गुरूवार, जुलै 24, 2025
Home Blog Page 167

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी आणि दळण- वळणाच्या सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करतानाच उपकेंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकीकृत विकास आराखड्याच्या प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्री श्री. पाटील यांनी आज दुपारी शिवनई शिवारातील उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष निकम, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, डॉ. राजेंद्र विखे पाटील, बागेश्री मंथळकर, देविदास वायदंडे, नितीन घोरपडे, संदीप पालवे, सिनेट सदस्य विजय सोनवणे, प्राचार्य श्री. भांबर, संपत काळे, सचिन गोरडे, बाकेराव बस्ते आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसराचा सर्वांगीण विकासाचे नियोजन करावे. त्यासाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा. उपकेंद्राच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घ्यावा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. वैद्य यांनी उपकेंद्राची माहिती देतानाच परिसरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा नवा भारत आहे, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीड दि. 9 ( जिमाका ) : -पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायचं काम भारत करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेला हा घुसके मारेंगे वाला भारत आहे.

आमच्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम या दहशतवाद्यांनी केलं त्यासाठी ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले त्याचे मी स्वागत करतो. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायचं काम आमचे जवान करत आहेत या दरम्यान महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले त्यांना मी आदरांजली वाहतो असे म्हणत, केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी बैठक झाल्याचीदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बीडच्या तारकेश्वर गड येथे संत नारायण बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस, यांची प्रमुख उपस्थिती होती.. गडाच्या विकासासाठी आवश्यक ती मदत आपण करणार असल्याचा शब्द देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गडाचे महंत आदिनाथ महाराज यांना दिला..

कार्यक्रमासाठी गडावरील हेलिपॅड वर त्यांचे आगमन झाले त्यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गोदामाची साठवणूक क्षमता वाढवावी – पणनमंत्री जयकुमार रावल

पुणे, दि. ९: राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा व त्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या अद्यावत साठवणूक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पुणे येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री. रावल म्हणाले, राज्यात सद्यस्थितीत महामंडळाची उपलब्ध साठवणूक क्षमता ही स्वमालकीची १७.२२ लाख मेट्रिक टन आणि भाडेतत्त्वावरील ७.३३  लाख मेट्रिक टन अशी २४.५५ मेट्रिक टन आहे, येत्या काळात नवीन सुमारे ५२ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम निर्मितीसंदर्भात व्यवहार्य नियोजन करावे. राज्यातील गोदामाचे रेटिंग करुन घ्यावे, जेणेकरून केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ घेता येईल.

राज्यातील गोदामामध्ये सनियंत्रण तसेच कामकाजात पारदर्शकता राहण्याच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसवून त्यांचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात करावे. यामुळे राज्यातील गोदामात उपलब्ध साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये ५० टक्के आणि शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत दिली जाते. साठवणूक केलेल्या मालास १०० टक्के विमा संरक्षण तसेच शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

धान्य साठवणूकीमुळे बाजारभाव उच्च असतांना शेतकऱ्यांच्या शेतमालाचा चांगला परतावा मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी गोदामामध्ये अधिकाधिक धान्य साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांचे अन्न धान्याचे कापणीनंतरचे नुकसान कमी होऊन त्यांच्या शेतमालास चांगला बाजारभाव मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

शेतकऱ्यांचा शेतीमाल शास्त्रशुध्द पध्दतीने साठविण्यासोबतच कृषी क्षेत्रात अन्नधान्याचा साठा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये धान्य ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास आणि इच्छा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे श्री रावल म्हणाले.

श्री. दिवेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची मागील तीन वर्षाची तुलनात्मक आर्थिकस्थिती, साठवून क्षमता व साठवून क्षमता वापर, संस्थानिहाय साठवणूक क्षमता वापर, शेतकऱ्यांसाठी सोई-सुविधा, शेतमाल तारण कर्ज योजना, हमीभाव खेरेदी, साठवणूक नियोजन, गोदाम बांधकाम, प्रस्तावित गोदाम तसेच राज्य शासन, स्मार्ट प्रकल्पाकडे प्रस्तावित प्रकल्पाबाबत माहिती दिली.

जांबरगाव ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लवकरच उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथील ॲग्रो लॉजिस्टिक पार्क निर्माण कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे.त्यामध्ये १० हजार मे. टन क्षमतेचे सायलो दोन गोदामे ६ हजार मे.टन, क्लिनिंग व ग्रेडिंग २ युनीट (५ मे.टन /तास क्षमता), पेट्रोल पंप, सामायिक सुविधा केंद्र, उपहारगृह, ट्रक टर्मिनल, अंतर्गत रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले. त्याच बरोबर लातूर येथील १० हजार मेट्रिक टन क्षमतेचे सायलो निर्माण कार्याचे भूमिपजन करण्यात येणार आहे. असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.

समुदाय स्तरावरील उद्दिष्टे, कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे – सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक

मुंबई, दि.9 : एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात समुदाय स्तरावरील उद्दिष्टे व कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांनी केले.

एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने ७ मे २०२५ रोजी नवी मुंबई येथे ‘NACP-V’ अंतर्गत कार्यशाळा आयोजित केली. भविष्यातील कार्यपद्धती, अडथळे आणि त्यावरचे उपाय यावर लक्ष केंद्रित करून पुढील वाटचालीचा नवा मार्ग आखण्यात आला.

राज्यातील सुविधास्तरावरील १४० अधिकारी आणि कर्मचारी ( वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा पर्यवेक्षक, सामाजिक संस्था, पार्टनर इ.) आणि ‘महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी’ चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यशाळेत मुख्य NACP-V अंतर्गत चालू असलेल्या व नियोजित उपक्रमांची स्थिती जाणून घेणे, त्या अनुषंगाने सेवांमध्ये करावयाच्या सुधारणा  याबाबत सर्व उपस्थितांचे मत जाणून घेण्यात आले. उपस्थितांना गटामध्ये विभागण्यात आले. प्रत्येक गटामध्ये आठ ते नऊ अधिकारी व कर्मचारी यांचे 17 गट बनविण्यात आले. गटचर्चा करतांना, एचआईव्ही /एड्स आजाराबाबत सादर करण्यात येणाऱ्या विविध रिपोर्ट्सची अचूकता, सद्यस्थिती, जोखीमग्रस्त कुणाला म्हणायचे तसेच गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी करावयाची कार्यवाही या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.

एचआयव्ही/एड्सचा धोका कोणाला नाही किंवा असुरक्षित घटक कोण आहेत?, अंदाजे किती टक्के आरोग्य संस्थांमध्ये दर्जेदार एसटीआय / आरटीआय सेवा मिळतात?, किती टक्के एचआयव्ही सह जगणारे हे एआरटी पासून सुटतात?, NACP-V अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्राची प्रगती ० ते १० या मापदंडामध्ये किती झाली असे तुम्हाला वाटते?, एचआयव्हीसह जगत आहेत (एचआयव्ही पॉझिटिव्ह) परंतु, आरोग्य यंत्रणेकडे त्याची नोंद नाही अशा लोकसंख्येचा अंदाजे आकडा किती आहे?,मुद्द्यांवर गटामध्ये चर्चा झाली त्यानंतर गटांचे सादरीकरण झाले.

या सादरीकरणामधून एचआयव्हीचा बदलता कल आणि वयोगट समजला. राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. मात्र, अद्यापही काही क्षेत्रांमध्ये लोकांपर्यंत माहिती व सेवा पोहोचविण्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे ‘९५-९५-९५’ या राष्ट्रीय उद्दिष्टाकडे वाटचाल करताना  सुसंगत व सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यशाळेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव डॉ. निपुण विनायक, डॉ. सुनील भोकरे, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय करंजकर आदी उपस्थित होते

परंपरा आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधणारा ‘टेक वारी’ उपक्रमाचा यशस्वी समारोप

Oplus_131072

मुंबई, दि. ९ : “माऊली… माऊली…” च्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि हरिभक्तीच्या भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात मंत्रालयात पार पडलेल्या  “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” या अनोख्या उपक्रमाचा  सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप झाला.

यावेळी अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा आदी उपस्थित होते. राज्याचे प्रशासनातील मनुष्यबळ अधिक तंत्र कुशल, गतिमान होण्यासाठी मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 5 ते 9 मे दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत टेक वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी म्हणाले, सद्यस्थितीत तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे आवश्यक ठरते. प्रशासकीय कामकाजात अचूकता आणि गतीमानता आणण्याबरोबरच कार्यप्रणालीत परिणामकारकता वाढविणे, तसेच कामाच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘टेक वारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

Oplus_131072

आयुक्त आर. विमला म्हणाल्या, भविष्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि संवेदनशील करण्याच्या दृष्टीने ‘टेक वारी’ उपक्रम हा महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या उपक्रमातून केवळ नवतंत्रज्ञानाची ओळख नव्हे, तर मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा मार्ग उघडण्यात आला आहे.

डॉ. संध्या पुरेचा म्हणाल्या, तंत्रज्ञानाचा स्वीकार जितका आवश्यक आहे, तितकेच संस्कृतीचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. मातृभाषा, कला आणि परंपरेच जतन करा, ‘टेक वारी’ उपक्रमातून याच संतुलनाचा संदेश देण्यात आला आहे.

‘टेक वारी’ उपक्रमात प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ‘ब्लॉकचेन’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘सायबर सुरक्षा’, ‘डिजिटल फायनान्स’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर आधारित सत्रांमधून सहभागी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना समृद्ध माहिती मिळाली. या तांत्रिक विषयांचे सुलभ व समजण्यायोग्य पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. तज्ज्ञांनी आपल्या सादरीकरणातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, याची दिशा दाखवली आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. ०९ जून, २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १० जून, २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १० जून, २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४ (३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत्त समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस  प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील,असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन २०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरणपूरक अशा सीएनजी व एलएनजीसारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रिड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पर्यावरणपूरक इंधनाच्या संदर्भात बोलावलेल्या एसटी अधिकारी व संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या बैठकीमध्ये बोलत होते.

मंत्री श्री.सरनाईक म्हणाले, एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चा पैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर होतो. दररोज सुमारे १० लाख ७० हजार लिटर इतके डिझेल लागते. वर्षाला सुमारे ३४ हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतो.

भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता, पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे. सीएनजी आणि एलएनजी हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेलपेक्षा स्वस्त असून पर्यावरणपूरक देखील आहेत. तसेच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लिटर ५-५.५ किलोमीटर अंतर कापते. डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ ४ किलोमीटर अंतर कापते. सहाजिकच एलएनजी व सी एन.जी. इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षीपासून घेण्यात येणाऱ्या नव्या २० हजार बसेस हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या घेण्यात येणार आहेत.

एलएनजी इंधनावर २० टक्के सूट

एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत केलेल्या करारानुसार एलएनजीइंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या २० सूट कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी २३५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

राज्याभरात ९० ठिकाणी एलएनजी चे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सीएनजी चे २० पंप उभारले जात आहेत. त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार आहे. या दोन्ही इंधना सोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रीड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्याकडून मागविण्यात आले आहेत. भविष्यात एसटीच्या तफ्यात या दोन इंधनावर चालणाऱ्या हायब्रीड बसेस घेण्याचा एसटीचा मानस असल्याचे मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ

शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाची उल्लेखनीय कामगिरी

मुंबई,दि.9:  शासनाच्या 100 दिवसीय कार्यक्रमा’ अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने उत्कृष्ट गुणवत्ता व कार्यक्षमतेने काम पूर्ण करून राज्यातील सर्व आयुक्तालये व संचालनालये यांच्या गटामध्ये राज्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे.

ही कामगिरी  मुख्यमंत्री,  ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, तसेच . प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विभागातील संपूर्ण प्रशासन यंत्रणेच्या एकात्मिक, उद्दिष्टाभिमुख व लोकसहभागावर आधारित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे विभागाने कळविले आहे.

QCI (Quality Council of India), नवी दिल्ली यांनी केलेल्या प्रत्यक्ष स्थळपाहणी व मूल्यांकनामध्ये ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने समाधानकारक प्रगती दर्शवली असून, राज्यस्तरीय मानांकनात विशेष उल्लेखनीय स्थान प्राप्त केले आहे.

 (अ) कार्यक्रम अंमलबजावणीतील प्रमुख घटक :

1 घरकुलांना मंजूरी: 13,60,084 घरकुलांना मंजुरी देण्यात आली ( उद्दिष्टाच्या 104.6% पूर्तता)

  1. पहिला हप्ता वितरणः 12,85,553 लाभार्थ्यांना ₹2062.06 कोटी वितरीत ( 428.5% पूर्तता)
  2. भौतिक पूर्तता (पूर्ण बांधलेली घरकुले): 1,48,542 घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण (148.5% पूर्तता)
  3. भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धताः23,333 लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा प्रदान ( 466.7% पूर्तता)
  4. महा आवास अभियान राज्यभर 10 उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी ( नियोजनबद्ध आणि सुसंगत अंमलबावणी)

प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासनः

या वर्गवारीमध्ये संकेतस्थळ सुरुः www.mahanwans.org. केंद्र शासनाशी सुसंवादः देशात सर्वोत्कृष्ट काम,  स्वच्छता उपक्रमः 2449 नस्त्यांचे निंदणीकरण व वर्गीकरण पूर्ण, तक्रार निवारणः “आपले सरकार” पोर्टलवरील 96% व “PG पोर्टल “वरील 98% तक्रारींचे निराकरण,  कार्यालयीन सुविधाः कार्यालयांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध,  ई-ऑफिस प्रणालीचा वापरः 100% अमलबजावणी,  प्रशिक्षण व AI वापरः सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर,  CSR अंतर्गत आर्थिक सहकार्य: 30 जिल्ह्यांतील 2,33,664 लाभार्थ्यांना CSR माध्यमातून सहकार्य,  नाविन्यपूर्ण उपक्रम “सुकर जीवनमान” या अंतर्गत  १०० दिवसीय महा आवास अभियानामार्फत गतिमानता व गुणवत्ता, बहुमजली इमारती, लैंड बैंक, गृहसंकुल, घरकुल मार्ट, डेमो हाऊस, सॅण्ड बैंक, कॉप शॉप, नागरी सुविधा, कॉर्पोरेट व अॅकेडेमिया सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणाः,  महाआवास पोर्टल, हेल्पलाईन,  भूमिलाभ पोर्टल, “आवास मित्र” अॅप या कामांचा समावेश आहे.

कार्यप्रदर्शनामागील व्यवस्थापनाची सामूहिक ताकद

उल्लेखनीय यशामागे केवळ सांख्यिकीय प्रगती नसून, राज्यातील लाखो पात्र लाभार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण समर्पण, प्रभावी समन्वय व कार्यक्षम अंमलबजावणीमुळे ही प्रगती शक्य झाली असल्याचे  ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ

मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला. यावेळी जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी सान, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मेट्रोच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी  या 13 कि.मी. मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 कि.मी. मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे.

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगाव सारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ व अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 50 कि.मी. तर पुढील वर्षी आणखी 50 कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार

मेट्रो, बेस्ट, लोकल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकीटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत हा प्रयोग सुरू करण्यात येणार असून त्यानंतर महामुंबईतही ही सेवा देण्यात येणार आहे. सध्या यावर प्रायोगिक तत्वावर काम सुरू असून लवकरच त्याचा व्यावसायिक वापर सुरू होईल. यामुळे नागरिकांना मुंबई तसेच महामुंबई परिसरात सुलभपणे प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाईम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे. नागरिकांची गरज ओळखून कामे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील 50 टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे.

 

टप्पा 2 अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती :

– स्थानकांची संख्या – 6 (सर्व भूमिगत)

– अंतर – 9.77 किमी

– हेडवे – 6 मि 20 सेकंद

– तिकिटाचे दर – किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ४०/-

– गाड्यांची संख्या – ८

– प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- १५ मिनिटे २० से

– फेऱ्यांची संख्या – २४४ फेऱ्या

– प्रवास वेळ आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक- ३६ मी

– तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ६०/-

– एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) २०८

– एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) – ६७

कनेक्टिविटी

बीकेसी, वरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे. बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा आणि माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहेत.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

डिजिटल युगात कामात सुलभता आणि सुरक्षेसाठी संगणक सजग असणे आवश्यक – प्राजक्ता तळवलकर

मुंबई, दि. 9 : डिजिटल युगात संगणक हा आपला अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर होतो. या डिजिटल युगात  संगणकाच्या मूलभूत गोष्टींची  माहिती असणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर कामामध्ये सुलभता, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा संगणक सजग असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मास्टेक नॉसकॉमच्या प्राजक्ता तळवलकर यांनी सांगितले.

टेक – वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘डिजिटली सजग बना’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नॅसकॉमचे अधिकारी प्राजक्ता तळवलकर, राहुल मुलाने यांनी मार्गदर्शन केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता टूल्सचा वापर करताना सावधगिरी बाळगा

माहिती तंत्रज्ञानाच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करताना सावधगिरीने केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना डेटा चोरी होणार नाही यासाठी सतर्क असणे आवश्यक असून चॅट जीपीटी सारख्या एआय टूल्सवर काळजीपूर्वक डेटा दिला पाहिजे असा सल्ला राहुल मुलाने यांनी उपस्थितांना दिला.

यासोबतच संगणकाचे विविध भाग, ऑपरेटिंग सिस्टीम, संगणकाचा कीबोर्ड वापरताना उपयोगी पडणारे शॉर्टकट, जीमेल वापरताना स्मार्ट ईमेल आणि दिनदर्शिकेचा वापर कसा करावा, जीमेल मधील लेबल्सचा उपयोग, गूगल नोट्स, गूगल लेन्स, डॉक्युमेंट डिजिटायझेशन याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

0
मुंबई, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special Intensive Revision -...

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

0
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी  ‘विद्यार्थी सहाय्यता...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात लोकांमध्ये प्रभवीपणे पोहचवावा –...

0
सातारा दि.२३  : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात प्रभवीपणे पोहचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व जिल्हास्तरीय समित्यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा...

उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात...

0
सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0
सातारा दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असून तुमचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही...