मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 1674

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आदरांजली

मुंबई, दि. 30: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवन येथे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे उप सचिव राजेश तारवी, अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन ब्रँडिंग करणे गरजेचे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 30 : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या प्रस्तावाला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे भरडधान्याच्या योगदानाचे महत्त्व, आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती करण्यात येत असून याचाच भाग म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्याचे महत्त्व आणि उपयुक्तता याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती आणि या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी रामनारायण रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस.पी. मंडळी, अॅड. एस. के. जैन, श्रीकृष्ण चितळे,  महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष अॅड.मिहीर प्रभुदेसाई,  प्रा. कामिनी दोंदे, उपप्राचार्य डॉ.वर्षा शुक्ला तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

मुंबई, दि.  30 : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी त्यासाठी संचालनालयाचे अभिनंदन केले आहे. राज्य शासनाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील कॅन्टॉन्मेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅलीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या  बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2021 ते  नोव्हेंबर 2022 मधील विविध स्तरांवरील मूल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताकदिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 18 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याने सात वर्षांनी सलग दोन वर्ष ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून  उत्तम कामगिरी केली आहे.

00000

राजू धोत्रे/विसंअ

विश्वचषक पटकावणाऱ्या भारतीय महिला संघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक

मुंबई, दि. २९ : – विश्वचष्क पटकावून भारतीय महिला युवा क्रिकेट संघाने भारतीय महिलांच्या कर्तबगारीवर मोहोर उमटवणारी कामगिरी केली आहे. त्यामुळे हा भारतीय महिला युवा क्रिकेट संघ कौतुकास पात्र आहे. या विजयामुळे नव्या वर्षात भारतीयांनी एक चांगली भेट मिळाली आहे, या कौतुकोद्गारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला युवा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या १९ वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट युवा संघाचे अभिनंदन केले आहे.

भारतीय महिला संघाने केवळ ६७ धावांत इंग्लडच्या संघाचा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंचे कौतुक केले आहे. हा विजय भारतातील क्रीडा क्षेत्रासह, सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या  भगिनींचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. या विजयामुळे भारतीयांचा  क्रिकेटमधील कामगिरीचा लौकिकही उंचावला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संघातील सर्व क्रिकेटपटूंचे, त्यांचे प्रशिक्षक तसेच मार्गदर्शकांचेही अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

मुंबई, दि. 29 : विश्वचषकावर आपले नाव कोरणाऱ्या 19 वर्षांखालील युवा महिला क्रिकेटपटूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. आगामी काळात क्रीडाविश्वात भारत आपला वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, भारताच्या युवा महिला क्रिकेटपटूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत विश्वचषक पटकाविला. गेल्या काही वर्षात सर्वच क्रीडा प्रकारात आपले युवा खेळाडू उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करत असून आगामी काळात भारत क्रीडाविश्वात आणखी नाव कमावेल. युवा महिला क्रिकेटपटूंचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

जत्रोत्सवाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला चालना – मुख्यमंत्री

पुणे दि.२९: इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून  भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून  जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

इंद्रायणी थडी जत्रा भव्यदिव्य आणि हजारोंना एकाचवेळी आनंद देणारी जत्रा असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे. विविध वयेगाटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्ताने एक हजार स्टॉलद्वारे ८०० महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली आहे. महिला बचत गट आणि लहान व्यावसायिकांना अशा महोत्सवातून बाजारपेठ मिळते आणि त्यातून मोठे उद्योजक तयार होतात. म्हणून अशा महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आणि राज्याची प्रगती करणारे हे सरकार आहे. म्हणूनच कोविडनंतर शासनाने निर्बंध हटविल्याने विविध उत्सव सुरू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या आकांक्षांना न्याय देण्याचे कार्य सरकार करत आहे. सहा महिन्यात सर्व समाजघटकांसाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उत्तम आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार लांडगे यांचे अभिनंदन केले.आमदार लांडगे आणि विकास डोळस यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि.२९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारणीसंदर्भातील अडचणी दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद पाटील आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे श्री.शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी  मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे. आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी. वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं. आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते.  उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार श्री. बारणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पालखी मार्गाचे काम आणि पंढरपूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी वारकरी दत्तात्रेय कराळे यांनी पाच लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

प्रास्ताविकात श्री. काशिद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामाची माहिती दिली.

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर, दि. 29 (जि. मा. का.) : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पुणे विभागाच्या आढाव्यांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या सादरीकरणावेळी ते बोलत होते.
या बैठकीस पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील प्रवरा लोणी (जि. अहमदनगर) येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, राम सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी यशवंत माने आदिंसह प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 साठी शासनाने दिलेल्या कमाल आर्थिक मर्यादेनुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 502.95 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तथापि सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 166.76 कोटी रूपयांची अतिरीक्त मागणी आजच्या बैठकीत प्रस्तावित करण्यात आली.
प्रस्तावित प्रारूप आराखडा तयार करताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवल्याचे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिरिक्त मागणी करताना धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास, महिला व बालविकास, शैक्षणिक क्षेत्राचा विकास, जलसंधारण, उद्योगधंद्यांमध्ये वाढीसाठी उपयुक्त योजनांचा समावेश या बाबींच्या विकासावर भर देण्यात आला असल्याचे सांगितले. अतिरिक्त निधीच्या  मागणीसह प्रारूप आराखडा मान्य झाल्यास जिल्ह्याच्या विकासाच्या कामांना गती देता येईल, असे ते म्हणाले.
या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरीक्त 166.76 कोटी रूपयांची मागणी प्रस्तावित करण्यात आली. यामध्ये कृषि व संलग्न सेवा, ग्रामविकास, लघुपाटबंधारे, ऊर्जा विकास, उद्योग व खाणकाम, सामाजिक व सामूहिक सेवा, नाविन्यपूर्ण योजना, पशुसंवर्धन, रस्ते व नगर विकास, शिक्षण विभाग, पर्यटन विकास आदिंसाठी प्रामुख्याने ही अतिरीक्त निधीची मागणी करण्यात आली आहे.
या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्याची माहिती सादर केली. यामध्ये त्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2023-24 चा प्रारूप आराखडा व सन 2022-23 मधील यंत्रणास्तरावरील झालेल्या निधी खर्चाची, तसेच गत पाच वर्षात राज्यस्तरीय बैठकीत मिळालेल्या वाढीव निधीच्या खर्चाची टक्केवारी जवळपास 100 टक्के असल्याची माहिती दिली.

कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.29 : शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे  दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले  शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी  केले.

नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी व अध्यात्मिक विकास मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘जागतिक कृषी महोत्सव, 2023’ निमित्त महोत्सवाच्या चौथ्या दिवशी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार सुहास कांदे, आमदार सीमा हिरे, आमदार संजय शिरसाट, श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे, जिल्हाधिकारी गंगाधरन. डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपले शासन सर्वसामान्य जनतेचे आहे. कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, समाजातील प्रत्येक घटकाचे हे शासन आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक निर्णय हा जनतेच्या कल्याणार्थ घेत आहोत. शेतीवर येणाऱ्या अतिवृष्टी, रोगराई आदी संकटांमध्ये देखील राज्य शासन आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. एनडीआरएफच्या नियमांना डावलून यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्यात आली आहे. शेतीचे जे नुकसान एनडीआरएफ च्या नियमात बसत नव्हते त्यावर योग्य निर्णय घेऊन शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्यातील 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय  शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत प्रयत्नशील आहोत. ४५० महिला बचत गटांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील जनता सुखी असली पाहिजे, हा राज्य व केंद्र सरकारचा अजेंडा आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे विकासाला मोठी चालना मिळाली आहे. सर्वत्र सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे.

बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा ‘गेम चेंजर’ असा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतमाला अवघ्या काही तासात राज्यासह परदेशात पाठविणे अतिशय वेगवान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकाधिक चालना मिळाली आहे. याशिवाय नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेऊन राज्यातील साखर उद्योगांच्या अडचणी सोडविण्याबाबत चर्चा केली आहे. लवकरच राज्यातील साखर उद्योगांच्या अडचणी देखील सोडविण्यात येणार आहेत. राज्याकडून केंद्राकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रस्तावाला केंद्र सरकार तत्काळ मंजुरी देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद केली असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कृषी महोत्सवाचे हे 12 वे वर्ष आहे. याठिकाणी अनेक राज्यातील नागरिक, शेतकरी येवून भेटी देत शेती संदर्भातील योग्य माहिती जाणून घेतात. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, कृषी विभागातील तज्ज्ञ मंडळी, शेतकरी यासोबत जोडले गेले आहेत. या कृषी महोत्सवात असलेल्या सातत्यामुळे शेतकऱ्यांना मोठे पाठबळ मिळत आहे. आयोजकांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी, आपुलकी व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून चालविलेला हा कृषी महोत्सव जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना उर्जा देतो. याठिकाणी लावण्यात आलेल्या 250 हून अधिक स्टॉलच्या माध्यमातून प्रगती शेतीसह गटशेती, योग्य बियाणे कसे निवडावे याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळाली आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे सुरु असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात अनेक समाजपयोगी कार्यक्रम पार पडले आहे. या कृषी महोत्सवात गुरुमाऊलींनी 11 सामूहिक विवाह लावून दिले आहेत. तसेच सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील 51 गावे श्री स्वामी समर्थ ट्रस्टने वर्षभरासाठी दत्तक घेतल्यामुळे या सर्वांचे पुण्य गुरुमाऊली मोरे यांच्या पदरी पडत असून ते देखील हे पुण्य कृषी महोत्सवातून जनतेपर्यंन्त पोहचवित आहेत. या जागतिक कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकाधिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक  प्रमाणात निधी उपलब्ध करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा दि. 29 –  जिल्ह्याच्या विकासासाठी लागणारा निधी आवश्यक  त्या प्रमाणात वितरित करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
    जिल्हा वार्षिक योजना (सर्व साधारण) सन 2023-24 प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय  बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून  पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील,दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले , जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलिस अधीक्षक समीर शेख,नियोजन अधिकारी शशिकांत माळी  यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.
        जिल्ह्याच्या डोंगरी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री जयवंशी यांना करून उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पर्यटन विकासासह ग्रामीण रस्ते आणि डोंगरी भागातील रस्ते याचा सविस्तर आराखडा सादर करावा.
     पालकमंत्री श्री देसाई म्हणाले. जिल्हा हा ८० टक्के डोंगरी आहे. या डोंगरी भागातील रस्ते, पाणी व इतर मूलभूत  पायाभूत सुविधांच्या  विकासासाठी वाढीव निधी मिळावा.
    खासदार श्री. पाटील यांनी कोकणातून जिल्ह्याला जोडणारे रस्ते प्रामुख्याने विकसित करावे अशी मागणी केली.
      यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी  यांनी जिल्ह्यासाठी 2023-24 साठीच्या सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली तसेच आवश्यक त्या वाढीव निधीची मागणी केली.

ताज्या बातम्या

अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १९ : भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी...

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...