गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1488

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०

महाराष्ट्र राज्यात सुमारे 45 लाख कृषी वीज ग्राहक असून देशातील शेतीच्या विद्युत पंपामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे २२ टक्के ऊर्जेचा वापर होत असून प्रामुख्याने या वीजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सध्या शेतकऱ्यांना चक्रीय पद्धतीने दिवसा व रात्री वीजपुरवठा केला जातो. अशाप्रकारे वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची खूप गैरसोय होते, रात्रीच्या वेळी शेतात सिंचन करताना वन्य प्राणी, साप चावणे, इत्यादी धोक्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. या सर्व गोष्टींचा विचार करुन राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपाना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी फिडर्सचे सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे अभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या योजनेमुळे राज्यशासनाला औद्योगिक व व्यावसायिक वीज ग्राहकावर आकारण्यात येणारी क्रॉस सबसिडी कमी होऊन औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांच्या वीज दरात कपात होईल. तसेच या अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या 7000 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात विविध जिल्ह्यामध्ये विकेंद्रित पद्धतीने अंदाजे 30 हजार कोटींची गुंतवणूक होईल व सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, ती 25 वर्षे चालवणे आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, याद्वारे ग्रामीण भागात अंदाजे 6 हजार  पूर्णवेळ व 13 हजार अर्धवेळ रोजगार निर्माण होणार आहे.

या योजनेत निविदा प्रक्रियेद्वारे प्रवर्तक, सहकारी संस्था, खाजगी विकासक (राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय, राज्य शासन / केंद्र शासन यांच्या सार्वजनिक उपक्रम कंपनी, वैयक्तिक विकासक, शेतकरी, शेतकऱ्यांचा गट,सहभाग घेण्यास पात्र राहतील. सौरऊर्जेसाठी शासकीय पडीक जमीन, शासकीय जमीन, निमशासकीय जमीन, महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण कंपनी व महाऊर्जाकडे असणारी अतिरिक्त जमीन धरणांचे जलाशय, खाजगी जमीन इत्यादी जमीनी प्राथम्यक्रमाने सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यासाठी वापरण्यात येणार असून  प्राधान्य क्रमानुसार प्रत्येक जिल्हयात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे.

महावितरण कंपनीच्या मागणीप्रमाणे संबंधित जिल्हाधिकारी यांनी वीज उपकेंद्रापासून 10 किलोमीटर अंतरातील शासकीय / निमशासकीय जमिनींपैकी वीज उपकेंद्रापासून जवळ असणारी जमीन प्राधान्याने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास उपलब्ध करून देईल. त्याबरोबरच वीज उपकेंद्रापासून 5 किलोमीटर अंतरातील जमिनधारक त्यांची जमीन स्वेच्छेने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडेपट्ट्याने देण्यास इच्छुक असतील अशा खाजगी जमिनींपैकी बीज उपकेंद्रापासून जवळ असणारी जमीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्याने विचारात घेण्यात येईल तसेच  पीक कर्जाचा बोजा असणाऱ्या खाजगी जमिनीसुध्दा प्रकल्पासाठी विचारात घेतल्या जातील.

या प्रकल्पासाठी सौर कृषी वीज वाहिनीला उपलब्ध करून देण्यात येणारी जमीन अकृषिक (एन.ए) करण्याची गरज राहणार नाही, अशा जमिनींचे अकृषिक जमिनीमध्ये रूपांतर करणे अनिवार्य राहणार नाही व सदर जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगीची सनद महसूल यंत्रणा तातडीने जारी करेल तसेच अशा जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्पांना महसूल अथवा स्थानिक स्वराज्य संस्था, इ. विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व कर/ फी मधून प्रकल्प उभारणीपासून वीज खरेदी करारनामा (PPA) ते ३० वर्षापर्यंत सूट देण्यात आली आहे.

सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी शासकीय जमिनी नाममात्र वार्षिक रु.1/- भाडेपट्ट्याने व पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याप्रमाणेच या अभियानांतर्गत सौर कृषी वाहिनी योजनेच्या प्रकल्पाकरीता निश्चित केलेली शासकीय जमीन 30 वर्षांच्या कालावधीकरीता नाममात्र वार्षिक रु.1/- या दराने अंमलबजावणी यंत्रणेस भाडेपट्ट्याने देण्यास व अशी जमीन नाममात्र वार्षिक रु.1/- या दरानेच विकासकास पोटभाडेपट्टयाने देण्यास मान्यता देण्यात येईल. भविष्यात महसूल विभागाच्या प्रस्तावित भाडेपट्टा धोरणानुसार शासकीय जमीन भाडेपट्ट्याने देण्यात येईल आणि तोपर्यंत वर नमूद केल्यानुसार नाममात्र वार्षिक रु.5/- या दराने भाडेपट्टा व पोटभाडेपट्टा आकारण्यात येईल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कृषी वीज वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन भाडेपट्टयाने उपलब्ध करून घेताना जमिनीचा त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या 6 टक्के दरानुसार परिगणित केलेला दर किंवा प्रतिवर्ष 1 लाख 25 हजार  प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम पायाभूत वार्षिक भाडेपट्टा दर म्हणून गृहीत धरण्यात येईल, अशा प्रकारे प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टा दरावर (Base Rate) प्रत्येक वर्षी 3 टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येईल.

या योजनेतंर्गत विकासकाला सहज व सुलभरित्या जमीन उपलब्ध होण्यासाठी भाडेपट्टयाची रक्कम महावितरण कंपनीकडून विकासकाने विक्री केलेल्या वीजेच्या देयकातून कपात करुन जमिनधारकास अदा करण्यात येईल, त्याचप्रमाणे प्रकल्पासाठी वापरण्यात आलेली पीक कर्जाचा बोजा असणाऱ्या जमिनीच्या पीक कर्जाची परतफेड त्यांना देय असणाऱ्या भाडेपट्टयाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल.

सौर प्रकल्पांसाठी प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य

या अभियानांतर्गत 11 के. व्ही. / 22 के. की फिटरवर वीज जोडणी करणाऱ्या प्रकल्पधारकांना रु.0.25 प्रति युनिट आणि 33 के. व्ही. वर वीज जोडणी करणाऱ्या प्रकल्पधारकांना रु.0.15 प्रति युनिट प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य प्रकल्प कार्यान्वित झाल्याच्या दिनांकापासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी देय राहील. मात्र सदर प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य डिरोबर, 2024 पूर्वी नोडल एजन्सी / महावितरण कंपनी/ नवीन कंपनी सोबत वीज खरेदी करार करणाऱ्या तसेच निविदेच्या अटी व शर्ती प्रमाणे विहित कालावधीत प्रकल्प कार्यान्वित करणाऱ्या प्रकल्पांना अनुज्ञेय राहील.

या अभियानांतर्गत आस्थापित सौर ऊर्जा प्रकल्प जोडण्यात आलेल्या वीज उपकेंद्राच्या आवश्यक देखभाल आणि सुधारणांसाठी (उदा. ब्रेकर्सची दुरुस्ती / बदलणे, संरक्षण प्रणाली दुरुस्ती किवा बदल, उपकेंद्रातील सर्किट बदल, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, कंपेसिटर बदल, इ.) राज्य शासनाद्वारे प्रति उपकेंद्र रु. 25 लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल. महावितरण / महापारेषण कंपनी सौर प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या वीजेसाठी आवश्यक असलेली तांत्रिक देखभाल दुरुस्ती सदर अनुदानातून करेल. यासाठी वीज उपकेंद्र स्तरावरील आवश्यक कामांसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) सादर केल्यानंतर हा निधी महावितरण / महापारेषण कंपनीला वितरित केला जाईल, सदर प्रकल्प अहवालात नमुद कामे महावितरण/ महापारेषण कंपनी स्पर्धात्मक बोलीद्वारे निवडलेल्या विकासकाशी सल्लामसलत करुन पूर्ण करतील.

महावितरण कंपनीस होणारे फायदे

शेतीसाठी वीज पुरवठयाच्या खर्चात कपात होईल. अपारंपारिक ऊर्जा खरेदी बघनाचे (RPO) उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल, या अभियानांतर्गत वीज उपकेंद्रांचे तांत्रिक सुदृढीकरण करण्यात येणार असल्याने महावितरण / महापारेषण कंपनीची वितरण प्रणाली बळकट होईल, महावितरण कंपनीच्या वीज वहनात होणा-या हानीमध्ये घट होईल, शेतकन्याच्या शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन होणार असल्याने महावितरण कंपनीवरील शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दराने द्यावयाचा वीज पुरवठा कमी होऊन कृषी सबसिडीसाठी शासनावर अवलंबून रहावे लागणार नाही.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांसाठी त्यांच्या मागणीप्रमाणे दिवसा योग्य त्या भाराने वीज पुरवठा उपलब्ध होईल, शेतकरी सिंचनासाठी किती वीजेचा वापर करतात याची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल, या अभियानांतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडेपट्टयाने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना 25 वर्षांच्या कालावधीकरीता शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊन त्यांचा राहणीमानाचा दर्जा व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.

सौरऊर्जा प्रकल्प आस्थापित केले जातील अशा ग्रामपंचायतींना अंदाजे रु.200 कोटीपेक्षाजास्त अनुदान प्राप्त होऊन जनसुविधेची कामे होतील व ग्रामीण भागात सौर ऊर्जा निर्मिती परिसंस्थेचा (इको सिस्टिम) आणि कौशल्याचा विकास होईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कंपनीशी संपर्क साधून या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेचा लाभ घ्यावा.

 

संदीप गावित,

उपसंपादक

जिल्हा माहिती कार्यालय,नंदुरबार

कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन

मुंबई, दि, १८: अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराला ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला.

कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार जे. पी. नड्डा, आमदार आशीष शेलार, आमदार मनीषा कायंदे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्या विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळेच संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. सध्या देशात जी २०च्या बैठक सुरु आहेत. जी २०चे अध्यक्षपद भारताकडे आहे, ही देशासाठी गौरवाची बाब आहे.

देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे. नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पाऊले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना लागणारे शिक्षण, तसेच शिक्षणासाठी देण्यात येणारे अर्थ सहाय्य, शिष्यवृत्ती तसेच रोजगाराच्या विविध संधी, पालकांचे समुपदेशन या शिबिरात केले जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचे उद्दीष्ट आहे. बार्टी, सारथी व महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १ लाख २५ हजार रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध संस्थासोबत राजभवनात करार करण्यात आले. आगामी काळात ३ लाख रोजगार निर्माण करण्यात येतील.

मंत्री श्री. लोढा यांनी मुंबई महापालिका शाळांमध्ये स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरु करण्याची गरज व्यक्त केली होती त्यानुसार १०० शाळांसोबत करार केला आहे, लवकरच महापालिकेच्या शाळांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

युवा पिढीने कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन आज राज्यातील सर्व मतदार संघात आयोजित केले आहे. या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून युवक, युवतींना नक्की फायदा होईल. या शिबीराच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे.

औद्योगिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन शिक्षण घ्या खासदार जे. पी. नड्डा

खासदार जे. पी. नड्डा म्हणाले की, आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी मागणी कळत नाही त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या. तांत्रिक प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अपग्रेड व्हावे लागेल. १० लाख रोजगार देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. प्रधानमंत्र्यांनी २ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे. १३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे. देशात स्कील डेव्हलपमेंटची गरज होती हे लक्षात घेवून प्रधानमंत्र्यांनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली .

प्रधानमंत्री यांनी स्वप्नं पहिले आणि स्कील इंडिया मिशन सुरु झाले. युवा पिढी प्रशिक्षित होताना पुनर्प्रशिक्षण गरजेचे आहे. पुनर्प्रशिक्षणानंतर पुन्हा अपग्रेड होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांत ६६ टक्के महिलांचा समावेश असून, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत १ कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम राबवला, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.५०० कोटी रुपयांची इको सिस्टीम तयार करण्यासाठी तरतूद केली आहे.

राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार – कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, असा प्रश्न असतो तसेच कोणत्या क्षेत्रात आपल्याला कौशल्य प्राप्त करावे लागेल याबाबत साशंकता असते. विद्यार्थ्यांचा संवाद वाढून त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले रोजगार मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन राज्यभरात २८८ मतदारसंघात असे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मेळावे यशस्वीपणे पार पाडले जात आहेत, असेही ते म्हणाले.

मान्यवरांनी केले व्यवसाय समुपदेशन

प्रेरणादायी मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शक डॉ. दिनेश गुप्ता, रोजगाराच्या विविध संधी या विषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक सुरेश वांदिले, करिअर कसे निवडावे या विषयी श्रीमती प्रिया सावंत, व्यक्तीमत्व विकास या विषयी सुचिता सुर्वे तसेच स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन श्री. रोकडे यांनी केले. यावेळी विविध ३८ विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर स्टॉल लावले होते.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. १७ : राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

फोर्ट येथील राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार प्रविण दरेकर, अनंत अडसुळ, अभिजित अडसुळ यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते ४ टक्के व्याजदराने १५ लाखांपर्यंत शेक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरु करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींना मोठा आधार दिला असून त्यांचे अश्रू पुसण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.

शासनाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मधून बाहेर काढण्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनेचा निधी वाढवून मदत केली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाई तातडीने देण्यात आली. शेतकऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे राज्यानेही  वर्षाला ६ हजार रूपये देण्याची सन्मान योजना सुरू केली आहे. अशा विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जाची परतफेड करण्यासाठी १० वर्षे कालावधी म्हणजे नोकरी लागल्यानंतर परतफेड असणार आहे. पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची  व जामीनदारांची आवश्यकता नाही. पाच लाख ते दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल, मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल.

१० लाख ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. पाच लाखांपर्यंत शुन्य टक्के, पाच लाखांच्या वर ते १० लाखांपर्यंत २ टक्के तर १०  लाखांच्यावर ते १५ लाखापर्यंत ४ टक्के व्याजदर असणारी योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशातील सर्व राज्य सहकारी बँकांच्या तुलनेत राज्य सहकारी बॅंकेचा सर्वात जास्त ६ हजार ५४५ कोटींचा स्वनिधी,  सर्वात जास्त ४५ हजार ६४ कोटी रुपयांचा व्यवहार, सर्वात जास्त ३ हजार ८७९ कोटींचे नक्त मुल्य, सर्वात जास्त ६०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा हे या बँकेचे असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर, माजी मंत्री अनंत अडसुळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे प्रशासक  विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले तर व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी आभार मानले.

00000

राजू धोत्रे/विसंअ

शासन आपल्या दारी

राज्याच्या, जिल्ह्याच्या प्रगतीत उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरातून ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे तयार करणे व जिल्ह्यातून त्याचे सनियंत्रण होणे या मुख्य उद्देशाने उद्योगविषयक अनेक शासकीय योजना आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करणे आणि त्याद्वारे रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी या योजना फायदेशीर ठरतात. या लेखात काही महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला आहे.

1)    पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) –

स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्त्वावर भांडवल उभारणी करुन देण्याच्या हेतूने ही योजना राबविली जाते. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र या तीन यंत्रणांमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. राज्य खादी ग्रामोद्योग आयोग, मुंबई सदर योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते.

या योजनेअंतर्गत उत्पादित उद्योग घटकांना कमाल रू. 50 लाखापर्यंत तसेच व्यवसाय-सेवा उद्योग घटकांना कमाल रू. 20 लाखापर्यंतचे अर्थसहाय्य बँकामार्फत केले जाते. उद्योग घटकास 5 ते 10 टक्के रक्कम स्वगुंतवणूक करावी लागते. बँकेचा कर्ज समभाग 90 ते 95 पर्यंत असतो. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी लाभार्थीचे भागभांडवल 10 टक्के असून, शहरी भागासाठी 15 टक्के तर ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदान (मार्जिन मनी) दिले जाते. अनुसूचित जाती / जमाती / इतर मागासवर्गीय जाती / अल्पसंख्याक / माजी सैनिक / महिला/ अपंग प्रवर्गासाठी लाभार्थीचे भागभांडवल 5 टक्के असून शहरी भागासाठी 25 टक्के तर ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान (मार्जिन मनी) दिले जाते.

2)   मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) –  

राज्यातील होतकरु युवक/युवतींसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे. सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या मार्गदर्शनाने व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली जिल्हा उद्योग केंद्र (DIC) व जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय (KVIB) यांच्यामार्फत करण्यात येते. या योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले असून सदर पोर्टल सुलभतेने कार्यान्वित झालेले आहे.

योजनेतर्गत पात्रतेचे निकष : उत्पादन उद्योग, कृषिपूरक उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र, उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी प्रकल्प मर्यादा रु. 50 लाख व सेवा क्षेत्रातील आणि कृषि आधारीत/प्राथमिक कृषी पक्रिया उद्योग प्रकल्पांसाठी प्रकल्प मर्यादा रु. 20 लाख

शैक्षणिक पात्रता – रू. 10 लाखांच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान सातवी पास व रू. 25 लाखाच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान दहावी पास आहे. राज्य शासनाकडून प्रकल्प मंजूरीच्या 15 ते 35 टक्के इतके आर्थिक सहाय्य अनुदान स्वरुपात  लाभार्थ्याची स्वगुंतवणूक 5 ते 10 टक्के, बँक कर्ज 60 ते 80 टक्के व राज्य शासनाचे अनुदान 15 ते 35 टक्के.

3)   सुधारित बीज भांडवल योजना (एसएमएस)

बेरोजगार व्यक्तींना उद्योग, सेवा उद्योग, व्यवसाय याव्दारे स्वयंरोजगार उभारण्यासाठी आवश्यक असलेले वित्तीय संस्थेकडील अर्थसहाय्य मिळविण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देणे हा या योजनेचा हेतू आहे.

धोरणात्मक बदलानुसार सुधारित नियम करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रकल्प मर्यादा रू. 25 लाखांपर्यंत आहे. बीज भांडवल कर्जाची कमाल मर्यादा रू. 3.75 लाख आहे. बँक कर्ज 75 टक्के मिळते. ही योजना वाहन व्यवसाय, व्यापार व उद्योगांसाठी लागू आहे.

रुपये दहा लाखांपेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकल्पांमध्ये बीज भांडवल कर्जाचे प्रमाण सर्वसाधारण प्रवर्गातील लाभ धारकांसाठी 15 टक्के तर अनु.जाती / जमाती, अपंग, विमुक्त व भटक्या जाती / जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 20 टक्के राहील.

बीज भांडवलाची रक्कम मृदु कर्ज (सॉफ्ट लोन) म्हणून द.सा.द.शे सहा टक्के व्याजाने देण्यात यावे. कर्जाच्या रक्कमेची विहित कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थींना 3 टक्के रिबेट देण्यात येईल. मात्र कर्जाच्या रकमेची विहित कालावधीत परतफेड करण्यात आली नाही तर थकित रकमेवर द.सा.द.शे. 1 टक्के दंडनीय व्याज आकारण्यात येईल. कर्जाची परतफेड 7 वर्षांच्या आत करावयाची असून सुरुवातीची 3 वर्ष विलंबावधी (वाहनांसाठी 6 महिने) निश्चित करण्यात येईल.

4)   जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना (जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत)

निमशहरी व ग्रामीण भागात अतिलहान उद्योगांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन त्यांचा विकास साधणे व याद्वारे अधिक रोजगारसंधी व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सुरु करण्यात आली. ही योजना जिल्हास्तरीय योजना असून जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत राबविली जाते.

या योजनेतून 65 ते 75 टक्के बँक कर्ज दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 20 टक्के मार्जीन मनी जास्तीत जास्त कमाल मर्यादा रू. 40000 तर अनु.जाती/जमातीच्या लाभार्थीस 30 टक्के मार्जीन मनी कमाल रू. 60000 पर्यंत दिले जाते. व्याजाचा दर 4 टक्के राहील. लाभार्थीस स्वत:चे 5 टक्के भांडवल बँकेकडे भरणा करणे आवश्यक आहे. बीज भांडवल कर्जाची परतफेड 8 वर्षांच्या आत करावयाची असून मार्जीन मनी कर्जाची परतफेड विहित केलेल्या कालावधीत केली नाही तर थकित रक्कमेवर द.सा.द.शे. 1 टक्का दंडव्याज आकारण्यात येईल.

5)   उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत)

सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक शिबिरे व प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. त्यामध्ये उद्योग / सेवा याकरिता मार्गदर्शन देणे, जागेसंबंधी आवश्यक तरतूदी, प्रकल्प अहवाल तयार करणे, निरनिराळे परवाने मिळविण्याच्या पध्दती विक्रीकरिता आवश्यक बाबी इत्यादीबाबत उपयुक्त माहिती दिली जाते. या योजनेमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन व उद्योग संचालनालयाने मान्यता दिलेल्या अशासकीय कुशल प्रशिक्षक संस्थांमार्फत खालीलप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यांत येतात.

  • उद्योजकता परिचय कार्यक्रम (एकदिवसीय, अनिवासी)

एक दिवसाच्या परिचय कार्यक्रमात व्यवसायाची निवड, उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय व्यवस्थापन, शासनाच्या विविध संस्था व अर्थसहाय्य देणाऱ्या संस्था व यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते. प्रति प्रशिक्षण कार्यक्रम रू. 600/- खर्च राहील.

  • उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (12 दिवसीय, निवासी)

सदर प्रशिक्षण कार्यक्रम 12 दिवसांचे, निवासी व भोजन व्यवस्थेसह आहे. उद्योजकता परिचय कार्यक्रमात निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना उद्योगाशी संबंधित कलागुणांचा विकास व माहिती मिळण्याचा प्रशिक्षणात प्रामुख्याने समावेश आहे. प्रति प्रशिक्षणार्थी रू. 4000/- संस्थेस देण्यात येतात.

  • तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (15 दिवस ते 2 महिने अनिवासी)

या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्पादन/सेवा उद्योगांशी निगडीत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण अनिवासी असून प्रशिक्षणार्थीस 15 दिवसांकरिता रू. 500 आणि दरमहा रू. 1000 तसेच 2 महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रू. 2000 विद्यावेतन देण्यात येते तसेच प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिमाह रू. 3000 संस्थेस देण्यात येतात.

6)   जिल्हा पुरस्कार योजना

लघुउद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी संपादन केलेल्या प्रथित यशाची साभार पोच द्यावी, या हेतूने राज्य सरकारतर्फे जिल्हा पातळीवर जिल्हा पुरस्कार योजना राबविण्यात येते. कमीत कमी 3 वर्ष नोंदणी झालेला आणि सलग दोन वर्ष उत्पादन करीत असलेल्या घटकाचा मालक/ भागीदार/संचालक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतो. पुरस्कारासाठी उद्योजकाची निवड जिल्हा स्तरावर जिल्हा सल्लागार समिती करते. पुरस्कारासाठी उद्योजकांची निवड, विकासाचा वेग, तंत्रज्ञानाचा वापर, स्वावलंबन घटकाचे स्थान, उत्पादन विकास व गुणवत्ता नियंत्रण आयात, निर्यात उत्पादनातील बदल, व्यवस्थापन इ. निकषावर केली जाते. मागासवर्ग/अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना निवडीसाठी अतिरीक्त गुण दिले जातात. प्रथम पुरस्कार रोख रू. 15000 गौरव चिन्ह व द्वितीय पुरस्कार रू. 10000 गौरव चिन्ह देवून पुरस्कारित करण्यात येते.

 

(संकलन संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर)

श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. १७ : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते.

संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी खासदार श्री. लोखंडे आणि संस्थानच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती, शाल देऊन मुख्यमंत्र्यांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

०००००

जात वैधता प्रमाणपत्र –एक गरज

सध्या परीक्षेचा मौसम सुरू आहे. वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळया अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षा सुद्धा सुरू आहे. जेईई, नीट सीईटी, परीक्षांपैकी काही परीक्षा संपल्या आहेत व निकाल यायला सुरुवात झालेली आहे.

निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थी व पालकांची प्रवेशाकरीता कागदपत्रांची जुळवणी सुरु आहे. आरक्षणांतर्गत राखीव प्रवर्गात प्रवेश घ्यावयाचा असल्यास महत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र होय. असे जात वैधता प्रमाणपत्र आपण प्राप्त केले नसेल तर प्रवेशाच्या वेळेपर्यत आपणाकडे वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास आपण आरक्षित प्रवर्गाचे असून सुध्दा आपल्या हक्कापासून वंचित राहू शकता. जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया काय आहे हे आपण समजून घेऊया…

जात वैधता प्रमाणपत्राची गरज :-

        जे विद्यार्थी १२ वी पास झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणार असेल अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. बारावी विज्ञान शाखतील अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकिय,मत्स्य,विधी शाखा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अशा प्रकारे बारावीच्या आधारे ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे त्याकरिता जात वैधता प्रमाणपत्राची गरज आहे.

जात प्रमाणपत्र कुठे काढावे :-

        राखीव प्रवर्गात असणा-या बहुतांश विद्यार्थ्याकडे जातीचे प्रमाणपत्र वर्ग दहावी पूर्वीच काढलेले असते परंतु त्याने जातीचे प्रमाणपत्र काढण्यापूर्वी काही गोष्टीची माहिती घेऊनच जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक असते.

जातीचे प्रमाणपत्र हे अर्जदाराच्या वाडवडीलांचे कायमस्वरुपी वास्तव्य एका निश्चित तारखेस ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी काढणे आवश्यक आहे. उदा.अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास १० ऑगष्ट १९५० पूर्वी अर्जदाराचे वाडवडील ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्याच ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाकरीता १३ ऑक्टोबर १९६७, विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी २१ नोव्हेबर १९६१ पूर्वी ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे अर्जदाराच्या वाडवडीलांचे वास्तव्य नसतांना सक्षम प्राधिका-याने (उपविभागीय अधिकारी) जातीचे प्रमाणपत्र दिल्यास ते जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीमार्फत अवैध ठरविले जाते. एखाद्या अर्जदाराने वाडवडील, शिक्षण, रोजगार निमित्त एखाद्या भागात मानीव दिनांकानंतर वास्तव्यास गेले असल्यास त्यांनी त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढू नये. त्यांचे मुळ वास्तव्याच्या ठिकाणी प्रमाणपत्र काढावे तेच प्रमाणपत्र ग्राह्य राहील.

जातीचे प्रमाणपत्र अचूक असावे :-

        आपण जे जातीचे प्रमाणपत्र काढतो ते पुन्हा तपासून पहावे. स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जे स्पेलींग आहे अथवा वर्ग १० वी च्या बोर्ड प्रमाणपत्रावरील स्पेलींगप्रमाणेच स्पेलींग असावे. तसेच प्रमाणपत्रावर रेव्हेन्यू क्रमांक नमुद असावा, प्रमाणपत्र निर्गमित दिनांक, जातीचे स्पेलींग व जातीचा प्रवर्ग अचूक आहे हे अर्जदारानेच पाहून घ्यावे. वरील बाबी  अर्जदाराच्या प्रमाणपत्रामध्ये चुकीच्या असल्यास ज्या कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्या कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र दुरुस्ती करुन घ्यावे व त्याची पडताळणी करावी.

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी  करीता करावयाचा अर्ज www.barti.evalidity.maharashtra.gov.inया वेबसाईडवर अर्ज करावयाचा असतो. अर्ज करावयाचा असतो. अर्ज करतांना अर्जदाराला मुळ कागदपत्रे अपलोड करावयाची असतात. सर्वप्रथम अर्जदाराने मुळ जातीचे प्रमाणपत्र,अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला,वडीलांचा शाळेचा दाखला अथवा वडील अशिक्षित असल्यास शपथपत्र, आजोबा, पंजोबा, चुलत आजोबा शिक्षीत असल्यास त्यांचे प्राथमिक शाळेचे दाखले अथवा दाखल खारीत उतारा, महसुल विषयक पुरावे उपलब्ध असल्यास अधिकार अभिलेख पंजी,पी-१, पी-२, बंदोबस्त मिसळ, जुने खरेदी-विक्रीपत्र, मेंटेनन्स खासरा, जुनी कर आकारणी, इ.याव्यतिरिक्त असा कुठलाही पुरावा जो अर्जदाराच प्रवर्गानुसार मानीव दिनांकाच्या कालावधीतील असून ज्यावर वास्तव्याचे गाव व जात नमुद आहे असा पुरावा अपलोड करावा व प्रस्तावासोबत संलग्न करावा.

शपथपत्र :-

         जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रस्तावासोबत दोन शपथपत्र जोडणे आवश्यक आहे. शपथपत्र कुठल्याही रकमेच्या स्टॅम्पपेपरवर आवश्यक नाही. साध्या को-या कागदावर लिहिलेले व नोंदणीकृत असावे.नमुना १७ व नियम १४ अन्वये कागदपत्रे खरे असल्याबाबत शपथपत्र असते तसेच यामध्ये कागदपत्रे बनावट असल्यास शिक्षेस पात्र राहिल अशा आशयाचे शपथपत्र असते.तसेच यामध्ये कागदपत्रे बनावट असल्यास शिक्षेस पात्र राहिल अशा आशयाचे शपथपत्र असते.दुसरे शपथपत्र नमुना ३ नियम ४ नुसार कुटुंबाची वंशावळ असते. वंशावळी मध्ये कागदपत्रे संलग्न करतो  त्या  सर्वांचा वंशावळीमध्ये उल्लेख असावा.

सर्व मूळ कागदपत्रे व मूळ शपथपत्रे ऑनलाईन अपलोड करावी.यासोबत ज्या महाविद्यालयाा विद्यार्थी आहे त्या प्राचार्याच्या स्टॅम्प व स्वाक्षरीचे फॉर्म नं.१५ ए सुध्दा अपलोड करावे. सर्व कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन भरलेल अर्जाची प्रिंट काढावी व त्यासोबत अपजलोड केलेली सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित केलेली असावी. मूळ शपथपत्रासह अर्ज कार्यालयात जमा करावा.त्यावर समिती १५ ते ३० दिवसांच्या आत कार्यवाही करुन निर्ण्य देते.आक्षेप असल्यास ऑनलाईन त्रुटी कळविल्या जातात. त्या त्रुटीची पूर्तता करावी.

दक्षता :-

         अर्ज भरतांना जात प्रमाणपत्रावरील माहिती अचुक भरावी.खरे कागदपत्रे अपलोड करावे व सलंग्न करावे.सबंध नसलेली कागदपत्रे जोडू नये.तसेच खोटे व बनावट कागदपत्रे सादर करु नये.

मानीव दिनांकाचे पुरावे नसल्यास दक्षता पथकामार्फत चौकशी करुन निर्णय दिला जातो.अशा प्रकारे खरा मागासवर्गीय अर्जदार योग्य कागदपत्रे असल्यास लाभापासून वंचित राहणार नाही याचा प्रयत्न समिती करते. तसेच खोटे व बनावट कागदपत्रे सलंग्न केल्यास शिक्षेची तरतूदसुध्दा आहे.

श्री. सुरेंद्र पवार

उपायुक्त तथा सदस्य

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,

नागपूर.

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १७ : सन २०२८ साली लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी आज येथे दिली.  सन २०३६ साली भारताने देखील मुंबई आणि अहमदाबाद येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत विचार केला पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

राजदूत पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आलेले राजदूत एरिक गारसेटी यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

एरिक गारसेटी म्हणाले, आपण स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असून भारतात असेपर्यंत क्रिकेटमधील छोटेमोठे तज्ज्ञ होण्याचा आपला मानस आहे, असे सांगून आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी आपण गुजरात येथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  आपण दहा वर्षे लॉस एंजेल्सचे मेयर होतो, असे सांगून लॉस एंजेल्सच्या क्रिकेट टीमचे आश्रयदाते व्हावे यासाठी अभिनेते शाहरुख खान यांना कालच विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली.

पुढील चार महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात टोकियो, ऑस्ट्रेलिया, वॉशिंग्टन व नवी दिल्ली येथे चार बैठकी होणार असून अंतरिक्ष विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, सप्लाय चेन यांसह संरक्षण क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी राजदूत गारसेटी यांनी सांगितले.

आपण चौदा वर्षाचे असताना प्रथम भारतात आलो होतो. त्यानंतर राजदूत म्हणून भारतात येणे हा आपल्यासाठी मोठा बहुमान असल्याचे सांगताना भारत आणि अमेरिकेपुढे समसमान संधी व आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमेरिकेतील लोकांनी भारत समजून घ्यावा व अधिकाधिक विद्यार्थ्यांनी देखील भारताला भेट द्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गारसेटी यांनी सांगितले.

महाराष्ट्राशी कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा झाल्याचे सांगून शिक्षण कौशल्य प्रशिक्षण व हवामान अनुकूल कृषी या विषयात सहकार्य वाढविण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या सर्व भागातून आंब्यांच्या पेट्या

राजदूत म्हणून तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसह देशाच्या सर्व भागातून आपणांस आंब्याच्या पेट्या मिळत असून आपले कुटुंब अद्याप भारतात आले  नसल्याने इतक्या आंब्यांचे करायचे काय असा प्रश्न आपणास पडला आहे. आंब्यांचे दुकानच लावता येईल की काय याची चाचपणी करण्याची सूचना आपण दूतावासातील कर्मचाऱ्यांना केली असल्याची मिश्किल टिप्पणी राजदूत गारसेटी यांनी केली.

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे – राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्राचे राज्यपाल या नात्याने आपण २६ विद्यापीठांचे कुलपती असून अलीकडेच राज्यातील काही विद्यापीठांचे अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कशी करार झाल्याचे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले.

जगातील युवा देश असलेल्या भारताला अमेरिकेने कौशल्य प्रशिक्षण व कौशल्य वर्धन करण्यासाठी तसेच कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात आपल्या शाखा सुरु कराव्या किंवा राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. 

ऐतिहासिक संदर्भ

राजदूतांनी कालच साबरमती आश्रमाला भेट दिल्याचे समजल्याचे सांगून महात्मा गांधी यांनी राजभवन उभे असलेल्या जागी सन १९१५ साली भेट दिली होती, असे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले.  सन १८९६ साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनी देखील तत्कालीन गव्हर्मेंट हाऊस येथे भेट दिल्याचे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले. अमेरिकेतील नागरिकांनी आणि विशेषतः विल ड्युरांट सारख्या लेखकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मदत केल्याबद्दल राज्यपालांनी राजदूतांकडे कृतज्ञता व्यक्त केली.

बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, राजकीय व आर्थिक विषयक काऊंसल क्रिस्तोफर ब्राऊन व राजकीय सल्लागार प्रियांका विसरिया – नायक उपस्थित होते.

०००

 

 

‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि.१४: पुणे महानगरपालिका आणि पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबरेटिव्ह रिस्पॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

केसरीवाडा येथे आयोजित या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त  आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर सलील कुलकर्णी, पीपीसीआरचे डॉ.सुधीर मेहता, उपायुक्त आशा राऊत, महेश सूर्यवंशी, अण्णा थोरात, कुणाल टिळक, आशिष भंडारी, राजीव खेर, श्रीकांत शेट्ये उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, नीटपणे नियोजन केल्यास स्वच्छतेसोबतच कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती करता येते. विशेषतः प्लास्टिकच्या कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करता येतात. कोरडा कचरा उपयोगात आणून कांडी कोळसा तयार करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात नीट नियोजन आवश्यक आहे. या क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्ती आहेत, त्यांच्यात महानगरपालिकेने समन्वय साधावा. सर्वांनी मिळून पुणे शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

शहरात सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी देण्यात येत आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही. शहर स्वच्छतेबाबत नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. राज्य शासन या उपक्रमात सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहर स्वच्छतेचा संकल्प करून प्रत्येकाने शहरासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, शहरात दररोज आज २२ लाख किलो कचरा संकलन होत आहे. २०३५ मध्ये हे प्रमाण दुपटीवर जाईल.  शहरातील ५५० जागांवर उघड्यावर कचरा टाकण्यात येतो. असे भाग कमी करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त मनुष्यबळ, नागरिकांशी संवाद आणि प्रोत्साहन या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. गेल्या चार वर्षात फुरसुंगी येथील कचऱ्याचा डोंगर ७० टक्के कमी करण्यात आला आहे. कचरा संकलनासाठी २५० नवीन वाहने घेण्यात आले आहेत. पुढील महिन्यात ५ अत्याधुनिक वाहने आणि १० विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविकात श्री.भंडारी म्हणाले, शहरातील कचरा संकलन यंत्रणा बळकट करून ९० टक्के कचरा संकलन आणि विलगीकरण व्हावे असे प्रयत्न पुढील वर्षभरात करण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या संदर्भात पुण्याला देशात पुढे आणणे आणि नागरिकांच्या आरोग्यात सुधार करण्यासाठी स्वच्छता आवश्यक  आहे. विश्रामबाग परिसरातून या उपक्रमाची सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.खेर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. वडारवाडीत कचरा संकलनासाठी करण्यात आलेला प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्याने कसबा-विश्रामबाग भागात मोठ्या प्रमाणात हे अभियान हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोहोच नागरिकांपर्यंत असल्याने उत्तम समन्वयाद्वारे पुण्याला स्वच्छ शहर बनविण्यात येईल असे श्री.सूर्यवंशी यांनी सांगितले.

‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाला जनवाणी, सोशल लॅब आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे.

स्वच्छ भारत अभियानात पुणे शहराला यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेसह नागरिकांनीही योगदान द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १७ : पुढील वर्षी स्वच्छ भारत अभियानात पुणे शहराला देशात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येण्यासाठी महानगरपालिकेसह नागरिकांनीही योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा २०२३’ च्या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन उप आयुक्त आशा राऊत, राष्ट्रीय टेनिस खेळाडू तथा पुणे महानरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर ऋतुजा भोसले, माजी नगरसेवक माधुरी सहस्रबुद्धे, कमिन्स इंडिया कंपनीच्या अवंतिका कदम आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, महानगपालिकेने राबविलेली प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धेची कल्पना अतिशय अभिनव असून पुणे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासठी हा चांगला उपक्रम आहे. आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावण्याबाबत जागतिक पातळीवर संशोधन चालू आहे. स्वच्छतेची  सवय म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करावे.

नागरिकांनी आपली सोसायटी, शहर, कार्यालय, कॉलनी, घर स्वच्छ ठेवावे. ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती होते.  प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर आहे. प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करुन विविध वस्तू बनविता येतात, तसेच रस्ता बनविण्यासाठीही प्लास्टिकचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे कचरा म्हणून टाकले जाणारे प्लास्टिक संकलन करणे हाही एक चांगला उपक्रम आहे.

कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहनासाठी पुणे शहरात १०० ठिकाणी कापडी पिशव्या मिळण्याचे यंत्र कार्यान्वित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक बॉटल संकलन करण्यासाठी कमिन्स इंडिया कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारून  चांगले कार्य केल्याचे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते शहर पातळीवरील व क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील वैयक्तिक, शैक्षणिक, व संस्थात्मक गटातील प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांना प्रतिनिधीक स्वरुपात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

प्रास्ताविकात श्री. खेमनार म्हणाले, या अभियानात २३ टन प्लास्टिकचे  संकलन करण्यात आले. पुणे शहरात आपण दररोज २ हजार २०० टन कचरा संकलन करत असून त्यापैकी २०० टन कचऱ्याचे रिसायकलिंग केले जाते. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वच्छतेकडून संपन्नतेकडे’पुस्तिकेचे, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, ‘हवेची गुणवत्ता आणि पुणे’ या शिक्षण हस्तपुस्तिकेचे आणि हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) झेंड्यांचे अनावरण करण्यात आले.

यावेळी पुणे शहरात स्वच्छता अभियानात योगदान देणाऱ्या विविध संस्था, पुनर्प्रकियेद्वारे उत्पादने बनवणाऱ्या, माझा कचरा माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी झालेल्या, कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या संस्था, कमिन्स इंडिया, जनवाणी संस्था, कारागिरी संस्था व  सरहद्द कॉलेज आदींनाही पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

पुणे शहरातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन

पुणे शहरातील १५ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर वैयक्तिक, सर्व वयोगटातील नागरिक, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, संस्थात्मक  गृहनिर्माण संस्था,  व्यावसायिक आस्थापना, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था व  गणेश मंडळे इत्यादी  गटांमध्ये १ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीमध्ये प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेअंतर्गत एकूण २३ टन वजनाच्या प्लास्टिक बॉटल्स संकलित करण्यात आल्या असून या प्लास्टिक बॉटल्सचा पुर्नवापर करणे आवश्यक आहे. या पासून पर्यावरणाचा संदेश देणे करीता सार्वजनिक ठिकाणी शिल्प उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्लास्टीकचा वापर रस्ते विकासना करिता करण्यात येणार आहे. या शिवाय  १६ टन प्लास्टिक पासून नाविन्यपूर्ण पद्धतीने टी शर्ट तयार करण्यात येत आहेत.

‘मेरा लाईफ मेरा स्वच्छ शहर’ हे राष्ट्रीय अभियान १५ मे ते ५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरामध्ये नागरिकांच्या सहभागातून विकेंद्रित पद्धतीने थ्री आर- रिड्यूस-रियुज- रिसायकल सेंटर्स उभारली जाणार असून या अभियानाचे उद्दिष्ट लाईफ मिशनच्या पर्यावरण रक्षण व संवर्धन उद्दिष्टाशी संलग्नित आहे.

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.  आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री श्री. शिंदे  ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या श्री. शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.

००००

ताज्या बातम्या

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

0
मुंबई, दि.२१ : भारतीय संविधानातील कलम ३२४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक...

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...