शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1487

समाजाने दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १८ : समाजात अनेक प्रकारचे दिव्यांग व्यक्ती उत्कृष्ट काम करीत आहेत. अशा व्यक्तींना निसर्गाकडून दिव्य गुणांचे सहावे ज्ञानेंद्रिय असते. समाजाने दिव्यांग व्यक्तीमधील दिव्य गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

दिव्यांग व्यक्तींच्या व्यावसायिक कौशल्याच्या ऑलिम्पिक असलेल्या यंदाच्या १० व्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग अॅबलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक प्राप्त करणाऱ्या ४ दिव्यांग युवक व युवतींचा राज्यपाल रमेश बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १८) राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे येथील बालकल्याण संस्थेच्या वतीने या दिव्यांग पदक विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक दिव्यांग व्यक्ती स्वतंत्रपणे व सन्मानाने जीवन जगू शकेल हे पाहणे समाजाचे कर्तव्य आहे, असे सांगून आज तंत्रज्ञान तसेच बालकल्याण सारख्या सेवाभावी संस्थांमुळे अपंगत्वावर बऱ्याच प्रमाणात मात करता येते असे राज्यपालांनी सांगितले.

आपण समाज कल्याण व सक्षमीकरण संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयक तयार केले होते याचे स्मरण देऊन दिव्यांगांना सन्मानाने जगण्यास आपण यापुढेही शक्य तितके प्रयत्न करू असे राज्यपालांनी सांगितले.

बालकल्याण संस्थेच्या कार्याचे तसेच अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपालांनी संस्थेला भेट देण्याचे मान्य केले.

सन १९७८ साली बालकल्याण संस्था पुणे येथील राजभवन परिसरात सुरु करण्यात आली व आजवर ५००० दिव्यांग विद्यार्थी व युवकांनी संस्थेतील सुविधांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती प्रतापराव पवार यांनी दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालकल्याण सारख्या सुविधा देशात कोठेही नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते चेतन पाशिलकर (पेंटिंग व वेस्ट रियुज मधील सुवर्ण पदक), प्रियांका दबडे (एम्ब्रॉयडरी), भाग्यश्री नडीमेटला-कन्ना (टेलरिंग) व ओंकार देवरुखकर (पोस्टर डिझायनिंग ऑन कम्प्युटर) या दिव्यांग विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या व्यवस्थापक अपर्णा पानसे यांनी संस्थेच्या आजवरच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

दिनांक २३ ते २५ मार्च या कालावधीत फ्रान्स येथे या आंतरराष्ट्रीय ऍबलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ मधील कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (परीक्षोत्तर) (अ.प.) उप सचिव यांनी कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

नवीन पिढीने संशोधन क्षेत्रात पुढे यावे – अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. 18 : संशोधन हे वैयक्तिक स्तरावरील अडचणी, प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुढे येते. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. भारत हा तरुणाईचा देश आहे. युवा पिढीने ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यासाठी संशोधन क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज केले.

आयआयटी, मुंबई येथील व्हीएमसीसी सभागृहात तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन ॲडव्हान्सेस इन रेडिओलॉजी अँड रेडिओथेरपी 2023’ चे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या तिसऱ्या दिवशी ‘जर्नी ऑफ इंडियन एमआरआय’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन  कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर केंद्रीय इलेक्ट्रिक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेल्या समीर (सोसायटी फॉर अप्लाईड माईक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग अँड रिसर्च) संस्थेचे महासंचालक डॉ.पी. एच राव, आयआयटी मुंबई येथील संशोधन आणि विकास शाखेचे प्रमुख प्रा. मिलिंद अत्रे, राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, समीरचे प्रकल्प संचालक राजेश हर्ष, डॉ.तनुजा दीक्षित यांची उपस्थिती होती.

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचा उपयोग सामान्य जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी होणे गरजेचे असल्याचे मत मांडत श्रीमती सौनिक म्हणाल्या, की समीर संस्थेचे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचे कार्य प्रशंसनीय आहे. या क्षेत्रात नवनवीन अद्ययावत वैद्यकीय साहित्य व उपकरणांची निर्मिती करून देशाला आत्मनिर्भरता प्राप्त करून द्यावी.

त्या पुढे म्हणाल्या, सामान्य मनुष्याला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन होणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेतील रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचे अनुभवही कथन केले. चर्चासत्रादरम्यान डॉ. मिलिंद अत्रे यांनी आयआयटी, मुंबई येथील संशोधन आणि विकास शाखेमार्फत सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांची माहिती  देत शाखेच्या कार्याचा आढावा घेतला.

प्रकल्प संचालक श्री. हर्ष यांनी सादरीकरणाद्वारे एमआरआय मशीनचे महत्त्व सांगितले. ‘समीर’ने बनवलेल्या एमआरआय मशीनचे वैशिष्ट्येही सांगितली.  सुरुवातीला समीरचे महासंचालक श्री. राव यांनी समीर संस्थेविषयी माहिती दिली. कोलकाता, मुंबई,  चेन्नई,  गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथील समीरचे केंद्र कार्यान्वित असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यकमाला  विद्यार्थी, संशोधक,  उद्योजक, डॉक्टर उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/ससं/

स्थानिक स्वराज्य संस्थांना मैला सफाईच्या यंत्रसामग्रीकरिता अर्थसहाय्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 18 : राज्यात हाताने मैला साफ करणारे कामगार हे सफाईदूत आहेत. त्यांचे जीव वाचवण्यासाठी हे काम यांत्रिक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठीची यंत्रसामग्री स्थानिक स्वराज्य संस्थांनी खरेदी करावी आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधीची अडचण असेल त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून यंत्रसामग्रीसाठी अर्थसहाय्य पुरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि ‘महाप्रित’मार्फत ‘नमस्ते’ (नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम) या राज्यस्तरीय परिषदेचे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, ‘महाप्रित’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, माजी सनदी अधिकारी अजितकुमार जैन उपस्थित होते.

महाप्रित नोडल एजन्सी

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सफाई कामगारांच्या पुनर्वसनाकरिता आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते `नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम` अर्थात ‘नमस्ते’ या उपक्रमाचा संपूर्ण देशभर शुभारंभ झाला आहे. याचा आज राज्यात शुभारंभ आपण करत आहोत. ‘नमस्ते’च्या राष्ट्रीय उद्घाटन सोहळ्यात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘नमस्ते’ अंतर्गत विविध योजना राबवून सफाई कामगारांचे जीवनमान उंचावण्याबाबत निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन ही परिषद आयोजित केली आहे. राज्यात या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सर्व संबंधित विभाग आणि यंत्रणा यांचा समन्वय ठेवण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित आणि ‘महाप्रित’ यांना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

सेफ्टी टँक स्वच्छ करताना दुर्दैवाने दुर्घटना होतात, जीवितहानी होते त्यांच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने मदत दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यात सोनपेठ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना अवघ्या चार तासात शासन निर्णय काढून मदत देण्यात आली. अशाच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ३८ सफाई कामगारांच्या कुटुंबियांना ३ कोटी ८० लाखांची मदत शासनाने आतापर्यंत उपलब्ध करुन दिली आहे. ही मदत देण्याबरोबरच सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. यासाठी सर्व महापालिका आणि नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांनी सजग राहून अशा दुर्घटनांना प्रतिबंध करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

मुंबई, दि. 18 : मुंबईतील सुमारे २२०० किमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा मुख्यमंत्री श्री.  शिंदे यांनी घेतला. दुपारी तीन वाजता भर उन्हात सुरू झालेला हा पाहणी दौरा सायंकाळी सहाच्या सुमारास वरळी येथे संपला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तो यावर्षी करावा लागू नये, याकरिता नाले सफाई चांगली झाली पाहिजे, नाल्यांचे खोलीकरण मोठ्या प्रमाणावर करावे, असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा नाल्यांचे खोलीकरण कठीण खडक लागेपर्यत करावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल. कर्तव्यात जे कसूर करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

नाल्यांचे खोलीकरण झाल्यावर त्यांची वहन क्षमता वाढेल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते, त्यांची माहिती अधिकाऱ्यांना असते त्यामुळे अशा जागी नोडल अधिकारी नेमून कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने काम करुन घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. वरळी येथील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राच्या ठिकाणी नाल्यांना फ्लड गेट लावण्यात आले आहेत. जेणेकरून भरतीच्या वेळी समुद्रातील पाणी नाल्यांमध्ये शिरणार नाही.

अशाच प्रकारे फ्लड गेट आणि वेगाने पावसाचे पाणी समुद्रात फेकणाऱ्या पंपाची संख्या वाढवावी असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे हद्दीतील नाल्यांचीदेखील चांगल्या पद्धतीने सफाई झाली पाहिजे जेणेकरून रेल्वे रुळांवर पाणी साचणार नाही. याचीदेखील दक्षता घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला सांगितले.

दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे वांद्रे (पूर्व) परिसरातील मिठी नदी येथे आगमन झाले. तेथून त्यांच्या पाहणी दौऱ्यास सुरूवात झाली. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातील भारत नगर येथे वाकोला नदीची पाहणी केली. त्या पाठोपाठ दादरमधील प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकीचे बांधकाम, वरळीतील लव्हग्रोव उदंचन केंद्र या ठिकाणी भेट देऊन नालेसफाई तसेच पावसाळ्यात पाणी साचणार यासाठीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, महापालिका आयुक्त आय. ए. चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु, आशीष शर्मा, महापालिका उपायुक्त, मुख्य अभियंता आदी अधिकारी उपस्थित होते.

जनकल्याणकारी योजना राबवून लातूरचा सर्वांगीण विकास साधणार – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

मुंबई, दि. 18 : “राज्य शासनामार्फत जनकल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू नागरिकांपर्यत पोहोचावा, या अनुषंगाने ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ व त्या बरोबर जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठीचे प्रकल्प या सर्व उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीचे नियोजन केले असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सांगितले आहे.

राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त नुकताच लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार’ देऊन राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या योग्य समन्वयातून आणि योग्य नियोजनातून आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ‘आरोग्यवर्धिनी’ या उपक्रमाची जिल्हा प्रशासनाने कशा प्रकारे यशस्वी अंमलबजावणी केली.या बरोबर सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती देली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. 19 आणि शनिवार दि. 20 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी घेतली आहे.

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी सात वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधित खर्चासाठी सात वर्षे मुदतीचे 3 हजार  कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 23 मे, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 23 मे, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 24 मे, 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 24 मे, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी सात वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 24 मे, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 24 मे, 2030 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 24 नोव्हेंबर व 24 मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 18 मे, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी पाच वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी पाच वर्षे मुदतीचे 3 हजार  कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 23 मे, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 23 मे, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 24 मे, 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 24 मे, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी पाच वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 24 मे, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 24 मे, 2028 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 24 नोव्हेंबर व 24 मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 18 मे, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 18 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे दि.१३ मे रोजी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शासन आपल्या दारी अंतर्गत २७ हजार पात्र लाभार्थ्यांना लाभ झाला असून  या अभियानांतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ होण्यासाठी सातारा पॅटर्न तयार करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मंत्री श्री. देसाई यांनी आज शासन आपल्या दारी अभियान व जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन या विषयाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात करण्यात झाली आहे. या अभियानाच्या निमित्ताने  जिल्ह्यातील खेडोपाडी व दुर्गम भागात प्रशासन पोहोचले असून शासन आपल्या दारी या अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची उद्या बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील जलसाठे होणार गाळमुक्त

शेतजमिनींची सुपिकता वाढवून शेतीचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने  गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविली जाते. जलसाठ्यांमधील गाळ काढल्याने जलसाठ्यांची साठवणूक क्षमता वाढेल व काढलेला गाळ शेतजमिनीसाठी वापरल्याने जमिनीचा पोत सुधारेल. धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे 15 जूनपर्यंत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

 

मंत्री श्री. देसाई म्हणाले, जलयुक्त शिवार टप्पा दोन, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनासंदर्भात काल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या गावांतील कामांची देखभाल, दुरुस्तीची कामे ही या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तातडीने हाती घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या वर्षात जलसाठे शंभर टक्के कसे भरतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.  जलसाठ्यातील गाळ उपसा करुन शेतकऱ्यांच्या शेतात तसेच गायरान जमीन किंवा पडीक जमिनीत टाकण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीसाठी डिझेल परतावा देण्यात येणार आहे. गावागावात जलयुक्त शिवाराने भूजल पातळीत वाढ करण्यासाठी प्रभावीपणे अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व पालकमंत्री यांचे आपल्या जिल्ह्यातील कामांवर लक्ष असणार आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला

अलिबाग, दि. १८( जिमाका) :- भारत देशाला लांबच लांब समुद्रकिनारे लाभले आहेत. या सामुद्रिक संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहोत, असे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला यांनी काल (१७ मे ) रोजी करंजा जेट्टी, उरण येथे केले.
सागर परिक्रमा कार्यक्रम २०२३ अंतर्गत पाचव्या चरणाचा शुभारंभ उरण तालुक्यातील करंजा जेट्टी येथून संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, केंद्रीय मंत्री महोदयांच्या पत्नी श्रीमती रुपाला, केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.अभिलाष लेखी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे, सहसचिव डॉ.जे.बालाजी, श्री.पंकज कुमार,भारतीय तटरक्षक दलाचे डीआयजी अनुराग कश्यप, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम केंद्रीय मंत्री श्री.रूपाला यांनी मच्छीमार बांधवांनी, माता- भगिनींनी त्यांच्या केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानून ते पुढे म्हणाले की,केंद्र शासन मच्छीमार बांधवांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. मच्छिमार बांधवांसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे, त्याचा लाभ सर्व मच्छिमार बांधवांनी जरूर घ्यावा.
या सागर परिक्रमा कार्यक्रमांतर्गत मच्छिमार बांधव, त्यांच्या सर्व संघटना यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या ज्या समस्या, जे प्रश्न, त्यांच्या मागण्या समोर येतील, त्या समस्यांची आणि शासनाच्या योजनांची व धोरणांची योग्य ती सांगड घालण्यात येईल. त्यात ज्या काही सुधारणा आवश्यक आहेत त्या निश्चित केल्या जातील, अशी ग्वाही श्री.रूपाला यांनी यावेळी दिली.
संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कौतुक
आपल्या भाषणात श्री.रूपाला यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कौतुक केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मनोरी येथील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीसंदर्भात अत्यंत संवेदनशीलतेने व तत्परतेने घेतलेल्या निर्णयाबाबतचा उल्लेख करून केंद्रात संवेदनशील निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात तसेच काम करणारे मुख्यमंत्री असल्यावर समस्त जनतेचे भले होणारच, देशाचा सर्वांगीण विकास होणारच, असा विश्वास व्यक्त केला.
भारताचे पहिले आरमार उभे करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीस नमन करून केंद्रीय मंत्री श्री.रुपाला यांनी अनेक वर्ष भारतीय नौदलाच्या ध्वजावरील ब्रिटिश राजवटीचे चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलून त्या जागी छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचे चिन्ह प्रदर्शित करण्याचा निर्णय समस्त भारतीयांचा अभिमान उंचावणारा असल्याचे सांगितले.
केंद्र शासनाने चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मच्छीमार बांधवांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तब्बल ६ हजार कोटी रुपयांची अधिकची तरतूद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात श्री.परषोत्तम रूपाला हे मच्छीमार बांधवांना अशा प्रकारे थेट भेट देणारे आणि त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधणारे पहिलेच केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री असल्याचे सांगितले व त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
ते म्हणाले, आपल्या मच्छीमार बांधवांमधील पारंपारिक व अपारंपारिक हा भेदभाव मिटविणे आवश्यक आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मच्छीमार बांधवांच्या हिताचे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, असे सांगून केंद्रीय मंत्री मच्छिमार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिकेत आहेत. अशा वेळी त्यांच्या आवाहनाला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी केंद्रीय मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्री.अभिलाष लिखी, श्री.पंकजकुमार, करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली परिख व नितेश पंडित यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री श्री.परषोत्तम रुपाला व उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते काही मच्छिमार बांधवांना प्रातिनिधीक स्वरूपात मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात आले. त्याचप्रमाणे मनोरी येथील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ५४ लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला.
सागर परिक्रमा कार्यक्रम-२०२३ (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेला दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातपाटी येथून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा “देशाची अन्नसुरक्षा, किनारपट्टीवर निवास करणाऱ्या मच्छिमारांची उपजीविका आणि सागर पर्यावरणाची सुरक्षा” या मुद्यांवर केंद्रित आहे. भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाने (Fisheries Department) ही यात्रा “आजादी का अमृत महोत्सव” चा एक भाग म्हणून आयोजित केली आहे.
या सागर परिक्रमा यात्रेचे हे पाचवे चरण उरण तालुक्यातील करंजा येथून दि.१७ मे २०२३ रोजी सुरू होऊन दि.१८ मे २०२३ रोजी रत्नागिरी येथे समाप्त होईल. ही सागर परिक्रमा यात्रा करंजा, मिरकरवाडा व मिऱ्या बंदर येथे संपन्न होणार आहे. या यात्रेतून प्रगतशील मच्छिमार मुख्यत्वे किनारी भागात निवास करणारे मच्छिमार, मत्स्य शेतकरी, तरुण मत्स्य उद्योजक इत्यादींना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), केसीसी FIDF आणि महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय विषयक योजनांची माहिती दिली जाईल.
या परिक्रमेत राज्याचे मत्स्य अधिकारी, मच्छिमारांचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसायिक, मत्स्य उद्योजक, मत्स्यसंवर्धक, अधिकारी आणि राज्य, देशभरातील मत्स्य शास्त्रज्ञ सामील झाले आहेत. किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मच्छिमार, मस्यव्यवसायाशी निगडित असलेल्या समुदायाशी आणि हितधारकांशी संवाद साधणे, हा या यात्रेचा उद्देश असून ही परिक्रमा संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवरील राज्याच्या समुद्रमार्गातून जाणार आहे.
या कार्यक्रमास मच्छीमार बांधव, मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...