शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1705

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. चहांदे ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ

नागपूर, दि. 24 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. चहांदे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, नितीन करीर, राजेश कुमार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्या श्वेताली ठाकरे, डॉ. साधना महाशब्दे, प्राधिकरणचे सचिव डॉ. रामनाथ सोनवणे, सचिव रंजनकुमार शहा, राजेंद्र मोहिते, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष पाटील, गोसीखुर्दचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधिक्षक अभियंता राजेश सोनटक्के, पद्माकर पाटील, राजीवकुमार पराते, कन्नाजीराव वेमुलकोंडा उपस्थित होते.

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. चहांदे यांना शपथ दिली. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. संजय चहांदे हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून 1988 च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून एम.एस्सी केले आहे. अमेरिकेतून त्यांनी लोकप्रशासन ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आपल्या 34 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी अनेक पदे भुषविली आहेत. नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेस प्रारंभ,  मुंबई शहर व उपनगर येथे जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, नाशिकचे विभागीय आयुक्त, यशदा पुणे येथे महासंचालक, महिला व बालविकास विभागाचे सचिव, मुख्यमंत्री कार्यालयात सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, पाणी पुरवठा विभागाचे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच केंद्रीय सेवेत असतांना आधारकार्ड प्रकल्पाचे उपमहासंचालक म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे.

000

जी२० बैठकीनिमित्त नागपूरचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 24 : जी – २० परिषदेनिमित्त दि.२१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व  प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगीरी’ येथे जी-20 परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, महानगरपालिका,सुधारप्रन्यास व जिल्हा प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पूर्वतयारीचा आढावा सादर केला. विमानतळ ते प्रमुख महामार्गांचा कायापालट या काळात केला जाईल. मुंबईप्रमाणेच नागपूर येथे तयारी सुरु झाली असून प्रमुख रस्ते, बैठकीची स्थळे, ज्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत त्या त्या ठिकाणी प्राधान्याने सजावट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगती पथावर असणारी कामे, प्रस्तावित कामे मार्चपूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करा. ऐतिहासिक स्थळे, ताडोबा, फुटाळा तलाव अशा प्रेक्षणीय  ठिकाणी पोहोचणाऱ्या रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा. मुंबई प्रमाणे उत्तम व दर्जेदार सुशोभीकरण करण्यात यावे. देशाच्या यजमान पदाला साजेशी उत्तम दर्जाची कामे करावी. स्थानिक कला, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, शासकीय विभागांची माहिती, जुन्या इमारती यांची भव्यता व आकर्षकता प्रतिबिंबीत झाली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

या बैठकीला उपस्थित प्रधान सचिव दीपक कपूर यांनीही मिहान व अन्य महत्वाच्या प्रकल्पांची माहिती बैठकांमध्ये अधिक चांगल्याप्रकारे सादर व्हावी, अशा सूचना केल्या. या निमित्ताने दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे.आयोजनाची प्रसिद्धीही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

000

सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबीत व्हावी महाराष्ट्राची विज्ञान तंत्रज्ञानातील भरारी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 24 : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान व तंत्रज्ञानातील भरारी प्रतिबिंबीत व्हावी. शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी होतील अशी उपाययोजना करावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उच्च तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु एस.आर. चौधरी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, विद्यापीठाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरु एस.आर. चौधरी यांनी सादरीकरणातून पूर्वतयारीची माहिती दिली. दि.3 ते 7 जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत. देशातील 7 हजार शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र अशा विविध 14 शाखांमधील नवनवीन शोध प्रबंध, प्रदर्शन, मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ विज्ञानस्नेही  विद्यार्थ्यांना होईल.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी यंत्रणा उभारा. राज्यातील अन्य ठिकाणावरूनही सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा. बाहेरुन येणाऱ्या प्रतिनिधींच्या निवास, प्रवासाची उत्तम व्यवस्था ठेवा. विदेशातून येणाऱ्या शास्रज्ञांच्या निवास व्यवस्थेबाबत विशेष काळजी घ्या, अशी सुचना त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की,   यंदा विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा हा प्रमुख कार्यक्रम समजून उत्तम प्रसिद्धी करा. या आयोजनाचे यजमान पद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राने विज्ञान, तंत्रज्ञान व सर्व क्षेत्रातील प्रगतीची भरारी प्रतिबिंबीत व्हावी याकडे विशेष लक्ष द्यावे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.                           

000

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर, दि.२३ :हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करण्‍याची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केली. या मागणीबाबत मुख्‍यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत याबाबतचे निवेदन सादर केले व चर्चा केली. चंद्रपूर जिल्‍हा हा आदिवासीबहुल, वनव्‍याप्‍त जिल्‍हा असून ताडोबा सारख्‍या राष्‍ट्रीय उद्यानाला देशविदेशातुन पर्यटक भेट देण्‍यास येत असतात. हा जिल्‍हा विविध खनिजांनी समृध्‍द असून जिल्‍ह्याची अर्थव्‍यवस्‍था विद्युतनिर्मीती, खनिज उद्योग व सिमेंट उद्योगाभोवती केंद्रीत आहे. त्‍यामुळे राज्‍याच्‍या या भागातील वाहनांना देखील समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईकरिता सर्वात कमी अंतराची तसेच जलदगती महामार्गाची सुविधा उपलब्‍ध होऊ शकेल.दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ रोजीच्‍या पत्रान्‍वये नागपूर मुंबई सुपर कम्‍युनिकेशन एक्‍सप्रेसवे लिमिटेड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून समृध्‍दी महामार्गाचा नागपूर ते चंद्रपूर-राजुरा पर्यंत विस्‍तार करण्‍यासाठी सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल तयार करण्‍यासाठी व भूसंपादन करण्‍यासाठी अंदाजे २० कोटी रू. निधी महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाला उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती श्री. मुनगंटीवार यांनी केली होती. अद्याप त्‍यांच्‍या सदर विनंतीला मान्‍यता मिळालेली नाही. याबाबत मुख्‍यमंत्र्यांनी स्‍वतः लक्ष घालुन या अहवालाला मान्‍यता देण्‍याचे निर्देश द्यावे, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.

0000000

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

अमरावती, दि. 23 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात उदया, 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल उपस्थित राहतील .

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची मुलाखत

मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 26, मंगळवार दिनांक 27 व बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले, 45 वर्षाहून अधिक काळ चित्रपट, मालिका आणि नाटकं अशा 100 हून अधिक कलाकृती हाताळलेले, विविध पुरस्कारांनी सन्मानित, कलाकार घडविणारे नाट्य दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नाटकांची संहिता स्वतःच्या हाताने लिहिण्याची कारणे, नेपथ्य आणि हालचालींचे चित्रमय आराखडे बनवण्याचे फायदे, मालिकांमध्ये व्यस्त असलेल्या नटांना घेऊन तालमींचं काटेकोर नियोजन, स्वगतं सादर करण्यातील नव्या शक्यता काय आहेत, अशा अनेक रोचक विषयांवर विस्तृत माहिती संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे उद्या लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डी वॉर्ड’ कार्यक्षेत्रात ताडदेव महापालिका शाळा, बने कम्पाऊंड, साने गुरूजी मार्ग, ताडदेव येथे शनिवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले आहे.

या शिबीरामध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण आणि दंत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी सुमारे 1 हजार बालके उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल  हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती सुशीबेन शहा यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

000

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणीवर भर द्यावा

मुंबई, दि. 23 : अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. श्री. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर ओबेरॉय, संचालक पश्चिम विभाग श्रीमती प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातील अन्न  व औषध प्रशासन कार्यालय आणि प्रयोगशाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (विधी) चंद्रकांत थोरात,  सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शशिकांत केकरे, अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती संगीता ठाकूर व इतर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त आणि प्रयोगशाळेतील सहयोगी कर्मचारी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान या संकुलात अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज कसे चालते, तसेच प्रयोगशाळेत येणारे नमूने कशा पद्धतीने तपासले जातात याची पाहणी त्यांनी केली. प्रशासनाच्या चौथ्या मजल्यावर प्रयोगशाळेकरिता नव्याने बांधकाम सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच अत्याधुनिक प्राणी गृह, अन्न तपासणी केंद्र,  अन्न दर्जा तपासली जाणारी प्रयोगशाळा येथे भेट दिली.

भेटी दरम्यान अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती ठाकूर यांनी मुंबई, नागपूर व औरंगाबाद प्रयोगशाळेबाबत सादरीकरण केले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन,यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.

​सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई श्री. केकरे, यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

000

कामगारांसाठी सुधारित वेतनदर जाहीर

मुंबई, दि. 23 : किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत २१ नोव्हेंबर २०२२ रोजी  ‘औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग’ व ‘अभियांत्रिकी उद्योग’ या उद्योगांच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २१ नोव्हेंबर २०२२ ते 31 डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता तसेच २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा’ या उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २३ नोव्हेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता ९ डिसेंबर २०२२ रोजी विशेष भत्ता दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे, असे कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा” या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,६२०/- + ८५८/- = १७,४७८/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,१५०/- + ८५८/- = १६,००८/-

३) अकुशल कामगार : १४,०९५/- + ८५८/- = १४,९५३/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १५,७८०/- + ८५८/- = १६,६३८/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,३१०/- + ८५८/- = १५,१६८/-

३) अकुशल कामगार : १३,२५५/- + ८५८/- = १४,११३/-

औषधी द्रव्य व औषध बनविणारा उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,६०५/- + ३७२/- = १६,९७७/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,१८५/- + ३७२/- = १५,५५७/-

३) अकुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,०००/- + ३७२/- = १६,३७२/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,५८०/- + ३७२/- = १४,९५२/-

३) अकुशल कामगार : १३,५६५/- + ३७२/- = १३,९३७/-

परिमंडळ ३ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १५,५९०/- + ३७२/- = १५,९६२/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-

३) अकुशल कामगार : १३,१५५/- + ३७२/- = १३,५२७/-

अभियांत्रिकी उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने याअधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,४५०/- + ३७२/- = १६,८२२/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,०२५/- + ३७२/- = १५,३९७/-

३) अकुशल कामगार : १४,०१०/- + ३७२/- = १४,३८२/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना)= एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,०४५/- + ३७२/- = १६,४१७/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,६२०/- + ३७२/- = १४,९९२/-

३) अकुशल कामगार : १३,६०५/- + ३७२/- = १३,९७७/-

परिमंडळ ३ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १५,२२५/- + ३७२/- = १५,५९७/-

२) अर्ध कुशल कामगार : १३,८०५/- + ३७२/- = १४,१७७/-

३) अकुशल कामगार : १२,७९५/- + ३७२/- = १३,१६७/-

000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुभेच्छा

नागपूर, दि. 23 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्राहकहित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ग्राहक हाच कोणत्याही बाजारपेठेचा कणा असतो, त्याचे हित हेच सर्वतोपरी असते. ग्राहकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनासोबतच या क्षेत्रात कार्यरत सर्व अशासकीय संस्था आणि व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे आहे. तसेच एक विकसित राज्य आणि राष्ट्र उभारणीत जागरूक ग्राहकाचे महत्त्व सर्वात अधिक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात पुढे म्हटले आहे की, जागतिकीकरणामुळे आता संपूर्ण जगच बाजारपेठ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना निवडीची संधी प्राप्त झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा जसा ग्राहकांना होत आहे, तसेच या तंत्रज्ञानाचा वापर करून काही कुप्रवृत्तीच्या लोकांकडून ग्राहकांची फसवणूकही होत आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाचा ग्राहक संरक्षण विभाग सातत्याने सतर्क असून सक्रियपणे कार्यरत आहे. त्याला समाजातील विविध सामाजिक अशासकीय संस्थांचे मिळत असलेले बळही महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक चळवळीत सातत्याने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा.

000

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...