शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 177

लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

  • अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्या देशबांधवांना श्रद्धांजली
  • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

लातूर, दि. ०१ : लातूर जिल्हा विविध क्षेत्रात नवनवीन उंची गाठत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदना कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी उपस्थितांना तसेच लातूर जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली.

लातूर येथे लवकरच अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागणार आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हृदयरोग, मेंदूविकार यांसारख्या उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रेही अधिक सक्षम केली जात असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यांनी नमूद केले.

सर्वसामान्य गरजूंना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येत आहे. या कक्षामुळे गरजू आणि गरीब रुग्णांना शासकीय वैद्यकीय आणि इतर मदतीसाठी अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि पाठपुरावा करणे सुलभ होणार आहे. विशेषतः गरीब, दिव्यांग, गंभीर आजारांनी त्रस्त रुग्ण तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबांना याचा थेट लाभ मिळेल. जिल्हास्तरावर ही सेवा उपलब्ध झाल्याने प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होणार असून, ही योजना शासनाच्या संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळाले आहे. यावर्षीपासून ही योजना तालुकास्तरावर राबविली जाणार असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.

मनरेगा अंतर्गत फलोत्पादनासाठी फळबाग लागवड योजना राबविली जात आहे. जलयुक्त शिवार अभियान, नवीन सिंचन प्रकल्प आणि जलसंधारणासाठी प्रगत उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याशिवाय, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान आणि ‘अमृतधारा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून, ग्रामीण भागासाठी १७ कोटी ७० लाख रुपये आणि नागरी भागासाठी ३ कोटी १६ लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी नमूद केले.

उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रातही लातूरने नवे पर्व सुरू केले आहे. जिल्हा गुंतवणूक परिषदेत अनेक उद्योग समूहांशी करार झाले असून, यामुळे तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. दळणवळण सुविधा वाढविण्यासाठी लातूर विमानतळाच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रस्ते, वीज, जलसंपदा आणि पायाभूत सुविधांचा विकास साधला जात आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचा उत्साहवर्धक सहभाग आहे. यामुळे विकासकामांना गती मिळाली आहे. जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक नवीन रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत, याचा पालकमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.

पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका यांच्यासह विविध शासकीय विभागांचे चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांची पालकमंत्री श्री. भोसले यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या विविध विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

००००

 कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्या – मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. ०१: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ होण्याचे नियोजन करावे. कुंभमेळ्यानिमित्त करावयाची कामे वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी या कामांच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशा सूचना जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, प्रयागराज येथे अलिकडेच कुंभमेळा झाला. या कुंभमेळ्यात भाविक मोठ्या संख्येने गेले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना आतापासूनच उपाययोजना कराव्यात. तसेच भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची कामे वेळेत होतील याची दक्षता घ्यावी. यावेळी मंत्री महाजन यांनी महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम, जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

०००

राज्याच्या प्रगतीला गती देणाऱ्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्राधान्य – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर, दि. ०१ : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्याच्या विकासाला गती देणारी कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार आहेत. दळणवळण सुविधा वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. लातूर येथील नवीन बांधकाम भवन कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, गणेश क्षीरसागर, अलका डाके, उपअभियंता संजय सावंत यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे. यापुढे राज्यात दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारून अर्थव्यवस्थेला गती दिली जाईल. यासाठी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि गतिमानपणे कार्य करावे, पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. तसेच त्यांनी लातूर येथील नवीन बांधकाम भवनातून जिल्ह्यातील नागरिकांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण होण्याचा विश्वास व्यक्त केला.

लातूरच्या रस्त्यांवर ‘एआय’ची नजर; उपक्रमाचे कौतुक

लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३,००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची देखरेख कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांची सद्यस्थिती समजणे सुलभ झाले आहे. असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ राज्यातील एकमेव आहे. पालकमंत्री श्री. भोसले यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याची प्रशंसा केली. शासनाच्या १०० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी नवीन बांधकाम भवन आणि त्यातील सुविधांविषयी माहिती दिली.

नवीन बांधकाम भवन बांधकामामध्ये महत्वपूर्ण योगादन देणारे कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, उपअभियंता संजय सावंत, कनिष्ठ अभियंता संजय आडे व विनोद खाडे यांच्यासह कंत्राटदारांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नवीन बांधकाम भवनाविषयी थोडक्यात

  • मंजुरी आणि निधी: मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पात इमारतीसाठी ६७३.०८ लाख रुपये मंजूर.
  • क्षेत्रफळ: एकूण १,७०६ चौ.मी.
  • सुविधा:
    • सर्व कार्यालये सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त.
    • प्रवेशद्वाराजवळ इमारतीचा सुस्पष्ट नकाशा, ज्यामुळे नागरिकांना कार्यालये आणि कार्यासने सहज शोधता येतात.
    • प्रत्येक मजल्यावर दिशादर्शक फलक, नागरिकांची सनद, लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सेवा माहिती आणि जनमाहिती अधिकाऱ्यांची माहिती.
    • अभ्यागतांसाठी प्रतीक्षालय, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रसाधनगृह.
    • पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावरील प्रकल्पांची छायाचित्रे दर्शनी भागात प्रदर्शित.
  • परिसर: मागील बाजूस वाहनतळ, बागबगीचा आणि सौंदर्यीकरण.

००००

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन

नाशिक, दि. ०१ (जिमाका): महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, तहसिलदार गणेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य बैरागी, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे वैद्यकीय उपचाराकरिता नागरिकांना अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावेत तसेच नागरिकांना अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावे तसेच नागरिकाचा वेळ  व पैसा यांची बचत होवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रूग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी 2025 ते आजपावेतो जवळपास 134 नागरिकांना वेगवेगळ्या अजारा संदर्भातील व रूग्णालय संदर्भातील योजनेबाबत माहिती व मदत घेतली असून त्यापैकी 35 रूग्णांची नावे वैद्यकीय मदतीसाठी या कक्षामार्फत प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी निगडीत दुर्धर आजारांवरील उपचारासाठी तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक  मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाद्वारे करण्यात आलेली मदत

  • मुख्यमंत्री सहाय्यता व इतर आरोग्य योजना अनुरूप मार्गदर्शन केलेले रूग्ण संख्या- 95
  • कक्ष भेट व चौकशी निमित्त आलेले अभ्यागत संख्या- 134
  • आजपर्यंत प्रत्यक्ष दाखल प्रस्ताव संख्या- 35
  • दाखल प्रस्तावांपैकी मेल द्वारे मार्गदर्शन केलेले रूग्ण संख्या- 9
  • रूग्ण नातेवाईकांचे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाबाबत मिळालेले अभिप्राय- 12

०००

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, दि. 1 मे – मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धाविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशिक्षण भवनच्या इमारतीत हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, यांच्यासह आरोग्य विभागाचे व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

००००

सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर :  पालकमंत्री अतुल सावे

  • जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना वेग द्यावा 
  • टॅक्टर अपघातातील मृतकांच्या परिजनांना सानुग्रह निधीचे वाटप
  • उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार 

नांदेड दि. 1 मे :- राज्य शासन नेहमी सामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. येणाऱ्या काळामध्ये शेती, माती, कृषी सोबतच अन्य सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासावर राज्य शासनाचा भर राहील ,असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

नव्या सरकारच्या गठनानंतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्राधान्याने भर असून जिल्ह्यात आतापर्यत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 812 कोटींची मदत करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना प्राधान्याने राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याची ग्वाही आज त्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिनानिमित्त आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील जनतेला त्यांनी संबोधित केले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपाचे महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर अन्य वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियाची उपस्थिती होती.

जिल्ह्यात मूल्य शेती अभियान सुरू असून केळी निर्यात संदर्भात कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत आहे. रेशीम शेती, फुल शेतीबाबतही शासनातर्फे जिल्ह्यामध्ये लक्ष घातले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम शिल्लक राहणार नाही यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी महसूल विभागाला दिले. तसेच अग्रिस्टॅक योजनेमध्ये सर्व शेतकरी यांनी नोंदणी करावी. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 जिल्हयात राबविण्यात येत आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात शासनाने सबसिडी जाहीर केली आहे. प्रत्येक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

जलसंधारणाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून पाऊस पडेपर्यंत कामे पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार टप्पा-2  मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरू असुन त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती” या अभियानालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्याचे हे दिवस असून संपूर्ण एक महिना आपल्या हातात आहे. जलसंधारणाच्या सर्व कामांना या काळात पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अनेक वर्षापासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. समृद्धी महामार्गाचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. याशिवाय नांदेड-वर्धा रेल्वे मार्गाचे भूसंपादन झाले आहे. शक्तिपीठ मार्गाच्या संदर्भातही स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या मागण्यांना समजून घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या अर्थकारणाला कलाटणी मिळणार असून त्यामुळे अशा मोठ्या प्रकल्पाला सकारात्मक दृष्टीने प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात ट्रॅक्टरची ट्रॉली विहिरीत पडल्यामुळे 7 शेतमजूर महिलांचा मृत्यू तर 3 शेतमजूर जखमी झाले होते.या दुर्घटनेचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

शंभर दिवसांच्या शासकीय कामकाज सुधारणा कृती आराखड्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने मराठवाडा विभागात पहिला क्रमांक व पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड कार्यालयाने पहिल्या तीनमध्ये क्रमांक मिळविल्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय नांदेड यांचे कार्यालय ई-ऑफिस करण्यात आले आहे. सर्व शासकीय कार्यालयात ई-फाईल्सचा वापर हळूहळु अनिवार्य केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले.  यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीता नंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर डॉ. आश्विनी जगताप, सेंकड इन कमांडर विजय कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद दल, दंगा नियंत्रण पथक, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक,  गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, राष्ट्रीय छात्रसेना,  अग्नीशमन दलाचे पथक, पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,  मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, दंगा नियंत्रक वाहन, वज्र वाहन,  अग्निशामक वाहन देवदूत यांचा पथसंचलनात सहभाग होता.

यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते क्षेत्रीय शासकीय/निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत कार्यालयीन सुधारणा विभागस्तरावर पोलीस विभागात प्रथम क्रमांक विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तर विभागस्तरावर महसूल विभागात प्रथम क्रमांक मिळल्याबद्दल राहुल कर्डिले यांना त्याचबरोबर राजीव गांधी गतीमानता (प्रगती) अभियान स्पर्धा पारितोषक 2024-25 साठी दुसरा क्रमांक कर्मचारी बदल्या ऑनलाईन पोर्टल मार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सन 2024 साठी पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह प्राप्त सोनखेड पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि.पांडुरंग माने, नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि.साईनाथ पुयड, देगलूर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. किरण कुलकर्णी, उस्माननगर पोलीस स्टेशनचे सुशील कुबडे, वजिराबाद पोलीस स्टेशनचे गजानन कदम, नागरी हक्क संरक्षण विभागातील व्यंकट शिंदे, कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे पो.उप.नि.गजेंद्र मांजरमकर, गुन्हे अन्वेषन विभागाचे पो.हे.कॉ. विनायक किरतने, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे चंद्रकांत पाटील, सद्या पिंपरी चिंचवड पो. आयुक्तालयातील सुधीर खोडवे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेला आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील तलाठी गोविंद काळे यांचा 5 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडा विभागामार्फत श्री शिवछत्रपती पुरस्कार सन 2022-24 प्राप्त आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू अजय पेंदोर, पॅरा ऑलम्पिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू म्हणून लताताई उमरेकर यांचा सत्कार तर युवा पुरस्कार सन 2024-25 संदीप कळासरे यांना पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, नदी स्वच्छता, पथनाट्य सादरीकरण, बालविवाह प्रतिबंध पशुपक्षी संरक्षण आदी कार्याबद्दल 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व श्रीमती अंजली नातु यांनी केले.

तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

0000

 

भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM addressing at the inauguration of the World Audio Visual and Entertainment Summit 2025 in Mumbai, Maharashtra on May 01, 2025.

मुंबई, दि. ०१: भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज् परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

PM addressing at the inauguration of the World Audio Visual and Entertainment Summit 2025 in Mumbai, Maharashtra on May 01, 2025.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲण्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ अर्थात ‘वेव्हज्’ परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

मानवाला यंत्र न बनू देता अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवणे गरजेचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी  संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करून जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज जग नवीन पद्धतीने कथा, संकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला. या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो. या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. वेव्हज परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक चळवळ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून ही महाराष्ट्रात साकार होत असल्याचे ते म्हणाले.

आज डिजिटल आशय, संगीत, अ‍ॅनिमेशन, गेम्स याला जागतिक स्तरावर आकार दिला जात आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करत असून यासाठी सक्षम धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत साकारणार आयआयसीटी – माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.

अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार वेव्हज् आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस.एस.राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गुरुदत्त, श्रीमती पी.भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

०००

संजय ओरके/विसंअ/

पहिल्या ‘वेव्हज् परिषदे’चा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे उपमख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार

पुणे, दि. ०१: देशातील पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेन्मेंट समिटअर्थात वेव्हज् परिषदआयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आभार मानले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी ही भावना व्यक्त केली.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यंदाचा महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत, महानगरी मुंबई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज परिषदेचे उद्घाटन हस्ते होणार असून याचा समस्त महाराष्ट्रवासीयांना मनापासून आनंद आहे.

०००

विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, अप्पर आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्धाटन

पुणे, दि. ०१: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे शिवाजीनगर पोलीस कवायत मैदान येथून उद्धाटन करण्यात आले.

यावेळी यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांना चांगले उपचार मिळावेत, आरोग्य विषयक मदत मिळावी म्हणून आजपासून राज्यभर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. या कक्षामुळे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होईल.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष

दुर्धर आजारावरील उपचाराकरीता आर्थिक सहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साह्य याबाबत नागरिकांना जिल्हा स्तरावर सुविधा उपलब्ध होण्यासोबतच मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने खोली क्रमांक 10 तळमजला, जुनी जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षासाठी एक पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक, समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय कक्षामध्ये शासनाच्या सर्व वैद्यकीय सुविधा व आरोग्य विषयक योजनांचे माहितीफलक लावण्यात आले आहेत. या कक्षाला भेट देणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची कक्षाला भेट

उद्घाटन कार्यक्रमानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कक्षाला भेट देऊन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी त्यांचे स्वागत केले.

०००

ताज्या बातम्या

विधानपरिषद कामकाज

0
लोणार सरोवर, कोकण किनारा व खुलताबाद येथील पर्यटन प्रकल्पांना गती - पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी शासन स्तरावर महत्वपूर्ण पावले...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
विधिमंडळ सदस्यांच्या समितीद्वारे मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहांच्या पाहणी करणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. १८ :- मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील सोयीसुविधा आणि मेसच्या पाहणीसाठी...

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात !

0
नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देताना राज्य सरकारने निरामयी महाराष्ट्रासाठी विविध योजना आणि उपक्रमांची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. समाजातील सर्वच घटकांना या योजनांच्या लाभाच्या...

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १८ : मुंबई ही देशाची 'एंटरटेनमेंट कॅपिटल' आहे आणि याच शहरातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'साठी जागतिक पातळीवर पुढाकार घेण्याची घोषणा...

विधानसभा निवेदन

0
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन मुंबई, दि. १८ :- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता.वाळवा) शहराचे नाव...