मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 186

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २५ : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी,  नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर श्रीनिवास आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील नागरिकांना प्रवास करताना जास्त ताटकळत थांबावे लागू यासाठी नियोजन करावे. बसच्या संख्या वाढविण्यासोबत बस किती वेळात येणार, सध्या कुठे आहे, याची माहिती प्रवाशांना होण्यासाठीच्या यंत्रणेची त्वरित अंमलबजावणी करावी. बांद्रा, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मुंबईतील छोटे, अरूंद रस्ते पाहता अत्याधुनिक छोट्या बस घ्याव्यात. यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या एन कॅपच्या (नॅशनल क्लिन एअर पॉलिसी) निधीचा वापर करावा.

मुंबईमध्ये लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल आणि बससाठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची प्रणाली तयार होत आहे. यातून नागरिकांना एकाच तिकिटामध्ये प्रवास करता येणार असल्याने बेस्टला याचाही फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाच बस डेपोच्या ठिकाणी मराठी सिनेमा थिएटर

बस डेपोंचा पुनर्विकास करताना करमणूक केंद्राचाही विचार करण्याबाबत सहपालक मंत्री श्री. शेलार यांनी सूचना केल्या. मराठी सिनेमाला उर्जितावस्था येण्यासाठी पाच ठिकाणी मराठी सिनेमा थिएटरची निर्मिती केल्यास यातूनही उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘मनपा’च्या बजेटमध्ये निधीची तरतूद

‘बेस्ट’वरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिका मदत करते. मात्र ‘मनपा’च्या बजेटमध्ये तीन टक्के वाहतुकीसाठी राखीव तरतूद केली तर याचा ‘बेस्ट’ला फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बेस्टचे व्यवस्थापक श्री. श्रीनिवास यांनी टोल माफ करावेत, कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटीची १६५८ कोटी मिळावेत. सरकारी कर माफ करण्याची मागणी केली. याबाबत प्रस्ताव सादर करावेत, शासन याचा सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

छोट्या गाड्यांचा प्रस्ताव तयार करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो स्टेशन आणि बेस्ट बसच्या मार्गाचे नियोजन करावे. यासाठी छोट्या अत्याधुनिक बसचा प्रस्ताव तयार करावा. नागरिकांच्या करानुसार सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. मुंबई शहरात बेस्टच्या विविध ठिकाणी जागा आहेत, त्यातूनही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत.

बेस्टच्या वातानुकूलित बसचे उद्घाटन

बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला हिरवी झेंडी दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईसाठी २,१०० वातानुकूलित बसची खरेदी करण्यात आली असून यातील ५०३ बस मिळाल्या असून आणखी २,४०० बस मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

‘जीपीएस’साठी गुगलशी करार

प्रवाशांना सध्या बस कुठे आहे, किती वेळेत येईल, यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यासाठी जीपीएस सिस्टीमचा उपयोग होणार आहे. यासाठी बेस्ट गुगलशी करार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बेस्ट बसची सद्यस्थिती

सध्या बेस्टकडे २,७८३ बस; यामध्ये ८७५ इलेक्ट्रीक बस

लोकसंख्येच्या तुलनेत सात हजार बसची आवश्यकता

रिक्षा, मेट्रो, टॅक्सीपेक्षा कमी भाडे; भाडेवाढीची मागणी

२०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रीक करण्याचा ‘बेस्ट’चा मानस

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं

“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”चे आयोजन

महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण  करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित केला आहे त्यानिमित्त…

बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात काळानुरूप बदल स्वीकारत काम करणे  आवश्यक असते. हे काम त्या काळाला अनुरूप असेल तर ते अधिक गतीमान होते. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासकीय कामामध्ये कुशलता वाढवून कामांची गुणवत्ता वाढवणे, समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जोपासणे, कमी कालावधीत अधिक अचूक काम करणे व लोकाभिमुख असणे ही काळाची गरज आहे.

आज काळानुरूप तंत्रज्ञानात आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत झपाट्याने बदल होत आहे. हे लक्षात घेता प्रशासकीय अधिकारी यांना या प्रशिक्षणातून गतीमानतेने प्रशासकीय कामकाज व्हावे,काम करत असताना येणाऱ्या ताण – तणावाचे व्यवस्थापन याबाबींचे मार्गदर्शन मिळत राहणे गरजेचे आहे यातून तणावरहित कार्यपद्धती आत्मसात करणे शक्य होते त्यातून कामाप्रती असलेली बांधिलकी जपली जाते आणि लोकसेवेच्या व्यापक भावनेतून ,प्रशासकीय कामकाजात अधिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन वेळोवेळी अनेक उपक्रम राबवत असते. हेच लक्षात घेवून केंद्र शासनाच्या Integrated Government online Training (iGOT) प्रणालीवर उपलब्ध असलेले प्रशिक्षण राज्यातील अधिकारी यांनी घ्यावेत यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना सूचना केल्या आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम

महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित केला आहे. महाराष्ट्र शासन आयोजित आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असलेली टेक वारी म्हणजे पहिली डिजिटल वारी असून टेक वारी ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. –अपर मुख्य सचिव व्ही. राधा, सामान्य प्रशासन विभाग.

‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगण आणि परिषद सभागृह सातवा मजला येथे विविध व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच  विविध क्षेत्रातील २४ स्टार्टअप्सचे सादरीकरण होणार असून निवड झालेल्या कल्पनांना १५ लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे.

‘टेक वारी’ म्हणजे काय तर (TECH-WARI) म्हणजे (Wisdom through wellness and Work-life Balance) निरोगीपणा आणि जीवनातील कामकाज संतुलन,(Awareness of Emerging technologies) उदयोन्मुख तंत्रज्ञानाची माहिती व जनजागृती,(Reform in Governance Practices) प्रशासनाच्या कामकाजात अधिक गतीमानता आणणे,(Informed and Inclusive Workforce) जाणकार आणि समावेशक कुशल अधिकारी व कर्मचारी यासाठी प्रयत्न करणे यासाठी टेक वारी असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले आहे.

आय गॉट प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्र शासनाच्या आय गॉट (iGOT) प्रणालीवर विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणे उपलब्ध आहेत. हे प्रशिक्षण मिशन कर्मयोगी अंतर्गत विकसित केलेले आहे,जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी आहे. आय गॉट मध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित ऑनलाइन प्रशिक्षण मॉड्यूल्स उपलब्ध आहेत. आय गॉट मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते, जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाला जोडले जाणार आहे. १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत सामान्य प्रशासन विभागाने केंद्र शासनाच्या आय गॉट प्रणालीवर तीन महिन्यात राज्यात ९ हजारावरून ५ लाख कर्मचाऱ्याची नोंदणी  केली आहे. आय गॉट प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टेक वारी असेल अथवा आय गॉट प्रणाली शासनातील अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या व्यस्त दिनचर्येतून स्वयंविकासासाठी असलेले हे व्यासपीठ शासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक विकासासोबतच त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा अधिक लोकाभिमुख होतील. महाराष्ट्र शासनाच्या  वेगवेगळ्या आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आय गॉट वर जरूर प्रशिक्षण घ्यावेच सोबत टेक वारीतही सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.

००००

– संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ निमित्त ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रिया खान यांची मुलाखत

मुंबई, दि.25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनासोबत काम करण्यासाठी युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त तरूणांनी अर्ज सादर करून शासनासोबत काम करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाबाबत घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि.26 एप्रिल 2025 रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर रात्री 8.00 वा. खाली दिलेल्या लिंकवरून पाहता येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 29, बुधवार दि. 30 एप्रिल तसेच गुरूवार दि. 1 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा तसेच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी यासाठी “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. फेलोंच्या निवडीसंदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी उमेदवारांना दिनांक 5 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे निकष, निवड प्रक्रिया, अनुभव आणि अर्ज सादर करण्याच्या एकंदरित प्रक्रियेबाबत ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून विशेष कार्य अधिकारी श्रीमती खान यांनी माहिती दिली आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं

 

मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २५ : जम्मू व काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्देवी मृत्यू पावलेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंग्लंडमधील लंडन शहरातील इंडिया हाऊस येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या श्रद्धांजली सभेत मृत्यू झालेल्या भारतीय पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह यूके मधील भारताचे उच्चायुक्त उपस्थित होते. मंत्री शिरसाट हे ‘डॉ. बी. आर. आंबेडकर ग्लोबल व्हिजन रिइमॅजनिंग : जस्टीस, इक्वलिटी अँड डेमॉक्रॅसी’ या जागतिक परिषदेसाठी लंडन येथे गेले आहेत.

यावेळी मंत्री शिरसाट म्हणाले, पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. दहशतवाद हा मानवतेसाठी घातक असून अशा घटनांमुळे देशाचे मनोबल खचणार नाही. या दुर्घटनेत जखमी झालेल्या  पर्यटकांशी प्रशासनाच्या वतीने संपर्क करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांची निवासव्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केला जात आहे. मंत्री श्री. शिरसाट यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्देवी मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. भारतीय उच्चायुक्त यांच्यावतीने ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

 

राज्यपालांची आर्चबिशप हाऊस येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २५ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कुलाबा येथील आर्चबिशप हाऊस येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी होऊन रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख दिवंगत पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यपालांनी पोप फ्रान्सिस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली आणि काही क्षण स्तब्ध उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली.

प्रार्थना सभेला मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स, विविध धर्मांचे प्रतिनिधी आणि मुंबईतील विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor pays tribute to Pope Francis

Maharashtra Governor C.P. Radhakrishnan offered his homage to Pope Francis, Head of the Roman Catholic Church at a Prayer Meet held at the Archbishop House in Mumbai on Fri (25 April).

The Governor offered flowers to the Portrait of Pope Francis, the late Sovereign Head of the Vatican City and stood in silence for a moment.

Archbishop of Bombay John Rodrigues, representatives of various religions and Consuls General of various countries in Mumbai were present.

००००

 सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २५: निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांनी दिली.

कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर,  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत आणि नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नये, अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे. या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार आहे. राज्य शासन रुग्णालयांना जागेसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देते.

जागतिक हिवताप दिनानिमित्त चांगले काम करण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अधिकारी, कर्मचाऱ्यासह नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे. आपले मानसिक आरोग्य चांगले राखून निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया आहे या विचाराने सर्वांनी काम करावे, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली पाहिजे. असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालये आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमध्ये प्रशिक्षण हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, अभिलेख कक्ष, वाहनतळ, आदी पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे, या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन आपला दवाखान्यांपैकी पुणे शहरात सात दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब नागरिकांना अधिक गतिमान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री आबिटकर म्हणाले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातही आपल्या सेवा पुरविल्या आहेत. या पुढील काळातही आरोग्य विभाग चांगली कामगिरी करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमानंतर जागतिक हिवताप दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून आरोग्य मंत्री आबिटकर त्यात सहभागी झाले.

यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळा सुरु करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये स्वच्छता, आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे राज्यातील ८ परिमंडळातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये साथरोग उद्रेक काळात जीवाणू व विषाणू चाचणी जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री आबिटकर यांनी केली.

०००

२५ ते २७ एप्रिल दरम्यान होणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे

मुंबई: दि.२४: पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ ते २७  एप्रिल, २०२५ या कालावधीत शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला भारतरत्न पं भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे.

या महोत्सवाची नवीन तारीख यथावकाश कळवण्यात येईल, असे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

0000

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा

मुंबई, दि. २४ :  पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या (१) टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर हॉस्पिटल, (२) गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज  आणि केइएम हॉस्पिटल, (३) लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल  हॉस्पिटल तसेच (४) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि आर एन कूपर हॉस्पिटलमध्ये  मानसिक आरोग्य सेवा विविध पातळ्यांवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुंबईतील या चार प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते सायं. ४ वाजेपर्यंत समुपदेशन, तीव्र तणावाचे मूल्यमापन, पीटीएसडी  (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) ची शक्यता, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती यासह सेवा दिल्या जाणार आहेत.

याच रुग्णालयांमध्ये सायं. ४ ते सकाळी ९ या वेळेत तणाव, निद्रानाश, अस्वस्थता, घटना पुन्हा अनुभवण्याची भावना यासाठी आपत्कालीन समुपदेशन व औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हिटगुज (HITGUJ) या आत्महत्येच्या प्रतिबंधासाठीच्या ०२२-२४१३१२१२ या दूरध्वनी हेल्पलाइनचा वापर करून सकाळी ९ ते सायं. ४ पर्यंत तज्ज्ञ समुपदेशक मानसिक लक्षणांची तपासणी करतील व आवश्यकतेनुसार रुग्णालयात पाठवण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा :

नायर हॉस्पिटल

डॉ. हेनल शाह (इन्चार्ज) : 9323193505

डॉ.जान्हवी केदारे (युनिट प्रमुख) : 93222 39997

डॉ.अल्का सुब्रमण्यम: 9820143245

केइएम हॉस्पिटल

डॉ.अजित नायक (विभाग प्रमुख) : 98703 14844

डॉ. नीना सावंत (युनिट प्रमुख) : 9930583713

डॉ.क्रांती कदम : 99209 69088

डॉ.शिल्पा आडारकर : 98201 39158

सायन हॉस्पिटल

डॉ.निलेश शाह (विभाग प्रमुख) : 8879564532

डॉ.हिना मर्चंट : 9930395679

कूपर हॉस्पिटल

डॉ .देवराज सिन्हा (इन्चार्ज) : 9869989894

000

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये; पर्यटकांशी साधला संवाद

बुलढाणा, (जिमाका) दि. 24 : जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर अडकुन पडलेल्या पर्यटकांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन भेट घेऊन संवाद साधला. पर्यटकांना घरी सुखरुप पोहचविण्यासाठी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल या पर्यटकांना आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहे. मृतकांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत. शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते, लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते.

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 49 पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनांसाठी गेलेले आहेत. हे सर्व पर्यटक सुखरुप आहेत. आज दि. 24 एप्रिलच्या सकाळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू-काश्मीरला गेले. पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे, असे पर्यटकांना सांगतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल. आज दुपारी 3 वाजता जम्मू कश्मीर वरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार होतील. दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे पोहचणाऱ्या रेल्वेने त्यांना पाठवल्या जाणार आहेत. या सर्व पर्यटकांसाठी विशेष रेल्वे बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी अनेक पर्यटकांनी व पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता. त्यांना घरी सुखरुप पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गृहमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे.

0000

 

कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक पदाचा प्रवीण टाके यांनी स्वीकारला पदभार

कोल्हापूर, दि. 24 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी श्री.प्रवीण टाके यांनी आज कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर  येथे त्यांनी पदभार स्वीकारुन कामकाजाबाबत आढावा घेतला.

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, उपसंपादक रणजित पवार, सहाय्यक अधीक्षक रवींद्र चव्हाण,  विभागीय व जिल्हा माहिती  कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सामान्य प्रशासन विभागाच्या २२ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपसंचालक (माहिती) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या यादीत जिल्हा माहिती अधिकारी,  नांदेड म्हणून कार्यरत असलेले प्रवीण टाके यांचाही समावेश आहे.

यापूर्वी त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रूजू झाल्या नंतर नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी, मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक असताना लोकराज्यचे कार्यकारी संपादक म्हणून  तर चंद्रपूर व नागपूर या दोन ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्य केले आहे . शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी नागपूर पत्रिका, तरुण भारत, सामना व लोकमत या दैनिकांमध्ये पत्रकारिता केली आहे.

000000

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...