रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 218

बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट

मुंबई, दि. ३ : क्रोध, द्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात  नवी पहाट निर्माण होऊ शकते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून १९० बंदिजनांच्या साधनेतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत.

मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. गीता परिवारद्वारा आजतागायत १२ लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे. पूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग १३ भाषांतून व २१ ‘टाईम स्लॉट्स ‘ मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज घेतले जात आहेत. हा वर्ग ४० मिनिटांचा आहे. वर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जाते. राज्यात या उपक्रमाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमाच्या ऑनलाईन वर्गासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता कारागृह प्रशासक आणि कर्मचारी करत आहेत. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात डिसेंबर २०२३ मध्ये पहिला वर्ग सुरू झाला. टप्प्याटप्प्याने यात कोल्हापूर, नाशिक, ठाणे, तळोजा येथील केंद्रीय कारागृहांना समाविष्ट केले गेले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात २५, ठाणे ३५, कोल्हापूर ४५, नाशिक ४०, तळोजा ३५, येरवडा १० कैद्यांचा समावेश आहे. या कारागृहातील सुमारे १९० बंदी साधक गीता श्लोक पठण करीत आहेत.

प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचन सुद्धा ऑनलाईन माध्यमातून केले जात आहे. सध्या ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये तिसऱ्या टप्प्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहे. येथे एकूण १२ अध्यायांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे. गीता परिवाराकडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कारागृह अधिकारी आणि साधक या उपक्रमाबाबत समाधानी आहेत. याबरोबरच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात आले. पुरुष बंदी बांधवांकरिता रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत.

शनिवारी व रविवारी शिकलेल्या श्लोकांचे विवेचन केले जाते. यावेळी उपस्थित साधकांच्या शंकांचे निरसनदेखील केले जाते. गीता परिवाराचे हे वर्ग चार टप्प्यांमध्ये चालत आहेत. या चार टप्प्यातील वर्गांना चार स्तर म्हटले जाते. पहिल्या स्तरावर दोन अध्याय शिकवले जातात. दुसऱ्या स्तरामध्ये चार अध्याय शिकवले जातात. तिसऱ्या आणि चौथ्या स्तरमध्ये प्रत्येकी सहा अध्याय शिकवले जातात.

या उपक्रमामुळे बंदीजनांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम निश्चितच बंदीजनांना नव्या आयुष्याच्या वळणावर आणण्यास यशस्वी होत आहे. अशा उपक्रमांमुळे बंदीजन आपल्या कुटुंबात परत येऊन एक चांगले आयुष्य जगू शकणार आहेत, असा विश्वास कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘अवधान’ लघुपटाचे अनावरण

मुंबई, दि. ०२: चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनद्वारे अध्ययन अक्षमता या  विषयावर निर्मित ‘अवधान’ या लघुपटाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सिंहगड शासकीय निवासस्थान येथे करण्यात आले.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस्मिता हुद्दार, सहयोगी प्राध्यापक डॉ. गायत्री शिरूर, डॉ. अमित मिसाळ, सहाय्यक प्राध्यापक निशा कुट्टी, पूनम मिश्रा, उत्तमचंद लेहरचंद ट्रस्ट फाउंडेशनचे कबीर भोगीलाल, निखिल पाटील उपस्थित होते.

‘अवधान’ या लघुपटाच्या माध्यमातून अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना मिळणारे शिक्षण, तसेच समाजाची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये अध्ययन अक्षमतेची लक्षणे समजून घेवून मुलांच्या विकासावर लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे. याबाबतीत जनजागृती करून शिक्षक, समाज व पालक यांना अध्ययन अक्षमतेबाबत शंका कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करणारी हा लघूपट असून  यासाठी जेष्ठ कलावंत नाना पाटेकर यांनी आवाज दिला आहे. याप्रसंगी विद्यापीठामध्ये दिव्यांग केंद्र निर्माण करण्यासंदर्भात सर्वसमावेशक चर्चा  करण्यात झाली.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. ०२: चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  येथे आगमन  झाले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी उच्चायुक्त अभिलाषा जोशी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर – म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

रेडी रेकनर दरासाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारीत सर्व्हे करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

मुंबई, दि. ०२: राज्यात रेडी रेकनरचे दर लागू करण्यात आले आहे. यामध्ये क्षेत्रनिहाय दर असणे गरजेचे आहे. झोपडपट्टी, चाळी, औद्योगिक, वाणिज्यिक, पुर्नविकास आदीबाबत वेगवगळे दर असावे. यासाठी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत जीआयएस तंत्रज्ञानावर आधारीत सर्व्हे करून क्षेत्रनिहाय दर तयार करावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात रेडी रेकनर दराबाबत आयोजित बैठकीत दिल्या.

बैठकीला आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार ॲड. अनिल परब, आमदार सचिन अहीर, नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, मुंबई शहरामध्ये प्राधान्याने या सर्व्हेची सुरूवात करावी. सिटी सर्व्हे क्रमांकानुसार मुंबई शहरातील जीआयएस तंत्रज्ञानावर आधारीत सर्व्हे पूर्ण करावा. याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून कार्यवाही पूर्ण करावी. याबाबत मुंबई शहरातील लोकप्रतिनिधींच्या सूचना घेण्यात याव्यात. रेडी रेकरनच्या दरामध्ये दुरूस्ती करायची असल्यास वर्षातून दोनवेळा दुरूस्ती करण्याचे अधिकार शासनाकडे घेण्यात यावे. याबाबत कार्यवाही करावी.

मुंबई शहरातील क्षेत्रनिहाय रेडीरेकरनच्या दराबाबत धोरण ठरविण्यासाठी मुंबईतील सर्व आमदार, सर्व संबंधीत शासकीय यंत्रणा प्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचनाही मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

 

०००

मुंबईतील बनावट नकाशे दाखवून बांधकाम परवानग्या मिळवलेली बांधकामे निष्कासित करा

मुंबई, दि. ०२: मुंबईत बनावट नकाशे सादर करुन महानगरपालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळविलेली बांधकामे तातडीने निष्कासित करावीत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने स्थापन केलेल्या एसआयटीद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

याबाबत विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. आमदार सर्वश्री योगेश सागर, सुनील शिंदे बैठकीस प्रत्यक्ष तर ॲड. अनिल परब, सचिन अहिर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, ऑनलाईन उपस्थित होते.

आयुक्त गगराणी यांनी याबाबत माहिती देताना बांधकाम परवानगी ऑनलाईन दिली जात असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या परवानगीच्या आधारे केलेली बांधकामे ही अनधिकृत ठरतात, अशी ४५७ बांधकामे असून त्यापैकी ६६ प्रकरणी कारवाई करण्यात आली असून इतरांना नोटीस देण्यात येईल. त्याचप्रमाणे एसआयटी कडे देखील तक्रार दाखल करण्यात येईल. एसआयटीमार्फत आतापर्यंत झालेल्या चौकशीनुसार २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एसआयटीमार्फत देण्यात आली.

मंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिकेमार्फत जुलै महिन्यापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना यावेळी केली.

०००

 

महामुंबई एसईझेडमधील शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्याच्या मागणीबाबत सविस्तर प्रस्ताव पाठवा

मुंबई, दि. ०२: रायगड जिल्ह्यातील महामुंबई एसईझेडसाठी रिलायन्स कंपनीने घेतलेल्या जमिनी वापरात नसल्याने त्या शेतकऱ्यांना परत करण्यात याव्यात अशी संबंधित शेतकऱ्यांची मागणी आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक सविस्तर माहितीचा अहवाल आणि प्रस्ताव शासनास पाठवावा. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

एसईझेडसाठी रायगड जिल्ह्यातील २५ गावातील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी रिलायन्स कंपनीमार्फत ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी रिलायन्सने दिलेली कोणतीही आश्वासने पाळली गेली नाहीत, तसेच १५ वर्षात त्या जागेचा एसईझेडसाठी वापर झालेला नाही. त्यामुळे त्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याबाबत विधीमंडळात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने मार्ग काढण्यासाठी मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार रवीशेठ पाटील, खासदार धैर्यशील पाटील (ई-उपस्थित) यांच्यासह संबंधित बाधित शेतकरी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, मागील १५ वर्षात एसईझेडसाठी ही जमीन वापरली गेली नसल्याने एसईझेड डीनोटीफाईड झाले असल्यास त्याबाबतची प्रत मिळवावी. शेतकऱ्यांच्या संमती निवाड्याद्वारे खरेदी केलेल्या जमिनी तसेच भूसंपादन केलेल्या जमिनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांची अपेक्षा याबाबतचा सविस्तर आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा. या माहितीच्या आधारे कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन संबंधित शेतकऱ्यांना या जमिनी परत करता येऊ शकतील का याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाला सादर करावा. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, रायगडचे जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत परिस्थिती सांगितली.

०००

 

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळेत होणार; नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

मुंबई, दि.२ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच गुरुवार दि. ३  एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने SLP No. ८५७६/२०२५ या याचिकेमध्ये विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांऐवजी “अवर सचिव स्तराचे नवीन निर्वाचन अधिकारी” तात्काळ नियुक्त केल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येईल असे निर्देश २ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशान्वये दिले आहेत. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक घेण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अवर सचिव सुनीलकुमार धोंडे यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे, असेही सचिव धीरज कुमार यांनी कळविले आहे.

00000

अर्चना देशमुख/विसंअ

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २: उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरेल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सिंहगड शासकीय निवासस्थान येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, त्यातील ५० टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

संचालक पी. एन. जुमले म्हणाले की, पूर्वी केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीच ॲप्रेंटीसशिप उपलब्ध होती. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनाही ॲप्रेंटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील १० विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांसाठी भव्य मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी यावेळी दिली.

000

काशीबाई थोरात/विसंअ

भारतीय शल्यविशारदांना ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ पुरस्कार प्राप्त; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शल्यविशारदांचा सत्कार

मुंबई, दि. २ : सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES – Society of American Gastrointestinal & Endoscopic Surgeons) परिषदेचे १२ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत लॉन्ग बीच, लॉस एंजेलिस, अमेरिका येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ हा पुरस्कार भारताला मिळाला. हा पुरस्कार मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शल्यविशारदांचा सत्कार करुन कौतुक केले.

मंत्रालय येथील वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या दालनात हा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते.

सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सा संघटना असून, मिनीमल अक्सेस (Minimal Access) व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसंबंधीचे संघटनेकडून प्रस्थापित प्रोटोकॉल संपूर्ण जगभरात प्रमाण मानले जातात. ही संस्था दरवर्षी शैक्षणिक परिषदांचे आयोजन करते तसेच संशोधन व नाविन्यपूर्ण उपचार पद्धतींना प्रोत्साहन देते. या सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) २०२५ परिषदेसाठी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज जी समूह रुग्णालये, मुंबई येथील १३ शस्त्रक्रिया व्हिडिओ सादर करण्यात आले होते. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (ग्रँट मेडिकल कॉलेज) जगातील या प्रमुख परिषदेतील सर्वाधिक व्हिडिओ सादरीकरण आणि स्वीकृती मिळवण्याचा मान मिळवला आहे, अशी माहिती पुरस्कार प्राप्त डॉ. गिरीश बक्षी यांनी यावेळी दिली.

सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन परिषदेत शल्यचिकित्साशास्त्र विभागातील अध्यापक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्य

प्रोफेसर डॉ. अजय भंडारवार –प्यूट्झ जेघर्स सिंड्रोम (Peutz-Jeghers Syndrome) मध्ये आंत्र संरक्षक शस्त्रक्रियेचा बॉवेल प्रिर्झविंग सर्जरी (Bowel Preserving Surgery) संकल्पना प्रथमच वैद्यकीय साहित्यात मांडली. ही नवी शस्त्रक्रिया तंत्रज्ञान भविष्यकालीन उपचार पद्धतींवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकेल. तसेच, आयएसजी (ICG) कांटिफिकेशन तंत्र विकसित केले, जे आंत्र जोडणीतील गळती ॲनास्टोमोटिक बॉवेल लेक (Anastomotic Bowel Leak) आणि गुंतागुंतीचे परिणाम अचूक ओळखण्यास मदत करेल. यामुळे रुग्णांचे मृत्यूदर व गुंतागुंत टाळता येईल आणि उपचाराचे परिणाम सुधारतील.

डॉ. गिरीश बक्षी – संशोधन प्रकल्पाची रूपरेषा तयार केली आणि डॉ. भंडारवार यांना शस्त्रक्रियेत मदत केली. तसेच, त्यांनी संशोधन विश्लेषण करून अंतिम अहवाल तयार केला.

डॉ. वरूण दत्तानी – वरील दोन विषयांवर संशोधन सादरीकरण केले आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ॲबस्ट्रॅक्ट हा पुरस्कार जिंकला. त्यांच्या सादरीकरणांनी मध्ये पहिले आणि तिसरे पारितोषिक मिळाले.

डॉ. मनीष हांडे – बॉडी पॅकर सिंड्रोम (Body Packer Syndrome) वरील संशोधन सादर केले, जिथे अतिशय कमी आक्रमक तंत्राचा वापर करून रुग्णाच्या शरीरातून ड्रग पेलेट काढण्यात आला. हा उपचार पहिल्यांदाच वैद्यकीय साहित्यात नोंदवला गेला असून, त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

पुरस्कार श्रेणीतील सात पोडियम सादरीकरणात दोन सादरीकरणे सर ज.जी. रुग्णालयांमधील होती. ज्यामध्ये रुग्णसेवेसाठी नाविन्यपूर्ण आणि सुधारित शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे.

या परिषदेत प्राप्त यशामागे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मोलाचे योगदान आहे. यासाठी पुरस्कार प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

0000

अर्चना देशमुख/विसंअ/

लातूर जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करावे – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 2 : लातूर येथे भव्य विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठीची कार्यवाही जलद गतीने करावी. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडापट्टूंसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही टप्प्या-टप्प्याने विकास करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

जिल्हा क्रीडा संकुलाचा पुनर्विकास व लातूर येथील विभागीय क्रीडा संकुल उभारणीस गती देणेबाबत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार अमित देशमुख, क्रीडा व युवक कल्याणचे सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उप जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता टकले आदिसह अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण व नवीन क्रीडा सुविधा निर्माण  करण्याकरिता प्रत्यक्ष जागेची पाहणी करून, मुलभूत सेवांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच प्रेक्षा गॅलरीची उभारणी आणि जुन्या प्रेक्षा गॅलरीस शेड उभारण्यात यावी. यासाठी अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही त्वरीत करावी.

याचबरोबर नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी विभागीय क्रीडा संकुल लातूर येथे उभारण्यात येणार आहे. तसेच इतर विभागीय क्रीडा संकुलासाठी उपलब्ध सोयी-सुविधांचा अभ्यास करून त्याच धर्तीवर विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भातील कार्यवाही करण्याच्या निर्देशमंत्री भरणे यांनी दिले.

आमदार अमित देशमुख यांनी क्रिकेट प्रबोधिनी उभारणे, क्रीडा संकुलाचा रस्ता, अल्पसंख्यांक वर्गातील मुलांचे वसतीगृह यासंदर्भात सूचना केल्या. यासंदर्भात क्रीडा मंत्री भरणे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...