गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
Home Blog Page 1619

राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १४ : प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट येथील एक्सप्रेस टॅावर इमारतीत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकसत्ता समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद गोयंका, संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते.

काळ, समाजकारण, राजकारण बदलले तरीसुद्धा गेल्या ७५ वर्षांपासून लोकसत्ताने आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम ठेवल्याबद्दल कौतुक व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात चांगले काम करणाऱ्या विविध संस्थांना पुढे आणण्याचे काम आणि महिला, युवकांसाठी लोकसत्ता समूहामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. राज्याच्या विकासात माध्यमांचे योगदान मोठे आहे. आम्हीही राज्यात लोकसत्ता आणली आहे. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमे करीत असून ही माध्यमे विकासाची वाट दाखविणारे आहेत. त्याचबरोबर राज्य शासन करीत असलेल्या कामांचे मूल्यमापन देखील माध्यमे करीत असतात, असे मत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन असून महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प राबवित असून या प्रकल्पांना गती दिली जात आहे. यात राज्यातील रस्त्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी व्यवस्था उभी करण्यासाठी गेमचेंजर असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत, नागपूर-गोवा महामार्ग, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता प्रस्तावित आहे. याचबरोबर राज्यात मेट्रो प्रकल्प सुरु आहेत. अशा विविध प्रकल्पांमुळे वाहनांची संख्या कमी होऊन पर्यायाने प्रवाशांची वेळेची बचत होईल, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई ही आर्थिक राजधानी असून कोस्टल रोडसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प हाती घेतले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच राज्य शासनाचे ध्येय असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पहिल्यांदाच आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. उद्योगवाढीसाठी नुकतेच दावोस येथे कोट्यवधींचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या उद्योगवाढीला चालना मिळणार आहे. राज्याच्या विकास आणि लोकहितासाठी प्रसारमाध्यमांनी सूचना केल्यास त्यांच्या सूचनांवर राज्य शासनाकडून नक्कीच कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केले.

यावेळी ‘लोकसत्ता वर्षवेध २०२२’ या वार्षिकांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

०००

राष्ट्रीय लोक अदालतीमधून राज्यभरात सुमारे १२ लाख प्रकरणे निकाली

वाहतूक विभागाला ५१ कोटींहून अधिक महसूल

मुंबई, दि. १४ : राज्यभरात दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११.९५ लाख दखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून ७.८० लाख वाहतूक विभागाच्या ई- ट्रॅफीक चलन प्रकरणांमध्ये सुमारे  ५१.२० कोटीं रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व प्रभारी मुख्य न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला, प्रमुख आश्रयदाते, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व न्यायमूर्ती रमेश धानुका, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती, उपसमित्या आणि ३०५ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

लोक अदालतीच्या ५ दिवस आधी घेण्यात आलेल्या विशेष अभियानामध्ये ५५ हजार ६८७ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीततेसाठी न्यायमूर्ती बी. रमेश धानूका, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी लोक अदालतपूर्व बैठका आयोजित करण्यावर भर दिला होता. न्यायमूर्तींच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीपूर्वी अनेक समुपदेशन सत्रे आयोजित करण्यात आली होती. ज्यामुळे पक्षकारांना विरोधी पक्षाशी संवाद साधण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळाली. राज्यभरात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँकांचे वसुलीचे दावे, वैवाहिक प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेले तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली होती. विशेष बाब म्हणजे वैवाहिक वाद प्रकरणामध्ये १०० पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये आपसात तडजोड झाली.

ही राष्ट्रीय लोक अदालत आणि यापूर्वीच्या लोक अदालतीचे प्राप्त यशावरुन असे दिसून येते की, वैकल्पिक वाद निवारण केंद्रासोबत राष्ट्रीय लोक अदालत देखील विवादांचे निराकरण करण्यासाठी योग्य यंत्रणा आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा १९८७ अंतर्गत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झाल्यानंतर उभयतांच्या संमतीने लेखी तडजोड  नोंद केली जाते व त्याआधारे ॲवार्ड पारीत केला जातो. तो ॲवार्ड हा अंतिम असतो व त्याला हुकूमनाम्याचे स्वरुप प्राप्त होते. त्या ॲवार्डच्या विरुद्ध अपीलाची तरतूद नाही. लोक अदालतीमध्ये प्रकरण निकाली निघाल्यावर पक्षकारांना संपूर्ण कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.

मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे एका धनादेश अनादरित प्रलंबित प्रकरणामध्ये दृकश्राव्य माध्यमाद्वारे तडजोड झाली. त्यात या प्रकरणातील एका पक्षकाराने अमेरिकेतून दृकश्राव्य पद्धतीने हजेरी लावली व एक पक्षकार न्यायालयात हजर होते. तसेच एका पुनर्विलोकन अर्जामध्ये (धनादेश अनादरित प्रकरणामध्ये) तडजोड झाली. त्यामधील धनादेशाची रक्कम ही रुपये 200 कोटी एवढी होती.

जळगाव विधी सेवा प्राधिकरणातील एका मोटार अपघात नुकसान भरपाईमध्ये उभय पक्षकाराकडून तडजोड होऊन लोक अदालतीच्या दिवशीच पक्षकाराला नुकसान भरपाई रक्कम रुपये 2.25 कोटी रुपयेचा धनादेश देण्यात आला.

पुढील राष्ट्रीय लोक अदालत ही दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीमध्येही सर्व संबंधित लाभधारकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी केले आहे.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी  – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १४ : राज्यातील विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास,  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  श्री. पाटील म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी कमीत कमी ५०० क्षमतेचे व जास्तीत जास्त १००० विद्यार्थी क्षमतेचे विद्यापीठांच्या परिसरात वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवरची क्षमता लक्षात घेऊन त्या त्या विद्यापीठांनी तातडीने प्रस्ताव तयार करून आदिवासी विकास विभागाकडे  पाठवावा, असे निर्देश संबंधितांना दिले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृह उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देणार – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्न करीत असतो. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जात असतात. तिथे त्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी विद्यापीठाच्या परिसरातच वसतीगृह उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिसर सोडून जावे लांब राहावे लागणार नाही. विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहामध्ये विद्यार्थी व  विद्यार्थीनींसाठी  स्वतंत्र वसतीगृह  असेल. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होईल असेही मंत्री श्री. गावीत यांनी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/शैलजा पाटील/विसंअ/

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

मुंबई, दि. १४ : मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात  आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबिरसिंह बिरा, उपाध्यक्ष जितू शाह, सचिव राजेश ठाकूर, हरबनसिंह यांच्यासह असोसिएशनचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमोर आपले विविध प्रश्न मांडले. टँकरधारकांचे प्रश्न नियमानुसार सोडविण्यात येतील. तथापि, लोकांची होणारी गैरसोय पाहता टँकरधारकांनी पाणीपुरवठा त्वरीत सुरु करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनास अनुसरुन संप मागे घेत असल्याचे तसेच गोरेगाव येथे आजच सर्व टँकरधारकांची बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल, असे असोसिएशनच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, वॉटर टँकर असोसिएशनच्या विविध मागण्या व त्यांना येत असलेल्या अडीअडचणी सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. केंद्र शासनाशी तसेच केंद्रीय भूजल प्राधिकरणाशी संबंधीत मागण्यांबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल. पाण्याचे टँकर अचानक बंद झाल्याने मुंबईत लोकांची मोठी गैरसोय होत आहे. अशा पद्धतीने पाण्यासारख्या मूलभूत गरजेशी संबंधीत बाबीवर लोकांची गैरसोय करणे चुकीचे आहे. त्यामुळे असोसिएशनने तातडीने टँकरचा पाणीपुरवठा सुरु करावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर पालकमंत्री श्री. लोढा आणि असोसिएशनच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जाहीर केले.

०००

इरशाद बागवान/विसंअ/

 

 

भारत रंग महोत्सवास नवी दिल्ली येथे प्रारंभ

नवी दिल्ली, १४ : प्रतिष्ठ‍ित राष्ट्रीय नाटक विद्यालयातंर्गत होणाऱ्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सवा’त दिल्लीसह अन्य शहरांत ६ मराठी नाटके सादर केली जाणार आहेत. दिल्लीत २, नाशिकमध्ये ३ आणि केवडिया येथे १ अशी एकूण सहा शहरांमध्ये नाटके दाखविली जाणार आहेत. महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल, नाटक दिग्दर्शक तथा अभिनेते  राम गोपाल बजाज, अभिनेत्री आणि निर्माता वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाटक विद्यालयाचे संचालक रमेश चंद्र गौर यांच्या उपस्थितीत सायं. ६ वा. कोपर्निकस मार्ग येथील कमानी सभागृहात मुख्य कार्यक्रम सोहळयाचे उद्घाटन झाले. यावर्षी दिल्लीसह अन्य दहा शहरांत ‘भारत रंग महोत्सव’ साजरा होत आहे.

दिल्ली येथे रविवार १९ फेब्रुवारीला सांयकाळी ६ वा. ‘शब्दांची रोजनिशी’  हे नाटक सादर केले जाईल. गुरूवारी  २३ फेब्रुवारीला सांयकाळी ६.३० वाजता ‘मराठी कर्ण’ (दशावतार) हे नाटक सादर केले जाईल. ही दोन्ही नाटके कमानी सभागृहात सादर होतील.

नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने महाकवी कालीदास कलामंदीर सभागृह येथे  १८, २० तसेच २३ फेब्रुवारीला ‘संगीत मत्स्यगंध’, ‘विश्वामित्र’, ‘संगीत सुवर्णतुला’ ही नाटके सादर केली जाणार आहेत. केवडिया येथे गुजरात स्टेट संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने एकता सभागृहात २३ फेब्रुवारीला ‘तेरव’ हे नाटक सादर होणार आहे. महाराष्ट्रातील हिंदी नाट्य संस्थांची नाटकेही दिल्लीसह अन्य शहरांत सादर केली जाणार आहेत.

०००

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात जागतिक बाल कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं ७.३० वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल :

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक बाल कर्करोग दिवस’ म्हणून पाळला जातो. कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता यावी, तसेच वेळीच या आजाराला प्रतिबंध घालता यावा, हा जागतिक बाल कर्करोग दिवस पाळण्यामागचा मुख्य उद्देश आहे. बाल कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती टाटा मेमोरियल सेंटरचे अधिष्ठाता व कॅन्सर तज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

 

 

‘त्या’ १६९ कुटुंबाना मिळणार हक्काचा निवारा; घुग्घुस भूस्खलन बाधित कुटुंबियांना पालकमंत्र्यांचा दिलासा

जागा उपलब्ध करुन देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

चंद्रपूर, दि. 14 : घुग्घुस येथील आमराई वॉर्डात मागील वर्षी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे दिलासा मिळणार आहे. बाधित कुटुंबीयांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात याव्या, अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

26 ऑगस्ट 2022 मध्ये घुग्घुस येथील आमराई वॉर्डात भूस्खलनाची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरातील कोळसा खाणीमुळे या परिसरातील अनेक घरांना भुस्खलनाचा धोका कायम राहत असल्यामुळे 169 कुटुंबे इतरत्र स्थलांतरित करण्यात आली होती. आता या कुटुंबाना हक्काचा निवारा मिळण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून सदर कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांना दिल्या आहे.

घुग्घुस येथील भूस्खलन पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनाचा आढावा पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृह येथे घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी मरुगनांथम एम., माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे आदी उपस्थित होते.

गत सहा महिन्यात पीडित कुटुंबियांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करण्यात आली असली तरी घरभाड्याकरीता देण्यात आलेली रक्कम संपली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांची घर भाड्याची रक्कम वेकोलीने सदर कुटुंबियांना त्वरित द्यावी. रक्कम देण्यास टाळाटाळ केली तर प्रशासनाने कंपनीचे काम त्वरीत बंद करावे. तसेच 169 पीडित कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासनाने घरासाठी जागा निश्चित करून त्या ले-आऊट मध्ये रस्ता, वीज, पाणी आदींची सुविधा उपलब्ध करून देणे. त्या 169 कुटुंबाची आदर्श नगरी तयार होईल, याबाबत नियोजन करावे. विशेष म्हणजे यापैकी किती कुटुंब रमाई आवास, शबरी आवास, महाप्रीत योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल योजनेसाठी पात्र आहेत, ते तपासावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

यापूर्वी घटना घडल्यानंतर आठ दिवसांच्या आत पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रती कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तुंची किट देण्यात आली होती.

बैठकीला निरीक्षण तांड्रा, संतोष नुने तुळशीदास धवस, श्रीकांत सावे, श्रीमती कारले, शिला उईके, माया चटकी, साधना कांबळे व पिडीत कुटुंबाचे सदस्य उपस्थित होते.

0000000

शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण यंत्रणा

चंद्रपूर, दि. 14 : शासकीय कार्यालयातील प्रलंबित अर्ज व तक्रारींच्या आधारे कार्यालयाची गुणवत्ता निश्चित होण्यासाठी तसेच नागरिकांना शासनाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण होण्याकरिता व तक्रारीचे जलद गतीने, सोयीस्कर व प्रभावी निवारण करण्याकरिता ‘वंदे मातरम‌् चांदा’ तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तक्रार नोंदविण्याकरीता टोल फ्री क्रमांक आणि पोर्टल या दोन्ही बाबींचे 15 फेब्रुवारी 2023 रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी नियोजन सभागृह येथे आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक रविंद्र परदेसी, उपविभागीय अधिकारी मरुगनांथम एम., जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महिनाभरात कोणत्या विभागाशी संबंधित कशा प्रकारच्या तक्रारी येतात, त्याची पडताळणी करावी. या यंत्रणेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व टीमला संवेदनशील राहणे आवश्यक आहे. जो विभाग वेगाने समस्यांचे निराकरण करेल, त्या विभागाचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे, यासारखे उपक्रम राबविल्यास इतरही विभागांना चालना मिळेल. सदर यंत्रणा सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात विश्लेषण करा. तक्रारींचे स्वरूप काय आहे, ते तपासा. तक्रारी विविध प्रकारच्या येऊ शकतात, त्याचे निराकरण संवेदनशीलपणे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काय आहे ‘वंदे मातरम चांदा’ तक्रार प्रणाली : ही प्रणाली जिल्ह्यातील नागरिक व प्रशासन यामधील दुवा सारखे काम करेल. ‘वंदे मातरम चांदा’ ही स्मार्ट ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तयार केली असून, या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली येणार आहे. सदर व्यासपीठ लोकाभिमुख प्रशासनाच्या बाजूने काम करेल आणि शासन यंत्रणेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करेल. वंदे मातरम चांदा ही तक्रार दाखल करण्याची योजना असून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थेट देखरेखीखाली असणार आहे.

तक्रार नोंदवण्यासाठी 1800-233-8691 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सदर टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. सदर तक्रारीची नोंद झाल्यानंतर तक्रार कर्त्यास त्याच्या मोबाईल नंबरवर एसएमएस द्वारे टोकन नंबर मिळेल. या टोकन नंबर द्वारे केलेल्या तक्रारीबाबत सद्यस्थितीची माहिती मिळू शकेल.

टोल फ्री क्रमांकावरील प्राप्त तक्रारी vandemataramchanda.in या संकेतस्थळावर नोंदवली जाईल व संबंधित विभागात पुढील कार्यवाही पाठविली जाईल. तक्रारीची नोंद झाल्यावर सदर संकेतस्थळावर टोकन नंबरचा वापर करून तक्रारकर्त्यास आपल्या तक्रारीची सद्यस्थिती व विभागाकडून झालेल्या कार्यवाहीबाबतची माहिती मिळेल. तक्रारकर्ते टोल फ्री नंबर व्यतिरिक्त vandemataramchanda.in या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपली तक्रार नोंदवू शकतात.

तक्रारकर्त्यास जर विभागाचे उत्तर असमाधानकारक वाटल्यास तक्रारकर्ते टोल फ्री क्रमांक वर कॉल करून असमाधानी असल्याचे सांगितले तर ती तक्रार संबंधित विभागाला पुन्हा पाठविण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.

००००००

मंत्रिमंडळ निर्णय

शालेय शिक्षण विभाग

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणार

            राज्यात १० वी व १२ वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला.  प्रारंभी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात सादरीकरण केले.

या अभियानात राज्याचा “नोडल अधिकारी” म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच “समन्वयक अधिकारी” म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच “कॉपीमुक्त अभियान”राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,  मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे असे ठरले.

जनजागृती मोहिम शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करणे. माध्यमांद्वारे शाळा आणि पालकांशी संवाद साधणे यातून जनजागृती करण्यात येणार आहे.

पोलीस बंदोबस्त- याशिवाय पोलीस बंदोबस्तावरही भर देण्यात येणार आहे. ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात यावे. कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात यावेत. ५० मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत.

—–०—–

शालेय शिक्षण विभाग

राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार

            राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येईल.

पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे.  या करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० राज्यात लागू करण्यात येईल. पीएम श्री योजनेत केंद्राचा ६० टक्के हिस्सा असेल.  प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात येईल.  या शाळांसाठी ५ वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा ९५५ कोटी ९८ लाख राहणार असून राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रती शाळा ७५ लाख प्रमाणे ६३४ कोटी ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएम श्री शाळांची निवड केली जाईल.

या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मुल्यांकन करण्यात येईल.  या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येईल. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल.

या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील ६ प्रमुख आधार स्तंभांवर केला जाईल. अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र व मुल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा; मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व; समावेशक पद्धती आणि लाभार्थी समाधान; व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन.

या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावरून शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि महापालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांमार्फत केली जाईल. राज्य प्रकल्प संचालक हे राज्य अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.

—–०—–

                                                       अन्न व नागरी पुरवठा विभाग

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम

१ हजार कोटी रुपये खर्चास मान्यता

            राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी रुपये इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना होईल.

या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती.  २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.  ही रक्कम २ हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.

मागील म्हणजे २०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धान खरेदी झाली होती.  पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती.  या पूर्वीच्या खरीप हंगामामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे. मात्र ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या.  ज्या शेतकऱ्यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले.  तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

यंदा २०२२-२३ योजनेकरिता सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.

—–०—–

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता

            महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्याचा त्याचप्रमाणे मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासाठीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे असतील. या प्राधिकरणात भाप्रसे दर्जाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य सह संचालक दर्जाचा जनरल मॅनेजर, सह सचिव दर्जाचा जनरल मॅनेजर, उपसंचालक दर्जाचे असिस्टंट जनरल मॅनेंजर (तांत्रिक) तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण १४  पदे असतील.

प्राधिकरणाच्या स्तरावर कंत्राटी पद्धतीने कंत्राटी कर्मचारी देखील नेमण्यात येतील. ज्या बाबींची खरेदी करायची आहे त्याला एकत्रितरित्या प्रशासकीय विभागाच्या स्तरावर मान्यता देण्यात येऊन निधी उपलब्धतेनुसार खरेदी करण्यात येईल व संबंधित आरोग्य संस्थांना मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येईल.  हे प्राधिकरण सुरु करण्यासाठी ६५ कोटी १९ लाख ५८ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

—–०—–

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

तंत्रशास्त्र, तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरू निवड पद्धतीत सुधारणा

            रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि पुणे येथील महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवड पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार या विद्यापीठांच्या अधिनियमात सुधारणा करण्यात येईल.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय व महाधिवक्ता यांच्या अभिप्रायानुसार विविध अकृषि विद्यापीठांमधील कुलगुरु पदांच्या निवडीच्या पद्धतीत यापूर्वीच बदल करण्यात आले आहेत.  त्यानुसार लोणेरे आणि पुणे येथील तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवड पद्धतीत सुधारणा करण्यात येईल.

—–०—–

जलसंपदा विभाग

पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार

            विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देण्यासाठी सुमारे ७८७ कोटी रुपये सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयामुळे वाशिम तालुक्यातील ५ हजार ५५४ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर असे एकूण ७ हजार ६९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाची साठवणूक क्षमता ३३.२७ दलघमी इतकी असून २६.३४ दलघमी इतका उपयुक्त पाणी साठा आहे.

—–०—–

विविध विकास आराखड्यांचा आढावा

कामांना अधिक गती देण्याच्या सूचना

            पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखड्यांचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले.  यावेळी या कामांना अधिक गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

—–०—–

राज्यपालांचा अभिनंदन ठराव

            राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा ठराव मांडला. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करण्यात आले.

—–०—–

 

अपस्मार व्यवस्थापनासाठी योग, फिजिओथेरपीची मदत घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. १४ : ‘अपस्मार किंवा आकडी येणे ही गंभीर समस्या असून योग्य औषधोपचाराने त्यावर मात करता येते. अपस्मार व्यवस्थापनासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांनाकडून वेळीच उपचार करून घ्यावे तसेच त्यासाठी योग व फिजिओथेरपीची देखील मदत घ्यावी,’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

आंतरराष्ट्रीय अपस्मार दिनाचे औचित्य साधून एपिलेप्सी फाउंडेशन या संस्थेने राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मदतीने राज्यभर घेतलेल्या १०० अपस्मार शिबिरांची माहिती देणाऱ्या एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रकाशन सोहळ्याला खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री छगन भुजबळ, एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ मज्जाविकार तज्ज्ञ डॉ. निर्मल सूर्या, चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा, फाउंडेशनचे विश्वस्त यांसह अपस्मारग्रस्त व्यक्ती व लहान मुले उपस्थित होते. अपस्मार या आजारावर जनजागृती करण्याच्या हेतूने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आंतरराष्ट्रीय अपस्मार दिवसाचे आयोजन करण्यात येते.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन अपस्मार रुग्णांसाठी सर्वंकष तपासणी व शिबिरे आयोजित करून तसेच रुग्णांवर मोफत औषधोपचार करून एपिलेप्सी फाउंडेशन दैवी कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. आगामी पाच वर्षात फाउंडेशनने सध्याच्या दुप्पट अपस्मार रुग्णांना सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. एपिलेप्सी फाउंडेशने त्यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर न्यावे व त्या माध्यमातून देशातील अपस्माराच्या अधिकाधिक रुग्णांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.

ज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळीच उपचार घ्यावे

अपस्माराचा झटका (फिट) आलेल्या रुग्णाला कांदा किंवा चामड्याची चप्पल सुंगवणे अज्ञानमूलक असून रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळीच योग्य औषधोपचार घेतले पाहिजे असे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. डॉ. निर्मल सूर्या यांनी अपस्मार रोगनिदान व उपचारासाठी सिंधुदुर्ग ते गोंदिया – गडचिरोली येथपर्यंत केलेले वैद्यकीय सेवाकार्य मौलिक असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

१०० मोफत शिबिरांमधून ३४००० रुग्णांवर उपचार

जगाच्या लोकसंख्येपैकी ५ कोटी लोकांना अपस्माराचा त्रास असून भारतात अपस्मारीचे १.३० कोटी रुग्ण आहेत तर महाराष्ट्रामध्ये ११ लाख रुग्ण आहेत. योग्य औषधोपचाराने यापैकी ७० ते ८० टक्के लोक बरे होऊ शकतात असे एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या यांनी सांगितले. राज्यात फाउंडेशनने आरोग्य राष्ट्रीय अभियानाच्या सहकार्याने घेतलेल्या १०० शिबिरांमधून ३४००० रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांचा सन्मान

राज्यपालांच्या हस्ते यावेळी अपस्मार व्यवस्थापन व रुग्ण सेवा क्षेत्रातील सहकार्याबद्दल माजी केंद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळ, डॉ. निर्मल सूर्या, आनंद राठी, डॉ. नरेंद्र मेहता, बापूजी सावंत, डॉ. गायत्री हट्टंगडी, डॉ. आरती शर्मा, नाझिया अन्सारी, हेमंत कुलकर्णी, राहुल आमडस्कर, डॉ. अशोक थोरात व डॉ. नवीन सूर्या यांना सन्मानित करण्यात आले. अपस्मारग्रस्त लहान मुलांनी यावेळी राज्यपालांना स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू दिल्या.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र शासनाचे २०, २१, २९ व ३० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे...

0
महाराष्ट्र शासनाचे २० वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाच्या २० वर्षे मुदतीच्या १००० कोटींच्या ‘७.१४ टक्केमहाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०४५’ च्या ( दि.९ जुलै २०२५ रोजी उभारलेल्या)रोख्यांची...

पोलीस ठाण्यांमधील कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसाठी किमान वेतनाबाबत कार्यवाही करावी – गृह राज्यमंत्री योगेश...

0
मुंबई, दि. ७: राज्यातील पोलिस ठाण्यांमधील आस्थापनेवर कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसंदर्भात २७ जानेवारी २०१७ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार किमान वेतनाबाबत...

‘मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड’या योजनेंतर्गत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणार

0
मुंबई, दि.५ : महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ मध्ये "मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड"योजना राबविण्यात येणार आहे.विविध तंत्रशिक्षण प्राप्त ३० लाख युवक-युवतींची...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयातील ‘उमेद’ विशेष विक्री प्रदर्शनाला भेट

0
मुंबई, दि. ७ : ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण आणि उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मंत्रालयातील त्रिमूर्ती...

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

0
मुंबई, दि. 7 : ‘इतिहासाचे विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. ‘खालिद का शिवाजी’...