शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1710

महिला चालक असलेल्या वाहनांसाठी सार्वजनिक पार्किंगमध्ये आरक्षण – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

नागपूर, दि. २१: राज्यातील सार्वजनिक वाहन पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी महिला आता वाहने चालविताना दिसत आहेत. कॅबचालक म्हणूनही महिला काम करत आहेत. सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्यांची होणारी कुचंबना, गैरसोय पाहता आता अशा सार्वजनिक पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
००००

हिवाळी अधिवेशनात सहभागींसाठी ‘मराठी सिनेमा’चे आयोजन

नागपूर, दि. 21 : हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी दिवसभर विविध कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. अशात मोकळ्यावेळी त्यांना आराम मिळावा व त्यांच्यात मराठी सिनेमाची आवडही निर्माण व्हावी यासाठी प्रशासनाकडून प्रायोगिक स्तरावर मोबाईल डिजिटल मुव्ही थिएटरची उभारणी करण्यात आली आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मागे मोफत स्वरूपात विधानपरिषद व विधानसभा सदस्य तसेच अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मराठी सिनेमा दररोज अधिवेशन कामकाज संपल्यानंतर रात्री 7.00 वा. पासून ते 10.00 वा. पर्यंत दाखविण्यात येणार आहे. याची सुरूवात दि.21 डिसेंबर रोजी मराठी चित्रपट पावनखिंड ने झाली. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी उपस्थित होत्या. मुव्ही थिएटर या फॉरमॅटमध्ये असलेला हा प्रयोग आपण सर्वांनी एकदा अनुभवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. मंत्री तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानमंडळ निवास व्यवस्था वाटप समितीच्या मंजुरीनुसार दि. 30 डिसेंबर पर्यंत मराठी सिनेमा दाखविण्यात येणार आहेत. एखाद्या मल्टीप्लेक्स सारख्या हुबेहुब सुविधा असलेल्या मिनी थिएटरमधे एकावेळी 120 लोक बसू शकतात.

मिनी थिएटर मधे दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी – दि.22 डिसेंबर रोजी हवाहवाई, 23 डिसेंबर रोजी सिंहासन, 24 डिसेंबर गोष्ट छोटी डोंगरा एवढी,  25 डिसेंबर हरिश्चंद्राची फॅक्टरी, 26 डिसेंबर दुनियादारी, 27 डिसेंबर जैत रे जैत, 28 डिसेंबर नटसम्राट, 29 डिसेंबर टाइमपास व 30 डिसेंबर रोजी सैराट / मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.

000000

अंबाझरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि.21 : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू, असे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. निलम गोऱ्हे यांनी कृती समिती शिष्टमंडळाला दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, अंबाझरी, बचाव कृती समितीच्या सदस्यांनी  आमदार अमोल मिटकरी व समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांच्या नेतृत्वात विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात नमूद केल्यानुसार नागपुरातील अंबाझरी तलावाशेजारील शासकीय ४४ एकर जागेत उद्यान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह ५७ वर्षांपासून अस्तित्वात होते. मात्र सध्या ही जागा खाजगी कंपनीला ९९ वर्षाच्या करारावर देण्यात आली असून, या कंपनीने जुलै २०२१ मध्ये कोणालाही कल्पना न देता येथील आंबेडकर भवन हटविले. कंत्राटदाराच्या  ताब्यातून ही जागा सोडविण्यासाठी या बचाव कृती समितीने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून विषय समजून घेतला व सकारात्मक प्रतिसाद दिला व योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी समितीचे पदाधिकारी डॉ. धनराज डहाट, डॉ. सरोज आगलावे, सुधीर वासे, बाळू घरडे, वर्षा शामकुडे, सिद्धार्थ उके, राहुल परुळकर, रामभाऊ आंबूलकर, प्रताप गोस्वामी उपस्थित होते.

००००

व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. 21 : युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. हीच युवा पिढी आज व्यसनाधीन होत असतांना दिसत आहे. युवापिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढून नशामुक्त भारताचा संदेश देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्गदर्शनात राधिका क्रीएशन नागपूर प्रस्तुत ‘‘मोहजाल’’ या  नाटिकेचा 25 वा प्रयोग आज 21 डिसेंबर रोजी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात आला.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंगल, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, डॉ. मंगेश वानखेडे, भरत केंद्रे, नागपूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशात आज युवावर्गामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. अंमली पदार्थ सेवनाच्या अतिआहारी जाऊन काही जणांनी आत्महत्या केल्याचे बघितले आहे. आपल्या देशातील युवा पिढी अंमली पदार्थाच्या सेवनातून मुक्त झाली पाहिजे. युवा पिढी व्यसनापासून दूर राहावी. यासाठी अशाप्रकारच्या प्रबोधनात्मक जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याप्रसंगी केले.

भारतीय संस्कृती ही माणसाला माणूस बनविणारी आहे. जे व्यसनाच्या आहारी गेले त्यांनाही प्रेम आणि आपुलकीने व्यसनमुक्त करण्याचे काम युवा पिढींने करावे, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

‘‘मोहजाल’’ नाटिका अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या युवक – युवतींवर आधारित आहे. 30 मिनिटाच्या या नाटिकेतून युवावर्ग अंमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात कसा गुरफटला जात आहे. याचे जिवंत चित्रणच मांडण्यात आले आहे. युवावर्ग अंमली पदार्थाच्या आहारी जात असताना पालक आणि समाजाच्या संदिग्ध भूमिकेवरही नाटिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या पाल्यांशी कशाप्रकारचा व्यवहार केला पाहिजे, याचे प्रबोधन करण्यात आले आहे.

नाटिकेचे लेखक प्रसन्ना शेंबेकर, दिग्दर्शक संजय पेंडसे आणि निर्मिती प्रमुख सारिका पेंडसे व डॉ.रवी गिऱ्हे यांची आहे. या नाटिकेमध्ये 25 युवक-युवतींचा सहभाग असून हे सर्व जण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातंर्गत येणाऱ्या नागपूर येथील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पेंडसे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपालांनी नाटिकेत सहभागी सर्व कलावंतांचे, दिग्दर्शक, लेखक व निर्मिती प्रमुख यांचे कौतुक केले.

000000

विवक्षित सेवा

आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’-उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २१: विदर्भाला भरभरून नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. उद्योगासाठी येथे पोषक वातावरण आहे. स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’ येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित करीत आहोत. उद्योगपूरक वातावरणाला चालना देत राज्यशासन उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  आज विदर्भ विकास परिषदेत दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर व महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘विदर्भ विकास परिषदे’चे उद्घाटन श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. माजी खासदार अजय संचेती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष निकेश गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.सावंत  म्हणाले की, राज्य शासनाने उद्योग विभागाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोविड महामारीच्या काळात राज्यातील उद्योजकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आतापर्यंत दोन टप्प्यात २४ कोटी रुपयांची प्रोत्साहन अनुदान राशी प्रदान केली आहे.  येत्या मार्च महिन्यापर्यंत उर्वरीत प्रोत्साहन राशी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन आग्रही असून त्यासाठी मंत्रिमंडळ उद्योग उपसमितीची  महिन्याला दोन वेळा बैठक घेण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर आणि  गडचिरोली जिल्ह्यांतील उद्योगांसाठी ४१ हजार कोटींचा निधी

राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास भौगोलिक विभागनिहाय समतोल साधून होणे आवश्यक आहे. गेल्या तीन महिन्यात ७१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजुर झाले असून त्यापैकी ४१ हजार २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये येत आहेत. यामुळे ३२ हजार जणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. विदर्भातील आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित होईल, असा विश्वास श्री. सावंत यांनी व्यक्त केला.

तरुण उद्योजकांना प्रोत्साहन

तरूण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी  राज्य शासनाने ५०० कोटींहून अधिक निधींची तरतूद केली आहे. ही रक्कम संपूर्ण खर्च करण्यास उद्योग विभागाचे प्राधान्य असेल. याकरिता शासनासह अन्य घटकांचीही महत्त्वाची भूमिका आहे. बँकांनी तरुण उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यास बॅंकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आता बँकांद्वारे उद्योजकांना कर्ज नाकारण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासासाठी ४०० कोटींची तरतूद- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात कौशल्य विकास, पर्यटन, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले.  श्री लोढा म्हणाले की, राज्यात पर्यटन क्षेत्रामध्ये विविध संधी आहेत. पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात  रोजगार संधी उपलब्ध होतील. राज्यात कौशल्य आणि नाविन्यता  केंद्रांना चालना देऊन औद्योगिक विकास  संस्थांना सक्षम करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

परिषदेत दिवसभरात एकूण तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले. ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. विदर्भातील उद्योग, व्यापार, कृषी, पर्यटन या विषयांवर वरिष्ठ शासकीय अधिकारी, तज्ज्ञ, वित्तीय संस्थांचे प्रमुख यांनी  मार्गदर्शन केले.

000

‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरूवार, दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी सायं ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर- https://twitter.com/MahaDGIPR

अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या धोरणांतर्गत अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधेसाठी इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शौचालय बांधकाम, दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौर ऊर्जा संच, अन्न शिजविण्यासाठी साहित्य उपलब्ध होणार आहे. अंगणवाडी दत्तक धोरण नेमके काय आहे, याची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे, गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके व तीन ते सहा वर्षातील सुदृढ बालके, निरोगी माता यांना लाभ कसा होणार आहे, अशा विविध विषयांची विस्तृत माहिती, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी  ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि.२१ :  पशुसंवर्धन विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण  वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दि. ११ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. याचा लाभ घेण्याकरीता पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थीची निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.

यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्ष म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामूळे लाभार्थी हिस्सा भरणे किवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप अशा विविध योजनांसाठी लाभार्थींची निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सन २०२२-२३ वर्षाकरीता राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ: https.//ah.mahabms.com अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव : AH.MAHABMS (Google play स्टोरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध ) अर्ज करण्याचा कालावधी : १३ डिसेंबर २०२२ ते ११ जानेवारी २०२३, टोल फ्री क्रमांक : १९६२  किंवा 1800-233-0418 या क्रमांकावर संपर्क साधावा.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील, या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांश माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

००००

हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ

नागपूर, दि. २१ : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम झाला.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अॅपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले आहे. या अॅपचे आज लोकार्पण करण्यात  आले. सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध असून मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी ते उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या काळात या ॲपमध्ये अधिक सुधारणा आणि माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.

याप्रसंगी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ॲपची निर्मिती करणाऱ्या सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘महा असेंब्ली’ अॅपद्वारे अधिवेशन दैनंदिनी, अधिवेशन काळात आयोजित विविध बैठकांचा तपशील, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक असणारी निर्देशिका, निवास व्यवस्थेबद्दल परिपूर्ण माहिती एका क्लिकवर अधिवेशन काळात उपलब्ध होऊ शकणार आहे. या अधिवेशन काळात प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार असून पुढील काळात नवनवीन सुविधायुक्त असे ॲप उपलब्ध होणार आहे.

अॅपचे सादरीकरण राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून त्यांनी या संकल्पनेचे व अॅपचे कौतुक केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या अॅपचा आढावा घेऊन हे अॅप महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

अॅपची निर्मिती नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात कार्यरत सेटट्राईब या आयटी कंपनीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी केली आहे. सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर यांना स्टार्टअप यात्रा या उपक्रमात ई-प्रशासन प्रकारामध्ये राज्यस्तरीय विजेता म्हणून नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे ग्लोबल क्वालिटी स्किल या अॅपच्या निमित्ताने जगासमोर आले आहे.

अथक परिश्रम घेऊन सेटट्राईबच्या विद्यार्थ्यांनी केवळ चार दिवसात परिपूर्ण असे अॅप तयार करून ते कार्यान्वित केले असून त्यांना महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे श्री.वाकोडीकर म्हणाले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

नागपूर, दि. २१: पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल विधानसभेत यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.

यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार श्री. भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी आमदार श्री. भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना या राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे तसेच त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात याबाबत सूचना केल्या.

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्मारकाच्या कामाला कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...