शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1558

एकत्रितपणे करूया जलसंकटावर मात

पाणी शाश्वत विकासाचा केंद्रबिंदू आहे. सामाजिक-आर्थिक विकास, ऊर्जा आणि अन्न उत्पादन, निरोगी परिसंस्था आणि मानवी जगण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. पाणी समाज आणि पर्यावरण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते, हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्यादृष्टीनेदेखील पाण्याला महत्त्व आहे.

प्रत्येक व्यक्तीला पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणी उपलब्ध होणे हे त्याच्या हक्काशीही निगडीत आहे. वाढत्या जागतिक लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध घटकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जल व्यवस्थापनावर भर देण्याची गरज वाढते आहे. त्यासोबतच मानवी आरोग्याच्यादृष्टीनेदेखील यावर विचार होणे आवश्यक आहे.

दरवर्षी अशुद्ध पाणी, सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव आणि अस्वच्छतेमुळे सुमारे 14 लक्ष व्यक्ती आपला जीव गमावतात आणि  7 कोटी 40 लक्ष व्यक्तींचे आरोग्यही धोक्यात येते. युनिसेफच्या अहवालानुसार जगातील एक चतुर्थांश जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. दरवर्षी दूषित पाण्यामुळे 2 लक्ष 97 हजार बालकांचा मृत्यू होतेा. ही आकडेवरील लक्षात शुद्ध पाण्याचे महत्त्व लक्षात येईल.

बिघडलेल्या जलचक्रामुळे आरोग्यापासून उपासमारीपर्यंत, लैंगिक समानता ते नोकऱ्यांपर्यंत, शिक्षणापासून उद्योगापर्यंत आणि आपत्ती व्यवस्थापनासारख्या सर्व प्रमुख जागतिक समस्या सोडविण्यात अडथळे निर्माण होतात. 2050 पर्यंत जगात पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. म्हणून प्रत्येकाने जलचबचतीच्या संदर्भात आपापल्या स्तरावर आतापासूनच कृती करणे आवश्यक आहे.

पाणी आणि स्वच्छता ही जीवनाची पूर्वअट आणि प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे. शाश्वत विकासासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. येत्या काही वर्षांत, पाण्याशी संबंधित आपली आव्हाने अधिक तीव्र होतील. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची वाढती मागणी आणि वेगाने विकसित होत असलेली जागतिक अर्थव्यवस्था आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे घरगुती वापरासाठी आणि इतरही उपयोगासाठी पाण्याचा अभाव वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते यामुळे भविष्यात सामाजिक-आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

पाण्याशी संबंधित आव्हानांना तोंड देण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी, संयुक्त राष्ट्र महासभेने ‘शाश्वत विकासासाठी पाणी’ या विषयाबाबत 2018-2028 हे आंतरराष्ट्रीय कृती दशक  म्हणून घोषित केले आहे.

पाण्याशी संबंधित सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जलस्रोतांच्या शाश्वत विकासावर आणि एकात्मिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सोबतच समाजातील सर्व घटकांचा सहभाग निश्चित केल्यास पाण्याचा सुयोग्य वापर निश्चित करता येईल.

आपण काय करू शकतो

पाण्याचा सुयोग्य वापराचा विचार समाजातील प्रत्येक स्तरावर झाल्यास या जागतिक समस्येवर मात करणे शक्य आहे. घरगुती किंवा उद्योग क्षेत्रातील पाण्याच्या वापरात बचत करणे हे पहिले पाऊल ठरू शकेल. त्यासोबत मोठ्या गृह निर्माण संस्था, उद्योग, मोठी रुग्णालये आदींनी सांडपाण्यावर प्रक्रीया करण्याची स्वत:ची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. दूषित पाण्यामुळे जलस्त्रोत आणि भूजल दूषित होत असल्याने एकूणच पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे.

हवामानाचा लहरीपणा आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता जलसंधारणही महत्त्वाचे आहे. नदी-नाल्यातून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी जमिनीवर पडते तिथेच अडविण्याचे व जिरविण्याचे प्रयत्न झाल्यास भूजलाची पातही वाढण्यासोबत शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होईल. जलयुक्त शिवार 2.0 आणि शासनाची शेततळे योजना यासाठीच आहे. गावतपातळीवर उतारावरील पाणी लहान बंधाऱ्याच्या माध्यमातून अडविल्यास विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होऊ शकेल.

शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांचाही जलसंधारणातील सहभाग महत्त्वाचा आहे. पाण्याचे स्त्रोत निर्माण होण्यासोबत जलसाक्षर पिढी घडविण्यासाठी हा सहभाग उपयुक्त ठरू शकेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जलवाहिन्यांमधील गळती रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्यास शुद्ध पाण्याचा सुयोग्य वापर होण्यास मदत होईल. सर्वांनी मिळून ‘प्रत्येक थेंब अडवूया’ हे घोषवाक्य आपल्या पुढील कृतियोजनेचे उद्दिष्ट म्हणून स्वीकारल्यास पाण्याच्या संकटावर मात करणे सहज शक्य आहे आणि तरच शुद्ध पाणी व स्वच्छता सुविधेच्या आधारे आपले निरोगी आणि सुरक्षित भविष्य घडविणे शक्य आहे.

1993 पासून दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून जल आणि स्वच्छताविषयक जागरूकता वाढविण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक जलसंकटावर मात करण्याबाबत विचारमंथन या दिवसाच्या निमित्ताने होत असते. यूएन-वॉटरद्वारे या दिवसाचे आयोजन केले जाते.

जंगलाला लागलेली आग विझविण्यासाठी आपल्या चोचीने एक-एक थेंब पाणी टाकणाऱ्या चिमणीच्या गोष्टीवर आधारीत ‘अपेक्षित असणारा बदल तुम्ही  घडवा’ अशी संकल्पना घेऊन यावर्षीचा जागतिक जल दिन साजरा होत आहे. अर्थात पाण्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.

डॉ.किरण मोघे,

जिल्हा माहिती कार्यालय पुणे

मी नदी बोलतेय..!

आज जागतिक जल दिन…. म्हटलं बोलावं आपल्या लेकरांशी…. तुम्ही माझ्याकडे पहात नसला तरी माझ्या दोन्ही तटावर वाढताना, अंगाखांद्यावर खेळताना तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांनाही मी पाहिलंय, त्याचा आनंदही वेळोवळी घेतलाय. म्हणून तुम्ही विसरलात तरी मला तुमच्यापासून दूर कसं होता येईल? म्हणून म्हटलं बोलावं… काय, मी कोण असे विचारता? तेच तर माझं दु:ख आहे…. जवळ असूनही तुम्ही दूर आहात…. असू देत…. तर मी आहे तुमची नदी!

आज मला नदी म्हणतानाही तुम्हाला लाज वाटते. ही अवस्था कोणामुळे झाली हा विचार तरी केलाय? पूर्वी स्वच्छ व निर्मळ प्रवाह मिरवताना, स्वच्छंदीपणे वाहताना एक वेगळाच आनंद होता. त्यातून तुम्हालाही आनंद मिळायचा. लहान मुले माझ्या प्रवाहात डुंबण्यासाठी यायची. गुर-ढोरे तहान भागवायची. तहानलेला शेतकरी राजा माझी धार ओंजळीत घेऊन ओठाला लावायचा तेव्हा काय सुख व्हायचं सांगू…!

कपडे धुण्यासाठी बाया-पोरी यायच्या त्याचंही कधी वाईट वाटलं नाही मला. सगळी घाण पोटात घेऊन मी गावागावातून जात अनेकांचे पोषण केले, तहान भागवली, शेत फुलविले. किनाऱ्यावर असलेल्या तीर्थक्षेत्री  भरलेला भाविकांचा मेळा किंवा गावाची यात्रा पाहताना डोळ्याचं पारणं फिटायचं. भाविकही श्रद्धेने पावन होण्यासाठी माझ्या भेटीला यायचे तेव्हा देव भेटल्याचा आनंद मलाही व्हायचा.

काळ बदलला, माझं पाणी नवजीवन देणारं असल्याने किनाऱ्यावर वस्ती वाढू लागली. गावाचं शहर झालं, लोकसंख्या वाढली, व्यवसाय-उद्योग सगळं वाढलं. माझं पात्र मात्र आकुंचित झालं. माझा प्रवाह गरजेपोटी ठिकठिकाणी रोखला जाऊ लागला. तरीही माझी तक्रार नव्हतीच. शेवटी माझं वाहणं तुमच्यासाठीच होतं. पण शहरीकरणानंतर माझ्या प्रवाहात सांडपाणी, कचरा टाकला जाऊ लागला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. प्लास्टिक, पुजा साहित्य, खाद्यपदार्थ, कपडे, काचेच्या बाटल्या सर्व माझ्या पात्रात टाकलंत! दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत गेलं.

सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी मला अडवले गेले तरीही पुढच्या गावांना तृप्त करण्यासाठी मी थांबले नाही. माणूस जेव्हा स्वार्थाने माझ्या पात्रातही स्वत:चा हक्क सांगतो तेव्हा खूप दु:ख होते. पावसाळ्यात निसर्गापुढे माझेही चालत नाही आणि माझ्या वेगवान प्रवाहात जेव्हा अशांची वाताहत होते तेव्हा किती वाईट वाटतं कोणाला सांगू? निसर्गावर तुम्ही आक्रमण करू शकतात, मी मात्र निसर्ग नियमांशीच कायमची बांधली गेली आहे.

आज मला तुम्ही नदी म्हणूनही संबोधत नाही, गटारगंगा म्हणून हिणवतात. यात माझी काय चूक?  हे सर्व कशामुळे झालेय याचा विचार तरी कधी केलात? मी तर तुम्हा सगळ्यांना सुखावत समुद्राला जाऊन मिळण्यासाठीच पृथ्वीतलावर आले. अशी दूषित धारा घेऊन समुद्रात जाताना मला कसा आनंद होईल? म्हणून आजचा दिवस निवडला तुमच्याशी बोलायला. तुम्ही जल दिन साजरा करीत आहात ना!

आज तुम्ही जलबचतीची, शुद्धतेची प्रतिज्ञा केली असेल. चांगली गोष्ट आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या भविष्यासाठी तेच गरजेचे आहे. माझ्या अस्तित्वापेक्षा तुमच्या अस्तित्वासाठी माझं जगणं महत्त्वाचं आहे. पाण्याला उगाच जीवन म्हणत नाही. पिण्यासाठी, शेती फुलविण्यासाठी, उद्योगासाठी, विज्ञानाच्या प्रयोगासाठी, पृथ्वीवरील सजिवांसाठी पाणी गरजेचे आहे.

माझ्यामुळे परिसरातील भूजलाची पातळीही वाढते. पृथ्वीवरील एकूण गोड्या पाण्यापैकी अंदाजे ९९ टक्के भूजल आहे. एकूण वापराच्या अर्ध्या भूजलाचा उपसा घरगुती वापरासाठी केला जातो.  तर २५ टक्के भूजल सिंचनासाठी वापरले जाते. भूजलाचे महत्व योग्यरितीने न जाणल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. भूजलाचा अतिवापर, ते दूषित करणे, त्याचे अतिशोषण यामुळे संपूर्ण जलचक्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मानवी जीवनासाठी ते निश्चितपणे योग्य नाही. म्हणून तुम्हाला सावध करते आहे.

मर्यादित संसाधने आणि अमर्याद गरजा असल्या की टंचाईची स्थिती येते. पाण्याची उपलब्धता आहे म्हणून अमर्याद उपयोग अशाच टंचाईच्या स्थितीला निर्माण करणारा आहे. जगात ८० टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रीया न करता पर्यावरण साखळीत मिसळते. शुद्ध जलस्त्रोताचे अधिक शोषण न करता सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे पाण्याचा पुर्नउपयोग न केल्यास २०३० पर्यंत जगाला ४० टक्के पाण्याची कमतरता भासू शकते. म्हणून घाण पाणी माझ्या पात्रात सोडण्याऐवजी त्यावर प्रक्रीया करून ते उपयोगात आणा.

तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, आतातरी जागे व्हा. मला जाणून घ्या. माझ्या संवर्धनासाठी पुढे या असे म्हणणार नाही, तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्या जीवनासाठी पुढे या! महाराष्ट्र शासनाने ‘चला जाणूया नदीला’ हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे आणि हेच लक्षात घेऊन राज्यातील ७५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुमचा सहभाग मिळाला तरच हा उपक्रम यशस्वी होणार आहे.

महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या पूर आणि दुष्काळ या समस्यांपासून मुक्तीसाठी नदीशी संवाद साधणे गरजेचे आहे. माझ्याबद्दल माहिती, तटावरील जैवविविधता, माझ्या समस्या जाणून घेतल्या तर भविष्यात तुमचे जीवन समृद्ध करण्यासाठी मला निर्मळ प्रवाहाने वाहता  येईल. म्हणून संवाद साधूया!

बरेच दिवस अस्वस्थ होते, म्हणून खूप बोलले. याला रागावणे समजू नका. आईची हाक समजा. तुमच्या गावातली एकच नदी आहे. तीच लुप्त झाली तर तुमच्या भविष्याचे काय?… म्हणून चिंता वाटते. माझ्या इतर भगिनींचीही हीच स्थिती आहे. तेव्हा विचार करा, शेवटी माझ्या अंताची चिंता नाही, माझ्या लेकरांचं काय हाच विचार सारखा मनाला अस्वस्थ करतो. वाहणे आणि पुढे जाणे माझा धर्म आहे, तशी मी जाणार. माझा प्रवाह तुम्हाला सुखावणारा असावा म्हणून मला जाणून घ्या एवढेच…!

– तुमची नदी

 

शब्दांकन – डॉ. किरण मोघे,

जिल्हा माहिती अधिकारी पुणे

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

 नाशिक दि.21 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर व रानवड येथील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष व पिकांच्या झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून घेण्याच्या सूचनाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित कृषि अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी  शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा करून झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेद्वारे सकारात्मक निर्णय त्वरीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिली.

या पाहणी दौऱ्यात कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसिलदार शरद घोरपडे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब  गागरे यांच्यासह  संबधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

000

गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २१ : मराठी नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त करतानाच या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, गुढीपाडवा फक्त नव्या वर्षाचे स्वागत नाही तर नव्या संकल्पांचा सण आहे. नव्या विचारांची, नव्या कृतीची आणि नव्या स्फूर्तीची ऊर्जा देणारा सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढी उभारून या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. चैत्र महिन्यापासून निसर्गात होणाऱ्या चैतन्यदायी परिवर्तनाच्या स्वागताचाही उद्देश या उत्सवामागे आहे. आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या कल्याणाची भावना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. शेतकरी हिताचे निर्णय शासन घेत असून या कठीण काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे.

000000

नवीन ‘वस्त्रोद्योग धोरण’ आणण्याचा प्रयत्न करणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 21 : नवीन वस्त्रोद्योग धोरण तयार करण्याबाबत एक समिती नेमण्यात आली असून समितीच्या बैठकादेखील झाल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन वस्त्रोद्योग धोरण आणण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशन काळात नवीन वस्त्रोद्योग धोरण आले नाही तर पूर्वीच्या धोरणाला मुदतवाढ देण्यात येईल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर नगरविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागावर चर्चा झाली.

यावर वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, मंत्री संजय राठोड, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तरे दिली.

उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, नाफेडची हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. काही केंद्राच्या अनियमिततेबाबत तक्रारी आल्या होत्या ते केंद्र वगळून इतर ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू असल्याची माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

मंत्री संजय राठोड म्हणाले, संविधान भवनाची रचना राज्यात एक सारखी असावी. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासोबत बैठक घेऊन त्यासंदर्भात अंतिम आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सहकार मंत्री अतुल सावे यांनी सहकार विभागाकडून अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची माहिती दिली.

मंत्री उदय सामंत म्हणाले, नगरविकास विभागाच्या संदर्भात सदस्यांनी केलेल्या सूचनांची शासनाने नोंद घेतली आहे. नगर विकास विभागाकडून अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची माहिती त्यांनी यावेळी दिली.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

विविधतेचा आदर करून मानवतेला सर्वोच्च मानू

नागपूर,  दि. 21 –  जी-20 अंतर्गत झालेल्या सी -20 प्रारंभिक बैठकीचा शानदार समारोप शहरात झाला. या बैठकीमध्ये झालेल्या विचारमंथनातून निघालेले प्रस्ताव पुढील शिखर बैठकीत ठेवले जाणार आहेत. या बैठकीमध्ये जगभरातील विविधतेचा आदर करण्याचा आणि मानवतेला सर्वोच्च मानून सामान्य माणसाच्या आयुष्यात शाश्वत बदल करण्यासाठी नागरी संस्थांनी वाटचाल करावी, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. मान्यवरांच्या मार्गदर्शनात या दोन दिवसीय बैठकीचा नागपुरच्या आदरातिथ्याचे कौतुक करीत समारोप करण्यात आला.

नागपूरमध्ये 20 व 21 मार्च रोजी जी- 20 अंतर्गत सी-20 च्या प्रारंभिक बैठकीचे स्थानिक रॅडिसन ब्लू हॅाटेल येथे आयोजन करण्यात आले होते. विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत स्थानिक सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या या जागतिक स्तरावरील बैठकीच्या समारोप सत्राला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, सी -20 परिषदेच्या उदघाटक माता अमृतानंदमयी, जी-20 चे शेरपा तथा भारताचे माजी राजदूत विजय नांबियार, जी-20 चे शेरपा तसेच विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर, सी-20 सचिवालयाचे संरक्षक डॅा. विनय सहस्त्रबुद्धे, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्यासह नागरी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विजय नांबियार यांनी सी-२० परिषदेत पार पडलेले विविध परिसंवाद व विविध समित्यांमधील विषयांचा संक्षिप्त आढावा घेतला. दोन दिवसात एकूण चार परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरणासोबत विकासाचा समतोल राखणे, नागरी संस्था व्यवस्थापन आणि मानवी मुल्यांना प्रोत्साहन, मानव विकासामध्ये नागरी संस्थांची भूमिका, अभिनवता आणि तंत्रज्ञानाचे प्रवर्तक म्हणून नागरी संस्थांची भूमिका या चार विषयांचा समावेश होता. देश विदेशातील तज्ज्ञांनी या विषयांवर विचारमंथन केले. या विचारमंथनातून तयार झालेल्या प्रस्तावांची मांडणी पुढील बैठकीत केली जाणार आहे.

शेरपा अभय ठाकूर यांनी भौगोलिकदृष्ट्या नागपूर शहराचे स्थान व येथील उत्तम पायाभूत सुविधांमुळे  सी-२० परिषदेचे या शहरातील आयोजन औचित्यपूर्ण  ठरल्याचे सांगितले. जयपूर येथे ३१ जुलै २०२३ रोजी पार पडणाऱ्या सी-२० च्या शिखर परिषदेत नागपुरातील परिषदेतील मंथनातून आलेले विषय अंतर्भूत होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवेदिता भिडे यांनी अध्यात्म ही संकल्पना व्यापक असल्याचे सांगून सर्व समाज घटक एक असल्याची मूळ भावना अध्यात्माचा गाभा असल्याचे सांगितले. सी-२० चे धोरण ठरवतांना जागतिक स्तरावर दीर्घकाळ उपयोगी ठरतील आणि  पूर्णतः मानवतेच्या हिताचे असेच विषय अंतर्भूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक यंत्रणा निर्माण करणे उद्याच्या पर्यावरणपूरक जगासाठी आवश्यक असल्याचे सोदाहरण सांगितले. शेतीला आता केवळ अन्नधान्य पुरवठा करणारे कोठार न समजता ऊर्जास्त्रोत तयार करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच 2070 पूर्वी भारताला कार्बनमुक्त देश करणार असल्याचे सांगितले.

मुल्यांवर आधारित भारतीय कुटुंबरचना व त्यातून वसुधैव कुटुंबकम भूमिका साकारताना समतोल विकासाचे आर्थिक आणि सामाजिक विकासाचे धोरण अवलंबवावे लागेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या मार्गदर्शनात जगातील गतीने विकसित होणारी अर्थसत्ता म्हणून भारत पुढे येत आहे. मात्र, ही वाटचाल सुरू असताना आमची सामाजिक वाटचाल ही मुल्याधारित, आर्थिकदृष्टया सक्षम, पर्यावरणपूरक व निसर्गाशी एकरूप असणारी अशी असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूर हे शहर परिवर्तनाची आणि नागरी संस्थांच्या चळवळींची भूमी असल्याचे स्पष्ट करताना नागपुरवरून जाताना भारताचे हृदय असणा-या संत्रानगरीतील गेल्या दोन दिवसातील आठवणी घेऊन जा, अशी भावनिक साद घातली.

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी अध्यक्षीय समारोपात नागरी संस्था समोरील तंत्रज्ञान आणि स्थानिक प्रशासनाच्या आवाहनांचा आढावा घेतला. नागपुरातील सी-२० परिषदेत चर्चिल्या गेलेल्या विविध विषयांवरील महत्वाच्या बिंदूवरही लक्ष वेधले. नागपुरातून जाताना अनेक सुखद आठवणी देश विदेशातील पाहुणे घेऊन जात असल्याचे ते म्हणाले. सोबतच नागपुरातील पाहुणचारासाठी व आयोजनासाठी त्यांनी स्थानिक नागरी संस्था, आयोजक आणि प्रशासनाचे आभार मानले.

एक जग, एक कुटुंब, एक भविष्य या मान्यतेवर पुढील काळात वाटचाल करणार आहोत. तथापि हे धोरण ठरविताना जगाच्या विविधतेचा आदर करताना मानवतेला सर्वोच्च स्थान देण्यात यावे. मानवतेसाठी राग, द्वेष दूर करून सौहार्द निर्माण करण्यासाठी परस्परांशी कुटुंबाप्रमाणे जोडले जाणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत  मानवतेला धोका निर्माण होणार नाही. प्रत्येकाच्या सांस्कृतिक वारशावर तेथील आर्थिक उन्नती अवलंबून असते. त्यामुळे मूळ गाभ्याला धोका पोहोचणार नाही, अशी वाटचाल करण्याची अपेक्षा मान्यवरांनी समारोपीय भाषणात व्यक्त केली.

****

निसर्गप्रेमींसाठी ‘जंगल है तो कल है’ प्रदर्शनाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 21 : जागतिक वन, जल आणि हवामान दिनानिमित्त ‘जंगल है तो कल है’ संकल्पनेतून गेटवे ऑफ इंडिया येथे दोन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयामार्फत वन आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिता सिंग आदी उपस्थित होते.

प्रदर्शनातून आभासी जंगल सफारी

वनसंपदेचे महत्त्व जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘जंगल है तो कल है’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये वन, जल आणि हवामान या तीनही विषयांबाबतीत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. प्रत्यक्षात आभासी वास्तविकता (व्हर्चुअल रियालिटी) च्या माध्यमातून वन आणि पर्यावरणाला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे. या आभासी प्रदर्शनात लोकांना प्रत्यक्ष जंगलामध्ये आल्याची अनुभूती होत आहे आणि जंगलात होणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या किंवा गतिविधि प्रत्यक्ष अनुभवू शकत आहेत.

या प्रदर्शनात माहितीपट डिस्प्लेसह महाराष्ट्र कांदळवन कक्ष उभारण्यात आले आहे.  महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, महाराष्ट्र बांबू बोर्ड यांच्या वतीने बांबूसंबंधी माहिती आणि कलाकृती, उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वन उत्पादनांवर आधारित अगरबत्ती प्रकल्प, मध इत्यादी सारखे वन उत्पादने प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

दोन दिवसीय प्रदर्शन

हे प्रदर्शन आज मंगळवार दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत आणि बुधवार दि. २२ मार्च रोजी सकाळी ११ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत निसर्गप्रेमींसह सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात  मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.

०००

पवन राठोड/ससं/

लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

दि 21:- लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याचे आयोजनवरळी येथील नेहरू सेंटर येथे करण्यात आले.यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा,आशू दर्डा, योगेश लखानी, युवराज ढमाले, सुजाता बजाज, अमृता फडणवीस,गौर गोपालदास हे उपस्थित होते.

यावेळी अभिलिप्सा पांडा व षडज गोडखिंडी यांना उदयोन्मुख प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पद्मविभूषण पं हरिप्रसाद चौरसिया यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार -‘लिजेंड’ने सन्मानित करण्यात आले.पद्मश्री शंकर महादेवन यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार -‘आयकॉन’ने सन्मानित करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमत वृत्तपत्र परिवार विविध क्षेत्रात कार्यरत असून समाजाला जोडण्याचे काम करत आहे. ज्योत्स्नाताई सुरांच्या निस्सीम उपासक होत्या.

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार देशपातळीवरील मोठा आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहे. अनेक नवोदित कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीने तर संपूर्ण जगाला संमोहित केले आहे. हा पुरस्कार सोहळा संस्मरणीय असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी षडज गोडखिंडी यांचे बासरीवादन झाले.त्यांनी राग जोग सादर केला. त्यांना तबला साथ ओजस अढिया यांनी केली.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध सतारवादक निलाद्री कुमार यांचे सतारवादन झाले.

लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडीटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.

महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 21 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावरील संचलनात कलावंतांनी कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी सादर करीत द्वितीय क्रमांक पटकावला. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून या चित्ररथाच्या सादरीकरणात सहभागी कलावंत कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर राज्याचा ‘साडेतीन शक्तिपीठे : नारीशक्ती’ या चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तसेच राज्यगीताची संगीतमय निर्मिती करणाऱ्या कलावंतांचा सत्कार सोहळा आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्ररथ निर्मिती कलावंत, चित्ररथाबरोबर नृत्य करणारे कलांवत, राज्यगीताचे कलांवत आणि महाराष्ट्र वाद्य गीत सादर करणारे गायक नंदेश उमप, गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, प्राची गडकरी, पंकज इंगळे, आनंदी जोशी, विशाल भांगे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे आदींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रातर्फे कर्तव्य पथावर सादर झालेल्या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठाबरोबरच नारी शक्तीच्या सन्मानाची माहिती देशभरात पोहोचली. अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचवला जातो. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट, किल्ले, राज्याचे ऐश्वर्य आणि संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करावेत. त्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पोहोचवावे, असे सांगत गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील साडेतेरा कोटी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ती आपल्या राज्यगीतात आहे. राज्यातील कलावंतांनी कमी कालावधीत चित्ररथ सादर केला. त्याबरोबरच त्यांनी संपूर्ण देशातून दुसरा क्रमांक पटकावला ही अभिमानाची बाब आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक विभागातर्फे स्पर्धांचे आयोजन करण्याचीही सूचना त्यांनी केली.

प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकावला. त्याबरोबरच शाहीर साबळे यांनी घराघरात पोहोचविलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्याने राज्यगीत म्हणून स्वीकारले. या पार्श्वभूमीवर कलावंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

गायिका वैशाली सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका वैशाली सामंत, नंदेश उमप, वैशाली माडे, आनंदी जोशी, विशाल भांगे आदींनी विविध गीते सादर केली. त्यांनी ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’, ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’ आदी गीते सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

00000

गोपाळ साळुंखे/ससं/

विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबईत नदी परिसरात असलेल्या गोठ्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 21 : मुंबईतील गोठे हलविण्याचा निर्णय सध्या न्यायप्रविष्ट असून याबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. नदी परिसरात असलेल्या गोठ्यातील शेण व  सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 19 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एस.टी.पी. ) काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईतील व दहिसर, ओशिवरा, पोईसरसह मिठी नदी परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. एस.टी.पी. प्लांट मुळे प्रक्रिया करून पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. यामुळे नद्या प्रदूषणमुक्त होतील.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य योगेश सागर, छगन भुजबळ, मनीषा चौधरी, पृथ्वीराज चव्हाण, आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

००००

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानातील सोयीसुविधांबाबत विकास आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 21 : मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच उद्यानामध्ये पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत दिवे, सुरक्षा याबाबत विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य आशिष शेलार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिका हद्दीतील हायवेला चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे बांधण्यात येतील. महानगर पालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच मुले येत असतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. पोशा नाखवा मैदानातील दिव्यांच्या दुरुस्तीचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार सदस्य छगन भुजबळ, नाना पटोले, योगेश सागर, अजय चौधरी यांनी सहभाग घेतला.

००००

समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याबाबत कार्यवाही करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 21 : समृद्धी महामार्गावर २५-३० किमी अंतरावर पर्यायी रस्त्यांसाठी इंटरचेंज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुलभ होण्यासाठी शहरांना जोडणाऱ्या इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड फाटा येथील इंटरचेंजमुळे पलीकडच्या गावांना २२-२४ किमी अंतर पार करून जावे लागते. यासाठी पळसखेड ते असोला फाटा हे ९ किमी अंतर आणि जउळखेड मार्गे ते असोला फाटा हे १२ किमी अंतर असे दोन पर्याय आहेत. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा करून दोन्ही पर्यायांपैकी कुठला पर्याय वापरता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच समृद्धी महामार्गावरील स्मार्ट सिटीच्या संदर्भातील प्रस्तावांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. प्रस्तावित स्मार्ट सिटींसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

०००

बंधारे बांधून तीनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार – मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 21 : रायगड जिल्ह्यातील पहुर येथे बंधारा उभारणीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. या बंधाऱ्यामुळे त्या परिसरातील ३०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य अमीन पटेल यांनी पहूर कालव्यासाठी भूसंपादन न केल्यामुळे कालव्याअभावी सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला.

मंत्री श्री. सावंत म्हणाले की, पहूर कालव्याच्या भूसंपादनात स्थानिक शेतकऱ्यांनी सतत विरोध केला असल्यामुळे भूसंपादन करणे आतापर्यंत शक्य झाले नाही. सद्यस्थितीत दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC)साठी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमीन संपादित झाली असल्याने सिंचन करणे शक्य नाही. भविष्यात डीएमआयसी कडून पाण्याची मागणी प्राप्त झाल्यास सदर पाणीसाठा हा औद्योगिक वापरासाठी डीएमआयसीला देणे किंवा हा प्रकल्प मालकी हक्काने डीएमआयसीला हस्तांतरित करून प्रकल्प खर्चापेक्षा जास्त महसूल गोळा करणे शक्य आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य अशोक चव्हाण, हरिभाऊ बागडे यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...