शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1549

विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 25 : पालघर जिल्ह्यातील मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत, त्यांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य श्रीनिवास वनगा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, विद्यावासिनी कॉर्पोरेशन प्रा. लि.या कंपनीस जादा आकारण्यात आलेला मोबदला वसूल करण्यासाठी त्यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलाव विक्री करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या बाबतची कार्यवाही पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांना मोबदला अदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.या महामार्गासाठी भूसंपादनात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येत आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून दस्त नोंदणी अहवाल मागविणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 25 : दुय्यम निबंधक कार्यालय, नागपूर येथील दस्तातील अनियमिततेबाबत दस्तनिहाय स्वतंत्र अहवाल जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडून मागविण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य विकास कुंभारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दस्त नोंदणीत अनियमितता असल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने याबाबत समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल मागविण्यात येईल. तसेच दस्त नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात येईल.

०००

शैलजा पाटील/विसंअ

विधानसभा लक्षवेधी

मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य सुनिल राणे, प्रकाश अबिटकर,सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा सदस्यांची एक समिती गठीत करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीचीही छाननी करुन पात्र लोकांची यादी कालमर्यादेत तयार करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या घरांसाठी आवश्यक असणारी जागा निश्चित करुन या कामाला अधिक गती देऊन प्राधान्य देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

बोर, धाम प्रकल्पातील दुरुस्ती कामांना गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. : 25 : वर्धा जिल्ह्यातील बोर व धाम हे सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प आहेत. परंतु जुना प्रकल्प असल्याने कालवे व वितरण प्रणाली जीर्ण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे नुकसान होत आहे. त्यासाठी या प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य पंकज भोयर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी एका महिन्यात विस्तृत प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी भागातील 12 गावांना दिलासा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई, दि, 25 : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील 12 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या आदिवासी भागातील गावांना कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणाच्या जलाशयावरुन शेतीसाठी कळमजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली होती. त्यानुसार या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. याप्रकल्पासाठी आवश्यक तो निधीही देण्यात येईल आणि उपलब्ध पाणीसाठा याचा अंदाज घेऊन या 12 गावांच्या आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात येईल.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

जिगाव प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता पाहून अतिरिक्त गावांचा लाभक्षेत्रात समावेश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई, दि. 25 : जिगाव प्रकल्पात मोठी सिंचन क्षमता तयार करण्यात येत आहे. यामध्ये अधिक सिंचन क्षमता उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले तर मलकापूर विधानसभा मतदार संघातील 14 अतिरिक्त गावे या लाभक्षेत्रात समाविष्ट करुन त्यांना लाभ देता येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य संजय सावकारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मलकापूर विधानसभा मतदार संघातील 14 अतिरिक्त गावे  लाभक्षेत्राबाहेरील आहेत. या गावांचा समावेश या प्रकल्पात करत असताना अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध असणे महत्वाचे आहे. म्हणून पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी या प्रकल्पाला निधी देण्यात येईल,त्यानंतर या गावांना लाभक्षेत्रात समावेश करण्यात येईल,असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. : 25 : अंधेरी पश्चिम येथील जुननत नगर, समतानगर आणि खजूरवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या जागेवर अनधिकृत संक्रमण शिबिरे उभे करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीबाबत कार्यवाही करण्यात येईल. परिशिष्ट दोनची पुनर्पडताळणी करुन त्यातील निकष तपासून या प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून सन 2019 च्या सर्वेक्षणाप्रमाणे परिशिष्ट-दोन मधील सुधारणा करुन या प्रकल्पाला गती देण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

ततारपूर, सावरखेड, गणोजादेवी पुनर्वसन प्रकल्पाला लवकरच मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. : 25 : अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्पांतर्गत ततारपुर आणि सावरखेड पुनर्वसनाचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले आहेत. गणोजादेवी संदर्भातलाही प्रस्ताव तातडीने मागवून पुढील 3 महिन्यात या पुनर्वसन प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य रवी राणा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, निम्न पेढी प्रकल्पाचे जवळपास 90 टक्के काम झाले आहे. परंतु 10 टक्के काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच 50 घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

निम्न तापी प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेला निम्न तापी पाडळसे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त सहाय्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

 

याबाबत विधानसभा सदस्य संजय सावकारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा 6.6 टीएमसी चा प्रस्ताव प्राप्त झाला आहे परंतु तो प्रस्ताव 4 टीएमसीचा अपेक्षित असून याबाबत पुर्नप्रस्ताव मागवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

सोलापूर शहर पाणीपुरवठा प्रश्नाबाबत लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 25 : सोलापूर शहर पाणीपुरठ्यासंदर्भात कंत्राटदारांना देण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस वारंवार स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नाबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सुभाष देशमुख यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, उजनी धरणावरून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी 170 द. ल. लि. उजनी ते सोलापूर थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा प्रकल्पाची योजना सोलापूर स्मार्टसिटी मार्फत तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे, पंपिंग स्टेशन व पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन, बी.पी.टी. ग्रॅव्हिटी मेन या कामांचा समावेश आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

महाकाली, देवीपाडा गृहनिर्माण प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : मुंबई उपनगरातील मागाठाणे, बोरिवली येथील महाकाली व देवीपाडा गृहनिर्माण प्रकल्पाचा  अनेक वर्षापासून पुनर्विकास रखडला आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य प्रकाश सुर्वे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पात अनेक विकासक बदलले असल्याने यामध्ये जास्त कालावधी गेला. आता या प्रकल्पाचे  काम सुरू झाले आहे. यामध्ये विकासकाकडे 20 कोटी रुपये थकीत होते. त्यापैकी 11 कोटी रुपये दिले आहेत. अजून 9 कोटी रुपये थकीत रक्कम आहे. विकासक अनेक वेळा झोपडीधारकांना भाडे देत नाहीत, अशा तक्रारी येत आहेत. याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. विकासक आणि झोपडीधारक यांना दिलासा देण्यासाठी शासन भाडे रक्कम बाबत नवीन योजना आखत आहे. या योजनेत जे विकासक नाविन्यपूर्ण आणि कालबद्धपूर्ण प्रकल्प आराखडा तयार करून नियोजन करतील, अशा विकासकांना आणि झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनींच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर लवकरच बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि.25: कर्नाटक राज्याला वीज निर्मितीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनी अधिग्रहित करुन कोळसा उत्खननाकरिता देण्यात आल्या आहेत. कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन हे काम करीत असून काही प्रश्न प्रलंबित असल्याने लवकरच या विषयाबाबत बैठक घेण्यात येईल, असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य किशोर जोरगेवार यांनी कोळसा उत्खननाकरिता घेण्यात आलेल्या जमिनी आणि त्यांना मिळणारा मोबदला या कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की,  कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर 15 डिसेंबर 2016 रोजी करार करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळालेला मोबदला याबाबत तक्रारी असल्याने यासंदर्भात लवकरच एक सविस्तर बैठक घेण्यात येईल.

००००

वर्षा आंधळे/विसंअ 

निकषपात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, दि. २५ : राज्यात १ लाख ८ हजार ७५९ आदिवासींना जात वैधता प्रमाणपत्र दिले गेले आहे. निकषपात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य समाधान अवताडे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात जिथे आवश्यक आहे, तिथे जात पडताळणी कार्यालय उघडले आहेत.जात वैधता समितीची संख्या सातत्याने वाढविण्यात आली आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत सोलापूर जिल्ह्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/25/03/2023

 

मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत मोजणी करून हद्द निश्चित करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 25 : मशिद आणि दर्गा यांच्या जागांवर सरकारी कार्यालये वा इमारतींचे अतिक्रमण झालेले नाही. मशिद आणि दर्गा यांच्याजवळ सरकारी कार्यालये असल्याने त्यांच्या हद्दी जवळ असल्याने काही तक्रारी असतील, तर संबंधित ठिकाणी जागेची मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य अबू आझमी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

अहमदनगर शहरातील मशीद व दर्ग्यांच्या जागांसंदर्भात अतिक्रमण झालेले नाही, असे मंत्री श्री.देसाई यांनी स्पष्ट केले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 25 : लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात लघु व मध्यम उद्योग मोलाचे योगदान देत आहेत. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ या संस्थेचा ३० वा वर्धापन दिवस तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. २५) मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, लार्सन अँड टुब्रोचे कॉर्पोरेट रणनीती व विशेष प्रकल्प अधिकारी अनुप सहाय, चेंबरचे कार्यकारी अधिकारी महेश साळुंखे तसेच राज्यातील विविध लघु व मध्यम उद्योग संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ‘इंडिया एसएमई लीडरशिप समिट’ परिषदेला संबोधित करताना राज्यपालांनी कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारे क्षेत्र लघु आणि मध्यम उद्योग हे असून या उद्योगांच्या माध्यमातून महिला तसेच समाजातील विविध उपेक्षित घटकांच्या हातांना रोजगार मिळत असल्याचे राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले.

लघु मध्यम उद्योग क्षेत्रातील अर्ध्याहून अधिक उद्योग ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी आणण्याच्या कार्यात या उद्योगांचे योगदान मोठे आहे.  तसेच उद्योगांच्या वाढीसाठी संशोधन आणि विकासाला महत्व असून महाराष्ट्र शासनाने या दृष्टीने अनेक उपाय योजना केल्या असल्याचे राज्यपाल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी राज्यातील लघु मध्यम उद्योगांच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यात लघु मध्यम उद्योग मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक प्रभाकर साळुंके (सुमित ग्रुप पुणे), डॉ सीमा सैनी (दालमिया शिक्षण समूह) व सुषमा चोरडिया (सूर्यदत्ता शिक्षण समूह) यांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देण्यात आले.

युवा उद्योजक अर्पित सिद्धपुरा, ज्येष्ठ उद्योजक ललित चड्ढा, जितेंद्र पटेल, युसूफ कागझी, सोनीर शाह, उदय अधिकारी, विशाल मेहता यांसह २० उद्योजकांना ‘इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले.  राज्यपालांच्या हस्ते यावेळी एसएमई चेंबरच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

००००

Maharashtra Governor presents India SME Excellence Awards

 

Mumbai 25 : Maharashtra Governor Ramesh Bais addressed the India SME leadership Summit and presented the India SME Excellence Awards to successful small and medium entrepreneurs in Mumbai on Sat (25 Mar).

The Summit and awards function was organised by the SME Chamber of India and the Maharashtra Industry Development Association on the occasion of the 30th Foundation Day of the Chamber.

Founder Chairman of the SME Chamber of India Chandrakant Salunkhe, Head, Corporate Strategy and Special Projects Anup Sahay and heads of various small and medium entrepreneurs were present.

The Governor released the Activity Report and launched the initiative of ‘Entrepreneurship Development Council’ on the occasion.

The India SME Excellence Awards were presented to Arpit Sidhpura, Lalit Chadha, Jittendra Patel, Yusuf Kagzi, Sonir Shah, Uday Adhikari, Vishal Mehta among 20 others. The Governor also presented the Pride of Maharashtra to Prabhakar Salunke, Dr Seema Saini and Sushama Chordiya on the occasion.

0000

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई, दि.२५ : राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेलं विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून राज्याला गती देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. अंतिम आठवडा प्रस्ताव व नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, सर्वसामान्यांचे सरकार स्थापन होऊन नऊ महिने पूर्ण झाले आहे. पूर्ण काळ अधिवेशनं घेऊन विक्रमी कामकाज केले आहे.  लोकशाहीत चर्चा, संवादाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटू  शकतात. पंचामृताच्या योजनांतून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.

सर्वसमावेशक विकासाची संकल्पना

सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन काम करीत असलेल्या या सरकारने पायाभूत सुविधा, कृषि, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला, आदिवासी विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आमची विकासाची संकल्पना, प्रगतीचा विचार हा सर्वसमावेशक असून आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील १२ कोटींपेक्षा अधिक जनता आशावादी आहे.

बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

राज्यातील बळीराजावर संकट आले असून बळीराजाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. अडचणीच्या काळात मदतीसाठी मागेपुढे बघणार नाही. त्यामुळेच कांदा उत्पादकांपासून अवकाळीग्रस्तांपर्यंत सगळ्यांना या सरकारवर विश्वास आहे. सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

डबल इंजिनमुळे विकासाचा वेग वाढला

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार अशी ओळख धडाकेबाज निर्णयांमुळेच मिळाली आहे, डबल इंजिनमुळे या राज्यात विकासाचा वेग वाढला आहे. विकासाची बुलेट ट्रेन सुसाट निघाली असून आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी विविध योजनांसाठी निधी देखील मोठ्या प्रमाणावर दिला आहे. सुमारे ३२ हजार ७८० कोटी केंद्र शासनाने महाराष्ट्राला दिले आहेत. मुंबईतला एमटीएचएल प्रकल्प असो, किंवा कोस्टल रोड, मेट्रोची कामं, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग पकडला आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन वर्षअखेरीस होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग अधिक सुरक्षित करण्याचे नियोजन

भारतासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली असून बीकेसीमध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे. भारतातील या सर्वात पहिल्या बुलेट ट्रेनची सुरुवातही करू. मुंबई – नागपूर  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्ग अधिक सुरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही

गेल्या काही वर्षात मुंबईचा रखडलेला विकास आणि खड्ड्यांची मुंबई ही ओळख पुसून मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे. बाहेर गेलेला मुंबईकर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि यापुढेही राहील. मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. आम्ही ते कमी होऊ देणार नाही असे सांगत वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा मार्गही मोकळा केल्यामुळे सेस बिल्डिंगमधील रहिवाशांना आता चांगली आणि हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांनाही त्यांचे कोळीवाडे आणि स्वतंत्र गावठाण यांचे सर्वेक्षण आणि सीमांकन करून हक्काची घरं मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई, मुंबई महानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती

मुंबईसारख्या महानगरामध्ये दळणवळणानंतर घरांचा विषयही जिव्हाळ्याचा आहे. आमचं सरकार आल्यानंतर केवळ मुंबईच नाही तर मुंबई महानगर क्षेत्रात देखील सिडको, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करतो आहोत, असे सांगून आजच्या पिढीला, तरुणांना काम करणारे सरकार हवे आहे आणि आम्ही ‘परफॉर्म’ करीत आहोत. लोकांच्या मनातलं  हे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी अशीच दमदारपणे वाटचाल करीत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

००००

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

अलिबाग -रोहा  रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 25 : “अलिबाग – रोहा दरम्यान रस्त्याचे काम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलेले आहे. या कामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. तसेच या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे”, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिले.

अलिबाग -रोहा रस्त्याच्या कामामध्ये कंत्राटदार कंपनीने गैर व्यवहार केल्याबद्दल तारांकित प्रश्न विधानपरिषद  सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, अलिबाग – रोहा रस्ता पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या देखील घेतल्या आहेत. लोकहिताच्या कामांमध्ये कोणाकडून अडथळा आणल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

या प्रश्नाच्या अनुषंगाने विधानपरिषद  सदस्य सर्वश्री कपिल पाटील, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न विचारले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

 

छत्रपती संभाजीनगर शहरातील उड्डाणपुलांची  कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होणार – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 25 : छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. 90 टक्के कामे पूर्णत्वाकडे गेले आहेत. मंजूर आराखड्यानुसार काम पूर्ण केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. एकूण तीन उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल पूर्ण झाला असून उर्वरित दोन्ही पुलांची कामे एप्रिल महिनाअखेर पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहरात जुन्या बीड बायपास, स्वामी हंसराज  तीर्थ चौक यासह विविध ठिकाणी कामे सुरु आहेत. स्वामी हंसराज तीर्थ चौकात बायपासच्या नव्या पुलाखालून अस्तित्वात असलेल्या जुन्या रस्त्याची उंची कमी ठेवल्याची तक्रार होती. मात्र, ही उंची 5.50 मीटर इतकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या या कामांपैकी 13 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांपैकी 11 किलोमिटरचे काम पूर्ण झाले आहे तसेच 4.75 कि.मी. चौपदरीकरण कामांपैकी अडीच कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. एकूण तीन उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल पूर्ण झाला असून उर्वरित दोन्ही कामे एप्रिल महिनाअखेरपर्यंत पूर्ण होतील, अशी माहितीही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

००००

दीपक चव्हाण/विसंअ/

 

अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 25 : राज्यातील अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे समायोजन आणि अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ ग्रंथपालपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य रामदास आंबटकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, ज्या ठिकाणी शाळांची पटसंख्या कमी आहे, अशा शाळा एकत्रित करुन  तिथे पूर्णवेळ ग्रंथपाल उपलब्ध करुन देता येईल का, याचा विचार सुरु आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असून त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण देऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

याशिवाय, शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेत आहोत. शाळांमध्ये ई- ग्रंथालय सुरु करीत आहोत. पुढील वर्षीपासून प्रत्येक शाळेत पुस्तकपेटी योजना आणि डिजीटल लायब्ररीचा उपक्रम आपण  राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शालेय शिक्षणात गुणात्मक फरक पडेल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, प्रविण दरेकर, कपिल पाटील, भाई जगताप, महादेव जानकर, प्रसाद लाड आणि जयंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

००००

दीपक चव्हाण/विसंअ/

मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडविण्याचे मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

मुंबई, दि. 25 : मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न सामाजिक न्याय विभागाने अन्य संबंधित विभागांच्या समन्वयाने कालबद्ध पद्धतीने सोडवावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत विधान भवनातील समिती कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, अमित देशमुख, नारायण कुचे, दीपक चव्हाण, राजेश पवार, राजेश राठोड, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, राम सातपुते, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ‘बार्टी’चे महासंचालक श्री. वारे आदी उपस्थित होते. यावेळी विक्रोळी कन्नमवार नगर धोकादायक इमारती पुनर्वसन बैठकीचे आयोजनही करण्यात आले. या बैठकीला आमदार प्रा.वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. तसेच वसतिगृहबाबत बैठकीला आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.

लहुजी उस्ताद साळवे आयोगाने मातंग समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या शिफारसी व शिफारसींनुसार संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा. ‘बार्टी’कडून प्रकाशित होणाऱ्या प्रकाशनांबाबत आचारसंहिता असली पाहिजे. ‘बार्टी’ ने मातंग समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा अहवाल सादर करावा. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कार्यवाहीच्या आढाव्यासाठी एक महिन्यात पुन्हा बैठक लावण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

बैठकीत मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण, ‘बार्टी’मार्फत तसेच अण्णाभाऊ साठे आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, सांगली जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे स्मारक, मुंबई येथील स्मारक, लहुजी साळवे यांचे स्मारक आदी कामांचाही आढावा घेण्यात आला.

विक्रोळी येथील कन्नमवार नगर व अन्य ठिकाणी असलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाबाबतही आढावा घेण्यात आला. या प्रश्नाबाबत सोसायट्यांच्या अध्यक्षांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

त्याचप्रमाणे राज्यातील वसतिगृहांमधील भोजन, निवास आदींचे प्रश्न सोडविण्यात यावे. वसतिगृहांमध्ये अनियमितता झाली असल्यास ती दूर करावी. याबाबत वसतिगृहांच्या तपासण्या कराव्यात, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले. बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडले. सचिव श्री. भांगे यांनी बैठकीत माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/ससं/

‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारा’चे उद्या आळंदी येथे वितरण

मुंबई, दि. २५ : राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ आळंदी येथे उद्या रविवार दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रदान करण्यात येणार आहे. ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे (२०१९-२०), ह.भ.प.बाबा महाराज सातारकर(२०२०-२१), स्वामी श्री गोविंददेव गिरी (२०२१-२२), मा.बाभूळगांवकर शास्त्री महंत(२०२२-२३) यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. ५ लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवीतकर, डॉ. यू. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्रीमती उषा देशमुख, ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते, डॉ.किसन महाराज साखरे, मधुकर जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी ‘भक्तीसागर’ या भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. गायक अजित कडकडे, कार्तिकी गायकवाड, समीर अभ्यंकर, आसावरी, विशाल भांगे, भजनसम्राट ओमप्रकाश हे भक्तीगायनाचा कार्यक्रम सादर करणार असून कमलेश भडकमकर हे संगीत संयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन प्राची गडकरी करणार असून पुरस्कार प्रदान समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित ‘अवघा रंग एक’ झाला व ‘हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील रॉबीनहूड दत्तोबा भोसले मातोळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रेक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

 

तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 25 : “पर्यावरणपूरक जीवनशैलीसह विकासाचा समतोल राखण्यासाठी तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन करण्याची आणि सामाजिक कार्याची संधी उपलब्ध करून देऊन,पर्यावरण  हा विषय चळवळ म्हणून तो लोकाभिमुख बनविणे, काळाची गरज आहे”, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे ‘हवामान आणि पर्यावरण’ या विषयांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने महा यूथ फॉर क्लायमेट अॅक्शन (MYCA मायका) प्लॅटफॉर्मद्वारे ‘युथ लीडरशिप फॉर क्लायमेट अॅक्शन’ या ऑनलाइन स्वयं-गती अभ्यासक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी आज ऑनलाईन पद्धतीने केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे सचिव शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनोद मोहितकर, युनिसेफचे युसूफ कबीर, पर्यावरण तज्ज्ञ संस्कृती मेनन, विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यासह विद्यार्थी व प्राचार्य उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पर्यावरणाच्या संवर्धनातूनच जगातील सर्व देशांचा सर्वंकष विकास साधला जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लाईफ फॉर एन्व्हायर्न्मेंट’ ही संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना आत्मसात करुनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल. सध्या आपण एकाच वेळी अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट पाहत आहोत. हे चिंताजनक असून पर्यावरण अधिकाधिक संवेदनशील होत आहे. तरुण पिढीने हा मुद्दा समजून घेऊन त्यावर संशोधन केले पाहिजे. त्यासाठी हा अभ्यासक्रम  हवामानातील विविध घटकांवर मार्गदर्शन करेल, असे सांगून तरुणांनी वातावरणातील बदलाबाबत काम करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. विकास रस्तोगी म्हणाले की,  उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिसेफ, महाराष्ट्र यांनी एकत्र येऊन १३ जिल्ह्यांतील, ६ विद्यापीठांतील ३,हजार महाविद्यालये आणि २ दशलक्ष तरुणांना पर्यावरण या विषयासाठी पुढील तीन वर्षांसाठी जोडून घेतले आहे. या भागीदारीची सुरुवात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२०, राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (NAS) २०२१, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) २०२२ यांच्या शिफारशींनुसार करण्यात आली असून या विषयावर काम करण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढावा, म्हणून हा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, ६ हजार २०० हून अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाईल आणि ३ हजार महाविद्यालयांमध्ये ‘ग्रीन क्लब’ तयार करून अध्यापन सामग्री तयार करणं, जलसंधारण उपक्रमांबद्दल अल्पकालीन मोहिमांचं प्रशिक्षण आदी उपक्रम राबवले जातील. पर्यावरणविषयक कौशल्य, उद्योजकता हे सुद्धा ग्रीन क्लब अंतर्गत उपक्रमांचा एक भाग आहे. त्यात तरुणांना पाण्याची बचत करण्यासंबंधी सात उपाययोजना शिकवल्या जातील, त्यामुळे पुढील तीन वर्षांमध्ये महाविद्यालयांमध्ये ४३ दशलक्ष घन लिटर पाण्याची बचत होईल,

“राज्यातील महाविद्यालये आणि त्यातील प्राध्यापकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे” असे आवाहन डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी  केले.

युनिसेफचे श्री. युसूफ कबीर म्हणाले की, हवामानाच्या चिंतेपेक्षा हवामानाबद्दल जागरुकता असावी “युनिसेफचे धोरण हे हवामान आणि पर्यावरण शाश्वतता या विषयाकडे वळण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करून, त्यावर काम करण्यासाठी सक्षम बनवण्यावर भर देणारे आहे. हा अभ्यासक्रम तरुणांना हवामान रक्षक बनण्यासाठी आणि इतरांना कृती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”

सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया आणि अक्वाडॅम (ACWADAM) पुणे यांच्या तांत्रिक सहाय्याने उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि युनिसेफ महाराष्ट्र यांनी एकत्र येऊन या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये पाच युनिट्स असून त्यापैकी दोन हवामान बदल आणि जल व्यवस्थापन हे दोन अनिवार्य आहेत. ऊर्जा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन हे इतर तीन युनिट्स वैकल्पिक आहेत. या अभ्यासक्रमामध्ये लिखित साहित्य, चित्रे, प्रश्नमंजुषा, समस्या व उपाय, व्हिडिओ आणि संदर्भ लिंक तसेच पर्यावरणाशी संबंधित कौशल्यं आणि नोकरीच्या संधी आदी माहिती उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम विनामूल्य असून इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये पूर्ण करता येईल. महाराष्ट्रातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुण या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. यशस्वी उमेदवारांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल. हा अभ्यासक्रम  https://www.mahayouthnet.in  वर उपलब्ध आहे.

००००

प्रवीण भुरके/ससं/

विधानसभा लक्षवेधी

केमिकलमिश्रित हळदीच्या वापराला आळा घालण्यासाठी लवकरच बैठक –  मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 25 : काही देवस्थानांच्या ठिकाणी केमिकल मिश्रित हळदीचा वापर केला जातो. येणाऱ्या काळात यावर उपाययोजना करण्यासाठी  लवकरच फलोत्पादन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि अन्न व औषध प्रशासन अशा तीन विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी हळदीमध्ये होत असलेली भेसळ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, आयुर्वेदातील हळद हे एक महत्वाचे पीक आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. राज्यात हळदीच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. हिंगोली येथे स्थापन होणाऱ्या हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यावर्षीच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण लागू करण्यात आले आहे. आगामी काळात हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

वर्षा आंधळे/विसंअ/

 

नदी रुंदीकरणातील पाच प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन तत्काळ करण्याचे निर्देश –  मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 25 : पोयसर नदी रुंदीकरण प्रकल्पातील 5 प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन तातडीने करण्याचे निर्देशित करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सुनील प्रभू, रवींद्र वायकर आणि सुनील राणे यांनी ‘प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन’ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की,  मालाड येथील पोयसर नदीच्या रुंदीकरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 21 मे 2021 रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या कामातील 197 प्रकल्पबाधितांपैकी 10 प्रकल्पबाधित हे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील आहेत. आतापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 187 प्रकल्पबाधितांची पात्रता निश्चित करण्यात आली असून 185 प्रकल्पबाधितांपैकी 175 प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मालाड पूर्व येथे कायमस्वरुपी करण्यात आले आहे, तर 10 पैकी 5 प्रकल्पबांधितांचे पुनर्वसन यापूर्वी करण्यात आले असून आज उर्वरित 5 प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कायमस्वरुपी करण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच 2 अपात्र बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.

मुंबई उपजिल्हाधिकारी  (अतिक्रमण/ निष्कासन) यांनी तयार केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 10 प्रकल्पबाधितांपैकी 5 प्रकल्पबाधित हे 1 जानेवारी 2000 नुसार पात्र असून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित 5 प्रकल्पबाधित हे सशुल्क पात्र असून त्यांचे धारेण नसल्यामुळे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. 1 जानेवारी 2000 ते 1 जानवेारी 2011 पर्यंतच्या पुनर्वसन योग्य झोपडपट्टीना सशुल्क पुनर्वसन करण्याचे धोरण 16 मे 2018 रोजीच्या शासन निर्णयाने निश्चित करण्यात आले आहे. सशुल्क पुनर्वसनास पात्र असलेल्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकांचे शुल्क निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

वर्षा आंधळे/विसंअ/

 

फिनले मिलसंदर्भात 5 एप्रिलला बैठक घेणार – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 25 :  एनटीसीअंतर्गत येणारी फिनले मिल 25 मार्च 2020 पासून पूर्णत: बंद आहे. येत्या 5 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत या मिलसंदर्भातील सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी फिनले मिल बंद असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोविडपासून एनटीसीच्या फिनलेसह सर्वच मिल पूर्णत: बंद आहेत. मध्यंतरी जानेवारी 2021 पासून 4 ते 5 महिने फिनले मिल सुरु करण्यात आली होती. पण, परत ती बंद पडली. एनटीसीच्या सर्वच गिरण्या 25 मार्च 2020 पासून बंद असल्याने महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. एनटीसीच्या मिल सुरु कराव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने फिनले मिलचे पुनरुज्जीवन करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती वस्त्रोद्योग विभागाकडून राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला करण्यात आलेली आहे.

वर्षा आंधळे/विसंअ/

 

आधार प्रमाणीकरण करताना बोटांचे ठसे पुसट येत असल्यास लाभार्थींना कार्ड नॉमिनी सुविधा – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 25 : अनेक वृद्ध व्यक्तींच्या बोटांचे ठसे पुसट येत असल्याने आधार प्रमाणीकरण करताना समस्या निर्माण होतात. आता अशा लाभार्थींसाठी ‘कार्ड नॉमिनी’ सुविधा 29 डिसेंबर 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी रेशन वाटपाबाबच्या धेारणात बदल करण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, 14 हजार 282 लोकांनी आतापर्यंत कार्ड नॉमिनी सुविधेचा लाभ घेतला आहे. येणाऱ्या काळात बोटांचे ठसे न मिळाल्यास नवीन तंत्रज्ञान वापरुन लाभार्थींचे ‘आय इम्प्रेंशन’ करुन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळेल, यासाठी अभ्यास करण्यात येत आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत रास्त भाव दुकानातील शिधा वितरण करताना लाभार्थींची बायोमेट्रिक ओळख झाल्यांनतर शिध्याचे वितरण होते. जानेवारी 2023 च्या अन्नधान्याचे वितरण करण्यात आले असून फेब्रुवारी 2023 मधील अन्नधान्याचे वाटप सुरु आहे. एखाद्यावेळेस तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थींला अन्नधान्य न मिळाल्यास त्या महिन्याचे अन्न ई-पॉस मशीनमध्ये कॅरी फॉरवर्ड होऊन त्या लाभार्थ्यांला पुढील महिन्यात मिळते. सलग 3 महिने शिधापत्रिकेवर अन्नधान्य न घेतल्यास लाभार्थींचे अन्नधान्य बंद करण्यात येत नसल्याचे मंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

वर्षा आंधळे/विसंअ/ 

एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 25 : राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खननाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली असून या पथकाने एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत 662 प्रकरणात कारवाई करण्यात आली असून दंडात्मक रक्कम वसूल करून शासनस जमा करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय अवैधपणे दगड उत्खनन करून क्रशर चालविण्यात येत आहेत, अशा खडीक्रशरवर कारवाई करून बंद करण्यात आले आहेत असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

राष्ट्रीय संरक्षण अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 25 : “नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार आहे”, असे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील मौजे नायगाव येथे महाज्योती संस्थेमार्फत मुलीकरिता निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास 24 कोटी रुपयांचा निधी महाज्योती संस्थेस उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात असून जागा हस्तांतरणाची कार्यवाही चालू आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

धाराशिवमध्ये अवैध दारु विकणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या हद्दपारीचे निर्देश देणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. 25 : अवैध पद्धतीने दारु विक्री करणाऱ्या व्यक्तीवर तीनपेक्षा जास्त गुन्हे नोंद असल्यास त्या व्यक्तीस जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे निर्देश देण्यात येतात. धाराशिवमधील दोन व्यक्तींवर अनुक्रमे 4 आणि 5 गुन्हे दाखल असल्याने त्यांना हद्दपार करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात अवैध दारु विक्री सुरु असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली आणण्यात येत आहे. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांची संख्याही 12 वरुन 25 करण्यात आली आहे.येणाऱ्या काळात अवैध दारु विक्री रोखण्यासाठी अधिक भरारी पथक आणि तपासणी नाक्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदभरती टीसीएस कंपनीमार्फत केली जाणार असून एकूण 667 पदे 5 महिन्यांमध्ये भरण्यात येणार आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथम इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी 290 पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी 114 पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. तर उर्वरित 176 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

बुलढाण्यातील एनएल हेल्थ केअर सेंटरच्या कामांबाबत विभागीय चौकशी करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 25 : बुलढाणा येथील जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालयामार्फत एन.एल. हेल्थ केअर सेंटरला देण्यात आलेल्या कामाबाबत तक्रारी असल्याने याप्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक येथील कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

डॉ. सावंत म्हणाले की,  एन.एल. हेल्थ केअर सेंटरला मॉड्युलर ओटी आणि लेबर रुम तयार करण्यासाठी 23 कोटी रुपयांचा पुरवठा आदेश देण्यात आला असून याबाबत 80 टक्के काम करण्यात आले आहे.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

 

 ‘स्वाधार’ योजना तालुकास्तरावर नेणार – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 25 : सध्या जिल्हास्तरावर स्वाधार योजना राबविण्यात येत असून आगामी काळात ही योजना तालुकास्तरावर नेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य लहू कानडे, बळवंत वानखेडे, दीपक चव्हाण अणि प्रा. वर्षा गायकवाड यांनी ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणारी तरतूद’ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक कल्याणाकरिता विविध योजना राबविल्या जातात. यावर्षी आतापर्यंत उपलब्ध झालेल्या निधींपैकी 72 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. तर आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी 80 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील शासकीय निवासी वसतिगृहामध्ये लिप्ट कार्यान्वित करण्याच्या सूचना विभागाला देण्यात येतील. याशिवाय विभागामार्फत देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना आणि ‘स्वाधार’ योजनेत काही अनियमितता झाली असल्याचे दिसून आल्यास याबाबतही आयुक्तांमार्फत तपासणी करण्यात येईल, असेही श्री. राठोड यांनी सांगितले.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 25 : भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी या रुग्णालयाच्या कामासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

डॉ. सावंत म्हणाले की,  या रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासंदर्भात 10.38 कोटी रुपयांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर केले होते. त्यापैकी 5 कोटी 95 लाख निधी मंजूर होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आला असून या विभागामार्फत रुग्णालयातील कामे करण्यात येत आहे. आता हे रुग्णालय 100 खाटांवरुन 200 खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाले आहे. इमारतीमधील विद्युत कामांकरीता कार्यकारी अभियंता, ठाणे यांना 10.59 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दिले आहे. आगामी काळात दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

रुग्णवाहिकेसंदर्भात लवकरच नवीन धोरण आणणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 25 : रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. त्यादृष्टीने रुग्णवाहिका जलद गतीने उपलब्ध होण्याबरोबरच याबाबतची नवीन कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी नवीन धोरण आणण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ. राहुल आहेर, राजेश पवार, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होण्याबाबतची  लक्षवेधी सूचना मांडली होती.

डॉ. सावंत म्हणाले की,  रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. तर रुग्ण मृत झाल्यावर शववाहिकेची आवश्यकता असते. दोन्हींची आवश्यकता असली तरी त्याची रचना वेगळी असते. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत एक निश्चित धोरण ठरविण्यात येत आहे. शहरांपासून गावांपर्यंत दोन्ही वाहिका तातडीने उपलब्ध होण्यासाठी नगरविकास, ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य यांची एक संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

– मंत्री उदय सामंत

मुंबई, दि.25: केंद्र शासनामार्फत अमृत योजना 2 ला निधी देण्यात येतो. हा निधी त्वरित मिळावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सुलभा खोडके यांनी अमृत 2 योजनेंतर्गत करावयाची कामे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की,  राज्यात केंद्र पुरस्कृत अमृत – 2 अभियानाची अंमलबजावणी 14 जुलै 2022 पासून करण्यात येत आहे. अमरावती शहर पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाच्यसा अमृत – 2 अभियानाच्या पोर्टलवर प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून या अभियानासाठी निधी न आल्यास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीसमोर सादर करण्यात येईल.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

 

त्रयस्थ तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच देयके अदा – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 25 : सिन्नर नगरपरिषदेअंतर्गत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सरस्वती नदी सौंदर्यीकरण व विकास कामे हाती घेण्यात आली. याबाबतची कामे करताना ई निविदा प्रक्रिया अवलंबून न्यूनतम धारकास काम देण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर तसेच कामाची गुणवत्ता त्रयस्थ तपासणी अहवाल आल्यानंतरच संबंधित कंत्राटदारास देयके अदा करण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर नगरपरिषदेमार्फत शहरात करण्यात आलेल्या निकृष्ट कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की,  नदीतील गाळ काढणे, नदी काठी संरक्षक भिंत बांधणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे इत्यादी कामे यावेळी करण्यात आली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली असून त्यांच्याकडून संबंधित कंत्राटदाराने काम समाधानकारक केल्याचा अहवाल दिला आहे.

सिन्नर नगरपरिषदेने पाणी पुरवठा योजना कंत्राटदाराकडून ताब्यात घेतलेली नाही. सदर पाणी पुरवठा योजनेकरिता नियुक्त्‍ कंत्राटदाराने करारातील तरतुदीनुसार प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यापासून 1 वर्ष कालावधीसाठी देखभाल करणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराला प्रकल्प पुर्णत्वाची तारीख अमान्य असल्याने मा. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे.लवकरच सिन्नर नगरपरिषदेसंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे मंत्री सामंत यावेळी म्हणाले.

00000

वर्षा आंधळे/विसंअ/

‘महागाव’मध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून घडले परिवर्तन

कृषी विभाग यशकथा-२ 

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यात महागाव येथे  शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक गट स्थापन करुन त्यामाध्यमातून शेतीला शेतमाल प्रक्रिया उद्योगाची तसेच सामुहिक शेतीची जोड देऊन परिवर्तन घडविले आहे.

महागाव येथे आत्मा अंतर्गत गुरुकृपा हा शेतकरी उत्पादक गट आहे. या शेतकरी उत्पादक गटाला नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाअंतर्गत गोदाम बांधणे आणि दाळमिल या दोन बाबींसाठी अनुदान देण्यात आले. त्यात गोदाम बांधकामासाठी १२ लाख तर दाळमिल साठी  ८ लाख रुपये इतके अनुदान शेतकरी गटाला देण्यात आले.

एक गोडावून; फायदे अनेक

या अनुदानातून गावात सुसज्ज गोडावून बांधण्यात आले आहे. या शेतकरी गटाचे सभासद शेतकरी आपल्या शेतातील उत्पादित माल याठिकाणी साठवून ठेवतात. त्यासाठी त्यांना कोणताही दर आकारला जात नाही. या सर्व मालाची नोंद ठेवली जाते. शेतमाल उत्पादित झाल्यानंतर लगेचच बाजारात भाव मिळत नाही, असे बऱ्याचदा घडते. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीतही शेतात उघड्यावर माल ठेवल्यानंतर तो माल खराब होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी शेतमाल गोदामात सुरक्षित तर ठेवता येतोच शिवाय बाजारात योग्य भाव मिळाल्यास तेव्हा विक्रीसाठीही नेता येतो. एकाच गोदामात अनेक शेतकऱ्यांचा माल उपलब्ध असल्याने व्यापारी थेट गावात येऊनच माल विकत घेऊन जातात. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाचतो. असे या गोदामामुळे शेतकऱ्यांना फायदे होत आहेत. सध्या या गोडावून मध्ये तूर, हरभरा, गहू साठविण्यात आला आहे.

दाळमिल मुळे शेतीमाल प्रक्रिया शक्य

याच गटाला दाळमिलसाठीही अनुदान देण्यात आले असून दाळमिल उभारण्यात आली आहे. या भागात बरेच शेतकरी हे तूर, हरभरा, उडीद, मुग असे डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेत असतात. या शेतकऱ्यांना आता आपला माल बाजारात विकतांना तो प्रक्रिया करुन डाळीच्या भावात विकता येणार आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार हे नक्कीच.

एकत्रित पद्धतीने ‘कांदा बी उत्पादन’

या गटाच्या शेतकऱ्यांनी कांदा बी उत्पादक कंपनीशी करार करुन  ३० एकर क्षेत्रावर कांदा बी लागवड केली आहे. एका एकरात ५ क्विंटल बी उत्पादन होते. एका क्विंटल ला ४५ हजार रुपये या दराने त्याला भाव मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी जवळपास दोन ते सव्वा दोन लाख रुपयांचे उत्पादन घेईल. एकत्र व गटाने शेतकरी संघटीत असल्याने त्यांना हे शक्य झाले.

‘शेडनेट’द्वारे संरक्षित पिकांचे उत्पादन

याच गटाचे एक शेतकरी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांना शेडनेट साठी ८ लाख १५ हजार रुपये इतके अनुदान मिळाले आहे. त्यातून त्यांनी आपल्या २० गुंठे क्षेत्रावर संरक्षित पिकांचे उत्पादन घेतले. त्यात प्रामुख्याने त्यांनी  उन्हाळी काकडी, शिमला मिरची या पिकाची लागवड केली व उत्पादन घेतले.  या पिकांसाठी त्यांनी बाजारपेठ संपर्क प्रस्थापित केला होता.  त्यातून त्यांना एकूण साडे तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले.

०००

संकलन – अकोला जिल्हा माहिती कार्यालय

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...