गुरूवार, जुलै 3, 2025
Home Blog Page 26

योगाभ्यास करून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरा

नियमित योगाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते – निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली, दि. 21 : महाराष्ट्र सदनातील बँकेट सभागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’योगाभ्यास करून  उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राला दिलेल्या संदेशामध्ये योग साधनेचे महत्व सांगितले, “योग ही भारताला मिळालेली प्राचीन देणगी असून, ती शरीर, मन आणि आत्म्याला निरोगी ठेवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने योगाभ्यास जागतिक चळवळ बनली आहे. ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्यासाठी योग’ या संकल्पने अंतर्गत योगाचा प्रसार करून ‘फिट इंडिया’ आणि ‘निरोगी भारत’संकल्प साकार करूया.”

महाराष्ट्र सदनात झालेल्या योगाभ्यास सत्रात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी सांगितले, “दररोज केवळ पाच मिनिटे योगासने केल्याने मन आणि शरीर निरोगी राहते, तसेच ताजेतवाने आणि प्रफुल्लित राहता येते. योग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा. नियमित योगाभ्यासाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते, ज्यामुळे दैनंदिन जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडता येतात.”

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या प्रशिक्षक निशा चंद यांनी योगासनांचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रात्यक्षिके सादर केली.

या कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी तसेच सुरक्षा जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘ॐ’ च्या सामूहिक उच्चारणासह प्रार्थनेने झाली. सूक्ष्म व्यायामांमध्ये ग्रीवा चालन, कटी चालन आणि घुटना संचलन यांचा समावेश होता. योगासन सत्रात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, शशांकासन, मक्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन आणि शवासन यांचा समावेश होता. प्राणायाम सत्रात कपालभाती, नाडीशोधन, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम आणि ध्यान मुद्रा यांचा सराव झाला.

00000

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सांगली, दि. २१ (जि. मा. का.) : शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तियोग साधला. यात त्यांना चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभली. सर्व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी वारकरी तालावर योगसाधना करत विश्वविक्रमाला गवसणी घातली. वारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणांहून प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तिंनी केलेला योग या नावाने हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला गेला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आयोजित भक्तीयोग – तालवारकरी … योगकरी… आरोग्य पंढरी… या  जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे होते. ते म्हणाले, शारीरिक व मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक असून यामध्ये सातत्य ठेवावे. जिल्ह्यातल्या 1600 हून अधिक केंद्रावर झालेल्या योगसाधना कार्यक्रमात जवळपास साडेपाच लाख योग प्रेमी उत्साहाने सहभागी झाले. यामध्ये ग्रामीण भागातील योगप्रेमी व महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला. सर्वांच्या अथक प्रयत्नातून भव्य दिव्य योग कार्यक्रम साजरा झाला. याचे वर्ल्ड बुक, आशिया बुक व इंडिया बुकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अभिनव संकल्पनेतून हा अत्यंत सुंदर व देखणा कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर चितळे उद्योग समूह व गिरीष चितळे, विश्व योग केंद्र, वारकरी सांप्रदाय यांच्यासह या योग साधनेमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक घटकाचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले व सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, चितळे डेअरीचे गिरीष चितळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विश्व योग दर्शन केंद्राचे योगविशारद बालकृष्ण चिटणीस, अंजली चिटणीस, हर्षद गाडगीळ, शैलेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी योगसाधनेचे प्रात्यक्षिक सादर केले.

सांगली जिल्ह्यातील सर्व 10 तालुक्यातील पोर्टलवर नोंदणीकृत 1 हजार 367 केंद्रे व अनोंदणीकृत अन्य केंद्रे अशा 1600 हून अधिक केंद्रांवरील जवळपास साडेपाच लाखाहून अधिक योगसाधक, योगप्रेमी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी, नागरिक, युवक, महिला, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी “भेदाभेद अमंगळ” याची साक्ष देत झूम वेबिनारद्वारे मुख्य केंद्राशी जोडले जात विश्वविक्रमास गवसणी घातली. वारकरी तालासाठी संगीत संयोजन प्रशांत भाटे, ध्वनिमुद्रण परेश पेठे यांनी केले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना वर्ल्ड रेकॉर्डस बुक, आशिया बुक व इंडिया बुकमध्ये झालेल्या रेकॉर्डबद्दल प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.

योग दिनाचे औचित्य साधून एक विश्वविक्रम करावा, ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची मूळ संकल्पना होती. “एक अकेला चल पड़ा, जानिबे-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया…” याप्रमाणे ती केवळ कल्पना न राहता त्यांच्या विचारांशी समरस होणारे लोक आपोआप जोडले गेले आणि गेल्या आठवडाभर चळवळ होऊन प्रत्येकाने यात योगदान दिले. दूरदृश्यप्रणालीद्वारे हा कार्यक्रम प्रसारित झाला. त्यात पोर्टलवर नोंदणी केलेले 5 लाख 34 हजार 632 व दूरदृष्यप्रणालीव्दारे जोडले गेलेले सहभागी असे मिळून जवळपास साडेपाच लाख योगप्रेमी, नागरिक प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी सहभागी झाले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ व्यक्तिगत वा एका संस्थेपुरता न राहता सामूहिक योग साधनेतून एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांचे दर्शन घडविणारा ठरला. ही प्रेरणादायी सामूहिक कृती सांगलीकरांच्या मनात योगसंस्कार रुजवून सामाजिक बदल घडविण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल.

अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, जयश्री पाटील, भारती दिगडे, वर्ल्ड रेकॉर्डच्या सल्लागार रेणू अग्रवाल, नचिकेत जामदार, दत्ता आंबी महाराज, विश्व योगदर्शन केंद्र मिरज-सांगली चे योग साधक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, वारकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी योगप्रेमींनी एकाच वेळी एकाच तालावर समान योग रचनांसहित विश्व योग केंद्रांवरील विहित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली.

हा भक्तियोग आणखी भक्तिमय करण्यासाठी परेश पेठे प्रस्तुत स्वरवैभव क्रिएशन सांगली यांच्या मार्फत मूळ कार्यक्रमाच्या पूर्वी भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. अभिषेक तेलंग, कीर्ती पेठे यांनी गीतांचे सादरीकरण केले. त्यांना भास्कर पेठे यांनी हार्मोनियमची, प्रशांत भाटे यांनी कीबोर्ड व बासरीची, अक्षय कुलकर्णी यांनी तालवाद्याची तर स्वतः परेश पेठे यांनी तबल्याची साथ दिली. कार्यक्रमानंतर मनोहर सारडा यांच्या वतीने उपस्थित वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने भक्तीरसाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यावर उपस्थितांनी फुगड्या, झिम्माचा ताल धरला.

योगिनी स्मार्त एकादशी, जागतिक संगीत दिन यांचे औचित्य साधत भक्तीसंगीत व वारकरी तालावर योग करत भक्ती आणि योगाचा सुरेल भव्य दिव्य संगम साधला गेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय व ग्रामीण सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

यावेळी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत्युमुखींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

०००००

जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि.२१ :  गेल्या वर्षभरात कामठी तालुक्यात अमलीपदार्थ विरोधी ३० मोठ्या कारवाया करून ६० लोकांना अटक करण्यात आली आहे. जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करत जनतेच्या  सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त  करू,असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ऑपरेशन थंडर-२०२५ अंतर्गत कामठी येथील जयस्तंभ चौकात अमलीपदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, नागपूर पोलीस परिमंडळ -५चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले,तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे एक छुपे युद्ध सुरू आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेले तरुण हे व्यसन करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात. कामठी शहरातही तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यात ओढणारे षडयंत्र सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने थंडर मोहीम सुरू केली आहे. जनतेने निडरपणे पोलीसांना अमलीपदार्थ विक्रेत्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

येत्या काळात नागपूर शहर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत खापरा, जरीपटका हद्दीतील भागांचा समावेश असलेले नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात  येईल, येथील भाजीमंडी परिसरात पोलीस स्थानक उभारण्यात येईल तसेच कामठी  शहर १०० टक्के सीसीटीव्ही सर्व्हेलन्सने सज्ज करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी ‘ऑपरेश थंडर’ अंतर्गत गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या विविध कारवायांद्वारे ८ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यावेळी  दिली. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी प्रास्ताविक केले तर पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी आभार मानले.

श्री. बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी जयस्तंभ चौक ते गोयल टॉकीज पर्यंत ‘अंमली पदार्थ विरोधी रॅली’ काढण्यात आली. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांनी जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

००००

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. २१ : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले.

नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, अजय चरडे, रविंद्र माने, तहसीलदार विजय पवार, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना, त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही वाहने चंद्रपूर, गोंडपिपरी, मुल, वरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

00000

 

योगाच्या माध्यमातून मानवाचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संगम – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

चंद्रपूर, दि. २१ : धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आज अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. यावर मात करून निरोगी आणि उत्तम जीवन जगायचे असेल तर दैनंदिन जीवनात योगा करणे आवश्यक आहे. हा एक केवळ व्यायामच नाही तर योगामुळे मानवाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संगम साधण्यास मदत होते, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित मुख्य शासकीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संयुक्त राष्ट्र संघटनेने योगाचे महत्व ओळखले आणि 21 जूनला आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा ठराव पारीत केला. गत 11 वर्षांपासून जगातील 177 देशांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे. जिल्हा प्रशासनाने पतंजली योग समिती आणि विविध संघटनांच्या माध्यमातून चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुढील वर्षापासून सर्वांनी एकत्रित येऊन शासकीय योग दिन साजरा करावा. चंद्रपूरात योग संगम दिसणे आवश्यक आहे. पुढील आंतरराष्ट्रीय योग दिन यापेक्षा मोठ्या स्वरूपात व खुल्या मैदानात आयोजित करावा, अशा सुचनाही पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुजन करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका वैजंती गौरकार आणि कविता मंघानी यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन मंगला घोगी आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, मोरेश्वर गायकवाड, नंदू आवारे, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, संदीप वुईके, विजय ढोबाळे यांच्यासह पतंजली योग समितीचे इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगले व निरोगी आयुष्य योगामुळे शक्य : आमदार किशोर जोरगेवार

आज 11 वा आंतराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करीत आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी योगाचे महत्व जगाला पटवून दिले, त्यामुळेच याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अनादी कालापासून भारतात योग सुरू असून याला अनन्यसाधारण महत्व आहे. चांगले आयुष्य केवळ योगामुळेच मिळू शकते. कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल किंवा मनाच्या शांतीसाठी योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

उपस्थितांनी केली ही आसने : कपालभारती प्राणायाम, अनुलोमविलोम, ब्राभरी प्राणायाम, वज्रासन, स्कंदसंचालन, स्कंदस्थलांतरण, स्कंदचक्र, घुटनासंचालन, ताडासन, वृक्षासन, पादअष्टासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धवज्रासन, उत्तंगासन, वक्रासन, भुजंगासन, अर्धहलासन, पवनउत्तासन, शवासन आदी आसने करण्यात आली.

००००००

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.0 राबविणार – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. २१ – पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे. राज्यस्तरावर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतर आता १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान .0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

निसर्गाच्या भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रीत करून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यास सुरूवात करण्यात आली. निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय योजना, कार्यक्रम, उपाययोजना एकत्रित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे व मिशनमोड पद्धतीने राबविण्यासाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच टप्प्यात माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी झाली आहे.

राज्यातील २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार अंमलबजावणी

माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणीनंतर ‘माझी वसुंधरा अभियान .0’ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान .0’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहाय गट करून स्पर्धा घेण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला असून त्यावर १५ जुलै २०२५ पर्यंत सूचना/अभिप्राय मागविण्यात आले आहे. त्या सूचनांचा विचार करून अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) अंतिम करण्यात येणार आहे.

त्रयस्थ यंत्रणेद्वारे होणार कामांचे मूल्यांकन

या अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामांचे मूल्यमापन करून गुणांकन दिले जाणार आहे. यामध्ये अमृत गटासाठी १५,१२५ व अमृत गट वगळून इतर नागरी संस्थांच्या गटांसाठी १४,६२५ आणि ग्रामपंचायतीसाठी १३,६२५ गुण ठेवण्यात आले आहे. त्रयस्थ यंत्रणेद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामांचे मूल्यांकन करून पुढील वर्षी ५ जून २०२६ रोजी निकाल जाहीर करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

 

कार्बन पृथक्करण, हरित वायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या बाबींवर लक्ष केंद्रीत करून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी करावी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्त, मुख्याधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक आदींनी माझी वसुंधरा अभियान .0 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

विसंअ/नंदकुमार वाघमारे

 ००००

 

 

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. २१ : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही. https://wa.link/o93s9m यावर आपले मत नोंदवा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत@२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दि. ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी १६ संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगर विकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

विकसित महाराष्ट्राच्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्धाटन मुख्यमंत्री यांनी दिनांक १७ जून, २०२५ रोजी केले आहे. सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पासून गावपातळीवरील कार्यालय प्रमुखांनी सर्वेक्षणामध्ये सर्व नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावेत यासाठी दर्शनी भागावर फलक लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले आहेत. यामध्ये नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.

0000

 

योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले 

सातारा, दि. २१  : योगाला पूर्वापार चालत आलेली आपली मोठी परंपरा आहे. योगामुळे आरोग्य चांगले राहून मनशांती मिळते. प्रत्येकाने योगासने रोज करुन आपल्या जीवनात योगाला अविभाज्य घटक बनवा, असे आवाहन  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले.

मंत्री श्री.भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

सुरुवातीला मंत्री श्री. भोसले यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन योग दिनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक आदी उपस्थित होते.

रोज योगासने केल्यामुळे मनशांती बरोबर आरोग्यही चांगले राहते. हजारो वर्षांपासून परंपरा या योगाला आहे. योगासनांमुळे अनेक व्याधी बऱ्या होत आहेत. रोज योगासने करुन आपले जीवन योगामय करा, असे आवाहन करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

योगामुळे प्रकृती चांगली राहते. आरोग्यदायी जीवनासाठी रोज योगासने केली पाहिजेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग प्रात्यक्षिक केली.

00000

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. २१: योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर,  पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.

योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थाने पुनरुज्जीवीत करणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे. गेले ११ वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे.

योगसाधना कोणालाही करता येते. शरीर, मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनुरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. ही सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर), आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जाते.

यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘एक भूमी, एक आरोग्य’ हा संदेश कृतीतून देणारा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकऱ्यांसोबत योगासन करणे ही एकप्रकारे आनंदाची पर्वणी आहे. आज सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करत आहेत. तसेच ७०० महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील योगासनात सहभागी झाले आहेत, ही आनंदाची बाब आहे. आयोजकांनी आरोग्य वारी हे नवीन रिंगण दिले असून ते पुढे कायम चालत रहावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानुसार हा दीन साजरा केला जातो. आज एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास १० कोटी लोक योग करत असतील अशी अद्भुत किमया झाली आहे. ५ हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योगा, ध्यान, यज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत आहे. आषाढी वारीसाठी दिंड्या जातात अशा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम साजरा केला जावा अशी संकल्पना समोर आली, त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, योग हा पतंजली आणि गौतम बुद्धांनी या मातीत रुजवला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगात नेला.  पुणे शहरातील १८७ महाविद्यालये, प्राचार्य, सुमारे १ हजार २०० प्राध्यापक आणि ६ हजार विद्यार्थी या योग दिनाचे नियोजन करत होते. प्रशासन, शासन आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला सामाजिक आशय लाभला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने उपस्थित सर्वांकडून योगाभ्यास करवून  घेतला. ताडासन, भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विनोम आदी आसने व प्राणायाम करण्यात आले.

योग कार्यक्रमात आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे आदी सहभागी झाले. परदेशी नागरिक, विद्यापीठातील अधीष्ठाता, प्राचार्य, विद्यार्थी आदी योगात सहभागी झाले.

जागतिक संगीत दिनानिमित्त अभंग गायन करण्यात आले.

0000

आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या

बुलडाणा, (जिमाका) दि. २०:  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२  व राज्य शासनाच्या आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 1 लाख 20 हजाराहून जास्त घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले.

प्रधानमंत्री आवास योजना व विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बि.एम. मोहन, संजय इंगळे तसेच गटविकास अधिकारी, कृषी सेवक व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थिती व अंमलबजावणीची माहिती घेऊन प्रधान सचिव डवले म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर केले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक ती कारवाई पूर्ण करुन घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. आवास योजनांसाठी जमिनींच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालावे. केंद्र व राज्य शासनाच्या आवास योजना वेळेत व पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गुणवत्ता आणि उत्तरदायित्व हाच जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा पाया असायला हवा, असे प्रतिपादन एकनाथ डवले यांनी केले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक व टप्पा दोनमध्ये जिल्ह्यात अपूर्ण घरकुलांची संख्या अधिक आहे. विविध कारणांमुळे विभागातील अपूर्ण असलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक कशोशीने प्रयत्न करावे. समाजातील प्रत्येक गोर-गरीब घटकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने अटी कमी केल्या आहेत. घरकुलांची उद्दीष्टपूर्ती होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदने चांगली कारगिरी करुन उद्दीष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन डवले यांनी केले. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजनाचा आढावा घेऊन आवासाचे प्रलंबित असलेले कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश डवले यांनी दिले.

०००

ताज्या बातम्या

अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय

0
मुंबई, दि. २: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ठाण्याविहिर पाडा ते केलखाडी पाडा दरम्यान केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना...

वडखळ ते अलिबाग रस्ता चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. २ : अलिबागच्या दिशेने होणारी वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी वडखळ ते अलिबाग मार्गाचे चौपदरीकरणाचे काम अधिक जलदगतीने पूर्ण...

फळपीक विमा योजनेस अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ – कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. ०२ :  हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ देऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी...

पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि. २ : पोहरादेवी येथे उभारण्यात येत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच श्री क्षेत्र पोहरादेवी येथील म्युझियमचे...

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाद्वारे देशाचा समग्र विकास  – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २ : "महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासातूनच देशाचा विकास साधता येतो," असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राजभवन येथे महिला...