शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 257

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

मुंबई, दि. २६  : वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

पालकमंत्री पदाची धुरा सांभाळताना वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण, समतोल विकास साधणार अशी प्रतिक्रिया मंत्री भरणे यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करणार. पायाभूत सुविधा भक्कम करण्याबरोबर लोकप्रतिनिधी, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, महिला, वृद्ध, युवक आदी घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

0000

सागरकुमार कांबळे/विसंअ/

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आता मंडळ स्तरावर- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २६ : महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचे नामकरण ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ असे करण्यात आले असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले. याबाबतचा शासन निर्णय, दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर वर्षातून किमान चार वेळा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक शिबिरासाठी २५ हजार रुपये इतका खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना इत्यादींचा लाभ देण्यात येईल. तसेच या अभियानांतर्गत सात-बारा वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे व विविध शासकीय योजनासाठी लागणारे दाखले अशा महसूल विभागाच्या विविध योजना आदींबाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज करण्यात येईल, असेही मंत्री श्री.बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

या अभियानांतर्गत महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचना सर्व महसुली अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

मुंबई, दि. २६ : महसूल विभाग अंतर्गत राज्यातील जनतेची दैनंदिन कामे पूर्ण करणे, महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यात यापुढे महसूल मंडळ स्तरावर महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, या अभियानाचे नामकरण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत महसूल मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार आहे. वर्षातील किमान चार वेळा मंडळस्तरावर अभियानाअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात येईल.

समाधान शिबिरांमध्ये जातीचे, उत्पन्न व रहिवासी दाखले, सातबारा, फेरफार, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, महसूल विभागाच्या विविध सेवा, विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी लागणारे कागदपत्रे तसेच पीएम किसान आणि अन्य सामाजिक योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत पहिल्यांदाच प्रत्येक महसूल मंडळावर अंतर्गत आयोजित शिबिराला २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी निवेदनातद्वारे सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करण्यात येणार आहेत. एसटीच्या   बसेस इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये शशिकांत शिंदे, प्रविण दरेकर, अनिल परब, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

एसटी महामंडळाकरिता ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापैकी ४५० बसेस खरेदी केल्या आहेत. तसेच एसटीच्या सध्याच्या बसेस एलएनजीमध्ये परावर्तीत करण्यात येणार असून एलएनजी पुरवठा करण्यासाठी करार करण्यात आला आहे. राज्यात ईव्हीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्ही धोरण आणले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ३० लाखापेक्षा जास्त किमतीच्या ईव्ही वाहनांवर ६ टक्के कर आकारण्याचे जाहीर केले आहे. परंतु हा कर मागे घेण्याची घोषणा सभागृहात करण्यात येणार आहे. राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी किमान ८० टक्के ईव्ही वाहने होतील यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. ईव्ही वाहनांचा वापर वाढला की प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. तसेच हिंजवडी परिसरातील होणारे प्रदूषण हे मुख्यतः वाहनांमुळे होत असून यासाठी मेट्रो आणि बसेसची कनेक्टिव्हीटी सुरू करण्यात येत आहे. जास्तीत जास्त ईव्ही बसेस घेण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रदूषण मुक्त असावी असे शासनाचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

सर्व शासकीय वाहनेही इलेक्ट्रिक करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदारांनाही देण्यात येणाऱ्या वाहन कर्जावरील व्याज सवलतीही ईव्हीसाठीच देण्यात येतील. सर्व मंत्री यांची वाहनेही ईव्हीमध्ये बदलण्याचे शासनाचे नियोजन असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, रेडीमिक्स प्लांटना पूर्ण अच्छादन करण्याचा नियम शासनाने केला आहे. हिजंवडी परीसरात असलेल्या या रेडीमिक्स प्लांटलाही हा नियम लागू आहे. अशा प्रकारे पूर्ण अच्छादन न करणारे प्रकल्प बंद करण्याची कार्यावाही करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १७२ कोटी रुपयांच्या निधीच्या विनियोगबाबतही चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. २०२२ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्याचे ठरवण्यात आले. आता तो मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनीही प्रश्नाला उत्तर दिले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिदे, सदाभाऊ खोत, एकनाथ खडसे, प्रसाद लाड यांनीही चर्चेमध्ये सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “एमपीएससी परीक्षा यूपीएससीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेतली जाणार आहे. काही कोचिंग क्लासेसच्या लोकांनी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी मुलांच्या भविष्यासाठी हा बदल गरजेचा आहे.” सुरुवातीला २०२३ मध्ये हा बदल होणार होता, पण विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर तो २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय झाला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीमुळे विद्यार्थी यूपीएससीसाठी अधिक सक्षम होतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार म्हणाले की, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला आहे. संबंधित विभागाच्या मागणीपत्रांनुसार आणि नियमानुसार पीएसआय परीक्षांसाठी एका वर्षाची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोग स्वायत्त असला तरी, विविध न्यायालयीन निर्णय, विधी व न्याय विभागाचे मत आणि सरकारच्या धोरणाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, गट क परीक्षांमध्ये देखील PSI, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि ASO परीक्षांसाठी एक वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २६ : मुंबईमध्ये बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल करून ईव्ही बाईक रस्त्यावर चालवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ईव्ही बाईक्सवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते.

आतापर्यंत बॅटरी क्षमतेमध्ये बदल केल्याप्रकरणी २११ गुन्हे नोंदवण्यात आल्याचे सांगून परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, अशा प्रकारे बदल केलेल्या ८८९ ईव्ही बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. काही कंपन्यांकडून क्षमता वाढवून ईव्ही बाईक्स रस्त्यावर फिरवल्या जात आहेत. या चीनी बनावटीच्या बाईक्स सोसायटीमध्ये अंतर्गत वापररासाठीही आणल्या जात  आहेत. अशा सर्वच ईव्ही बाईक्सची नोंदणीही अत्यावश्यक करण्याचे धोरण राबवण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. २६ : ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार  वारंवार घडले आहेत. त्यामुळे या इराणी वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन  आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,  सदस्य अनिल परब यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

अनेक वर्षांपासून आंबिवली येथे इराणी वस्ती असल्याचे सांगून राज्यमंत्री कदम म्हणाले की, एखाद्या आरोपीवर कारवाईसाठी पोलीस या वस्तीमध्ये गेले असता त्याठिकाणी  महिला समोर येऊन पोलीसांवर हल्ले करतात. याठिकाणी अनेक सराईत गुन्हेगार लपतात.  तसेच या वस्तीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे देखील आहेत. या बांधकामांवरही कारवाई करण्यात येणार आहे. या वस्तीमध्ये आश्रय घेणाऱ्या गुन्हेगारांवर आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच अनेकवेळा गुन्हेगार हे पडीक इमारती, वापरात नसलेल्या इमारतींचा आश्रय घेत असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे अशा बांधकामांवरही कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांवर कारवाईसाठी एटीएसचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री कदम यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

 

 

विदर्भाच्या रणजी संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, दि. २६ – रणजी ट्रॉफी ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची आणि मोठी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे मुंबई, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तीन वेगवेगळ्या संघांचा समावेश असून यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाने शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ संघाचे विधान परिषदेत मनःपूर्वक अभिनंदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, क्रिकेट विश्वचषक जिंकणारा आपला संघ असो, किंवा देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू असोत त्यांचा उचित सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही खेळाडूंसाठी नियम आखले असून, त्यानुसार योग्य पातळीवरील खेळाडूंना योग्य सन्मान व पुरस्कार देण्याचे काम राज्य सरकार करेल. राज्य शासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

00000

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २६: एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर विराजमान होतो हे आपल्या संविधानाचे सामर्थ्य आहे, असे स्पष्ट करत विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा बनसोडे यांच्या सामाजिक व राजकीय  कारकिर्दीचा उल्लेख करत सांगितले की, एक साधा कार्यकर्ता ते विधानसभेचा उपाध्यक्ष हा प्रवास प्रेरणादायी आहे. ते जनतेच्या विश्वासावर पुढे आले असून, त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला निश्चितच लाभ होईल.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे शासन सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या या सभागृहात सामान्य कार्यकर्त्याची उपाध्यक्षपदी निवड झाली याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. उपाध्यक्षपदावरून अण्णा बनसोडे सभागृहातील सदस्याच्या प्रश्नातून राज्यातील जनतेला न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे अभिनंदनपर भाषणात म्हणाले की, विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांच्या निवड प्रक्रियेत सर्वपक्षीय सहकार्याचे वातावरण दिसून आले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेत बनसोडे यांच्या निवडीला पाठिंबा दर्शवला, याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचेही आभार मानले आणि उपाध्यक्षपदी विराजमान झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

संविधानामुळे सामान्य माणसाला संधीची समानता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानमंडळाला संविधानिक गौरवशाली परंपरा

मुंबई, दि. २६: मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या विधानमंडळाला मोठी गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झाले, ही घटना केवळ त्यांचा गौरव नसून राज्यातील १३ कोटी जनतेचा अभिमान आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्चपदावर पोहोचू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना त्यांचा राजकीय प्रवास आणि अनुभव यांची प्रशंसा केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळ देशातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या सभागृहांपैकी एक आहे. या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी समन्वयाने काम करून या सभागृहाचा अधिक लौकिक वाढवूया. उपाध्यक्ष पद हे महाराष्ट्र विधानसभेतील सन्मानाचे पद आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाचा गौरव वाढविला आहे.अण्णा बनसोडे यांची या पदासाठी निवड त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. पिंपरीचे आमदार म्हणून ते तिसऱ्यांदा निवडून आले असून, त्याआधी महानगरपालिकेत नगरसेवक पदाची हॅटट्रिक त्यांनी केली आहे. तसेच, स्थायी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार आणि आता उपाध्यक्ष असा चढता राहिला आहे. त्यांच्या निवडीने विधानसभेला सक्षम उपाध्यक्ष मिळाला असून त्यांनी या जबाबदारीतून संविधानिक परंपरेचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

अध्यक्ष पदावर विधीतज्ज्ञ ॲड. राहुल नार्वेकर आणि त्यांच्यासोबत सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण असलेला सदस्य हे उपाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. आपल्या या अनुभवातून विधानमंडळाचा बहुमान उंचावेल. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

वीर जवान रामदास बढे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

अहिल्यानगर/शिर्डी, दि. २६: जम्मू – काश्मीरमधील भारत – पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना शहीद झालेले संगमनेर तालुक्यातील मेंढवन गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बढे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

रामदास साहेबराव बढे (वय ४४) लष्कराच्या ३४ एफडी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. तंगधार सेक्टरमध्ये सोमवारी (दि. २४ मार्च) कर्तव्य बजावत असताना रामदास बडे यांना वीरमरण आले. आज (दि.२६ मार्च) सकाळी त्यांचे पार्थिव मेंढवन येथे आणण्यात आले. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

भारतीय लष्कराच्या मराठा फिल्ड रेजिमेंट व पोलिसांच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ आणि ‘शहीद रामदास बढे अमर रहें’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुलगा ऋषिकेश व भाऊ संदीप यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, निलम खताळ, लष्कराच्यावतीने मेजर आर. व्ही. राठोड, तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद बढे यांना श्रद्धांजली वाहिली.

”रामदास बढे यांनी देशासाठी दिलेले बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रशासन सहभागी असून कुटुंबियांना शासन सर्वतोपरी मदत करेल” अशा शब्दात जिल्हाधिकारी आशिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शैलेश हिंगे, बाळासाहेब थोरात यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हवालदार रामदास बढे हे वयाच्या २० व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, जम्मू -काश्मीर व महाराष्ट्र या राज्यात सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात आजी, आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

०००

विविध स्पर्धांमधील राज्याच्या खेळाडूंचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन

मुंबई, दि. २५:  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेली उत्कृष्ट कामगिरी त्याचप्रमाणे खो-खो विश्वचषक स्पर्धा आणि तेहरानमधील कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेले अजिंक्यपद यासाठी उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अभिनंदनपर प्रस्ताव मांडला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या अभिनंदनपर भाषणात म्हणाले की, उत्तराखंडमधील ३८ व्या क्रीडा स्पर्धेत आपल्या राज्यातील ५८० खेळाडूंनी सहभाग घेतला. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल २०१ पदके प्राप्त केली आहेत. त्यात ५४ सुवर्ण, ७१ रौप्य व ७६ कास्य पदकांचा समावेश आहे. स्पर्धेतील एकूण ३२ क्रीडा प्रकारांपैकी २६ क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंनी बाजी मारली आहे. जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात सर्वाधिक १२ सुवर्ण पदकांसह २४ पदके प्राप्त केली आहेत. सर्व राज्यांमध्ये प्रथम येत सलग तीन वेळा पदतालिकेत प्रथम येण्याचा मान महाराष्ट्राने प्राप्त केला आहे, ही आपणा सर्वांना अभिमानास्पद बाब आहे.

त्याचप्रमाणे, भारतीय पुरुष आणि महिला संघाने खो-खो खेळाच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकवल्याबद्धल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.

एकीकडे खो-खो स्पर्धेचे जेतेपद मिळवित असताना भारताच्या महिला कबड्डी संघाने तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे. ही देखील अभिमानास्पद बाब आहे. केवळ क्रिकेट पुरते हे जग सीमित नसून भारतीय खेळाडू कबड्डी तसेच खो-खो खेळातही प्राविण्य दाखवित आहेत. महाराष्ट्र आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिनास्पद बाब आहे. मी सभागृहाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महाराष्ट्रातील खेळाडू तसेच भारतीय पुरूष व व महिला खो-खो संघाचे त्याचप्रमाणे भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन करतो, असेही उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

हा प्रस्ताव विधान परिषदेत सर्वानुमते संमत करण्यात आला.

०००

संविधानामुळे जागतिक स्तरावर आपली लोकशाही सशक्त आणि स्थिर – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, दि. २५ : सन १९५० पासून सुरू झालेल्या भारतीय संसदीय परंपरेने आज ७५ वर्षांची महत्त्वपूर्ण वाटचाल पूर्ण केली आहे. भारतीय संविधानाच्या भक्कम अधिष्ठानामुळे देशाने जागतिक स्तरावर आपली लोकशाही सशक्त आणि स्थिर ठेवली आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सभागृहात केले.

भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेत सभापती प्रा. शिंदे यांनी संविधानाची महती आणि त्याचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी संविधानाद्वारे भारताने साधलेल्या ऐतिहासिक प्रगतीचा आढावा घेत राज्यघटनेच्या मूल्यांवर भर दिला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आज भारत जगातील एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय राज्यघटनेने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मुल्यांची महती अधोरेखित करत प्रा. शिंदे म्हणाले, ही मूल्ये आपल्या देशाच्या लोकशाहीचा दीपस्तंभ आहेत. या तत्वांवर आधारित आपली राज्यघटना येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२६ ते १९३७ या काळात मुंबई विधानपरिषदेचे सदस्य म्हणून आपले मार्गदर्शक विचार दिले, ज्यांनी आजच्या भारतीय संविधानाचा पाया घातला. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

भारतीय लोकशाहीचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तसेच सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही राज्यघटनेने दिलेली मूल्ये आणि उद्दिष्ट्य आपल्या दृष्टीने चिरंतन प्रेरणाचे स्त्रोत बनलेले आहेत. भारताने संविधानाच्या आधारे ७५ वर्षे लोकशाही टिकवून ठेवत प्रगत राष्ट्र म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे, असेही प्रा. शिंदे यांनी नमूद केले.

संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल संपूर्ण देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जात आहे. आपले संविधान प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि दिशा देईल, यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहायला हवे,” असे आवाहन सभापती प्रा.शिंदे यांनी केले.

विधानपरिषदेत झालेल्या या पहिल्या दिवशीच्या चर्चेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य ॲड.अनिल परब, प्रसाद लाड, भाई जगताप, अमित गोरखे, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, सत्यजीत तांबे, जगन्नाथ अभ्यंकर, सदाभाऊ खोत, अरुण लाड, संजय केनेकर, सुनील शिंदे, योगेश टिळेकर, सचिन अहिर, ज्ञानेश्वर म्हात्रे या सदस्यांनी सहभाग घेतला.

000

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...