शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1513

राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • महाराष्ट्रात फाटकमुक्त रेल्वेमार्ग संकल्पना राबविणार
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नागपूर दि. १५ : महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास फाटकमुक्त होईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील व त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. विदर्भातील रेल्वे उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमास दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपस्थित होते.

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे ( महारेल ) अजनी येथील पुलासह विदर्भातील नवीन सहा रेल्वे उड्डाणपुलांचे भूमिपूजन व सहा उड्डाणपुलांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, आशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर आदी मंचावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महारेलची स्थापना करण्यात आली होती. महारेलच्या माध्यमातून रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे जाळे महाराष्ट्रभर बळकट करण्यात येणार आहे. रेल्वे फाटकावर अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी होऊ नये, सुलभ व विनाअडथळा प्रवास व्हावा. यासाठी महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक सुलभ करणारे १०० उड्डाणपूल येत्या वर्षभरात उभारले जाणार असून आगामी पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अजनी येथील १९२७ मधील ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाचे आयुष्य संपले असल्याने येथे जड वाहतूक बंद करण्यात आली होती, यामुळे येथे नवीन पुलाची आवश्यकता होती. या पुलाचे आज भूमिपूजन झाले असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पुढील १४ महिन्यांत पुर्ण करण्यात येईल. अजनी येथे सहा पदरी पूल उभारणार असून सध्याचा पूल काही दिवस तसाच राहील. त्याच्या बाजूला तीन पदरी पुलाचे काम पुर्ण झाल्यावर जुना पूल तोडून तेथे उर्वरित तीन पदरी मार्गाचे काम सुरू करण्यात येइल. या पुलाची लांबी २२० मी. व रुंदी ३८ मी. राहणार असून त्याचा अंदाजित खर्च ३३२ कोटी आहे. या पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल असेही ते म्हणाले.

महारेलमार्फत राज्यात विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारने मागील केवळ एका वर्षात १३ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून अधिकाधिक विकासकामे करण्यात येतील. हा सहभाग पुढे कायम राखत महारेलच्या माध्यमातून राज्यातील बसस्थानके विमानतळाप्रमाणेच सुंदर व सुसज्ज करण्यात यावी व याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सिमेंट रस्ते बांधकामाच्या तिसऱ्या टप्प्यात नागपुरातील जवळजवळ सर्व महत्त्वाचे रस्ते सिमेंटचे करण्यात येवून शहराचा चेहरामोहरा बदलेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्यातील रेल्वे फाटक पुर्णपणे बंद करण्यासाठी राज्य शासनाला केंद्रातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, यासाठी  राज्यात १२०० कोटींच्या २५ रेल्वे पुलांना आजच मंजूरी देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. यासोबत नागपूर शहरातील विविध विकास कामांसाठी ५०० कोटींच्या निधी मंजूरीची घोषणाही त्यांनी केली. यातून नागपूर हे जगातील चांगले पायाभूत सुविधा असलेले ‘मल्टीमॉडल हब’ म्हणून विकसित होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. देशात रेल्वे मार्ग तयार करणाऱ्या केवळ चार एनटीसी (न्यू ट्रॅक कन्स्ट्रक्शन) यंत्र आहेत. यापैकी एका यंत्राद्वारे इतवारी ते नागभिड रेल्वे मार्ग तयार करण्याच्या कामालाही आजपासून सुरूवात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

भूमिपूजन झालेल्या नवीन सहा उड्डाणपूलांचा एकूण अंदाजित खर्च ६०० कोटी असून लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलांसाठी एकूण ३०६ कोटींचा खर्च आला आहे. लोकार्पण करण्यात आलेल्या पुलांमध्ये उमरेड – भिवापूर बायपास रोड वरील रेल्वे फाटक क्रमांक ३३, भरतवाडा ते कळमेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक २९० तसेच २९० बी, कोहली ते कळमेश्वर मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक २८८ ए, बोरखेडी आणि सिंदी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक १०८ तसेच नांदगाव मार्गावरील रेवराल आणि तारसा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक ५४८ येथील रेल्वे पुलांचा समावेश आहे. तसेच भूमिपूजन झालेल्या पुलांमध्ये अजनी रेल्वे स्थानकाजवळील सहा पदरी दुहेरी केबल स्टेड उड्डाणपुलासह यवतमाळ रोडवर मांजरी ते पिंपळकुट्टी रेल्वे फाटक २-बी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी रोड येथे चांदूरबाजार ते नरखेड मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक ५२-ए,  अमरावती- बडनेरा रोडवरील रेल्वे फाटक ६६२/२२ एन, अमरावती – निंभोरे रोड येथील रेल्वे फाटक  एस-२ व वणी ते वरोरा दरम्यान रेल्वे फाटक ६ (३ एबी-३ टी) या नवीन पुलांचा समावेश आहे.

महारेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायस्वाल यांनी प्रास्ताविक केले. मानसी सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. रेल्वेचे महाप्रबंधक जितेंद्र कुमार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

०००

मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि. १५ (जिमाका) : महिला सक्षमीकरणासाठी मुलींना दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मुलींना आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सोयी- सुविधा उपलब्ध करुन देवून दर्जेदार शिक्षण आणि महिलासक्षमीकरण यावर राज्य शासनाच्या वतीने भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना आरबीएल बँकेच्या वतीनेसामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत (उमीद १००० अंतर्गत) १०१ सायकली व शालेय वस्तूंच्या किटचे वाटप राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, आरबीएलचे मार्केटिंग व सर्विस प्रमुख अभिजीत सोमवंशी शासकीय सेवा विभाग प्रमुख पारुल सरिन, प्रकाश गुप्ता, दुर्गादास रेगे, सागर कुलकर्णी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

आरबीएल बँकेच्या वतीने विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे ग्रामीण भागात दूरवरुन शाळेत चालत जाणाऱ्या विद्यार्थिनींची निश्चितच सोय होईल. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या वतीने मुलगी जन्मल्यानंतर आर्थिक ठेव, ७५ वर्षावरील ज्येष्ठांना एसटी बस मधून मोफत प्रवास, महिलांना एसटी बसमध्ये निम्म्या भाड्यामध्ये प्रवास, उज्ज्वला गॅस योजना आदी विविध योजनांच्या माध्यमातून महिला व बालक, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय तसेच मराठा समाजातील तरुण तरुणींसह विविध घटकांचा विकास साधला जात आहे. तथापि, बँकांसह अन्य विविध प्रकारच्या संस्थांनी सामाजिक कार्यासाठी तसेच समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, शिक्षण ही मुलींच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील दूरवरुन शाळेत चालत जाणाऱ्या मुलींची सायकल मुळे सोय होईल. विद्यार्थिनींना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देवून मुलींची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आरबीएल बँकेच्या वतीने अभिजित सोमवंशी म्हणाले की, सीएसआर उपक्रमाअंर्तगत उपेक्षित समुदायांना मदत करण्यासाठी बँकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतातील विविध शहरांमध्ये १००० हून अधिक सायकली आणि स्कूल किट्स वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. सायकलमुळे शाळेत जाण्याची सोय झाल्याबद्दल उपस्थित विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले.

०००

उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे  त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे

मुंबई, दि. १५ : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

दर तिमाहीअखेर (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) विवरण सादर करणे बंधनकारक आहे. पंचवीस किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार कारखाने यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व अंतर्गत नियमावली १९६० नुसार मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उद्योजकांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्या उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. हे विवरणपत्र (ER-I) हे ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन ३० एप्रिल २०२३ पर्यंत विवरणपत्र (ईआर-१) सादर करावे, असे आवाहन श्री. रविंद्र प्र. सुरवसे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणारे सर्व नियोक्ते / आस्थापना यांनी https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर तिमाही विवरणपत्र ईआर १ सादर करण्याची दक्षता घ्यावी. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (List a Job ) या टॅबवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे आणि ईआर रिपोर्टमध्ये ईआर -१ या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती / मार्गदर्शन अथवा तांत्रिक अडचण असल्यास mumbaicity.employment@gmail.com  या ईमेलवर संपर्क करावा. ३१ मार्च २०२३ च्या तिमाही अखेर वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र ईआर १ हे ३० एप्रिल २०२३ पर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र ऑफलाईन स्विकारले जाणार नाही, असे सहायक आयुक्त यांनी सुचित केले आहे.

 

०००

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघातातील जखमींचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

नवी मुंबई, दि. १५: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघातातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कामोठे एमजीएम रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेवून विचारपूस व त्यांचे सांत्वन केले. जखमींवर योग्य ते उपचार करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, एमजीएम रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश दिले.

या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.

अपघातग्रस्त आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर  यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, जखमींच्या आरोग्याबद्दल विचारपूस करत त्यांना दिलासा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

०००

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त

मुंबई, दि. १५ : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

०००

नाईक व लेंडी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन

नागपूर,  14 : केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरातील नाईक व लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यक्रमाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. येत्या काळात या दोन्ही तलावांमध्ये स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होईल व या परिसराच्या विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

      केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विलास कुंभारे, कृष्णा खोपडे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी मंचावर उपस्थित होते.

यावेळी संबोधित करतांना उपमुख्यमंत्री म्हणाले, या दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाच्या भूमीपूजनाचा ऐतिहासिक क्षण आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील गतवैभव असणाऱ्या या तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण होईल. या भागातील जनतेचे जीवन सुखकर होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘अमृत सरोवर योजना’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 तलावांचे पुनरुज्जीवन आणि निर्मिती करण्याचे ध्येय आहे. ‘अटल अमृत योजने’च्या माध्यमातून तलावांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन अभियान हाती घेण्यात आले आहे. नागपुरातही तलावांच्या संवर्धनासाठी काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अंबाझरी, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर तलावांचे कार्य सुरू झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. या टप्प्यात नाईक व लेंडी तलावांचे पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. अमृत योजनेअंतर्गत केंद्राकडे या दोन्ही तलावांच्या संवर्धनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. राज्य सरकारनेही यास मंजुरी दिली आणि महानगरपालिकेने हे काम हाती घेतले आहे. आता या दोन्ही तलावांचा कायापालट होणार असून स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे या भागातील  जनतेचे जीवन सुखकर होईल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना श्री. गडकरी यांनी या दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाची योग्य प्रकारे काळजी घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले. वस्त्या मोठ्या होत आहेत. त्यामुळे सर्व सुविधा या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे अनेक सुविधा दिल्या जाऊ शकत नाही. नवीन रस्ते तयार होताना काही ठिकाणी काही घरे पाडावी लागतील. त्यांना योग्य प्रकारे मोबदला दिला जाईल. घरापर्यंत ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, वैद्यकीय सुविधा, पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अशा मोठ्या प्रकल्पांना गती देताना प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

      येत्याकाळात नागपुरच्या प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंट रस्ते होतील. एकही साधा रस्ता नागपुरमध्ये राहणार नाही. पुढील सहा महिन्यात नागपुरला 24 तास पाणीपुरवठा पूर्ण शहरभर दिला जाईल. उत्तर नागपूर मध्ये 1 हजार कोटीच्या खर्चातून उड्डाणपूल होत आहे. त्यामुळे गर्दीच्या वस्तीतील वाहतूक कोंडी पासून नागरिकांची सुटका होईल. मात्र यासाठी नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

      दोन्ही तलावांमध्ये यापुढे घाण पाणी जाणार नाही. आजुबाजुला अतिक्रमण होणार नाही. कोणाला अतिक्रमण करू देणार नाही यासाठी या वस्तीमधील नागरिकांनीच पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     तत्पूर्वी, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थितांना संबोधित केले. या भागातील समस्या, मागण्या याची मांडणी दोन्ही नेत्यांपुढे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

            या कार्यक्रमात श्री. फडणवीस आणि श्री. गडकरी यांच्या हस्ते चार लाभार्थ्यांना प्रातिनिधीकरित्या आयुष्मान कार्डचे आभासी पद्धतीने वितरण करण्यात आले.

नागपूरचे कन्व्हेन्शन सेंटर विदर्भातील अभ्यासकांसाठी मोलाचा ठेवा- देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. १४ : सामाजिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, विचार, वारसा या अभ्यासासोबतच आर्थिक व औद्योगिक घडामोडींवर नागपूर कन्व्हेंशन सेंटर एक बौद्धिक संपदा म्हणून तयार होत आहे. त्यामुळे  नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर नागपूर, विदर्भातील अभ्यासकांसाठी मोलाचा ठेवा म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या  लोकार्पण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण झाले. खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री डॉ. नितीन राऊत, चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती मनोज सूर्यवंशी  आणि समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रमोद नारनवरे आदी मंचावर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या कन्व्हेंशन सेंटरचे लोकार्पण होत आहे. याचा अत्यंत आनंद आहे. विदर्भ व नागपूरसाठी हे केंद्र अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच या  केंद्राच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वस्त केले. या भव्य सेंटरमध्ये प्रवेश करतानाच बाबासाहेबांचे दर्शन व्हावे यासाठी येथे उभारावयाच्या ४० फूट उंचीच्या बाबांसाहेबांच्या पुतळ्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ५ कोटींचा निधी लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

           बाबासाहेबांनी भारताला राज्यघटना दिली. राज्य घटनेमुळेच देश एक आर्थिक महासत्ता म्हणून नावारुपाला येत आहे. राज्यघटनेमुळे सर्वाँना संधीची समानता निर्माण झाली आहे. शंभर वर्षांपूर्वी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपिज’, हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी आजच्या काळातील आर्थिक प्रश्नांना हात घातला होता. भारतीय समाजापुढे काळया पैशाचा प्रश्न निर्माण होण्याची संकल्पना त्यांनी मांडली. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी दूरदृष्टी दाखवत नॅशनल ग्रीडची संकल्पना मांडली. त्यांनी जलसंपदा क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. नदी जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या दिशेने कार्य करून देशाला पुढे घेवून जात आहेत.

            बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या राज्य घटनेतील कर्तव्यांचे पालन करून या मार्गावर सर्वाँनी चालावे असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

            यावेळी, बोलताना केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर नागपूरच्या समतोल विकासाची ग्वाही दिली. उत्तर नागपूरमधून एक हजार कोटीचा उड्डाणपूल बनत आहे. यामुळे या क्षेत्राचा कायापालट होईल. उत्तर नागपूरवर अन्याय होणार नाही. या ठिकाणचे कोणतेच प्रकल्प अडणार नाही. विकासात कोणतेच राजकारण अडसर ठरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेन्टरचे पावित्र्य राखण्याचे आवाहन त्यांनी केले.बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे, व्यक्तिमत्त्वाप्रमाणे अभ्यासाप्रमाणे, या ठिकाणी कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            हा कार्यक्रम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आयोजित केला होता. उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती मनोज सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले तर समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रमोद नारनवरे यांनी आभार मानले.

            या कार्यक्रमात गड्डीगोदाम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहाचे आभासी लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तयारीचा मंत्री शंभूराज देसाई व रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा

ठाणे, दि. १४ (जिमाका) : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आढावा घेतला. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी आणि उपस्थित नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे कामे करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.
खारघर येथील कार्यक्रम स्थळी झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बनविलेल्या 30 हुन अधिक समित्यांना सोपविलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्वच्छता गृहे, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ व्यवस्था, परिवहन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
कार्यक्रमाला आलेले नागरिक व कार्यक्रम संपल्यानंतर जाणारे नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आदींची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच नागरिक या ठिकाणी जमणार आहेत. त्यामुळे या नागरिकांना काहीही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणांनी नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात. कामाच्या नियोजनाप्रमाणे आराखड्याची अंमलबजावणी करावी व दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
कार्यक्रम शांततेत व नियोजित पद्धतीने पार पडेल याची सर्वांनीच दक्षता घेण्याच्या सूचना श्री. शंभूराज देसाई यांनी यावेळी केल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

            मुंबई, दि. १४ : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव विपीन सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक- राज्यपाल रमेश बैस

    मुंबईदि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्जपुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे झालेत्यावेळी ते बोलत होते. 

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई फायर ब्रिगेड तसेच राज्य अग्निशमन सेवेतील 13 अधिकाऱ्यांना व जवानांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके‘ प्रदान करण्यात आलीतसेच अग्निशमन कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

            एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झालीत्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ 10-12 लाख होती. आज शहराची लोकसंख्या किमान पंधरा पटीने वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या आज अनेक देशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शहराला सशक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

 सोसायटी व उद्योगांचे नियमित फायर ऑडिट‘ करण्याची सूचना

            मुंबईसारख्या शहरांमध्ये आगीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांना तसेच गृहनिर्माण संस्थांना सहभागी केले पाहिजे तसेच गृहनिर्माण संस्था व उद्योग संस्थांचे नियमित फायर ऑडिट‘ केले गेले पाहिजेत असेही राज्यपालांनी सांगितले.

 अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला योगदान देण्याचे राज्यपालांचे आवाहन

            समाजाच्या विकासामध्ये अग्निशमन सेवा दलाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून राज्यपालांनी राज्यातील नागरिकांना अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले. या निधीचा उपयोग अग्निशमन सेवा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी करण्यात येतो. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांचेसह देवेंद्र पोटफोडेमुख्य अग्निशमन अधिकारीपुणे महानगर पालिकाप्रशांत रणपिसेमाजी मुख्य अग्निशमन अधिकारीपुणे महानगरपालिकाकिरण गावडेमाजी मुख्य अग्निशमन अधिकारीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकायशवंत जाधवउपमुख्य अग्निशमन अधिकारीमुंबई अग्निशमन दलकैलास हिवराळेमाजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई अग्निशमन दलविजयकुमार पाणिग्रहीमाजी उपमुख्य अग्निशमन अधिकारीमुंबई अग्निशमन दलसंजय पवारप्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारीमालेगाव महानगरपालिकानाशिकधर्मराज नाकोड,सहायक स्टेशन अधिकारीनागपूर महानगरपालिकाराजाराम केदारीलिडिंग फायरमनपुणे महानगरपालिकासुरेश पाटीललिडिंग फायरमनमुंबई अग्निशमन दलसंजय म्हामुणकरलिडिंग फायरमन मुंबई फायर ब्रिगेड व चंद्रकांत आनंददासफायरमनपुणे महानगरपालिका यांचा राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक‘ देऊन सत्कार करण्यात आला.

            सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखावर अग्निशमन सेवा चिन्ह अंकित केले. त्यानंतर राज्यपालांनी अग्निशमन कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान देऊन अग्निशमन सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन केले.  मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

ताज्या बातम्या

प्रशासकीय अधिकारी आणि पत्नींच्या संस्थेमार्फत शिलाई मशीन्सचे वितरण

0
मुंबई, दि. ९ - प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नींची संघटना आयएएसओडब्ल्यूए (IASOWA) ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली ना नफा तत्वावर सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी

0
नवी दिल्ली, ९ - शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची...

 उत्तरकाशी भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, बहुतांश पर्यटक आज राज्यात परतणार – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश...

0
मुंबई, दि. ९ : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले...

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट

0
मुंबई दि. ९:- उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १७२ पर्यटक या परिसरात अडकले होते. त्यापैकी...

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...