बुधवार, मे 21, 2025
Home Blog Page 232

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नांदेड, दि. १० : दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा अभियान’ राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत यानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री.सावे म्हणाले, “शिक्षण हे केवळ गुणांसाठी नाही, तर ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून, प्रामाणिक प्रयत्नांद्वारे यश संपादन करावे. आगामी परीक्षा काळात जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि सर्व परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त आणि भयमुक्त राहतील यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापनांनाही अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

0000

‘दिलखुलास’ मध्ये परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुलाखत

मुंबई दि. १०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व विविध उपक्रम’ याविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 12, गुरुवार दि. 13, शुक्रवार दि.14 आणि शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रितली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व रस्ते अपघातांचे टाळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता परिवहन विभागामार्फत दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून स्पीड गन, हेल्मेटचा वापर करणे, विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच नुकताच सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे, जुन्या गाड्या वापराबाबत करावयाच्या नियमांचे पालन आदी निर्णय आणि शंभर दिवसाच्या कामकाजात प्रामुख्याने करावयाच्या बाबी, याविषयी परिवहन आयुक्त भीमनवार यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

 

राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांना सर्वोत्तम सेवा देणे हेच ब्रीद – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्यासह रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा, सुविधा देणे हेच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ब्रीद आहे. तसेच सध्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून हे रोखण्यासाठी जिल्ह्यातील 9 ते 26 वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक  (एचपीव्ही) लस देण्यासाठीचा संकल्प केला असून सीएसआर निधी व लोकसहभागातून ही लस उपलब्ध करुन दिली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परीसरात 88 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी ही विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांचा सन्मान करण्यात आला.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सीपीआर परिसरातील नूतनीकरणाची सर्व कामे या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होतील. तसेच शेंडा पार्क परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या 1100 बेडेड रुग्णालयाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. तर आयुर्वेदिक, होमिओपॅथी व निसर्गोपचार शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांची कामेही गतीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यात आणखी 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली असून यामुळे एमबीबीएस ची विद्यार्थी क्षमता वाढली असल्याचे सांगून मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सीपीआर रुग्णालयात दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ न देता या रुग्णालयाचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. त्यानुसार ही कामे हाती घेण्यात आली. येथील उर्वरित सर्व कामे ही डिसेंबर अखेर पूर्ण होतील.

गोर गरीबांचा दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयातील सर्व इमारतींच्या नूतनीकरणाची कामे या वर्ष अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी यावेळी दिली.

वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी प्रास्ताविकातून सीपीआर रुग्णालयात आजवर करण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. मानसोपचार विभाग, स्त्री रोग विभागातील शस्त्रक्रियागार, अतिदक्षता विभाग, नर्सिंग मुलींचे हॉस्टेल व ईएनटी विभाग, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वॉर्डचे नुतनीकरण, प्रत्येक वॉर्डमध्ये अत्याधुनिक बेड आदी विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली.

आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी मानले.

0000

ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. १०: मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या उत्पादीत ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटरची विक्री व वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पुण्याच्या या कंपनीद्वारे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फेरबदल करण्यात आल्यासंदर्भातील याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी त्यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ अन्वये उत्पादित केलेल्या मीटरची खरेदी करु नये, तसेच वाहनावर हे मीटर न बसविण्याचे आवाहन नियंत्रण, वैद्यमापनशास्त्र यांनी केले आहे.

०००

‘फेस डिटेक्शन’ न झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची फेरनोंदणी

मुंबई, दि. १०: मंत्रालय प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या ‘फेस डिटेक्शन’वर आधारित ‘एफआरएस’ तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फेस डिटेक्शन न झाल्यामुळे मंत्रालय प्रवेशास विलंब किंवा अडथळा होत असल्यास अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अद्ययावत छायाचित्रासह फेर नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मंत्रालयात कामानिमीत्त येणाऱ्या  अभ्यांगताना व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी  यांना ‘डिजी प्रवेश’ या अॅप आधारीत ऑनलाईन प्रणालीमार्फत मंत्रालय प्रवेश सुनिश्चीत करण्यात येणार असून त्याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. तसेच अनधिकृत प्रवेश व अनधिकृत प्रवृत्तींना चाप बसणार आहे. या प्रणालीमुळे अनुचित प्रवेश रोखले जाणार असून मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता येईल. तसेच लोकांची कामे जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे.

मंत्रालय ही अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची आस्थापना असल्याने या आस्थापनेची सुरक्षा महत्त्वाची बाब आहे. त्याअनुषंगाने मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला आहे. मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.  मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा आणि देखरेख अंतर्गत टप्पा 2 प्रकल्प हा टप्पा 1 प्रकल्पाचा नैसर्गिक विस्तार म्हणून राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना ‘फेसीअल रिकॉग्नीशन’ व ‘आरएफआयडी’ कार्ड आधारित प्रवेश देण्याबाबत तरतूद आहे. याकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील 10 हजार 500 अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांचा तपशिल या प्रणालीमध्ये भरण्यात आलेला आहे. तसेच सर्व मंत्री कार्यालये, संसदेचे व विधानमंडळाचे सर्व विद्यमान व माजी सदस्य यांचा तपशिल मागविण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे ‘फेसीअल रिकॉग्नीशन’ यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे.   जानेवारी 2025 पासुन मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना ‘फेसीअल रिकॉग्नीशन’ व ‘आरएफआयडी’ कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे.

मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना दि.26 सप्टेंबर 2023 रोजीच्या  शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. त्यामधील सुचनेनुसार बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात आणण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा भाग म्हणून अभ्यागतांजवळील पाण्याच्या बॉटल्स, औषधे व इतर पदार्थ प्रवेशद्वार येथेच काढून ठेवण्यात येत आहेत, असे गृह विभागाचे कक्ष अधिकारी प्रविण ढिकले यांनी कळविले आहे.

०००

 

नीलेश तायडे/विसंअ/

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद

सातारा, दि. 10: पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पुणे संघाने, उपविजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले. सातारा संघ तृतीय स्थानी राहिला. या विजेत्या संघांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.
सातारच्या पथकाने अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे नेटके नियोजन केले, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, स्पर्धेत कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली नाही. या स्पर्धेतून राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ बालेवाडी येथे सराव करण्यासाठी पाठवावे. राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागाला सर्वसाधारण विजेते पद मिळेल असा विश्वास व्यक्त करुन सर्वांनी यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन केले. ते म्हणाले , महसूल विभागात अनेक गुणवान खेळाडू आहेत. या खेळाडूंनी नागरी सेवा देण्यात आपल्या विभागाचा नावलौकीक वाढवावा. तसेच येणाऱ्या काळात नागरिकांच्या समस्या संवेदनशीलपणे सोडविण्यास प्राधान्यही द्यावे, असेही आवाहन विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. एकत्रित काम केले तर कार्यक्रमाचे चांगले नियोजन करता येते हे यातून दाखवून दिले आहे. खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे.
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी पुणे येथे होणार आहे. सातारा महसूल विभागाकडून क्रीडा ध्वजाचे पुणे महसूल विभागाला हस्तांतरण करण्यात आले.
या प्रसंगी सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000

ग्रामीण कला, संस्कृती अनुभवण्यासाठी ‘महालक्षमी सरस’ ला भेट द्या – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई दि. १०:  ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास उद्या दि. 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचतगटांच्या उत्पादनांची विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वैविध्य पूर्ण उत्पादने, ग्रामीण कला, संस्कृतीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये ५०० हून अधिक स्टॉल

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५”  उद्घाटन सोहळा दि. ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथे होत आहे.

या   राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये ५०० पेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४०० आणि इतर राज्यातून साधारण १०० स्टॉल असणार आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणीचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ८० स्टॉलचे भव्य असे फूड कोर्ट असणार आहे.

मुंबईकरांच्या विशेष पसंतीच्या असलेल्या या भव्य प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना होणार आहे. हे प्रदर्शन प्रशस्त मोकळ्या पटांगणात असून वातानुकूलित असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता येणार आहे. तो घेण्यासाठी मुंबई, ठाणे आणि जवळच्या सर्व महानगरातील नागरिकांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.

११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला दि. ११ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भेट देता येणार आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या ठिकाणी  प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे  यांच्या नेतृत्वात  ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव, एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे  भव्य आयोजन करण्यात येत  आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

उमेद  हे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियानामार्फत या महिलांना अनेक प्रकारची कौशल्ये व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे दिली जातात. आज अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत.  त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवर्षी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन’ आयोजित केले जाते. आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी ‘महालक्ष्मी सरस’ चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

या वर्षीपासून ‘लोणार पर्यटन महोत्सव’ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. १०: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. त्याचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्याची घोषणा पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीस माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विभागाचे संचालक  डॉ. बी. एन. पाटील, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील ई – उपस्थित होते.

जगात उल्कापातामुळे तयार झालेली तीन सरोवरे आहेत, त्यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व संबंधितांची लवकरच बैठक घेऊन महोत्सवाची तारीख व वेळ घोषित करण्याचे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, गतिमान करा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. १० : आरोग्य विभागांतर्गत राज्यातील नवीन शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच शासकीय रुग्णालयांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, आरोग्य सेवा अधिक बळकट व गतिमान करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

पायाभूत विकास कक्ष (IDW) प्रगतीपथावरील कामकाज आढावा बैठकीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी आरोग्य विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, संचालक नितीन अंबाडेकर उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, पायाभूत विकासाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. यावेळी त्यांनी प्रगतीपथावर असलेली कामे व नवीन कामांचा, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा, आयुष रुग्णालय, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम आदी बाबींचा आढावा घेतला.

०००

मोहिनी राणे/ससं/

लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. १०: बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. यादृष्टीने परिसरातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील दालनात लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन, आणि विकास आराखडा संदर्भात बैठक झाली. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, तसेच व्हीसीद्वारे बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, पुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक उपस्थित होते.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघण्यासाठी सामान्य पर्यटकांसह संशोधन करणारे पर्यटकही जगभरातून मोठ्या प्रमाणावर येतात. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञही अनेकवेळा येथे येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात यावी. पर्यटन विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावे यासाठी त्या ठिकाणी तारांगण, संग्रहालय, चिल्ड्रन पार्क, गार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश देसाई यांनी यावेळी दिले. या ठिकाणी पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून रोपवेची सुविधा करता येईल का, यासंदर्भात पाहणी करावी.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले भारतीय सैन्य दलाचे आभार

0
सातारा दि. 20 :  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर...

विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

0
छत्रपती संभाजीनगर, दि. 20: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे...

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

0
एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर ठाणे, दि.20(जिमाका):- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित सर्व रस्ते, पुल इमारतीची कामे तात्काळ पूर्ण करा – सार्वजनिक...

0
मुंबई, दि. २० : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. 20 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले...