शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 175

‘वेव्हज्’ २०२५ मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्याबाबत विचारांचे आदानप्रदान

मुंबई, दि. ०१ : मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे वेव्हज् २०२५  च्या पहिल्या  दिवशी “भारतीय माध्यम आणि मनोरंजन @१०० : माध्यम आणि मनोरंजनाच्या भविष्याची  पुनर्कल्पना” या अंतर्गत लक्षवेधी परिसंवाद झाला. या सत्रात उद्योगातील प्रमुख व्यक्तींनी २०४७ च्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या भारताचा विकास आणि पुढील वाटचालीबाबत आपले विचार मांडले. बिझनेस स्टँडर्डच्या स्तंभलेखिका  वनिता कोहली खांडेकर यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.

सत्राच्या सुरुवातीला, वनिता कोहली खांडेकर यांनी वर्ष २००० च्या सुमारास अवघे ५०० कोटी रुपये मूल्य असलेले माध्यम  आणि मनोरंजन क्षेत्र आता ७०,००० कोटी रुपयांची उलाढाल असलेला प्रमुख उद्योग बनला असल्याचे सांगितले. या वाढीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन धोरणात्मक निर्णयांकडे त्यांनी लक्ष वेधले. यापैकी एक आहे  चित्रपट निर्मितीला देण्यात आलेला उद्योगाचा दर्जा आणि मल्टीप्लेक्सना दिलेल्या प्रारंभिक कर सवलती. आशय सामग्रीचा केवळ दर्जा सुधारण्यात नाही तर महसूल वाढीतही  मदत करण्याच्या एआयच्या क्षमतेबाबत त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. देशाच्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेवर भर देत, त्यांनी अधोरेखित केले की वेगवान वाढ ही भारताच्या विविध प्रेक्षकांसाठी समावेशक आणि संवेदनशील असायला हवी.

ग्रुपएमचे व्यवस्थापकीय संचालक विनित कर्णिक यांनी नमूद केले की आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील ६०% जाहिरात महसूल डिजिटल प्लॅटफॉर्मवरून येतो. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आशय सामग्रीचा वापर आणि विपणन यात मूलभूत बदल झाला आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एआयचा स्वीकार करताना, त्यांनी आशय मानवीय राहिला पाहिजे यावर भर दिला. विशेषतः अशा वेळी जेव्हा संस्कृती स्वतः मोबाईल तंत्रज्ञानाद्वारे आकाराला येत आहे. कथात्मक मांडणीला गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा रचनात्मक वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि भविष्यातील व्यावसायिकांना सुसज्ज करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या  नवीन अभ्यासक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि सीईओ राजन नवानी यांनी भविष्यातील कंटेंट डिलिव्हरीवर लक्ष केंद्रीत केले, जे क्रॉस-प्लॅटफॉर्म इंटरॅक्टिव्ह अनुभवांमध्ये विकसित होईल,असा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी सांगितले की जागतिक एम अँड ई बाजारपेठेत भारताचा वाटा फक्त २-३% आहे आणि २०४७ पर्यंत हा वाटा आणखी वाढवण्याच्या दृष्टीने प्रतिभेमध्ये गुंतवणूक करणे आणि देशाची गुंतवणूक क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यांनी नमूद केले की मनोरंजन अधिकाधिक गतिमान होत आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपांसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल.

वनिताच्या मुद्रीकरणाबाबतच्या चिंतेचे निराकरण करताना त्यांनी विकसित बाजारपेठांच्या तुलनेत भारतातील ग्राहकांच्या तुलनेने कमी खर्च करण्यायोग्य उत्पन्नाकडे लक्ष वेधले, परंतु, शाश्वत आर्थिक वाढीमुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होईल, असा आशावाद व्यक्त केला. त्यांनी ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगचे उदाहरण दिले, जिथे प्रेक्षक आधीच वैयक्तिकरीत्या वापर आणि पेमेंटमध्ये सहभागी होत आहेत.

इरॉस नाऊचे सीईओ विक्रम टन्ना यांनी भारताला माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, आशय सामग्रीची निर्मिती आणि वितरण या दोन्हीमध्ये एआय बदल घडवून आणेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना निर्माता बनण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. त्यांच्या मते डिजिटल युगात अनेक वळणे येतील आणि भारत स्पर्धात्मक राहावा, यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहेत. त्यांनी यावर भर दिला की नवीन तंत्रज्ञान सोपे करणे – त्यांना इंटरनेट इतके सुलभ करणे – यामुळे स्वाभाविकपणे व्यवसायाचा विस्तार होईल. त्यांनी सत्राचा समारोप करताना असे नमूद केले की, या विकसित वातावरणात, उद्योगाने यंत्रांशी कसे जोडले जावे आणि जाहिराती आणि प्रेक्षकांच्या सहभागासाठी विशाल आशय सामग्री परिचित्राचा कसा वापर करावा, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या सत्रात भारताच्या एम अँड ई क्षेत्राचा भविष्यकालीन दृष्टिकोन सादर करण्यात आला, ज्यात त्याचे भविष्य घडवण्यासाठी धोरण, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि सांस्कृतिक प्रासंगिकता यांच्या परस्परसंवादावर भर देण्यात आला. वेव्हज् २०२५ जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ४ मे पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन उद्योगांमधील जागतिक कल दर्शविणारी  सत्रे असतील.

०००

सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर – केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

वेव्हज् परिषद – २०२५

मुंबई, दि. ०१: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य केले आहे. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेच्या माध्यमातून भारतीय कला जगभर पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे. यातून सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शेखावत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, उद्योग मंत्री उदय सामंत, राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, यु-ट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी निल मोहन तसेच विविध देशातील मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक मंत्री शेखावत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा उद्घोष झाला आहे. भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर नेल्याने याचे फलित म्हणून कोडियाट्टम, वैदिक पठण, रामलीला, गरबा यांसह १५ सांस्कृतिक घटक युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. याशिवाय, भरतमुनींचे नाट्यशास्त्र आणि भगवद्गीताही युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’ रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आली.

मीडिया आणि विकास क्षेत्रात आघाडी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

भारत प्राचीन कला आणि आधुनिकतेला एकत्र आणत आहे, म्हणूनच जागतिक माध्यमे आणि विकास क्षेत्रात आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी भारत नैसर्गिक पर्याय ठरत आहे. वेव्हजच्या माध्यमातून आपण मनोरंजनासह देशाच्या संस्कृतीच्या संवर्धनाची प्रेरणा देत असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने झाली. त्यांच्या वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. नागालँड येथील कलाकारांनी नागालँडची लोककला सादर केली.

पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या ‘अप्सरा आली’ या गाण्याला तर पॉप संगीत गायक अलन वाल्कर यांच्या पॉप संगीताला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे लोकार्पण

एम. एम. किरामणी यांनी संगीत दिलेल्या आणि ए. आर. रहमान, शंकर महादेवन, प्रसन्न जोशी, रॉकी केज, मित ब्रदर यांनी गायलेल्या वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

‘वेव्हज्’मध्ये आज जागतिक माध्यम संवादासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

मुंबई, दि. ०१: वेव्हज् 2025 या आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषदेचे आयोजन जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी मुंबई येथे १ ते ४ मे २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेत उद्या 2 मे 2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

दालन क्रमांक 105 ए अण्ड बी, दालन क्रमांक 104 ए आणि 103, क्युब ॲण्ड स्टुडिओ येथे वेव्हज् बाजार असणार आहे. वेव्हज बझार हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठीची प्रमुख जागतिक बाजारपेठ असून, ते चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांना खरेदीदार, विक्रेते आणि विविध प्रकल्प आणि प्रोफाइलशी जोडून घेण्याची संधी देईल. व्ह्यूईंग रूम हे वेव्हज् बझारमध्ये उभारलेले एक समर्पित व्यासपीठ असून, ते 1 ते 4 मे 2025 या काळात खुले राहील.

तसेच लोटस-1 येथे जागतिक माध्यम संवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील भागधारक, मीडिया व्यावसायिक आणि कलाकार एकत्र येतील आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यतांत्रिक नवोन्मेष आणि नैतिक पद्धतींवर लक्ष केंद्रित करून दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्राचे भविष्य घडवण्याच्या उद्देशाने रचनात्मक चर्चेत सहभागी होतील. तसेच दु. 2.30 जास्मीन हॉल क्र.1 येथे क्रिएट इंडिया चँलेज पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

परिषदेत प्लेनरी सत्रामध्ये जस्मीन हॉल क्र.1 येथे स. 10 ते दुपारी 2 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरील चर्चासत्रे, सादरीकरण आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  तर जास्मीन हॉल क्र.2 येथे स 10 ते सायंकाळी 6 दरम्यान विविध विषयांच्या पॅनलवरील चर्चासत्रे, संवाद सत्र, फायर साईट चॅट उपक्रम होणार आहे. तसेच जास्मीन हॉल क्र.3 येथे स 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरची चर्चासत्रे, परिसंवाद, फायर साईट चॅट होणार आहे.

या परिषदेत ब्रेकऑउट सत्रात दालन क्रमांक 202, 203, 205, 206 मध्ये स 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चित्रपट माध्यम क्षेत्राचे विविध तंत्रज्ञान, नवीन आव्हाने, नव्या संधी याविषयी चर्चासत्रे होणार आहेत. परिषदेत मास्टर क्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये सकाळी 10 ते दुपारी 3.30 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग, दिनांक 1 मे 2025 (जिमाका वृत्त) : आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा बनविण्याचा निर्धार करुन हा प्रवास सुरू केला आणि आज आपला जिल्हा राज्यात ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा ठरला असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.

‘ए आय’ प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवनात पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले आदी उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी या संपूर्ण ए.आय प्रणालीविषयी सादरीकरण केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले,  आज आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण आहे. एआय प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. साक्षरतेमध्ये आपला जिल्हा आघाडीवर आहे. दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आलेला आहे. टँकरमुक्त जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. विशेष म्हणजे भविष्यात ‘एआय’ प्रणालीयुक्त  जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपला जिल्हा यापुढे एआय प्रणालीचा उपयोग करणार आहे. आज आपण पहिल्या टप्प्यात असून नुकतीच सुरूवात झालेली आहे. या प्रणालीमध्ये टप्याटप्याने होणारे बदल आपण स्विकारणार आहोत. अनेक देश एआय प्रणालीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करुन देशाचा विकास करत आहेत. आपल्या जिल्ह्यानेही या प्रणालीच्या वापरात पहिले पाऊल ठेवले आहे. जिल्ह्याचा विकास करत असताना अनेक आव्हाने समोर आहेत पण त्यावर देखील मात करत आपण जिल्ह्याचा विकास करणार आहोत.  शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी देखील या प्रणालीचा मोठा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले.

    जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले की, प्रशासनामध्ये या प्रणालीचा उपयोग व्हावा  यासाठी पालकमंत्री नितेश राणे पाठपुरावा करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासन या कामात पुर्णपणे गुंतलेले आहे. या प्रणालीमुळे प्रशासनाच्या कामकाज नक्कीच पारदर्शक, गतीमान आणि सुलभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन सुकर होणार असल्याचेही ते म्हणाले.

0000000

जातीनिहाय जनगणनेतून प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. १ : केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व माहिती होण्यास मदत मिळणार आहे. यातून आलेल्या संख्यात्मक आकडेवारीतून त्या-त्या घटकांसाठी विकासात्मक योजना राबविण्यास मदत होईल. यातून मागास वर्गासह प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

वरुड तहसील कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुधाकर कोहळे, उमेश यावलकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे जीवन सुखकर करण्यात येत आहे. जिवंत सातबारा ही मोहीम राबवून सातबारावरील मृत्यू झालेल्यांची नावे वगळून केवळ जिवंत व्यक्तींच्या नावांचे सातबारे शेतकऱ्यांना घरपोच वितरित करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पांदण रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. बंधारे बांधणे, नाला खोलीकरणनातून काढण्यात आलेले गौण खनिज या रस्त्यासाठी उपयोगात आणले जात आहे. शेतकऱ्यांना दुपारी 12 तास वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा फायदा प्रत्येक नागरिकांनी घ्यावा. प्रशासनाने ही त्यांना सहकार्य करून त्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. नागररिकांना शासनाच्या सुविधा मिळण्यास अडचणी येत असल्यास थेट संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान, मतदान कार्ड वाटप, पीएम किसान सन्मान निधीची वाटप, ट्रॅक्टर वाटप आदी योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.

०००००

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग, दिनांक 1 मे 2025 (जिमाका वृत्त) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग  जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अनिल पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, तसेच कक्षातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना  पालकमंत्री  श्री राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या कक्षामुळे सिंधदुर्ग जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवरच वैद्यकीय मदतीसाठी सहाय्य मिळणार आहे. कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष स्थापनेचा उद्देश:

समाजातील गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मदाय रुग्णालयांतर्गत मोफत उपचार मिळवून देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेसह इतर योजनांची माहिती व सुविधा रुग्णांना मिळवून देणे, तसेच योजनेच्या बाहेर असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत पुरविणे हे या कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह प्राधान्याने उभारावेत – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

अमरावती, दि. १ : शासनाचा शाळांमधील पटसंख्या वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ही पटसंख्या वाढवताना दर्जेदार शिक्षणासोबतच शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, ई सुविधा प्राधान्याने उभारावीत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, शिक्षणाधिकारी अनिल मोहोरे, प्रिया देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी यात सुधारणा कराव्या लागतील. यासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर फंड, तसेच नागरिकांच्या योगदानातून शाळांना आवश्यक असणाऱ्या सोयी उपलब्ध कराव्यात. रोजगार हमी योजनेतून शाळांना संरक्षक भिंती, वृक्ष लागवड करण्यात यावी.

राज्यभर आयडॉल शिक्षकांशी संवाद साधण्यात येत आहे. यातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमधील शिक्षक नावीन्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. विविध क्रीडा, कला आणि स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थी यश प्राप्त करीत आहेत. ही परंपरा कायम राहावी, यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्कृष्ट सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यावर्षीपासून सीबीएससी शाळांमधील चांगल्या गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीमधून शाळांच्या छोट्या समस्या निकाली निघू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी द्याव्यात. या भेटीमधून शाळांमध्ये सुधारणा घडवून आणाव्यात. शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पालकांचा सहभाग जाणीवपूर्वक घेण्यात यावा. शिक्षकांना जागतिक पातळीवरील ज्ञानाच्या पद्धती अभ्यासण्यासाठी विदेश दौरे आयोजित करण्यात येतात. येत्या काळात शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील प्रतिनिधींचाही यात समावेश केला जाईल. त्यामुळे शिक्षणविषयक प्रशिक्षण देताना लाभ होईल.

येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. तसेच राज्यभरातील प्रत्येक अधिकारी एका शाळेत उपस्थित राहणार आहेत. या शाळा संबंधित अधिकाऱ्यांना दत्तक दिल्या जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून शाळांमधील प्रश्न, समस्या सोडविण्यात येणार आहे. राज्यभरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, असे अमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००००

महाराष्ट्र दिनी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजवंदन

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.  तसेच सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आचल गोयल, अपर जिल्हाधिकारी रवी कडकधोंड, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाम सुरवसे उपस्थित होते.

यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते कर्तव्यावर कार्यरत असतांना असामान्य कामगिरीबद्दल मुंबई शहर व जिल्ह्यातील सहा रक्षकांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

00000

 

राष्ट्रीय अप्रेंटीस योजनेत महाराष्ट्र प्रथम स्थानावर

मुंबई, दि. 1 : राष्ट्रीय शिकावू (अप्रेंटीस) उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कौशल्य विकासाच्या उपक्रमांचा आढावा घेऊन विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दालनात झालेल्या बैठकीला कौशल्य विभागाचे आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधुरी सरदेशमुख, रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिकावू उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा सध्या राज्यातील 2 लाख 78 हजार प्रशिक्षणार्थी उमेदवार लाभ घेत असून आय. टी.  आय. मधील तब्बल 52 हजार विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेत महाराष्ट्राचे काम चांगले असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी यावेळी काढले. केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी राज्यातील कौशल्य आणि रोजगार विषयक विविध धोरणांबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत चर्चा चर्चा केली.

आय. टी.आय मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे, केंद्रीय राष्ट्रीय शिकावू योजना (NAPS) आणि महाराष्ट्राची शिकावू योजना (MAPS) यांच्यात समन्वय साधणारी यंत्रणा विकसित करावी, अशी मागणी  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांच्याकडे केली. ग्रामीण अथवा शहरातील झोपडपट्टी परिसरात युवक-युवतींना नव्याने प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी दीड हजार चौरस फुटांच्या जागेमध्ये नवीन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी केंद्रीय निकष आहेत. त्या निकषात शिथिलता आणून तीनशे चौरस फुटांच्या जागेत नवीन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यास  मान्यता द्यावी, राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ आणि केंद्रीय कामगार विभागांतर्गत असलेले नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलमध्ये समन्वय केल्यास रोजगाराच्या दृष्टीने युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करू शकतो, असे ही श्री. लोढा यांनी यावेळी नमूद केले. राज्याच्या कौशल्य, रोजगार विभागाला केंद्राचे सहकार्य लाभत असून यामागे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांचे प्रयत्न असल्याचे मंत्री लोढा यांनी आवर्जून सांगितले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

 

शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर – कृषिमंत्री ॲड्. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १ : शाश्वत शेतीच्या वाटचालीसाठी कृषी विभाग काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन सुधारणा मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये पहिल्या टप्प्यात कृषी विभागाने ६६.१५ टक्के गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून विभागाने केलेल्या कामांचे मुल्यांकन करण्यात आले. कृषी विभागात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना, नव्या योजनांची अंमलबजावणी, पारदर्शकता, नवकल्पना, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या बाबींवर भर दिला असल्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, पदभार स्वीकारल्यानंतरच्या या १०० दिवसांच्या कालावधीत शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. विभागीय परिसंवाद दौ-याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद  साधला. पुणे येथे महाराष्ट्रातील पहिली कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळा यशस्वी झाली. बियाणे- खत -किटकनाशक उत्पादक कंपन्या आणि विक्रेते संघटनांसोबत गुणवत्तेची खात्री, बाजारातील उपलब्धता आणि संभाव्य समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, ॲग्रीस्टेक या   (शेतकरी आयडी उपक्रम) आयडीद्वारे सर्व योजनांचा लाभ एकाच ओळखीद्वारे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची खरी संख्या व माहिती अचूकपणे उपलब्ध होणार आहे तसचे राज्यात 92 लाख शेतकरी ID तयार झाले आहेत त्यामुळे  शेतकरी डेटाचा मजबूत आधार तयार झाला आहे.  एक खिडकी सेवा उपक्रमामध्ये सर्व कृषी योजना, सेवा आणि माहिती एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांसाठी अर्ज, ट्रॅकिंग, आणि तक्रार निवारण एकाच ठिकाणी अ‍ॅप व वेब पोर्टलच्या माध्यमातून सेवा प्रदान होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, सूक्ष्म सिंचन योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण यासह केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा, तक्रार निवारण, कार्यालयीन बाबी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर या बाबी यावर १०० दिवसात भर दिला आहे. अधिक प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याचेही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

0
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल...