शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 250

रमजान ईदनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. ३०: राज्यात गुढीपाडव्या पाठोपाठ रमजान ईद हा सण उत्साहाने साजरा होत आहे. पवित्र अशा रमजान ईद सणाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले की, मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र मानला जातो. उपवासाच्या व्रतानंतर येणारा ‘ईद-उल-फित्र’ संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो. या दोन्ही सणांच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट होवून त्यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत, अशी मनोकामना व्यक्त करतानाच त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद-उल-फित्र हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या जीवनातील चांगल्या मुल्यांचा उत्सव आहे. या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन, एकमेकांशी प्रेम आणि आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ३०: गुढीपाडवा व मराठी नववर्षा सोबत आलेली रमजान ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, सौहार्द, एकता आणि बंधुत्व अधिक दृढ व्हावे. रमजान ईदच्या निमित्ताने वंचित, गरजू बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. यंदाची ईदही आपण सर्वांनी एकोपा, आनंद आणि उत्साहाने साजरी करुया. परस्परांप्रती सहकार्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया. मानवकल्याण आणि विश्वबंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देऊया… अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईदनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मुस्लिम बांधवांसोबतच सर्वधर्मीय नागरिकही या सणाच्या आनंदात सहभागी होतात. गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षासोबत आलेली यंदाची रमजान ईद वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्याच्या काळात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

०००

 

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. ३० : ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेतीपूरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते. या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द केल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संस्थापक प्रशासक नियुक्ती सोहळ्यात ते बोलत होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या विशेष समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन, कृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, सहकार आयुक्त दिपक तावरे, प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार आशिष देखमुख यांनी प्रशासक पदाबाबत केलेल्या विनंतीचा विचार करुन आपण हा पहिला प्रयोग करत आहोत. सहकार आयुक्तालयाने यात यथायोग्य भूमिका निभावून येत्या दीड वर्षात नागपुरची जिल्हा सहकारी बँक आर्थिक फायद्यात येईल याची खात्री असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांनी गुढीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेली ही अपूर्व भेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रुपाने नागपूर जिल्हा सहकारी बँकेला आता एक शक्तीशाली जोड मिळाली आहे. येत्या दोन वर्षात ही बँक फायद्यात येण्यासह जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आमदार आशिष देशमुख यांनी जिल्हा सहकारी बँकेत सर्वांनी मुदत ठेवी दाखल करुन आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले. शिखर बँका, जिल्हा बँका व विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यावर्षी राज्य बँकेने 52 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला असून 650 कोटींपेक्षा अधिक नफा बँकेने प्राप्त केल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

०००

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

मुंबई, दि. ३१: राज्यामध्ये दुचाकी चार चाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत करण्यात येते. नागरिकांमध्ये वाहन खरेदीचा उत्साह दिसून येत असल्यामुळे यावर्षी वाहन नोंदणी मध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तब्बल २० हजार ०५७ वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

चार चाकी कार प्रकारात २०२५ मध्ये २२ हजार ०८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८.८४ टक्के आहे. तसेच मोटरसायकल, स्कूटर या दुचाकी वाहन प्रकारात २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. यामध्येही ११ हजार ०८१ ने वाढ नोंदविण्यात आली असून २७.१४ टक्के अधिकची नोंदणी झाल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत ११ हजार ५६, पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालय अंतर्गत ६ हजार ६४८, नाशिक अंतर्गत ३ हजार ६२६, मुंबई (मध्य) परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १५४ आणि ठाणे परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १०७ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले.

०००

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा

मुंबई, दि. ३० : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

०००

गुढीपाडवा सकारात्मकता, नवउत्साहाचा सण – सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली, दि. ३०: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत, राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू असलेला नववर्ष स्वागताचा सण संपूर्ण देशभर मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा करण्यात येतो. राजधानी नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनाच्या वतीने कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांनी गुढी उभारली. त्यानंतर कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गुढी प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी सुमनचंद्रा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अन्य वरिष्ठ अधिकारी, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, सारिका शेलार, यांसह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढीपाडव्या निमित्त महाराष्ट्र सदनात स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त मराठमोळ्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत, निवासी आयुक्त आर. विमला यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यावेळी विशद केले. “गुढीपाडवा हा नवउत्साह, समृद्धी आणि सकारात्मकतेचा सण आहे. महाराष्ट्राबाहेरही तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे,” असे सांगत, त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धीचे आणि आनंददायी जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

०००

अमरज्योत कौर अरोरा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन

नागपूर, दि. ३० : नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलर कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कंपनीचे व्यवस्थापकीस संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष नुवाल, सोलर डिफेंस ॲन्ड एरोस्पेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक वासुदेव आर्या उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोटेरिंग म्युनिशन टेस्ट सुविधेचे तसेच भारतातील पहिली अनमॅन एरियल सिस्टीम (युएसए), 1.27 कि.मी. चे रनवे, हँगर्स आणि रिपेअर लेनचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सोलर ग्रुपद्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा यंत्राचे अवलोकन केले. कार्यक्रमाला कंपनीचे उपमहाव्यवस्थापक श्याम मुंदडा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

 

संघटन, समर्पण व सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची नेत्र संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
  • माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले

नागपूर, दि. ३०: संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार, त्यांनी काढले.

हिंगणा रोड वरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई- भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आरोग्य  क्षेत्रातील सुधारणांमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प जाहीर केला. गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आली. कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्या. एम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे. आरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू आहे.

आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले. आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे.  द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल. तसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील.

विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होते. मात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली. दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिली. माधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहे. समाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची नेत्र संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेला मौल्यवान ठेवा आहे. ज्यांच्याकडे दुर्देवाने ही दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य माधव नेत्रालय गत तीन दशकांपासून करीत आहे. देशात व राज्यात नेत्र आरोग्य क्षेत्रात भरीव सेवा देण्याची आवश्यकता आहे. माधव नेत्रालयासारख्या संस्था सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहेत. नेत्रालयाचे प्रीमियम सेंटर अस्तित्वात आल्याने मध्य भारतातील नेत्र आरोग्य क्षेत्रात सेवा देणारी माधव नेत्रालय ही महत्वाची संस्था ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोककल्याणाच्या प्रेरणेतून माधव नेत्रालयाचे जीवनदृष्टी देण्याचे कार्य – डॉ. मोहन भागवत

नि:स्वार्थ भावनेतून लोककल्याणाच्या प्रेरणेने माधव नेत्रालय अव्याहतपणे कार्यरत असून दृष्टीबाधितांना जीवनदृष्टी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. चैत्र प्रतिपदेचा दिवस आणि माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमीपूजन हा एक शुभ योग असल्याचे सांगत शुभ योगासाठी तप:श्चर्येची आवश्यकता असते.  तप:श्चर्येतून पुण्य लाभते व पुण्यातून फळ मिळते या मागची प्रेरणा लोककल्याण आहे. चांगल्या कर्मातून प्राप्त फळाचा उपयोग विश्व कल्याणासाठी करण्याची प्रत्येक माणसाची भूमिका असल्यास सर्वांचे जीवन निरामय होईल, असे ते म्हणाले.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या माधव नेत्रालयाचा आतापर्यंतचा प्रवास दर्शविणाऱ्या स्मरणिकेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माधव नेत्रालयाचे सचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शांतीमंत्राने कार्यक्रमांची सांगता झाली.

यावेळी महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माधव नेत्रालयाविषयी…

द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरात माधव नेत्रालयाची स्थापना १९९५  मध्ये झाली. वासुदेवनगर येथील माधव नेत्रालय सिटी सेंटर २०१८ पासून सेवेत आहे. या नेत्र चिकित्सालयातून आधुनिक तंत्रज्ञानाने गरीब रुग्णांवर कमी खर्चात उपचार होतात.

अशी असेल नवीन वास्तू

माधव नेत्रालयाची नवीन वास्तू हिंगणा रोडजवळील वासुदेवनगर येथे ५.८३ एकर जागेत बांधण्यात येणार आहे. येथे आधुनिक उपकरणांनी सुसज्ज २५० खाटा, १४ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि १४ अत्याधुनिक शस्त्रक्रिया केंद्र, नेत्रपेढी, संशोधन केंद्र असेल. सर्वत्र हिरवळ, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा अशी व्यवस्था या परिसरात राहणार आहे.

०००

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागपूर, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.

पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला अभिवादन केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्धवंदना दिली.

दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय नोंदवहीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूर स्थित दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य लाभल्याने मी भारावून गेलो आहे. या पवित्र स्थळाच्या वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समता, समानता आणि न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव येतो. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते. मला पूर्ण विश्वास आहे की या अमृत काळात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी आणि मूल्यांचा मार्ग अनुसरून देशाला प्रगतीच्या नवीन शिखरावर नेऊ. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणे हीच डॉ. बाबासाहेबांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल’, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नोंदविला.

०००

स्मृती मंदिरामुळे राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागपूर, दि. ३०:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन आद्य सरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे समाधी स्थळ, तसेच द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतले.

‘हे स्मृती मंदिर भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्ती या मूल्यांना समर्पित आहे. ते आपल्याला सतत राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देते. या दोन महापुरूषांची स्मृती जागविणारे हे स्थळ देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे’, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अभ्यागतांच्या अभिप्राय नोंदवहीत नोंदविला.

यावेळी त्यांनी महर्षी व्यास सभागृह, दत्तोपंत ठेंगडी सभागृह व परिसराची पाहणी केली, तसेच उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी स्वागत केले.

०००

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

0
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल...