मंगळवार, जुलै 29, 2025
Home Blog Page 153

नागपूर, कोराडी येथील माविमअंतर्गत प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. 20 : महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे नागपूर, कोराडी येथे महिलांकरिता आधुनिक गारमेंट सेंटर अंतर्गत महिलांना प्रशिक्षण, विद्यावेतन व रोजगार उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी व प्रकल्प सुरू करून अहवाल सादर करावा. कोराडी येथील विविध प्रकल्प कालबद्धतेत सुरू करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी महिलांना नियमित प्रशिक्षण आणि विद्यावेतन अदा करण्यासंदर्भात मागणी केली होती.

माविम अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे, प्रदुषणविरहित कलमकारी तथा वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, सॅनिटरी नॅपकीन निर्मिती प्रकल्प संदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या.

यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागाचे सह सचिव वी. रा. ठाकूर, महाव्यवस्थापक रवींद्र सावंत उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. महामंडळाअंतर्गत नागपूर येथे बचत गटातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या कोराडी येथील गारमेंट केंद्रात शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी व कालमर्यादेत केंद्र सुरू करावे. त्यांना नियमित सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना प्रशिक्षणासाठी दिले जाणारे विद्यावेतन वेळेत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या केंद्राद्वारे जवळपास २०० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

याचबरोबर महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध जागेत अगरबत्ती निर्मिती युनीट प्रकल्प मंजूर आहे. येथे अगरबत्ती व धूप निर्माण करण्याच्या माध्यमातून जवळपास १०० महिलांना ६ ते ७ हजार रूपये महिन्याला मिळणार आहेत. तसेच प्रदूषणविरहित कलमकारी तथा वस्त्रप्रक्रिया प्रकल्प आणि सॅनिटरी नॅपकीन निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून, हे प्रकल्प तातडीने सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार पाळण्याबाबतच्या सूचना जारी 

मुंबई, दि. २० : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या मुंबई तसेच राज्यात अन्यत्र दौऱ्यादरम्यान विहीत राजशिष्टाचाराचे पालन होण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य अतिथी नियम-२००४ अनुसार घोषित करण्यात आलेल्या राज्य अतिथींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या तसेच ज्यांना राज्य अतिथी समजण्यात येत आहे अशा मान्यवरांची विमानतळावर स्वागताची व निरोपाची व्यवस्था राजशिष्टाचार उपविभागाकडून करण्यात येते. तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील राजशिष्टाचार अधिकारी राज्य अतिथीचे स्वागत करण्यासाठी व त्यांना निरोप देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करतात.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना “कायमस्वरुपी राज्य अतिथी” (PERMANENT STATE GUEST) म्हणून घोषित करण्यात येत आहे.

त्यानुसार,  सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्य अतिथी नियम, २००४ नुसार यापुर्वीपासून घोषित राज्य अतिथी असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्याच्या दौ-यादरम्यान अनुज्ञेय राजशिष्टाचारविषयक सुविधा (निवास, वाहन व्यवस्था व सुरक्षा, इ.) पुरवण्यात येतात व अशा सर्व सुविधा त्यांना राज्यात सर्वत्र दौऱ्यादरम्यान अनुज्ञेय राहतील.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्यात मुंबई दौ-यावर असताना मुख्य सचिव अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलीस महासंचालक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि राज्यात अन्यत्र संबंधित जिल्हाधिकारी अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी तसेच पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी मान्यवरांचे स्वागत करावे.

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ०७ मार्च २०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र राज्याला भेट देणारे मान्यवर / अतिथी यांच्या भेटीदरम्यान ज्या विभागाच्या कामकाजासंदर्भात भेट देत असतील त्या विभागाने मान्यवरांच्या स्वागतासाठी व समन्वयासाठी संपर्क अधिकारी नेमण्याबाबत विहित केले आहे. त्यानुसार, मान्यवरांच्या मुंबई भेटीदरम्यान विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी तसेच राज्यातील अन्य जिल्हा येथील दौ-यादरम्यान संबंधित न्यायालय यांनी जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यान गट अ-श्रेणीतील राजपत्रित दर्जाचे संपर्क अधिकारी नेमावेत.

या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

००००

 

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी कालमर्यादेत सर्वेक्षण करा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

मुंबई, दि. 20 : कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेतला. या प्रकल्पाच्या  सर्वेक्षणाची  कामे निविदेत दिलेल्या कालमर्यादेत  करावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प (एमआरडीपी) मदत व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करणे आणि पवना धरण पर्यटन सादरीकरण संदर्भात जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या प्रकल्पातील कामांचेही सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जलदगतीने करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. सर्वेक्षणाचे काम गतीने झाल्यास पुढील  कामांची निविदा प्रक्रिया राबविणे सुलभ व सोयीस्कर होणार आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून अधिकचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्पातील

कामांचे सर्व्हेक्षण तीन महिन्यात पूर्ण करा

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास (एमआरडीपी) प्रकल्पातील कामांचे सर्वेक्षण गतीने करून ही काम तीन महिन्यात पूर्ण करावीत. यासाठी गरज भासल्यास अतिरिक्त एजन्सी नेमून सर्वेक्षणाचे काम जलदगतीने पूर्ण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा.

आतापर्यंत या प्रकल्पातील ज्या कामांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे याची माहिती ‘मित्रा’ यांच्याकडे देण्यात यावी. राधानगरी धरणाचे गेट व सांगली कोल्हापूर बंधारा येथे बॅरेज बांधणे या कामांच्या यावेळी आढावा घेण्यात येऊन ही कामे सुरू करण्याबाबत जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

तसेच पवना धरण येते पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरण केले. पर्यावरणाचा समतोल राखत प्रदूषणविरहित पर्यटन आराखडा तयार करावा. याबरोबरच धरण परिक्षेत्रातील अतिक्रमणे काढावीत, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

कामगारांच्या गरजेनुसार परिपूर्ण योजना तयार करावी – कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल

Oplus_131072

मुंबई, दि. 20 : कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या गरजेनुसार परिपूर्ण योजना तयार करून त्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा. या योजनेमध्ये इतर योजनांचा लाभ घेण्यास पात्र होणार नाहीत अशा कामगारांना लाभ मिळेल अशा तरतुदी कराव्यात, अशा सूचना कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

प्रभादेवी येथील कामगार व क्रीडा भवन येथे कामगार कल्याण मंडळाची आढावा बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते.

कामगार कल्याण मंडळाच्या सर्व योजनांचे सामाजिक मूल्यांकन करावे अशा सूचना देऊन राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले की, या योजनांचा आतापर्यंत किती कामगारांना लाभ झाला याची माहिती सदर करावी. कामगारांमध्ये मंडळाच्या योजनांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करावी. त्यासाठी समाजमाध्यमातून याचा प्रसार करावा. अपघाती मृत्यू, दुर्धर आजार, कामगारांच्या मुलांचे शिक्षण व सामाजिक सुरक्षा या बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, कला आणि क्रीडा प्रशिक्षण केंद्र अशा सुविधा उभारण्यात याव्यात. मंडळाच्या मालमत्तापासून महसूल उत्पन्न वाढवण्यासाठीचा आराखडा तयार करावा अशा सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.

बैठकीस कामगार आयुक्त रविराज इळवे, कामगार विभागाच्या उपसचिव रोशनी पाटील – कदम यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

‘एफएसएसएआय’ने राज्यांना फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली, दि. 20 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय)  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अवैधपणे फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. यासह फळांच्या कृत्रिम पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी आणून ग्राहकांच्या आरोग्याचे होणारे नुकसान थांबवून सकारात्मक पाऊल उचलले आहे.

सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्त आणि ‘एफएसएसएआय’च्या प्रादेशिक संचालकांना फळांच्या बाजारपेठा आणि मंडईंवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे, जेणेकरून कॅल्शियम कार्बाइडसारख्या (ज्याला सामान्यतः ‘मसाला’ म्हणतात) पिकवणाऱ्या एजंट्सचा अवैध वापर रोखता येईल.

या मोहिमेचा भाग म्हणून, ज्या ठिकाणी फळांची साठवणूक केली जाते तिथे जर कॅल्शियम कार्बाइडचा वापर आढळला तर त्याला परिस्थितीजन्य पुरावा मानून अन्न व्यवसाय ऑपरेटर (एफबीओ) वर खाद्य सुरक्षा आणि मानके (एफएसएस) कायदा, 2006 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

फळांच्या कृत्रिम पिकवणीसाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर खाद्य सुरक्षा आणि मानके (विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध) नियम, 2011 अंतर्गत कडकपणे प्रतिबंधित आहे. या पदार्थाचा वापर गंभीर आरोग्य धोके निर्माण करतो आणि यामुळे तोंडाला जखम, पोटात जळजळ आणि कर्करोगजन्य गुणधर्म निर्माण होऊ शकतात.

याशिवाय, एफएसएसएआयने असेही निर्देश दिले आहेत की, ज्या एफबीओज् कृत्रिमरित्या केळी पिकवताना रसायनांचा वापर करतात, त्यांच्यावरही कारवाई केली जावी. यासंदर्भात, प्राधिकरणाने एक सर्वसमावेशक मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत, त्या www.fssai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

यात फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलीन गॅसचा वापर कसा करावा याबाबत मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) स्पष्टपणे नमूद केली आहे. इथिलीन गॅस वापरण्याच्या सर्व पैलूंचा समावेश आहे, एफएसएसएआयने सर्व अन्न व्यवसाय ऑपरेटरांना या एसओपींचे पालन करण्याचे आणि सुरक्षित पिकवण पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

एफएसएसएआयच्या प्रसिद्धी पत्रकात एफएसएस कायदा, 2006 अंतर्गत कडक कारवाई होऊ शकते, त्यामुळे पुरवठा साखळीतील सर्व भागधारकांनी केवळ सुरक्षित आणि कायदेशीर फळे बाजारात आणावीत याची खातरजमा करावी. तसेच ग्राहकांनी सुरक्षित आणि दर्जेदार फळांचा आनंद घेण्यासाठी सतत सजग राहण्याचे, आवाहन करण्यात आले आहे.

००००

 

अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. २० : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्था चालवित असलेल्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे गरजेचे आहे. या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत विभागाने परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात यावा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

मंत्री श्री. शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी मंत्री बबनराव घोलप, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, सहसचिव सो. ना. बागूल, अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी. वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत प्रचलित असलेले शासन निर्णय कालबाह्य झालेले आहेत. ही बाब लक्षात घेता यामध्ये बदल करण्यात यावेत. तसेच अनुदानित  वसतिगृह कर्मचाऱ्यांना संस्थाचालकाकडून देण्यात येणारे मानधन वेळेवर देण्यात येते की नाही याबाबत विभागाने माहिती घ्यावी. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी अनुदानित  वसतिगृहांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा वसतिगृह व्यवस्थापनात मोठा वाटा आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

एमएमआरडीए प्रदेशासाठी १९ टीएमसी पाणीसाठा क्षमतेच्या पोशीर व शिलार प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई, दि. २० :- मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या नागरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेता पोशीर व शिलार या सुमारे १९ टी.एम.सी. पाणीसाठा करणाऱ्या प्रकल्पासाठी अनुक्रमे ६ हजार ३९४ कोटी व ४ हजार ८६९ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास  राज्य मंत्रिमंडळाने आज प्रशासकीय मान्यता दिली आहे.  या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

आज  मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या  बैठकीत या प्रकल्पांसाठी खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, हे दोन्ही प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहेत. मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर 12.344 टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित आहे.  प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 9.721 टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी 7.933 टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी 1.859 टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे. कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास 6394.13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस  मंजुरी देण्यात आली.  तर दुसरा प्रकल्प तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पांतर्गत मौजे किकवी येथे सिल्लार नदीवर 6.61 टी.एम.सी. क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. या योजनेस 4869.72 कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पांचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे.  त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे.

हे प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत.  हा प्रकल्प राबविण्याकरिता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.  प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.  या समितीत लाभदायक स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

मौजे हेत जल सिंचन व सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस मान्यता

सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास 2025.64 कोटी रुपयांच्या आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचेही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

*****

एकनाथ पोवार/विसंअ/

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 20 : गुंतवणूक आणि स्टार्टअप्सच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्य सरकारने स्टार्टअपसाठीची इको सिस्टिम उभी करण्यासाठी 120 कोटी रुपयांचा ‘फंड ऑफ फंड्स’ तयार केला आहे, ज्याद्वारे आर्थिक सक्षम आणि विक्रीयोग्य स्टार्टअप्सना आर्थिक मदत दिली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘सीएसआयआर’ आणि तीन प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव 2025 चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे करण्यात आले. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, ‘एनआयओ’चे संचालक प्रा.सुनील कुमार सिंह, ‘एनसीएल’चे संचालक डॉ.आशीष लेले, ‘नीरी’चे संचालक आणि डॉ.एस. वेंकट मोहन, स्टार्टअप उद्योजक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला समृद्ध समुद्रकिनारा लाभला असून येथे सागरी अर्थव्यवस्थेसाठी अफाट शक्यता आहेत. या आधारे हजारो स्टार्टअप्स उभे राहून नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर, किनारपट्टीची स्वच्छता कशी राखता येईल, मरीन इकॉनॉमीमध्ये शाश्वतता कशी आणता येईल, या प्रत्येक गोष्टीसाठी नाविन्यपूर्ण विचार आणि उपायांची गरज असून ‘स्टार्टअप’साठी ही एक मोठी संधी आहे. आज मरीन रोबोटिक्ससारख्या नवकल्पनांवर भर दिला जात आहे, जे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अनेक संस्था सॉलिड आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सतत नवे प्रयोग करत आहेत. समुद्र, नद्या किंवा नाले यामधील प्रदूषणाचा बहुतांश भाग हा औद्योगिक नसून, जास्तीत जास्त प्रदूषण अन्य तयार होणाऱ्या कचऱ्यामुळे होते. जर आपण शाश्वत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करू शकलो, तर पूर्वीप्रमाणेच आपले जलस्रोत स्वच्छ ठेवणे शक्य होईल. म्हणूनच या संपूर्ण क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि स्टार्ट-अप्सची अत्यंत गरज आहे.

आज भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इकोसिस्ट‍िमपैकी एक आहे. चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स उदयाला आले असून, भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल. नवी मुंबईत 300 एकरमध्ये देशातील सर्वात आधुनिक ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याचे काम सुरू आहे. येथे विज्ञान, तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील स्टार्टअप्सना इनक्यूबेट केले जाणार आहे. यासोबतच जागतिक दर्जाच्या 12 विद्यापीठांचे कॅंपस असलेली ‘एज्यु-सिटी’ देखील उभारली जाणार असून, त्यात एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतील.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्क्युलर इकॉनॉमीचा विशेष उल्लेख करत सांगितले की, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप्स उदयास येत आहेत. महाराष्ट्राला देशाच्या स्टार्टअप क्रांतीत अग्रणी बनवण्याचा संकल्प आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून आपण शिक्षण व इनोव्हेशन क्षेत्रात नेतृत्व करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

स्टार्टअप क्षेत्रात भारताची झेप, लहान शहरांमधून उदय – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग

भारत सरकारने स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवे मार्ग आखले आहेत. लहान शहरांमधून येणाऱ्या स्टार्टअप्सचा मोठा वाटा लक्षात घेता, सरकारच्या विविध योजनांचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले.

मागील १० वर्षांत भारत ‘फ्रॅजाइल फाइव्ह’ देशांमधून बाहेर येत थेट ‘टॉप फाइव्ह’ अर्थव्यवस्थांमध्ये पोहोचला आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताने ८१व्या क्रमांकावरून थेट ३९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. देशभरात सुमारे २.५ लाख स्टार्टअप्स सक्रिय असून, यापैकी ४९ टक्के सूरत, अहमदाबाद, अमृतसर, चंदीगड अशा लहान शहरांतून उदयास आले आहेत.

सध्या देशात ६४,४८० पेटंट्स फाइल झाले आहेत, ज्यापैकी ५६ टक्के पेटंट्स हे भारतातच शिक्षण घेतलेल्या, येथेच काम करणाऱ्या भारतीयांनी दाखल केले आहेत. ही बदलती मानसिकता आणि संधींचा विस्तार भारताला आत्मनिर्भर बनवत आहे. यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. निधी योजना, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेवलपमेंट अँड हार्नेसिंग इनोव्हेशन (NIDHI) अशा उपक्रमांतून आर्थिक, तांत्रिक व मार्गदर्शन साहाय्य दिले जात आहे. विशेष म्हणजे आता वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांसाठीही स्टार्टअप संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

जैव तंत्रज्ञान, समुद्र आधारित संसाधने (Marine Startups), कृषी तंत्रज्ञान (Agri-Tech) यांसारख्या नव्या क्षेत्रांतून पुढील २५ वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षित आहे. कृषी क्षेत्राचा जीडीपी वरील वाटा सध्या ३०-४० टक्के असून तो वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. युवा पिढीने स्टार्टअप क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, आणि ‘विकसित भारत 2047’ या स्वप्नपूर्तीसाठी आपली जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सिंग यांनीं केले.

नवीन स्टार्टअप धोरण तयार करण्याचा निर्णय – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

आज महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स आहेत. पण येणाऱ्या काळात ही चळवळ शहरातून गावापर्यंत पोहोचली पाहिजे. स्टार्टअप ही केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील समस्या सोडवणारी शक्ती बनली पाहिजे. त्याचबरोबर नवीन स्टार्टअप धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे धोरण केवळ शहरी भागापुरते मर्यादित न ठेवता, गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. स्टार्टअप क्षेत्र जन चळवळ बनावी, यासाठी हे धोरण तयार केले जात असून, त्यावर नागरिकांकडून मते मागविली असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

यावेळी एनआयओचे संचालक प्रा.सिंह, एनसीएलचे संचालक डॉ.लेले, नीरीचे संचालक आणि डॉ.वेंकट मोहन यांनी मनोगत व्यक्त केले.

००००

संजय ओरके/विसंअ/

 

सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेली आग दुर्दैवी – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

मुंबई, दि. 20 : सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना कामगार मंत्री ॲड . आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

ही दुर्घटना संपूर्ण जिल्ह्यास हादरवून सोडणारी असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा संचालनालयातील अधिकारी तातडीने घटनास्थळी  पोहोचले असून, दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेतील मयत कामगारांना कायद्याप्रमाणे सर्व लाभ मिळवून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले

याशिवाय अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून सोलापूर एमआयडीसीतील अतिधोकादायक, धोकादायक आणि रासायनिक कारखान्यांचे विशेष पथकाद्वारे ऑडिट करण्यात येणार असल्याचेही कामगार मंत्री ॲड .फुंडकर यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २१ ते २४ मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र आणि गोवा जवळ असलेल्या अरबी समुद्रावर 21 मे रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे आणि 24 मे पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा अजून तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही. या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या किनारपट्टीपासून एका सुरक्षित अंतरावर राहणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे राज्याला त्याचा थेट धोका नसणार आहे. मात्र त्याच्या प्रभावामुळे 21 ते 24 मे दरम्यान राज्याजवळील असलेला अरबी समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर पश्चिम किनारपट्टीवर 22 ते 24 दरम्यान पावसासह वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढू शकतो.

मासेमाऱ्यांनी कोणती सावधगिरी बाळगावी?

21 आणि 22 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर खोल समुद्र जोरदार वाऱ्यामुळे अधिक प्रमाणात खवळलेला राहील.

22 ते 24 दरम्यान रत्नागिरी, मुंबई, आणि पालघर जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर खोल समुद्र जोरदार वाऱ्यामुळे अधिक प्रमाणात खवळलेला राहील.

मासेमारांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे, आणि स्वतःच्या सुरक्षितेसाठी 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्रातील खोल भागांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

000

 

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

0
पुणे, दि.२८: लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना; शासन निर्णय निर्गमित

0
मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा...

नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८ :  नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून 'ग्रँड मास्टर' हा  किताब मिळविला आहे,...

महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू – क्रीडा...

0
पुणे, दि.२८: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल...

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे...

0
पुणे, दि. २८: पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण आदींच्या अनुषंगाने...