बुधवार, मे 21, 2025
Home Blog Page 230

मुंबई-पुणे मिसिंग लिंक जलदगतीने पूर्ण करा: राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ११:  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि ऑगस्ट २०२५ अखेर प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. तसेच, पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. हे लक्षात घेऊन, हा नवीन मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

एकूण सुधारित मार्ग: खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग आहे.

यामध्ये सध्याचे १९ किमीचे अंतर ६ किमीने कमी होऊन १३.३ किमी इतके होणार आहे.प्रवासाच्या वेळेत २०-२५ मिनिटांची बचत,इंधन बचत आणि वायू प्रदूषणात घट,घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे.

या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) पुणे विभागातील अधिक्षक अभियंता  राहुल वसईकर, कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे तसेच प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

 

राज्यमंत्री पंकज भोयर यांची बारावीच्या परीक्षा केंद्रास भेट

बुलढाणा, दि. ११ : इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शेगाव येथील श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली. प्राचार्य मीनाक्षी बुरूंगले व पर्यवेक्षक शिवाजी निळे यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी आशिष वाघ उपशिक्षणाधिकारी (मा), अनिल देवकर, उपशिक्षणाधिकारी (प्रा),गटशिक्षणाधिकारी श्रद्धा वायदंडे, योगीराज फाउंडेशनचे सचिव डॉ. श्यामकुमार बुरूंगले, श्रीधर पाटील, अन्य अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही भेट दिली.

पाहणीदरम्यान त्यांनी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती दिली. याशिवाय विद्यार्थ्यांनी शांततेत परीक्षा द्यावी तसेच परीक्षा केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि पालकांनी कॉपीमुक्त अभियात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

०००

 

पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार

मुंबई, दि.११: ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचतगटांना उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार केले जातील. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात उमेद मॉल तयार करणार आहोत, सोबतच राज्यात आगामी कालावधीत १ कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई  येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू  राहणाऱ्या ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘महालक्ष्मी सरस’ हा गत २१ वर्षे अविरत सुरू असलेला उपक्रम आहे. ‘उमेद’ अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. ‘उमेदच्या’ माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात. पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारले जातील. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बचत गटांमार्फत तयार केलेली वस्तू ही खासगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून त्या अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात. ‘उमेद’च्या माध्यमातून ६० लाखापेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत. या माध्यमातून बचतगटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी’ ही योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना ‘लखपती दीदी’  म्हटले जाते. आज महाराष्ट्रात ११ लाखांपेक्षा जास्त ‘लखपती दीदी’ आहेत. लवकरच २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा शासनाचा मानस आहे. आगामी कालावधीत १ कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. स्त्री शक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल. बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, लाडकी बहीण योजना, एसटी बसमध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत. लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री  यांनी सांगितले.

ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बचतगटांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासन आग्रही आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित माल विक्रीचे हमखास ठिकाण मिळावे, यासाठी जिल्ह्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी मॉल उभारले जातील. तालुक्यात देखील विक्री  केंद्र सुरू करण्यात येतील. बचत गटांसोबतच वैयक्तिक कर्ज देण्यासाठी निर्णय झाला पाहिजे. आज उमेद अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादननिर्मिती करत आहेत. त्यांनी तयार केलेली विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून प्रतिवर्षी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन’ आयोजित केले जाते या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन मंत्री गोरे यांनी सांगितले.

ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, ‘उमेद’च्या माध्यमातून गेली २१ वर्षे सरसच्या माध्यमातून महिलांना खुली बाजारपेठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. महिला अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत. यामध्ये ६० लाखापेक्षा अधिक लाख कुटुंबे जोडली गेली आहेत. अजूनही यामध्ये सुधारणा करायला वाव आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रत्येक जिल्ह्यावर मार्केटिंग व्हावे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘महिला सरस’ला राज्यभरातून मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त आहे. एकूण ४७९ स्टॉल्स आहेत. २५ टक्के अन्य राज्यातील महिला बचत गट देखील ‘सरस’मध्ये सहभागी आहेत. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचत गटांच्या उत्पादनांची विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वैविध्य पूर्ण उत्पादने, ग्रामीण कला, संस्कृतीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आभार मानले.

दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला ११ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भेट देता येईल. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावरील कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल  आहे. या प्रदर्शनात एकूण ५०० पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत, त्यापैकी ९० फुड स्टॉल आहेत.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

मंत्रिमंडळ निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय (दि. ११ फेब्रुवारी, २०२५)

(जलसंपदा विभाग)

पालघर मधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता

पालघर जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड) येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा अतिरिक्त खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एमएमआरडीए करणार आहे.

हा प्रकल्प पाणी पुरवठा प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे. या धरण प्रकल्पाबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या दरम्यान २३ सप्टेंबर २०२२ रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. देहरजी नदीवरील ९५.६० दलघमी क्षमतेचा हा प्रकल्प माती व संधानकातील संयुक्त धरण प्रकल्प असणार आहे. यातून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी ६९.४२ दलघमी पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असणार आहे. याशिवाय एमएमआरडीएच्या इतर क्षेत्रास देखील पाणी उपलब्ध होणार असून, सुमारे चाळीस लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. या प्रकल्पासाठी २०१९ मध्ये १ हजार ४४३ कोटी ७२ लाख रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी आता २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास दुसरी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या अतिरिक्त खर्चाची आणि प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याची जबाबदारी एमएमआरडीए ची राहणार आहे.

०००

(जलसंपदा विभाग)

पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे; ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता

पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील सिंचनासाठीच्या जनाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतर करण्याच्या कामाकरिता व त्यासाठीच्या ४३८ कोटी ४७ लाख ८७ हजार ४८३ रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची ही जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना अवर्षणग्रस्त क्षेत्रात आहे. या योजनेस खडकवासला प्रकल्पातून पाणी मिळते. या योजनेतील कालवे उघड्या पद्धतीचे आहेत. डोंगराळ भागातील मुरमाड जमिनीमुळे कालव्यांमधून पाणी गळती मोठी होते. कालव्यांची कामे पंचवीस वर्षे जूनी आहेत. पाणी उपलब्ध न झाल्यामुळे कालव्यांचे नुकसान झाले आहे.

ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने या परिसरातील ४० हून अधिक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे या योजनेतून पाणी मिळावी अशी मागणी केली होती. मूळ नियोजनानुसार कालवे व वितरण व्यवस्थेकरिता ४१५.५०५ हेक्टर भूसंपादन करावी लागणार होती. आता बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे भूसंपादनाची आवश्यकता राहणार नाही. तसेच बाष्पीभवन व गळतीमुळे वाया जाणाऱ्या १.०६ टिएमसी पाण्याची बचत होणार आहे. जनाई उपसा सिंचन योजनेतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील ८ हजार ३५० हेक्टरला व शिरसाई योजनेतून बारामती, पुरंदरच्या ५ हजार ७३० हेक्टरला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. यासर्व बाबींचा विचार करून योजनेच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणाली रुपांतरणासाठी आज मंत्रिमंडळाने ४३८ कोटी ४७ लाख ८७ हजार ४८३ रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.

०००

(मदत व पुनर्वसन विभाग)

महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियम २०१९ मध्ये दुरूस्ती

महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री समितीचे सदस्य मंत्री व अशासकीय सदस्य यांचे नामनिर्देशन करतील.

महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन नियम, २०१९ च्या नियम ३ मध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना निश्चित करण्यात आली आहे. ही रचना सुधारित करण्यास मान्यता देण्यात आली. या रचनेनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष आणि नऊ सदस्य असतील.  त्यामध्ये मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतील. तर अन्य पदसिद्ध सदस्य पदाकरिता मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून  इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील. तसेच अध्यक्ष आपत्ती जोखीम कमी करण्याचे ज्ञान आणि अनुभव असलेल्या व्यक्तींना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करतील. याशिवाय राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा या समितीत समावेश राहील.

यापूर्वी या प्राधिकरणाची रचना अशी होती, मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष, मंत्री (महसूल), मंत्री (वित्त), मंत्री (गृह), मंत्री (मदत व पुनर्वसन), मंत्री (सार्वजनिक आरोग्य) हे सर्व पदसिद्ध सदस्य होते. याशिवाय अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले आपत्ती धोके कमी करण्याचे ज्ञान व अनुभव असलेले तीन अशासकीय सदस्य आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

०००

 

कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. ११: भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे आयोजित कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२४- २०२५ या वर्षात निबंध स्पर्धेसाठी ‘विकसित भारत- सन २०४७’, उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्विमत्तेचा (AI) उपयोग विषयांवर निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध हा वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावयाचा आहे. निबंध ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा, निबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपणनांव लिहून चार प्रतीत सादर करावा.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये, निबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळया लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून); टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल, पत्ता नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १० हजार रुपये, दुसरे बक्षिस ७ हजार ५०० रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षिस २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

संस्थेस प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या प्रादेशिक शाखेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास बक्षीस न देण्याचा किंवा बक्षिसाची रक्कम कमी करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे. बक्षीस देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार नाही.

टोपणनांव लिहिलेल्या निबंधाच्या चार प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव (इंग्रजी व मराठी), टोपणनाव, पत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेल, पत्ता लिहिलेली माहिती एकत्रित एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर ‘कै. श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा, २०२४-२०२५’ असे नमूद करावे. आणि हा लिफाफा ‘मानद अध्यक्ष, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला मंत्रालय, मादम कामा मार्ग, मुंबई- ४०००३२’ या पत्त्यावर दिनांक २८/२/२०२५ पर्यंत पाठवावा. स्पर्धकांच्या काही शंका असल्यास, माहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९ ३४३० किंवा ईमेल: jsmrb-iipa@egov.in  द्वारे संपर्क साधावा.

०००

राजू धोत्रे/वि.सं.अ/

जपानची कार्यसंस्कृती जगात सर्वोत्तम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ११:  जपानचे लोक परिश्रमी, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असून जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम आहे. हिरोशिमा व नागासाकी शहरे बेचिराख झाल्यानंतर ज्या निर्धाराने जपान नव्या उमेदीने उभा ठाकला, ते अतिशय कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी  काढले.

जपानचे सम्राट नारुहितो यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातर्फे सोमवारी (दि.१०) हॉटेल ताजमहाल, मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कारचा शोध अमेरिकेत लागला असला तरी जपानमध्ये तयार झालेल्या कार गुणवत्तेच्या बाबतीत जगात सर्वोत्कृष्ट व आरामदायी असतात. जपानमध्ये निर्माण झालेले प्रत्येक उत्पादन गुणवत्तेच्या कसोटीवर पूर्णपणे खरे उतरल्याशिवाय जपान ती वस्तू बाजारात आणत नाही, ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प, विशेषतः अटल सेतू , मुंबई मेट्रो लाईन, बुलेट ट्रेन यांना अर्थसहाय्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी जपान सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

भारत आणि जपानमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक, अध्यात्मिक व तत्वज्ञान विषयक संबंध दृढ असून उभय देशांमध्ये पर्यटन विशेषतः अध्यात्मिक पर्यटन तसेच वैद्यकीय पर्यटन पर्यटनाला चालना देणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

भारत आणि जपानमधील संबंध स्वाभाविक आणि राजनीतिक दृष्टीने महत्त्वाचे असून आज उभय देशांमध्ये आर्थिक, व्यापार विषयक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य नव्या उंचीवर गेले आहे. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून जपानतर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीचा सर्वात मोठा लाभार्थी महाराष्ट्र असल्याचे जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांनी यावेळी सांगितले.भारतातून गेल्यावर्षी २.३० लाख पर्यटक जपानला गेले असून ही पर्यटक संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात भारत व जपानच्या राष्ट्रगीताने करण्यात आले. जपानचे सम्राट नारुहितो यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्ती तसेच विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.

०००

 

प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 11: ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. अस्सल ग्रामीण साहित्याच्या निर्मितीतून त्यांनी मराठी रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच ग्रामीण भागातील प्रश्न, संघर्ष आणि जीवनशैली आपल्या लेखणीद्वारे रसिकांसमोर समर्थपणे उभी केली. त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले, “प्राचार्य रा. रं. बोराडे हे ग्रामीण साहित्याचे सशक्त आणि प्रभावी लेखक होते. त्यांच्या लेखणीतून साहित्य रसिकांना ग्रामीण जीवनाचे खरेखुरे चित्र पाहायला मिळाले. ‘पाचोळा’, ‘चारापाणी’, ‘मी आमदार सौभाग्यवती’ यांसारख्या कादंबऱ्यांतून आणि विविध कथासंग्रहांतून त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, संघर्ष आणि जीवनशैलीला जिवंत केले. मागच्याच आठवड्यात त्यांना राज्य शासनाचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला होता. मात्र, त्या सन्मानाचा स्वीकार करण्याआधीच त्यांचे निधन होणे हे अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने प्रतिभावान साहित्यिक आणि कथाकथनकार हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”

ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला – ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. ११:- मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील अशा प्रा. रा. रं. बोराडे यांचे निधन या चळवळीची हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्रा. रा. रं बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रा. बोराडे यांना जाहीर झालेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला, हे दु:खद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘पाचोळाकार’ म्हणून लोकप्रियता मिळविणारे प्रा. बोराडे मराठीचे अध्यापन, साहित्य चळवळ अशा सर्वच ठिकाणी हिरीरीने पुढे राहिले. प्रा. बोराडे यांनी आपल्या अस्सल ग्रामीण साहित्यकृतींनी साहित्यात मोलाची भर घातली.  देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी भूषविले. अनेक साहित्यिक, नवोदितांसाठी ते मार्गदर्शक म्हणून आदरस्थानी होते. त्यांनी ग्रामीण साहित्य चळवळ आणि त्यातील विविध प्रवाहांना बळ दिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील समर्पित सेवायात्री हरपल्याची भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रा.बोराडे यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून, त्यांचे कुटुंबीय, चाहते यांच्या दु:खात सहभागी आहोत, असेही म्हटले आहे.

प्रा. रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

मुंबई, दि..11 : ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार प्रा. रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे, अशा शब्दांत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले.

रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी लातूर जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला होता. बघता बघता महाराष्ट्राचं अवघं साहित्यक्षेत्र त्यांची कर्मभूमी झाली ‘पाचोळा’कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोराडे सरांनी केवळ साहित्यक्षेत्रात नव्हे, तर शिक्षण आणि साहित्य प्रसाराच्या माध्यमातूनही मोठे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी ग्रामीण ग्रंथालयांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

त्यांच्या निधनाने मराठी साहित्याची मोठी हानी झाली असून, त्यांच्या साहित्याच्या रूपाने ते कायम आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असे श्री. सामंत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी

मुंबई  दि.११ :  सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २.६३  टक्के इतकी आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता, त्यांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल १ टक्का निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना, शाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एन्ट्री यासाठीच्या एकंदरीत ५ टक्के निधी वगळून नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या ९५ टक्के निधीमधून १९ टक्के निधी विविध प्रशासकीय विभागांच्या नियमित योजनांसाठी राखून ठेवण्यात येतो.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री.पवार यांनी दि.०५ फेब्रुवारी, २०२५ च्या राज्यस्तर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ आराखडा बैठकीत राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत कमाल १ टक्का पर्यंत निधी राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने नियोजन विभागाने सोमवारी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

“जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)” अंतर्गत “दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व कल्याण” या करीता राखून ठेवावयाच्या एक टक्का निधीचा सुयोग्य विनियोग होण्याकरिता त्यासंबंधीच्या योजनेचे सुस्पष्ट आदेश नियोजन विभाग, वित्त विभाग यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येतील अशी माहितीही,उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी

0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी ‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून उपलब्ध झाली...

पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले भारतीय सैन्य दलाचे आभार

0
सातारा दि. 20 :  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर...

विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

0
छत्रपती संभाजीनगर, दि. 20: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे...

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

0
एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर ठाणे, दि.20(जिमाका):- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित सर्व रस्ते, पुल इमारतीची कामे तात्काळ पूर्ण करा – सार्वजनिक...

0
मुंबई, दि. २० : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...