गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
Home Blog Page 1544

मिरज दर्गा येथे आवश्यक सुविधांसाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्ग्याचा आणि मिरज येथील सर्व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी सर्व समावेशक विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या.

मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा हा सुमारे 600 वर्षापूर्वीचा असून दर्ग्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता सौंदर्य व पावित्र्य याचा समतोल राखत नवीन विकास आराखडा येत्या दोन आठवड्यात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळे विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पालकमंत्री डॉ. खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकास आराखडा करताना दर्ग्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारावा. दर्ग्यासमोरील अतिक्रमणे काढावीत. आराखड्यामध्ये वाहनतळ, सर्व सोयीयुक्त यात्री निवास, नगारखाना, प्रवेशव्दार व कमान, फायर फायटिंग, सोलर सिस्टिम, अंडरग्राउंड वायरिंग, चौक सुशोभिकरण व दर्ग्याच्या शेजारी असणाऱ्या सरपंच कार्यालयाचे नूतनीकरण या बाबीनाही प्राधान्य द्यावे. 

याबरोबरच इदगाह मैदान, खासबाग परिसर, अनुभव मंडप, तंतूवाद्य भवन, चर्मकार समाज भवन आदी बाबींचा सर्व समावेशक विकास आराखडा समावेश करावा. जैन समाजाच्या मुलांसाठी असलेल्या वस्तीगृहाची दुरुस्ती व दीपस्तंभ, ख्रिचन समाज स्मशान भूमी व पंढरपूर रोडवर असणाऱ्या चर्च परिसरातील दुरुस्तीची कामे आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषण करणाऱ्या कारखाने, कंपन्या, यंत्रणांवर कठोर कारवाई करणार – पालकमंत्री

जिल्ह्यातील नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या  कारखाने, कंपन्या, यंत्रणा यांची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

कृष्णा नदीत 10 मार्च 2023 रोजी मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले, या घटनेला जबाबदार असणाऱ्या घटकांचा व त्यावरील केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रदूषण नियंत्रण महामंडळ व प्रशासकीय यंत्रणा यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. औताडे यांच्यासह सबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

कृष्णा नदीत सोडण्यात येत असलेल्या प्रदूषीत पाण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, महानगरपालिकेच्या पंपहाऊसमधील पंप वारंवार बंद पडत असल्याने प्रदूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. परिणामी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर नदीतील मासे मृत्यूमुखी पडले. ही अत्यंत दुर्देवी घटना असून नागरिकांच्या आरोग्यालाही यातून मोठ्या प्रमाणावर धोका संभवू शकतो. त्यामुळे या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या यंत्रणा, वरिष्ठ अधिकारी यांच्यावरच कठोर कारवाई करण्यात यावी. गेल्या अनेक वर्षापासून शेरीनाल्यावरील एसटीपी प्लाँट चे काम सुरू आहे. सदरचा प्लाँट तात्काळ पूर्ण करून सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्न गांर्भियाने सोडविणे आवश्यक आहे. प्रदूषित पाणी नदीत मिसळू नये यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना त्वरीत करा. सन 2022-23 आणि 2023-24 मध्ये प्रदूषण टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल महानगरपालिकेकडील यंत्रणांनी तात्काळ सादर करावा. महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सदैव सज्ज असणे आवश्यक आहे. नदी प्रदूषणासाठी जबाबदाऱ्या असणाऱ्या घटकांना प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हा प्रशासनानेही नोटीसा बजावाव्यात. यावेळी त्यांनी सावळी येथील भूजल प्रदूषणाबाबतही चर्चा केली.  जिल्ह्यात नदी प्रदूषण करणाऱ्या तसेच हवा प्रदूषण करणाऱ्या घटकांचा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने स्पेशल ड्राईव्ह घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सामान्य माणसाला आनंद देणारा आनंदाचा शिधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) :-  राज्य शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असून आनंदाचा शिधा वितरण या निर्णयामुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री डॉ. खाडे यांच्याहस्ते 100 फुटी रोड येथील शासनमान्य रास्त भाव दुकान येथे पात्र लाभार्थीना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी  महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलाचा समावेश असून प्रतिसंच मात्र 100 रूपये या सवलतीच्या दराने पात्र मिळणार आहे. शिधा गुढी पाडव्यापासून एक महिन्यात वितरीत केला जाणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

सातारा, दि. 28 :- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण 3 लाख 95 हजार 431 शेतकऱ्यांना 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा लाभ दिला असून ही योजना राबविण्यात सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.

शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्त्वूपर्ण निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी  अल्पदराने कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या दरात सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे. पिक कर्जाची उचल 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील हंगामामध्ये घेतलेले पिक कर्ज व ते विहित मुदीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी) तसेच दि. 28 जून 2010 च्या शासन निर्णय प्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शासन निर्णय दि. 11 जून 2021 अन्वये सन 2021-2022 वर्षापासून पीक कर्ज घेतलेल्या व विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत दिली जात असल्याने शेतकऱ्यांना 0 टक्के व्याज दराने पीक कर्ज मिळत आहे. हे या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात स्टेट पुल (सर्वसाधारण) मधून 3 लाख 13 हजार 188  शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयांचा लाभ, जिल्हा नियोजन समिती (सर्व साधारण) योजनेमधून 81 हजार 310 शेतकऱ्यांना 12 कोटी 99 लाख 99 हजार 985 , समाज कल्याण विभाग (विशेष घटक योजन) मधून 933 शेतकऱ्यांना  10 लाख रुपयांचा असे एकूण 3 लाख 95 हजार 431 शेतकऱ्यांना 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा या योजनेंतर्गत लाभ देऊन ही योजना राबविण्यात राज्यात सातारा जिल्हा अव्वल ठरला आहे.

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

नवी मुंबई,दि.28:- कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अंधार कोठडी सहायक म्हणून  कार्यरत असलेले श्री. संजय नवल कोळी, वय 52 वर्षे यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी दु:खद निधन झाले.

श्री. कोळी यांच्यावर त्यांचे मूळ गाव चोपडा जि.जळगाव या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री. संजय नवल कोळी हे जून 1995 पासून 28 वर्षे शासकीय सेवेत कार्यरत होते.  ते आजारी असल्याने काही महिन्यांपासून त्यांच्यावर एमजीएम हॉस्पीटल नवी मुंबई आणि जे.जे.रुग्णालय मुंबई येथे उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचे दु:खद निधन झाले. यावेळी  त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कोकण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्त्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच प्रति थेंब अधिक पीक योजना राबवण्यात येत आहे.      

पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाखालील क्षेत्र वाढविणे. अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. पिकांची व्याप्ती वाढविणे. सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरास चालना देणे. कृषि आणि फलोउत्पादन विकासासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार, विकास आणि प्रसार करणे. कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी, सूक्ष्म सिंचन प्रणालीची स्थापना आणि देखभाल करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, असा या योजनेचा  उद्देश आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाच्या खर्चाच्या 45 ते 55 टक्के इतके अनुदान देण्यात येते. त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना संचाच्या अनुज्ञेय खर्चाच्या 55 टक्के किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 55टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांना संचाच्या अनुज्ञेय खर्चाच्या 45 टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 45 टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम दिली जाते. तसेच या योजनेचा लाभ घेतलेला शेतकरी हा अटल भूजल योजनेत निवड झालेल्या गावातील असल्यास त्यास अटल भूजल योजनेचा लाभ दिला जातो. तर इतर लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत पूरक अनुदानाचा लाभ दिला जातो. याअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पुरक अनुदान देण्यात येते. असे एकूण अनुक्रमे 80 ते 75 टक्के मर्यादेत अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी  https:mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर शेतकरी योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत 7/12 व 8 अ चा उतारा, समाईक क्षेत्र असल्यास साध्या कागदावर इतर खातेदारांचे संमती पत्र, शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनांचा लाभ घेताना अर्ज मंजूर झाल्यापासून 7 वर्षांच्या कालावधीसाठी लाभार्थ्याने शेतमालकाशी केलेला नोंदणीकृत करार. 7/12 उताऱ्यावर विहीर, शेततळे इत्यादींवर सिंचन सुविधांची नोंद नसेल तर याबाबत साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांसाठी) इ. कागदपत्रे जोडावीत. 

सूक्ष्म सिंचनामध्ये पाणी हे थेट पिकास दिले जाते. ठिबकमुळे पाण्याची 30 ते 80 टक्के बचत होते. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकांची जोमदार आणि सतत वाढ होते. पिकाला गरजेनुसार पाणी मिळते. मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा समन्वय साधला जातो. कमीत कमी वेगाने पाणी दिले जात असल्याने मुळाच्या सभोवती ते जिरते, त्यामुळे पिकांची जोमाने वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळते. द्रवरुप खते देता येतात. खतांचा 100 टक्के वापर तर होतोच शिवाय खताच्या खर्चात 30 ते 35 टक्के बचत होते. खताचा अपव्यय टळून सम प्रमाणात खते देता येतात. जमिनीची धूप थांबते  त्याचबरोबर तणांवर नियंत्रणास मदत होते. असे सुक्ष्म सिंचनाचे फायदे आहेत.

सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 1 हजार 389 शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी 3 कोटी 85 लक्ष  रुपयांचे अनुदानही वाटप करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हे शासनाचे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याअनुषंगाने  पाण्याची कमी उपलब्धता असणाऱ्या प्रदेशात सिंचनाच्या चांगल्या सुविधा उभारून त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा मार्ग आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी ठिबक सिंचन हे कमी पावसाच्या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरत आहे.

 

हेमंतकुमार चव्हाण,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

जैव इंधनाची गुणवत्ता आणि घनता यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे – डॉ.अनबलगन

पुणे  दि.२८: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) तर्फे ‘मिशन समर्थ’ अंतर्गत आयोजित जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांच्या हस्ते करण्यात आले. बायोमासचा उपयोग करतांना बाष्पकाच्या रचनेनुसार ज्वलन क्षमतेत वाढ करण्यावर आणि जैव इंधनाची गुणवत्ता व घनता यावर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे, असे डॉ.अनबलगन यावेळी म्हणाले.

हॉटेल नोवोटेल येथे आयोजित या कार्यशाळेला महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप, मिशन समर्थचे संचालक सुदीप नाग, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, दिवाकर गोखले, अभय हरणे, कार्यकारी संचालक राजेश पाटील, डॉ.नितीन वाघ, नितीन चांदूरकर, राजेशकुमार ओसवाल, अंकुश नाळे, पंकज नागदेवते, प्रफुल्लचंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.

डॉ.पी.अनबलगन म्हणाले की, महाराष्ट्राचे सर्वच क्षेत्रात लक्षणीय योगदान आहे. बायोमास पेलेटच्या वापराच्या क्षेत्रातही राज्यात मोठी संधी आहे. बाष्पकासाठी कोळशाचा तुटवडा आणि विद्युत ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता बायोमासचा उपयोग महत्त्वाचा आहे. जैव इंधनाचा वापर करणे व पर्यावरणपूरक वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भारत सरकार विद्युत मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘मिशन समर्थ’ अंतर्गत औष्णिक वीज केंद्रात कोळशासोबत किमान ५ टक्के इतक्या प्रमाणात बायोमास पेलेट इंधनाचा मिश्रित वापर करण्याचे निर्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रास बायोमास इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन त्यासाठी शेतकरी, लघु व मध्यम उद्योजक यांची एक दीर्घकालीन पुरवठा साखळी व्यवस्था स्थानिक पातळीवर तयार होऊन त्यायोगे कृषी व लघु–मध्यम उद्योग क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी असा प्रयत्न केला जाणार आहे.

महासंचालक रवींद्र जगताप म्हणाले की, शेतकऱ्याच्या हिताचा हा विषय असल्याने त्याचा क्षेत्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. पेलेट उत्पादनात शेतकऱ्यांनी पुढे यावे यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे. महाराष्ट्रात २०३० पर्यंत ३५ ते ४० हजार मेगावॅट विजेची मागणी राहू शकते, त्यापैकी ३० टक्के नाविनीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल. प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर भेट देऊन वास्तव परिस्थिती जाणून घ्यावी लागेल. स्थानिक स्तरावरील लहान प्रयोगांना प्रोत्साहित करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

मिशन समर्थचे संचालक सुदीप नाग म्हणाले की, शेतीत जैव इंधन जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पीक काढल्यानंतर शेत पुन्हा तयार करण्याची ही स्वस्त आणि सुलभ पद्धत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी जुलै २०२१ मध्ये ‘मिशन समर्थ’ सुरू करण्यात आले. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे हे या मिशनचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. बायोमासच्या उपयोगाने आताच्या पायाभूत सुविधेच्या साहाय्याने वीजनिर्मिती करणे शक्य आहे. मिशनच्या माध्यमातून पेलेट उत्पादकांना त्याच्या उपयोगाची शाश्वती देण्यात येऊन प्रोत्साहनही देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी सहकाराच्या माध्यमातून बायोमास एकत्रित करणे आणि पेलेट तयार करून उत्पन्न वाढवावे. महाराष्ट्रात ८२ दशलक्ष मे.टन कृषी उत्पादन होते. त्यापैकी ५२ दशलक्ष मे.टन बायोमास उपलब्ध होते. घरगुती व इतर उपयोग वजा जाता २१ दशलक्ष मे.टन बायोमास पेलेट उत्पादनासाठी उपयोगात आणणे शक्य आहे. उद्योजक आणि शेतकऱ्यांनी याबाबत विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

संजय मारुडकर यांनी प्रास्ताविक केले. जैव इंधनाशी संबंधित सर्व घटकांना एकत्रित आणून बायोमास पेलेट इंधनाचा वापर वीजनिर्मितीत करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणासाठी महानिर्मितीतर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जैव इंधन क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान, संधी, आव्हाने, संशोधन, बाजारपेठ विश्लेषण आणि कर्ज उपलब्धतेवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जैव इंधन विषयाशी संबंधित माहिती देणारे विविध  स्टॉल्स देखील प्रदर्शित करण्यात आले. कार्यशाळेला शेतकरी, पेलेट उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, लघु/मध्यम उद्योजक प्रतिनिधी, महानिर्मितीचे अधिकारी उपस्थित होते.

०००

कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. २७ –  कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत एक महिन्याच्या आत बैठक लावणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. या प्रश्नाबाबत सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले. या विषयी कोयनानगर येथे आंदोलक व प्रशासकीय अधिकारी यांची  बैठक संपन्न झाली. त्यावेळी पालकमंत्री श्री.  देसाई बोलत होते.

या बैठकीस श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसीलदार रमेश जाधव, पुनर्वसनचे तहसीलदार विवेक जाधव, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर व कायमस्वरूपी सोडवणे हा शासनाचा उद्देश असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हा प्रश्न सोडवण्यासाठी एक साचेबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने काम सुरू केले आहे. तसेच ज्या धरणग्रस्तांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले.

फक्त खातेदार यांनी केलेलेच अर्ज घ्यावेत अशा सूचना देऊन पालकमंत्री श्री देसाई पुढे म्हणाले की, कोणत्या गावात पुनर्वसन योग्य जमीन आहे त्याची यादी तलाठी सजा, ग्रामपंचायत येथे उपलब्ध करावी. लाभ द्यावयाच्या धरणग्रस्तांची यादी लवकरात लवकर पूर्ण करावी, सर्व यंत्रणांनी समन्वयाने युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पालकमंत्री श्री देसाई यांनी साधला आंदोलनकर्त्यांशी संवाद

बैठकीत नंतर पालकमंत्री श्री देसाई यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी एक महिन्याच्या आत बैठक बोलावण्याबाबतचे पत्रही पालकमंत्री श्री देसाई यांनी दिले व आंदोलन स्थगित करण्याचे आवाहनही केले. त्यास आंदोलनाचे नेते श्री. पाटणकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उद्या आंदोलन स्थगित करणार असल्याचे सांगितले.

इतर सर्व जिल्हाधिकारी यांच्याशीही करणार चर्चा

कोयना धरणग्रस्तांचे सातारा सह आणखी पाच जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्या सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून तातडीने माहिती मागवण्यात येत आहे. तसेच या बाबत त्यांच्याशी चर्चाही करणार असल्याचे पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले. उच्च स्तरीय समितीची बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
०००००

शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील

अमरावती, दि. २७ : तहसील कार्यालय हे तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू असते. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या मागण्या, प्रश्न व अडीअडचणी या ठिकाणाहून सोडविण्यात येते. सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित झाले असून प्रशासनाची व्याप्ती वाढली आहे. तहसील कार्यालयाच्या नवनिर्मित वास्तूच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन आज झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, अधीक्षक अभियंता श्रीमती रुपा गिरासे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वच क्षेत्रात देश प्रगती करीत आहे. अमरावती जिल्ह्याला संत महात्मे व थोर पुरुषांची परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय ठेवा असून क्षेत्रफळाने सुध्दा जिल्हा मोठा आहे. जिल्हा अग्रगण्य राहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने लोकाभिमुख अर्थसंकल्प मांडला आहे. सामान्य जनतेच्याहिताच्या विविध योजना, प्रकल्प शासनाव्दारे पूर्ण केल्या जात आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सामान्य लोकांना 600 रुपये प्रती ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन वाळू धोरण अंमलात आणले आहे. तसेच शेतजमीन मोजणी अगदी अचूकपणे होण्यासाठी रोव्हर मशीनव्दारे मोजणी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून मोजणीचा अर्ज केल्यापासून दोन महिन्याच्या आत संबंधितांना जमीन मोजणीसह नकाशा घरपोच उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन सामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे श्री. विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या उत्तम नियोजनातून जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष भरुन काढण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ या मोहिमे अंतर्गत सर्वांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यात सर्व पांदण रस्ते, शिव रस्ते शेतकऱ्यांना शेतमाल ने-आण करण्यासाठी खुले करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

इंदू कंस्ट्रकशन तर्फे तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून त्यासाठी 771 कोटी खर्च आला आहे. सुमारे 2271 चौ.मि. बांधकाम करण्यात आले असून सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेश सोनवाल यांनी प्रास्ताविकेतून दिली.

तहसील कार्यालयाच्या नवीन वास्तूच्या माध्यमातून सामान्य नागरिक, शेतकरी, गोरगरीबांची कामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत, असे आमदार प्रताप अडसळ यांनी सांगितले. वीजेच्या बचतीसाठी प्रशासनाच्या सर्व शासकीय कार्यालयात सौर उर्जा प्रकल्प बसविण्यात यावेत, असे आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तहसीलदार यांच्या कक्षाचेही मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

00000

लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 27 :- लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन शर्मा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृषी आधारित उद्योग तसेच अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारते आहे. या क्षेत्रातील उद्योगांसाठी मोठ्या संधी आहेत. राज्यातील शेतकरी प्रयोगशील असून राज्यातील विविध शहरांमध्ये यासाठी इकोसिस्टिम तयार करण्यात आली आहे. या क्षेत्रातील उद्योग समूहांना नक्कीच सहकार्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन म्हणाले, अन्न प्रक्रिया उद्योगांत विस्तार करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असल्याचे श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर येथे मॉल्स उभारण्यासाठी ग्रुप उत्सुक असल्याचे तसेच नागपूर येथे अन्न प्रक्रिया युनिट उभारणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच लवकरच ग्रुपचे अध्यक्ष भारतास भेट देणार असून त्यावेळी सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

हायपरमार्केट क्षेत्रातील हायपरमार्केट व्यवसायाचा प्रणेता

LuLu Group

जगभरातील महत्वाच्या ठिकाणी यशस्वी व्यावसायिक संस्थांसह  वैविध्यपूर्ण असा LuLu समूह आहे. समूह आखाती प्रदेशाच्या आर्थिक स्थितीत एक प्रमुख योगदानकर्ता बनला आहे. हायपरमार्केट ऑपरेशन्सपासून ते शॉपिंग मॉल डेव्हलपमेंट, वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार, आदरातिथ्य मालमत्ता आणि रिअल इस्टेटपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात ग्रुप अग्रणी आहे.   LuLu समूह प्रामुख्याने मध्य पूर्व, आशिया, अमेरिका आणि युरोपमधील 23 देशांमध्ये कार्यरत आहे.

LuLu Group हा ‘LuLu Hypermarket’ या क्षेत्रातील हायपरमार्केट व्यवसायाचा प्रणेता आहे. त्याने शॉपिंग मॉल्सचा पोर्टफोलिओ तयार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

——000——-

केशव करंदीकर/विसंअ/

 

 

लाभ घ्या… भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा

नागपूर जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना फायदेशीर असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. फळबागांचे क्षेत्र वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा या हेतुने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाही अशा शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचा लाभ देण्याकरिता सन 2018-19 पासून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु झाली.  सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांनी फळबागांच्या लागवडीसारख्या फायदेशीर प्रस्ताव स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेची व्याप्ती व अंमलबजावणी

नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली या 6 जिल्ह्यात या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीची प्रक्रिया महाडीबीटी या प्रणालीद्वारे राबविण्याचे निर्देशित असल्यामुळे महाडीबीटी प्रणाली सुरु झाल्यापासून योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी मागील प्राप्त अर्ज  किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर क्षेत्रमर्यादा फळबाग लागवडीकरिता अनुज्ञेय आहे.

आंबा, काजु, पेरु, डाळींब, का. लिंबु, मोसंबी, संत्रा, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम,फणस, अंजिर व चिकु आदी 16 बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत एकापेक्षा जास्त फळपिक लागवड शक्य आहे. मग्रारोहयो अंतर्गत 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभ घेणे शक्य आहे.

यापूर्वी रोहयो किंवा अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्रमर्यादेपर्यंत लाभ घेणे शक्य आहे. लाभार्थी पात्रता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाही, असे शेतकरी वैयक्तीक शेतक-यांनाच योजनेचा लाभ. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. स्वतःच्या नावे ७/१२ असणे आवश्यक. संयुक्त उतारा असल्यास संमतीपत्राचे बंधन. जमिन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ उता-यावर कुळाचे नाव असल्यास कुळाचे संमतीपत्र आवश्यक. प्राप्त अर्जामधून सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड. अनुदान मर्यादा- शंभर टक्के राज्य योजना• खड्डे खोदणे, कलमे/रोपे लागवड करणे, पिक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे याकरिता शासनाचे अनुदान देय. जमिन तयार करणे, माती व शेणखत/सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खते देणे, आंतरमशागत करणे, काटेरी झाडांचे कुंपण करणे इ. कामे पुर्ण करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील, लाभार्थ्यास तीन वर्षाच्या कालावधीत 50:30:20या प्रमाणात अनुदान देय आहे. लाभार्थ्याने लावलेली फळझाडे पहील्या वर्षी किमान ८०% व दुस-या वर्षी किमान 90 टक्के जगविणे आवश्यक आहे.

अर्जदाराची नोंदणी व आधार प्रमाणीकरण

महाडीबीटी पोर्टल च्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे व आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक, सदर प्रक्रीया शेतक-यांना एकदाच करावी लागेल. महाडीबीटी पोर्टलचे स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या बाबीकरिता https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत. संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. • अर्जदार शेतक-याने पहिल्यांदा वापरकर्त्यांचे नाव (युजर नेम) व संकेतशब्द (पासवर्ड) तयार करावा. अर्ज सादर करताना शेतक-यांनी 20 रुपयांचे शुल्क व 3.60 रुपयांची जीएसटी, असे एकूण 23.60 रुपये ऑनलाईन भरायचे आहेत,त्यानंतर महाडीबीटी महामंडळाकडे शेतक-यांचा अर्ज पुढील प्रक्रीयेसाठी जातो. अर्ज भरल्यानंतर शेतक-यांनी संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा पडताळून पाहायला हवा. अर्जदारास शेतक-याने अर्जात नमूद केलेल्या माहितीनूसार पूर्वसंमती रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहणार असल्याने अर्जातील माहिती अचूक असावी.

योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या शेतक-यांनी अर्ज करणे अपेक्षित आहे. आवश्यक कागदपत्रे, ७/१२ उतारा, ८ अ उतारा सामाईक क्षेत्र असल्यास विहीत नमुन्यातील इतर खातेदारांची सहमती पत्र,आधार कार्ड आधार लिंक बँक खाते क्रमांक माती परिक्षण अहवाल (कागदी लिंबु, संत्रा व मोसंबी या लिंबुवर्गीय फळपिकासाठी)

फळबागांचे क्षेत्र वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा या हेतूने सुरु झालेल्या या योजनेत जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घेणेकरिता नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा ऑनलाईन पध्दतीने https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.

 सुनिलदत्त जांभूळे

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...