शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 198

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी ५० सायबर पोलीस ठाणे

मुंबई दि. १७: सायबर फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तसेच भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहे. त्यानुसार राज्यामध्ये ५० सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असून जिल्हा आयुक्त स्तरावर सायबर लॅबची स्थापना करण्यात येत आहे. कार्यान्वीत झालेल्या लॅबमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जागतिक स्तरावरील अत्याधुनिक आणि क्रांतिकारी उपक्रम महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

जानेवारी ते ‍‍डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र सायबर कार्यालयातील एनसीआरओ पोर्टल व सायबर हेल्पलाईन १९३० वर एकूण ३ लाख ३२ हजार ५३८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीच्या रक्कमेपैकी ४४०.३७ कोटी रूपये वाचविण्यात आले आहेत. संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ऑनलाईन होऊ लागल्याने शासनाने नागरिकांची होणारी फसवणूक थांबविण्याच्यादृष्टीने http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आणि टोल फ्री क्रमांक १९३० वर आर्थिक फसवणूक झाल्याबाबत तात्काळ तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नॅशनल क्राईम रिर्पोंटींग पोर्टलवर सन २०२४ मध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई शहरात २ पुणे शहरात १२५ व ठाणे शहरात ८६२  सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर आर्थिक फसवणूक झालेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये ८३८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे व ९४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.  तसेच संपूर्ण राज्यात एकंदरीत सायबर गुन्ह्यांमध्ये १ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यामध्ये १ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांवर वचक निर्माण करण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत.  कमांड अँड कंट्रोल सेंटर अंतर्गत हेल्पलाईन १९३० आणि राज्यासाठी १९४५ हेल्पलाईन क्रमांकाद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात ५ हजार पोलीसांना सायबर तपास आणि प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे असे पोलीस उपमहानिरीक्षक महाराष्ट्र सायबर यांनी कळविले आहे.

000

निलेश तायडे/विसंअ

पीक उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात समिती -कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि.१७: राज्यातील शेतक-यांचा पीक उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी पिकाच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणा-या खर्चापैकी ५०% ‘मनरेगा’ मधून अदा करण्यासंदर्भात अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन मजुरीच्या खर्चाचा ‘मनरेगा’ मध्ये समावेश करण्याबाबत राज्य शासनामार्फत केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात येईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी संघटनांच्या बैठकीत सांगितले. तसेच, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

राज्यातील विविध शेतकरी संघटनांची कृषीविषयक प्रश्नाबाबत मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ललित पाटील, प्रकाश शिंदे तसेच कृषी, सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या कांदा, केळी, द्राक्ष अशा पिकांच्या प्रश्नांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री व केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. राज्यातील शेतक-यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा सहजरित्या लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक ही डिजिटल प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल असे त्यांनी केले.

कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकरी संघटनांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन या योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच, राज्यातील प्रत्येक पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राची अद्ययावत माहिती शेतक-यांना व कृषी विभागास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येईल असे ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केले.

बैठकीत राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण इ. विषयावर सूचना केल्या.

००००

संध्या गरवारे/विसंअ

चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव, स्व.राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

  • सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार
  • २५ एप्रिल २०२५ रोजी मुंबईत पुरस्काराचे वितरण

मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांर्गत रु.१० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाईल. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप रु. ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना घोषित झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे रु. १० लाख व रु. ६ लाख, स्मृतिचिन्ह व मानपत्र, चांदीचे पदक असे स्वरूप आहे.

तसेच, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. १० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार्थीची निवड करण्याकरिता शासन स्तरावर समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे सदस्य असून सांस्कृतिक कार्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.

सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल, २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार असून, संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

0000

संजय ओरके/विसंअ

 

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृषी विद्यावेत्ता आणि मृदा विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प-२ ची अंमलबजावणी’ या विषयावर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता आणि मृदा विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २२ एप्रिल २०२५  रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुचेता गरूडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी शेतकऱ्यांना जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास साहाय्य करणे या उद्देशाने राज्यात ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. राज्यात ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प-२’ राबविण्यात येत असून सर्व दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना पाणी आणि हवेच्या परिस्थितीनुसार शेती करणे तसेच शेतविषयक नवीन संशोधनाचा उन्नत शेतीसाठी उपयोग करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, शेतीतील कर्ब उत्सर्जन कमी करणे आणि पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे. राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी याविषयी या प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता तथा मृदा विज्ञान तज्ज्ञ श्री. कोळेकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

00000

जयश्री कोल्हे/स.सं

 

 

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण

मुंबई, दि. १७: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे ‘ ब्रेक थ्रू ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.  यावेळी कौशल,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्यांकडून  प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच कळ दाबून ‘ब्रेक थ्रू’ कामाला सुरुवात केली. यानंतर या कामाची पाहणी केली. हा भुयारी बोगदा मेट्रो ७ अ वर डाऊनलाईन वर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टेशन ते एअरपोर्ट कॉलनी स्टेशन दरम्यान हा बोगदा असणार आहे.  ही मेट्रो जोडणे मुंबई महानगर प्रदेशातील एकूण मेट्रो जाळ्यासाठी महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा-भाईंदर व पुढे वसई – विरार हा भाग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत मेट्रोने जोडले जातील. तसेच ठाणे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा मेट्रो ने जोडण्यात येईल. या मेट्रो मार्गाचे ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

मेट्रो मार्ग ७ अ विषयी..

या मेट्रो मार्गाची लांबी ३.४  किलोमीटर असून त्यापैकी उन्नत मार्ग ०.९४ किलोमीटर आणि भूमिगत २.५० किलोमीटर आहे. या मार्गावर दोन स्थानके असणार आहेत. एक स्थानक उन्नत मार्गावर एअरपोर्ट कॉलनी तर दुसरे स्थानक भूमिगत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असणार आहे.  उन्नत मेट्रो मार्ग ०.५७ किलोमीटर असेल दुहेरी बोगद्याची लांबी २.०३५  किलोमीटर आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी डाउनलाईन बोगद्याचे पहिले ड्राईव्ह सुरू झाले. या बोगद्याची लांबी १.६५ किलोमीटर असून लाइनिंगसाठी ११८० रिंग्स बसविण्यात आल्या आहेत.  बोगद्याचा व्यास ६.३५ मीटर एवढा असून सहा भागात विशेष डिझाईन असलेल्या प्रिकास्ट रिंग वापरण्यात आल्या आहेत.

सप्टेंबर २०२३ मध्ये टीबीएम मशीन जमिनीपासून ३० मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आली. मेट्रो मार्ग तीनच्या वरून, सहार उन्नत रस्त्यांच्या पायाखालून,  मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करून विविध अडचणींवर मात करून या बोगद्याचा ब्रेक थ्रू पूर्ण करण्यात आला. या मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांना कुलाबा ते वसई विरार, मीरा भाईंदर पर्यंत  आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे.

या मार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रोमार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील. मेट्रोमार्ग ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या भूमिगत स्थानक मार्गासोबत सुलभ संलग्न करणे शक्य होईल.  प्रवाशांसाठी सुरक्षित आरामदायी व सुलभ प्रवास शक्य होणार आहे.  दाटीवाटीच्या नागरी परिसरातून मेट्रोसाठी उन्नत व भूमिगत मार्गाची रचना केल्यामुळे विमानतळ परिसरात मेट्रो बांधकामासाठी कमी जागा व्यापली जाणार आहे.

00000

निलेश तायडे/विसंअ

महाराष्ट्र-यूएई कृषिमाल व्यापाराला चालना देण्याची मोठी संधी – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १६ : संयुक्त अरब अमिरात (युएई) हा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) मधील एक महत्त्वाचा कृषीमाल-आयात करणारा देश असून, भारत तिचा एक प्रमुख अन्न व कृषी व्यापार भागीदार देश आहे. महाराष्ट्राच्या कृषी उत्पादनांची विविधता, गुणवत्ता आणि उत्तम दळणवळण सुविधांमुळे यूएई सोबत कृषी व्यापार वाढवण्याची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

दुबई चेंबर ऑफ कॉमर्स आणि संयुक्त अरब अमिरातीचे महावाणिज्यदूत अब्दुल्ला अलमर्जुकी यांच्या सोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, भारत आणि यूएईमधील मजबूत द्विपक्षीय संबंध, तेथील मोठी भारतीय लोकसंख्या आणि दर्जेदार अन्नपदार्थांची वाढती मागणी पाहता, भारतीय कृषी उत्पादक व निर्यातदारांसाठी ही एक मोठी संधी आहे. विशेषतः महाराष्ट्रातील फळे, भाजीपाला, धान्ये आणि प्रक्रिया केलेले अन्न या गोष्टींना यूएईमध्ये विशेष मागणी आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र व यूएईमधील कृषी विषयक व्यापारी संबंध अधिक सक्षम होतील, असा विश्वासही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

महाराष्ट्र-युरोपियन युनियन परस्पर व्यापार वृद्धीसाठी सहकार्य – राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर असून युरोपियन युनियन सोबत कोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीची आणि व्यापाराची अधिक संधी आहे ते क्षेत्र निश्चित करण्यात यावे. यासाठी राजशिष्टाचार आणि पणन विभाग युरोपियन युनियनला मदत करेल, असे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी युरोपियन युनियन चेंबर्सच्या प्रतिनिधींना सांगितले.

युरोपियन युनियन चेंबर्स (भारतीय हितधारक) यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित मंत्री श्री.रावल बोलत होते. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, युरोपियन युनियन चेंबर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जी, संचालक डॉ. रेणू शोमे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र आणि युरोपियन युनियनच्या परस्पर सहकार्याने व्यापाराची क्षेत्र निश्चित झाली की त्या विभागासोबत सविस्तर चर्चा करता येईल. यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्राची कृषी उत्पादनांची विविधता आणि गुणवत्ता युरोपियन बाजारासाठी आकर्षक आहे. महाराष्ट्रात हापूस आंबा, डाळिंब, द्राक्षे, कांदा, हळद, तांदूळ आणि गहू यांसारख्या विविध आणि उच्च दर्जाच्या कृषी उत्पादनांचे उत्पादन होते. ही विविधता युरोपियन संघ देशांतील विविध ग्राहकांच्या गरजांना पूर्ण करण्यास सक्षम आहे. विशेषतः कोकणातील हापूस आंबा आणि पुण्याची द्राक्षे युरोपियन बाजारात विशेष मागणी असलेल्या उत्पादनांमध्ये गणले जातात, असेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी नमूद केले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

महाराष्ट्र सायप्रससोबत निर्यात क्षेत्रात व्यावसायिक सबंध वाढविण्यास उत्सुक – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे कृषीमाल, फळे आणि फुलांचे केंद्र असून, येथून विविध उच्च दर्जाची शेतीउत्पादने सायप्रससारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यास उत्तम संधी आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सायप्रससोबत कृषीमाल निर्यात क्षेत्रात व्यावसायिक सबंध वाढविण्यास उत्सुक आहे, असे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, इंडियन मर्चंट्स चेंबर आणि सायप्रसचे मानद वाणिज्यदूत विराज कुलकर्णी यांच्यासोबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे, सायप्रसचे प्रतिनिधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले,   सायप्रस ही मध्य पूर्वेतील एक लहान परंतु महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील अर्थव्यवस्था उच्च उत्पन्नावर आधारित आहे. अलीकडील काळात येथे दर्जेदार कृषी उत्पादने आणि प्रक्रिया अन्नपदार्थांची मागणी झपाट्याने वाढत असल्याने  सायप्रससोबत व्यावसायिक संबंध वृद्धिंगत केल्यास नक्कीच लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला. येत्या काळात महाराष्ट्रात व्यापारविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी सायप्रसला निमंत्रित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

व्हिएतनाममध्ये कृषी उत्पादनांच्या निर्यातीची संधी – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १६ : व्हिएतनाममधील अन्न विषयक मागणीतील विविधता, बदलती आहारपद्धती आणि अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार या गोष्टी महाराष्ट्रातील कृषीमाल निर्यातदारांसाठी संधी निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

इंडो-व्हिएतनाम चेंबर्सचे अध्यक्ष अजय रुईया आणि व्हिएतनामचे महावाणिज्यदूत बियेन क्वांग ले यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्र व व्हिएतनाम मिळून कृषी, औषधी, स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, ऑईल अँड गॅस आदी विविध क्षेत्रात व्यापाराची मोठी संधी आहे. या क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्यात येईल. व्हिएतनाम मधील प्रांतांसोबत सहकार्याचे संबंध बळकट केले जातील. महाराष्ट्रात येत्या काळात बियाणे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग आणि उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

 

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सोय; आश्रमशाळा आणि विद्यापीठ परिसरात उभारणी -मंत्री डॉ. अशोक उईके

मुंबई, दि. १६ : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना निवासाची अडचण भासू नये, यासाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. वसतिगृहाची गरज आहे त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये तसेच विद्यापीठाच्या परिसरात वसतीगृह उभारण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. वसतिगृहांच्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मंत्री डॉ. उईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विभागांतर्गत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी चंद्रशेखर वझे, प्रणव गोंदे, दूरदृष्यप्रणालीद्वारे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्यातील विद्यापींठात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विभागाने कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. वनधन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींच्या वनौपज खरेदी व विपणन व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

आदिवासी आश्रमशाळांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांची चरित्रे उपलब्ध करून देण्याबाबत तसेच वनहक्क समिती सदस्यांच्या नियमित आणि नियोजित प्रशिक्षण याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील वनहक्क समितीबाबत आढावा घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी समाजातील कोलाम, पारधी, कातकरी, माडिया, गोंड समाजाच्या विकासाकरिता विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमामुळे या समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.

जात पडताळणीची प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा वाढवणे, कौशल्य व आर्थिक विकासाच्या योजना याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

००००

शैलजा पाटील/विसंअ

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...