्य दाखवित म्हणाले की, स्वीडनची कॅंडेला कंपनी येवून सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करू.

पोर्टच्या ससून डॉकला मॉडेल पोर्ट करा – मंत्री राणे

महावाणिज्यदूत श्री. ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याने सांगितल्याने मंत्री श्री. राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली. स्वीडन कंपनीने राज्य शासनाला पोर्टच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करावा. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून देशात एक नंबर होईल, असे मॉडेल पोर्ट विकसित करावे. यासाठी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

श्री. ओस्टबर्ग यांनी पोर्टचा विकास, स्वच्छता, सोयी-सुविधा, गुंतवणुकीबाबतची माहिती दिली.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं/

 

महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – वनमंत्री  गणेश नाईक

  • असक्षम महिला भगिनींना राजकीय, सामजिक आणि आर्थिक बळ देऊ

ठाणे,दि. २० (जिमाका): पतीच्या खांद्याला खांदा लावून आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना असक्षम महिला भगिनींना, राजकीय, सामजिक आणि आर्थिक बळ देवून त्यांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी आज येथे केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाची (माविम) यशस्वी ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माविम सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून आज नवी मुंबईतील वाशी सिडको प्रदर्शन केंद्र येथे झालेल्या “माविम सुवर्ण महोत्सव- नव तेजस्विनी २०२५” च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दि. २० ते २५ मार्च २०२५ या कालावधीत ग्रामीण भागातील बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी साधन सामग्री असलेल्या जिल्हास्तरीय माविम “सुवर्ण महोत्सव- नव तेजस्विनी २०२५”  प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. सुरुवातीस मंत्री नाईक यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व स्टॉलला भेटी देवून स्टॉलमध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या वस्तू व पदार्थांची माहिती घेतली.

या सोहळ्याप्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री महिला व बालविकास मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार प्रशांत ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव,  महिला व बालविकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा  लड्डा-उंटवाल, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आव्हाडे, इफाड च्या राष्ट्रीय समन्वयक मीरा मिश्रा, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचतगटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ झाला.

वनमंत्री गणेश नाईक हे उपस्थित सर्व महिलांना माविमच्या सुवर्णमोहोत्सवी दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की, आदिती तटकरे आणि मेघना साकोरे- बोर्डीकर या दोन महिला मंत्र्यांच्या नेतृत्वाने माविम च्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला उत्तम गती मिळेल.

मंत्री नाईक पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी महिलांना सक्षम करण्याची फक्त इच्छाच व्यक्त केली नाही, तर त्याअनुषंगाने दमदार पावलेदेखील उचलली आहेत. महिलांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागू नये, यासाठी जलजीवन मिशन युद्धपातळीवर राबविण्यात आले. अन्न, वस्त्र, निवारा आणि महिलांचा सन्मान यानुषंगाने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भूमिका सकारात्मक आहे. महाराष्ट्र राज्यात जेव्हा महिलांच्या विकासासाठी काही अपेक्षा केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत महिला सक्षम होत नाही तोपर्यंत कुटुंब सक्षम होत नाही, असे म्हणत येणाऱ्या कालखंडात महिला अधिक सक्षम होतील, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, माविमचा सुवर्ण महोत्सव आपण आज साजरा करू शकलो कारण माविमच्या प्रत्येक घटकाने माविमच्या यशासाठी मोलाचा वाटा उचलला आहे. खऱ्या अर्थाने सगळ्यांचे कष्ट आणि माविमला प्रतिसाद देणारी प्रत्येक महिला ही आजच्या या सोहळ्याची तितकीच समान मानकरी आहे, जितकी या विभागाची प्रतिनिधी म्हणून मी आहे.  माविमला यशस्वी करण्यासाठी खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आणि आज माविम मधे २० लाखांहून अधिक महिला साहभागी झाल्या आहेत. माविमला केवळ राज्य अन् राष्ट्रीय स्तरावरच नाही तर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मानित कऱण्यात आले आहे. सगळ्या बचतगटांच्या चळवळीत माविमच आयडियल मॉडेल आहे. कारण माविम कोणावरही अवलंबून न राहता महिलांना कर्ज देते.  माविमच्या महिला बचतगटांचा कर्ज परतफेडीचा दर ९९.०५ टक्के आहे. याचा मला अभिमान आहे, असे सांगून आदिती तटकरे यांनी माविमच्या महिलांचे अभिनंदन केले.

त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव ठेवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर प्रत्येक ३५ ते ५० किलोमीटरच्या अंतरावर महिलांसाठी स्वच्छ सुंदर शौचालये बांधण्यात यावे आणि त्या शौचालयाच्या जवळपास स्टॉल उपलब्ध करून दिल्यास माविमच्या माध्यमातून त्या स्टॉलवर होणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीतून शौचालयांच्या देखभालीचा खर्च भागविला जावू शकतो. तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून उमेद प्रमाणे तालुक्याच्या प्रत्येक नगरपंचायतीच्या बाजारपेठेच्या ठिकाणी माविमचे स्वतंत्र अस्मिता भवन उभारण्यात येईल. असा प्रस्तावच शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

या अस्मिता भवनात माविमच्या महिलांची उत्पादने, विक्रीसाठी स्टॉल, माविमची कार्यालये, प्रशिक्षण केंद्र असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी माविमच्या विस्ताराची मागणी मान्य केली असून, माविममधील महिलांची संख्या २० लाखांहून किमान ५० लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट आम्ही या सुवर्ण महोत्सवी दिवशी ठरविले आहे.

राज्यमंत्री महिला व बालविकास मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी नुकत्याच अंतराळात ९ महिने राहून पृथ्वीवर परतलेल्या सुनिता विल्यम्स यांचा दाखला देत स्त्रीशक्तीच्या इच्छाशक्ती आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले. माविमच्य महिलांचे कष्ट आणि त्यांच्या यशकथा पाहून मला अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी माविम च्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या रमा कांबळे, स्वाती विठ्ठल शेळके, वैशाली वसंत पाटील, रोहिणी भानुदास कुसमागडे, शशिकला नारायण डांगे, मंजुताई राजेंद्र ठाकरे, संगिता कोळी या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी माविमच्य महिला बचतगटांच्या यशकथा तसेच त्यांची उत्पादने याची माहिती असणाऱ्या एकूण ३ कॅटलॉगचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकपर भाषणात महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी माविमबद्दल सविस्तर माहिती दिली.

०००

ताज्या बातम्या

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

0
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करणे, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण यासाठी शासनास जवळपास 8...

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी कटिबद्ध : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि.21जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत शालेय स्तरावर अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व प्रयोगशीलता...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष — गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना

0
गडचिरोली, दि. २१ जुलै : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व...

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...