बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 1532

मातीकाम प्रात्यक्षिकाचा जी २० परिषदेच्या सदस्यांनी घेतला आनंद

मुंबई, दि. २९ :- सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीजतर्फे जी – 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हस्तशिल्प, लगद्यापासून बनविलेली उत्पादने, काष्ठशिल्प तसेच मातीपासून तयार होत असलेल्या वस्तूंचे प्रात्यक्षिकासह प्रदर्शन मांडले आहे. या प्रात्यक्षिकाचा जी २० च्या सदस्यांनी आनंद घेतला.

मुंबईत जी 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले असल्याची माहिती मातीकाम कलावंत अबय पंडित यांनी दिली.

केंद्र शासनाने या परिषदेत आपली कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल श्री. पंडित यांनी शासनाचे आभार मानले. हे प्रदर्शन गुरूवार दि. ३० मार्च पर्यंत जी २० सदस्यांना पाहता येणार आहे.

00000

अर्चना शंभरकर/विसंअ/

जी २० परिषदेत जगातील सर्वोत्तम ‘माईल्ड’ कॉफीचे प्रदर्शन

मुंबई, दि. 29 : सुमारे 8 हजार कोटी रुपये किमतीची कॉफी भारतातून निर्यात होते, अशी माहिती कॉफी बोर्डाचे विपणन उपसंचालक डॉ. बाबू रेड्डी यांनी दिली. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या कॉफी बोर्डच्या माध्यमातून भारतातील उच्च प्रतीची कॉफी प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतात उत्पादन आणि प्रक्रिया होणाऱ्या कॉफीविषयी अधिक माहिती देताना श्री. रेड्डी म्हणाले की, सुमारे १२० देशांमध्ये भारतातील कॉफी निर्यात होते. यात युरोप, मध्य पूर्व देशांमध्ये अधिक मागणी आहे. जगभरात तयार होणाऱ्या कॉफी उत्पादकांमध्ये भारताचा सातवा क्रमांक आहे. तर, जगभरातून कॉफी निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. सावलीत उगवलेली, हाताने तोडलेली आणि सूर्यप्रकाशात वाळवलेली ही ‘माईल्ड’ कॉफी जगभरातील कॉफी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. याबद्दलची अधिक माहिती https://indiacoffee.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जी 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.

00000

अर्चना शंभरकर/विसंअ/

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी २० परिषदेत प्रदर्शन

मुंबई, दि. 29 : पाच लाख रूपये किलो किमतीचे केसर तसेच सहा हजार रूपये किलो किमतीची वेलची जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या कार्यगटाच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या स्पाइस बोर्डच्या माध्यमातून भारतातील हजारो वर्षांची परंपरा असलेले मसाले प्रदर्शित करण्यात आले आहेत.

या विषयी माहिती देताना स्पाइस बोर्डाचे विपणन संचालक बसिस्थ नारायण झा यांनी सांगितले की, सुमारे 180 देशांमध्ये निर्यात होणाऱ्या या मसाल्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. 800 प्रकारचे मसाले, त्यांचे अर्क, मिश्रण आदींना जगभरात मागणी आहे. पोषक घटक पदार्थ, आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यात हे पदार्थ वापरले जातात. जगात मसाल्यांच्या व्यवसायाची सुमारे 33 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. यापैकी 47 टक्के एवढा व्यापार एकट्या भारतातून होतो. याबाबतची अधिक माहिती www.indianspices.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जी – 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.

00000

अर्चना शंभरकर/विसंअ/

लोकराज्य : मार्च २०२३ (अर्थसंकल्प विशेषांक)

लोकराज्य – मार्च २०२३

लोकराज्यचा मार्च २०२३ चा ‘अर्थसंकल्प’ विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. 29 : देशाच्या अमृतकाळातील पंचामृतावर आधारित अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, भरीव भांडवली पायाभूत सुविधांचा विकास, सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृतांचा समावेश करण्यात आला आहे. या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने लोकराज्य मार्च 2023 या महिन्याच्या अर्थसंकल्प विशेषांकाचे प्रकाशन केले आहे.

या अर्थसंकल्पात शेतकरी कष्टकरी, महिला, तरुण व वंचित उपेक्षित घटकांना केंद्रस्थानी  ठेवण्यात आले आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आणि समतोल न्याय देणारा तसेच राज्याला नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. तसेच राज्याला गडकिल्ल्यांचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. या वारशाची जपणूक, जतन आणि संरक्षण करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केलेली आहे. अशा अनेक घटकांसाठीच्या योजनांची माहिती  या विशेषांकात देण्यात आलेली आहे. यासोबतच ‘महिला विशेष’ लेख समाविष्ट केले असून महिलांचे आरोग्य शिक्षण, महिलांचा सर्वांगीण विकास, महिला सक्षमीकरण याविषयीचे लेख या बरोबरच मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती या अंकात देण्यात आली आहे.

हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच http://13.200.45.248/ या पोर्टलवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

 

लोकराज्य : मार्च २०२३ (अर्थसंकल्प विशेषांक)

http://13.200.45.248/?p=92395

0000

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

अमरावती, दि. 29 : जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वतरांगा, उत्तुंग सागवृक्ष, मिश्र वनांचे पट्टे, धबधबे यांनी समृद्ध मेळघाटात गौर, सांबरसारख्या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत विपुल जैवविविधता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळण्याचा योग प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या, तसेच अमरावतीकरांच्या आनंदात भर घालणारा आहे.

व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्व, व्यवस्थापन नियोजन, स्थानिक समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास विकास, वाघांची संख्या अशा सात विषयांबाबत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल प्रकल्पातर्फे टायगर फोरमकडे सादर करण्यात आला. फोरमच्या चमूने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेटी देऊन या कामांची पाहणी केली. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी या चमूत सहभागी असतात. या चमूने प्रत्यक्ष कामे, व्यवस्थापनाचा दर्जा, संरक्षण दर्जा याची तपासणी करून अहवाल ग्लोबल फोरमला दिला. त्यानुसार फोरमकडून जागतिक मानक प्रकल्पाला जाहीर करण्यात आले आहे.

‘कॅटस्’नंतर ‘मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॅल्यूशन’तर्फे विविध विषयांवर पाहणी केलेली असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सकारात्मक गुण प्राप्त करेल, असा विश्वास प्रकल्पाच्या संचालिका जयोती बॅनर्जी यांनी व्यक्त केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संवर्धन व संरक्षण कार्यात अहोरात्र झटणा-या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य या कामासाठी मिळाले असून, या सर्वांचे अभिनंदन श्रीमती बॅनर्जी यांनी केले.

मजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी ‘परिसंस्था – आधारित दृष्टीकोन’ यावर केंद्र सरकारचा भर – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

मुंबई, दि. 29 : मुंबईत जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या प्रारंभिक बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज संबोधित केले. उपस्थितांना  संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने जागतिक व्यापार आणि व्यवसायांसाठी मोठ्या संधी निर्माण करून भारताला आशेचे बेट बनवले आहे. व्यापार आणि गुंतवणुकीच्या वाढीसाठी एक मजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी  परिसंस्था -आधारित दृष्टीकोन या  दोन प्रमुख पैलूंवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारतातील  एकूण निर्यात आणि गुंतवणुकीत अतिशय वेगाने वाढ झाल्याची माहिती त्यांनी जी 20 बैठकीत दिली. “जागतिक निर्यातीतील भारताचा वाटा 1990 मधील 0.5 टक्क्यांवरून 2018 मध्ये 1.7 टक्क्यांवर तर 2022 मध्ये 2.1 टक्क्यांवर पोहोचला. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये भारताची एकूण निर्यात 568.57 अब्ज डॉलर्स इतकी राहिल्याचा अंदाज आहे.  भारत सरकारच्या सक्रिय आणि एकात्मिक विकासाच्या दृष्टिकोनामुळे हे शक्य झाले .”

भारताच्या जी 20 अध्यक्षतेचा उद्देश व्यापक विकासाच्या तत्त्वांचे पालन करून व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा आहे असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले.

एक मजबूत वित्तीय जाळे  तयार करणे आणि विकासाप्रति परिसंस्था -आधारित दृष्टिकोन यावर केंद्र सरकार भर देत असून जागतिक व्यापार आणि व्यवसाय तसेच सर्वांगीण विकासात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मजबूत वित्तीय जाळे उभारणी

केंद्र  सरकारने लोकांसाठी कर्ज, बचत आणि गुंतवणूक वाढीसाठी विविध संधींसह  एक मजबूत वित्तीय  परिसंस्था निर्माण करण्याला प्रोत्साहन दिले. “जन धन योजनेंतर्गत बँकिंग खाती उघडून त्याद्वारे बँकिंग सेवांमध्ये प्रवेश सक्षम करणे हे या दिशेने पहिले मोठे पाऊल आहे”. सामान्य जनतेसाठी कर्ज आणि गुंतवणूक सुलभ करण्यात बँक खाती एक महत्त्वपूर्ण घटक  म्हणून काम करतात, असे ते म्हणाले.“

ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या रूपात कर्जाच्या उपलब्धतेसह रूपे डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी  बँक खाती सक्षम करण्यात आली.  तसेच ही बँक खाती आधार अंतर्गत लोकांच्या विशिष्ट डिजिटल ओळखपत्राशी देखील जोडली गेली असून कर्ज , विमा आणि गुंतवणूक उत्पादनांसह संपूर्ण डिजिटल वित्तीय  परिसंस्था तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निधी हस्तांतरण आणि पैसे पाठवणे यासाठी होणारा खर्च कमी झाला आहे. डिसेंबर 2022 मध्ये युपीआयने रु. 12.82 ट्रिलियन इतक्या मूल्याच्या  7.82 अब्ज पेक्षा अधिक  व्यवहारांची नोंद केली असून 2016 मध्ये युपीआयचा प्रारंभ झाल्यापासून हा एक नवीन विक्रम नोंदला गेला आहे .”

ठेवींमधील एकूण  वाढ आणि सक्रिय आर्थिक परिसंस्थेमुळे कंपन्या आणि स्टार्ट-अप्ससाठी स्वस्त भांडवल उपलब्ध होण्यास मदत झाली आहे असे ते म्हणाले.

“आज, 107 युनिकॉर्नसह भारतीय स्टार्ट-अप परिसंस्था ही जगातील तिसरी सर्वात मोठी परिसंस्था आहे. अलिकडेच  आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाच्या वापराला चालना देण्यासाठी भारताने प्रयत्न केले आहेत. स्पेशल रुपी वोस्ट्रो अकाउंट्स  (SRVA) उघडून त्याद्वारे भारतीय बँकिंग नियामकाने 18 देशांमधील  देशी आणि विदेशी अधिकृत डीलर (AD) बँकांना मान्यता दिली आहे” असे ते म्हणाले.

गेल्या 5 वर्षात, विशेषत: कोरोना महामारी नंतरच्या  काळात भांडवली बाजार आणि गुंतवणूक सेवा उद्योग अतिशय झपाट्याने वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी  दिली.

“शेअर बाजारात 142 लाख नवीन वैयक्तिक गुंतवणूकदार सहभागी झाल्यामुळे किरकोळ सहभाग वाढला आहे. गुंतवणुकीचा कमी खर्च आणि गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची उपलब्धता हे गुंतवणुकीतील वाढीमागचे प्रमुख कारण आहे.”

देशात गुंतवणुकीचे वातावरण आणखी सुधारण्यासाठी केंद्र सरकारने भारतात पारदर्शक आणि मुक्त  एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) धोरण  हाती घेतले याबाबतही त्यांनी माहिती दिली.  एप्रिल 2000 ते मार्च 2022 पर्यंत देशात एकूण 847 अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक आली.  ही थेट परकीय गुंतवणूक 101 देशांमधून आली तसेच  केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमधील 57 क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.”

मंजुरी आणि परवानगी देण्यासाठी एकल  डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम   सुरू करण्यात आली आहे अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. “आता बँका आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे सामान्य लोकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात  आहे. आज, वित्तीय समावेशन निधी (FIF) अंतर्गत, नाबार्ड योग्य  आर्थिक साक्षरता आणि समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी  अधिकाधिक शिबिरे आयोजित करू शकते तसेच  मोबाईल व्हॅन चालवू शकते” असे ते म्हणाले.

परिसंस्थेवर आधारित विकासाचा दृष्टीकोन

विकासासाठी परिसंस्थेवर आधारित दृष्टीकोन स्वीकारणे, हा भारताच्या व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील विकासाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले. “सरकारने मुख्य उत्पादक किंवा उत्पादकांपासून ते अंतिम वापर वापरकर्ते, या मूल्य साखळीमधील सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतामधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत, विविध योजना सुरू केल्या असून, यामध्ये ‘व्यवसाय सुलभतेवर’ विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.”  व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने एकमेकांवर प्रभाव टाकणारे आणि क्लिष्ट अनुपालन नियम रद्द केले आहेत, तसेच नियमनमुक्ती आणि परवाने रद्द करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 9,000 पेक्षा जास्त अनुपालन कमी केले गेले आहेत, आणि 3,400 पेक्षा जास्त कायदेशीर तरतुदी गुन्हेगारीच्या व्याख्येतून वगळण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त, स्थिर आणि पारदर्शक कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. व्यापार सुविधेसाठी, सीमा शुल्क आणि इतर अप्रत्यक्ष करांचे दर, सोपे अनुपालन आणि फेस-लेस मुल्यांकनासह, तर्कसंगत करण्यात आले आहेत.” कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली देशांतर्गत समन्वय आणि तरतुदींची अंमलबजावणी, हे दोन्ही सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय व्यापार सुविधा समिती (NCTF) ची स्थापना करण्यात आली आहे. उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत, सरकारने भारतात फार्मा, अर्थात औषध निर्माण, ऑटोमोबाईल आणि व्हाईट गुड्स यांसारख्या विविध क्षेत्रांमधील उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे. ही योजना 14 प्रमुख उत्पादन क्षेत्रांसाठी सुरू करण्यात आली असून, याचा एकूण खर्च रु. 3 ट्रिलियन रुपये इतका आहे.”

एक-जिल्हा-एक-उत्पादन (ODOP) उपक्रम ही ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाची आणखी एक अभिव्यक्ती आहे. “सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलवर एक-जिल्हा-एक-उत्पादन (ODOP) अंतर्गत, उत्पादनांच्या 200 पेक्षा जास्त उत्पादन श्रेणी नोंदवण्यात आल्या आहेत.

सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना (एमएसएमईं) भेडसावणाऱ्या निधी तरलतेच्या समस्यांचे निराकरण करण्यामध्ये, ट्रेड रिसीव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टम (TReDS) प्रणाली ही एक ‘गेम चेंजर’ (परिवर्तन घडवणारी) ठरली असून, ही प्रणाली कॉर्पोरेट खरेदीदारांकडून एमएसएमईना प्राप्त होणाऱ्या बिलामध्ये अनेक अर्थ पुरवठादारांच्या माध्यमातून सूट देते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, व्यापाराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) मॉडेल अंतर्गत पायाभूत गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. “सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पावर प्रभाव टाकणारा आपला भांडवली खर्च 13.7 लाख कोटी इतका वाढवला आहे, जो गेल्या वर्षीच्या 10 लाख कोटींच्या GDP गुंतवणूक खर्चाच्या 4.5% म्हणजेच, 3.3% इतका आहे. कोरोना महामारीच्या काळातही, 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज अशा प्रकारे आखले गेले, की त्यामुळे  देशांतर्गत मागणी वाढली, कंपन्यांद्वारे निधीच्या रोख हस्तांतरणा ऐवजी, रोजगार निर्मितीला आणि उत्पादना वाढीला चालना मिळाली. यामुळे भारताला महामारी नंतरच्या काळात महागाई नियंत्रणात ठेवायला मदत झाली.”

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, सरकारने देशातील व्यापार पायाभूत सुविधांच्या एकात्मिक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. “रस्ते, रेल्वे मार्ग, जलमार्ग, विमानतळे, बंदरे, सार्वजनिक परिवहन, आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा, यांसारख्या मल्टी-मॉडल पायाभूत सुविधांना पूरक ठरतील, अशा प्रकारे पायाभूत सुविधा प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण देखील अशा प्रकारे आखण्यात आले आहे की, लॉजिस्टिकसाठीचा खर्च सध्याच्या GDP च्या 13% वरून 7.5% पर्यंत कमी होईल, आणि यामुळे भारतीय निर्यात क्षेत्राला जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत उतरणे सोपे होईल.”

डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास हा देशातील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राच्या विस्तारासाठी महत्त्वाचा घटक आहे. “डिजिटायझेशनमुळे, हाय-स्पीड इंटरनेटची उपलब्धता, डिजिटल ओळख निर्माण करणे आणि सरकारी सेवांची अखंड उपलब्धता या सुविधा उपलब्ध झाल्या असून, त्यामुळे नागरिकांच्या विकासाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. भारताच्या निर्यात क्षेत्रातील यशासाठी ओळखले जाणारे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (ICT), आर्थिक सेवा, शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रांच्या व्यापक विकासाला चालना देण्यासाठी वापरले जात आहे” असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले.

* * *

वन क्षेत्रातील ‘कुरणाचे कुंपण’ करणार शेताची राखण

‘कुंपणानेच शेत खाल्ले’ ही एक प्रचलित म्हण…आणि वन्यजीवांकडून होणारे पिकांचे नुकसान ही शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फिरवणारी बाब. वारंवार उद्भवणाऱ्या या संघर्षावर उपाय म्हणून वन हद्दीतच ‘कुरण विकास कार्यक्रम’  वन विभाग राबवित आहे. आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून हे वनांतील ‘कुरणांचे कुंपण शेताची राखण’ करणार आहे.

वन्यजीव शेतात शिरुन पिके खातात वा रानडुकरांसारखे प्राणी नासाडीही करतात. शेतकऱ्यांसाठी हा मोठा संघर्षाचा प्रसंग असतो. याच मुद्यावरुन वन विभागालाही शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. रहदारीचे नियम वा प्रवेश बंदी या सारख्या उपाययोजना वन्य प्राण्यांवर कशा लादायच्या? त्या तशा अशक्यच. पण ज्या अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शेतीकडे वळतात ते अन्न म्हणजेच ‘गवत’ त्यांना वन हद्दीतच उपलब्ध व्हावे,यासाठी वन विभागाने कुरण विकास कार्यक्रम राबविला आहे.

अकोला जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात  ९० हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यात ८५ हेक्टर वनक्षेत्रावर वन्य प्राण्यांचे खाद्य असणारे गवत लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. सन २०२२-२३  मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला असून व आता सन २०२३-२४ मध्ये दुसरा टप्पा सुरु झाला आहे.

दोन टप्प्यात कुरण विकास

पहिल्या टप्प्यात सन २०२२-२३ मध्ये बोरगाव (२० हेक्टर), बाभुळगाव (२५ हेक्टर), सोनखास (३० हेक्टर) या प्रमाणे व  याशिवाय बाभुळगाव मध्येच अतिरिक्त १५ हेक्टर क्षेत्रात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतूनही  कुरण विकास करण्यात आले असून एकूण ९० हेक्टर क्षेत्रावर कुरणांचा विकास करण्यात आला आहे.  या कुरण विकास कार्यक्रमाला १ कोटी २० लक्ष रुपये इतका खर्च आला आहे.

दुसऱ्या टप्प्यात पातुर (२० हेक्टर), सोनखास (३० हेक्टर), परांडा (३५ हेक्टर) अशी ८५ हेक्टरवर कुरण विकास कार्यक्रम राबविला जात आहे.

असा होतो ‘कुरण विकास’

कुरण विकासात गवताचे बी पेरले जाते. त्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील मोकळ्या जमिनींची नांगरणी करुन त्यावर सरी पद्धतीने गवत बी पेरले जाते. साधारण एक मिटर अंतरावर ह्या सरी पाडल्या जातात. काही वेळा गवताचे रोप तयार करुनही लागवड केली जाते. पाऊस पडण्याच्या आधीच हे काम केले जाते. पाऊस आल्यावर गवत अंकुरते. या कालावधीत तेथे प्राण्यांचा वावर होऊ दिला जात नाही. गवत मोठे झाल्यावर त्याचे बी पुन्हा जमिनीत पडते. पुढल्या पावसात हेच बी पुन्हा अंकुरते आणि गवताची घनता वाढते. साहजिकच हे गवत वन्य प्राण्यांचा अन्नाचा शोध सुरु होतो तेव्हा त्यांना खाता येते. या जादाच्या वेळात तिकडे शेतांमधील पिके शेतकऱ्यांच्या हाती आलेली असतात आणि नुकसान टळलेले असते.

विविध गवतांची लागवड

कुरण विकास करतांना वन्य प्राण्यांना (तृणभक्षी) आवडते असे गवत लागवड केले जाते. त्यात  मारवेल, मोती तुरा, पौन्या, काळी मुसळी, जंगली हरळी, गोंडे गवत, राई गवत, सोंद्री गवत, लहान गवत, गोंधळ, तिखाडी, वैद्य गवत या लागवड करता येणाऱ्या गवताच्या जाती आहेत. याशिवाय रान तूर, रान मुग, रान सोयाबीन, रान शेवरी या जंगली जातीही उगवत असतात. ही सर्व गवते वन्य प्राणी आवडीने खातात.

पाळीव जनावरांसाठीही चारा उपलब्धता

केवळ वन विभागातील जनावरे शेतात जाऊन पिके खातात असे नव्हे तर गावातील पाळीव जनावरे (गाय, बैल, म्हैस इ.) सुद्धा वन हद्दीत चरावयास जातात. त्यांच्या तेथील कुरणात वावरण्याने त्यांच्या खुरांखाली गवत दाबले जाते. जमिन कडक होऊन उगवण कमी होणे, अशा समस्या निर्माण होतात. त्यासाठी वन विभाग  लिलाव पद्धतीने लगतच्या ग्रामस्थांना ‘कापा आणि घेऊन जा’, या तत्त्वावर गवत नेण्यास परवानगी देतात. त्यामुळे गावातील पाळीव जनावरांनाही चारा उपलब्ध होऊन गावातील लोकांना रोजगारही मिळतो, असे सहा. वनसंरक्षक  सुरेश वडोदे यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांना अन्न उपलब्धता हाच उद्देश

मुळात वन्य प्राणी हे जंगलात खाद्याचे दुर्भिक्ष्य झाले की, मगच मानवी वस्त्यांकडे म्हणजेच शेतांकडे जातात. त्यासाठी त्यांना दुर्भिक्ष्य कालावधीत पुरेसे खाद्यान्न उपलब्ध करणे हाच या कुरण विकासाचा उद्देश आहे. जेणे करुन ते शेतांकडे जाणार नाही. जंगलांची घनता कमी होणे, जैविक ताणात वाढ, तापमानात होत असलेले बदल  यासर्व पर्यावरणीय कारणांमुळे खाद्य गवत कमी होते. त्यासाठी कुरण विकास कार्यक्रम राबवून गवत  लागवड व संवर्धन केले जात आहे, असे उपवनसंरक्षक अर्जूना के. आर. यांनी सांगितले.

सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर

दिवसाला आठ-दहा तास अखंडीत वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात वीजेच्या वेळापत्रकानुसार पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. ऐन हंगामातच अनेकदा वीजेचा लपंडाव सुरु असतो. अनेकदा सोसाट्याचा वारा सुटतो. वीजेच्या तारा, खांबांचे नुकसान होते. परिणामी वीजपुरवठा खंडीत होतो आणि शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. तसेच त्यातल्या त्यात रात्री वीजपुरवठा दिवसाच्या तुलनेत अखंडित राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पाणी द्यावे लागते, अशा वेळी जंगली डुकरे, कोल्हे, लांडगे, अस्वल आदी जंगली श्वापदांनी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटना घडल्याचे आपण पाहिले, वाचले आहे. जंगलाशेजारील गावांमध्ये तर वाघांच्या शिकारीस बळी पडले आहेत. असे असले तरीही शेतकऱ्यांसमोर पर्याय नव्हता. पिके वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान असायचे. पाण्याविना पिके करपून जात असताना त्या शेतकऱ्याची, त्याच्या मुला-बाळांची स्वप्न करपून जात असत. त्यामुळेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही, त्यांची मागणी होती.

आता राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप ही योजना आणली असून, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात सौरकृषि वाहिनीचा लाभ घेता येतो आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा अखंड विज मिळत असल्यामुळे पिकांना मुबलक पाणी मिळत आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा विजेची हमी मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून, आर्थिक स्तर उंचावला जात आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गंत शेतकऱ्यांना अनुदानही मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील २७५ गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली असून, अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे. अशाच एका युवा शेतकऱ्याचा सौर कृषि पंपाच्या आधारे आर्थिक स्तर ऊंचावला आहे.

परभणी तालुक्यातील वाडी दमई येथील माणिक प्रकाश वाटोडे या युवा शेतकऱ्याला शेतात विजेअभावी सिंचन करता येत नव्हते. पारंपरिक वीज वापरासाठी लागणारे विद्युत खांब आणि त्याला येणारा खर्च पाहता हे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. कुपनलिकेवर डिझेल इंजिन बसवून पिकांना पाणी देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. या शेतकऱ्याला मुख्यमंत्री सौरकृषि पंपाची माहिती मिळाली व त्याने मुख्यमंत्री सौर कृषिपंप मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज केला. आता हा युवा शेतकरी त्याच्या शेतात सौर कृषिपंपाच्या सहाय्याने वेगवेगळी पिके घेत असून, त्याचा आर्थिक स्तर कमालीचा सुधारला आहे. शिवाय रात्री उशिरापर्यंत शेतात थांबण्याची त्याला आवश्यकताही पडत नाही.

दिवसा शेतीपंपास विजेची उपलब्धता झाली असून, दिवसा विनाव्यत्यय वीज पुरवठा मिळत आहे. शिवाय कोणत्याही प्रकारचे वीज बिल भरण्याची आवश्यकता राहिली नसून, वीज बिलापासून मुक्तता मिळाल्याचे माणिक वाटोडे सांगतात. शिवाय माझ्या शेतात सिंचन सुविधेसाठी डिझेल पंपाशिवाय पर्याय नव्हता. त्यापेक्षा सौर कृषिपंपामुळे डिझेलच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च असून, शिवाय हे पर्यावरणपूरक आहे. सौर कृषिपंप घेण्यासाठी त्याला केवळ पाच टक्के शुल्क भरावे लागले असून, या योजनेवर असलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याची भावना श्री. वाटोडे व्यक्त करतात.

            माणिक वाटोडे या शेतकऱ्याने यंदा त्याच्या शेतात कापसाचे पिक घेतले असून, सिंचनाअभावी त्याला पिकावर बियाणे, लागवड, मजुरी आणि किटकनाशके यांच्यावर केलेला खर्चही बरेचदा भरून निघणे कठीण होत असे. आता मात्र, सौर कृषिपंपामुळे शाश्वत सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे तो उन्हाळ्यातही पिकांना पाणी देत आहे. एरव्ही जेमतेम उत्पन्न व्हायचे. यंदा मात्र सौर कृषिपंपामुळे दिवसा अखंड विज मिळाली आहे. यावर्षी दोन एकरामध्ये आतापर्यंत  २० क्विंटल कापूस झाला असून, अजून सात क्विंटल कापूस होण्याचा अंदाज त्याने व्यक्त केला आहे. शिवाय सौर कृषिपंपामुळे दिवसा विज मिळाल्यामुळे त्याने तुषार सिंचनातून जवळपास सात क्विंटल हरभरा पिक घेतले आहे. सौरकृषि पंपामुळे जनावरांना लागणारा चाराही उपलब्ध झाला असून, तो ही प्रश्न मिटला आहे. सौर कृषिपंपामुळे आता मला स्वत:च्या शेतात बारमाही पिक घेऊन आर्थिक उन्नती साधता येत असल्याचे माणिक वाटोडे हा युवा शेतकरी सांगतो.

प्रभाकर बारहाते, माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय, परभणी

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. अशी माणसे दुर्मिळ असतात. सर्वांना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली. पुणे शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. सर्वांना हवाहवासा नेता आपण गमावला. कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व धर्मियांना मदत केली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केले. अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा अतिशय मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे नररत्नाची खाण असल्याचे आपण म्हणतो, त्यापैकी खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. त्यांच्यामध्ये माणसे जपण्याची कला होती. महत्वाचे म्हणजे रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. बोलण्यामध्ये ते खूप चपखल होते. कोणालाही न दुखावता शालजोडीतून शब्द वापरुन आपला मुद्दा पटवून देण्याची हातोटी होती. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संसदीय कार्यमंत्री म्हणूनही त्यांचे कार्य नोंद घेण्यासारखे होते. शेतीवरही त्यांचे प्रचंड प्रेम होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचे केलेले काम सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. त्यांना सगळ्या क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. असे नेते तयार होण्यासाठी चाळीस- चाळीस वर्षे लागतात, अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून बापट कुटुंबियांचे सांत्वन

मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक उपस्थित होते.

0000

ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला आढावा

0
मतदान केंद्रांवरील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे दिले निर्देश नाशिक, दि. 5: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, निवडणूक पार...

‘स्मार्ट’द्वारे शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता….

0
कांचनी कंपनीची १०० कोटींच्यावर वार्षिक उलाढाल लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने राज्यात...

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई, दि .5:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" चित्रपटाच्या...

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज...

0
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव स्व. राज कपूर जीवनगौरव...

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

0
नवी दिल्ली, 06 : साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24...