गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1494

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सन्मानार्थ स्टुटगार्टमध्ये अल्फॉन वादनाचा खास कार्यक्रम

स्टुटगार्ट, दि. 14 – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सन्मानार्थ बाडेन-वर्टेमबर्ग राज्याने अल्फॉन वादनाच्या खास कार्यक्रमाचे आयोजन केले. अल्फॉन हे बाडेन-वर्टेमबर्ग प्रांतातील पारंपरिक वाद्य असून, त्याचा इतिहास सोळाव्या शतकापर्यंत जातो. विशेष पाहुण्यांच्या सन्मानार्थ त्याचे आयोजन करण्याची त्या राज्याची परंपरा आहे. महाराष्ट्र आणि बाडेन-वर्टेमबर्ग राज्यांचा प्रवास अधिक सहकार्याच्या दिशेने होईल, असा विश्वास श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

सुखद संध्याकाळ, स्वच्छ आकाश, निवडक पाहुणे आणि धीरगंभीर वादनाने काळजाचा ठाव घेणारा वादकांचा ताफा.. बाडेन-वर्टेमबर्गच्या राजधानीतील शनिवार (दि. १३) संध्याकाळचा माहोल असा सूरमयी होता. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी त्याचा आनंद लुटला. त्यांच्या सोबत बाडेन- वर्टेमबर्गचे मिनिस्टर प्रेसिडेंट विनफ्रीड क्रेचमन आणि स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियान स्टेकमन होते.

अल्फॉन-वादनाचा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. श्री. केसरकर यांनीही कुतुहलाने अल्फॉन वाद्य हाताळले. कौशल्य विकास कार्यक्रम, जर्मन पर्यटकांना महाराष्ट्राचा, विशेषतः कोकणचा परिचय करून देणे, मराठी आणि जर्मन भाषांमधील देवाण – घेवाण यासाठी श्री. केसरकर जर्मनीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासमवेत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल व अन्य वरिष्ठ अधिकारी आहेत.

महाराष्ट्राशी स्नेहबंध व मैत्रीचे नाते दृढ करण्यासाठी श्री. केसरकर यांच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास स्टुटगार्टमधील भारतीय व सुमारे पाचशे जर्मन नागरिक उपस्थित होते..

बाडेन-वर्टेमबर्ग राज्याचे प्रशासकीय व सरकारप्रमुख विनफ्रीड क्रेचमन व डॉ. स्टेकमन यांनी श्री. केसरकर यांचे स्वागत केले. स्वागतपर भाषणांनंतर अल्फॉर्न-वादनाचा कार्यक्रम सुरू झाला. स्वित्झर्लंडचे हे वाद्य या जर्मन राज्याने आपलेसे केले आहे. जवळपास शंभराहून वादकांनी वेगवेगळ्या प्रकारे वादन केले. त्याने वातावरण भारून गेले होते. श्री. केसरकर व त्यांचे सहकारी अधिकारी या कार्यक्रमाने मंत्रमुग्ध झाले.

महाराष्ट्र आणि बाडेन- वर्टेमबर्ग राज्यांच्या राजधान्यांचे म्हणजे मुंबई आणि स्टुटगार्ट यांचे परस्पर सहकार्य अर्धशतकाहून अधिक काळापासून चालू आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही दोन्ही राज्ये औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली आहेत. पाहुण्यांच्या सन्मानार्थ अल्फॉन-वादन आयोजित केले जाणे, हा चांगला संकेत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांचा प्रवास अधिक सहकार्याच्या दिशेने चालू होईल, असा विश्वास मंत्री श्री. केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. १४ : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली.

या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, राजमाता जिजाऊ यांचे वंशज विजयराव जाधव, संयोजक व्यासपीठावर उपस्थित होते.

 गड, किल्ल्यांच्या जतन,संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. मराठा समाज बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करणार

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुंबईतल्या गेटवे ॲाफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होतेय याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान यांचे स्मरण करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहचवला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारीदेखील राज्य शासन करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबईतील इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १४ : – मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असून यासाठी आवश्यकता भासल्यास प्रचलित  नियमांत बदल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -२०२३ प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर , मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे  (म्हाडाचे ) मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मोठा आहे. या विषयावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. काही कायदे आणि नियम यांचा फेरआढावा घेणे आवश्यक आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून या सूचनांची सकारात्मक दखल घेतली जाईल. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांनी “सेल्फ रिडेव्हलपमेंट” हे धोरण राबविण्याचे ठरविले आहे. या स्वयंपुनर्विकासाचा  सर्वसामान्यांना लाभ होणार आहे. यासाठी ‘स्वयं  पुनर्विकास  महामंडळ ‘ स्थापन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावर शासन निश्चितच सकारात्मक विचार करेल असेही श्री. शिंदे म्हणाले.

गृहनिर्माण संस्थेला दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर कमी करणे, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील चाळीचा प्रश्न, ज्या इमारतींना ओसी  प्रमाणपत्र मिळाले नाही अशा इमारतींचा पुनर्विकास, यासारख्या अनेक मागण्यांवर शासन तोडगा काढेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पुरस्कार मिळालेल्या गृहनिर्माण संस्थाचे अभिनंदन केले तसेच वर्षा बंगल्यावर चहापानाचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले.

दि. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन हे भारतातील सर्वात मोठे फेडरेशन असून २४ हजार गृहनिर्माण संस्था यांचे सदस्य आहेत. गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून सातत्य राखत उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या शिखर संस्थेचे तसेच मुंबै बॅंकेचे कौतुक केले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, गृहनिर्माण संस्थांच्या जागेसंबधी महसूल विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या विविध मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विदर्भात नझुलच्या जमिनीसंदर्भात लागू केलेला निर्णय इतर ठिकाणी लागू करता येईल, जमिनीवर भरावयाच्या करासंदर्भातही काही महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. यानुसार वारंवार कर भरण्याची आवश्यकता राहणार नाही असा प्रस्ताव मांडत आहोत. सर्व परवानग्या आणि मंजुऱ्यांसाठी एक खिडकी योजना आणली आहे. मुंबईत सहकार भवन साठी जागा द्यावी  ही मागणी या परिषदेत करण्यात आली , त्यासाठी गोरेगाव येथे जागा देण्याचे आश्वासन श्री. विखे-पाटील यांनी यावेळी दिले. परिषदेच्या भव्य आणि यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

गृहनिर्माण संस्थांना पुरस्कार

स्वच्छता, पर्यावरण रक्षण, सौदर्यीकरण आणि आरोग्यविषयक जनजागृती या निकषांवर आधारित हजारो संस्थांच्या प्रवेशिकांमधून निवडक काही संस्थांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. एक लाख रूपयांचा धनादेश, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. निवडक पाच संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर इतर संस्थांना संचालक मंडळाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात छेडा हाईट्स, रहेजा विस्टा, स्प्लेंडर कॉम्प्लेक्स, विशाल सह्याद्री आणि संजोग को. ऑप. संस्थांचा समावेश होता.

सामान्य मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४: सामान्य मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी ‘ॲक्शन मोड’वर काम करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे दि डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लिमिटेड व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सहकार मंत्री अतुल सावे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, आमदार प्रविण दरेकर, आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, आमदार भारती लव्हेकर, प्रकाश दरेकर, सिद्धार्थ कांबळे, चंद्रशेखर प्रभू आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी ‘ईज ॲाफ डुईंग बिझनेस’ गरजेचे आहे. गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास योजनेची संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध विभागांच्या समन्वयासाठी विशेष कक्षही सुरु करण्यात येईल. या योजनेंतर्गत स्वयंपुनर्विकास प्रस्तावांना ३ महिन्यात मान्यता देण्यात येईल. गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी तसेच रस्त्यांलगतच्या गृहनिर्माण संस्थांना वाढीव चटईक्षेत्राचा लाभ मिळण्यासाठी रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीची अट रद्द करण्यात येईल. पुनर्विकासामध्ये सगळ्या कराराकरिता आकारल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्काप्रमाणे स्वयंपुनर्विकासाकरिता देखील १०० रुपये  मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

स्वयंपुनर्विकास प्रक्रियांसाठी ऑनलाईन प्रणाली

स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना  व्याज सवलत देण्यात येईल.  मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र, स्टॅम्प ॲडज्युडीकेशन करणे, नोंदणी करणे, मालमत्ता पत्रकात नोंद करणे या  बाबींसाठी कायदेशीर बदल करण्याचे ठरविले आहे.  ही प्रक्रिया सोपी आणि गतिमान करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येईल. या प्रणालीद्वारे अर्जावर एका महिन्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. दस्त नोंदणी ॲानलाईन पद्धतीने होणार आहे. दहा दिवसात प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात येणार असून ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चार दिवसात फेरफार करण्यात येईल अशी ॲानलाईन प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

’म्हाडा आपल्या दारी’ उपक्रम राबविणार

जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कनव्हेअन्स) साठी मुद्रांक शुल्काच्या थकबाकीकरिता अभय योजना आणण्यात येईल. म्हाडाच्या ५६ वसाहतीत व इतर म्हाडाच्या भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वाढीव सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णयदेखील यावेळी जाहीर करण्यात आला. ‘म्हाडा आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येईल. पुनर्विकासासाठी लागणाऱ्या सर्व बाबी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हा उपक्रम राबविला जाईल, अशी माहितीही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

स्वयंपुनर्विकास आर्थिक महामंडळ विचाराधीन

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पांकरिता कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात येईल. पुनर्विकासाबाबतच्या तक्रार निवारण समितीमध्ये सदस्य म्हणून संबंधित जिल्हा को-ऑप. हौसिंग फेडशनच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात येईल.

स्वयंपुनर्विकास आर्थिक महामंडळ सुरु करण्याचा विचार करण्यात येत आहे. बॅंकांना एकत्र करुन निधी जमा करण्यासाठी हे महामंडळ सुरु करण्याचा विचार राज्य शासन करीत आहे.  सहकार विभागाने अधिक सहकार्याच्या भावनेने काम करावे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उत्तम कामगिरी करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार

पुणे दि.१४- पुढील  वर्षी राज्य शासनाच्या वतीने किल्ले पुरंदर येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात  येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 

किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी अधिकारी मिनाज मुल्ला , उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील . गटविकास अधिकारी अमर माने, पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. 

गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज जयंती नियमितपणे साजरी केल्याबद्दल पंचायत समिती,पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन करून पालकमंत्री पाटील म्हणाले, परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. 

छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे.  अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. 

आमदार जगताप म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज कुशल प्रशासक होते. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी यात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

श्री.शिवतारे म्हणाले,छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केले. स्वराज्य आणि स्वधर्म प्रेमाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि विचारांचे अनुसरण करण्याची गरज आहे. 

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाई जिंकली. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व  होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढू बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल. 

कार्यक्रमपूर्वी सुवासिनींनी बाल शंभुराजेंचा पाळणा म्हटला. मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. तत्पूर्वी पालकमंत्री श्री.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करणार – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

औरंगाबाद दि 14 (विमाका)- राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासोबतच आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, असे आवाहन आरोग्यमंत्री  प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.

औरंगाबाद तसेच लातूर विभागातील आरोग्य सेवेचा आरोग्यमंत्री  श्री. सावंत यांनी आज आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त संचालक डॉ.रघुनाथ भोई,  सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ.श्रीमती बी. एस.कमलापूरकर, औरंगाबाद विभागाच्या उपसंचालक डॉ. महानंदा मुंडे, लातूर विभागाचे उपसंचालक  डॉ.पी. एम.ढोले उपस्थित होते.

आरोग्यमंत्री  डॉ. सावंत म्हणाले, रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडत असून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे  आहे. आरोग्य विभागातर्फे राज्यात १८ वर्षावरील महिला,  गरोदर स्त्रिया, माता यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ आणि शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राबविण्यात येत आहे. अशा अभियानामुळे राज्याच्या आरोग्य सेवा सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा दिली आहे. आरोग्य यंत्रणेचे प्राथमिक आरोग्य केंद्रापासूत ते जिल्हा रूग्णालयापर्यंत सेवा देणारी यंत्रणा चांगले काम करते आहे. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासोबतच फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जिल्हा व विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आरोग्यमंत्री  डॉ. सावंत यांनी केले.

आंध्रप्रदेश, केरळ तसेच राजस्थान या राज्यातील आरोग्य सेवांची पाहणी करण्यासाठी विभागातील शिष्टमंडळाने भेट द्यावी. आपल्याकडे काय बदल करता येतील, यासाठी एक पाहणी अहवाल शासनास सादर करावा. राज्यातील प्रत्येक विभागीय उपसंचालकाने आपल्या विभागाचा आरोग्यविषयक आराखडा तयार करावा. रूग्णालयात ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात. रुग्णांना कुठे काय आहे, याची माहिती समजण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत ठिकठिकाणी कायमस्वरूपी सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी आपला दवाखाना उपक्रम सुरू केला आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यात सद्यस्थितीत 317 दवाखाने सुरू आहेत. या दवाखान्यात वाढ करण्यात येत आहे. आपल्या दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांच्या नोंदी अद्ययावत ठेवा व याबाबतच प्रत्येक पंधरा दिवसाला शासनास अहवाल सादर करा, असे निर्देश देत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद आरोग्य विभागाचे आहे.त्यानुसार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करूया, असे आवाहनही डॉ.सावंत यांनी केले.

यावेळी औरंगाबाद व लातूर विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.14 : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (प्र. सु.र.व का. ) श्रीमती सुजाता सैनिक यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्रकाश इंदलकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कक्ष अधिकारी श्रीमती पल्लवी कदम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई, दि.१४:- स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह उपस्थित अधिकारी,कर्मचारी आदींनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटले आहे की “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी अतुलनीय पराक्रम गाजवला. ते रणधुरंधर, मुत्सद्दी आणि महापराक्रमी होतेच पण विद्वत्तेचा महामेरू होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आशीर्वाद, प्रेरणा हेच आपल्या सर्वांचे संचित आहे. यातूनच आपण महाराष्ट्राच्या लौकिकाची पताका अशीच विश्वात डौलाने फडकत ठेवण्याचा प्रण करूया. छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!”

या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित

मुंबई, दि.13:  केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरिता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली  करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

नागरिकांची  मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार  करण्यात येणार आहे. तरी याबाबत नागरिकांनी dycommr.enf1@gmail.com या ई-मेलवर दिनांक २० मे २०२३ पर्यंत अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन राज्याच्या परिवहन आयुक्त यांनी  केले आहे.

याविषयी अधिक माहितीसाठी  कैलास कोठावदे, सहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. (मो. ९५५२८८३९३०/ ई-मेल- dycommr.enf1@gmail.com)  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याची लिंक https://morth.nic.in/sites/default/files/notificationsdocument/Motor%20Vehicle%20Aggregators 27112020150046.pdf

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,दि.१३ : आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे  महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशिन आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदान येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य लाभ वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, सर्वश्री आमदार अॅड. आशिष शेलार, प्रसाद लाड, मंगेश कुडाळकर, सुनिल शिंदे, राजहंस सिंह, सदा सरवणकर, कॅप्टन तमिल सेल्वन, कालिदास कोळंबकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, श्रीमती भारती लव्हेकर, यामिनी जाधव, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, श्रावण हार्डिकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देण्याबरोबरच त्यांच्या प्रयत्नांना, प्रगतीला, कष्टाला बळ देण्याचे काम करण्यात येत आहे.जवळपास २७ हजारांहून अधिक पात्र महिलांना शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र दिले जाणार आहेत. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम राज्य सरकार, मनपा करीत आहे. मनपाच्या जेंडर बजेटमध्ये १० ते १५ कोटी रुपये तरतूद होती. यामध्ये साहित्य वाटप, महिलांना सक्षम, पायावर उभे करण्यासाठी २५० कोटी रूपयांची बजेटमध्ये तरतूद केली. मुंबईत अनेक योजनांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. मेट्रोची कामे सुरू आहेत. मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी कायमचा तोडगा काढण्यासाठी ४५० किमीचे सिमेंट काँक्रिंटचे रस्ते केले. उर्वरितही रस्ते काँक्रिटचे करणार असून  अडीच वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार आहे.

मुंबई ही आर्थिक राजधानी असून मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करणार बनविण्यासाठी प्रयत्नशील असून मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी वापरणार आहे. खराब काम करणारे कंत्राटदार हद्दपार करणार आहे. शहरात १,१७४ सुशोभिकरण प्रकल्प, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून ८ लाख मुंबईकरांना लाभ झाला आहे. सर्व सोयींनीयुक्त दवाखाना असा हा दवाखाना असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सर्व सुविधा यामध्ये आहेत. मुंबईला प्रदूषणमुक्त करणार आहे. जी-२० कार्यक्रम मुंबईत होत असून देशाला जी-२० चा मान मिळालाय हे अभिमानास्पद आहे. हे सरकार राज्याला विकासासाकडे नेण्याचे काम करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लेक लाडकीच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यानंतर सुकन्या योजना, महिलांना एसटीमध्ये ५०  टक्के सूट, घरघंटी, कांडप मशिन, शिलाई मशिनसोबत मार्केटिंग करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्या वस्तूला बाजारात भाव मिळण्यासाठी मनपाने योजना तयार करावी. मुंबई मनपाच्या ७७ हजार कोटी रूपयांच्या सुरक्षा ठेवी होत्या त्या वाढून ८८ हजार कोटी झाल्या. २५ हजार कोटींची कामे करूनही ११ हजार कोटी रूपयांच्या सुरक्षा ठेवी वाढल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख, लोकोपयोगी काम करीत आहे. केंद्राची राज्याला मदत होत आहे. प्रत्येक निर्णय सर्वसामान्यासाठी घेतोय. सर्व योजना राबवून मुंबईचा कायापालट करण्याच्या ध्येयाबरोबर मुंबई बाहेरचा माणूस पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

२७ हजार महिला नव्हे तर २७ हजार कुटुंबांना सशक्त करण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने केले

उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत २७ हजारांहून अधिक महिलांना शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने २७ हजार महिला सक्षम होण्याबरोबरच २७ हजार कुटुंबे सशक्त होणार आहेत. आणखी २५  लाख महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मनपाच्या कामाची दिशा बदलली असून मनपा लोकाभिमुख झाली आहे. मनपातील कामे पारदर्शक पद्धतीनेच होणार असू कामात अनियमितता होत असेल तर कारवाई करण्यात येईल. मनपा, राज्य सरकार महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून बजेटमध्ये महिलांना मदत, एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली. महिलांना सक्षम करण्याचे काम महिला धोरणाद्वारे करणार असून मुंबईतील झोपडपट्टीमध्ये वीज, रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत.

प्रारंभी महिला व बालविकास योजनेच्या पात्र महिलांकरिता शिलाई मशीन, घरघंटी मशीन, मसाला कांडप मशीन यंत्रसामग्री वाटप योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोटच्या माध्यमातून करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आज प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना अर्थसहाय्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...