बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 176

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे, खड्डे नाहीत

  • प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिकचे अतिरिक्त आवरण
  • मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित

मुंबई, दि. २१: बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये तसेच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून केले जात आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात येते की, सदर आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत. सध्या प्रसारमाध्यम व समाजमाध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

याअनुषंगाने नागरिकांमध्ये गैरसमज पसरु नयेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे.

मुंबई किनारी रस्ता अंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. डांबरीकरणाच्या काही भागांमध्ये सांधे रुंद झाले होते. हे सांधे आणखी रुंद होवू नये आणि डांबरीकरण पूर्णपणे मजबूत रहावे, टिकावे यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. कारण पावसाळा सुरु झाल्यानंतर, सततच्या व जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होवू नये, रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. या ठिकाणी आता अस्फाल्टचा नवीन थर निकषानुसार देण्यात येणार आहे. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

वरळी ते चौपाटी या दक्षिणवाहिनी मार्गावर मास्टिकचे आवरण टाकलेले नाही, हे नागरिकांनी व प्रसारमाध्यमांनी कृपया लक्षात घ्यावे. कारण सदर दक्षिणवाहिनी मार्ग मार्च २०२४ मध्ये खुला करण्यात आला. परिणामी, त्यावरील डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी मजबूत होण्यास पुरेसा अवधी मिळाला. सबब, प्रकल्पातील मार्ग बांधणीमध्ये कोणताही दोष नाही, हे सिद्ध होते.

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, सर्व मुंबईकरांना, नागरिकांना तसेच प्रसारमाध्यमांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते की, कृपया कोणत्याही अपुऱया माहितीवर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा मुंबई व महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांमधील आगळावेगळा मानदंड प्रस्थापित करणारा प्रकल्प आहे. त्याच्या अभियांत्रिकी बांधणीबाबत, बांधकाम दर्जाबाबत आणि एकूणच सुरक्षेबाबत कृपया कोणत्याही शंका बाळगू नयेत, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

०००

श्री जोतिबा मंदिर व परिसराचा विकास ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच केला जाईल – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ग्वाही

शंभूराज देसाई यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान दख्खनचा राजा श्री जोतिबा आणि

 करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

कोल्हापूर दि. २१: महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दौऱ्यादरम्यान श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी येथे भेट देऊन त्यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन करवीर निवासिनी माता अंबाबाई देवीचेही त्यांनी दर्शन घेतले. याप्रसंगी सर्वांना उत्तम आयुरारोग्य आणि सुखसमृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी वाडीरत्नागिरी येथील मंदिर परिसराची, तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टची पाहणी केली. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थान आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, या उद्देशाने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. जोतिबा देवस्थानसह परिसरातील सर्व संबंधित गावांचा समावेश असलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर श्री जोतिबा मंदिर आणि संपूर्ण परिसराचा विकास केला जाणार आहे. या संपूर्ण परिसरात वृक्ष लागवड, पक्षी उद्यान, जलसंवर्धन, सुशोभीकरण, यात्री निवास, भाविकांना विविध सुविधा आदी विकासकामे केली जाणार आहेत. श्री जोतिबा मंदिर व परिसराचा हा विकास ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी दिली.

तसेच येथे पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी आवश्यक त्या सूचना दिल्या. आजच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्यामुळे कोल्हापूरशी आमच्या कुटुंबाचे घट्ट बंध जोडले गेले आहेत. येथील प्रत्येक भेटीत त्यांच्याबद्दल आणि आमच्या कुटुंबाबाबत करवीरवासीयांमध्ये असलेली आपुलकीची भावना जाणवते. कोल्हापूरकरांच्या या प्रेमाबद्दल नेहमी कृतज्ञ आहे आणि यापुढेही राहील, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराज देसाई (दादा), ॲड. इंद्रजितजी चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा), जयराज देसाई (दादा) यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.

०००००

राज्याचे नवीन कृषी धोरण आखणार – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

कोल्हापूर, दि. २१ : राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचवावा तसेच अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वंयपूर्ण व्हावा त्याचबरोबर राज्यातून अधिक निर्यात वाढावी आदी उद्देश्याने लवकरच राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर  खासदार धैर्यशिल माने, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, कृषी आयुक्तालयाचे (पुणे) सहसंचालक रविशंकर चलवदे, सहायक संचालक (संशोधन) डॉ. अशोक पिसाळ, रामेतीचे प्राचार्य बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिदंर पागंरे (कोल्हापूर), जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार (सांगली),  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे (सातारा), ऊस तज्ज्ञ संजीव माने आदी मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, कृषी विद्यापीठाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक प्रश्नाचे निराकरण करावे. शेतकऱ्यांनी रासायनिक शेती ऐवजी सेंद्रीय शेती करण्याला प्राधान्य द्यावे तसेच त्यांनी कृषी पुरक व्यवसायाकडे वळावे, भविष्यात शेतकऱ्यांना कृषी विषयक चुकीची औषधे देणाऱ्या कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसुल करुन ती संबंधित बाधित शेतकऱ्यांना देण्याबाबत विचार सुरु असून याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. पर्जन्यमान व हवामान केंद्रे गावोगावी उभे करण्याबाबत शासनाचा विचार सुरु आहे. कृषी विभागात सुटसुटीतपणा आणणार असल्याचे सांगून कृषी विभागाकडून पारदर्शी कामकाजाला प्राधान्य देणार असल्याचेही कृषीमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले.

विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी राज्यात ऊस उत्पादनामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची विशेष योगदान असल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. तसेच ऊस तज्ज्ञ संजीव माने व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रारंभी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विविध कृषी विषयक स्टॉलला भेट देवून तेथील उपस्थितांशी संवाद सांधला. यावेळी कृषी मंत्र्यांनी सांगली जिल्ह्यात दिनांक २३ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित फळ महोत्सवाच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या प्रसिध्दी रथाला हिरवा झेंडा दाखविला.  याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्षे, भातपीक, नाचणी, डाळिंब, बांबु, हळद, काजु, आंबा, ड्रॅगन, नर्सरी आदी पिकांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींचा उहापोह केला. या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 

कृषी विभागाच्या विविध योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देश्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर विभागातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रथमच परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात प्रत्यक्ष कृषी मंत्र्याशी थेट संवाद झाल्याने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कृषी विभागाला धन्यवाद दिले. या परिसंवादाच्या निमित्ताने तब्‌बल सुमारे साडेचार तासाहून अधिक वेळ उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

*****

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून शिवाजी विद्यापीठाचा आढावा

मुंबई, दि. २१ : राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी विद्यापीठासंदर्भात विस्तृत सादरीकरण केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, संशोधन व आंतरराष्ट्रीय सहकार्य, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, भाषांतर प्रकल्पांतर्गत कार्य, आंतरवासिता कार्यक्रमाची अंमलबजावणी, अध्यापकांची उपलब्धता, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, क्रीडा सुविधांचा विकास, ‘स्वच्छ भारत अभियान’ व विकसित भारत उपक्रमांमध्ये विद्यापीठाचा सहभाग, उद्योग क्षेत्राशी सहकार्य आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

बैठकीला प्रकुलगुरू प्रा. पी. एस. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. अजितसिंह जाधव उपस्थित होते.

०००

शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देणारी योजना ‘अॅग्रीस्टॅक’

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने  १४ ऑक्टोबर २०२४ पासून  महाराष्ट्रासह देशातील २४ राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना  राबविण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. याशिवाय हंगामी पिके, भू-शास्त्रीय माहिती आणि अन्य महत्त्वाचे डेटा गोळा करून त्यांचे सतत अद्ययावतीकरण करणे,  कृषी कर्ज आणि विमा सेवांचा लाभ सहज मिळवून देणे, किमान आधारभूत किंमत व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी  ऑनलाईन नोंदणीद्वारे शेतमाल खरेदी प्रक्रिया सुलभ करणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला गती देणे आणि नावीन्यपूर्ण उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हादेखील ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यामागील उद्देश आहे.
‘अॅग्रीस्टॅक’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे अनेक फायदे होणार आहेत. यात प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ अधिक जलद व सुलभ होईल, शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया वेगवान होईल आणि शेतीविकासासाठी अधिक सहाय्य मिळेल,  शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक सुलभ प्रवेश मिळेल,  सरकारी कार्यालयांना वारंवार भेटी न देता डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल, शेतकऱ्यांना नव्या योजनांची माहिती तात्काळ मिळणार आहे. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करणे सुलभ होईल.  किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल.
‘अॅग्रीस्टॅक’ योजनेत ओळखपत्रासाठी शेतकऱ्यांना सीएससी केंद्र, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत  https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटत असेल, त्यांच्यासाठी गावपातळीवर महसूल विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेत शेतकऱ्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या सातबारा उताऱ्याबरोबर जोडण्यात येऊन त्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत मोफत नोंदणी करण्यात येत आहे.
नोंदणीत अहिल्यानगर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत नोंदणी करण्यात राज्यात अहिल्यानगर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात ६ फेब्रुवारीअखेर २ लाख १० हजार ३८५ शेतकऱ्यांनी ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुका प्रथम क्रमांकावर असून २३ हजार ९७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात त्याखालोखाल राहूरी २० हजार ९५९, संगमनेर १९ हजार ४२७, पाथर्डी १८ हजार ६८८, शेवगाव १८ हजार ५९०,  अहिल्यानगर १७ हजार १९७, श्रीगोंदा १६ हजार ७०८, पारनेर १३ हजार ११०, राहाता ११ हजार ५९१, अकोले ११ हजार ४२१, श्रीरामपूर ११ हजार ४३, कर्जत ९ हजार ९५७,  जामखेड ९ हजार ५९३, कोपरगाव ८ हजार १२७ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे.
संकलन – उप माहिती कार्यालय, शिर्डी

स्मार्ट क्लासरूमसोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद

मुंबई, दि. २१: सामाजिक दायित्व निधीतून समाजकार्य अनिवार्य केल्यापासून गेल्या दशकामध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यांसह अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य झाले असून या निधीतून होत असलेले शासकीय व निमशासकीय शाळांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपालांनी आज परळ मुंबई येथील श्री तुलसी हिंदी माध्यमिक विद्यालयास भेट देऊन तेथे सामाजिक दायित्व निधीतून तयार करण्यात आलेल्या स्मार्ट वर्गखोल्यांची तसेच स्वच्छतागृहांची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते.

स्मार्ट क्लासरूम व डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देताना स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक आहे असे सांगून शिक्षक परिवर्तनासाठी तयार नसल्यास आधुनिक सुविधांचा लाभ अपेक्षित प्रमाणात पोहोचणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

‘युवा अनस्टॉपेबल’ या अशासकीय संस्थेच्या पुढाकाराने शाळांच्या अद्ययावतीकरणाची देशव्यापी मोहीम राबविण्यात आली असून त्या योजनेअंतर्गत शाळेला स्मार्ट क्लासरूम व आधुनिक स्वच्छतागृहे  उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली देशात अनेक परिवर्तनकारी उपक्रम राबविण्यात येत असून ‘स्वच्छ भारत’ उपक्रमाअंतर्गत  रेल्वेमध्ये बायो टॉयलेट बसविल्यामुळे देशातील रेल्वे स्थानके स्वच्छ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळांमध्ये आधुनिक स्वच्छतागृहे बसवून देताना तेथे पुरेसे पाणी उपलब्ध असल्याची खातरजमा करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी संस्थांना केली.

यावेळी राज्यपालांनी मुलांना परस्पर संवादी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या विज्ञान – तंत्रज्ञान प्रयोगशाळेला भेट दिली तसेच शाळेत नव्याने विकसित करण्यात आलेल्या स्वच्छता सुविधा आणि स्मार्ट वर्गखोल्यांची पाहणी केली.

या प्रसंगी युवा अनस्टॉपेबलचे संस्थापक अमिताभ शहा, एचडीएफसी बँक ‘परिवर्तन’ उपक्रमाच्या प्रमुख नुसरत पठाण, लेखक अमीश त्रिपाठी, पार्थ वसवडा (युवा अनस्टॉपेबल), कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते आणि युवा अनस्टॉपेबलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते टाटा कॅपिटल, बँक ऑफ अमेरिका, जीएसके, नोमुरा, कॅपजेमिनी, नुवामा, एचडीएफसी बँक, बजाज इलेक्ट्रिकल्स, येस बँक, फिनोलेक्स आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांच्या योगदानाबद्दल ‘युवा कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

०००

 

 

आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधांसाठी निधी देणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि.२१ : जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधांसह जल संधारणाच्या कामांना प्राधान्याने निधी मंजूर केला जाईल. तसेच सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेत जाऊन बैठक घेतली. यावेळी त्यांनी सिंचन, पुनर्वसन, जलसंधारण, आरोग्य, आदींबाबत आढावा घेतला. त्यांच्या समवेत आमदार रवि राणा, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रविण तायडे, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, प्रविण पोटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी उपस्थित होते.

सिंचन हा शासनाचा प्रथम प्राधान्याचा विषय आहे. प्रामुख्याने गेल्या वीस वर्षांपासूनची सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी जुनी कामे शोधून त्याची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. टप्प्याने ही कामे घेण्यात येणार आहे. यामुळे अल्प निधीमध्ये याठिकाणी पाणी साचणार असल्याने सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामाची माहिती सादर करण्यात यावी. सिंचनाची व्यवस्था करताना दर्जेदार पुनर्वसनाची कामे करण्यात यावी. पुनर्वसित गावातील सर्व नागरिक स्थलांतरित होत नाही तोपर्यंत शासनाची जबाबदारी पूर्ण होत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

नाला खोलीकरण करून त्यातील माती पांदण रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पात गाळ आणि रेती साचली असल्यास आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांना भेटी देण्यात येणार आहे. यात पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन आवश्यक असलेल्या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. शासनाकडून आवश्यक असलेली मदत यासाठी देण्यात येईल. पाणी गळती ही मोठी समस्या असून या बाबीवर लक्ष केंद्रित करावे. येत्या काळात सिंचनाची व्यवस्था सुरळीत करण्यात येणार आहे. यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा परिषदेत जलसंधारण, आरोग्य, महिला व बालविकास आदींचा आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. डॉक्टरांसाठी कमी मुदतीत मुलाखती घेण्याचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांची भरती करण्यात यावी. प्रामुख्याने ‘आपला दवाखाना’ येथे डॉक्टरांची व्यवस्था करावी. मेळघाटसारख्या दुर्गम भागात विशेषज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात यावी. सर्व शाळा, अंगणवाडीमध्ये वीज पुरवठा करण्यात यावा. याठिकाणी पाणी आणि फिल्टरची व्यवस्था करण्यात यावी. येथे डिजीटल अंगणवाडी आणि शाळा तयार करण्यात येईल. यासाठी सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शासनाच्या शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी जाणून घेतली.

00000

खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत- डॉ. अशोक उईके

आदिवासी विकास विभागातील क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न

नागपूर,दि. २१ : आदिवासी विकास विभागामध्ये खेळाला विशेष महत्व असून दैनंदीन जीवनात खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे शासकीय कामकाजात सुद्धा सुधारणा होत असते, असे असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते झाले. यावेळी  प्रकल्प अधिकारी नितीन ईसोकर, लेखाधिकारी संजना पेंडके, सहा. लेखाधिकारी विनोद बोरघाटे, नियोजन अधिकारी माधुरी नासरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाद्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय मैदान येथे क्रीडा स्पर्धा व विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, नागपूर येथे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.

मैदानी खेळामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल या खेळाचा समावेश होता तर इनडोअर खेळामध्ये बुद्धीबळ, कॅरम, संगीत खुर्ची, मटकी फोळ, इत्यादी खेळांचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सामूहिक नृत्य, वैयक्तीक नृत्य, गायन, वेशभुषा, कविता, नाटक आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या क्रीडास्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रमाकरिता नागपूर विभागातील प्रकल्प कार्यालय नागपूर अधिनस्त सर्व शासकिय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकिय वसतिगृहातील गृहपाल व कर्मचारी, अपर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी, प्रकल्प कार्यालय नागपूर, चिमुर, वर्धा, देवरी , अनु. जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर तसेच शबरी आदिवासी महामंडळ, नागपूर येथील जवळपास ३५० कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला होता.

00000

आजपर्यंतची मराठी साहित्य संमेलने

केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्णय जाहिर करून आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. महाराष्ट्र हे मराठी भाषिकाचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आपल्या मायमराठीचा जागर करण्यासाठी सज्ज झाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे हे देखील मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे. मराठी साहित्य हे आपल्या संस्कृतीचे सजीव प्रतीक आहे ज्याने काळानुसार समाजाला मार्गदर्शन केले आहे. मराठी साहित्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्तिप्रधान आणि लोकप्रबोधन करणाऱ्या विचारांपासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लोकचळवळदर्शी लेखनापर्यंत आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर आधारित जीवनदर्शनापर्यंत अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. मराठी लिहिणाऱ्यांनी भाषेचे माधुर्य दाखवताना प्रबोधनपर लेखनात मराठी वज्रासारखी किती कठीण होते हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. समाजाला विचारशील बनवण्याचे कार्य केले आहे. प्रत्येक पिढीतील बदलांना आपलेसे करण्याचे औदार्य मराठी साहित्यातून प्रकट होत आले आहे. समाजातील सर्व घटकांची भाषा आत्मसात करताना साहित्य अधिक समृद्ध आणि समकालाशी सुसंगत करणारी तरूण पिढी निर्माण होत राहिली हे मराठीचे भाग्यच आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे साहित्यिकांना जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. डिजिटल माध्यमातून मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. मुलांचाच नव्हे तर पोक्त पिढीचाही स्क्रीन टाईम वाढत असताना या सर्वांना पुन्हा एकदा साहित्याकडे वळविणे हे सोपे काम नाही याची जाणीव आहे. त्यासाठी नव्या प्रयोगांची आवश्यकता आहे. साहित्य संमेलनातून होणाऱ्या परिसंवादातून आणि चर्चांतून याबाबत उहापोह केला जाईल असा मला विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभसंदेशातून व्यक्त केला.

सुमारे २००० वर्षांपासूनची आपली भाषिक परंपरा एकविसाव्या शतकापर्यंत अव्याहत चालत आलेली आहे. हाल सातवाहनाने तत्कालीन लोकसाहित्यातील महाराष्ट्री प्राकृतातील गाथांचा संग्रह करून गाहा सतसई (गाथा सप्तशती) हा ग्रंथ रचला. ह्या लोकभाषेच्या प्रवाहाला विविध धर्मपंथाच्या साहित्याने समृद्ध केले. लीळाचरित्र आणि त्यापासून सुरू झालेली महानुभावीय साहित्याची सघन परंपरा ज्ञानदेवी एकनाथी भागवत विविध संतांची अभंगवाणी आणि त्यावर तुकाबारायांच्या अभंगगाथेने चढवलेला कळस ह्यांमुळे तुकोबांच्या गाथेप्रमाणेच मराठी भाषाही लोकगंगेच्या प्रवाहासोबत वाहती राहिली. पंडित कवी आणि शाहिरांनी तिला नटवले. शिवछत्रपतींनी तिला राजभाषेचा सन्मान दिला. सामर्थ्य दिले. एकोणिसाव्या शतकात अन्य भाषांशी आणि साहित्यप्रवाहांशी संपर्क आल्याने अभिव्यक्तीच्या अनेक विधा तिने आत्मसात केल्या. पारतंत्र्यात तिने स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत ठेवली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाही बळकट करण्यासाठी ती महाराष्ट्र राज्याची राजभाषा होऊन नागरिकांच्या अभिव्यक्तीचा आधार बनली आहे. आत्मबोधापासून समाजप्रबोधनापर्यंत आणि मनोरंजनापासून अन्यायनिर्मूलनापर्यंतची विविध वैयक्तिक आणि सामाजिक कार्ये पार पाडण्यासाठी आपली भाषा आपल्याला सक्षम करत आलेली आहे. लोकांच्या अभिव्यक्तीतून साकारलेल्या मराठी भाषेच्या साहित्याचा उत्सव आपण साजरा करत असताना त्या उत्सवाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य लोकसंस्कृती आणि लोककला ह्यांच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर ह्यांची निवड होणे हा एक सुखद योग जुळून आला आहे. बालकाला आत्मसात होणाऱ्या पहिल्या भाषेला मायबोली अथवा मातृभाषा म्हणतात हा केवळ योगायोग नाही. भाषेच्या आणि संस्कृतीच्या विकासात स्त्रियांचा महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या अभ्यासातून ह्या योगदानाचा साक्षेपाने आढावा घेणाऱ्या डॉ.भवाळकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेले हे संमेलन मराठी साहित्य मराठी भाषा ह्यांच्या पुढील वाटचालीत निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे २१ २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान संपन्न होत आहे. या गौरवास्पद संमेलनाचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हे संमेलन मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या गौरवशाली परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरते.

मराठी भाषा आणि साहित्य यांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने हे संमेलन विशेष महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध नामवंत साहित्यिक कवी विचारवंत अभ्यासक तसेच नव्या पिढीतील साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. संमेलनात मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात विविध चर्चासत्रे परिसंवाद कवी संमेलने ग्रंथप्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मराठीतून करण्याची परंपरा त्यांनी ठेवली आहे. ही बाब त्यांच्या मराठी भाषेवरील प्रेम आदर आणि आपलेपणाचा उत्तम प्रत्यय देणारी आहे. त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये मराठी संस्कृती आणि साहित्याच्या समृद्ध वारशाचे कौतुक केले आहे. मराठी ही केवळ महाराष्ट्राची भाषा नसून ती भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचा एक अभिमानास्पद भाग आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीमुळे या संमेलनाचे महत्त्व आणखी वाढले असून मराठी साहित्याचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. हे संमेलन मराठी भाषा आणि साहित्याची महती वाढवण्यास मोठे योगदान देईल. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाला नवी प्रेरणा मिळेल आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न होण्यास चालना मिळेल. मराठी भाषा आणि साहित्याच्या गौरवशाली वारशाचा जागर करण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे नक्कीच ठरणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या या ९८व्या सम्मेलनांबरोबर मागील सम्मेलनाची माहिती घेऊ या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली सन १८७८ पुणे येथे पहिले अखिल भारतीय साहित्य सम्मेलन भरविण्यात आले होते. त्यानंतर दुसरे सम्मलेन १८८५ साली कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे तर १९०५ साली सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे मराठी साहित्य सम्मेलन पार पडले.

चौथे सम्मलेन १९०६ पाचवे सम्मलेन १९०७ आणि सहावे सम्मेलन १९०८ साली पुणे येथे मराठी साहित्य सम्मेलने पार पडली. या सम्मेलनाचे अनुक्रमे वासुदेव गोविंद कानिटकर विष्णु मोरेश्वर महाजन आणि चिंतामण विनायक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर १९०९ साली बडोदे येथे कान्होबा रामछोडदास कीर्तिकर १९१२ साली अकोला येथे हरी नारायण आपटे आणि १९१५ साली मुंबई येथे गंगाधर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य सम्मेलन यशस्वीरित्या संपन्न झाले. सन १९१७ साली दहावे मराठी साहित्य सम्मेलन हे इंदूर येथे गणेश जनार्दन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
नरसिंह चिंतामण केळकर यांच्या अध्यक्षतेखाली अकरावे मराठी साहित्य सममेलन बडोदे येथे १९२१ साली संपन्न झाले. १९२६ साली मुंबई येथे माधव विनायक किबे १९२७ साली पुणे येथे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर १९२८ साली ग्वाल्हेर येथे माधव श्रीहरी अणे १९२९ साली बेळगाव येथे शिवराम महादेव परांजपे १९३० साली मडगाव येथे वामन मल्हार जोशी १९३१ साली हैदराबाद येथे श्रीधर व्यंकटेश केतकर १९३२ साली कोल्हापूर येथे महाराजा सयाजीराव गायकवाड १९३३ साली नागपूर येथे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर तर १९३४ साली बडोदे येथे नारायण गोविंद चापेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य सम्मेलन पार पडले.

एकविसावे मराठी सम्मेलन हे १९३५ साली इंदूर येथे भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. १९३६ साली जळगाव येथे माधव जुलियन/माधव त्रिंबक पटवर्धन १९३८ साली मुंबई येथे विनायक दामोदर सावरकर १९३९ साली अहमदनगर येथे दत्तो वामन पोतदार १९४० साली रत्नागिरी येथे नारायण सीताराम फडके १९४१ साली सोलापूर येथे विष्णू सखाराम खांडेकर १९४२ साली नाशिक येथे प्रल्हाद केशव अत्रे १९४३ साली सांगली येथे श्रीपादा महादेव माटे १९४४ साली धुळे येथे भार्गवराम विठ्ठल वरेरकर १९४६ साली बेळगाव येथे गजानन त्र्यंबक माडखोलकर १९४७ साली हैदराबाद येथे नरहर रघुनाथ फाटक १९४९ साली पुणे येथे शंकर दत्तात्रय जावडेकर १९५० साली मुंबई येथे यशवंत दिनकर पेंढारकर/कवी यशवंत १९५१ साली कारवार येथे अनंद काकबा प्रियोळकर १९५२ साली अमळनेर येथे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी १९५३ साली अहमदाबाद येथे वि.द.घाटे १९५४ साली दिल्ली येथे लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी १९५५ साली पंढरपूर येथे शंकर दामोदर पेंडसे १९५७ साली औरंगाबाद येथे अनंत काणेकर आणि १९५८ साली चाळीसावे मराठी साहित्य सम्मेलन हे मालवण येथे अनिल/ आत्माराम रावजी देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
एकेचाळीसावे मराठी साहित्यस संमलेन १९५९ साली मिरज येथे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर १९६० साली ठाणे येथे रामचंद्र श्रीपाद जोग १९६१ साली ग्वाल्हेर येथे कुसुमावती देशपांडे १९६२ साली सातारा येथे नरहर विष्णू गाडगीळ १९६४ साली मडगाव येथे वि.वा.शिरवाडकर/ कुसुमाग्रज १९६५ साली सातारा येथे वामन लक्ष्मण कुलकर्णी १९६७ साली भोपाळ येथे विष्णू भिकाजी कोलते १९६९ साली वर्धा येथे पु.शि.रेगे १९७३ साली यवतमाळ येथे गजानन दिगंबर माडगूळकर आणि १९७४ साली इचलकरंजी येथे पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पन्नासावे संमेलन संपन्न झाले. पुढील ५१ वे मरराठी साहित्य सम्मेलन हे १९७५ साली कऱ्हाड येथे दुर्गा भागवत १९७७ साली पुणे पु.भा.भावे १९७९ साली चंद्रपूर येथे वामन कृष्ण चोरघडे १९८० साली बार्शी येथे गं.बा.सरदार १९८१ साली अकोला येथे गो.नी.दांडेकर १९८१ साली रायपूर (छत्तीसगढ) येथे गंगाधर गाडगीळ १९८३ साली अंबेजोगाई येथे व्यंकटेश दिगंबर माडगूळकर १९८४ साली जळगांव येथे शंकर रामचंद्र खरात १९८५ साली नांदेड येथे शंकर बाबाजी पाटील आणि १९८८ साली साठावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

६१ वे मराठी साहित्य सम्मेलन १९८८ साली ठाणे येथे वसंत कानेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. १९८९ साली अमरावती येथे केशव जगन्नाथ पुरोहित १९९० साली पुणे येथे यू.म. पठाण १९९० साली रत्नागिरी येथे मधू मंगेश कर्णिक १९९२ साली कोल्हापूर येथे रमेश मंत्री १९९३ साली सातारा येथे विद्याधर गोखले १९९४ साली पणजी येथे राम शेवाळकर १९९५ साली परभणी येथे नारायण सुर्वे १९९६ साली आळंदी येथे शांता शेळके १९९७ साली अहमदनगर येथे ना.सं.इनामदार १९९८ साली परळी-वैजनाथ येथे द.मा.मिरासदार १९९९ साली मुंबई येथे वसंत बापट २००० साली बेळगांव येथे य.दि.फडके २००१ साली इंदूर येथे विजया राजाध्यक्ष आणि २००२ साली पुणे येथे राजेंद्र बनहट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पंचाहत्तरवे मराठी साहित्य सम्मेलन यशस्वीपणे संपन्न झाले.

७६ वे मराठी साहित्य सम्मेलन २००३ साली कऱ्हाड येथे सुभाष भेंडे २००४ साली औरंगाबाद येथे रा.ग. जाधव २००५ साली नाशिक साली केशव मेश्राम २००६ साली सोलापूर येथे मारुती चितमपल्ली २००७ साली नागपूर येथे अरुण साधू २००८ साली सांगली येथे म.द. हातकणंगलेकर २००९ साली महाबळेश्वर येथे आनंद यादव २०१० साली पुणे येथे द.भि.कुलकर्णी २०१० साली ठाणे येथे उत्तम कांबळे २०१२ साली चंद्रपूर येथे वसंत आबाजी डहाके २०१३ साली चिपळूण येथे नागनाथ कोत्तापल्ले २०१४ सासवड येथे फ.मुं.शिंदे २०१५ साली घुमान (पंजाब) येथे सदानंद मोरे २०१६ साली पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे श्रीपाल सबनीस आणि २०१७ साली डोंबिवली येथे अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर एक्यान्नववे साहित्य सम्मेलन २०१८ साली बडोदे येथे लक्ष्मीकांत देशमुख २०१९ साली यवतमाळ येथे अरुणा ढेरे संपन्न झाले.
९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन हे दिनांक १० ११ १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ९४ वे मराठी साहित्य सम्मेलन दिनांक २६ २७ २८ मार्च २०२१ रोजी नाशिक येथे जयंत नारळीकर आणि ९५वे सम्मेलन दिनांक २२ २३ २४ एप्रिल २०२२ रोजी उदगीर येथे भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ९६ वे मराठी साहित्य सम्मेलन दिनांक ३ ४ ५ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्धा येथे नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तर ९७ वे दिनांक २ ३ ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर (जळगाव) येथे रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. तर यंदाचे ९८वे अखिल भारतीय मरराठी साहित्य सम्मेलन हे दिनांक २१ २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत डॉ.तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
– संजय डी.ओरके
विभागीय संपर्क अधिकारी
0000

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित नागरिकांनी अफवांवर तसेच अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये – महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिकचे अतिरिक्त आवरण
बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये तसेच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून केले जात आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात येते की, सदर आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत. सध्या प्रसारमाध्यम व समाजमाध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
याअनुषंगाने नागरिकांमध्ये गैरसमज पसरु नयेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे.
मुंबई किनारी रस्ता अंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. डांबरीकरणाच्या काही भागांमध्ये सांधे रुंद झाले होते. हे सांधे आणखी रुंद होवू नये आणि डांबरीकरण पूर्णपणे मजबूत रहावे, टिकावे यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. कारण पावसाळा सुरु झाल्यानंतर, सततच्या व जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होवू नये, रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. या ठिकाणी आता अस्फाल्टचा नवीन थर निकषानुसार देण्यात येणार आहे. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
वरळी ते चौपाटी या दक्षिणवाहिनी मार्गावर मास्टिकचे आवरण टाकलेले नाही, हे नागरिकांनी व प्रसारमाध्यमांनी कृपया लक्षात घ्यावे. कारण सदर दक्षिणवाहिनी मार्ग मार्च २०२४ मध्ये खुला करण्यात आला. परिणामी, त्यावरील डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी मजबूत होण्यास पुरेसा अवधी मिळाला. सबब, प्रकल्पातील मार्ग बांधणीमध्ये कोणताही दोष नाही, हे सिद्ध होते.
उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, सर्व मुंबईकरांना, नागरिकांना तसेच प्रसारमाध्यमांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते की, कृपया कोणत्याही अपुऱया माहितीवर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा मुंबई व महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांमधील आगळावेगळा मानदंड प्रस्थापित करणारा प्रकल्प आहे. त्याच्या अभियांत्रिकी बांधणीबाबत, बांधकाम दर्जाबाबत आणि एकूणच सुरक्षेबाबत कृपया कोणत्याही शंका बाळगू नयेत, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
000

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...