गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1490

जिल्हाधिकारी सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १६ : माल वाहतूक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनतळ अपुरे पडतात. सांगली महानगरपालिकेच्या मालकीच्या ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या १७ एकर जागेवर अद्ययावत ट्रक टर्मिनल उभारणीसाठी जिल्हाधिकारी सांगली यांनी प्रस्ताव तयार करावा, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करणे व अनुषंगिक बाबींविषयी परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. या अभ्यास गटाने याबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे. तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून आपले सरकार या पोर्टलवरही तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहे. तसेच परिवहन आयुक्त कार्यालय, वाहतूक पोलीस विभाग किंवा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दूरध्वनी व ईमेलद्वारे तक्रारीची नोंद करता येईल असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट यांच्या ट्रक टर्मिनस, जकात नाक्याची जागा इत्यादी मागण्यांबाबत पुढील आठवड्यात नगर विकास विभाग, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण व मुंबई महानगरपालिकांच्या  अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

या बैठकीत मालवाहतूक वाहनांची कागदपत्रे तपासणी, वाहन क्षमता तपासणी, बॉर्डर चेक पोस्ट, परिवहन विभागाने मालवाहतूक भाड्याची व्याख्या निश्चित करणे,राष्ट्रीय महामार्गावर विश्रांतीगृह,शौचालय तसेच पार्किंग सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, यांच्यासह विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी, तसेच ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ

विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 16 : विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होईल. या दृष्टीने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सिक्कीम येथील कलाकारांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १६) राजभवन येथे ‘सिक्कीम राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

दिनांक १६ मे १९७५ रोजी सिक्कीम भारताचे २२ वे राज्य झाले. त्या दिवसापासून सिक्कीमने मोठी प्रगती केली असून देशाच्या विकासातदेखील मोठे योगदान दिले आहे. सिक्कीम हे देशातील हरित राज्य असून पर्यावरण रक्षणाबाबत हे राज्य इतर राज्यांकरिता मार्गदर्शक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

उंच बर्फाच्छादित पहाड असलेले सिक्कीम पर्यटकांचे आकर्षण असून येथील निसर्ग सौंदर्य व विविधतेमुळे सिक्कीम म्हणजे स्वर्गीय राज्य आहे. या राज्याने डॅनी डेंग्जोपा, बायचुंग भुतियासारखे रत्न देशाला दिले आहे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी सिक्कीमच्या गुरुंग जमातीचे घाटू नृत्य, सोराती नृत्य, अक्षैमा गीत, तमांग सेलो नृत्य तसेच सिक्कीमच्या वाद्यवृंदाचे सादरीकरणे झाले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक दाखविणारे शिववंदना, लावणी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे देखील यावेळी सादरीकरण करण्यात आले.

००००

Sikkim Foundation Day Celebrated at Maharashtra Raj Bhavan

The Foundation Day of Sikkim was celebrated for the first time at Maharashtra Raj Bhavan in Mumbai on Tuesday (16 May).

Maharashtra Governor Ramesh Bais, accompanied by Smt Rambai Bais presided over the programme.

The Sikkim Foundation Day was organised at Maharashtra Raj Bhavan as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of the Government of India.

Speaking on the occasion, the Governor said India is a beautiful bouquet of diverse cultures, languages, dance forms, cuisines. He said organisation of Foundation Days of various States will promote better understanding among people and strengthen the cause of national integration.

A cultural troupe from Sikkim presented the Sikkim Dance Ghatu, Sorati, Tamang Selo and Maruni and Sikkim’s Instrumental music on the occasion.

The programme also showcased the Shiva Vandana and Lavani Dance from Maharashtra and concluded with the presentation of the Coronation Ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj.

लघु पौष्टीक तृणधान्ये : ओळख आणि महत्त्व

कृषि क्षेत्राच्या विकास कार्यात लघु तृणधान्य पिके (राळा, वरई, बर्टी, नाचणी, कोडो, बाजरी व इतर ) बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षितच राहिली होती. परंतु या पिकांतील पौष्टिक मूल्यांचा विचार करता सद्यपरिस्थितीत उत्तम आरोग्यासाठी आणि आहारविषयक जनजागृतीमुळे या पिकाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता केंद्र शासनाने राळा, नाचणी, बर्टी, कोडो, बाजरी आणि ज्वारी इ. पिकांचा त्याच्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे पौष्टिक तृणधान्य (Nutri Cereals) या वर्गात समावेश करुन अधिसूचित केले आहे.

येणाऱ्या काळात सर्व जनतेला जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच आरोग्य संपन्न, पौष्टिक शाकाहार उत्तमरित्या मिळण्याकरिता या दुर्लक्षित झालेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख आणि महत्व घेऊन सुधारित पद्धतीने लागवड करुन उत्पादकता वाढवणे ही काळाची गरज आहे.

बर्टी (Barnyard Millet) :

बर्टी या पिकास सावा, शमुल, सावऱ्या या नावानेही ओळखतात. इंग्रजीमध्ये याला बार्नयार्ड मिलेट म्हणतात. गुजरात – सया, हिंदी – झंगोरा, तमिल – कुधिरवालि तर कन्नडमध्ये ओडलु या नावाने बर्टी परिचित आहे.

बर्टी हे एकदल वर्गातील पीक असून वाणानुसार 50-130 सें.मी. सरळ उंच वाढते. पिकास 4-7 फुटव्याची  संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून बारिक लव पानावर असते. हे पीक दुष्काळजन्य तसेच अतिपर्जन्यमान असलेल्या भागात तग धरुन राहते. बर्टी या लघु पौष्टीक तृणधान्याची लागवड धान्य आणि चारा अशा दुहेरी उददेशासाठी केली जाते. भारतात उत्तराखंड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आसाम, ओरिसा, तमिलनाडु, गुजरात आणि महाराष्ट्रात लागवड केली जाते. भारतात 0.93 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून 0.73 लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टर एवढी आहे.

उपवासासाठी बर्टीचा वापर भाताप्रमाणे शिजवून केला जातो. नवरात्रीमध्ये तसेच इतर उपवासाच्या दिवशी पचन्यास हलके अन्न पदार्थ म्हणूनही अनेकांची पसंती बर्टी भगरीला असते.

आहारातील महत्त्व :

धान्याचे पोषण मुल्यद्रव्ये प्रति 100 ग्रॅम मध्ये प्रथिने         6.3, स्निग्ध पदार्थ 2.2, कार्बोदके 65.5, तंतुमय पदार्थ 9.8,    खनिज द्रव्ये   4.4, झिंक 3.0 मि.ग्रॅ., लोह 15.0 मि.ग्रॅ.,  फॉस्फरस 280 मि.ग्रॅ., नियासिन 4.20 मि.ग्रॅ. असे आहे.

बर्टी धान्य हे प्रथिनाचा चांगला स्त्रोत असून हे प्रथिने सहज पचण्याजोगे आहेत. पिष्टमय पदार्थाचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होत असल्यामुळे आधुनिक जीवनशैलीत कमी श्रमाचे किंवा बैठे काम करणाऱ्यांसाठी बर्टी धान्य वरदान आहे. यातील नियासिन घटकामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बर्टी धान्यात असलेल्या लिनोलिक, पाल्मेटिक आणि ओलिक या असंपृप्त स्निग्धाम्ले मुळे हृदयरोग व मधुमेहासाठी उपयुक्त आहार. रक्तातील साखरेची आणि लिपीडची पातळी कमी करण्यासाठी बर्टीचे सेवन प्रभावी ठरते. बर्टी धान्य ग्लुटेनमुक्त असल्यामुळे ग्लुटेनची ॲलर्जी असणाऱ्यांना उपयुक्त आहार आहे.

सुधारित लागवड तंत्रज्ञान :

जमीन : हलकी ते मध्यम जमीन उपयुक्त. पाणी धरुन ठेवण्याची क्षमता उत्तम.

हवामान : उष्ण व समशितोष्ण प्रदेशात येणारे पीक. समुद्रसपाटीपासून 2700 मी. उंचीपर्यंतच्या भागात पीक लागवड वार्षिक पर्जन्यमान 200 ते 400 मिमि आवश्यक.

हंगाम : खरीप हंगाम.

पेरणी : बर्टीची लागवड पेरणी पद्धतीने केली जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात रोप लागवड करतात.

पेरणी अंतर :          30 सें.मी. x 10 सें.मी.

बियाणे : 3 ते 4 कि. प्रति हेक्टरी.

आंतर पिक पद्धती : बर्टी + राजमा (4 : 1) प्रमाणात फायदेशीर.

पिक संरक्षण : खोड माशीचा प्रादूर्भाव पीक सहा आठवड्याचे झाल्यापासून जास्त होतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात दिसतो. क्विनॉलफॉस 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारावे. मावा आणि लष्करी अळीसाठी क्लोरोपायरिफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात सायंकाळच्या वेळेस फवारावे.

काढणी  मळणी : पक्व झालेले पीक जमिनीलगत कापावे किंवा वाळलेली कणसे पीक उभे असताना कापावे. उन्हामध्ये वाळवून बडवावे किंवा मशिनद्वारे मळणी करुन स्वच्छ धान्य उन्हात वाळवून साठवण करावी.

उत्पादन :    धान्य – 18 – 20 क्विंटल प्रति हेक्टरी.

                   कडबा – 20 – 25 क्विंटल प्रति हेक्टरी.

डॉ. दिनेश गोपीनाथ कानवडे,

डॉ. चंद्रकांत पंढरीनाथ जायभाये,

कृषि संशोधन केंद्र, बुलडाणा.

जिल्हा नियोजनमधून डायलिसिस सुविधेसाठी ९ कोटी – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

बुलडाणा, दि. १६ : जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्याला 370 कोटी रूपयांचा निधी यावर्षी प्राप्त होणार आहे. या निधीमधून जिल्ह्यातील रूग्णांसाठी डायलिसीसची सुविधा प्राधान्याने उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून 9 कोटी रूपयांचा निधी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हा नियोजन व विकास समितीतर्फे येत्या वर्षात करण्यात येणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, श्वोता महाले, कृषि सचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपूते आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातून गुणवत्तापूर्ण कामे होण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीमध्ये तीन हजारावर डायलिसीसचे रूग्ण आहेत. या रुग्णांना डायलिसिस साठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या निधीतून सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. गेल्या काळात 140 गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यात आल्यामुळे रूग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.

यावर्षीच्या निधीमून अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यात उघड्यावर अंगणवाडी भरत असलेल्या ठिकाणीची यादी मागविण्यात येणार आहे. या इमारत बांधकामासाठी 5 कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तसेच 22 आदर्श शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यातून विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आणि शाळेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी देण्यात येणार आहे. या विकासात्मक कामांना विजेची गरज असल्याने या शाळांना सौरऊर्जेची व्यवस्था करण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.

पोलिस दलाला नविन चारचाकी आणि दुचाकी वाहने देण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी रूपये देण्यात येणार आहे. यातून 20 चारचाकी आणि दुचाकी वाहने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पोलिस विभागाला करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन मधून जिल्ह्याच्या विकासासाठी आश्वासित निधी प्राप्त होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उभारण्यासाठी या निधीचा उपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

000

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण-तरुणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

योजनेचे निकष :

या योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरीता 18 ते 45 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करु शकते. (अजा/अज/महिला/माजी सैनिक यांना 50 वर्ष). जर प्रकल्प हा 10 ते 25 लाखासाठी असेल तर इयत्ता सातवी पास आणि जर प्रकल्प 25 ते 50 लाखासाठी असेल तर इयत्ता दहावी पास असणे आवश्यक आहे.

उत्पादन उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा 50 लाख रुपये आणि सेवा उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा 20 लाख रुपये आहे.

प्रकल्प अहवालातील निकष :

स्थिर भांडवलाकरीता मशीनरी रक्कम कमीत कमी 50 टक्के, इमारत बांधकामाकरिता जास्तीत जास्त 20 टक्के आणि खेळते भांडवलाकरिता जास्तीत जास्त 30 टक्के असणे आवश्यक आहे. स्वगुंतवणूक 5 ते 10 टक्के, अनुदान मर्यादा 15 ते 35 टक्के आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे. यामध्ये वैयक्तिक मालकी असलेले घटक देखील पात्र आहेत. 

ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसीयल सर्टिफिकेट, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे दहावी, बारावी, पदवीचे गुणपत्रक), हमीपत्र (Undertaking Form) वेबसाईटवर मेनूमध्ये मिळेल, प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र (अजा/अज असेल तर), विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र (माजी सैनिक, अपंग), REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र, लोकसंख्येचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर), पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि अधिकारपत्र आदी कागदपत्रे लागतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी http://maha-cmegp.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.

 

जिल्हा माहिती अधिकारी

उस्मानाबाद

आधी उगवण चाचणी करा, मगच बियाणे पेरा

जिल्ह्यात खरीप हंगामास सुरुवात होत असून घरगुती सोयाबिन बियाणे उगवणे क्षमता तपासणी करुन शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासंदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांचा बरेचदा असा समज असतो की, प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करुनच पेरणी करावी. परंतु सोयाबिन, मुग, उडीद, चवळी, हरभरा भूईमुग, गहू या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत असल्यामुळे कोणतेही संकरित वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही. यामुळे सरळ वाणाचे बियाणे विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारी बियाणे आपण पुढील दोन वर्ष बियाणे म्हणून वापरु शकतो. त्यामुळे दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. बाजारातून विकत आणलेले महागडे बियाणे न उगवल्यामुळे पेरणीकरिता वापरलेली खते, मनुष्यबळ इत्यादी वाया जाते. शिवाय लेखी, पंचनामा यामुळे पेरणीचा कालावधी निघून जाण्याचा धोका होण्याची शक्यता असते. यात शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते. खाजगी कंपनीचे बियाणे विकत घेतले असले तरी शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे हितावह आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे मागील हंगामातील सोयाबिन शिल्लक असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याने घरच्या सोयाबिनची घरीच साध्या सोप्या पध्दतीने उगवण तपासणी केली तर खर्चात बरीच बचत होईल. तसेच फसवणूकही टाळता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती उगवण तपासणी करुनच या हंगामात घरचेच सोयाबिन बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करण्यासाठी सोप्या पध्दती आहेत.

गोणपाट वापरुन उगवण क्षमता तपासणी

गोणपाट पध्दतीमध्ये बियाणांचा प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे. यानंतर सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावे. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुऊन घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट शंभर दाणे मोजून दीड ते दोन से.मी. अंतरावर दहा-दहाच्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे. अशा प्रकारे शंभर दाण्यांचे तीन नमुने तयार करावे. गोणपाटावर पाणी शिंपडून ओले करावे. बियाणांवर दुसऱ्या गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा पाणी शिंपडावे. गोणपाटांच्या तुकड्यांची बियाणांसकट गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. यानंतर सहा-सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरुन उघडावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजा. तीनही गुंडाळ्यांची सरासरी काढून शंभरपैकी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणांसारखे गुणवत्तेचे आहेत, असे समजता येईल. परंतु जर उगवण झालेल्या बियाणांची सरासरी संख्या सत्तरपेक्षा कमी असेल तर एकरी बियाणांचे प्रमाण वाढवून पेरणी करावी. तसेच पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशक व जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

 वर्तमानपत्राचा कागद वापरुन उगवण क्षमता तपासणी

वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या पाडाव्यात. यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा पध्दतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात. त्या गुंडाळ्या पॉलिथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्यामधील अंकुर मोजावेत.

पाण्यात भिजवून उगवण क्षमता तपासणी

बियाणांच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावे. त्या नमुन्यात शंभर दाणे मोजून वेगळे काढा. असे शंभर दाण्यांचे तीन संच तयार करावे. शक्यतोवर काचेच्या तीन पेल्यात पाणी घेऊन त्यात हे दाणे टाकावे. पाच ते सहा मिनीट ते तसेच राहू द्यावे. त्यानंतर पाणी फेकून देऊन दाणे वेगळे काढा व त्यामधील पूर्णत: फुगलेले तसेच बियाण्यांच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळे करावे. यामध्ये दोन्ही प्रकारच्या दाण्यांची संख्या मोजून घ्यावी. जो दाणा पाच ते सहा मिनिट पाण्यात ठेवल्यावर फुगतो तो पेरणीसाठी अयोग्य समजावा. मात्र जे बियाणे चांगले असते त्याचे टरफल शाबूत असल्यामुळे त्यात पाणी आत शिरत नाही. फक्त टरफलातून पाणी आत गेल्यामुळे त्यावर सुरुकुत्या पडल्यासारख्या दिसतात. यामुळे शंभर दाण्यापैकी जरी सरासरी सत्तर किंवा जास्त दाणे अशा प्रकारे न फुगलेले, सुरकुत्या न पडलेले असेल तर बियाणे बाजारातील बियाण्यांसारखे गुणवत्तेचे आहेत, असे समजावे.

शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासल्यानंतरच बियाण्यांची पेरणी करावी. उगवण क्षमता सत्तरपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. अशा पध्दतीने उगवण क्षमता तपासणी केल्यानंतर बियाणे पेरल्यास शेतकऱ्याचे वेळ आणि श्रम दोन्ही वाचेल.

 

माहिती अधिकारी

अपर्णा यावलकर

अमरावती

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना

 

कोरडवाहू भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी  “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना”  योजना शासनाने  सुरू केली आहे.

कमी पाऊस पडणाऱ्या भागात पीकांसाठी सिंचनाची सुविधा महत्वाची आहे.  केवळ पावसावर अवलंबून न राहता पाईप, कालवे, फवारे किंवा इतर मानवनिर्मित साधनांमधून पाणी आणून पिकांना पाणी दिल्यास शाश्वत उत्पन्न घेता येते. विशेषत: ठिबक व तुषार सिंचन शेतकऱ्यांना अधिक  लाभदायी ठरते.

 

कमी पाण्यात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे व पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी  सूक्ष्म सिंचन योजना राबविल्या जातात. राष्ट्रीय कृषि विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी शेतकऱ्यांना 90 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येते.

ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत 55 टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत 25 टक्के असे एकूण 80 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच बहूभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के व 30 टक्के असे एकूण 75 टक्के अनुदान देण्यात येते.

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत 35 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान ठिबक व तुषार सिंचनाचे संच बसवण्यासाठी देण्यात येते. तर बहु भूधारक शेतकऱ्यांनाही दोन्ही योजनेतून 45-45 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो.

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेतून ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी महाडिबीटी संकेतस्थळावरुन 24×7 अर्ज प्रक्रिया सुरु आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून हार्डकॉपी सादर करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन सोडत  असल्याने प्रक्रीया संपूर्णपणे पारदर्शी आहे.  योजनेअंतर्गत 5 हेक्टरपर्यंत लाभ मर्यादा राहील. शेतकऱ्यांच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान थेट जमा होते. केंद्राच्या सुधारित खर्च मर्यादेप्रमाणे सर्व पिकांसाठी अनुदान उपलब्ध होते.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतून सूक्ष्म सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. तर अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

000

संकलन – विभागीय माहिती कार्यालय, पुणे

सोयाबीन पेरणीची अष्टसुत्री

अकोला जिल्ह्यात कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख खरिपाची पिके असून त्यांचे लागवड क्षेत्र व उत्पादकताही जास्त आहे. आगामी खरीप हंगामात एकूण ४ लाख ६९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, कापूस, तूर, मूग उडीद, इत्तर पिक पेरणीचे नियोजन आहे. त्यापैकी सोयाबीनचे २ लाख ३२ हजार हेक्टर, कापसाचे १ लाख ६० हजार हेक्टर, तूर ५७ हजार ५०० हेक्टर, मूग १० हजार हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन आहे. इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणीचे क्षेत्र जास्त आहे. हमखास उत्पन्न व चांगला बाजार भाव यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ होत आहे. सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. सोयाबीनसाठी घरचेच बियाणे वापरणे यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादन वाढते. अर्थात त्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यावर प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबिल्यास हमखास उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी कृषी विभागाने अष्टसुत्री दिली आहे, तिचा अवलंब शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

घरगुती सोयाबीनची प्रतवार

अ) स्पायरल सेपरेटवर – बहुतेक शेतकरी सोयाबीनचे घरचे बियाणे पेरणी करीता वापरत असतांना प्रतवारी न करता वापरतात. त्यामुळे पेरणीसाठी सरसकट ३५ ते ४० किलो बियाणे वापरतात.  सोयाबीन पीक स्वयंपरागसिंचीत असल्याने या पिकाचे सुधारीत वाणाचा वापर केला जातो. सर्वसाधारण ६७ टक्के बियाणे दरवर्षी घरगुती निवडपद्धतीने राखुन ठेवुन ती पेरणी केली जाते. घरगुती राखुन ठेवलेले बियाणे वापर करतांना स्पायरल सेपरेटरमधून प्रतवारी करुन घ्यावी. प्रतवारी केलेले बियाण्याची  घरगुती पद्धतीने उगवण क्षमता तपासावी. उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास शिफारशीनुसार हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे, ७० टक्के पेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास प्रति १ टक्का उगवणीकरीता अर्धा किलो प्रमाणे बियाण्याची मात्रा वाढवावी. प्रतवारी करुनही उगवणक्षमता ६० टक्के पेक्षाकमी असल्यास असे सोयाबीन बियाणे पेरणीकरता वापरु नये.

ब) बियाणे प्रक्रिया केंद्रावरुन प्रतवारी करुन घेणे : ज्या शेतकऱ्याकडे घरगुती पद्धतीने राखुन ठेवलेल्या  सोयाबीनची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे अशा शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील बियाणे उत्पादन कंपन्या व बिजोत्पादन करणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या बीजप्रक्रिया केंद्रावर घरगुती बियाण्याची प्रतवारी करुन घ्यावी.

घरच्या घरी बियाणे उगवणक्षमता तपासणीची पद्धत

वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण बियाणाचे प्रतिनिधीत्व करतील असे 100 दाणे घ्यावे व ते ओल्या गोणपाट, टिशुपेपर, वर्तमान पत्र कागद, जर्मिनेटींग पेपर, ट्रे व मातीमध्ये या कोणत्याही पद्धतीने  बियाणे ओळीत ठेवा, ते गुंडाळा आणि 4 ते 5 दिवस सावलीत ठेवावे. पाच दिवसानंतर अंकुरित बियाणे मोजा आणि अंकुरित बियांची  टक्केवारी काढा.

बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करुन पेरणी केल्यामुळे रोपांची उगवण चांगली होते. रोपाची जोमदार वाढ होते व सुरुवातीच्या काळात कीड व रोगापासून पिकाचे संरक्षण होते. तसेच जैविक बीज प्रक्रिया केल्यामुळे व्दिदल पिकांचे मुळावरील गाठीमुळे हवेतील नत्र स्थिरीकरण होते. तसेच पिकास मुळाव्दारे घेण्याच्या स्थितीत स्फुरद उपलब्ध करुन देते.

रासायनिक बीज प्रक्रिया : पेरणीपुर्वी दोन महिन्याअगोदर किंवा एक दिवस पेरणी पुर्वी कार्बोक्झीन ३७.५ टक्के ३ ग्रॅम + थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. खोडमाशीकरिता थायोमेथोक्झाम ३० टक्के एफ.एस. ६ मी.ली./किलो रस शोषणाऱ्या किडीसाठी इमीडाक्लोप्रीड १.५ मी.ली./किलो बियाणे लावावे. बाजारात बुरशीनाशक+किटकनाशक एकाच वेष्टनात उपलब्ध झालेली आहेत ते ३ ते ५मी.ली./किलो वापरावे. जसे. वार्डन, इलेक्ट्रॉन व कॅसकेड.

जैविक बीज प्रक्रिया : रायझोबीयम+पी.एस.बी.+के.एम.बी. २५ ग्रॅम किंवा ६ मिली/किलो किंवा लिक्वीड कॉन्सर्सिया ६ मिली/किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅक किंवा ६ मिली/किलो पेरणीपुर्वी दोन तास अगोदर करुन बियाणे सावलीत सुकवुन पेरणी करावी.

वाणाची निवड

शक्यतो दहा वर्षाच्या आतील वाणाची निवड करावी. (जेएस-२०२९ (२०१४), एमएयुएस- १५८(२०१०), एएमएस -१००१(२०१८), एएमएस-एमबी-५-१८ (२०१९), एमएयुएस-१६२ (२०१४), जेएस-२०३४ (२०१४), जेएस – २०९८ (२०१९), एमएसीएस -११८८ (२०१३), एनआरसी -८६ (२०१५), एमएयुएस – ६१२ (२०१६) फुले अग्रणी (केडीएस -३४४) (२०१३), फुले संगम (केडीएस-७२६) (२०१६), फुले किमया(केडीएस-७५३) (२०१७), एएमएस-१००-३९(२०१९), केडीएस-९९२(२०२०)

पेरणीच्या पद्धती

 सलग दोन ते तीन दिवसात ७५ ते १०० मिमी पाऊस अथवा चार ते सहा इंच जमीनीत ओल उपलब्ध झाल्यानंतर व वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी.

पेरणीची खोली

 रब्बीमध्ये पेरणी करण्याकरीता बियाणे खोल ओलीत पडावे म्हणून पेरणी यंत्राच्या नळ्या उलट्या म्हणजेच खताची नळी बियाण्याला व बियाण्याची खताला जोडतात.  खरीपाची पेरणी करण्यापुर्वी पेरणी यंत्राच्या नळ्या योग्य प्रकारे जोडणी करुन घ्यावे. पेरणी यंत्राचे फण सारखे खोलीवर लागावे, याकरीता समपातळीत करुन घ्यावे. पेरणी करीत असतांना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर पडत असल्याची खात्री करावी. रासायनिक खत खालच्या बाजुला व त्यावर ५ सेमी अंतरावर बियाणे पेरणी होत असल्याची खात्री करावी.  ट्रॅक्टरव्दारे पेरणी करतांना ट्रॅक्टर सेंकड लो गेअरमध्ये १.९६० आर.पी.एम. ठेऊन प्रति तास ५ किमी या वेगाने चालविल्यास साधारण ४५ ते ५२ मिनीटात एक एकर पेरणी करावी. रात्रीच्या वेळी पेरणी करुन नये. शक्यतोवर बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी करावी. साध्या पेरणी यंत्राने  पेरणी करतांना प्रत्येक सात तासानंतर ६० सेमी रुंदीची खोल मृत सरी पाडावी.

रासायनिक खताची मात्रा

प्रति एकर शिफारशीनुसार उपलब्ध खताचे प्रमाण :

१. युरिया १६ किलो +१०:२६:२६  -४६ किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो.

२. युरिया ६.५२ + १२:३२:१६ -७५ किलो + गंधक २० किलो.

३. युरिया २६ किलो + सिंगल सुपर फॉस्पेट १५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश २० किलो.

४. युरिया ५.७३ किलो + डी. ए. पी. ५२.१६ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश २० किलो + गंधक २० किलो.

५. १५:१५:१५-८० किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो.

६. १८:१८:१० – ६६.४० किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ८.९३ किलो.

वरील पैकी एक खत + गंधक एकरी ८ किलो पेरणी करताना द्यावी. पेरणीनंतर सोयाबीन पिकास युरिया खताची दुसरी मात्रा देण्यात येऊ नये. काही भागात सोयाबीन पिकाची वाढ व्हावी म्हणून पेरणीपासून एक महिन्यानंतर युरिया खताचा वापर करतात. त्यामुळे पिकाची कायिक वाढ होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे पेरणीनंतर युरिया खताचा वापर टाळावा. रासायनिक खताबरोबर एकरी ४ किलो फोरेट किंवा १० किलो कॉर्बो फ्युरॉन दिल्यास सोयाबीनवरील महत्वाच्या किडी खोडमाशी व चक्रीभुंग्याचे व्यवस्थापन करण्यात मदत होते.

तणनाशकाचा वापर

 जमीनीची सेंद्रीय कर्ब व प्रति ग्रॅम जिवाणुची उपलब्धता लक्षात घेता शक्यतो तणनाशकाचा वापर टाळून भौतिक पद्धतीने तण नियंत्रण करावे. अपवादात्मक परिस्थितीतच तणनाशकाचा वापर करावा. पेरणी लगेचच फ्लुमीऑक्झीन ५० टक्के एस.सी. ५ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.  किंवा पेरणीनंतर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान तण दोन ते तिन पानावर असतांना इमॅझीथायपर २० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा क्विझॅलो्रपॉप पी इथाईल ५ टक्के इ.सी. २० मीली प्रती १० लिटर पाणी. यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी नॅपसॅक पंपाव्दारेच करावी. तणनाशकाच्या फवारणी करीता गढुळ पाण्याचा वापर करु नये. तणनाशकाची फवारणी करतांना वापरण्यात येणारे पाणी आम्लधर्मी असावे. त्याकरिता लिटमस पेपरव्दारे तपासणी करावी. पाणी अल्कधर्मी असल्यास सिट्रीक ॲसिड मिसळुन पाणी आम्लधर्मी करुन वापरल्यास तणाचे प्रभावी नियंत्रण होते. फवारणीकरीत असतांना जमीनीत पुरसा ओलावा असणे आवश्यक आहे.

माहिती स्त्रोत – कृषी विभाग.

संकलन –

जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

जमीन अधिग्रहण पद्धत, मोबदला देण्याची कार्यप्रणाली निश्चित करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 16: सामूहिक आणि वैयक्तिक वनहक्क अंतर्गत प्राप्त झालेले वनपट्टे शासकीय किंवा निमशासकीय प्रकल्पासाठी संपादित केल्यानंतर जमीन अधिग्रहण करण्यासाठीची पद्धत आणि अधिग्रहित जमिनीसाठी द्यावयाचा मोबदला याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यात यावी, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिले.

वैयक्तिक वनहक्क धारकांची गाव नमुना नंबर 7/12 च्या धारणाधिकार सदरी भोगवटादार वर्ग -2 नोंदी घेणे आणि अन्य विषयांच्या अनुषंगाने गठित अभ्यास समितीची बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.

एखाद्या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित केल्यास त्यांना भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई किंवा मोबदला नेमका किती असावा याचा अभ्यास करण्यात यावा, असे यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

वनहक्क प्राप्त धारकांना बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचण येणार नाही यासाठी आवश्यक असणारे परिपत्रक पुन्हा एकदा निर्गमित करण्यात यावे, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिल्या.

वनहक्क निश्चित करण्यासाठी कमीत कमी दोन पुरावे सादर करणे आवश्यक असते. हे नेमके दोन पुरावे कोणते असावे याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात याव्या, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केल्या.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारणा नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये वैयक्तिक वनहक्क धारकांची गाव नमुना नंबर 7/12 सदरी भोगवटादार वर्ग-2 (नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनी) अशी नोंद घेणेबाबत महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती 24 मार्च 2023 रोजी नियुक्त करण्यात आली आहे. या अभ्यास समितीची पहिली बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या समितीने सर्व बाबींचा अभ्यास करुन शिफारशींचा अहवाल शासनास सादर करणार आहे.

भूसंपादन केल्यानंतर मोबदला न मिळणे, शेती कर्ज मिळण्यास होणाऱ्या अडचणी, शासनाच्या इतर शेती विषयक योजनांचा लाभ मिळण्यास येणाऱ्या अडचणी, वनहक्काच्या अनुषंगाने इतर सूचना याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

मागासावर्गीयांचा शैक्षणिक विकास, सामाजिक न्याय विभागाच्या योजना खास

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान सुरू करण्यात आले असून, शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजना पोहोचण्यास व कमीत कमी कागदपत्रे, जलद मंजुरी व शासकीय निर्धारित शुल्कात नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने विविध शासकीय विभागांच्या कल्याणकारी योजनांचा वेध घेणाऱ्या लेखमालिकेच्या या पहिल्या पुष्पात सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक विकास योजनांचा आढावा घेण्यात आला आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक शैक्षणिक योजना राबविल्या जातात. समाजातील तळागाळातील, वंचित, मागास समाजातील विद्यार्थ्यांसाठी या योजना मदतीच्या ठरत आहेत. यामध्ये विविध शिष्यवृत्ती, आश्रमशाळा, वसतिगृहे या माध्यमातून संबंधित घटकांचा शैक्षणिक विकास साधला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासन स्तरावरून या योजना राबविण्यात येतात. या माध्यमातून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते व आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण न थांबता ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात.

१)      भारत सरकार शिष्यवृत्ती योजना

सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणाली व्दारे शिष्यवृत्तीचा लाभ  देण्यात येतो. यामध्ये शासन स्तरावर भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षि छत्रपत्ती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता या योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येतात.

२)      शासकीय निवासी शाळा

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत या हेतूने शासकीय निवासी शाळा योजना राबविली जाते. सुसज्ज इमारत, निसर्गरम्य वातावरण, डिजीटल तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, निवास व भोजनाची उत्तम सोय, मुबलक क्रीडा साहित्य, अद्ययावत व्यायामशाळा, शैक्षणिक साहित्य निर्मिती, सर्व महापुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकासपर मार्गदर्शन व्याख्याने, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेमध्ये परिपाठ, विविध स्पर्धा, परीक्षा, प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण २ शासकीय निवासी शाळा आहेत.

३)     शासकीय वसतिगृह योजना

मागासवर्गीय मुलां-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविली जात आहे.

शासनाच्या ध्येय धोरणानुसार साधारणपणे माहे जूनपासून शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू केली जाते. वसतिगृहामधील प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, अंथरुण-पांघरुण व ग्रंथालयीन सुविधा दिली जाते. विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश, क्रमिक पुस्तके, वह्या, स्टेशनरी दिली जाते. वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य दिले जाते. दैनंदिन खर्चासाठी विद्यार्थ्यांना प्रतिमहिना निर्वाहभत्ता दिला जातो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 16 शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत. त्यापैकी 9 मुलांची व 7 मुलींची वसतिगृहे आहेत.

४)     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुविधेचा जागेची मर्यादा लक्षात घेता लाभ देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागून, त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासास मर्यादा येण्याची शक्यता आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सुरू करुन तेथे प्रवेश देणे यासाठी जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा आहेत. सबब, शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते.

५)     संवाद उपक्रम

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे सोयीसुविधा मिळतात की नाही, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना राबवण्याच्या अनुषंगाने संवाद उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.

अधिक माहितीसाठी संपर्क – सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर 413001,  दूरध्वनी क्र. 0217-2734950

 

संकलन

– संप्रदा बीडकर,

जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...

‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

0
मुंबई, दि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. त्याच धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी...

शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन

0
मुंबई, दि. २१ : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस...