शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 17

ईशान्य भारतात सिनेमाची ‘आव्हाने आणि भवितव्य’ विषयावरील चर्चेत आसाममधील चित्रपट निर्माते आणि कलाकार सहभागी

ईशान्य भारत हे प्रतिभेचे भांडार जानू बारुआ

आसामला आपल्या चित्रपटांना चांगली बाजारपेठ देण्यासाठी ओटीटी मंचांची गरज – जतीन बोरा

मुंबई, 1 मे 2025 :-मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित  जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत(वेव्हज् 2025) ईशान्य भारतीय सिनेमासाठी ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या “ईशान्य भारतातील सिनेमाची आव्हाने आणि भवितव्य” या शीर्षकाखाली पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या सत्रात या प्रदेशातील चित्रपट उद्योगातील महत्त्वाची व्यक्तीमत्वे एकत्र आली आणि त्यांनी येथील सळसळत्या चेतनादायी चित्रपट परिदृश्याचा आढावा घेतला.

या पॅनेलमध्ये जानू बरुआ, जतीन बोरा, रवी शर्मा, ऐमी बरुआ, हाओबम पाबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांच्यासारखे नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा समावेश होता, सर्वांनीच ईशान्येतील चित्रपट संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या चर्चेत या प्रदेशातील चित्रपट निर्मात्यांना भेडसावणाऱ्या  अपुऱ्या उत्पादन पायाभूत सुविधा, भाषिक अडथळे, मर्यादित बाजारपेठ उपलब्धता आणि संस्थात्मक पाठबळाचा अभाव यांच्यासह अनेक समस्यांवर विशेष भर देण्यात आला. या अडचणी असूनही, पॅनेल सदस्यांनी ईशान्य भारत चित्रपट निर्मितीतील नवोन्मेष आणि सांस्कृतिक कथाकथनासाठी एक सुपीक भूमी असल्याबाबत सहमती व्यक्त केली.

ईशान्य भारत म्हणजे प्रतिभेचे भांडार असल्याचे मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते जानू बारुआ यांनी व्यक्त केले. या प्रदेशातील चित्रपट निर्माते उल्लेखनीय निर्मिती करत आहेत. या प्रदेशातील सांस्कृतिक गुंफण आणि अकथित कथांच्या विपुलतेवर त्यांनी भर दिला. अनेक युवा प्रतिभांचा उदय होत असल्याने ईशान्येकडील सिनेमाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे त्यांनी नमूद केले.

ईशान्येकडील चित्रपटांची प्रादेशिक सीमांच्या पलीकडे असलेली मर्यादित पोहोच आसाममधील लोकप्रिय अभिनेते जतीन बोरा यांनी अधोरेखित केली. डिजिटल वितरणाच्या गरजेवर ते म्हणाले, “आसामला आपल्या चित्रपटांना अधिक चांगली बाजारपेठ देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सची गरज आहे.” त्यांनी प्रादेशिक चित्रपटांना अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्यात मदत करण्यासाठी अशा मंचांच्या निर्मितीला पाठिंबा देण्याचे आवाहन सरकारला केले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही प्रादेशिक चित्रपट परिसंस्थेला पाठिंबा देण्यासाठी दीर्घकालीन धोरणे विकसित करण्याचे आवाहन केले आणि मजबूत वितरण नेटवर्कशिवाय, सर्वोत्कृष्ट चित्रपटदेखील राज्याच्या सीमा ओलांडण्यासाठी संघर्ष करतात असे सांगितले.

रवी सरमा यांनी या प्रदेशातील सर्जनशील पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर गुंतवणुकीची तातडीची गरज असल्याचे सांगितले. प्रादेशिक उद्योगाच्या वाढीसाठी आर्थिक पाठबळ आणि विपणन पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ईशान्येकडे लाखो सुंदर आणि अद्वितीय कथा आहेत, असे ते म्हणाले.

अभिनेत्री-दिग्दर्शिका ऐमी बरुआ यांनी भाषिक विविधता जपण्यामध्ये  सिनेमा महत्त्वाची  भूमिका बजावतो असे सांगितले. “आपल्या भाषांना शतकानुशतकांचा मौखिक इतिहास आहे. चित्रपट हे त्यांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे,” असे त्यांनी नमूद केले.

चित्रपट निर्माते हाओबम पबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांनी या प्रदेशातील तळागाळातील चित्रपट निर्मितीबद्दल माहिती दिली. अनेक कथाकार आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असल्याचे सांगितले.

पॅनेल सदस्यांनी पारंपरिक अडथळे दूर करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा, प्रादेशिक सहकार्य आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा धोरणात्मक वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व भागधारक, सरकारी संस्था, खासगी गुंतवणूकदार आणि राष्ट्रीय स्टुडिओना ईशान्य भारतातील चित्रपटसृष्टीची हा ऐकण्याचे आणि त्यांना उभारी देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

0000

सागरकुमार कांबळे/ससं/

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी बायकॉन कंपनीस राज्य शासन सहकार्य करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ : औषध निर्मिती  प्रकल्पाच्या माध्यमातून बायकॉन लिमिटेड महाराष्ट्रात गुंतवणूक करायला उत्सुक आहे, ही स्वागतार्ह बाब असून यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित “वेव्हज २०२५ दृकश्राव्य मनोरंजन समिट मध्ये “बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती किरण शॉ मुजुमदार यांच्या समवेत आयोजित भेटी  दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात राज्य शासनाचे अधिकारी बायकॉन व्यवस्थापन समितीसोबत प्राथमिक चर्चा करतील. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने बायकॉनला सर्व सहकार्य करण्यात येईल,  असे सांगितले.

यावेळी औषध उत्पादन निर्मितीमध्ये बायकॉन गुंतवणूक करायला उत्सुक आहे. इन्सुलिन निर्मिती मध्ये लवकरच बायकॉन जगातील अव्वल कंपनी होणार आहे. या दृष्टीने बायकॉनला महाराष्ट्रात गुंतवणूक करायची असून पुणे परिसरात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक असल्याचे किरण शॉ मुजुमदार यांनी सांगितले.

****

वंदना थोरात/विसंअ/

परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता ‘एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ :- सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय  चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् २०२५ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत ३००० कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत २००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह,आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.

जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी व कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबतच्या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. विश्वास, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये ‘गोदरेज’चे नाव अग्रगण्य आहे. गोदरेज कडून उभारला जाणारा स्टुडिओ सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एनएसई इंडायसेसकडून निफ्टी वेव्हज् इंडेक्सचा शुभारंभ

‘एनएसई इंडायसेस लिमिटेड’ने मुंबईत आयोजित व्हेव्ज २०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’ चा शुभारंभ केला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत.

भारताच्या सर्वात गतिशील क्षेत्रांपैकी एक असलेल्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य ‘निफ्टी वेव्हव्ज’च्या माध्यमातून झाल्याचा अभिमान वाटत आहे, असा विश्वास एनएससीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया तसेच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांच्याशी सिडकोचा करार

सिडकोमार्फत नवी मुंबई येथे एज्युसिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांचे कॅंपस स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’च्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी करारावर स्वाक्षरी केली.

उद्योग विभागामार्फत प्राईम फोकसआणि गोदरेजयांच्यासोबत करार

उद्योग विभाग आणि ‘प्राईम फोकस’ तसेच ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांशी स्वतंत्रपणे सामंजस्य करार करण्यात आले.

‘प्राईम फोकस’ सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला असून यामध्ये प्रस्तावित गुंतवणूक ३००० कोटी रुपये असणार आहे. या माध्यमातून सुमारे २५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल.

तर ‘गोदरेज’ सोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत करार झाला. या कराराचा पहिला टप्पा 500 कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) 600 रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प 2027 मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये 1900 रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा 2030 पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 2500 रोजगार निर्मिती होईल.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ.अन्बळगन पी. यांनी, प्राईम फोकसच्या वतीने संचालक नमित मल्होत्रा यांनी तर गोदरेज च्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरण सिंग यांनी करारावर स्वाक्षरी केली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ : भारतीय संगीत क्षेत्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेला बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विस्तारीत करत असताना स्पॉटीफायसारखी संगीत क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी निश्चितच सहाय्यक ठरणार असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित “वेव्हज २०२५  दृकश्राव्य मनोरंजन समिट” मध्ये स्पॉटीफाय ग्लोबलच्या मुख्य सार्वजनिक व्यवहार अधिकारी आणि व्यवसाय अधिकारी डस्टी जेनकिन्स यांच्यासोबत स्पॉटीफाय इंडियाच्या एमडी अमरजित सिंग बत्रा आणि गव्हर्नमेंट अफेयर्स इंडियाच्या संचालक विनीता दीक्षित यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ.अनबळगन पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासु, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आणि  संबंधित अन्य  अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पॉटीफायने संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवला आहे. भारतीय संगीत आणि कलाकारांना विस्तृत व्यावसायिक व्यासपीठाची संधी स्पॉटीफाय सोबत प्राप्त होईल,ही निश्चितच स्वागतार्ह बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

डस्टी जेनकिन्स म्हणाल्या की, स्पॉटिफाय गेली सहा वर्षे भारतात कार्यरत आहे. भारत हा आमच्यासाठी सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे आणि आम्ही येथील समृद्ध संगीत परंपरेशी आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

गेल्या वर्षी स्पॉटिफायने जागतिक स्तरावर संगीत उद्योगाला १० अब्ज अमेरिकी डॉलर वितरित केले. जसे आपण ऑलिंपिकमध्ये खेळाडूंना स्टार्सप्रमाणे गौरवतो, तसेच आम्हाला भारतातील संगीत कलाकारांसाठीही असा आदर आणि ओळख निर्माण करायची आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला विविध माध्यमातून पाठिंबा दिला आहे आणि आम्ही ही भागीदारी भविष्यातही सुरू ठेवू इच्छितो, असे सांगून डस्टी जेनकिन्स म्हणाल्या की,  लोकांमध्ये असा समज आहे की टेलर स्विफ्ट स्पॉटिफायवर सर्वात जास्त फॉलो केलेली कलाकार आहे. मात्र, खरे पाहता भारताचा अरिजीत सिंग हा स्पॉटिफायवर सर्वाधिक फॉलो केलेला कलाकार आहे – हे भारतीय संगीताच्या जागतिक प्रभावाचे उदाहरण आहे.

तसेच भारत सरकार कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे. भारतीय संगीताचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा, अशी इच्छा असल्याचे  डस्टी जेनकिन्स यांनी यावेळी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ/

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. २ : सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स फैसल बिन बंदर बिन सुलतान अल सऊद यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेव्हज् परिषदेदरम्यान सदिच्छा भेट घेतली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्रिएटिव्ह उद्योगांतर्गत येणाऱ्या गेमिंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. गेमिंगबाबतची बाजारपेठ विस्तारत असून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यातील गेमिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सौदीबरोबर काम करण्यास आपण उत्सुक आहोत.  गेमिंग आणि ई-स्पोर्ट संदर्भातील मार्गदर्शक तत्वे तयार करून या क्षेत्रात भागीदारी करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे चेअरमन प्रिन्स फैसल बिन बदर बिन सुलतान अल सऊद यांनी सौदीमध्ये ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची यावेळी माहिती दिली. सौदीच्या विकासात ई-स्पोर्ट आणि सॅव्ही गेम यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आशियाई देशांमध्ये गेमिंगचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात महाराष्ट्रासोबत काम करण्यास सौदी उत्सुक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

—०००—

संतोष तोडकर/विसंअ/

ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व्यापक करण्याची गरज ‘इंडियाज रिच टू ऑस्कर्स’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

मुंबई दि. 2 :- भारतात सध्याच्या घडीला ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असून ऑस्करमध्ये एकाच प्रवेशिकेने संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणे कठीण आहे. ऑस्करमध्ये चित्रपट पाठविण्याच्या नियमांमुळे केवळ एकाच चित्रपटाची ऑस्करसाठी निवड होत असल्याने प्रादेशिक चित्रपट या संधीपासून वंचित राहतात. यासाठी ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे मत या चर्चासत्रात मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ समिटमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी इंडियाज रिच टू ऑस्कर्स या विषयावरील आयोजित चर्चा सत्रात चालवे गौडा, ए. श्रीकर प्रसाद, उज्वल निरगुडकर या मान्यवरांनी सहभाग घेतला.

या चर्चासत्रात चालवे गौडा म्हणाले, भारतात ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट तयार होतात. त्यामुळे फक्त एकाच प्रवेशिकेने भारताचं प्रतिनिधित्व करणे अवघड आहे. शिवाय, ऑस्करसाठी प्रचार मोहिमांचा खर्चही मोठा अडथळा ठरतो. प्राथमिक मोहिमेसाठी ३० ते ४० लाख रुपये, तर  आरआरआर चित्रपटाच्या  मोठ्या मोहिमेसाठी ५ ते ८ कोटी रुपये लागतात.  तसेच चित्रपट निर्मात्यांना पात्रता निकषांची माहिती नसल्यामुळेही अनेक दर्जेदार चित्रपट स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. कांतारासारख्या चित्रपटाच्या बाबतीत ही बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने अशा चित्रपटाच्या स्पर्धांसाठी कार्यशाळा आयोजित करून माहिती प्रसारित करणे गरजेचे आहे.

या चर्चासत्रात ए. श्रीकर प्रसाद यांनी ऑस्कर नामांकन प्रक्रियेबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, लहान निर्मात्यांसाठी केवळ सरकारमार्फत अधिकृत प्रवेशिकाच एकमेव पर्याय आहे. त्यांना स्वतंत्रपणे पात्रतेचे निकष पूर्ण करणे आणि प्रचार व प्रचार खर्च उचलणे अशक्य असते. आज अनेक दर्जेदार आशय असलेले चित्रपट केवळ निधीअभावी मागे पडतात. त्यामुळे सरकारने किंवा इतर संस्थांनी प्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास निर्मात्यांना प्रसिद्धी तज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येईल. पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या चित्रपटांना सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.

जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आशयाचे स्वरूपही महत्त्वाचे असल्याचे नमूद करून श्री. प्रसाद म्हणाले सामाजिक भावना, मानवी मूल्ये आणि सार्वत्रिक भावनांवर आधारित कथा अधिक प्रभावी ठरतात. गेल्या काही वर्षांत चित्रपटांच्या प्रेक्षकवर्गात आणि व्याप्तीत मोठा बदल झाला असल्याचेही ते म्हणाले.

ऑस्कर परीक्षक आणि चित्रपट तज्ज्ञ उज्वल निरगुडकर यांनी सांगितले की, भारतातील निर्माते आणि संस्थांनी ऑस्करमध्ये केवळ “बेस्ट इंटरनॅशनल फिल्म” श्रेणीतच नव्हे, तर लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म, ऍनिमेशन फिल्म, आणि स्टुडंट फिल्म या चार महत्त्वाच्या श्रेणींमध्येही चित्रपट पाठवण्यावर भर द्यावा. विशेषतः स्टुडंट फिल्म श्रेणीसाठी ऑस्कर अकॅडमीदरम्यान दरवर्षी स्वतंत्र स्पर्धा आयोजित केली जाते, ज्यात विजेते चित्रपट मुख्य ऑस्कर स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

श्री. निरगुडकर म्हणाले, ऑस्कर अकॅडमीद्वारे आयोजित “Nicholl Script writing Competition” आणि “Gold Mentorship Program” यासारख्या संधी भारतीय नवोदित लेखक आणि विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान ठरतील. चित्रपटातील उपशीर्षक अमेरिकन इंग्रजीत असणे आवश्यक आहे. ऑस्करचे ९० टक्के परीक्षक लॉस एंजेलिसमधील असून त्यांची भाषिक समज वेगळी असते. ते म्हणाले गाण्यांचे उपशीर्षक सरळ भाषांतर न करता त्यामागचा अर्थ थोडक्यात मांडावा. ऑस्करसाठी चित्रपटाची भाषा नव्हे तर आशय, दर्जा, आणि सादरीकरण महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

0000

एकनाथ पोवार/विसंअ/

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार – अभिनेते अमीर खान

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत्रामध्ये उत्तुंग आघाडी घेईल, असा विश्वास अभिनेते अमीर खान यांनी व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, 2025 मधील ‘भविष्यातील स्टुडिओ : भारताला जागतिक स्टुडिओ नकाशावर नेण्यासाठी पुढाकार’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते, या चर्चासत्रात पीव्हीआर आणि इनॉक्सचे संस्थापक अजय बिजिली, अमेरिकन चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन, चित्रपट निर्माते दिनेश विजन, प्राइम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा, आणि चित्रपट निर्माते रितेश सिधवानी सहभागी झाले होते. यावेळी चित्रपट समीक्षक मयंक शेखर यांनी सूत्रसंचालन केले.

अभिनेते अमीर खान म्हणाले, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे. शासन आणि मनोरंजन क्षेत्र यांच्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने संवाद सुरु झाला आहे आणि ही सुरुवात निश्चित आशादायक आहे. संवादातून या क्षेत्रासाठी दूरगामी परिणाम करणारी धोरणं निश्चित तयार होऊ शकतील.

 भारतातील कंटेंट क्रिएशन आणि मनोरंजन व्यवसायाची जागतिक स्तरावर दमदार छाप – चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन

भारतामध्ये कंटेंट क्रिएशन, मनोरंजन व्यवसाय आणि स्ट्रीमिंग किंवा लीजिंगसारख्या विविध माध्यमांचा अनुभव घेताना जाणवते की, हा उद्योग पूर्णपणे वेगळ्या मॉडेलवर चालतो. जागतिक पातळीवर काम पाहत असताना आणि येथील काम देशांतर्गत केंद्रित आहे, त्यामुळे दृष्टिकोनही वेगळा आहे, असे मत अमेरिकन चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन यांनी व्यक्त केले.

श्री. रोव्हेन म्हणाले, मी चित्रपट किंवा कंटेंट तयार करताना आधीच ठरवतो की, ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर की, चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण येथे आधी कंटेंट तयार होतो आणि मग त्याचे प्रदर्शन करण्याचा मार्ग ठरवला जातो. या ठिकाणी कधी स्वतः तर कधी इतरांकडून गुंतवणूक  केली जाते, ही पद्धत वेगळी आहे आणि ती खूपच छान आहे.

वेव्हज कार्यक्रमाचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे भारत आता जागतिक स्तरावर या क्षेत्रात आपले लक्ष केंद्रीत करत आहे. खरं तर, भारताला जगाकडे पाहण्याची गरज नाही, कारण आता जगच तुमचा कंटेंट शोधून येऊ लागले आहे, असंही त्यांनी नमूद केले.

भारतीय चित्रपटांच्या जागतिक वितरणासाठी भाषा आणि सुस्पष्ट संवाद महत्त्वाचा – चित्रपट निर्माते रितेश सिधवानी

मार्केटमध्ये पुन्हा एकदा भावना जागृत होत आहेत. पूर्वी 80 च्या दशकात, स्थानिक वितरण सर्वात मोठे मानले जात होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही फक्त त्याचा एक भाग असायची. पण आजच्या घडीला, भाषेच्या विविधतेमुळे आणि विविध प्रेक्षकसमूहांच्या गरजांमुळे, वितरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, असे चित्रपट निर्माते रितेश सिधवानी यांनी सांगितले.

श्री. सिधवानी म्हणाले की, आज एकाच चित्रपटासाठी वेगवेगळ्या मार्केटसाठी वेगळे ट्रेलर्स तयार केले जातात. यूकेसाठीचा ट्रेलर अमेरिकेसाठीच्या ट्रेलरपेक्षा वेगळा असतो. युरोपियन मार्केटसाठी एक ट्रेलर असतो आणि उत्तर अमेरिकेसाठी दुसरा ट्रेलर असतो. त्यामुळे भाषांतर नक्कीच मदत करते, पण त्या माहितीचा योग्य प्रकारे संवाद आणि वितरण कसे होईल, हे अधिक महत्त्वाचे आहे.

पश्चिमेकडील देशातील प्रेक्षक फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश चित्रपट सहज स्वीकारतात. ते त्यांची भाषा समजतात आणि त्या चित्रपटांकडे उत्सुकतेने पाहतात. ते आता भारतीय चित्रपटांची ओळख करून घेत आहेत. योग्य वितरण व्यवस्था आणि सादरीकरण त्यांच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय कथा जागतिक प्रेक्षकांसाठी स्थानिक वाटू शकतात – फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा

योग्य प्रतिभा, तंत्रज्ञान आणि भविष्यातील दिशादर्शक दृष्टिकोन यांच्या योग्य संमिश्रणातून जगभरातील प्रेक्षकांना आपली गोष्ट स्थानिक वाटते. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण चित्रपट विविध भाषांमध्ये केवळ भाषांतरित नाही, तर त्या भाषेत ‘लिपसिंक’सह प्रदर्शित करू शकतो, ज्यामुळे उपशीर्षकांची किंवा व्हॉइसओव्हरची गरज उरत नाही, असे मत प्राइम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा यांनी व्यक्त केले.

श्री.मल्होत्रा म्हणाले, भारतीय चित्रपट इंग्रजी, स्पॅनिश, जपानी अशा विविध भाषांमध्ये तयार करता येईल आणि हे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. त्याच वेळी, आपली कथा, तिचे पात्र आणि त्यांचा आत्मा जपून ठेवते, आपण ती जागतिक स्तरावर पोहोचवू शकतो. कारण अनेक वेळा भाषा ही सर्वात मोठी अडचण ठरते. चांगला कंटेंट ही अडचण पार करू शकतो, पण व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषेची अडचण दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

वेव्हज् २०२५ : कृत्रिम बुद्ध‍िमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ

मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे, व्यवसाय मॉडेल्समध्ये नावीन्य आणणे, एआय-कुशल कार्यबलाचे नेतृत्व करणे आणि उद्योजकता वाढवणे यामध्ये भारत आघाडीवर आहे. इंटरनेटपासून मोबाइल आणि आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेपर्यंतच्या डिजिटल प्रवासात भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांनी सांगितले.

बीकेसी येथे सुरू असलेल्या वेव्हज २०२५ मध्ये शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी जागतिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन सत्रांमध्ये माध्यम, कथाकथन आणि डिजिटल उत्पादनात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या गतिमान प्रवेशाचा वेध घेण्यात आला.

वेव्हज २०२५ : ‘एआय’च्या नेतृत्वाखाली सर्जनशील परिवर्तनासाठी भक्कम पाया

सत्रांमधील चर्चेदरम्यान,  एआय हे सक्षमीकरणाचे साधन आहे. ते कोणाची जागा घेणार नाही, असा एकंदर सूर उमटला. डिझाइन, चित्रपट, अ‍ॅनिमेशन किंवा कथाकथन असो, जे मूलभूत गोष्टी समजून घेतील, नवीन साधनांचा जबाबदारीने वापर करतील आणि नीतिमत्ता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेवर आधारित प्रणाली तयार करतील अशांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. जागतिक स्तरावर सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित परिसंस्थेमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सबळ पुरावा म्हणजे वेव्हज २०२५ आहे.

“कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या युगात संरचना, माध्यम आणि सर्जनशीलता” या विषयावर अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेवर विस्तृत दृष्टिकोन मांडताना बोलत होते. ‘एआय’ संचालित चौकट तयार करण्यात भारताचे अद्वितीय स्थान अधोरेखित करताना अनुप्रयोगांपासून डेटा पायाभूत सुविधांपर्यंत श्री.नारायण यांनी चार-स्तरीय धोरणाची रूपरेषा मांडली.

एनव्हीडीओ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल म्हणाले की, “पीसी कार्यालयीन वेळेनंतर निद्रिस्त व्हायचे पण मानवाचे तसे नाही.” एनव्हीआयडीआचा सुरुवातीचा दृष्टिकोन  पीसींना सर्जनशील साथीदार म्हणून कल्पना करणे हा आहे. आता कृत्रिम प्रज्ञा समर्थित जगात याचा  प्रतिध्वनी कसा उमटतो, याबाबत त्यांनी त्यांचे विचार स्पष्ट केले.

एनव्हीआयडीआचे उपाध्यक्ष रिचर्ड केरिस यांनी, जनरेटिव्ह एआय सह, आपण संकल्पनेपासून निर्मितीकडे खूप वेगाने प्रगती करू शकतो. असे सांगताना त्यांनी मूलभूत गोष्टींशी संपर्क गमावण्याविरोधात सजग केले. आपल्या सर्वांच्या फोनवर कॅमेरा असल्याने आपण सर्वजण उत्तम छायाचित्रकार बनत नाही. एआय तुमच्या हातात विविध साधने देते. परंतु कला, मूलभूत गोष्टी जाणून घेणे आजही तितकेच आवश्यक आहे. सर्जनशील लोक त्यांचे काम अक्षरशः जगतात. कृत्रिम बुद्ध‍िमत्ता त्याची जागा घेत नाही तर ते लोकांना अधिक सक्षम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तिसऱ्या सत्रात, एनव्हीडीआचे सोल्युशन्स आर्किटेक्ट अनिश मुखर्जी यांनी “जनरेटिव्ह एआय सह गोष्टी सत्यात आणणे” हे सत्र हार्डवेअरच्या पलिकडे जाऊन परिवर्तनात्मक साधनांकडे वळण्याच्या एनव्हीडीआच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकते असे त्यांनी सांगितले. मुखर्जी यांनी एआय-द्वारे सक्षम उपायांचे प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामध्ये स्थिर प्रतिमा डिजिटल मानवांमध्ये रूपांतरित करणे, बहुभाषिक व्हॉइस-ओव्हर आणि ऑडिओवर आधारित कॅरेक्टर अ‍ॅनिमेशन यांचा समावेश होता. एनव्हीआयडीआयएच्या फुगाटो मॉडेलचा वापर करून, त्यांनी एआयद्वारे जनरेट केलेले संगीत आणि डबिंगसाठी वास्तववादी लिप-सिंकिंग दाखवले. त्यांनी ओम्निव्हर्स प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ जनरेशन आणि सिम्युलेशनवर आधारित प्रशिक्षणासाठी मूलभूत मॉडेल्सचा संच ‘कॉसमॉस’ देखील सादर केला.

०००

सागरकुमार कांबळे/ससं/

‘वेव्हज् २०२५’ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह साहस, समानतेचा उत्सव

मुंबई, दि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. धैर्याने पुढे येण्यासाठी, एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी चळवळ उभी करण्याचे आवाहन इस्त्राइलच्या अभिनेत्री रोना ली शिमोन यांनी केले. या चळवळीत समाजमाध्‍यमांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण हे माध्‍यम  महिलांना त्यांचा आवाज आणि कथा सामायिक करण्याची ताकद देतो, असेही त्यांनी सांगितले.

बीकेसी मुंबई येथे वेव्हज २०२५ जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये “प्रतिकूल परिस्थितींना धैर्याने सामोरे जात, एका कथेची नवीन पटकथा लिहिणे” या विषयावरील चर्चासत्रात सुप्रसिद्ध इस्रायली अभिनेत्री रोना-ली शिमोन, इटालियन मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली  बियांका बाल्टी, माजी जर्मन फुटबॉलपटू आणि विश्वविजेती एरिअन हिंगस्ट यांनी सहभाग घेतला.

रोना-ली शिमोन यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र यावे, धैर्याने व एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने न घाबरता उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. इथल्या प्रत्येक वक्त्याने वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना केला आहे आणि त्यांचा आयुष्य़ावर परिणाम होऊ देण्याऐवजी त्यांनी त्या क्षणांचा उपयोग स्वतःची कथा नव्याने लिहिण्यासाठी केला आहे. वेव्हज २०२५ याच गोष्टीचे प्रतीक आहे. अशा व्यक्ती जे केवळ आव्हानांना सामोरे जात नाही, तर त्यांना परिवर्तन आणि प्रेरणेसाठी व्यासपीठात रूपांतरित करतात.

एरिअन हिंगस्ट हिने पुरुषप्रधान खेळात व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आपला प्रवास सांगितला. लिंगभेदावर मात करून जगज्जेता बनण्याबाबत आणि आता खेळांमध्ये निष्पक्षता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ती करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तिने माहिती दिली. पुरुषांच्या तुलनेत महिला फुटबॉलला प्रसारमाध्‍यमांकडून मिळणारी कमी प्रसिद्धी आणि योग्य व्यासपीठांचा अभाव असल्याची बाब तिने अधोरेखित केली आणि महिला खेळाडूंना समान संधी आणि ओळख मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.

मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी हिने बरे झाल्यानंतर कामावर परतण्याची तिची यशकथा सांगितली. मॉडेलिंग उद्योगात महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तफावत, महिला मॉडेल्सना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा मिळणारे कमी पैसे, यामुळे माध्यमांत अजूनही पुरूषप्रधान संस्कृती असल्याचे तिने स्पष्ट केले. समाजमाध्यमांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद असल्याचे तिने सांगितले.

000

सागरकुमार कांबळे/ससं/

‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.  २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेव्हज् परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज् परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे.

वेव्हज् परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे सामंजस्य करार  (MoUs) केलेले आहेत. यामध्ये  सगळ्यात महत्त्वाचा, एनएसईने (NSE) वेव्हज् निर्देशांक सुरू केलेला आहे. ४३ कंपन्या, या दृकश्राव्य क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टीम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. हा वेव्हज इंडेक्स म्हणजे वेव्हजच्या यशामधला एक मुकुटमणी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या दोन जागतिक विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार  केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत, परदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाची 10 ते 12 विद्यापीठे आपले कॅम्पस सुरू करणार आहेत. त्यातील दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे. आणखी तीन महत्त्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे. देशातले जागतिक विद्यापीठ एकत्र असलेले पहिले कॅम्पस नवी मुंबईमध्ये सुरू होत आहे.

यासोबत प्राइम फोकससोबत (Prime Focus) सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये प्राइम फोकस एक फिल्मसिटी या ठिकाणी तयार करणार आहे, ज्यामध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून किमान 10 हजार लोकांना रोजगार मिळेल.  ‘एआय’ (AI) पॉवर आणि जगातली उत्तम तंत्रज्ञानही त्या ठिकाणी असणार आहे.

पनवेल येथे चित्रपट सृष्टी उभारण्यासाठी गोदरेज सोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एकूण 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

फिल्मसिटी म्हणजे तंत्रज्ञान

फिल्मसिटी म्हणजे लोकेशन नाही, आता फिल्मसिटी म्हणजे टेक्नॉलॉजी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व तंत्रज्ञानाने परिपूर्ण चित्रपट सृष्टी असेल. तेथे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सगळ्या गोष्टींसाठी परिसंस्था असतील. आतापर्यंत आपले लोक तिथे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करायचे, मात्र जे लोकं जाऊ शकत नाहीत, त्यांना तेच शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. आज वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल, तर ती दृकश्राव्य माध्यमाची अर्थव्यवस्था आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी यात असून, या क्षेत्रात भारताला नेतृत्व करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स, कंटेंट वापर, आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत. या क्षेत्रात नेतृत्व करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेव्हजमुळे, हे शक्य झाले आहे आणि मुंबई, ही दृकश्राव्य माध्यमाची जणू राजधानीच या संमेलनामुळे झालेली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा १३ मे रोजी

0
मुंबई, दि.9 : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मंगळवार, दि. १३ रोजी वितरण करण्यात येणार आहे. राज्यपाल...

स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिजे – मंत्री मंगलप्रभात लोढा

0
मुंबई, दि. ९ : एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला  'सोने की चिडिया' म्हटले जात होते....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

0
मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला....

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0
सातारा दि. 9 : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी...

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...