मुंबई, दि. 11 :- पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे. याचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात आज उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सांगलीत विविध नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील – उद्योग मंत्री उदय सामंत
सांगली, दि. १० : सांगली जिल्ह्यात विविध माध्यमातून नवीन उद्योग प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करू. उद्योजकांच्या अडीअडचणी टप्प्याटप्प्याने सोडवू, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्यावतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंड. अँड अग्रीचे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. च्या संचालिका नीता केळकर, दीपक शिंदे, रवींद्र माणगावे, रमाकांत मालू आदि मान्यवर व उद्योजक उपस्थित होते.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, हळदीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र करण्यासाठी लवकरच बैठक घेऊ. तसेच संरक्षण सामग्री उद्योग प्रकल्पही सांगलीत आणण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, सांगली एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते, दिवा बत्ती व पाण्याची सुविधा महानगरपालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. एमआयडीसी क्षेत्रातील अत्यावश्यक सुविधांसाठी एमआयडीसी विभाग, महानगरपालिका व शक्य झाले तर जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल. कवलापूर विमानतळाच्या बाबतीत निकषांचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरणाचा अहवाल आल्यानंतर उचित निर्णय घेण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टचा प्रश्न सकारात्मक पध्दतीने सोडवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी एमआयडीसी करण्याचा निर्णय शासनाच्या उद्योग विभागाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड व त्या परिसरातील जमीन संपादित करून ही एमआयडीसी झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात फार मोठी औद्योगिक क्रांती होवू शकते. आपल्या भागात आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी जिल्ह्यात नवीन येणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले पाहिजे, उद्योजकांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते कामांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन मधून कामे करण्यासाठी प्रयत्न करू. उद्योजकांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता असते. नवनवीन उपक्रम, शोधामुळे जग श्रीमंत झाले. त्यामुळे आपल्यालाही त्या दिशेने जावयाचे आहे. उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहोत. संशोधनासाठी प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग जगत व प्रामुख्याने पॉलिटेक्निक इंजिनिअरींग यांनी परस्पर समन्वयाने बैठक घेऊन आवश्यक मनुष्यबळ विकसीत करण्यासाठी अभ्यासक्रम विकसीत करावेत, असे ते म्हणाले.
आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्यात मोठा उद्योग जिल्ह्यात आला पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात किमान 25 ते 30 हजार छोटे, मोठे उद्योजक तयार होतील. परराष्ट्रातून येणाऱ्या गुंतवणूकीचा काही भाग सांगलीतील उद्योग विकासासाठी वापरता येईल. नवीन उपक्रमासाठी उद्योग खात्याने इंजिनिअरींग कॉलेजशी जास्त संवाद ठेवला पाहिजे. त्यांच्या गरजा मांडाव्यात. त्यामुळे विविध प्रयोग होवून प्रगती होईल, असे ते म्हणाले.
यावेळी ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून उद्योजकांच्या अनेक अडीअडचणी, प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक केली आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांचे अनेक प्रश्न मांडले. उद्योजकांचे प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नीता केळकर, प्रविण लुंकड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उद्योजक रविंद्र मानगावे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रियांका कार्लेकर यांनी केले. कार्यक्रमास उद्योजक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
सिंगापूरसोबत व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र उत्सुक – मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १०: भारत हा सर्वांगाने पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण असलेला देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील समुद्रकिनारे, पर्वतरांगा, अभयारण्ये अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण फळे, फुले, भाजीपाला अशी मुबलक कृषी संपदा असून सिंगापूरने व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढे यावे, महाराष्ट्र आपले स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
सिंगापूरचे महावाणिज्य दूत चिओंग मिंग फुंग यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्याबाबत चर्चा झाली.
राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री.फुंग यांना माहिती दिली. जगप्रसिद्ध हापूस आंबा, स्ट्रॉबेरी, सह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळ, फळे, भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. सिंगापूरला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सिंगापूरच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी सिंगापूर करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
‘विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्या समारोप
नवी दिल्ली, दि. १० : महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (प्राइड) च्यावतीने करण्यात आले. प्रशिक्षणाचा समारोप महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते.
राज्यातील नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्यासाठी प्रशिक्षण संस्थान प्राइड (PRIDE) च्याद्वारे आयोजित या कार्यक्रमात विधीमंडळीय मसुदा लेखन (लेजिस्लेटिव ड्राफ्टिंग) कौशल्य आणि संसदीय समित्यांच्या कार्यकुशलतेचे महत्त्व प्रशिक्षण कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.
संसदीय प्रक्रियेतील सक्रीय सहभाग गरजेचा- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक दिवसांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळ सदस्यांनी शून्य तास, प्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रिय सहभाग घ्यावा, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला.
सभागृहातील उपस्थिती शंभर टक्के असावी, संसद व विधीमंडळाच्या जुन्या चर्चांचा अभ्यास करावा, तसेच विषयाचा सखोल अभ्यास करून प्रभावी लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील आमदार उपस्थित होते. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे जितेंद्र भोळे (सचिव-१) आणि विलास आठवले (सचिव-२) हेदेखील उपस्थित होते.
उपराष्ट्रपती तसेच उपसभापती यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट
उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ आणि राज्यसभेतील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.
राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासोबतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चर्चा केली. असंघटित कामगार, सामाजिक न्याय यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.
०००
अंजु निमसरकर, मा.अ.
सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मुदतवाढ नाही
मुंबई, दि. १०: महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.
काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात आली आहे. तथापि, ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
०००
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’
नवी दिल्ली दि. १०: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली.
11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल. ५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
कार्यक्रमाच्या पूर्वी शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
०००
हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत, दर्जेदार करा – मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १० : राज्य शासनाच्या पुनर्विकसित करण्यात येत असलेल्या हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावे, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
देशातील विविध महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती यांच्या बैठक आणि निवासस्थानाच्या व्यवस्थेसाठी मुंबईमध्ये असलेल्या अतिथीगृहांपैकी एक असलेल्या हायमाउंट अतिथीगृहाच्या पुनर्विकासाचे काम पूर्णत्वास आले असून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्याची पाहणी केली. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हायमाऊंट येथे महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असणार असल्याने या इमारतीचे सुरू असलेले काम मुंबई आणि महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसे असे व दर्जेदाररित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपसचिव हेमंत डांगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, मुख्य वास्तूशास्त्रज्ञ चेतन आके, वरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ मि.दी.जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील तावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वि.अ. पाटसकर, डॉ. प्रसन्ना कुलकर्णी उपस्थित होते.
मुंबईत येणाऱ्या महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी असलेले अतिथीगृह हे सर्व सुविधांनी युक्त असावे. त्यादृष्टीने हाय माउंट अतिथीगृहात एक्झिक्यूटिव्ह कक्षांसोबतच महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी आवश्यक सर्व सुविधा असणारे कक्ष असावेत, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.
हाय माउंट अतिथीगृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेल्या सह्याद्री अतिथीगृहाची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, असे निर्देशही मंत्री रावल त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे मुंबई विमानतळानजिकच्या नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
लोकनाट्य कला केंद्रांसाठी नवी नियमावली करणार – मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. १० : महाराष्ट्रातील लोककला जगली पाहिजे, लोकनाट्य कला केंद्रांवरील सादरीकरणातील पारंपरिक बाज जपला पाहिजे. तसेच सादरीकरणात पारंपरिक वाद्यांचा वापर झाला पाहिजे. या तसेच अनुषंगिक बाबींसाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून लवकरच नियमावली तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. लोककलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.
मंत्री ॲड. शेलार म्हणाले, लोकनाट्य केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. लोकनाट्य व पारंपरिक लावणी कला जपणे गरजेचे असून ही कला व हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्व.पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.
लोकनाट्य कला केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. यासंदर्भात नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
०००
संजय ओरके/विसंअ/
हिंदी भाषा व साहित्य अकादमीच्या शिष्टमंडळाकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट
मुंबई, दि. १० : साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना सन्मानित करण्यासाठी ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाषा शिखर सम्मान’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार असून याबाबतची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. हिंदी भाषा व साहित्य अकादमीच्या शिष्टमंडळानी मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली त्यावेळी ते बाेलत हाेते.
यानुसार दरवर्षी एका साहित्यिकाची निवड करून त्यास या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी आवश्यक नियमावली तयार करण्यात येणार असून लवकर याबाबतची घोषणा करण्यात येत असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.
०००
संजय ओरके/विसंअ/
कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना – मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. १०: कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स अशा विविध स्मृतींचे जतन करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर चित्रनगरी येथे नवीन वस्तुसंग्रहालयात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचा ठेवा जपला जाणार असून, जुन्या तसेच नव्या पिढीला चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली परंपरेची माहिती मिळेल असे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, सांस्कृतिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने चित्रफिती तयार करून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित कराव्या.
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे काम सुरळीत चालविले जावे, यासाठी यंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामे सुरू असल्याने या विकासकामांकरिता चित्रपट क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या वास्तुविशारद यांची बाह्य स्रोतांद्वारे नियुक्ती करावी. ही पदे भरताना ‘एम एस आय डी सी’ ची मदत घेण्याची सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी केली.
०००
संजय ओरके/विसंअ/