रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 194

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ

मुंबई, दि. २१ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.

सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.

शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

0000

Rahul Pande takes oath as State Chief Information Commissioner

3 State Information Commissioners also sworn in

Mumbai, 21st April : Governor C. P. Radhakrishnan today administered the Oath of office to the newly appointed State Chief Information Commissioner Rahul Pande at a brief swearing-in ceremony held at Raj Bhavan, Mumbai.

In the oath taking ceremony attended by State Chief Minister Devendra Fadnavis, the Governor also administered the  Oath of office to three State Information Commissioners – Ravindra Thakre, Prakash Indalkar and Gajanan Nimdev.

Earlier, Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware read out the notification of appointment of the State Chief Information Commissioner and State Information Commissioners.

The oath taking began with National Anthem and State Song and concluded with the rendition of National anthem.

The oath-taking ceremony was attended by MLC Parinay Phuke,  Chief Secretary Sujata Saunik, Principal Secretary Brijesh Singh, senior journalists, and dignitaries from various walks of life.

0000

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली विविध विभागाची आढावा बैठक

नागपूर, दि. २१ : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभाग व जिल्ह्याचा आढावा घेतला.

येथील रविभवनात आयोजित या बैठकीस अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर आयुषी सिंह, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, पुरवठा उपायुक्त अनिल बन्सो, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये व नागपूर जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबतची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी जाणून घेतली. समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, ॲट्रॉसिटीच्या प्रकरणांची स्थिती, व्यसनमुक्ती केंद्र, वृद्धाश्रम आदींसह दिव्यांग कल्याण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. आदिवासी विकास विभागाच्यावतीने विभागात सुरु असलेली वसतीगृहे, एकलव्य पब्लिक स्कूल, नामांकित शाळा, सैनिकी शाळा आदींची माहिती त्यांनी घेतली. यासोबतच केंद्र सरकारच्या जनधन, मुद्रा, प्रधानमंत्री आवास, आयुष्यमान भारत या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीची स्थितीही त्यांनी जाणून घेतली.

०००

जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार असल्याने हा आनंदाचा क्षण सर्वासमवेत अनुभवता येणार आहे. नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण होत असून यापुढे अडचण होणार नाही असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

आज, राई येथील धामणी प्रकल्प येथे जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा अंतर्गत अभियंत्यांची तांत्रिक कार्यशाळा व शेतकरी  संवाद सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, आज माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण आज झाले. धामणीमुळे नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण होत असून यापुढे अडचण होणार नाही. यंदाच्या दिवाळीतील अभ्यंगस्नान धामणीत नक्की करणार आहे. पूर्णत्वास येणाऱ्या या प्रकल्पास सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी व नागरिकांचे यावेळी त्यांनी आभार मानले. प्रकल्पग्रस्त व शेतकरी यांच्याशी संवाद साधला.

कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी धामणी प्रकल्प अभियंत्यासाठी पर्यावरणाशी अभ्यासपूरक असून याचा लाभ घ्यावा. या प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडे उभारणीस सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी धामणी प्रकल्पांची माहिती देत या प्रकल्पांमुळे शेतकरी तसेच अनेक गावांच्या नागरिकांना यामुळे पाण्याची सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमांच्या सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न एम. विश्वशरय्या यांचे प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक जलसंपदा विभागाचे एस.एन.पाटील व आभार विशाल शेळोलकर यांनी केले.

यावेळी राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, भुमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले, एस.एन.पाटील, यांत्रिकी विभागाचे संग्राम पाटील, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी व यांत्रिकी अभियंता, शिवाजी चौगुले, दीपक शेट्टी, जलसंपदा विभागाचे कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार निर्माळे यांनी केले.

000000

धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियाजित वेळेत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

        पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाकडून धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियोजित वेळेत होत आहे. येथील पंचक्रोशीतील पाण्याची कमतरता यापुढे राहणार नसून या गावातील शेतकरी व ग्रामस्थ आनंदाने नागरी सुविधांचा लाभ घेतील. धामणी प्रकल्पग्रस्तांचे पहिले पुनर्वसन नंतर धरणाचे काम होत असल्याने नागरिकांची कोणतीही तक्रार होणार नाही. या प्रकल्पाच्या पूर्णत्वास नागरिकांचे, जलसंपदा व विविध विभागाकडून मुदतीत काम पूर्ण चांगले सहकार्य मिळाले आहे.

नव्याने बस थांबा, प्राथमिक शाळा इमारत, स्मशान शेड, ग्रामपंचायत इमारत, समाज मंदिर, पाणीपुरवठा आदी पुनर्वसित नागरी सुविधांचा लोकार्पण कार्यक्रम यावेळी करण्यात आले. धामणी मध्यम प्रकल्प पडसाळी व राई येथील प्रकल्पग्रस्त व शेतकरी त्यांच्याशी सोहार्दपूर्ण संवाद साधला.

या कार्यक्रमावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्री श्री. आबिटकर यांचे पुष्पगुच्छ व श्री फळ देवून आभार मानले. यावेळी राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, एस.एन.पाटील, दूधगंगा प्रकल्प उप विभागीय अभियंता विजयसिंह राठोड, यांत्रिकी विभागाचे संग्राम पाटील, दूधगंगा प्रकल्पचे सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे, पडसाळीचे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच अंकुश जिनगरे, तानाजी चौगुले, दीपक शेट्टी, जलसंपदा विभागाचे कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार निर्माळे यांनी केले.

000000

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम

अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चासत्र ठेवणार !

मुंबई दि. २०: संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेला जागर संविधानाचा  गौरव विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचा हा सांगीतिक कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, सामाजिक जाणीव जागवणारा हा सोहळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेली मूल्ये, तत्वे आणि त्यांचे विचार जगाला मार्गदर्शक असून त्यांची ही मूल्ये व विचार जगाच्या व्यासपीठावर नेण्यात येणार असून अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात सुध्दा चर्चासत्र, शोधनिबंध सादर करण्यात येतील, असा संस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आमदार संजय उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर, राज पुरोहित, मुख्यमंत्री कार्यालयाचे  व संस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह सिने, नाट्य व संगीत क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

मंत्री श्री. शेलार म्हणाले, संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असताना सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित  करून  संविधानाचा जागर करण्यात येत आहे. राज्यात या निमित्ताने चर्चासत्रे, उद्देशिकेचे  वाचन, घरोघरी संविधान यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर बाबासाहेबांचे विचार आणि भारतीय संविधान जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी मांडण्याचा  सांस्कृतिक विभागाचा संकल्प आहे.

अरबी सागराच्या साक्षीने आणि गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी हजारोंच्या उपस्थितीत  ‘जागर संविधानाचा’  हा कार्यक्रम होत आहे. नाट्य, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम हे  या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचे मंत्री श्री. शेलार म्हणाले.

 

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले.

०००

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. २० : पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल असे सांगते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र, पुणे आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी आयोजित दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान सोहळा भांडारकर संस्था लॉ कॉलेज रोड येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विकलांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, केंद्राचे विश्वस्त व प्रमुख विनय खटावकर, सचिव राजेंद्र जोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था करून आणि सेवा आणि समर्पण हा भाव ठेऊन दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा एक नवीन जागतिक विक्रम तयार केला. सेवेचाच भाव ठेऊन काम करणाऱ्यांसाठी विक्रम बनवावा लागत नाही तर तो एक विसावा असून हा प्रवास कधीच थांबत नाही. हा विक्रम पुन्हा हीच संस्था मोडेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने या केंद्राचे नाव दिव्यांग पुनर्वसन केंद्र करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विशेषतः आर्टिफिशियल लिम्ब्ज मनुफॅक्चरिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया (अलिम्को) स्थापन केल्यामुळे पूर्वी जे अत्याधुनिक कृत्रिम अवयव (प्रोस्थेटिक पार्ट्स) आयात करावे लागत होते; ते तयार करण्याचे तंत्रज्ञान भारतात आणल्याने जागतिक गुणवत्तेचे कृत्रिम अवयव आपल्या देशात तयार होत आहेत. मोठ्या ग्रामीण भागातील लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने योजना सुरू केली असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, असे देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

राज्यातील शासकीय कार्यालये, संकेतस्थळे या सर्व ठिकाणी सुगमता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 100 दिवसांच्या कार्य आराखड्यामध्ये दिव्यांगांकरिता सुगमता निर्माण करणे हेदेखील लक्ष्य दिले आहे, अशी माहिती देखील श्री. फडणवीस यांनी दिली.

श्री. चितळे यांनी माहिती दिली. या विक्रमात दिव्यांगांना ८ तासात ८९२ अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कृत्रिम हात, पाय अवयव बसविण्यात आले. संस्थेला या कार्यासाठी आर्थिक मदतीसाठी मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येतात. सेवेतून चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. ढोले पाटील, श्री. खटावकर यांनी मनोगत व्यक्त केले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे परीक्षक स्वप्नील डांगरेकर यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राला जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी जागतिक विक्रमाबाबत माहितीची चित्रफित दाखविण्यात आली. प्रायोजक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

0000

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

आपल्या वसुंधरेसाठी नऊ दिवस समर्पित भावनेने काम करा

मुंबई, दि. २० : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते महाराष्ट्र दिन १ मे, २०२५ या कालावधीत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ या उपक्रमांतर्गत मंत्री पंकजा मुंडे या स्वतः २२ एप्रिल रोजी मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी  केले आहे.

नदी, नाले, तलाव स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे

श्रीमती मुंडे म्हणाल्या, 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे. या दिवशी आम्ही पर्यावरण वातावरणीय बदल विभागामार्फत एक अत्यंत चांगली संकल्पना राबवत आहोत. ती संकल्पना म्हणजे जागतिक वसुंधरा दिवसाच्या पासून  म्हणजे, 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिनापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जसं आपण नवरात्र साजरा करतो, नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतो, आराधना करतो, तसंच वसुंधरेची आराधना करण्यासाठी हे नऊ दिवस विविध कार्यक्रम आपण सर्वांनी राबवावेत. 22 एप्रिल रोजी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मी स्वतः 22 एप्रिल रोजी पवई लेक मुंबई येथून स्वच्छतेची सुरुवात करणार आहे. दि. 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी आपण सर्वांनी आपापल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महानगरातील, नगरातील पाण्याचे विविध स्त्रोत साफ करायचे आहेत. नद्या, नाले, तलाव ह्यांची स्वच्छता करायची आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषद सीईओपर्यंत, तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारीपर्यंत, ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत आणि आमदार, खासदार, पालकमंत्री या सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे.

याबरोबर शासकीय यंत्रणासमवेत वेगवेगळ्या संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी देखील यामध्ये सहभाग घ्यावा.  नदी – नाले, सरोवर  स्वच्छ करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे अधिकाऱ्याचे आणि सामाजिक संस्थेचे मूल्यमापन करून त्यांचा सुद्धा जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर सन्मान होईल आणि राज्यभरातून अशा अत्यंत चांगल्या काम केलेल्या लोकांचा राज्यपातळीवरही सन्मान होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रीड्यूस, री-यूज आणि रिसायकल या त्रिसूत्रीचा प्रयोग करणाऱ्यांचा होणार सत्कार

दि. 25, 26 आणि 27 एप्रिल या तीन दिवसांमध्ये विविध संघटना, शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी या सर्वांनी मिळून रीड्यूस, री युज आणि रिसायकल या तत्त्वाप्रमाणे म्हणजे, आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टींचा वापर कमी करणे म्हणजे रीड्यूस  करणे, त्याचबरोबर कोणत्याही चांगल्या गोष्टी ज्या आपण परत परत वापरू शकतो त्यांचा रीयूज करणे आणि कुठल्याही गोष्टी जसे पाणी रिसायकल करतो आणि ते वापरतो त्यामुळे आपण वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा फार मोठा फायदा त्याच्यामधून होतो आणि पर्यायी आपल्याला त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे या त्रिसूत्री चा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, रीड्यूस, री यूज आणि रिसायकल या तत्त्वावर कोणी जर अत्यंत चांगले प्रयोग केले असतील, तर या प्रयोगांचा सन्मान एक मे रोजी महाराष्ट्रदिनी ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या त्या जिल्ह्यामध्ये होईल. तसेच हे प्रयोग राज्य पातळीवर मागवून यांच्यामधले उपयुक्त प्रयोगाचे कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात येईल. तसेच अशा प्रयोगाचा उपयोग विविध योजनामध्ये करण्याचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.

घोषवाक्य स्पर्धा घेऊन विजेत्यांना गौरविणार

दि . 28, 29 व 30 एप्रिल या तीन दिवसांमध्ये पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव या अभियानाच्या माध्यमातून घोषवाक्य (स्लोगन) स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट घोषवाक्य तयार करणाऱ्यांचा सन्मान हा महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात येईल. तसेच या घोषवाक्याचा समावेश महाराष्ट्र दिनाच्या संचलनात  देखील करण्यात येईल.  प्रत्येक जिल्ह्यामधून तीन असे घोषवाक्य घेऊन राज्यस्तरावर तीन उत्कृष्ट घोषवाक्य निवडण्यात येतील. याचा वापर महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या जाहिरातींमध्ये केला जाईल. उत्कृष्ट तीन घोषवाक्य करणाऱ्यांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात येईल.

22 एप्रिल ते 1 मे या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच सामान्य नागरिक यांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे.

00000

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

सातारा, दि.२०: पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे महाबळेश्वर दौऱ्यावर होते. यावेळी मधाचे संग्रहालय व विक्री केंद्रास आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास भेट दिली. तसेच त्यांनी महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसराची आणि प्राचीन मंदिरांची पाहणी केली.
प्रथमतः त्यांनी पाच नद्यांचा संगम असणाऱ्या पंचगंगा मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मंदिराची पाहणी केली. त्यानंतर जुने महाबळेश्वर मधील हेमाडपंथी वास्तुशैली असणाऱ्या व प्राचीन शिवमंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वैशिष्टपूर्ण मंदिराची पाहणी केली. कृष्णा नदीच्या उगमस्थानी वसलेल्या कृष्णामाई मंदिरात जाऊन देवीची पूजा केली व मंदिराची पाहणी केली.
या सर्व भेटीनंतर मधाचे संग्रहालय व विक्री केंद्र असणाऱ्या मधुसागर केंद्रास भेट दिली. तसेच मध उद्योगास चालना मिळावी म्हणून स्थापन केलेल्या मध संचालनालयाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी मध उत्पादन, मध विक्री व मध संकलन यासंबधी माहिती जाणून घेतली. तसेच मधासंदर्भात स्थानिक व्यवसाय व स्थानिक उत्पादने यांची माहिती घेऊन व्यवसायिकांना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण उद्योगांना चालना देणाऱ्या आणि स्थानिक कारागिरांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या महाबळेश्वर येथील प्रादेशिक कार्यालयाला भेट दिली.यावेळी खादी आणि ग्रामीण उद्योगातून बनलेल्या वस्तूंच्या उत्पादनाची माहिती घेतली.
यावेळी ते म्हणाले, ” थंड हवेचे ठिकाण’ किंवा ‘गिरीस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी देश-विदेशात दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देत असतात. याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळांचे ब्रँन्डिग करुन त्याठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील याचाही पर्यटन विभागाचा मंत्री या नात्याने या दौ-यात पाहणी करुन व माहिती घेऊन अभ्यास केला.”
याप्रसंगी महाबळेश्वरच्या तहसीलदार श्रीमती तेजस्विनी खोचरे पाटील,विशाल जाधव, तलाठी सागर शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.
0000

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर, दि २० : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिडर्रसल सिस्टिम (पीजीआरएस) ही ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुख्यमंत्री सचिवालयात या संदर्भात बैठक झाली.

शासकीय कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला तात्काळ दिलासा देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. यास अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यावेळी व येथील मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांशी व विषयांशी संबंधित निवेदने, अर्ज व तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर उचित कार्यवाही होण्याच्या दृष्टीने पीजीआरएस ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्यधिकारी आशा पठाण यांनी या ऑनलाईन प्रणाली विषयी सविस्तर सादरीकरण केले.

या ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त निवेदने व अर्जांचे विभागनिहाय व तक्रारनिहाय वर्गीकरण करण्यात येईल. हे अर्ज व निवेदने स्कॅन करून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल व त्याची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराला कळेल. संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येवून अर्जदाराचा अर्ज निकाली काढल्याबाबत अर्जदारास एसएमएसद्वारे माहिती मिळेल. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या ऑनलाईन प्रणालीबाबत समाधान व्यक्त केले. लवकरच ही सुविधा जनेतेचा सेवेत रूजू होणार आहे.

बैठकीस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, समाज कल्याण आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

00000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या; मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर, दि. २० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित केल्या. त्यांनी या जनता दरबारात एकूण ६२६ निवेदने स्वीकारली.

महिला व बाल विकास विभागाच्या पिंक ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपूरच्या विविध भागातील नागरिकांनी येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील हैदराबाद हाऊस या मुख्यमंत्री सचिवालयात एकच गर्दी केली होती. श्री. फडणवीस यांची दिव्यांग, महिला, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या सांगून निवेदन दिले. म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्री यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याबाबत आश्वस्थ केले. दुपारी १२ ते ३ दरम्यान या जनता दरबारात जवळपास २ हजार नागरीक सहभागी झाले होते तर ६२६ निवेदन प्राप्त झाली आहेत.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह, ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, समाज कल्याण आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

00000

ताज्या बातम्या

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...