शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1554

न्यूज १८ लोकमतच्या विविध क्षेत्रातील ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कारांचे वितरण; जीवन गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान

मुंबई, दि. 23 : न्यूज 18 लोकमत वृत्त वहिनीच्यावतीने विविध क्षेत्रातील नामवंताना महाराष्ट्र गौरव आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला. सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ व अध्यात्मिक गुरू तथा जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामन पै यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सोहळ्याला व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, टिव्ही 18 चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौल उपस्थित होते.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हिंदी चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन सुपरस्टार आहेत. त्याप्रमाणेच मराठी चित्रपटांचे अशोक सराफ सुपरस्टार आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिका अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या कार्याचा हा सत्कार आहे. त्यांचे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान आहे. प्रल्हाद  पै यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. त्यांनी सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. समाजात अनेक व्यक्तिमत्व समाजाच्या कल्याणासाठी झटत असतात. मात्र त्यांचे कार्य समाजासमोर येत नाही.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीने महाराष्ट्र गौरव पुरस्काराच्या माध्यमातून अशी रत्ने शोधून समोर आणली.  अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे महत्त्वाचे कार्य केले.

विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले, ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याला व्यासपीठावर सहभागी होता आले. हे माझे भाग्य समजतो. पुरस्कार प्राप्त सर्वांचे कार्य प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते न्यूज १८ लोकमत वृत्त वहिनीच्या महाराष्ट्र गौरव विशेष पुरस्कार गायिका आर्या आंबेकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, आशिष पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओक व्यासपीठावर उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/ससं/

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’…

विशेष लेख

गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात 2021 रोजीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मविभषण आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंत 19 जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.. तर मग जाणून घेऊया कोण आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्र भूषण’..

महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची ओळख आहे. महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्यास असलेल्या आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान दिला जातो. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या  क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.  10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप होते. आता या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात आली असून पुरस्कार रक्कम 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

  1. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल.देशपांडे

साहित्यक्षेत्रातील भरीव योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने 1997 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. मराठी लेखक, नाटककार, नट, कथा आणि पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना अवघा महाराष्ट्र पु.ल.देशपांडे म्हणूनच ओळखतो.

  1. लता दीनानाथ मंगेशकर

आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दीदी आणि भारतीय चित्रपट संगीताला अतिशय वरच्या दर्जावर नेण्याचं काम लता मंगेशकर यांच्या असामान्य आवाजाने केले. म्हणूनच भारतीय चित्रपट संगीतात लता मंगेशकर यांचे स्थान अजोड आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन 1998 मध्ये लता दीनानाथ मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दैऊन गौरव केला. केंद्र सरकारनेही 2001 साली लता मंगेशकर यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला आहे.

  1. डॉ.विजय पांडुरंग भटकर

परम महासंगणकाचे जनक अशी ओळख असलेले डॉ. विजय पांडुरंग भटकर हे महाराष्ट्रातील मुरंबा या गावचे.  डॉ. विजय भटकर यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळविली. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्वल त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान 2000 मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तत्पूर्वी सन 1999 मध्ये विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी “महाराष्ट्र भूषण“ हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मानाही डॉ.भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

  1. सुनील मनोहर गावस्कर

सुनील मनोहर गावसकर यांना आपण ओळखतो ते भारताचा महान क्रिकेटर म्हणून.   फलंदाजीतल्या तंत्रशुद्धतेचा अंतिम शब्द म्हणजे सुनील गावसकर, एकाग्रतेचा महामेरू म्हणजे सुनील गावसकर. कसोटी सामन्यांच्या रणांगणात दहा हजार रन्सचा पल्ला ओलांडणारा पहिला फलंदाज. सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जवळजवळ वीस वर्षे मिरवणारा फलंदाज. सन 2000 मध्ये सुनील गावस्कर यांना त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  1. सचिन रमेश तेंडुलकर

गेली जवळपास अडीच दशके भारतासह जगातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांना आपल्या खेळाने परमानंद देणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा सन 2001 चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. 2014 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

  1. पं.भीमसेन गुरुराज जोशी

लहानपणापासूनच संगीताचा ओढा असलेल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्र शासनाने सन 2002 मध्ये संगीत क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला. 60 वर्षाहून अधिक काळ संगीतात योगदान देणाऱ्या पंडितजींनी त्यांच्या गुरुजींच्या नावाने सवाई गंधर्व महोत्सव सुरु केला.  आज राज्य शासन पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने संगीत शिष्यवृत्ती देते.पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने 2008 मध्ये गौरविण्यात आले आहे.

  1. डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.अभय बंग आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. समाजप्रबोधन या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देण्यासाठी 2003 साली या दाम्पत्याला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. गडचिरोलीसारख्या मागास भागात जाऊन तेथील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या या डॉक्टर्सनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्सना घ्यावी लागली आहे.डॉ. अभय आणि राणी बंग यांचं काम एखाद्या रुग्णालयापुरतं सीमित न राहता, खेड्यापाड्यांत, देशा-परदेशात उपयुक्त ठरत आहे यातच त्यांच्या कामाचे यश आहे.

  1. डॉ.मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटे

मुरलीधर देवीदास आमटे यांना त्यांच्या घरातच त्यांना लहानपणी बाबा म्हटले जायचे आणि एका क्षणी कुष्ठरोग्यांसाठी जीवन वेचण्याचा निर्णय घेऊन हा मुरलीधर लाखो कुष्ठरोग्यांना आपलासा वाटणारा ‘बाबा’ झाला. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे बाबा सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढले. कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत अंगीकारले. 2004 साली महाराष्ट्र शासनाने समाज प्रबोधनासाठी डॉ. मुरलीधर आमटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला.

  1. डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर

अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ.रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य केले आहे. 2005 मध्ये विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. माशेलकर यांना महाराष्ट्रभूषण देऊन त्यांचा सन्मान केला.

  1. रतन टाटा

राज्याच्या विकासात टाटा समूहाचे मोठे योगदान आहे. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना उदयोग क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2006 साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.

  1. रामराव कृष्णराव ऊर्फ रा.कृ.पाटील

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेल्या पहिल्या प्लॅनिंग कमिशनचे श्री. पाटील सदस्य होते. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वतःला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांचे वयाच्या 99व्या वर्षी, 31 मे, 2007 रोजी निधन झाले. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

  1. नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी

नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. समाजप्रबोधनासाठी 2008 साली महाराष्ट्र शासनातर्फे श्री. धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  1. मंगेश केशव पाडगावकर

मंगेश केशव पाडगांवकर  यांना 2008 साली महाराष्ट्र शासनाने साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबददल महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता खूप गाजली. साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले.

14.सुलोचना लाटकर

मराठी-हिंदी सिनेमांतून सोज्वळ भूमिका रंगवणा-या अभिनेत्री सुलोचना यांचा चेहरा आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. पासष्टहून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत कलाकार-दिग्दर्शक-तंत्रज्ञांच्या अनेक पिढय़ांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी चित्रपटात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला.

15.डॉ.जयंत विष्णू नारळीकर

जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठा’ हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे  ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक अशी डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख आहे. विज्ञानातील सिद्धांत आपल्या लेखणीतून, व्याख्यानातून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते आहेत. 2010 मध्ये विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.

  1. डॉ.अनिल पुरुषोत्तम काकोडकर

बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणाऱ्या डॉ. अनिल काकोडकर यांना भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार मानले जाते. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे दहा वर्षांहून अधिक काळ डॉ. काकोडकर अध्यक्ष होते. 2011 मध्ये डॉ. काकोडकर यांना विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला.

  1. बाबासाहेब पुरंदरे

बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन केले आहे.  पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य आहे. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्यांपुढे ‘जाणता राजा’च्या माध्यमातून नेण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे.2015 मध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  1. आशा भोसले

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी आणि गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांना संगीत आणि नाटकाचा वारसा लाभला.  बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते. आशाताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली असून आतापर्यंत त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत.सन 2021 या वर्षीचा पुरस्कार श्रीमती आशा भोसले यांना जाहीर झाला असून 24 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  1. आप्पासाहेब धर्माधिकारी

आप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. 2014 मध्ये डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. 2017 मध्ये, ते चौथा, पद्मश्रीने सन्मानित झाले. सन 2022 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे.

 

  • वर्षा फडके– आंधळे, विभागीय संपर्क अधिकारी (सांस्कृतिक कार्य)

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. २३ : हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिक आणि उत्कृष्ट वाड्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे तीन वर्षांचे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.

बांद्रा येथील रंगशारदा नाट्यमंदिरात आयोजित हा पुरस्कार प्रदान सोहळा आमदार आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, अभिनेता आशुतोष राणा, मनोज जोशी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखकांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

यावेळी सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या तीन वर्षातील विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांतर्गत महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॅा. विकास दवे, चित्रा मुद्गल, डॉ. कन्हैया सिंह यांना तर डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॉ. अनिल मिश्र, आशुतोष राणा, सुधीर पराडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासह विविध प्रकारातील पुरस्कार प्रदान करून पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले.

०००

पवन राठोड/ससं/

लातूर विभागात सहा हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना वाढीव मानधनाचा लाभ

लातूर, दि.23 (विमाका) : राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा 2023-24 सालचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मासिक मानधनात दीड हजार रूपयांची वाढ करण्यात आली. लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण 6 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना या वाढीव मानधनाचा लाभ होईल.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक कार्यरत आहेत. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्सहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्त्वपूर्ण असा सामाजिक दुवा म्हणून काम करतात. स्थानिक रहिवासी असल्याने गावच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवणुकीसाठी त्या योगदान देतात.

आरोग्य संस्थेतील प्रसुतीत वाढ करणे, मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग आदी उपचारासाठी मदत करणे, मोफत असलेल्या संदर्भ सेवेचा प्रचार करणे, कुटुंब कल्याणाचा प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप, किरकोळ आजारांवर उपचार, माता व बाल आरोग्यविषयक प्रबोधन, जसे की प्रसुतीपूर्व तपासणी, प्रसूती पश्चात तपासणी, बालकांचे लसीकरण आदी कामे करणे. जन्म मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये सहकार्य करणे इत्यादी कामे आशा स्वयंसेविका करतात. त्यांच्या कामावर देखरेख गट प्रवर्तक ठेवतात, म्हणून आरोग्य यंत्रणेत महत्त्वाचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्याकडे पाहिले जाते.

राज्यात सुमारे 81 हजार आशा स्वयंसेविका व 3 हजार 500 गट प्रवर्तक आहेत. त्यापैकी लातूर विभागात एकूण 5 हजार 828 आशा स्वयंसेविका, 287 गट प्रर्वतक आहेत. लातूर जिल्ह्यात 01 हजार 906, नांदेड 01 हजार 645, उस्मानाबाद 01 हजार 207, हिंगोली जिल्ह्यात 01 हजार 70 आशा स्वयंसेविका आहेत. लातूर, नांदेड प्रत्येकी 89 तर उस्मानाबाद 61 आणि हिंगोलीत 48 गट प्रर्वतक आहेत. यापूर्वी आशा स्वयंसेविकांना 3 हजार 500 रूपये मानधन होते, ते आता अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे 05 हजार रूपये झाले. तर गट प्रवर्तकांना 04 हजार 700 रूपयांवरून 06 हजार 200 रूपये मानधन झाले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनीमुळे पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

लातूर, दि. 23 (जिमाका) : राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जा निर्मितीवर भर दिला आहे. शेतीला दिवसा वीज पुरविण्यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी खासगी जमीन भाडेपट्ट्याने घेता येणार असून त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरला दरवर्षी 75 हजार रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे.

शेतीला दिवसा वीज पुरविण्यासाठी महावितरणतर्फे विद्युत वाहिन्यांचे सौर उर्जीकरण केले जाणार असून यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकरी, ग्रामपंचायत, कारखाने यांच्याकडून जमीन भाड्याने घेण्याची तरतूद आहे. याठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या खासगी जमिनींना दरवर्षी प्रतिहेक्टरी 75 हजार रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे. याबाबतचा पुनरुच्चार राज्याच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पडीक जमिनीतूनही वार्षिक हेक्टरी 75 हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.

लातूर जिल्ह्यातून १०० प्रस्ताव सादर

प्रत्येक जिल्ह्यात महावितरणच्या कृषि वाहिन्यांपैकी किमान 30 टक्के कृषि वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण गतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी लातूर जिल्ह्यातून आतापर्यंत 100 प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे 1437.73 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून 160.11 मेगावॉट विद्युत निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी 21 ठिकाणी सुमारे 496 एकर शासकीय जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यामधून सुमारे 87.75 मेगावॉट वीज निर्मिती होईल. तसेच 79 ठिकाणी एकूण सुमारे 941.73 एकर खासगी जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामधून सुमारे 72.36 मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून रोजगार निर्मिती !

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ सुरु करण्यात आली आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करुन स्वत:च्या पायावर उभे राहत नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे होण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी कृषी विभाग सहाय्य करत आहे.

शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विशेषतः नाशवंत शेतमाल बाजारात आल्यावर त्याला योग्य तो भाव मिळेलच असे नाही. त्यामुळे त्याच्या कष्टाचे चिज होत नाही. अशा नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करून त्यातून त्या शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण, शेतकऱ्यांनी  घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

66% अन्नप्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात असून त्यापैकी 80 टक्के कुटुंब- आधारित उद्योग आहेत. या घरगुती उद्योगांमुळे ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांच्या संसाराला आर्थिक हातभार लागतो आणि त्यांचे शहराकडे होणारे स्थालांतर टाळले जाते.  या योजनेसाठी लागणारा खर्च केंद्र आणि राज्य सरकार अनुक्रमे 60:40 अशा प्रमाणात करणार आहे. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात एक जिल्हा एक उत्पादन (ONE DISTRICT ONE PRODUCT) या धर्तीवर राबविली जाणार आहे.

योजनेचा उद्देश :

सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट /संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे. उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे. सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

लाभार्थ्यांना प्रशिक्षण : या योजने अंतर्गत कर्ज मंजुरी झालेल्या लाभार्थ्यास 50 तासांचे प्रशिक्षण तर अन्न व प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत कामगार यांना 24 तासांचे प्रशिक्षण निवड केलेल्या जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संस्थेत देण्यात येते.

अर्जासाठी ऑनलाईन पोर्टल : वैयक्तिक व गट लाभार्थ्यांसाठी – www.pmfme.mofpi.gov.in  बीजभांडवलासाठी – ग्रामीण भागासाठी www.nrlm.gov.in  आणि शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज करता येईल.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २३ : देशभरातील विद्यार्थी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये (एबीसीआयडी) आपले खाते उघडत आहेत.आत्तापर्यंत देशातील १ हजार १६० शैक्षणिक संस्थांनी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये सहभाग घेतला आहे.यात राज्यातील ११० शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. देशात सक्रिय असलेली पहिले चारही राज्याचे विद्यापीठ यात आघाडीवर राहिले आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि कौशल्याभिमुख अभ्यासक्रमाच्या दृष्टीने श्रेयांकासाठी (क्रेडिट) एक बँक तयार केली  जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या व्यवहारासाठी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट आहे. परीक्षेद्वारे दरवर्षी प्राप्त होणारे क्रेडिट या बँकेत साठवले जातील. विद्यार्थी अथवा शैक्षणिक संस्था पदवी बहाल करताना या क्रेडिटचा वापर करतील. दोन वेगवेगळ्या महाविद्यालयात जरी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले तरी क्रेडिट मात्र याच एबीसी आयडीवर जमा होतील.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार जेव्हा क्रेडिट ट्रान्सफर करावे लागतील तेव्हा विद्यार्थ्यांना याचा फायदा  होईल. संस्थेबाबत प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, दुसऱ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विद्यापीठ आहे. तर चौथ्या क्रमांकावर जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा क्रमांक आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संख्या पाहिली तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ५ लाख ४हजार ९३६ सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ ४ लाख ४५ हजार ४५३ मुंबई विद्यापीठ २ लाख १४ हजार ५६०, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठ १ लाख १९हजार ९३६  एवढी आहे.

यामध्ये सहभागी होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत उच्च शिक्षण संचालक यांनी यासाठी कार्यशाळा, अभियान घेऊन विशेष मोहिम राबविली आणि जनजागृती केली. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे, असे म्हणता येईल, असे सांगून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील आणि  त्याचे अभिनंदन केले आणि यामध्ये संस्था आणि विद्यार्थी यांनी अधिक सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

विधानसभा कामकाज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार येणारा शिवराज्याभिषेक उत्साहात

साजरा करण्यात येणार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईदि. २३ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुढील वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेतत्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांसाठी ३५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. २ ते ९ जून २०२३ या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार असून हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर पर्यटन व सांस्कृतिक कार्यअल्पसंख्याक विकासइतर मागास बहुजन कल्याण आणि दिव्यांग कल्याण या विभागांची विधानसभेत सदस्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेसांस्कृतिक विभागाकडे  मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे. त्यासाठी अत्याधुनिक संग्राहालय उभारण्यात येणार आहे. राज्यात गड -किल्ल्यांचे जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कार आशा भोसले यांना उद्या गेटवे आँफ इंडिया येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेराज्यात पर्यटनातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी खासगी भागीदार नेमून त्यांना जागेसह इतर सुविधा उपलब्ध करून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जुने मंदिर दुरुस्ती ,मुंबई फेस्टिवल,पर्यटनासाठी योग्य अशा ठिकाणांचा विकास असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक विकास विभागाबाबत मंत्री शंभुराज देसाई, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे, दिव्यांग कल्याण विभाग यांची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली. सर्व सदस्यांच्या सूचनांच्या सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

000

राजू धोत्रे/विसंअ/

 

विधानपरिषद कामकाज

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा

दक्ष – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई दि. २३ : राज्यात सध्या एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे व रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याबाबत आरोग्याच्या सर्व संस्थांना सर्वेक्षण वाढविण्याच्या आणि उपचाराबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेतअशी माहिती, आरोग्य मंत्री प्रा. डॉ  तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.

आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले कीएच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा वाढत्या प्रादुर्भावाचा राज्यातील सर्व स्तरावर सतत आढावा घेण्यात येत आहे. राज्यात सर्व स्तरावर सनियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्य चिकित्सकवैद्यकीय अधिकारी यांची व्हीसीद्वारे आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी देखील आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा घेऊन केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाहीच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पुर्नप्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले आहे.

राज्यात गंभीर आजारीवृद्ध नागरिकअतिजोखमीच्या व्यक्तीगरोदर माता व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा व महानगरपालिकांना स्थानिक स्तरावर लस खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सन २०२२-२३ मध्ये ९९.७७८ लोकांना लस देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार लस उपलब्ध ठेवण्यासाठी स्थानिक स्तरावर अनुदान देण्यात आलेले आहेअसेही त्यांनी सांगितले.

राज्यात १ जानेवारी २०२३ पासून २० मार्च २०२३ पर्यंत एच१ एन१ चे एकूण बाधित रुग्ण  ४०७ तर एच३एन२ चे बाधित रुग्ण २१७  रुग्ण आढळून आलेले  आहेत. या आजारा बाबत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा तसेच रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणारी ऑसेलटॅमीवीर हे औषध शासकीय संस्थांमध्ये उपलब्ध आहे. तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. याबरोबरच काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहेअसे डॉ. सावंत यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याची आढावा बैठक घेऊन कोविड प्रतिबंधक जीवनशैली बाबत जनतेचे प्रबोधन करण्याचे निदेश दिले आहेत. राज्य शासन कोविड उपचाराबाबत दक्ष आहे. त्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी  आवाहन करण्यात येत असल्याचेही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ/

 

माळरानावरच्या यशस्वी फळबागेतून सुमनबाईंनी साधला लखपती बनण्याचा मार्ग 

नांदेडच्या सीमा ओलांडून भोकर तालुका लागला की लहान डोंगरांची माळ सुरू होते. भोकरच्या पायथ्याला मुदखेड-अर्धापूर तालुक्यातील जमिनीचा पोत हा केळी, ऊस, हळद व इतर फळबागांसाठी पोषक आहे. त्या तुलनेत भोकरच्या माळरानावर शेतीला फुलवणे हे तसे आव्हानात्मक आहे. भोसी येथील सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड या महिलेने आपल्या माळरानावर असलेल्या शेतीसाठी स्वप्न पाहिले. ते सुद्धा फळबाग शेतीची. या स्वप्नाला आकार देण्यासाठी तेथील कृषि सहाय्यक, कृषि अधिकारी पुढे सरसावले.

उराशी स्वप्न घेऊन माळरानावर फळबागेसाठी खड्डे खोदणे, त्यात काळी माती, शेणखत भरून झाडांसाठी हे खड्डे तयार करणे, पाण्याचे नियोजन करणे आदी एकापाठोपाठ एक गायकवाड कुटुंबाने काम हाती घेतले. पाण्याशिवाय शेती नाही, कष्टाशिवाय पाणी नाही हे गणित सुमनबाईने बरोबर ओळखले. त्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधला. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेच्या माध्यमातून त्यांना विहिर मिळाली. या विहिरीवर सुरू झाली त्यांची फळबाग शेती!

 

सुमनबाईंसारख्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दूरदृष्टी ठेऊन व्यापक नियोजन केले आहे. यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहनावरही भर आहे. तीन वर्षात 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणले जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीत वाढ केली जाणार आहे. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी ही भूमिका शासनाने अधिक दृढ केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाईल. यात प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर असून केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे 12 हजार रुपये प्रतीवर्षी शेतकऱ्यांना मिळतील. याचा राज्यातील सुमारे 1.15 कोटी कुटुंबातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

 

सुरूवातीला पेरू सारखे पीक आपल्याला किती पैसे देईल याची खूप चिंता होती. या चिंतेला बाजुला सारून सुमनबाईने पेरूची लागवड केली. सुरूवातील अडीच एकर शेतीत त्यांनी एकरी 666 प्रमाणे अडीच एकरमध्ये 1 हजार 666 घनदाट लागवड पद्धतीने पेरूची लागवड केली. पहिल्याच वर्षी त्यांना फुलोरा मिळाला. या फुलोऱ्याला निसवत पहिल्याच वर्षी 10 लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. याच्या जोडीला आंब्याचीही लागवड केली. दोन एकर शेतीत अती घनदाट पद्धतीने 1 हजार 300 झाडाची लागवड केली. आंबा लागवड करून 5 वर्षे झाली. यावर्षी त्यांनी भरीव उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना चालना दिली. पेरूच्या उत्पन्नातून सुमारे 1 हजार सिताफळाची लागवड करून त्यांनी शेतीतला पैसा पुन्हा शेतीसाठी वळवला. आजच्या घडीला 10 एकर शेतीत माळरानावर त्यांच्या कष्टातून फुलविलेल्या शेतातील आंब्यानेही 5 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न देऊ केले आहे.

सुमनबाईच्या जोडीला त्यांचे पती दिगंबर गायकवाड व मुलगा नंदकिशोर हे कायम तत्पर राहिले. एमपीएससी परिक्षेचा अभ्यास करत करत कोरोनाच्या काळात नंदकिशोर यांनी शेतीला जवळ करण्याचा निर्णय घेतला. एका बाजुला अभ्यास तर दुसऱ्या बाजुला शेतासाठी कष्टाची तयारी त्यांनी ठेवली. आज या माय-लेकरासह सारेच शेतात राबत असल्याने या मुलानेही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यात काहीही कमी पडू दिलेले नाही. नंदकिशोर यांनी आता शेतात शेडनेट उभारायला कमी केले नाही. शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी शेतीसाठी लाभ घेतला. यात एमआरजीएस अंतर्गत 1 हजार 666 पेरू झाडाची लागवड केली. या झाडांसाठी पंतप्रधान सुक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक योजनेचाही लाभ घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाच्या विहिर योजनेचा लाभ घेतला. झाड झाली, पाण्याची व्यवस्था झाली, ठिबक झाले. विजेचा प्रश्न तेवढा बाकी होता. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती केली. मेडा अंतर्गत त्यांना सोलार पंपाचा लाभ मिळाला. या योजनेंतर्गत 95 टक्के सबसीडीवर पाच एचपीचा सोलारपंप मिळाला. अंतर्गत मशागतीसाठी कृषि विभागाकडून त्यांनी मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला.

शेतीतील उत्पन्न आज मोहून टाकणारे असले तरी प्रत्यक्ष शेती करतांना खूप आव्हानाचा सामना करावा लागतो. परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुमनबाईचे शेत आता एक आदर्श शेत झाले आहे. या माळरानावर फणसाच्या झाडापासून मसाला, ईलायची पर्यंत झाडाचे नियोजन केले आहे.  पंचक्रोशितील शेतकरी आता त्यांच्याकडे विविध फळांच्या रोपाची मागणी करीत आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सुमनबाई पदर खोचून कामाला लागले आहेत. कृषि अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी याही स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी मार्ग मागितला. अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेतून त्यांना निकषानुसार 50 टक्के सबसीडीवर शेडनेट मिळाले. आता त्या फळउत्पादक शेतकरी म्हणून आपली ओळख वाढवत रोपविक्रेत्याही झाल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या गारपिटीतून सावरत शासनाच्या कृषि योजनांच्या साह्याने व त्यांचा परिवार पुन्हा तेवढ्याच जोमाने उभा राहिला आहे. जेवढे प्रयत्न लावू तेवढे आम्ही मिळू या संदेशाला जवळ करीत गायकवाड कुटुंब आता प्रगतीचे नवे मार्ग चाखत आहेत. हिंमत हारायची नाही, कष्टाला कमी पडायचे नाही, निसर्गाचे आव्हान आले तरी गांगारून जायचे नाही हे साधे तत्त्व शेतीतून सुमनबाईने घेतले आहे. हाच मंत्र आता त्या इतर शेतकऱ्यांना देत आहेत. 

 

 

 

– विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...