रविवार, मे 18, 2025
Home Blog Page 1626

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांबाबत आढावा

मुंबई दि. 3 : चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि परिचर्या संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रकियेला शासनाने मान्यता दिली असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

विधानभवनात श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक झाली.

या वैद्यकीय महाविद्यालयाचे इमारत बांधकाम गतीने आणि दर्जेदार करण्याबाबत तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रसामुग्री, औषधपुरवठा आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीविषयी आरोग्य विभाग,एचएससीसी, वैद्यकीय शिक्षण विभाग, हाफकीन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची विधानभवनात संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश श्री. देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले.

या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी, तंत्रशिक्षण संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तासगाव, खानलोशी, माजलगाव एमआयडीसीसंदर्भात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई दि. 3 : नवीन एमआयडीसीबाबत उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत सांगली जिल्ह्यातील तासगाव, रायगड जिल्ह्यातील खानलोशी, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एमआयडीसीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

रितसर नियमावलीने एमआयडीसीकरिता आवश्यक तेथे भूसंपादन करून तसेच एमआयडीसीबाबतची आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करून याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना यावेळी कुमारी तटकरे यांनी दिल्या.

यावेळी एमआयडीसी चे अविनाश सुभेदार, उपसचिव भोसले, अपर सचिव किरण जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याची बँकांनी दक्षता घ्यावी – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

मुंबई,  दि.  3  : कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे बँकांनी येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

कृषी क्षेत्रात कर्जपुरवठा अधिक होण्यासाठी कृषिमंत्र्यांनी बँकांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राज्य बँकर्स समितीचे एन. एस. देशपांडे, नाबार्डचे आर.बी.डिसूझा, योगेश गोखले, एसबीआयचे रिजनल मॅनेजर संतोष मोहपात्रा, एमएससीबीचे एस.बी.जाधव, व्ही.डी.जोशी, आयसीआयसीआय बँकेचे समीर कुलकर्णी, कृषी विभागाचे उपसचिव पी.डी.सिकंदर तसेच आयसीआयसीआय, नाबार्ड, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, एमएससीबी आदी बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, बँकांनी लहान शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कर्जपुरवठा करावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याकरिता प्रयत्न करावेत. कृषी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का, निकषाप्रमाणे त्यांनी रक्कम भरली का याचा आढावा संबंधित बँकांनी घ्यावा. तसेच पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये, असेही त्यानी यावेळी सांगितले. कृषी योजनाच्या बाबतीत धोरणात्मक बाबींसाठी सहकारमंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असेही श्री. भुसे यानी सांगितले.

कृषी क्षेत्रात पतपुरवठा वाढविण्याबाबत सहकार्य  करण्याचे आश्वासन  बँकांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिले.  अल्प, अत्यल्प, व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी पीककर्ज व मध्यम मुदत कर्ज वितरण, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज देणे, कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक करणे आदी विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

पैठणच्या संतपीठ अध्यासन केंद्राचा अहवाल तातडीने सादर करण्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

मुंबई, दि. 3 :  महाराष्ट्राला संत, महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. संतांची परंपरा पुढे चालू राहावी आणि वारकरी संप्रदायाचे संस्कारही या पिढीला मिळावेत, यासाठी वारकरी आणि संत वाङ्‌मय

यांचा एकत्रित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने संतपीठाच्या अध्यासन केंद्राचा अहवाल तातडीने सादर करावा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.

विधानभवनात पैठण येथील संतपीठ तातडीने सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला आमदार अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने उपस्थित होते.

संतपीठाचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी गठित केलेल्या समितीने याबद्दलचा अहवाल तातडीने सादर करावा, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगड जिल्हा आढावा बैठक

मुंबई, दि. 3 : रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावून कामे पूर्ण करावीत तसेच जी कामे सुरू झाली नाहीत, अशा कंत्राटदारांनाही नोटीस देऊन पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून कामाला गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत दिल्या.

विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, जलसंधारणाच्या अडचणीसंदर्भात स्वतंत्र समिती गठित करून पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा. तसेच याबाबत काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळून बाकी गुन्हे माफ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

बैठकीत राज्यमंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, कोकणातील मत्स्य व्यावसायिकांसाठी मत्स्य दुष्काळ जाहीर करून त्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा. तसेच त्यांना डिझेल परवाना लवकर मिळवून देण्यात यावा, स्पीड बोट, रुग्णवाहिका सेवा सुरु करावी. २३ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समावेशन नगरपंचायतीमध्ये करावे, अशा सूचनाही कुमारी तटकरे यांनी केल्या.  

बैठकीत रायगड जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्यांची सद्यस्थिती, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, कृषी पंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या, आरोग्य सुविधा, अमृत योजना, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन, रोरो सेवेसाठी पार्किंग सुविधा, आरोग्य विभागातील रिक्त पदे, मुद्रांक शुल्क रक्कम, रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्याची स्थिती व दुरुस्ती या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/3.3.2020

जिल्हा तिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 3 : वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी 70:30 प्रमाणात लागू करण्यात आलेल्या प्रादेशिक आरक्षणाबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांनाही योग्य प्रमाणात वैद्यकीय प्रवेश मिळण्याबाबत शासन सकारात्मक असून यासाठी शासन न्यायालयात भूमिका मांडेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच जिल्हा तिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही संकल्पना शासनाने स्वीकारली असून याबाबत अंमलबजावणीचे काम सुरु आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेली 70:30 ही प्रवेश पद्धती मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय करणारी असल्याने ती रद्द करण्यात यावी, अशा आशयाची लक्षवेधी सूचना सदस्य मेघना साकोरे बोर्डीकर, कैलास घाडगे पाटील, ज्ञानराज चौगुले, नमिता मुंदडा, डॉ. राहुल पाटील आदींनी मांडली होती, त्यावर मंत्री श्री. देशमुख यांनी उत्तर दिले.

मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, 70:30 च्या प्रवेश पद्धतीमुळे मराठवाडा आणि विदर्भावर होत असलेल्या अन्यायाबाबत शासनाच्या वतीने लक्ष घातले जाईल. याबाबत न्यायालयात रास्त भूमिका मांडली जाईल. तसेच संबंधितांबरोबर बैठक घेऊन हा अन्याय त्वरित दूर करण्याबाबत योग्य ती पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून कोणताही जिल्हा वंचित राहणार नाही. परभणी येथेही प्राधान्याने हे महाविद्यालय सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे त्यांनी यावेळी सदस्य मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

००००

 इर्शाद बागवान/विसंअ/दि.०३.०३.२०२०

सारथी संस्थेच्या कामकाजातील अनियमितता : दोषींवर कारवाई करणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 3 : सारथी संस्थेच्या कामकाजात झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी करण्यासाठी अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल १०दिवसात येईल. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले. त्याचबरोबर या संस्थेची स्वायत्तता कायम राखण्याबरोबरच संस्थेचे सक्षमीकरण आणि त्यामार्फत मराठा विद्यार्थी आणि तरुणांसाठीच्या विविध योजना प्रभावी पद्धतीने राबविल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभेत सदस्य वैभव नाईक, महेंद्र थोरवे, मंगेश कुडाळकर आदींनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

सारथी‘मधील अनियमिततेच्या प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांवर आरोप झाले आहेत. तपासणीसाठी सचिव किशोरराजे निंबाळकर यांची समिती नेमली होती. आता अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचा अहवाल १० दिवसात प्राप्त होईल. अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तथापि, या अनियमिततेमध्ये तत्कालीन इतर संचालकांचा काहीही दोष नाही, त्यामुळे त्यांच्या चौकशीचा विषय नाही, असेही मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.   

मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, ‘सारथीमार्फत मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती तथा मानधनाचा दुसरा हप्ता वितरीत केला जाईल. यूपीएससी, स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षांच्या अभ्यासासाठी निवडलेल्या या विद्यार्थ्यांचे मानधन येत्या दहा दिवसात दिले जाईल. एकाही मराठी विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. संस्थेसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

बार्टी आणि’सारथी‘च्या धर्तीवर ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्था सुरु करण्यात येत आहे. महाज्योतीच्या माध्यमातून वंचित ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही या सर्व योजना उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत आमदार रोहीत पवार, संजय कुटे, राहूल कुल, नितेश राणे आदींनी सहभाग घेतला.

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

सातारा जिल्हा आढावा बैठक

मुंबई, दि. 3 : सातारा जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत, असे केल्यास निधीचे योग्य नियोजन करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील इतर विकासकामांकरिता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून निधीचे योग्य नियोजन करुन कामे करावीत.

असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान मोठ्या प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय महेता यांच्यासह सर्व संबंधित विभागाच्या सचिवांची उपस्थित होते. यावेळी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या.

उरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करुन दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माण खटाव या भागातील31 किलोमीटर वितरण प्रणालीचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. तसेच मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देऊन कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

सातारा जिल्ह्यात नवीन एमआयडीसी सुरु करताना ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येण्यास उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच रोजगार उपलब्ध होऊ शकेल. अशा ठिकाणास प्राधान्य देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 3 : वस्तू व सेवाकर विभागामध्ये बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून विहीत पद्धतीने ई- निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाते. या कंत्राटदारांद्वारे कर्मचाऱ्यांची सेवा पुरविली जाते. त्यांची नेमणूक कंत्राटदाराकडून विभागाच्या कार्यालयामधे करण्यात येते. त्यांची नियुक्ती करणे, त्यांना वेतन देणे, तसेच त्यांची सेवा खंडित करणे या बाबी कंत्राटदाराच्या स्तरावरून केल्या जातात. त्यामुळे बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेतलेल्या लिपिकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. पवार म्हणाले, सध्या वस्तू व सेवाकर विभागामध्ये 83 कंत्राटी लिपिक कार्यरत असून प्रत्येकी 15 हजार 753 रुपये एवढे मानधन निश्चित केले गेले आहे. यात कंत्राटी कर्मचारी याचा भविष्य निर्वाह निधी कंत्राटदाराने भरणे अपेक्षित आहे.

राज्यातील लिपिकांची पदभरती ही ‘एमपीएससी’ मार्फत होत असते. ‘एमपीएससी’ ने ही पदे  भरावीत. या जागा जाहीर झाल्यावर सध्या कार्यरत कंत्राटी लिपिकांनाही अर्ज करता येईल. ‘एमपीएससी’ मार्फतच स्थायी कर्मचारी भरती होईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोले, विक्रम काळे, श्रीमती मनिषा कायंदे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देणार जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 3 : एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत असलेल्या योजनांचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी गठित केलेल्या अभ्यास समितीच्या शिफारशींनुसार मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्यात येईल, असे  जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा प्रदेशात कोकणातील नार पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून एकूण 89.85 अघफू पाणी वळविण्याबाबत आखणी करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. या पैकी 2.43 अ.घ.फू. पाणी वळणाच्या  बांधकामाधीन आहेत. 25.55 अ.घ.फू. पाणी वळणाबाबत पार-गोदावरी, दमणगंगा पिंजाळ पूर्ण झाल्यावर उर्ध्व वैतरणा ते गोदावरी नदीजोड व दमणगंगा- पिंजाळ पूर्ण व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आले आहे. उर्वरित 61.88 अघफू पाणी वळविण्यासाठीच्या काही योजना प्रस्तावित तर काही प्रकल्पाधीन आहेत. अहमदनगर, जळगावसह मराठवाड्यातील क्षेत्र सिंचनाखाली आणणार आहे, असेही त्यांनी उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

या विषयी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री अंबादास दानवे, विनायक मेटे, सुरेश धस, शरद रणपिसे, जयंत पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

प्रत्येक जिल्ह्यात पॅलिएटिव्ह केअर सेंटर सुरु करणार

– आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.3 : कर्करोग, एचआयव्ही बाधित तसेच दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष उपचार केंद्र पॅलिएटिव्ह केअर सेंटरहे राज्यात 17 जिल्ह्यात स्थापन झाले असून येत्या दोन वर्षात उर्वरित 19 जिल्ह्यात सुरु करण्यात येतील , अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

श्री. टोपे म्हणाले, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय  पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाअंतर्गत टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात येत आहे.  यासाठी आवश्यक असणारे औषधे, कर्मचारी वर्ग त्याचबरोबर निधीची कोणतीही कमतरता यासाठी  होणार नाही. जिल्हा रुग्णालयात पॅलिएटिव्ह केअरसाठी दहा खाटा वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे यासाठी विशेष डॉक्टर आणि प्रशिक्षित परिचारिकांची नियुक्ती करण्यात येत आहे. यासंदर्भातील अभ्यासक्रमही लवकरच सुरु करू, असेही श्री.टोपे यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री. जगन्नाथ शिंदे, डॉ. रणजित पाटील, हेमंत टकले, गिरिशचंद्र व्यास आदिंनी सहभाग घेतला होता.

००००

अंगणवाडी सेविकांची सहा हजार रिक्त पदे भरणार

 महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 3 : राज्यातील अंगणवाडी सेविकांची रिक्त असलेली सुमारे सहा हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (सोनवणे) यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या, गेली पाच वर्षे अंगणवाडी सेविकांची पदे भरली गेली नव्हती. सन 2018 ला या सेविका तसेच त्यांच्या मदतनीस यांचे मानधनात वाढ करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या समन्वयाने त्यांना मानधन हे वेळेत दिले जावे  यासाठी काम करण्यात येईल.

या विषयी सदस्य सर्वश्री हेमंत टकले, भाई गिरकर, श्रीमती हुस्न बानो खलिफे आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

विसंअ/ अर्चना शंभरकर/ प्रश्नोत्तरे विधान परिषद/3-3-20

राज्यातील सहा जण निरीक्षणाखाली; १४९ प्रवासी कोरोना निगेटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. ३ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सहा जण निरीक्षणाखाली असून १४६ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  ५५१ विमानांमधील  ६५ हजार ६२१ प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या १२ देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत ४०१ प्रवासी आले आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १५२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी  १४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने’कोरोना‘करिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर ३ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या १५२ प्रवाशांपैकी १४६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या  ४ जण मुंबईत तर  २ जण पुणे येथे भरती आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुढील सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे –

o     वुहानमधून (चीन ) आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

o     इतर  बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते.

o     बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.

o     या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते.

o     याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळविण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात आले आहे.

o     या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

– अजय जाधव..३.३.२०२०

ताज्या बातम्या

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम-  केंद्रीय कृषीमंत्री...

0
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा कृषीमंत्र्यांनी केला गौरव नागपूर, दि.१८ :  आमचे शेतकरी हे मेहनती आहेत. निसर्गाच्या प्रत्येक आव्हानाला ते धैर्याने तोंड...

पर्यटकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

0
पुणे, दि.१८ : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून...

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. १८: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची...

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

0
यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील...

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप...